Skip to main content

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 25/03/2016 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली. पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला. तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत! या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा. अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे? आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं --मुनव्वर राना
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28118
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात चंद्रपूरला गेलो होतो. घरा शेजारी मोठे विद्यत केंद्र, पंचक्रोशीत हि ४-५ सरकारी आणि निजी. तरीही रोज १० तास वीज नव्हती. (विदर्भाच्या गरजेपेक्षा किमान १० पट जास्त वीज निर्मिती विदर्भात होते). ज्या राज्यांत वीज निर्मिती जास्त आहे, तिथे विजेचे बिल कमी असते. उदा: हिमाचल प्रदेशला प्रत्येक जल विद्युत योजनेत १५-२५% वीज मुफ्त मिळते. ३ रुपये निर्मिती लागत असलेल्या विजेसाठी विदर्भकराना, मुंबई सारखे बिल भरावे लागत. मुंबईला २४ तास वीज मिळते आणि विदर्भातल्या अनेक गावांत वीज नाही आहे. शिवाय चंद्रपूर नागपूर सारख्या शहरांत हि वीज कट असतेच. विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड सारखे विदर्भात २४ तास वीज राहील. विदर्भाचा विकासाला वेग येईल. सोन्याची मुर्गी हातची जाईल.

In reply to by विवेकपटाईत

विवेकसाहेब निर्मीती पारेषण व वितरण या वेगळ्या कंपण्या आहेत. कंपण्यांच्या नावावरून त्यांची कार्यकक्ष कळते. लोडशेडींग रिकव्हरीवर अवलंबून आहे. एक महिना बिल भरले नाही तर काय होते ते एखाद्या मुंबईकराला विचारा.

In reply to by मितभाषी

लिहीण्यासारखे खूप आहे. पण आता टंकाळा आला आहे.

In reply to by मितभाषी

एकदा चंद्रपूरला या आणि वास्तव अनुभवावा. विदर्भचे लोक हि बिल नियमित पणे. विजेची सर्वस्त जास्त चोरी उद्योगात होते. विश्वास नसेल तर वितरण वितरण कंपनीत कार्य करणार्याला विचारा.

In reply to by विवेकपटाईत

विश्वासाचा प्रशन नाही साहेब. तुम्ही क्रूपया अभ्यास वाढवा. मी गेले २१ वर्षे याच क्षेत्रात काम करत आहे. विदर्भात माझे आजही काम चालू आहे व सर्व फर्सटहॅड आकडे माझ्याकडे आहेत. फक्त फेकाफेकी करू नका हि विनंती.

In reply to by विवेकपटाईत

विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड सारखे विदर्भात २४ तास वीज राहील.
म्हणूनच अर्थशास्त्र हा विषय शाळेत असताना कंपल्सरी शिकवला पाहिजे. तो फार महत्वाचा विषय आहे. मुंबई वेगळ्या विदर्भाकडून वीज सहज विकत घेवू शकतो. खरं तर सध्या जी वेगवेगळी राज्ये वीज विकतायत, त्या मधून मुंबई सहज सर्वात कमी खर्चाचा पुरवठादार शोधू शकतो. मुंबई फक्त वीजेवर अवलंबून नाहीये. तिला लागणारी ती फक्त एक गोष्ट आहे. बाकी विदर्भ वेगळा झाला तर ते पश्चिम महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे. एक तर नोकरशाही विभागली जाईल, त्यामुळे सरकारवरचा नोकरशाहीवरचा खर्च वाचेल. दुसरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उगम पावणार्‍या गोदावरी चं पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल.

सहमत! पण काय आहे ज्यांनी विदर्भ मागणी पुढे रेटायचि तेच आज मुम्बईच्या सिंहासनावर बसून विदर्भचा अनुशेष भरून काढू अशा वल्गना करतायेत! वेगळ्या विदर्भाचा विषयच नाही! जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत विकास नाही! ----एक पश्चिम महाराष्ट्रीय

In reply to by DEADPOOL

स्पष्ट लिहिलेले खालील वाक्य आपण वाचलेले नाहीत काय?? या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, ************************************** तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! हे ही लेखक महाशय बोलले आहेत, अन ते उगाच अभिनिवेषात येऊन कंसात पश्चिम महाराष्ट्रियन वगैरे लिहून आपण सिद्ध करताय इतके नोंदवतो!! असो!.

भारतातील बरीच राज्ये एक स्वतंत्र देश बनू शकतात... आणि एक पश्चिम महाराष्ट्रीयन म्हणून मी त्याचा निषेध करतो

In reply to by भाऊंचे भाऊ

Nation ही संकल्पना लक्षात घेतली तर तुमचे म्हणणेही खरेच आहे हे लक्षात येईल.

In reply to by भाऊंचे भाऊ

काय भाऊ राज्य अन देश ह्यात तरी फरक करा! अन त्याहुन जास्त म्हणजे तुम्ही परत परत लेखकाचाच मुद्दा सिद्ध करताय झाले!!!

In reply to by नाना स्कॉच

पश्चिम मराठी लोकांनी आपले तोंड बंद ठेवावे अन एक पश्चिम मराठी माणुस म्हणून माझे तोंड उघडून मी हेच सांगेन की काश्मीर हां भारताचा अविभाज्य भाग आहे भलेही उभ्या आयुष्यात मी कधीही काश्मिरला स्थायिक होणार नसेन

In reply to by भाऊंचे भाऊ

आराररा मालक जरा गुळ पाणी घेता काय वैच?? कच्याला जीव तापविता जनु!! एकाव एक उदाहरणे गोळ्याझाडल्यागत हानतायसा तुमी पर सगळी हुकल्याली हैती हो!!

In reply to by नाना स्कॉच

हुकने का चान्सिच नय बस थर्ड हम्पायर प्रामाणिक होना मंगता... पश्चिम मराठी म्हणून पुन्हा सांगतो केवळ गवतही उगवत नाही आशा जमिनीवर रहायला मी जाणार नाही पण म्हणून ती जमीन मी चीनच्या ताब्यात द्यायला माझा स्पष्ट विरोध आहे

लहान राज्ये जास्त जास्त कार्यक्षमरीत्या चालवली जातात असे वाटते. हिंदीभाषी अनेक राज्ये असू शकतात तर मराठीभाषी का नकोत? तसे वर्‍हाडातल्या लोकांना मुंबई फार लांब आहे. गोवा सार्वमताच्या वेळी मुंबई फार लांब आहे, त्यापेक्षा पणजी राजधानी असली तर जास्त बरे हा एक मुद्दा प्रभावी ठरला होता. परंतु विदर्भाकडे उत्पन्नाची मुंबईसारखी काय साधने आहेत? की वेगळे राज्य केल्यावर निधीसाठी केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागेल?

In reply to by पैसा

पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै!मुद्दा हा की संयुक्त महाराष्ट्र समर्थक आवाज विदर्भातून कमी, पश्चिम महाराष्ट्रातूनच जास्त निघत आहेत हा आहे.

In reply to by स्वामी संकेतानंद

स्वतंत्र विदर्भाला विरोध पश्चिम महाराष्ट्रातून इमोसनल कारणे दाखवून केला जातोय असे तुम्ही म्हणताय ते ठीक. पण स्वतंत्र विदर्भाची मागणी पुरी झाली तर पुढे राज्य कसे चालेल याचा काही विचार असेल ना. विदर्भातलेच फडणवीस आता सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गडकरी मोठ्या पदावर आहेत, मग ते स्वतंत्र विदर्भासाठी काय करतील? फडणविसाना स्वतंत्र विदर्भाबद्दल बोलायचे नाही अशी अट घालून मुख्यमंत्री केलंय का?

In reply to by स्वामी संकेतानंद

म्हणूनच मी कंसात पश्चिम महाराष्ट्र म्हटले! कारण माझ्या मताचे सार्वत्रिकरण व्हायला नको!

तसं बघाया गेलं तर आमच्या कवठे महांकाळ आन तासगाव तालुक्यात बी द्राक्ष आन उसाचं अमाप पिक हुतया तरीबी आम्हाला द्राक्ष आन साखर स्वस्त मिळत न्हाई,अर्धी अधिक साखर इदर्भातील लोक उन्हाळ्यात सरबत करून आणि थंडीत च्या करून पेत्यात, आमचा कवठे महांकाळ आणि तासगाव तालुकाबी येगळा करा म्हंजी आमच्याकड बी बक्कळ पाऊस पडील आन आमचा इकास हुईल, आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे शायद आपकी पैलेच शादी हुई है -सुन्नव्वर शाणा

In reply to by पैसा

कोकण गोव्यात समाविष्ट करा त्यामुळे तरी तेथे पर्यटन व इतर व्यवसाय वाढेल सुब्बता येईल.

In reply to by निनाद मुक्काम …

नाका रे! गोयां आसा तितलें पुरो. सुशेगाद रावच्या बरें नीऽऽ..

In reply to by नाना स्कॉच

बरोबर राजेहो! तुमी बी इदर्भातलेच दिसून रायल्या मले!!

In reply to by स्वामी संकेतानंद

नाही मी प्रॉपर पश्चिम महाराष्ट्रियन आहे हो! फ़क्त मी अभिनिवेष ठेवत नाही हे एक कारण असू शकेल !! थोडक्यात आमच्याकडली जनताच ते विदर्भाला एक प्राइस पोससेशन सारखे पाहतात हे आपापल्या प्रतिसाद अन स्वाक्षरी मधुन सिद्ध करीत आहेत इतके मात्र जाणवले!!

In reply to by नाना स्कॉच

च्यायला , आता मिपाला माझे प्रतिसाद सुद्धा नकोसे झाले कि काय? बादवे नाना, अभिनिवेश नसला तुमच्या बोलण्यात तरी 'कुंपणावरचे' दिसताय एवढेच सांगायचे होते.

In reply to by विशाल कुलकर्णी

ऑ, आम्हालातर कुंपणावरही अभिनिवेश दिसला ब्वॉ! - (कुंपणकरी) सोकाजी

In reply to by स्वामी संकेतानंद

तसे नसेल,विदर्भाच्या वाटयाचा पैसा हि पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी पळवून नेतात ना त्याला विदर्भ वेगळा झाल्याने पायबंद बसेल म्हणून हि वेगळ्या विदर्भाच्या मागणीविरोधात तावातावाने बोलत असतील।

पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना लष्कराच्या भाकरी भाजायची जुनी खोड आहे म्हणून असेल. मग ते राज्य पातळीवर असो नाहीतर देशपातळीवर. कुठे देशच एकसंध ठेवायला मारतील / मरतील फौजेत जाऊन तर कुठे सगळे मराठी जन एकत्र ठेवायला.

In reply to by सातारकर

मराठी भाषिक 2 राज्ये झाली तर बॉर्डरी काय भारत पाकिस्तान असतील अशी काहीशी आपली समजूत आहे का सातारकर?? :D

In reply to by नाना स्कॉच

कर्णाटक च्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे; बेळगाव महाराष्ट्रात जायचं असेल तर पाकिस्तान युद्धापेक्षा जास्त सेना लागेल. यावर आपल काय म्हणण आहे? :)

In reply to by सातारकर

कर्नाटक महाराष्ट्र जो प्रॉब्लम झालाय तो भाषेमुळे झालाय नै का पावनं?? मी दोन स्वतंत्र मराठी भाषिक राज्यं असं बोललो सुद्धा हाय की, वाचले नै काय? विदर्भ वेगळा करण्यात तो मुद्दा होता/ आहे वह्य?? हे म्हंजी सोमालिया अमेरिका परराष्ट्र संबंध कसे आहेत ह्यावर आज जेवाय आमटी नको ठरवल्यागत झाले आहे बरंका. उगा कच्याला वडाची साल पिंपळाला म्हणतू मी! कर्णाटक महाराष्ट्र वेगळे उर्वरीत महाराष्ट्र विदर्भ वेगळे असे वाटते बुआ

In reply to by नाना स्कॉच

माझा समज (आता गैरसमज) असा होता कि हा प्रश्न नको त्याला नको त्याच्यात घातल्यामुळ आणि मग नको त्याचि बळजबरि केल्यान झाला आहे.

In reply to by सातारकर

मराठी भाषिक बेळगावला बळजबरी कर्नाटकात घातल्यामुळे अन त्यांच्यावर कन्नड़ भाषेची बळजबरी केली गेली, त्यामुळे प्रॉब्लम झालाय असेच आपण म्हणता आहात काय? बरं, ह्यातले काय विदर्भ - उर्वरीत महाराष्ट्राला लागु होईल ते ही सांगा , माझेच खरे असे म्हणणे नाही फ़क्त मुद्दा नीट सांगा , श्लेष अलंकार नको पुस्तकी प्रमाण भाषेत नीट सांगा. मुळात तर भाषिक वादच आहे न? का कसे? अन तो वाद विदर्भ उर्वरीत महाराष्ट्रात कुठे आला म्हणे?

In reply to by सातारकर

आम्ही तर बाबा जन्मभूमी कर्नाटक असूनसुद्धा, बेळगाव, कारवार,अथणी आणि निप्पानीसह संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करतो. आणि आमच्या महाराष्ट्राला वैदर्भीय मुख्यमंत्री लाभले असून ते कर्नाटकच्या मुख्य मंत्र्यासारखे बरळत नाहीत याचं आम्हाला विशेष कौतुक वाटते

In reply to by सतिश पाटील

फक्त विदर्भवाद्यांना पश्चिम महाराष्ट्रान मांडिखाली दाबून ठेवलय (आणि ते तसे राहीलेत) अस कुणी म्हटल की मला हसू येत, त्याला माझा नाइलाज आहे. तरी आर्थिक्दॄष्ट्या मराठवाडा जास्त गरिब असूनही ते बिचारे असल काही म्हणत नाहीत.

इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा हिंदू-मुस्लीम, आतले-बाहेरचे, महाराष्ट्र-कर्नाटक, वेगळा विदर्भ, भारत पाकीस्तान, आईची जय हेच विषय जास्त महत्वाचे आहेत हे एकंदरीत मिडियात डोकावून पाहिलं तर लक्शात येते. प्रजेचा इंटरेस्ट अशाच प्रश्नांत जास्त तर राजकीय पक्षांकडून वेगळी अपेक्षा तरी कशी ठेवायची ? महागाई, भ्रष्टाचार, दुष्काळ, पाणी टंचाई, शिक्षण यासारख्या विषयांवर किमान साधक बाधक चर्चा करण्याला आणि जमलेच तर त्या दिशेने हात पाय हलवायला आपण प्राधान्यक्रम कधी देणार आहोत देव जाणे !

In reply to by धर्मराजमुटके

तुम्ही इशारा करताय ते मुद्देही महत्वाचे असले तरी मोठ्या प्रमाणावर ज्या भागांतील लोक विकासाच्या व संधींच्या अनुशेषामुळे दीर्घकाळापासून बाधित आहेत त्यांच्या मुद्द्यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. त्यावर भावनिक उत्तरे देणे तर अतिशय चुकीचे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

तेच तर मी म्हणतोय. मी उल्लेख केलेला कोणताही मुद्दा बघीतला की त्यात व्यवहार्यता कमी आणि भावनिक मुद्द्यांवरची लढतच जास्त दिसतेय. मला प्रामुख्याने खालील प्रश्न आहेत. १. वेगळा विदर्भ किंवा मराठवाडा करायचा की नाही हे कोणी ठरवायचे ? राज्यकर्त्यांनी की तिथल्या बाधित जनतेने ? की उर्वरीत महाराष्ट्राने ? २. वेगळे राज्य निर्माण झाल्यास त्याचा आर्थिक व्यवहार कसा चालणार याचा अभ्यास येथून मागे स्थापन झालेल्या अनेक समित्यांनी केला असेलच. किंवा मागास जिल्ह्यांचा अनुशेष कसा भरुन काढायचा यावरही कित्येक वेळा चर्चा झाल्या आहेत. केळकर समितीचा अहवाल त्यातल्या त्यात जास्तीत जास्त आदर्श मानला जातो. (इच्छुकांना अहवाल येथून उतरवून घेता येईल. ३. विदर्भ / मराठवाडा मागास राहण्यात केवळ सरकारी अनास्था कारणीभूत आहे की काही तांत्रिक / व्यवहार्य अडचणी देखील आहेत काय हे तपासून बघीतले आहे काय आहे ? की ही कारणे केवळ आणि केवळ राजकीय आहेत ? मनात बरेच प्रश्न आहेत पण ज्याची प्रामाणिक उत्तरे मिळणे आणि मिळालेली प्रामाणिक उत्तरे पचविणे हा एक वेगळाच विषय आहे. शेवटी माझा अंदाज : सध्याचे महाराष्ट्रातील भाजपा सरकार आपल्या पाच वर्षातील शेवटच्या कार्यकालात यावर निर्णय घेऊ शकते. जर महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापनेची संधी असेल तर तो निर्णय घेणे पुढे ढकलला जाऊ शकेल. मात्र जर महाराष्ट्र हातातून जातेय हे दिसले तर कमीतकमी विदर्भ तरी हाती असावा म्हणून राज्यविभाजनाचा निर्णय होऊ शकतो. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता अनुशेष भरुन काढण्याचा पर्याय वापरता येईल की नाही याबद्दल साशंकता वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

तपशीलवार प्रतिसादाबद्दल धन्यवाद. गेल्या दोन वर्षांत मिपावर या विषयावर चर्चा झाल्या आहेत. त्यांचे दुवे इथे देतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

धन्यवाद ! चर्चांवर लक्ष ठेऊन असतोच. आपण निर्देश केलेल्या सगळ्या चर्चा वाचल्या आहेत. पण आख्याड्यात उतरायचा कंटाळा करतो. १००-१२५ प्रतिसांदांत १०-१५ प्रतिसाद लक्ष देण्यालायक असतात पण ते जरी वाचायला मिळाले तरी संस्थळावर आल्याचे सार्थक होते. धाग्यांबद्दलदेखील असेच म्हणता येईल. असो.

हाच मुद्दा माझे मित्र श्री गजू तायडे यांच्या शब्दांत.... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ : भाऊ? : काय होय बे? : तुमच्या घरात राहाचं नाही मले. मले अल्लग राहाव वाटते. : काहून बे? मस्ती आली का तुले? : तुमी रोज तूप-साखर-पोयी खाता. आम्हाले शियापाक्या भाकरी खाऊ घालता. : अबे पन अल्लग होऊन घरान्याच्या इज्जतीले बट्टा लावशीन काय बोहार्‍या? : मंग काय कोरड्या भाकरीचे कुटकेच चावत बसू काय अथीसा? : अल्लग व्हाची भाषा करशीन तर तंगडंच तोडंन तुहं! : मले वाटलंच होतं तुमी धमक्या द्यान म्हनून. त्याच्यापेक्षा प्रेमानं तूप-साखर-पोयी वाटून घेतली असती तं? : अबे, अल्लग निंघशीन तं शिया भाकरीची तरी सोय हुईन काय तुही? : ते माहंवालं मी पाहून घीन ना! तुम्ही कायले फिकर करता? खरं म्हनसान तं तुमची फिकर दुसरीच हाये. : मले कोन्ची फिकर हाये बे? : तुम्हाले फिकर हाये का मी अल्लग झालो तं तुमची तूप-साखर-पोयी बंद हून जाईन! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मग तुम्हाला काय अपेक्षा आहे तिबेटी लोकांनी यावरती तावातावाने बोलावे का ?

In reply to by भाऊंचे भाऊ

तुमच्या लक्षात नाही आले. घेणे ना देणें, फुकट कंदील लावणे अशी एक म्हण आहे पहा

In reply to by स्वामी संकेतानंद

सर्व पश्चिम महाराष्ट्रीय जनतेला विनंती आहे की या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये! घेणे ना देणें, फुकट कंदील लावणे ही म्हण लक्षात ठेवावी!!

In reply to by DEADPOOL

चर्चा करा, भावनिक आवाहने करू नका, मारायला धावू नका.

कोण मारायला धावले? आपली म्हणचा अर्थ घेतला तर आपण सरळ आम्हाला रिकामटेकडे अथवा बिनकामाचे म्हणत आहात! मग आवाहन केले तर चुकलं काय? असो या धाग्यावर माझा शेवटचा प्रतिसाद!!! (म्हण लक्षात ठेऊन.......)

In reply to by DEADPOOL

इथे नाही, बाहेर जे अनुभव आले ते पाहून हे सगळे लिहिले मी. म्हणूनच पोस्टमध्ये हळवे मावळे म्हणालोय

वेस्ट महाराष्ट नाही पण पुणे मुंबई मधील सेनेचे समर्थक अस्मिता भावना ह्यांचे राजकारण जोरात करतात ह्यामुळे विधार्भात जनाधार कमी होतो आहे तेच आता पुढील काही वर्षात मराठवाड्यात होईल , काडी सारण्यात आली आहे आता स्वतंत्र मराठवाडा वणवा पेट घेईल. मुळात विधार्भ महाराष्ट्रातून वेगळा झाला तर महाराष्ट्राचे असे काय नुकसान होणार आहे राजकीयदृष्ट्या मराठी खासदार केवळ महाराष्ट्रासाठी एकत्र येउन दक्षिण भारतीयांच्या सारखी संसदेत आपल्या मागण्या करत नाहीत,आपली लॉबी उभारत नाहीत, विधर्भ खनिज व इतर नैसर्गिक सामुग्रीने संपन्न आहे तेथे फडणीस मुख्यंमत्री झाले तर महाराष्ट्रात खडसे तावडे ह्यांना संधी मिळू शकते मात्र विधर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्राचे थोडे कर्ज तो आपल्या शिरावर घेणार का हा यक्ष प्रश्न आहे. माझ्यामते देवेंद्र त्यांच्या शेवटच्या वर्षात स्वतंत्र विधर्भाची घोषणा करेल. त्याला विरोध होऊ नये म्हणूनच स्वतंत्र मराठवाड्याची हवा पसरवली आहे राष्ट्रवादी सूचक मौन बाळगून आहेत तर कोन्ग्रेज मध्ये दोन गट पडले आहेत.

विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करावाच. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र म्हणजे मुंबई,कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून एक राज्य झाले कि जीडीपी किती उच्चांकावर असेल?आणि किती संपन्न प्रदेश असेल नै? माण,खटाव,जत अन सोलापूरचा काही भाग पाण्याने संपन्न करावा लागेल इतकेच, शिवाय उपराजधानी पुणे असेल?मज्जाच मज्जा. ते मराठवाडा अन् विदर्भवाले त्यांचं ते बघोत,दुष्काळ पडल्यास मदत मिळणार नै!!

एक लक्षात आलंय का? कुठलाही पुणे मुंबईचा माणूस नागपूर आणि बाकीच्या वैदर्भीय शहरांत (बाकीची कोणती शहरं आहेत विदर्भात?) घरं विकत घ्यायला जात नाही. पण पुणे मुंबईत हे "जाऊन राहिले" वाले बरेच फ्लॅट विकत घेवून इथले जमिनीचे आणि जागांचे रेट वाढवत स्वतंत्र विदर्भाची तुणतुणे वाजवत असतात. तेव्हा त्यांना तो वेगळा विदर्भ देवून टाकावाच. तसंही तिकडं इथल्या कुणाचं काम असेलसं वाटत नाही. पण नंतर वैदर्भीय लोकांना इथले फ्लॅट, जागा विकत घ्यायला कायद्याने (किंवा अ-कायद्याने) बंदी घालावी. घ्या ते नागपूर आणि फुटा. पहिल्यांदा इथले फ्लॅट सरकारजमा करा. बाकी राहिला प्रश्न वीज कुठून मिळणार आणि खनिजं कुठून मिळणार वगैरेचा. ते बघून घेवू आम्ही. तुम्ही निघा.

In reply to by काळा पहाड

फ्लॅट विकत घेवून इथले जमिनीचे आणि जागांचे रेट वाढवत स्वतंत्र विदर्भाची तुणतुणे वाजवत असतात धन्यवाद!! बाकी तुमचा एकंदरित पिंड द्वेषमुलक असल्या कारणे अजुन काही बोलायची इच्छा नाही आपल्याशी, तरीही आपल्या तर्कातील (?) दोष आपणांस दिसला असेल अशी (भाबड़ी) *आशा आहे *आशेला ठळक केलेले आहे बरंका! मी स्वतः एक पश्चिम महाराष्ट्रियन आहे अन तरीही मला तुमचे बोलणे चुकीचे वाटले !! लोकांनी मेहनतीच्या पैश्याने विकत घेतलेल्या फ्लॅटमधे वेदपठन करावे का वेगळ्या विदर्भावर चर्चा करावी ही त्या त्या गृहस्वामीची हक्ककक्षा आहे , शिवाय फ्लॅट सरकारजमा करायला सांगणारे आपण कोण घटनासिद्ध पदाधिकारी आहात म्हणे प्रशासन/सरकारातले? उगाच आपले काहीही राव!

In reply to by नाना स्कॉच

स्कॉचनाना,
लोकांनी मेहनतीच्या पैश्याने विकत घेतलेल्या फ्लॅटमधे वेदपठन करावे का वेगळ्या विदर्भावर चर्चा करावी ही त्या त्या गृहस्वामीची हक्ककक्षा आहे
स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर पुण्या मुंबईत फ्लॅट कशाला हवेत? हे म्हणजे विप्रो मध्ये नोकरी करत असताना विप्रो कशी वाईट आहे, टीसीएस कशी चांगली आहे याचा प्रचार केल्यासारखं झालं. जर विदर्भ हवाच आहे, तर काया वाचा मन तिन्ही ने तो मागा नं. पुण्यात येवून रहायचं आणि नागपूर वेगळा करण्यासाठी आंदोलनं करायची हा दुतोंडीपणा कशाला? त्या अणे महाशयांना महाराष्ट्राबद्दलेवढा आकस आहे, तर महाराष्ट्राचं पद स्वीकारलं कशाला? ते पद नाकारून मग अक्कल शिकवायची!
बाकी तुमचा एकंदरित पिंड द्वेषमुलक असल्या कारणे अजुन काही बोलायची इच्छा नाही आपल्याशी
मी तर स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे. मी तर म्हणतो जावू द्या. यात द्वेषमुलक पिंड कुठे दिसला?
शिवाय फ्लॅट सरकारजमा करायला सांगणारे आपण कोण घटनासिद्ध पदाधिकारी आहात म्हणे प्रशासन/सरकारातले?
सरकारला अमर्याद अधिकार असतात (अधिकृत आणि अनधिकृत). तेलंगण चे उदाहरण पहा.

In reply to by काळा पहाड

मग पहिले विदर्भाचा मागच्या अनेक वर्षांचा अनुषेश भरुन काढा. गोल्डन क्वाड्रीलॅटरल, रेल्वे कनेक्टीव्हेटी वगैरे भानगडी आपपल्या बघुन घ्या. खबरदार कोणि (उर्वरीत) महाराष्ट्रीय माणुस वैदभीय जमिनीवर पाय ठेवता झाला तर :प बाकि ते समुद्र, सह्याद्री वगैरे गोष्टी आमच्या आम्हि मॅनेज करु (इती: वैदर्भीय मनोगत) ढिस्क्लेमरः आमचा कशाशी काहिही संबंध नाहि. आम्हि बारामतीचा व्हिसा कधि मिळतो याचीच वाट बघतोय.

In reply to by नाना स्कॉच

एवढा द्वेष बरा नव्हे माझी आईचे वडील अकोल्याचे आहेत डोंबिवली मध्ये ते १९५० साली आले , पुढे डोंबिवलीच्या जोशी हाय स्कूल मध्ये त्यांनी स्वतंत्र विधार्भाच्या साठी सभा आयोजित केली होती. आजही अकोल्यात्त आईचे आजोळ आहे व मी लहानपणापासून येथे जातो. म्हणून ह्याविषयी लिहित आहे. वेगळे राष्ट्र नव्हे तर वेगळे राज्य मागत आहेत. आणि पुण्यात जागांचे भाव वाढवले म्हणून कशाला त्रागा करतात मुंबईत सुद्धा जागांचे भाव परप्रांतीयांनी वाढवले, वाढते शहरीकरण अपरिहार्य आहे. त्याला इलाज नाही अणे ह्यांची मुलाखत पाहा त्यांच्यात आणि बेताल मुक्तफळे उधळणाऱ्या कनैह्या मध्ये फरक आहे.

In reply to by काळा पहाड

मी माझे विचार ह्या धाग्यावर आधीच मांडले आहेत, पण तरीही ह्या प्रतिसादात हेटाळणीचा सूर जाणवतोय, म्हणून विचारतोय.. फुकट दिलेत का हो विदर्भवाल्यांना फ्लॅट्स पुण्यातल्या बिल्डरांनी? खडकू नि खडकू मोजून घेतलाय.. लोन्सचे हप्ते फेडताहेत ते.. त्या-त्या पोरा-पोरींनी शिकून आपल्या जिद्दीवर आणि कमाईवर विकत घेतले आहेत ते फ्लॅट्स. उद्या माझी ऐपत असेल तर लुट्येन्स दिल्लीत बंगला घेईल मी, कोणाचा बाप रोखणार आहे? जरा राज्यघटना वाचा भारताची.. आणि तुमच्याच तिरपागड्या लॉजिकनी तर गुजराथ्यांनी/पारश्यांनी वाढवलेली जोपासलेली मुंबई तुम्ही घेतलीत. हाकलू शकलात त्यांना? स्वतःच आता उपनगरांमध्ये जाऊन बसलेत 'मराठीजन'.. त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला की. तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'आरक्षणाचे दुष्परिणाम', 'पुण्यावर बाहेरच्यांचे अतिक्रमण' वगैरे सुचतं हो.. त्याहीपेक्षा महत्त्वाचं.. विदर्भाला येणार्‍या योजना, मग त्या सरकारी असो वा निजी, ह्या प. महाराष्ट्रानी आपल्या राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्यात. आमचे नेते नालायक पडले, असंही म्हणता येईल. नाहीतर आम्हाला तुमचं पुणं-मुंबई इतकंही प्रिय नाही हो.. आता मुद्द्याचं: १. विदर्भाची महाराष्ट्राशी ऐतिहासिक नाळ नाहीये. आम्ही कधीच शिवाजीमहाराजांच्या 'हिंदवी स्वराज्याचे' भाग नव्हतो. नागपूरकर भोसल्यांचा इतिहासच शिकवला जात नाही कुठेच महाराष्ट्रात. विदर्भाचा इतिहासच माहीत नाही आम्हाला, कारण की भावनिक होतात भक्क ऽऽकन लोक.. 'काय आहे असा तुमचा इतिहास' असं म्हणून हिणावण्याआधीच सांगतो, पार आसामला भिडलं होतं नागपुरकर भोसल्यांचं राज्य. रघुजीराजे भोसलेंनी आसामवरुन आणली होती संत्र्याची रोपं, जी आज नागपुरी संत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. कलकत्त्यात 'मराठा डीच' आहे जी ह्या मराठ्यांपासून संरक्षणासाठी बनवली होती.. २. विदर्भाच्या मराठी बोली-भाषेवर हिंदीचा प्रभाव आहे, त्यामुळे ही दोनदा क्रियापद वापरण्याची सवय आहे. 'जा रहा हुं/ आ रहा हुं' सारखंच 'जाऊन राहीलो'/'येऊन राहीलो'.. तुमच्या प्रमाण भाषेचा बाज आणि माज आम्ही बोलतांना का जोपासावा? ३. देवदेवस्कीचा विचार केला तरी हेच. पंढपुरच्या विठोबाच्या वारीला जाणारे वैदर्भीय मोजकेच असतील. त्यापेक्षा आजच्या मध्यप्रदेश-छ्त्तीसगड मधले देव जवळचे आणि पुर्वापार आहेत. रोटीबेटीचे व्यवहारपण मध्यप्रदेश-छत्तीसगडशी जास्त. (माझी स्वतःची आजी मध्यप्रदेशमध्ये माहेर असलेली) ही बाब माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्याला लागू नाही.. ३. कर्जाच्या बाबतीत तेच बोलतो, जे आधी बोललो होतो.. जे कर्ज विदर्भापायी, त्याच्या विकासासाठी झालंय, त्याचा बोजा विदर्भाला उचलावाच लागेल. ४. वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही.. माझ्याकडून ब्बास.. आता तेच ते बोलून कंटाळा आणि टंकाळा आलाय..

In reply to by चिगो

हान तिज्यायला. चिगो साह्यबाला एक पार्टी लागू ह्या जबरदस्त प्रतिसादासाठी. मराठवाड्याचे जवळपास असेच आहे. रोटीबेटीचे व्यवहार सर्रास नसले तरी आंध्र आणि कर्नाटकात होतात.

In reply to by चिगो

एक्कीच मारा, सॉल्लिड मारा. __/\__ सुंदर, संयत, माहितीपूर्ण, वजनदार प्रतिसाद.

In reply to by चिगो

वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही. +१ सहमत!! -(भावनिक नसलेला, विनाकारणअतिसंवेदनशील नसलेला पश्चिम महाराष्ट्रीय)