✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

स
स्वामी संकेतानंद यांनी
Fri, 03/25/2016 - 15:49  ·  लेख
लेख
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली. पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला. तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत! या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा. अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे? आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं --मुनव्वर राना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
27877 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा

भाऊंचे भाऊ
Fri, 03/25/2016 - 18:16 नवीन
या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मग तुम्हाला काय अपेक्षा आहे तिबेटी लोकांनी यावरती तावातावाने बोलावे का ?
  • Log in or register to post comments

तुमच्या लक्षात नाही आले. घेणे

स्वामी संकेतानंद
Fri, 03/25/2016 - 18:22 नवीन
तुमच्या लक्षात नाही आले. घेणे ना देणें, फुकट कंदील लावणे अशी एक म्हण आहे पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

आहे खरी

सातारकर
Fri, 03/25/2016 - 18:24 नवीन
पश्चिम महाराष्ट्रात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

सर्व पश्चिम महाराष्ट्रीय

DEADPOOL
Fri, 03/25/2016 - 18:38 नवीन
सर्व पश्चिम महाराष्ट्रीय जनतेला विनंती आहे की या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये! घेणे ना देणें, फुकट कंदील लावणे ही म्हण लक्षात ठेवावी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

चर्चा करा, भावनिक आवाहने करू

स्वामी संकेतानंद
Fri, 03/25/2016 - 18:50 नवीन
चर्चा करा, भावनिक आवाहने करू नका, मारायला धावू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

कोण मारायला धावले?

DEADPOOL
Fri, 03/25/2016 - 18:55 नवीन
कोण मारायला धावले? आपली म्हणचा अर्थ घेतला तर आपण सरळ आम्हाला रिकामटेकडे अथवा बिनकामाचे म्हणत आहात! मग आवाहन केले तर चुकलं काय? असो या धाग्यावर माझा शेवटचा प्रतिसाद!!! (म्हण लक्षात ठेऊन.......)
  • Log in or register to post comments

इथे नाही, बाहेर जे अनुभव आले

स्वामी संकेतानंद
Fri, 03/25/2016 - 19:22 नवीन
इथे नाही, बाहेर जे अनुभव आले ते पाहून हे सगळे लिहिले मी. म्हणूनच पोस्टमध्ये हळवे मावळे म्हणालोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

वेस्ट महाराष्ट नाही पण पुणे

निनाद मुक्काम …
Fri, 03/25/2016 - 18:57 नवीन
वेस्ट महाराष्ट नाही पण पुणे मुंबई मधील सेनेचे समर्थक अस्मिता भावना ह्यांचे राजकारण जोरात करतात ह्यामुळे विधार्भात जनाधार कमी होतो आहे तेच आता पुढील काही वर्षात मराठवाड्यात होईल , काडी सारण्यात आली आहे आता स्वतंत्र मराठवाडा वणवा पेट घेईल. मुळात विधार्भ महाराष्ट्रातून वेगळा झाला तर महाराष्ट्राचे असे काय नुकसान होणार आहे राजकीयदृष्ट्या मराठी खासदार केवळ महाराष्ट्रासाठी एकत्र येउन दक्षिण भारतीयांच्या सारखी संसदेत आपल्या मागण्या करत नाहीत,आपली लॉबी उभारत नाहीत, विधर्भ खनिज व इतर नैसर्गिक सामुग्रीने संपन्न आहे तेथे फडणीस मुख्यंमत्री झाले तर महाराष्ट्रात खडसे तावडे ह्यांना संधी मिळू शकते मात्र विधर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्राचे थोडे कर्ज तो आपल्या शिरावर घेणार का हा यक्ष प्रश्न आहे. माझ्यामते देवेंद्र त्यांच्या शेवटच्या वर्षात स्वतंत्र विधर्भाची घोषणा करेल. त्याला विरोध होऊ नये म्हणूनच स्वतंत्र मराठवाड्याची हवा पसरवली आहे राष्ट्रवादी सूचक मौन बाळगून आहेत तर कोन्ग्रेज मध्ये दोन गट पडले आहेत.
  • Log in or register to post comments

विदर्भ आणि मराठवाडा वेगळा

खालीमुंडी पाताळधुंडी
Fri, 03/25/2016 - 20:42 नवीन
विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करावाच. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र म्हणजे मुंबई,कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून एक राज्य झाले कि जीडीपी किती उच्चांकावर असेल?आणि किती संपन्न प्रदेश असेल नै? माण,खटाव,जत अन सोलापूरचा काही भाग पाण्याने संपन्न करावा लागेल इतकेच, शिवाय उपराजधानी पुणे असेल?मज्जाच मज्जा. ते मराठवाडा अन् विदर्भवाले त्यांचं ते बघोत,दुष्काळ पडल्यास मदत मिळणार नै!!
  • Log in or register to post comments

धागालेखकाचा मुद्दा काय आणी

तर्राट जोकर
Fri, 03/25/2016 - 21:51 नवीन
धागालेखकाचा मुद्दा काय आणी लोक बघा चर्चा कशावर करत आहेत. ;-)
  • Log in or register to post comments

एक लक्षात आलंय का? कुठलाही

काळा पहाड
Fri, 03/25/2016 - 22:35 नवीन
एक लक्षात आलंय का? कुठलाही पुणे मुंबईचा माणूस नागपूर आणि बाकीच्या वैदर्भीय शहरांत (बाकीची कोणती शहरं आहेत विदर्भात?) घरं विकत घ्यायला जात नाही. पण पुणे मुंबईत हे "जाऊन राहिले" वाले बरेच फ्लॅट विकत घेवून इथले जमिनीचे आणि जागांचे रेट वाढवत स्वतंत्र विदर्भाची तुणतुणे वाजवत असतात. तेव्हा त्यांना तो वेगळा विदर्भ देवून टाकावाच. तसंही तिकडं इथल्या कुणाचं काम असेलसं वाटत नाही. पण नंतर वैदर्भीय लोकांना इथले फ्लॅट, जागा विकत घ्यायला कायद्याने (किंवा अ-कायद्याने) बंदी घालावी. घ्या ते नागपूर आणि फुटा. पहिल्यांदा इथले फ्लॅट सरकारजमा करा. बाकी राहिला प्रश्न वीज कुठून मिळणार आणि खनिजं कुठून मिळणार वगैरेचा. ते बघून घेवू आम्ही. तुम्ही निघा.
  • Log in or register to post comments

चला

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 22:49 नवीन
फ्लॅट विकत घेवून इथले जमिनीचे आणि जागांचे रेट वाढवत स्वतंत्र विदर्भाची तुणतुणे वाजवत असतात धन्यवाद!! बाकी तुमचा एकंदरित पिंड द्वेषमुलक असल्या कारणे अजुन काही बोलायची इच्छा नाही आपल्याशी, तरीही आपल्या तर्कातील (?) दोष आपणांस दिसला असेल अशी (भाबड़ी) *आशा आहे *आशेला ठळक केलेले आहे बरंका! मी स्वतः एक पश्चिम महाराष्ट्रियन आहे अन तरीही मला तुमचे बोलणे चुकीचे वाटले !! लोकांनी मेहनतीच्या पैश्याने विकत घेतलेल्या फ्लॅटमधे वेदपठन करावे का वेगळ्या विदर्भावर चर्चा करावी ही त्या त्या गृहस्वामीची हक्ककक्षा आहे , शिवाय फ्लॅट सरकारजमा करायला सांगणारे आपण कोण घटनासिद्ध पदाधिकारी आहात म्हणे प्रशासन/सरकारातले? उगाच आपले काहीही राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

स्कॉचनाना,

काळा पहाड
Fri, 03/25/2016 - 23:40 नवीन
स्कॉचनाना,
लोकांनी मेहनतीच्या पैश्याने विकत घेतलेल्या फ्लॅटमधे वेदपठन करावे का वेगळ्या विदर्भावर चर्चा करावी ही त्या त्या गृहस्वामीची हक्ककक्षा आहे
स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर पुण्या मुंबईत फ्लॅट कशाला हवेत? हे म्हणजे विप्रो मध्ये नोकरी करत असताना विप्रो कशी वाईट आहे, टीसीएस कशी चांगली आहे याचा प्रचार केल्यासारखं झालं. जर विदर्भ हवाच आहे, तर काया वाचा मन तिन्ही ने तो मागा नं. पुण्यात येवून रहायचं आणि नागपूर वेगळा करण्यासाठी आंदोलनं करायची हा दुतोंडीपणा कशाला? त्या अणे महाशयांना महाराष्ट्राबद्दलेवढा आकस आहे, तर महाराष्ट्राचं पद स्वीकारलं कशाला? ते पद नाकारून मग अक्कल शिकवायची!
बाकी तुमचा एकंदरित पिंड द्वेषमुलक असल्या कारणे अजुन काही बोलायची इच्छा नाही आपल्याशी
मी तर स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे. मी तर म्हणतो जावू द्या. यात द्वेषमुलक पिंड कुठे दिसला?
शिवाय फ्लॅट सरकारजमा करायला सांगणारे आपण कोण घटनासिद्ध पदाधिकारी आहात म्हणे प्रशासन/सरकारातले?
सरकारला अमर्याद अधिकार असतात (अधिकृत आणि अनधिकृत). तेलंगण चे उदाहरण पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

असं म्हणताय...

अर्धवटराव
Sun, 03/27/2016 - 00:21 नवीन
मग पहिले विदर्भाचा मागच्या अनेक वर्षांचा अनुषेश भरुन काढा. गोल्डन क्वाड्रीलॅटरल, रेल्वे कनेक्टीव्हेटी वगैरे भानगडी आपपल्या बघुन घ्या. खबरदार कोणि (उर्वरीत) महाराष्ट्रीय माणुस वैदभीय जमिनीवर पाय ठेवता झाला तर :प बाकि ते समुद्र, सह्याद्री वगैरे गोष्टी आमच्या आम्हि मॅनेज करु (इती: वैदर्भीय मनोगत) ढिस्क्लेमरः आमचा कशाशी काहिही संबंध नाहि. आम्हि बारामतीचा व्हिसा कधि मिळतो याचीच वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

एवढा द्वेष बरा नव्हे

निनाद मुक्काम …
Sat, 03/26/2016 - 01:49 नवीन
एवढा द्वेष बरा नव्हे माझी आईचे वडील अकोल्याचे आहेत डोंबिवली मध्ये ते १९५० साली आले , पुढे डोंबिवलीच्या जोशी हाय स्कूल मध्ये त्यांनी स्वतंत्र विधार्भाच्या साठी सभा आयोजित केली होती. आजही अकोल्यात्त आईचे आजोळ आहे व मी लहानपणापासून येथे जातो. म्हणून ह्याविषयी लिहित आहे. वेगळे राष्ट्र नव्हे तर वेगळे राज्य मागत आहेत. आणि पुण्यात जागांचे भाव वाढवले म्हणून कशाला त्रागा करतात मुंबईत सुद्धा जागांचे भाव परप्रांतीयांनी वाढवले, वाढते शहरीकरण अपरिहार्य आहे. त्याला इलाज नाही अणे ह्यांची मुलाखत पाहा त्यांच्यात आणि बेताल मुक्तफळे उधळणाऱ्या कनैह्या मध्ये फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

...

hmangeshrao
Sat, 03/26/2016 - 11:43 नवीन
अगदी निषेधास्पद विचार . संकुचित विचार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पुन्हा तेच..

चिगो
Sat, 03/26/2016 - 14:17 नवीन
मी माझे विचार ह्या धाग्यावर आधीच मांडले आहेत, पण तरीही ह्या प्रतिसादात हेटाळणीचा सूर जाणवतोय, म्हणून विचारतोय.. फुकट दिलेत का हो विदर्भवाल्यांना फ्लॅट्स पुण्यातल्या बिल्डरांनी? खडकू नि खडकू मोजून घेतलाय.. लोन्सचे हप्ते फेडताहेत ते.. त्या-त्या पोरा-पोरींनी शिकून आपल्या जिद्दीवर आणि कमाईवर विकत घेतले आहेत ते फ्लॅट्स. उद्या माझी ऐपत असेल तर लुट्येन्स दिल्लीत बंगला घेईल मी, कोणाचा बाप रोखणार आहे? जरा राज्यघटना वाचा भारताची.. आणि तुमच्याच तिरपागड्या लॉजिकनी तर गुजराथ्यांनी/पारश्यांनी वाढवलेली जोपासलेली मुंबई तुम्ही घेतलीत. हाकलू शकलात त्यांना? स्वतःच आता उपनगरांमध्ये जाऊन बसलेत 'मराठीजन'.. त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला की. तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'आरक्षणाचे दुष्परिणाम', 'पुण्यावर बाहेरच्यांचे अतिक्रमण' वगैरे सुचतं हो.. त्याहीपेक्षा महत्त्वाचं.. विदर्भाला येणार्‍या योजना, मग त्या सरकारी असो वा निजी, ह्या प. महाराष्ट्रानी आपल्या राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्यात. आमचे नेते नालायक पडले, असंही म्हणता येईल. नाहीतर आम्हाला तुमचं पुणं-मुंबई इतकंही प्रिय नाही हो.. आता मुद्द्याचं: १. विदर्भाची महाराष्ट्राशी ऐतिहासिक नाळ नाहीये. आम्ही कधीच शिवाजीमहाराजांच्या 'हिंदवी स्वराज्याचे' भाग नव्हतो. नागपूरकर भोसल्यांचा इतिहासच शिकवला जात नाही कुठेच महाराष्ट्रात. विदर्भाचा इतिहासच माहीत नाही आम्हाला, कारण की भावनिक होतात भक्क ऽऽकन लोक.. 'काय आहे असा तुमचा इतिहास' असं म्हणून हिणावण्याआधीच सांगतो, पार आसामला भिडलं होतं नागपुरकर भोसल्यांचं राज्य. रघुजीराजे भोसलेंनी आसामवरुन आणली होती संत्र्याची रोपं, जी आज नागपुरी संत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. कलकत्त्यात 'मराठा डीच' आहे जी ह्या मराठ्यांपासून संरक्षणासाठी बनवली होती.. २. विदर्भाच्या मराठी बोली-भाषेवर हिंदीचा प्रभाव आहे, त्यामुळे ही दोनदा क्रियापद वापरण्याची सवय आहे. 'जा रहा हुं/ आ रहा हुं' सारखंच 'जाऊन राहीलो'/'येऊन राहीलो'.. तुमच्या प्रमाण भाषेचा बाज आणि माज आम्ही बोलतांना का जोपासावा? ३. देवदेवस्कीचा विचार केला तरी हेच. पंढपुरच्या विठोबाच्या वारीला जाणारे वैदर्भीय मोजकेच असतील. त्यापेक्षा आजच्या मध्यप्रदेश-छ्त्तीसगड मधले देव जवळचे आणि पुर्वापार आहेत. रोटीबेटीचे व्यवहारपण मध्यप्रदेश-छत्तीसगडशी जास्त. (माझी स्वतःची आजी मध्यप्रदेशमध्ये माहेर असलेली) ही बाब माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्याला लागू नाही.. ३. कर्जाच्या बाबतीत तेच बोलतो, जे आधी बोललो होतो.. जे कर्ज विदर्भापायी, त्याच्या विकासासाठी झालंय, त्याचा बोजा विदर्भाला उचलावाच लागेल. ४. वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही.. माझ्याकडून ब्बास.. आता तेच ते बोलून कंटाळा आणि टंकाळा आलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हान तिज्यायला.

अभ्या..
Sat, 03/26/2016 - 14:25 नवीन
हान तिज्यायला. चिगो साह्यबाला एक पार्टी लागू ह्या जबरदस्त प्रतिसादासाठी. मराठवाड्याचे जवळपास असेच आहे. रोटीबेटीचे व्यवहार सर्रास नसले तरी आंध्र आणि कर्नाटकात होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

एक्कीच मारा, सॉल्लिड मारा. __

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 14:43 नवीन
एक्कीच मारा, सॉल्लिड मारा. __/\__ सुंदर, संयत, माहितीपूर्ण, वजनदार प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

कडक प्रतिसाद!!

तुषार काळभोर
Sat, 03/26/2016 - 14:50 नवीन
वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही. +१ सहमत!! -(भावनिक नसलेला, विनाकारणअतिसंवेदनशील नसलेला पश्चिम महाराष्ट्रीय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या

भाऊंचे भाऊ
Sat, 03/26/2016 - 18:47 नवीन
त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला आम्हाला ते कधी स्पर्धक वाटले नाहित पण त्यांना मात्र आम्ही तसे वाटत असू तर दुर्दैव महाराष्ट्राचे. बाकी भाषा दर10 km ला बदलते, रोटी बेटिचे व्यवहार जवळच्या अंतरात होत असतात म्हणून उगा ते एम्पित होतात की कर्नाटकशी हां दुय्यम भाग. बाकी तुमचे नेते नालायक पडले म्हणता आहात तर ते सुधाराना .. भलत्याच भावनिक बाबेला बळि पडून हे प्रिय नाही ते प्रिय नाही चा सुर कशाला ? सगळ्यात जास्त वाईट हे वाटते की एक विदर्भिय मनुक्ष म्हणुन धागा लेखकाला अभिप्रेत धाग्यातिल मुद्दा आपण सपशेल भरकटवला आहे. त्यावर चार शब्द आले असते तर बरे झाले असते पण तुमिबी पच्चिम मराठी लोकावानी येग्लच बोलू रायला ना बे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

हम्म..

चिगो
Mon, 03/28/2016 - 14:55 नवीन
साहेब, 'पम'तल्या लोकांनाच 'एकी'चा उमाळा फुटतो, मग छत्रपती आठवतात नी शहीद आठवतात, वेगळ्या विदर्भाबद्दल बोललं म्हणजे हे ह्या धाग्यातल्या बव्हांश प्रतिक्रीयांवरुन स्पष्ट होतंय.. त्याबद्दल काय बोलू?
त्यावर चार शब्द आले असते तर बरे झाले असते पण तुमिबी पच्चिम मराठी लोकावानी येग्लच बोलू रायला ना बे ?
माझ्या माहितीत विदर्भात कुठंही असं काही बोलत नाही.. कृपा करुन वर्‍हाडीचा आव आणू नका. जमत नाहीये तुम्हाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

पण तरीही ह्या प्रतिसादात

काळा पहाड
Sat, 03/26/2016 - 23:27 नवीन
पण तरीही ह्या प्रतिसादात हेटाळणीचा सूर जाणवतोय
हो, कारण इथं धागाकर्त्यानं धागा तयार करताना पश्चिम महाराष्ट्रातल्या (खरं तर विदर्भ आणी मराठवाड्यातल्या लोकांना वेगळ्ं राज्य हवं असल्यानं महाराष्ट्रातल्या म्हणायला हवं) लोकांना ते मोठ्या संख्येने विदर्भाबाबतीत प्रतिक्रिया का देतायत असा हेटाळणीचा सूर लावलाय. आणि तुमची प्रतिक्रिया सुद्धा काही फार संतवाणी नाही.
फुकट दिलेत का हो विदर्भवाल्यांना फ्लॅट्स पुण्यातल्या बिल्डरांनी? खडकू नि खडकू मोजून घेतलाय.. लोन्सचे हप्ते फेडताहेत ते.. त्या-त्या पोरा-पोरींनी शिकून आपल्या जिद्दीवर आणि कमाईवर विकत घेतले आहेत ते फ्लॅट्स. उद्या माझी ऐपत असेल तर लुट्येन्स दिल्लीत बंगला घेईल मी, कोणाचा बाप रोखणार आहे? जरा राज्यघटना वाचा भारताची..
पण एवढं जर नागपूर प्रिय आहे, तर तिकडेच का जात नाही? दर पाच मिनिटानी एम एच तीस, एकतीस च्या गाड्या दिसतात. त्या नागपूरला काढा आयटी कंपन्या आणि खडकू(?) मोजून घ्या विकत फ्लॅट्स. कशाला तुमच्यावर इतका अन्याय करणार्‍या परराज्यातल्या लोकांमध्ये रहायचं? मला खरं तर हे लॉजिक कळलेलं नाही. अन्याय सहन करत रहाण्याला काही अर्थच नाही ना!
उद्या माझी ऐपत असेल तर लुट्येन्स दिल्लीत बंगला घेईल मी
तुम्हाला मेन प्रॉब्लेम सांगतो. या विदर्भात जे सरकारी नोकर, सरकारी शिक्षक इत्यादी (थोडक्यात भ्रष्टाचारी) लोकांना पैसा गुंतवायचाय तो पश्चिम महाराष्ट्रात. त्यांना खरं तर इकडं शिफ्टच व्हायचंय. ज्यांना हे शक्य नाही त्यांना वेगळं राज्य हवंय. तेव्हा घ्या तुम्ही दिल्लीत बंगला, माझं काही म्हणणं नाही, पण तुमच्या बंगल्याला वेगळं राज्य करण्याची मागणी करू नका. दिल्लीतले पोलीस फार मारतात म्हणे.
त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला की. तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'आरक्षणाचे दुष्परिणाम', 'पुण्यावर बाहेरच्यांचे अतिक्रमण' वगैरे सुचतं हो..
खिक! ते यूपी वाले झाले, मग बिहारी झाले (एक बिहारी सौ पे भारी वगैरे). आता तुम्ही आला. 'काँपिटीशन' म्हणे. हे म्हणजे बांग्लादेशानं दिलेली काँपिटीशन भारताला झोंबतंय म्हटल्यासारखं झालं. चड्डी में रहो मियां. वेगळं राज्य झाल्यावर उलट 'काँपिटीशन' कमी होईल माहितीये का? कारण परराज्यातल्या विद्द्यार्थ्यांना सध्या फक्त मॅनेजमेंट सीट वरच प्रवेश मिळतो. आणि मग पुण्या मुंबईत शिकायला येण्याचे तुमच्या लोकांचे मार्ग उलटे बंद होतील. जास्त कॉलेजेस कुठल्या प्रदेशात आहेत हे माहितीये ना?
त्याहीपेक्षा महत्त्वाचं.. विदर्भाला येणार्‍या योजना, मग त्या सरकारी असो वा निजी, ह्या प. महाराष्ट्रानी आपल्या राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्यात.
तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'आरक्षणाचे दुष्परिणाम', 'पुण्यावर बाहेरच्यांचे अतिक्रमण' वगैरे सुचतं हो..
तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्या' वगैरे सुचतं हो..
तुमच्या प्रमाण भाषेचा बाज आणि माज आम्ही बोलतांना का जोपासावा
जोपासू नका. तुमचं वेगळं राज्य झालं की हिंदीचा प्रभाव असलेली भाषा प्रमाण करा. महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे, वैदर्भी नाही. तस्मात, ते हिंदी बरोबरचं म्यूटंट मराठी 'तिकडे'.
आम्ही कधीच शिवाजीमहाराजांच्या 'हिंदवी स्वराज्याचे' भाग नव्हतो.
बरोबर आहे. विदर्भ इज इक्वल टू नो शिवाजी महाराज, गॉट इट.
देवदेवस्कीचा विचार केला तरी हेच. पंढपुरच्या विठोबाच्या वारीला जाणारे वैदर्भीय मोजकेच असतील. त्यापेक्षा आजच्या मध्यप्रदेश-छ्त्तीसगड मधले देव जवळचे आणि पुर्वापार आहेत. रोटीबेटीचे व्यवहारपण मध्यप्रदेश-छत्तीसगडशी जास्त. (माझी स्वतःची आजी मध्यप्रदेशमध्ये माहेर असलेली) ही बाब माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्याला लागू नाही..
आमची ना नाही. तुमच्या वेगळ्या विदर्भाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. वेगळ्या मराठवाड्याला सुद्धा.
३. कर्जाच्या बाबतीत तेच बोलतो, जे आधी बोललो होतो.. जे कर्ज विदर्भापायी, त्याच्या विकासासाठी झालंय, त्याचा बोजा विदर्भाला उचलावाच लागेल.
सी? या बाबतीत सुद्धा माझे विचार सेम.
४. वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही..
बिलकुल. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. तात्पर्य, माझा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे, वेगळ्या मराठवाड्याला सुद्धा. फक्त तुमचे नेते आणि 'काँपिटीशन' देणारे पोरं पोरी यांना बहुधा पुण्या मुंबईत स्थायिक व्हायचंय. तेव्हा एकदा मिटींग करा, काय ते नक्की ठरवा आणि मग सांगा. तुकडा पाडून टाकू. हाय काय नाय काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

नक्कीच..

चिगो
Mon, 03/28/2016 - 14:50 नवीन
हे म्हणजे बांग्लादेशानं दिलेली काँपिटीशन भारताला झोंबतंय म्हटल्यासारखं झालं.
झोंबलीय ते दिसतंय.. असोच..
चड्डी में रहो मियां.
अरेच्च्या.. चड्डीत आहोत तरी 'रिअल इस्टेट'चे भाव वाढलेत की.. बाहेर आलो तर काय होणार?
जास्त कॉलेजेस कुठल्या प्रदेशात आहेत हे माहितीये ना?
अर्थात.. आणि सीट्सचा जोगवा मागत पार इथं मेघालयातल्या माझ्या ऑफीससमोर बसतात हो दोन-दोन तास ही लोकं.. यादी हवीय का?
तुमचं वेगळं राज्य झालं की हिंदीचा प्रभाव असलेली भाषा प्रमाण करा. महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे, वैदर्भी नाही. तस्मात, ते हिंदी बरोबरचं म्यूटंट मराठी 'तिकडे'.
ते आमचं आम्ही बघू.. आम्ही आमच्याच पद्धतीची मराठी बोलणार. तुमचा माज तुमच्याजवळ ठेवा. आणि शक्य असल्यास ते 'मराठीच्या सक्ती' विरोधात निरुपम वगैरे बोंबलत असतात, ते जमतंय का सांभाळायला ते बघा. नाही, 'तुमच्या' मुंबईत होतंय हो हे सगळं..
तेव्हा घ्या तुम्ही दिल्लीत बंगला, माझं काही म्हणणं नाही, पण तुमच्या बंगल्याला वेगळं राज्य करण्याची मागणी करू नका. दिल्लीतले पोलीस फार मारतात म्हणे.
सदिच्छांसाठी धन्यवाद.. ऐपत असेल तर घेऊही. बाकी पोलिसांची चिंता सोडा. त्याची आम्हाला पर्वा नाही. उद्या 'महागड्या' वैदर्भियांविरुद्ध आंदोलन-बिंदोलन करायचा विचार असेल तर तुम्हालाच ती चिंता.. एकंदरीत, वेगळा विदर्भ व्हावा ह्यावर आपलं एकमत आहे.. त्याकरीता धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

माज...

ब़जरबट्टू
Mon, 03/28/2016 - 17:06 नवीन
त्या नागपूरला काढा आयटी कंपन्या आणि खडकू(?) मोजून घ्या विकत फ्लॅट्स. हा तुमचा निव्वळ माज आहे साहेब. पुण्यात २००५ पर्यंत काय दशा होती रियल एस्टेट ची ते आठवा जरा.. चार कंपन्या आल्या म्हणून तुमच्या जागेला सोन्याचा भाव तरी आलाय..या परराज्यातून आलेल्या लोकांच्या भरवश्यावरच कमवताहेत इथले , नाही तर बसले होते पेन्श्नर सिटी चा वांझोटा बोर्ड घेऊन... एव्हढा माज करू नका.. एकदा बजाज गेल्यावर औरंगाबादची व कंपन्या गेल्यावर मिशिगनची झालेली वाताहत बघा.. आयटी को आते और जाते देर नाही लागती दोस्त.. और शायद शुरुवात का शंखनाद हो चुका है :) http://www.mh-31.com/nagpur/about-nagpur/nagpur-mihan-real-estate-land/627-it-companies-mihan-and-it
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

महाराष्ट्रियन????? कि मराठी??

टवाळ कार्टा
Fri, 03/25/2016 - 22:52 नवीन
महाराष्ट्रियन????? कि मराठी????? चायला आधी मराठी नीट लिहायला शिका की
  • Log in or register to post comments

अहो

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 22:57 नवीन
मला ते "फ्लो" मधे सुचले तसे लिहित गेलो !, मला काय माहीती इथे व्याकरणाची परीक्षा होते आहे, तसे आपणांस जे गोड वाटेल ते वाचा, बाकी जमल्यास थोड़े सौजन्य शिकुन घ्या तोंडी लावण्यापुरते, बरे असते ते अनोळखी माणसाशी बोलताना, असो!. रच्याकने, पश्चिम महाराष्ट्रियन नसेल चालत किंवा चुक असेल तर काय लिहावे? "पश्चिम महाराष्ट्रातील मराठी"?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

तर्राट जोकर
Fri, 03/25/2016 - 23:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

भरा हो एक लाइट लाइट पेग जोकर

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 23:06 नवीन
भरा हो एक लाइट लाइट पेग जोकर बुआ!

डोके उठल्यावर ही निमुट मुग गिळून बसणे अन सौजन्य पाळणे हेच बहुदा गृहस्थाश्रमाचे वैश्विक सार असावे असे वाटते आहे आम्हांस आजकाल!

त्या बबल्याला सांगा बॉयल सिंग आण म्हणा एक कंप्लीमेंट्री!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

लाईट क्यू... खंबा लेके बैठा ना यार इदर. =))

तर्राट जोकर
Fri, 03/25/2016 - 23:14 नवीन
काटेरी, आगलावू प्रतिसाद देण्याची शक्ती विशिष्ट आयडींकडे मुक्तपणे उपलब्ध असे पर्यंत आपण मूग, चणा, शेंग गिळत राहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

मोगांचे नावही घेऊ नका!! ;)

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 23:21 नवीन
मोगांचे नावही घेऊ नका!! ;) चढ़ली दारू उतरंल!! काटेरी प्रतिसाद देणारे तेच एक आहेत !! बाकी सगळे प्रतिक्रियावादी भद्रजन आहेत! काय समजलात मिस्टर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

प्रतिक्रियावादी भद्रजन =))

तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 12:25 नवीन
प्रतिक्रियावादी भद्रजन =)) प्रतिक्रियावादी हा शब्द ब्रँचमधे शंभरदा घोटायला लावत असतील, तेव्हाच सगळीकडे यायला लागलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

असे चुकीचे शब्द आपणच परत परत

टवाळ कार्टा
Fri, 03/25/2016 - 23:07 नवीन
असे चुकीचे शब्द आपणच परत परत वापरतो...आणि नंतर मराठी बिघडली म्हणून गळे काढतो...तस्मात एखाद्याने चूक दाखवली तर त्यालाच सुनवण्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे... सौजन्य काय अस्ते/कशाशी खातात याचे चांगले ज्ञान आहे मला "प.महा.मधील लोक" असे लिहित चला की रच्याकने तुम्ही पुणेकर असाल तर माझा पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

असे चुकीचे शब्द आपणच परत परत

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 23:16 नवीन
असे चुकीचे शब्द आपणच परत परत वापरतो...आणि नंतर मराठी बिघडली म्हणून गळे काढतो... हे अगोदरच बोलला असतात तर काय प्रश्न होता राजे! सेम शब्द ! समजुतीचा सुर कामे तड़ीस नेतो इतके फ़क्त ह्या निमित्ताने सांगतो देवा. तस्मात एखाद्याने चूक दाखवली तर त्यालाच सुनवण्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे... चुक दाखवण्याला आक्षेप असता तर खाली "मग नेमके कसे लिहावे" विचारले नसते साहेब, आक्षेप चुक दाखवायला नसुन चुक दाखवायच्या पद्धतीला आहे , हे परत एकदा लक्षात आणून देतो. आपण वरती जे गळे काढणे वगैरे लिहिले आहे त्यात "आपण गळे काढतो" म्हणला आहात आपण बरे वाटते ते! हेच आधी बोलला असता तर आपल्याला आपल्या सौजन्याची सेल्फअट्टेस्टेड कॉपी (स्वसत्यापित प्रत) दाखवावी लागली नसती इतकेच ! :) असो. लोभ असावा की नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे पण रोष असू नये ही माझी वैयक्तिक विनंती आहे! -नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

श्रीयुत नाना

सातारकर
Sat, 03/26/2016 - 07:11 नवीन
आपल नक्की काय विवेचन आहे लेखकान विचारलेल्या मुळ प्रश्नावर. आपले सर्व प्रतिसाद इतर प्रतिसादांना उत्तर दिसताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

लेखकाच्या मुद्द्यावर माझे म्हणणे

नाना स्कॉच
Sat, 03/26/2016 - 07:41 नवीन
हेच आहे की , 1 विदर्भ वेगळा व्हावा की नाही ह्यावर लेखकाने भाष्य केलेले नाही (तसे मलाही ते करण्यात रस नाही) 2 लेखकाच्या म्हणण्यानुसार वेगळा विदर्भ ह्या विषयावर एकंदरित पश्चिम महाराष्ट्रातील जनता जास्तच आवेशपुर्ण होते (वरील काही दिव्य प्रतिक्रियांचा लाभ घ्यावात परत फिरून एकदा ही विनंती), अन लेखकाचे हे मत काही प्रतिक्रिया अन काही सदस्यांनी शब्दशः बरोबर ठरवले आहे 3 पुढे माझ्यामते लेखकाने हा प्रश्न विचारला आहे की असे का होत असावे?, त्याला कोणीच समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही, अगदी आपणही *"पश्चिम महाराष्ट्रातली माणसे लष्कराच्या भाकरी...." वगैरे वगैरे भावनिक खेळ केले आहेत. ते एक असोच्. पण वेगळा विदर्भ किंवा एकुणच विदर्भ म्हणले की पश्चिम महाराष्ट्रातील लोकं इतकी हाइपर का होतात हा प्रश्न अजुन अनुत्तरीत आहे! हे मात्र खरे! *बरं लेखकाने "मग पश्चिम महाराष्ट्रातली जनता पोस्टिंग विदर्भात आल्यास मंत्रालयात खोके पोचवुन बदली का करून घेतात"?? असा ही प्रश्न विचारला आहे! एक उदाहरण डोळ्यासमोरचे आहे ते नंतर कधीतरी! एकंदरित , लेखकाच्या लिखाणात मला तरी कुठेही अभिनिवेष दिसला नाही मात्र थेट प्रश्न दिसले जे बऱ्याचजणांस दुखवु शकतात, त्या प्रश्नांना उत्तरे नाहीत किंवा तेच प्रश्न वर्मावर वगैरे आहेत असेही मला वाटत नाही, फ़क्त एक निरिक्षण हे ही आहे की त्या प्रश्नांना बहुतांशी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने भावनात्मक जिंगोइसम आधारीत उत्तरे दिली आहेत , कोणीही त्या प्रश्नांना तर्काने कापू शकलेला नाही, उगाच स्वाक्षरी मधे " एक पश्चिम महाराष्ट्रियन माणुस" "मी एक पश्चिम महाराष्ट्रियन मराठी" वगैरे बोलून उपयोग नसतो/ इथे नाही!. मी तरी माझ्यापरीने ह्याला उत्तरे शोधून मग जरूर बोलल पण तुर्तास लेखकाचे मुद्दे भावनावेगात येऊन स्वहस्ते सिद्ध करायची आमची अजिबात मनीषा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

परत एकदा

सातारकर
Sat, 03/26/2016 - 14:40 नवीन
वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला. हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही. आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा. अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

परत एकदा

सातारकर
Sat, 03/26/2016 - 14:51 नवीन
वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला. हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही. आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा. अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

नमस्कार सातारकर साहेब

नाना स्कॉच
Sat, 03/26/2016 - 15:34 नवीन
1 प म मधील लोकं ही असं का करतात हे समजून घ्यायला मला बरेच सायास पडले बघा कारण आम्हाला आमचा कोष (*शब्द लक्षात ठेवा) तोडून बाहेर पडून ते पाहता ते एक टक्का समजले आहे असा आमचा समज आहे बघा, आपण केलेल्या भावनिक प्रतिपादनात अन मुळ प म मधील लोकांच्या वागणुकीत जमीन अस्मानाचे अंतर आहे ! असे एक "वेंटेज पॉइंट वर" बसता दिसुन येते बघा साहेब!! (U may please take all the offence in return of this hard truth) तुम्ही म्हणता तसे आम्ही किंवा आपण पश्चिम महाराष्ट्रातले लोक भारत/मराठी तेतुका एक ठेवायला झटतो . ओके ! पण आपण आपल्या सारखे नाहीत म्हणून इतर लोकांस हसतो सुद्धा! माना वा ण माना ती आपली मर्जी पण एखाद्या वैदर्भ माणसाने जर "बुआ आमच्याकडे अमुक गोष्ट अमुक पद्धतीने खातात" म्हणले की आपली रिएक्शन काय असते?? "आम्ही 'तसलं' खात नसतो" पुढे अजुन सुलभ करायचे म्हणले तर आपण ओवर सिम्पलीफिकेशन करतोय साहेब, आंबट चव घातलेल्या वरणाला "आमटीच" म्हणायचे "त्याला कुठं चिंचगुळ वरण म्हणतात वह्य!!!" 'ही रूपकात्मक उदाहरणे आहेत बरंका ! नाहीतर शब्दप्रमाणिक अर्थ शोधत वरडत हिंडसाला!!' मालक पश्चिम महाराष्ट्र हाच प्रमाणित महाराष्ट्र आहे असा गोड गैरसमज तुम्हाला असलेला जाणवतो आहे, पण त्यांची संस्कृती वेगळी आहे!एनी आहे का? आता नका म्हणू झेपले नाही! सार्वजनिक संस्थळावर अजुन स्पष्ट बोलणे शक्य नाही आम्हाला! झेपले नाही तर आम्ही यड़े म्हणून सोडुन द्या ! टिप :- आपण आमचे आवड़ते शब्द हुड़कत बसा आम्हाला हरकत नाही फ़क्त उद्या त्याचा रोजमुरा मागु नका ही विनंती!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

'अभिनिवेश' शब्दावर नाना स्कॉच

स्वामी संकेतानंद
Sun, 03/27/2016 - 15:10 नवीन
'अभिनिवेश' शब्दावर नाना स्कॉच ह्यांचे प्रेम पाहता त्यांना यंदाचा 'अभिनिवेश गुप्त' पुरस्कार जाहीर करण्यात येतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

परत एकदा

सातारकर
Sat, 03/26/2016 - 15:26 नवीन
वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला. हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही. आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा. अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

खिक्क...काय राव...इतक्या लौकर

टवाळ कार्टा
Sat, 03/26/2016 - 09:32 नवीन
खिक्क...काय राव...इतक्या लौकर खेळ आटपायचा असतो का मिपावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

पूर्वग्रहदूषित विचारांनी लिहिलेला लेख!

विद्यार्थी
Sat, 03/26/2016 - 01:01 नवीन
मी स्वतः वेगळ्या विदर्भ राज्याचा समर्थक आहे तरीसुद्धा लेखातील खालील गोष्टी विशेष मानसिकता दर्शवतात,
संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!
मला वाटते की समस्या इथेच आहे. मुंबई तत्कालीन प्रदेशातील सर्वात महत्वाचे शहर असल्याने आंदोलन तेथे झाले होते. याचा अर्थ ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा आणि विदर्भाचा त्याच्याशी काही संबंध नाही असा होत नाही. वैदर्भीयांना संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांनी "आमचे आंदोलन मुंबई, पुणे, बेळगाव, मराठवाडा, विदर्भ यासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आहे" अशी घोषणा करणे अपेक्षित होते का? ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याच करता होते हा पूर्वग्रह करून लेख लिहिला आहे असे मला वाटते. महाराष्ट्र एकीकरण समितीची निवडणुकीतली कामगिरी आणि त्यांना "केवळ" फक्त मुंबई कोकणात मिळालेले यश याचा मुद्दा मांडून वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न इथे दिसतो कारण हीच महाराष्ट्र एकीकरण समिती गेली कित्येक दशके बेळगावमध्ये महानगरपालिका निवडणूक अविरतपणे जिंकत आहे याचा उल्लेख लेखकाने सोयीस्करपणे टाळलेला दिसतो. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील लोकांनीसुद्धा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी आपला काही संबंध नाही असे म्हणावे का? राहिला मुद्दा वेगळ्या विदर्भाच्या विषयावर पश्चिम महाराष्ट्रातून होणाऱ्या आरडा ओरड्याचा, सगळे राजकारण आहे हो. जसे विदर्भ आणि मराठवाड्यात होणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी जसा पश्चिम महाराष्ट्र जबाबदार असतो तसाच तो वेगळ्या विदर्भाच्या मागणीला होणाऱ्या विरोधालासुद्धा आहे, नाही का?
  • Log in or register to post comments

+1

भाऊंचे भाऊ
Sat, 03/26/2016 - 08:43 नवीन
विदर्भातील लोकांचीमानसिकता आपण अचूक पकडलीत. या धागालेखकापेक्षा जास्त योग्य प्रतिवाद आपले ते हे सरही करतील इतका एकतर्फी धागा आहे हां बर काही बोलले की लेखकाचे मुद्दे सिध्द करत असल्याची ओरड अन न बोलले की आपोआप सहमती लेखकाला मिलनार... वा रे वा. मला वाटते या धाग्याच्या प्रिन्ताउत काढून लेखकाचे म्हनने मान्य होस्तवर सर्व पश्चिममराठी लोकांनी पुन्हा पुन्हा वाचायला हव्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्यार्थी

त्यापेक्षा असं केलं तर -

घाटावरचे भट
Sat, 03/26/2016 - 09:48 नवीन
त्यापेक्षा असं केलं तर - कोकण, पच्चिम म्हाराश्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश अशी ५ राज्यं करून टाकू. असंही महाराष्ट्रात एक सरकारवरचा कर्जाचा डोंगर सोडला तर 'महा' म्हणावं असं काय उरलंय?
  • Log in or register to post comments

मा गो वैद्य चार राज्ये

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/26/2016 - 11:46 नवीन
मा गो वैद्य चार राज्ये म्हणतात. खानदेश कुठ त्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

अहो आपलं उपर एक!

घाटावरचे भट
Sat, 03/26/2016 - 16:03 नवीन
अहो आपलं उपर एक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आम्हाला कोकणाची चार राज्य

सतीश कुडतरकर
Mon, 03/28/2016 - 17:23 नवीन
आम्हाला कोकणाची चार राज्य पाहिजेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

हा विचार पण करा

पुतळाचैतन्याचा
Sat, 03/26/2016 - 11:32 नवीन
विदर्भ आणि मराठवाड्या बद्दल प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत लिहिण्याची गरज आहे. शेवटी लोकांचे ज्यात कल्याण असेल ते करावे पण खालील मुद्दे दुर्लक्षित करण्या सारखे नाहीतच: १) विकासाचा कालावधी: पश्चिम महाराष्ट्राचा विकास केवळ स्वातंत्र्य नंतर झालेला नाही. शिव-काळा पासून याची सुरुवात झाली आणि एक-एक क्षेत्रात विकास होत गेला. उदा. शिव-काळा पासून नेतृत्व विकास हि प्रक्रिया सुरु झाली आणि शिंदे-होळकर- गायकवाड हे सरदार उत्तरेत निर्माण झाले. त्या शिवाय संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सामान्य जनतेने नेतृत्व करून दाखविले. अवघड परिस्थिती असताना कसे लढावे याच तंत्र पश्चिम महाराष्ट्रात रुजले. म्हणून लोकशाहीत सामान्य नेते पुढे येउन नेतृत्व करतात (यशवंतराव चव्हाण, आर आर पाटील, राजू शेट्टी, अन्ना हजारे). शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले (१८९०), कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे, टिळक, आगरकर यांनी पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी पासून काम केले. याच वेळी विदर्भ मध्य प्रांत मध्ये होता आणि मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. म्हणून तिकडे शिक्षणाचा प्रचार कमी आहे आणि उशिरा सुरुवात झालीये.थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रात विकास प्रक्रिया २०० वर्ष पासून सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात ती आत्ता सुरु झालीये. २) सामाजिक विकास पश्चिम महाराष्ट्रात फक्त आर्थिक विकासावर भर नसून सामाजिक विकास हा त्याच्या केंद्र स्थानी आहे. उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान: गाडगेबाबा विदर्भातले पण त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान आर आर पाटीलांनी सुरु केले. कोणत्याही विदर्भ किंवा मराठवाड्यातील नेत्याला हि योजना का सुचली नाही? १९७२ च्या दुष्काळात आणलेली रोजगार हमी योजना जी आज म न रे गा म्हणून अख्या देशाने स्वीकारली ती वि स पागे (सांगली) यांची कल्पना आहे. जातीय आरक्षण हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा दिले. विदर्भ आणि मराठवाड्यात मागासवर्गीय जास्त असताना तिकडे कोणी का अशा योजना आणू शकले नाही. फडणवीस सरकारची जाल्युक्त शिवार हि मागील सरकार च्या शेततळे उपक्रमाची कोपी आहे.सहकार पश्चिम महाराष्ट्रात जसा रुजला तसा तो विदर्भात का नाही रुजला? सहकारातून ग्रामीण रोजगार मोठ्या प्रमाणावर आहे. सामाजिक सुधारणांची जी मोठी पार्श्वभूमी पश्चिम महाराष्ट्राला आहे तशी तिकडे नाही. ३) तंत्रज्ञान तंत्रज्ञान सर्वाना समान आहे.पण ग्रामीण भागासाठी शेतीची उपकरणे तयार करणारे किर्लोस्कर कुठे तयार झाले? भारत फोर्ज कुठली? अशा किती कल्पना तिकडे तयार झाल्या? नागपूर चा पर्सिस्तंत सोफ्टवेर वाला पुण्यात का कंपनी काढतो? त्याला विदर्भात लोक मिळत नाहीत का? विजय भाटकर नागपूरचे. पण पुण्यात का राहावे लागते? कुठे तरी मूळ तंत्रज्ञान पुण्यात होते आणि संधी होत्या म्हणूनच. असे मूळ तंत्रज्ञान कुठेहि निर्माण होऊ शकते. ते तिकडे का केले जात नाही हा पश्चिम महाराष्ट्राचा दोष नाही. chaitanya wingkar Mar 23 (3 days ago) to Sunil तंत्रज्ञान सर्वाना समान आहे.पण ग्रामीण भागासाठी शेतीची उपकरणे तयार करणारे किर्लोस्कर कुठे तयार झाले? भारत फोर्ज कुठली? अशा किती कल्पना तिकडे तयार झाल्या? नागपूर चा पर्सिस्तंत सोफ्टवेर वाला पुण्यात का कंपनी काढतो? त्याला विदर्भात लोक मिळत नाहीत का? विजय भाटकर नागपूरचे. पण पुण्यात का राहावे लागते? कुठे तरी मूळ तंत्रज्ञान पुण्यात होते आणि संधी होत्या म्हणूनच. असे मूळ तंत्रज्ञान कुठेहि निर्माण होऊ शकते. ते तिकडे का केले जात नाही हा पश्चिम महाराष्ट्राचा दोष नाही. कापूस पिकतो विदर्भात पण कापूस एकाधिकार योजना बनवायला पश्चिम महाराष्ट्राचा सहकार मंत्री व्हावा लागला तेव्हा ती योजना झाली. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योगाच तिकडे नाहीत. संत्री, कापूस बाहेर पाठवावा लागतो यांना. उलट इचलकरंजी मध्ये कापूस पिकत नसताना प्रक्रिया केंद्र उभी केली ती बुद्धीच्या जोरावर. ४) मुलभूत क्षमता: प्रत्येक प्रदेशाची मुलभूत बलस्थाने आणि कमतरता असतात. त्याचा योग्य वापर करणे राज्यकर्त्यांना जमावे लागते. उदा. गोव्याला निसर्ग आहे म्हणून पर्यटन व्यवसाय आहे.कोकणात का नाही एवढा व्यवसाय? कारण तशी दृष्टी नाही. राजस्तान आणि गुजरात कडे पाणी नाही पण एकाने इंडस्ट्री आणि दुसर्याने पर्यटन विकसित केले. पश्चिम महाराष्ट्रात आज उस, साखर, गुळ, हळद, द्राक्षे, डाळिंब, दारू, सोफ्टवेर, मेटल-कास्टिंग, चादर आणि टेक्स्तैल असे अनेक उद्योग आहेत. नाशिक ला द्राक्ष होतात, कोकणात आंबे, नागपूर ला संत्री. मराठवाड्या बद्दल असे एक प्रोडक्ट सांगू शकाल? ज्या-त्या भागातील मुलभूत क्षमता ओळखून विकास करणे गरजेचे आहे. पाणी नसताना पण उसाच लावू हा अट्टाहास मराठवाड्याने का केला? स्वताच्या क्षमता माहित नसताना केवळ पैशासाठी हे उद्योग केलेत. मुद्दा हा आहे कि स्वताची बलस्थाने आणि कमतरता लक्षात घेऊन उद्योग उभारणी केली पाहिजे. ५) इतर घटक: कला-क्रीडा, मनोरंजन हि क्षेत्रे पण याला अपवाद नाहीत. सांगली नाट्य पंढरी आहे. कोल्हापूर हे कलापूर आहे.पुण्या मध्ये शास्त्रीय संगीत खोलवर रुजले आहे. अनेक कुस्तीपटू, धावपटू, स्वीमर्स, मल्लखांब खेळाडू, क्रिकेटर, बेड्मिन्तन, कब्बडी अशा अनेक खेळातील दिग्गज हे पश्चिम महाराष्ट्रात होतात ते त्यांच्या जिद्द आणि चिकाटीवर. अनेक गरीब कुटुंबातील मूल केवळ जिद्दीवर पुढे जातात. विदर्भ मराठवाड्यात खरा Deficit हा या जिद्दीचा आहे. दूरदृष्टीचा डेफ़िसिट आहे. वेगळे केल्याने या दृष्टीकोनात फरक पडायची काहीच शक्यता नाही. महाराष्ट्राच्या पैशावर या प्रदेशांना थोडातरी आधार मिळेल नाहीतर इथले नादान राज्यकर्ते लूट माजवतील हे आज पर्यंतच्या राजकीय इतिहासावरून स्पष्ट आहे. भाजपवाल्यांना हि महाराष्ट्राची नस सापडलेली नाही. शरद पवारांना हे पक्के माहित आहे म्हणून एवढे वर्ष सत्ता टिकवू शकले. हि पार्श्वभूमी विसरून भाजप काही उलटे करेल तर पुढे यश मिळायची शक्यता कमी आहे
  • Log in or register to post comments

मनापासून मांडलेय सारे. बर्

अभ्या..
Sat, 03/26/2016 - 13:47 नवीन
मनापासून मांडलेय सारे. बर्‍याच त्रुटी पण आहेत मराठवाड्याच्या आकलनात. उसाचा अट्टाहास हा मुद्दा सोडता जिद्द वगैरे कुणा एका प्रांताची मिरासदारी नसते. मराठवाड्याने निजामाशी जिद्दीनेच टक्कर देऊन मराठवाडा मिळवलाय. कित्येक मराठवाड्याचे लोक पुण्यामुंबईत जाउन यशस्वी झालेत. तेंव्हा जिद्द हा मुद्दा बाजूला ठेवा. दूरदृष्टीचे नेते लाभले नाहीत असे म्हणू शकतो. त्यामुळे भागाचा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर आदी गोष्टी नाहीत अ‍ॅव्हेलेबल. विकास म्हणजे पुण्यामुंबईसारखेच मोठमोठे रस्ते, उड्डाण पूल, कंपन्यांचे चकचकीत आउटलेट, मॉल्स हे नव्हे. आणि तो तसा होऊ पण नये. प्रत्येक भागाची एक संस्कृती असते, त्या संस्कृतीला डोक्यात ठेउन दूरदृष्टीने विकास घडवण्याच्या एवजी राजकारण्यानी एकगट्ठा मतपेटी अशा दृष्टीने पाहिले. त्याचे दुष्परिणाम आज विदर्भ अन मराठवाड्याची जनता भोगतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुतळाचैतन्याचा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा