विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त
लेखनप्रकार
भाग १ - काळाचा आवाका
भाग २ - नासदीय सूक्त
भाग ३ - अस्तिस्तोत्र
भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर
भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी
अगदी कट्टर नास्तिक सोडले तर बहुतेक लोक कुठच्या ना कुठच्या उच्च शक्तीचे अस्तित्व मानतात. या शक्तीचे आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकजण आपापल्या अनुभवांवरून ठरवतो. मात्र अशा शक्तीवर विश्वास ठेवण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे या जगात दिसणारा अद्भुत निसर्गाचा विस्तार. हे सगळे कुठून आले? कोणी तयार केले? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी 'ज्या कोणी तयार केले ती सर्वोच्च शक्ती' असा विश्वास दृढ होतो. या विश्वासातून ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. यांना 'रचना-दृष्टांत' किंवा इंग्रजीमध्ये 'आर्ग्युमेंट फ्रॉम डिझाइन' असे म्हणतात. त्यांचा प्रातिनिधिक म्हणून मी खालील उतारा वापरलेला आहे. १८०२ साली विलियम पेलीने हे लिहिले. मी त्याचा सर्वसाधारण गोषवारा - स्वैर अनुवाद लिहिला आहे. (कंस माझे आहेत).
"समजा तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला एखादा दगड दिसला आणि तुम्ही विचार केला की हा इथे कसा काय आला? तर तुम्ही म्हणू शकता की हा कायमच इथे असला पाहिजे. (दगड कसा "झाला" हा प्रश्न काही तितकासा विचार करण्याजोगा नाही.) पण समजा, तुम्हाला एखादे घड्याळ पडलेले दिसले तर त्याविषयी तुम्हाला "ते कायमच इथे असले पाहिजे" असे साधे उत्तर देता येणार नाही.... त्या घड्याळाचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर तुम्हाला असा निष्कर्ष काढावा लागेल की भूतकाळात कधीतरी एका किंवा अनेक अभियंत्यांनी किंवा कुशल कारागिरांनी त्याचा आराखडा आखला असला पाहिजे, त्याची रचना केली असली पाहिजे. (कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे.) .... आता तुम्ही प्राण्यांकडे किंवा एकंदरीतच सृष्टीकडे पहा. जिथे पाहाल तिथे घड्याळा इतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक जटील वस्तू, रचना दिसतील. मानवी डोळ्याचंच उदाहरण घ्या (डोळ्याच्या क्लिष्टतेच अत्यंत खोलात वर्णन करून मग तो पुढे म्हणतो..) डोळा हा घड्याळापेक्षा किती तरी अधिक सुरचित आहे. वनस्पती, पक्षी, प्राणी यांच्याकडे बघितले तर जागोजाग ही रचना दिसून येते. मग आता तुम्ही मला सांगा, की इतक्या सुंदर रचना बघितल्यावर त्यामागे कोणी रचनाकार नाही यावर कसा विश्वास बसेल? (प्राणी कसे "झाले" हा महत्त्वाचा, विचाराण्याजोगा प्रश्न आहे, आणि त्याचे एकच उत्तर संभवत - ते म्हणजे एका सर्वोच्च शक्तीने - ईश्वराने ते निर्माण केले. याचा अर्थ प्राण्यांचे अस्तित्व हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.)"
पण मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. वरवर पटणारा पेलीचा सिद्धांत/दृष्टांत कितपत खरा आहे? पेलीच्या भाष्यात दोन उघड उघड चुका दिसतात. एक - त्या मानाने छोटी चूक - मी कंसात मांडलेली आहे. "कारण सामान्य नैसर्गिक प्रक्रियांतून घड्याळासारख्या क्लिष्ट रचनाप्रधान गोष्टी तयार होत नाहीत हे उघडच आहे."... हे गृहीतक वापरून, आपल्याला पेली ते रचित आहे हे पटवतो. मग तो निसर्गाकडे बघतो आणि त्याला घड्याळापेक्षा सुरचित गोष्टी दिसतात. जर निसर्गात घड्याळापेक्षा जटील वस्तु दिसू शकतात, आणि त्या आपोआप तयार होऊ शकतात असे गृहीत धरले तर घड्याळाविषयी काहीच विशेष वाटण्याची गरज नाही. पण पेली सफाईदारपणे आपल्या मनातील पाने, डोळे (नैसर्गिक) व घड्याळ (मानवनिर्मित - कृत्रिम) या दोन कल्पनांमधले अंतर वापरतो आणि एखाद्या जादुगाराप्रमाणे दोन्हींना सारख्याच पातळीवर (सुरचित - रचनाकाराची गरज असलेले) नेउन ठेवतो. ही चलाखी फारच तरल, वाखाणण्याजोगी आहे.
पण पेलीच्या प्रश्नाकडे पाठ फिरवूनही चालत नाही. "हे सगळे कसे काय तयार झाले?" जोपर्यंत वैज्ञानिक उत्तर सापडत नाही तोपर्यंत पेलीचे उत्तर कितीही चूक वाटले तरीही त्याच्या अनुत्तराशिवाय आपल्याकडे अधिक चांगला पर्याय नाही. आणि मेख अशी आहे की सजीव सृष्टीतल्या प्रत्येक कोड्याचे उत्तर सुटले पाहिजे. पक्षी का उडतात? (त्यांना पंख आहेत म्हणून नव्हे - त्यांना उडण्याची क्षमता का असते हा प्रश्न आहे) जिराफाची(च) मान लांब का? डोळे कसे निर्माण झाले? (ते कोणी केले असल्यास मुळात तो कर्ता कसा निर्माण झाला?) माणसाच्या मना मनाचे पोत जाऊ द्या, त्याचे हात, पाय, जगण्याची इच्छा कुठून आली? माणूस म्हातारा का होतो? माणूस मरतो का? आई मुलावर प्रेम का करते? कोंबडी आधी की अंडे आधी? बोला, आहेत उत्तरे? हजारो वर्ष तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंतांनी डोकी खाजवली, चर्चा केल्या. पण बराच काळ त्यांच्या हाताला रिकाम्या शब्दच्छलाशिवाय काही लागले नाही. इकडे पेली आनंदात होता, कारण त्याच्या सुंदर चपखल अनुत्तरापुढे कुठचच उत्तर टिकाव धरणार नाही याची त्याला खात्री होती. प्रश्न इतका कठीण होता की सगळ्यांना हात झटकून झक मारत मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे 'हासडल्या तुज शिव्या तरीही तुझ्याच पायी आलो लोळत' म्हणत यावे लागणार याबद्दल शंका नव्हती.
या प्रश्नाला पेलीच्या उत्तरा इतकंच असंभव असलेले दुसरे उत्तर देता येते. ते उत्तर असे "कोणताही प्राणी हा अणु-रेणू पासून बनलेला असतो. पृथ्वीवर हवे तितके रेणू आहेत. ते पाण्यात, वार्यामुळे, एकंदरीत ऊर्जेमुळे एकमेकांवर आपटतात - एकमेकांशी जोडले जातात. असेच जर खूप रेणू अचानक विविक्षित आकारात जोडले गेले की कदाचित माणूस तयार होण्याची शक्यता आहे. आणि एकदा एक पुरुष आणि एक स्त्री तयार झाली की पुढचा सोपे आहे." ही अर्थातच इतकी हास्यास्पद कल्पना आहे की याला जम्बो जेट दृष्टांत असे नाव आहे. माणूस सोडून द्या, आपण जर एखाद्या जम्बो जेट चे स्पेअर पार्ट मोठ्ठ्या पाखडायच्या यंत्रात घातले, भरपूर उर्जा दिली आणि वाट पाहत बसलो, की कधी तरी त्यातून आख्खे जम्बो जेट बाहेर येईल... त्याची शक्यता काय याचाअंदाज बांधता येतो... त्याला इतका वेळ लागेल की आख्या विश्वाचा कालावधी निमिषार्धाप्रमाणे वाटेल. आणि मनुष्य तर विमानाच्या कित्येक पतीने क्लिष्ट असतो. त्यात शिवाय आणखीन एक स्त्री तयार करायची. ती सुद्धा तो पुरुष मारायच्या आत... त्यापेक्षा पेलीचा जादूगार परवडला.
मुळात जम्बो जेट तरी कसे तयार झाले? आपल्याला विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला हे माहीत असते. पण त्यांनी तरी शून्यापासून थोडंच बनवले? विमानाची कल्पना लेओनारदो दा विन्ची पर्यंत जाते. पण त्याही आधी बलून होते, पतंग होते, आणि उडण्याची "प्रेरणा" नसलेल्या, किंवा त्या इच्छेने न बनवलेले कागदाचे कपटे, पाने हवेवर लाखो वर्षांपासून गिरक्या घेताहेत. हवेवर तरंगणाऱ्या वस्तु ते आधुनिक जम्बो जेट पर्यंत कल्पना/रचना - अवकाशात रेष काढली तर त्यावर मधल्या मधल्या टप्प्यांवर त्या त्या काळाच्या तंत्रज्ञानाला शक्य असे अनेक विमानाचे "पूर्वज" सापडतात. किंबहुना विमानांच (किंवा "उडणार्या/तरंगणाऱ्या वस्तूंचे - पक्षी वगळता") नीट वर्गीकरण केले तर त्यांच्यात हवेपेक्षा जड व हवेपेक्षा हलके अशा दोन उघड शाखा तयार झालेल्या दिसतील. "हवेपेक्षा हलके किंवा आपल्या आपण तरंगणारे" या गटामध्ये साबणाचे फुगे, पाने, कागदाचे कपटे, सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय, छत्र्या, पॅराशूट, हात-ग्लायडर, ग्लायडर, बलून, मोठे बलून ते हिंडेनबर्ग पर्यंत वाटचाल दिसेल. इथे या चढत्या क्रमात 'उडणं' या प्रक्रियेची देखील हळूहळू वाटचाल होताना दिसते. भरकटणे, एका जागी भुरभुरत राहणे, संथपणे खाली येणे, तरंगत थोडे पुढे जाणे, तरंगत बरेच पुढे जाणे पण वार्यावर अवलंबून असणे, आणि खऱ्या अर्थाने तरंगत पाहिजे तिथे जाता येणं] हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे - कारण रचनेची वाढ होते त्याबरोबर विशिष्ट क्षमतेतही बदल होत जातो. शब्दांना जीव प्राप्त होतो.
ही मांडणी करण्यामागे उद्देश काय? तो असा - जम्बो जेट किंवा हिंडेनबर्ग शून्यापासून तयार करणे यासाठी रचना अवकाशात प्रचंड मोठी उडी घ्यावी लागते. अशा उड्या मारणे अशक्यप्राय असते. म्हणजे मोहेंजोदारो संस्कृतीतल्या अग्रेसर अभियंत्याला अणुबॉम्ब बनवायला सांगण्यासारखे. पण त्यालादेखील काही वस्तू तरंगतात, हे माहीत असते (उदा सुंदरीचे भुरभुरणारे उत्तरीय). आपल्याला काही पुरावा सापडलेला नाही, पण जर असे सिद्ध झाले की त्या काळात पतंग अस्तित्वात होते तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही. तरंगणाऱ्या वस्तूंपासून पतंगा पर्यंत फार मोठी उडी नाही. जर रचनाहीनतेपासून ते अत्यंत क्लिष्ट रचनेपर्यंत छोट्या छोट्या पायर्यांचा प्रवास आखता आला तर तो शक्य आहे. आणि जर या पायर्या अगदी बारीक केल्या तर तो जिना न राहता वरती जाणारा हलका चढ होईल. मग त्यावरून प्रवास करणे सहज शक्य आहे. गरज आहे ती पाठून लावण्याच्या बलाची. आणि पुरेशा काळाची. पण चार अब्ज वर्षे म्हणजे काही कमी काळ नाही.
पेलीच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाचे उत्तर काहीसे असे आहे. 'अब्जावधी वर्षांपूर्वी काही रेणूंना पुनरुत्पादनाची शक्ती प्राप्त झाली. हे रेणू आणि त्यांच्यामुळे घडणाऱ्या त्यांच्या आसपासच्या रचना क्लिष्ट होत होत त्यांचे एकपेशीय जीव तयार झाले. पुनरुत्पादन होताना काही वेळा 'चुका' होत असत. बहुतांश चुका तोट्याच्या असल्याने तो जीव मरत असे, पण काही वेळा त्या बदलांमुळे तयार होणारा जीव हा तत्कालीन परिस्थितीत टिकण्यासाठी अधिक सक्षम असे. असे जीव लोकसंख्येत अर्थात वाढत जात. ही प्रक्रिया अजूनही चालू आहे. पिढ्यानपिढ्या ही प्रक्रिया चालली की आपल्याला अधिकाधिक क्लिष्ट रचना घडताना दिसतात. पिढ्यांमागून पिढ्या गेल्या की असे 'सुधारणात्मक बदल' गोळा होतात. आणि मग लाखो पिढ्यांनंतर तरंगणे ते स्वबळावर उडणे सारखे क्रांतीकारी बदल घडताना दिसतात.'
थोडक्यात, पेलीच्या युक्तिवादात जम्बोजेट दृष्टांत अंतर्भूत आहे. शून्यापासून ते तयार डोळ्यापर्यंत एका फटक्यात पोचण्याबद्दल तक्रार आहे. ती तक्रार रास्त असली तरी हा प्रवास टप्प्याटप्प्याने करता येतो. त्यामुळे तो डोळा कोणी बनवण्याची गरज पडत नाही.
(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)
वाचने
16041
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
शून्यापासून ते तयार
आधीच्या भागांचे दुवे
डॉकिन्सच्या "ब्लाइन्ड वॉचमेकर
In reply to डॉकिन्सच्या "ब्लाइन्ड वॉचमेकर by सतिश गावडे
होय. वाचून बरीच वर्षं झालेली
In reply to डॉकिन्सच्या "ब्लाइन्ड वॉचमेकर by सतिश गावडे
ब्लाइंड वॉचमेकरच्या
In reply to ब्लाइंड वॉचमेकरच्या by राजेश घासकडवी
ते असंच गंमतीत लिहिलं होतं.
एक किस्सा.
पेली आणि उत्क्रांतीवाद एकच थेअरी मांडत आहेत का??
In reply to पेली आणि उत्क्रांतीवाद एकच थेअरी मांडत आहेत का?? by अर्धवटराव
+१
पेलीच्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाचे उत्तर काहीसे असे आहे...".."
लेख आवडला.
अब्जावधी वर्षांपूर्वी काही
In reply to अब्जावधी वर्षांपूर्वी काही by राजेश घासकडवी
प्रतिकृती तयार करण्याची क्षमता काही रेणूंत होती
In reply to प्रतिकृती तयार करण्याची क्षमता काही रेणूंत होती by अर्धवटराव
याचाच अर्थ प्रतिक्रुती तयार
In reply to याचाच अर्थ प्रतिक्रुती तयार by राजेश घासकडवी
हालचाल
In reply to अब्जावधी वर्षांपूर्वी काही by राजेश घासकडवी
"रेणूंची प्रतिकृती करण्याची
In reply to "रेणूंची प्रतिकृती करण्याची by डॉ सुहास म्हात्रे
अगदी बरोबर. भाषेमध्ये कर्तरी
In reply to अगदी बरोबर. भाषेमध्ये कर्तरी by राजेश घासकडवी
बेस्ट!
In reply to बेस्ट! by विवेक ठाकूर
अहो हे सगळे सिद्धांत
In reply to अहो हे सगळे सिद्धांत by राजेश घासकडवी
अरेच्या !
In reply to अरेच्या ! by विवेक ठाकूर
लेखमालेतून भारंभार माहिती
In reply to लेखमालेतून भारंभार माहिती by राजेश घासकडवी
लेखमालेतून काहीही हाती लागणार नाही याची खात्री असूनही ....
In reply to अहो हे सगळे सिद्धांत by राजेश घासकडवी
राघा, तुम्ही मान्य का करत
In reply to राघा, तुम्ही मान्य का करत by गवि
अजून `का' तर फार पुढे आहे !
In reply to राघा, तुम्ही मान्य का करत by गवि
=)))
प्रतिकृति तयार करताना
In reply to प्रतिकृति तयार करताना by कवितानागेश
प्रतिकृती करताना क्लिष्टता
ठाकूर साहेबांच्या प्रतीक्षेत
In reply to ठाकूर साहेबांच्या प्रतीक्षेत by sagarpdy
;-)
देव ही `निव्वळ मानवी कल्पना' आहे
रेणूंच्या पुनरुत्पादानावर एक
In reply to रेणूंच्या पुनरुत्पादानावर एक by sagarpdy
थेअरिच मूळ अस आहे कि
In reply to थेअरिच मूळ अस आहे कि by sagarpdy
याबद्दल काहीच तक्रार नाही.
पण मूळ प्रश्न राहिलाच !
In reply to पण मूळ प्रश्न राहिलाच ! by विवेक ठाकूर
मग देव हे नांव कसं वाटतं?
In reply to मग देव हे नांव कसं वाटतं? by अनुप ढेरे
नको हो.. त्यापेक्षा देवच बरं.
In reply to नको हो.. त्यापेक्षा देवच बरं. by अत्रुप्त आत्मा
त्यापेक्षा देवच बरं ?
मरठीत लिहिनं थोडं अवघड जात
In reply to मरठीत लिहिनं थोडं अवघड जात by पॉइंट ब्लँक
प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट.
In reply to प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट. by गवि
+१ सहमत..
In reply to प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट. by गवि
पॉइंट ब्लँक !
In reply to प्रचंड टाळ्या. उत्कृष्ट. by गवि
एखाददोन सुरुवातीच्या अणुरेणू
In reply to मरठीत लिहिनं थोडं अवघड जात by पॉइंट ब्लँक
सर्वप्रथम, मी वरच्या लेखात
In reply to सर्वप्रथम, मी वरच्या लेखात by राजेश घासकडवी
एपिजेनेटिक्समुळे उत्क्रांतीची
In reply to एपिजेनेटिक्समुळे उत्क्रांतीची by पॉइंट ब्लँक
डार्विनिझम मध्ये असलेले