✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 10/19/2015 - 08:26  ·  लेख
लेख
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
274232 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

colon plaque

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 17:21 नवीन
त्याहीपेक्षा colon plaque असे गुगलल्याने जास्त फोटो दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

वजन हे फक्त वय आणि उंची या

सुबोध खरे
Mon, 10/19/2015 - 11:59 नवीन
वजन हे फक्त वय आणि उंची या मापात न धरता बारीक बांधा मध्यम बांधा आणि मोठा बांधा या प्रमाणे पण गृहीत धरले पाहिजे पहा http://www.medindia.net/patients/calculators/height_weight_foradults.asp
  • Log in or register to post comments

डॉक साब,

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/20/2015 - 06:49 नवीन
डॉक साब, शरीर प्रकारात १ एक्टोमोर्फिक २ एंडोमोर्फिक ३ एक्सऑमोर्फिक अश्या तीन प्रकारच्या बॉडी फ्रेम्स असलेले ऐकले होते, ह्यावर अजुन प्रकाश टाकू शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हेच का ते ?

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 07:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

वजन, कॅलरी वगैरे

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 12:08 नवीन
हा जो रसाहाराचा प्रयोग केला, त्यातून मूळव्याध, फिस्टुला वगैरे बरे होईल, पोटाचा घेर आणि वजन कमी होईल, अशी मला कल्पनाही नव्हती, त्यामुळे हे घडून आल्याचा अतिशय आनंद झाला. 'पोटातला काळसर्प' याची तर कल्पनाही केली नव्हती. आहारातील कॅलरी वगैरेंचाही विचार केला नव्हता. काहीतरी नवीन, वेगळे करून बघण्याची आवड आणि तयारी यातूनच पूर्वी विपश्यनेचा कोर्सही केला होता, तेंव्हा त्यातून अनेक वर्षांची पाठदुखी सुद्धा अशीच अनपेक्षितपणे कायमची बंद झाली होती. माझे वजन ७५-७६ किलो झालेले होते (वय ६४, उंची ५'५") ते ७०-७१ झाले. जिना कष्टाने चढू शकत होतो, तो धावत सुद्धा चढू लागलो. शरीरात 'फाजील' चरबी किती आहे, हे कळावे यासाठी काही खात्रीलायक पद्धत आहे का?
  • Log in or register to post comments

वात, पित्त आणि कफ प्रकृती

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 12:16 नवीन
बारीक बांधा - मध्यम बांधा - मोठा बांधा यालाच आयुर्वेदात 'वात - पित्त - कफ प्रकृती म्हणतात ना? 'काहीही मेहनत न करता' सुद्धा वात प्रकृतीच्या लोकांच्या जास्त कॅलरी खर्च होतात, पित्त वाल्यांच्या मध्यम आणि कफ वाल्यांच्या अगदी कमी असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या थोडया फार अभ्यासानुसार

मांत्रिक
Mon, 10/19/2015 - 13:12 नवीन
माझ्या थोडया फार अभ्यासानुसार वात पित्त कफ हे मानवी शरीरात पुढील भूमिका बजावतातः १) वात वियोग(dissociation), चलनवलन, हालवाली, चेतना, विघटन, उत्सर्जन यांच्याशी संबंधित आहे. २) पित्त रुपांतरण(transformation), पचन, ऊर्जा, तेज, उष्णता, पोटातील अग्नि/भूक, यांच्याशी संबंधित आहे. ३) कफ संघटन(association), शीतलता, पौष्टिकता, वृद्धी, धारणा यांच्याशी संबंधित आहे. शरीरातील सर्व क्रिया या ३ कॅटॅगरीत बसतात. उदा. एखाद्या लहान अर्भकात कफ हा स्वतःच्या असोसिएशन गुणाधर्मामुळे भराभरा पेशींची, हाडांची वाढ घडवून आणतो. पित्त हा ग्रहण केलेल्या अन्नाचे पचन घडवून आणतो. शरीराला आवश्यक अशी ऊर्जा, तेज पुरवतो. तर वात हा शारीरिक हालचाली, स्नायूंच्या ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया, खेळणे इ. क्रियांना मदत करतो. बाकी तज्ञ मंडळीच सांगू शकतील. मिपावर आनंदा हा आयडी बहुतेक आयुर्वैदिक वैद्य आहेत, असे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चित्रगुप्तसाहेब, खूप दिवस वाट

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/19/2015 - 12:17 नवीन
चित्रगुप्तसाहेब, खूप दिवस वाट पाहयला लावल्यानंतर पाताळेश्वर कट्ट्यांत सांगितलेला कालसर्पवियोगलेख आला... आणि तोही तुमच्या खास शैलीत आणि यथार्थ सुंदर चित्रांसहित ! आता परत एकदा मिपाकट्टाज्यूसभक्षण करायला पुण्यात लवकरच या ! :)
  • Log in or register to post comments

http://www.calculator.net

सुबोध खरे
Mon, 10/19/2015 - 12:18 नवीन
http://www.calculator.net/body-fat-calculator.html
  • Log in or register to post comments

आमच्या कंपनीचे डॅाक्टरांनी

कंजूस
Mon, 10/19/2015 - 12:23 नवीन
आमच्या कंपनीचे डॅाक्टरांनी नोकरीच्यावेळी मेडिकल टेस्ट करतांना- १) एक रबरी हातोडीने गुडघ्यांवर ( तिथे मेंदू असतो असं मेडीकल शास्त्रतरी मानत नसावेत ) आणि ढोपरांवर ठोकून पाहिले, २) स्टेथो• ने छातीचे ठोके मोजले, दीर्घ श्वास घेण्यास सांगून मोजले, जागेवरच दोन मिनीटे उड्या मारायला सांगून त्यानंतर मोजले, ३) छातीचं माप श्वास घेण्याअगोदर व नंतर मोजले. ४) वजन घेतले. ५) खोकायला सांगुन पोटाखालचे रिफ्लेक्स पाहिले, ६) आणि( काही लैंगिक रोग वगैरे). ओके म्हणाल्यावर मी त्यांना विचारले बास इतक्या टेस्ट पुरेशा असतात? " होय यातून बरेच कळते." गावातले शेतकरी दहा किलो+ चा नांगर तीन चार किमी खांद्यावर नेतात तो पाहून वाटते असेल यांचे वजन नव्वद किलो तर काय बिघडते?
  • Log in or register to post comments

काका अभिनंदन!!

पिलीयन रायडर
Mon, 10/19/2015 - 12:27 नवीन
काका अभिनंदन!! फळांचे ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच? आणि कच्च्या भाज्या पोटात जाताना अनेक जण असेही म्हणतात की न शिजवल्याने त्याचाही त्रास होऊ शकतो. हे कितपत खरे आहे?
  • Log in or register to post comments

चित्रगुप्तकाका, लेख अतिशय

बॅटमॅन
Mon, 10/19/2015 - 12:30 नवीन
चित्रगुप्तकाका, लेख अतिशय आवडला. सध्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे, सबब नक्कीच मददगार साबित होगा ये लेख. अनेक धन्यवाद!!!!
  • Log in or register to post comments

कमी झालास तर गायब होशिल रे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/19/2015 - 17:06 नवीन
कमी झालास तर गायब होशिल रे आता बॅट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/19/2015 - 19:32 नवीन
+१ बॅट्याला वजन कमी करायला कोणी सांगितले ???!!!... बहुतेक आंतरजालावर सापडलेला तज्ञ असावा ;) मात्र, बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे रोज अर्धा ते पाऊण तास तरी घाम येऊन नाडीचे ठोके १२० पर्यंत वाढतील इतपत व्यायाम करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅट्या

नाखु
Tue, 10/20/2015 - 09:35 नवीन
कुणाच्या तरी नजरेत "मावत" नसावा किंवा

भरला

असावा म्हणून हे वजन कमी करण्याचे त्याच्या डोक्यात आले आहे असे आमचा मिपा नगरीचा वार्ताहर कळवतो. दैनीक सध्या आनंद तर्फे कट्टेकर्यांच्या माहीती करता प्रसारीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१

बॅटमॅन
Tue, 10/20/2015 - 12:27 नवीन
दिसत नसले तरी वजन बरेच आहे ओ. ७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे. अगोदर ७५ होते ते आता हळू हळू व्यायामाने ७२ पर्यंत आणलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे

प्रसाद गोडबोले
Tue, 10/20/2015 - 14:20 नवीन
७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे
चला किमान एका गोष्टीवर तरी एकमत आहे आपले =)) http://www.misalpav.com/comment/757884#comment-757884
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बॅट्या लेका तुला गरज नाही बे

अभ्या..
Tue, 10/20/2015 - 14:35 नवीन
बॅट्या लेका तुला गरज नाही बे कमी करायची. मलाच ३ किलो तरी कमी करावे असे वाटू लागलेय. सध्यातरी वन्डे ज्युसडे करायला काहि हरकत नाही. नंतर टेस्ट खेळून पाहावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

नाय बे अभ्या, गरज नक्कीच आहे.

बॅटमॅन
Tue, 10/20/2015 - 14:41 नवीन
नाय बे अभ्या, गरज नक्कीच आहे. नुसते बघून कळत नाय पण तीनचार महिन्यांचे पाप (या शब्दप्रयोगासाठी पोपशास्त्री यांचे पोरगीपटाव शास्त्र पहावे.) तरी नक्कीच आहे त्याचे परिमार्जन करण्याची नितांत गरज आहे. =)) तूही लाग कामाला. वजन कमी केल्यावर खास सपाटपोटप्रीत्यर्थ ज्यूसकट्टा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))

बॅटमॅन
Tue, 10/20/2015 - 14:38 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =)) जोक्स अपार्ट, मोबिलिटी वाढवणे हे परम आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मोबिलिटी

प्रसाद गोडबोले
Tue, 10/20/2015 - 14:49 नवीन
अनुमोदन . फक्त मोबिलीटीच नव्हे तर strength stamina speed agility चारही पाहिजे ! कोणताही ट्रेक करताना आता मला जे साठवलेले ६-८ किलो एक्स्ट्रा फॅट आहे ते जाणवते राव .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+११११११११११

बॅटमॅन
Tue, 10/20/2015 - 14:57 नवीन
आम्! अन साठवलेले फॅट जाणवते हे बाकी खरेच!!!! :( इन्शामारुती, हे होईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आयडियली पाहता खांद्यावर ९-१०

बॅटमॅन
Tue, 10/20/2015 - 15:01 नवीन
आयडियली पाहता खांद्यावर ९-१० किलो वजनाची सॅक घेऊन राजगडसारखा ट्रेक तसा बर्‍यापैकी सहजपणे करता आला पाहिजे. ही अपेक्षा तशी बरीच जास्त आहे सद्यस्थितीकडे पाहता, पण असे काही लक्ष्य समोर ठेवले तर थोडे थोडे करत करत सुधारणा होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पेशन्स लॅडी पेशन्स.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/20/2015 - 16:38 नवीन
पेशन्स लॅडी पेशन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आय आय क्याप्टन!

बॅटमॅन
Tue, 10/20/2015 - 18:17 नवीन
आय आय क्याप्टन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

चांगला लेख !

धर्मराजमुटके
Mon, 10/19/2015 - 12:30 नवीन
चांगला लेख ! मात्र याबरोबरच शादी के पहले आणि शादी के बाद चा फोटो ( आय मीन सुरुवातीचा फोटो आणि प्रयोगानंतरचा फोटो) टाकला असता तर आमच्यासारख्यांना जरा जास्त प्रेरणा मिळाली असती !
  • Log in or register to post comments

पहले और बाद

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 12:03 नवीन
पहले और बाद चे फोटो द्यायचे आहेत, पण अद्याप कंबरेचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही (३८ वरुन ३३ वर आली, पण २८-३० वर यायची इच्छा आहे) शिवाय ते सिक्स अ‍ॅब वगैरे जमले तर उत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

हायला, सिक्स प्याक अ‍ॅब !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/20/2015 - 12:13 नवीन
हायला, सिक्स प्याक अ‍ॅब ! शर्ट काडून पिच्चर-बिच्चर मदे काम करायच इचार हाय काय, भाय ?! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

.

dadadarekar
Mon, 10/19/2015 - 12:37 नवीन
आजपासून सुरु केले. दोन काकडी , दोन गाजर , एक सफरचंद , दोन संत्री , थोडी मेथी व चार टोम्याटो. मिस्करातून फिरवून थोडे पाणी घातले. अर्धा लिटर लिक्विड तयार झाले. यात पाणी घातले तर चालते ना ? साखर मीठ घातले नाही. चोथा गाळला नव्हता. चोथ्यासकटच प्यालो. सोबत लिंबू सरबत. संध्याकाळी थोडे दूध , दही , के ळी व खजूर ज्युस करायचा आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

फक्त गाजराचे तुकडे शिजवले होते.

dadadarekar
Mon, 10/19/2015 - 12:39 नवीन
बाकी कच्चे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच?

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 12:53 नवीन
न शिजवलेल्या भाज्या-फळे हे पचायला कठीण (त्यामुळे अयोग्य), आणी शिजवल्याने त्यातले व्हिटॅमिन वगैरे नष्ट होतात, या दोन्हीवरचा एकत्रित उपाय म्हणजे जूस. नुस्ती कच्ची फळे खाल्ल्यास त्यांचा चोथा शरीराबाहेर टाकायला पचन-संस्थेला एक-दोन दिवस काम करावे लागते, त्यामुळे आतड्यात वर्षानुवर्षे साचलेली घाण बाहेर काढायला मोकळीक मिळत नाही. जूसरद्वारे चोथा आधीच काढून टाकून आपण फक्त पाणी आणि पोषकद्रव्ये घेत असल्याने ते काम सहजपणे केले जाते. शिवाय आतड्यातील परजीवी जंतु (parasites) हे मुख्यतः शर्करा आणि starch वर जगत असतात, त्यांच्या अभावी ते मरून बाहेर पडतात, परिणामी भूक कमी लागू लागते, गोड, मैद्याचे पदार्थ वगैरे खाण्याची इच्छा मावळते. Gluten युक्त धान्ये विशेषतः गहू (मैदा, कणीक इ. चे पदार्थ) पचणे (पोटात विघटित होणे) कठीण असल्याने ते शरिरात हानिकारक द्रव्ये निर्माण करत असतात. त्या ऐवजी ज्वार, बाजरी इ. ची भाकरी वा अठरा धान्याची भाजणी खाणे उत्तम. खरेतर दुग्धजन्य पदार्थ (दूध, खवा, मिठाया) पण कमी करणे बरे. मी लेखाच्या शेवटी दिलेला तूनळीवरील 'Fat, Sick and Nearly Dead' हा व्हिडियो अवश्य बघावा.
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Mon, 10/19/2015 - 13:04 नवीन
आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो. ताकातील पालक वगैरेही वापरता येइइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आगोबै , मी जुसर नसल्याने

मांत्रिक
Mon, 10/19/2015 - 13:18 नवीन
आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो. दादूस काय चाललंय काय? एकतर आगोबैनं सुरुवात! मग जुसर हा प्रेमळ उच्चार. मग मिश्किल मिस्कर? चोथ्यासकट कसे प्यालात? चोथा एकतर गिळावा लागणारच किंवा चावावा तरी लागणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

थोडे पाणी घालून पातळ केले होते.

dadadarekar
Mon, 10/19/2015 - 13:42 नवीन
वर फोटोत दिले आहे तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

चोथा चांगला असतो ना शरीराला?

पिलीयन रायडर
Mon, 10/19/2015 - 13:11 नवीन
चोथा चांगला असतो ना शरीराला? पोट साफ होण्यासाठी फायबरयुक्त आहार असावा असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. की हे असे फक्त डाएट पुरते (शरीरशुद्धी पुरतेच..) करायचे असुन नंतर रोजचाच आहार घ्यायचा आहे? अजुन काही शंका, -मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. वीकांताला हे प्रयोग केले तर मदत होईल का? -मध्यंतरी शंखप्रक्षालनासंबंधी पण वाचले होते ज्यात काही विशिष्ट व्यायाम आणि पाणी पिणे ह्याची सांगड घालुन १८-२० ग्लास पाणी पिऊन पोट साफ केले जाते. ह्या क्रियेतही आतडे साफ होत असतील ना? पण तेव्हा असा "काळसर्प" बाहेर पडल्याचे कधी ऐकले नाही. किंवा पंचक्र्मातही बहुदा विरेचनात पोट साफ होते तेव्हाही असे काही बाहेर पडल्याचे ऐकले नाही. ह्या मागे काय करण असु शकेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

>>> मी नोकरी करते, शिवाय

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 13:38 नवीन
>>> मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. रात्री पाच सात बदाम भिजवून सकाळी सालं काढून खाणे. मस्त एनर्जी टिकते. याबरोबर सुका मेवा कमी क्वांटम मध्ये जास्त एनर्जी देतोच. बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम. ज्युस बनवल्यास साखर अजिबात नको. डॉक्टरांना प्रश्न - कार्ब्स काही दिवस पूर्ण बंद केले तर काय होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

फळे की ज्यूस ?

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 13:59 नवीन
बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम.
हे एरवी, म्हणजे जेंव्हा आपण पोळी, भात वगैरे आहार घेत असतो, तेंव्हा ठीक, परंतु शरीर-शुद्धीसाठी रसाहार घ्यायच्या दिवसात ते योग्य नाही, याचे कारण मी एका प्रतिसादात दिलेच आहे. समजा, एक टोपलीभर भाज्या-फळे आपण घेतली तर ती सर्व कच्ची एका दिवसात आपण खाऊ शकत नाही, आणि खाणेही योग्य नाही, मात्र त्यांचा रस सुमारे तीन-चार ग्लास निघेल, तो मात्र आपण सहज पिऊ शकतो, त्यातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळतातच, परंतु चोथा बाहेर टाकून देण्याच्या कामात पचनसंस्था गुंतून रहात नाही, परिणामी जुनी साचलेली घाण काढणे शक्य होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओह ओके.

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 14:02 नवीन
ओह ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

वेगळ्यावेगळ्या रंगाची फळे व भाज्या खाउन

dadadarekar
Mon, 10/19/2015 - 14:08 नवीन
इतर काहीच न खाल्ल्याने तो काळपट संडास तयार झाला आहे. त्यात आधीची घाण व फळभाज्यातील रंगद्रव्ये दोन्ही असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

दुपारी हफिसात ज्युस कसा करणार?

dadadarekar
Mon, 10/19/2015 - 13:13 नवीन
त्यामुळे कच्ची फळे व भाज्या खाव्या लागतील. सकाळी मिक्स जुस दूपारी फळे व भाज्या. रात्री फ्रुट जुस दही घालून ( पंचामृत टाइप) थोडेसे दूध घालावे लागेल. त्यातून क्यालशियम व विट डी मिळेल. ते भाज्या / फळात नसते. यात मोड आलेले गहू , कडधान्ये घेता येतील का ? ... आमची एक एच आय व्ही पेशंट रोज कोर्फड गर , मोड आलेले गहू व कडधानुये खाते.. औषधेही आहेत. तीची तब्येत अगदी निरोगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा कालसर्पयोग प्रकार

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 13:44 नवीन
हा कालसर्पयोग प्रकार वेगवेगळ्या प्रकारे करतात असं वाटतंय. २००० साली एस एस वाय केलं होतं तेव्हा शेवटच्या टप्प्यात पातेलंभर कोमट पाणी मीठ घालून प्रत्येकाला दिलं होतं. पित राहायचं नि थोडं चालणं उड्या मारणं वगैरे. मीठाचं पाणी प्यायल्यावर व्हायचं ते होतं. आधी उलट्या मग खालून सगळं बाहेर पडणे वगैरे. पाणी पिणं थांबवायचं नाही. या बाहेर पडण्यात आधी चित्रगुप्त म्हणतात तसं अतिशय घाण पासून नंतर हळू हळू सगळं चिकटलेलं वगैरे बाहेर पडतं. शेवटाकडं प्यायलेलं पाणीच संडासवाटे बाहेर पडू लागतं. नंतर १० १५ दिवस बाळाचा आहार घ्यायचा. गुरगुट्या भात तूप घालून वगैरे. आणि त्यातले लोक निव्वळ कच्च्या भाज्या, ड्राय फ्रुट्स नि फळं यावर असतात.
  • Log in or register to post comments

अत्यंत माहितीपूर्ण धागा.

मोदक
Mon, 10/19/2015 - 14:03 नवीन
अत्यंत माहितीपूर्ण धागा. तुमच्या चिकाटीला सलाम!!!!! तुमचे दिवसाचे पूर्ण वेळापत्रक द्याल का? १) सकाळी किती वाजता उठलात? २) सकाळी शरीर मोकळे होण्यासाठी काही व्यायामप्रकार केले का? ३) नाष्ट्या ऐवजी किती ग्लास ज्यूस प्यायलात? किती वाजता? ४) दिवसभरात इतर काही खाल्ले का? साधारणपणे किती वाजता? ५) पाणी किती प्यायलात? घन स्वरूपातील अन्न टाळत असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण वाढले का? पाणी कोमट प्यायलात का साधे? ६) हे सगळे करताना दिवसातून ठरावीक वेळी माफक व्यायाम केला का? ७) झोप शांत लागते का? ८) झोपेच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या वेळापत्रकामध्ये काही फरक पडला आहे का? आणखी काही मुद्दे आठवले तर पुढील प्रश्न विचारेन.
  • Log in or register to post comments

मोदकला पुढचा प्रोजेक्ट

पिलीयन रायडर
Mon, 10/19/2015 - 14:07 नवीन
मोदकला पुढचा प्रोजेक्ट मिळालेला आहे! आता लवकरच आपल्याला शास्त्रशुद्ध लेखमाला वाचायला मिळलेच. मग आपण ती आपल्या रुटीनमध्ये चोप्य पस्ते करु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

=)) =)) =))

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 14:11 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ओ ताई.. कशाला चेष्टा करताय

मोदक
Mon, 10/19/2015 - 14:17 नवीन
ओ ताई.. कशाला चेष्टा करताय गरिबाची. व्यायाम करायचा कंटाळा असल्याने आणखी काही मार्ग मिळतो आहे का ते शोधत असतानाच हा लेख सामोरा आला ..आणि हे सर्वांना सहज शक्य आहे. चित्रगुप्त साहेब.. तुमचे या लेखाबद्दल प्रचंड प्रचंड आभार..!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खि खि खि

टवाळ कार्टा
Mon, 10/19/2015 - 14:45 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मोदक यांच्या प्रश्नांची उत्तरे

चित्रगुप्त
Mon, 10/19/2015 - 20:42 नवीन
१. सकाळी उठण्याची वेळः मला लहानपणापासून सुमारे ५-५:३० वाजता उठायची सवय आहे, त्यातून आता वयामुळे पहाटे तीन ते पाच च्या मधे केंव्हातरी जाग येते. २. व्यायामः मी सर्व बाबतीत अनियमित असल्याने व्यायाम नियमित कधीच केलेला नाही. त्यातून हा प्रयोग सुरु केला तेंव्हातर फारच आळशी झालेलो होतो. पोट, वजन कमी झाल्यावर मात्र उत्साह संचारून बर्‍यापैकी नियमित व्यायाम सुरु झाला. ३. माझ्या जेवणाखाण्याच्या वेळाही ठरलेल्या नाहीत (कदाचित अश्या सर्व अनियमितपणाच्या परिणामीच मूळव्याधीपर्यंत मजल गेली असावी) त्यामुळे जेंव्हा वाटेल, तेंव्हा थोडे थोडे जूस सावकाशपणे पीत होतो. ४. अन्य खाणे: याबद्दल नोंद न ठेवल्याने आता आठवत नाही, परंतु दोन-तीन दिवसांनंतर (कृमि मेल्यावर ??) अन्य काही खाण्याची इच्छा कमी झाली. खजूर, केळे, अंजीर, भिजवलेले बदाम, उकडलेले अंडे असे वाटले तर खात असे. ५. पाणी तहान लागेल तेंव्हा साधेच पीत असे. मुद्दाम ठरवून अमूक इतके असे केले नाही. जूसिंगच्या दिवसात एकाद लीटर पाणी पुरेसे वाटते. उन्हाळा असेल तर जरा जास्त. उत्तम भाज्या - फळे थंडीत चांगली मिळत असल्याने तेंव्हा करणे सोपे. ६. व्यायाम दहा-पंधरा दिवसांनंतर करू लागलो, तोही अगदी हलका. ७. झोप नेहमी अगदी लगेच लागते, त्यात काही बदल झाला नाही. पांढरी साखर (आणि मिठाया) खाऊ नये, त्या ऐवजी खजूर, केळी (अगदी पिकलेली) खाणे चांगले. मैद्याचे सर्व पदार्थ वर्ज्य केल्यास उत्तम परिणाम होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद. आणखी प्रश्न असल्यास

मोदक
Tue, 10/20/2015 - 12:39 नवीन
धन्यवाद. आणखी प्रश्न असल्यास जरूर विचारेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

इच्छुकांसाठी जो क्रॉस यांची

तर्राट जोकर
Mon, 10/19/2015 - 14:13 नवीन
इच्छुकांसाठी जो क्रॉस यांची ही मोफत पीडीएफ आहे. १५ दिवसाचा प्लान आहे. बघुया करून. ते आतडीतून निघालेले रबर बघून नखशिखांत हललो आहे. कित्येक प्रयत्नांनंतरही वजन कमी न होण्याचे खरे कारण आज सापडले. चित्रगुप्त यांना लाख धन्यवाद! हा धागा योग्य रितीने चालू राहावा, चांगले माहितीपूर्ण प्रतिसाद येऊन प्रयोगकर्त्यांच्या अनुभवाचे बोलही इथे यावेत. आर्थिक घडामोडीसारखा हा धागा प्रवाही राहिले तर बरं.
  • Log in or register to post comments

पिडिएफ घेतलीये.आज सर्व भाज्या

अजया
Mon, 10/19/2015 - 14:26 नवीन
पिडिएफ घेतलीये.आज सर्व भाज्या फळं आणते लिस्ट प्रमाणे.बघतेच करुन डिटाॅक्स ! पिरे चल सुरु करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा