✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 07/16/2015 - 16:59  ·  लेख
लेख
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार. ते खराब आहेत का चांगले, हे घरी गेल्याशिवाय नाही कळणार! घेणारे भाविक म्हणण्यापेक्षा - भावुक अधिक आहेत, तिथे फक्त विकण्याला महत्व. तसं आहे हे. घेणाऱ्यांनी विचार नाही केला तर देणाऱ्यांना काय पडलेय? खालील चित्रात २००६-१३ या काळात वाढलेली कॉलेजेस पाहिली की हे कळेल. सध्या सतरा लाख प्रवेश देशात होतात. त्यापैकी एक लाखाहून अधिक महाराष्ट्रात होतात. अनेक मोठ्या व्यक्तिंनी वेळोवेळी या वाढीवर जाहीर टीका केलीच आहे. 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांनी तर थेट ही असली वाढ देशाला लाजिरवाणी असल्याचं म्हटलंय ! अभियांत्रिकीची संपूर्ण भारतात वाढलेली प्रवेश क्षमता : गेल्या सात वर्षात जवळ-जवळ चौपट! e मार्च २०१० मधे एक आशादायक बातमी वाचली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाने परदेशी विद्यापीठांना काही अटींवर भारतात खासगी विद्यापीठे सुरु करायला परवानगी द्यायचं ठरवलं. (त्यावेळची वॉल स्ट्रीट जर्नल मधली ही बातमी) याला आधार असा होता की कुठल्याश्या पहाणीनुसार अजूनही तांत्रिक शिक्षण घेतलेले लोक जागतिक पातळीवर कमी पडणार आहेत. पण आपले शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाही. त्यामुळे इथल्या युवकांना ही संधी मिळणार नाही . त्यापेक्षा परदेशी विद्यापीठांनी इथे यावे तसेच भारतीय उद्योगांनी पण आपली विद्यापीठे काढावीत. शिवाय हे दोन्ही घटक भागीदारीत सुद्धा हे करू शकणार होते. सरकार डाव्या पक्षांवर अवलंबून नसल्याने हे शक्य आहे असा कयास होता. सरकारला हे माहीत होते की दर्जेदार शिक्षणाला प्रचंड खर्च आहे. तो करणे आपल्याला शक्य नाही. त्यापेक्षा हे सरळ सोपे आहे ते करून मोकळे व्हावे. असा निर्णय होण्यामागे पाश्चात्य देशांचा इंटरेस्ट असणारच. दरवर्षी लाखो मंडळी शिकायला तिकडे जातात आणि स्थायिक होतात. पण जे पैशाच्या थोडक्या कमतरतेमुळे जाऊ शकत नाहीत त्यातले काही इथेच मिळाले निम्म्या शुल्कात तर काय वाईट आहे? टाटा, विप्रो आणि काही आयटी कंपन्यांना अश्या विद्यापीठांमध्ये रस होता कारण सध्या दरवर्षी पास होणाऱ्या सतरा लाखातले एक लाख इंजिनियर पण थेट त्यांच्या कामाचे नसतात. त्यापेक्षा आपापले हवे तसे मनुष्यबळ तयार केलेले बरेच. पण असं काही पुढे झालंच नाही. कुठे माशी शिंकली? सरकारमध्ये सामील महान मंडळी आडवी आली. या विद्यापीठांनी '' Non-profit organization'' असण्याची मुख्य अट आणि वर त्यांनी या संस्थांतही घटनेनुसार ५०% आरक्षणाची अट पुढे केली. या कल्पनेचे उद्धिष्ट वेगळे आहे, १००% भांडवल खासगी आहे याचा सोयीस्कर विसर पडला, अश्या अटी मान्य करणे त्या विद्यापीठांना शक्य नव्हते आणि सरकारला पण ती फी भरणे शक्य नव्हते. एकूण योजना बारगळलीच. आता पुन्हा बोलावले तरी ही विद्यापीठे येतील असं वाटत नाही. त्यातली मेख अशी होती की अश्या फक्त दहा विद्यापीठांनी सध्याच्या १५००० खासगी संस्थांचे पितळ उघड केले असते. दर्जा म्हणजे काय ते लोकांना पहायला मिळाले असते. संशोधनाची संस्कृती आली असती - किंवा सुरु तरी झाली असती. सध्याच्या संस्थांची क्याम्पस प्लेसमेन्ट बंद झाली असती. आपल्या मुळाशी येणारी अशी काही सुधारणा त्यांना नको होती. एकूण काय, इच्छाशक्तीअभावी ही हाताशी आलेली मोठी संधी गेली. तरीही प्रत्येक सरकार काहीतरी वेगळं करू पाहातंच. पण चुकीचे निर्णय झाले की अनेक पिढ्या परिणाम भोगत बसतात. आता पुन्हा सरकार बदलले असल्याने कांही नवे निर्णय येणे साहजिकच आहे. त्यानुसार कर्नाटकच्या धर्तीवर सर्व महाराष्ट्रात एकच तंत्रविद्यापीठ असणार आहे असं समजतंय . याच्या चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. चांगली बाजू अशी की सध्या मुलांमधे विभागीय कॉम्प्लेक्स खूप जास्त आहे. अन्य ठिकाणी BE झालेल्यांना पुण्यामुंबईत काहीसं कमी लेखलं जातं, ते होणार नाही. सर्वांनी एकसारखीच परीक्षा दिलेली असल्याने भेदभाव होणार नाही. अन्य कांही राज्यांत याचा फायदा झाला आहे. सध्या परीक्षा व्यवस्थेवर ताण आहे तो परीक्षक कमी संख्येने आहेत म्हणून. विभागीय असमतोल असूनही अन्य विभागात पेपर तपासणीला पाठवता येतील. निकाल वेळेवर लागतील . मर्यादा अशी आहे की या सर्व शिक्षकांना एका पातळीवर प्रशिक्षित करणे कठीण काम आहे. '' चलता है '' मनोवृत्ती ग्रामीण संस्थांत कमालीची दिसून येते. मी काही ठिकाणी परीक्षक म्हणून जात असे तेव्हां ही मंडळी कधी भिकाऱ्यागत 'मार्क्स चांगले द्या ' म्हणून गयावया करत. त्यांना नि:पक्षपाती परीक्षेचे महत्व, त्याचा मुलांना होणारा फायदा , हुशार मुलांवर होणारा अन्याय , हे काही सांगून समजत नसे. शेवटी ते असेही सांगत की, '' आमच्या नोकरीचा प्रश्न आहे … '' संस्थाचालक मुलांच्या पासिंगवरून त्यांची नोकरी चालू ठेवायची का हे ठरवतात! मग अशा वेळी मुद्देच संपतात. असले प्रकार आता शहरातही होऊ लागलेत. एकाच विद्यापीठ आल्यावर अश्या ठिकाणांना आणि चांगल्या संस्थांना वेगळे करणे कठीण होणार. म्हणजेच ' सब घोडे बारा टक्के' ची शक्यता आहे . जर काही गैरव्यवहार झाले तर संपूर्ण विद्यापीठ बदनाम होऊ शकते. याचा भारताबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसू शकेल. पण हे सगळे झाले जर-तर . आता यावर्षीचे अभियांत्रिकी प्रवेशाचे महाराष्ट्रापुरते आकडे पाहू : महाराष्ट्रातल्या एकूण मंजूर जागा: १,६५,००० आलेले अर्ज: १,१०,००० रिक्त जागा : ५५,००० अंतिम किमान रिक्त जागांचा अंदाज : ७०,००० (४२%) अचूक अंतिम चित्र सप्टेंबरमध्ये स्पष्ट होईल लवकरच हा रिक्त जागांचा आकडा ५०% पेक्षा वाढेल. कारण यावर्षीसुद्धा नव्या संस्था आणि तुकड्या आल्याच आहेत ! आजची अवस्था हे बाळसे नसून सूज आहे, हे कळत असूनही वळत नाही अशी सगळ्यांची अवस्था आहे . ''अति तिथं माती '' ची ही केस. आमच्या कंपनीतल्या क्याम्पसला जाणाऱ्या लोकांच्या अंदाजाने खरी गरज याच्या निम्मी पण नाहीय. महाराष्ट्रासाठी त्यांनी फक्त सोळा कॉलेजेसची यादी केलीय त्याबाहेरील कॉलेजच्या लोकांना ते फ्रेशर म्हणून घेतच नाहीत. अन्यत्र पास झालेल्यांना दोन वर्षे अनुभव असल्यास परीक्षा घेऊन- अनुभवाचा खरेपणा तपासून मग घेतात. विशेष म्हणजे तीन सर्वोत्तम कॉलेजेसमधूनही घेत नाहीत कारण तिथली मुले अमेरिकेला किंवा व्यवस्थापनाकडे नक्कीच जातात. ट्रेनिंग पूर्ण होता होता कंपनी सोडतात ! सामाजिक परिणाम: माझ्याकडे गावाकडचे दोन जुळे बंधू जॉबसाठी मदत करा म्हणून भेटायला येतात. हे खरं जुळ्याचं दुखणं . एकाला इंजिनियर केलं म्हणून दुसऱ्यालाही केलं. पदवीप्रमाणे ज्ञान दोघांनाही नाही. घरची गरिबी असूनही ते दोघे लहान खेड्यात BE झाले. त्यात नऊ लाख खर्च झालाय आणि पुण्यात काटकसरीने राहून सात महिने नोकरी शोधतायत. घरून खर्चासाठी दोघात पाचसात हजार महिना मिळतात. आता पालकांची सहनशक्ती संपत आलीय. अत्यंत निराशेत असणारे पण हिम्मतीने घरची शेती करायला नको म्हणणारे हे दोघेजण केवळ प्रातिनिधिक आहेत. अशी किती मुले- मुली नोकरी शोधत फिरत असतील? शिक्षणाची गंगा (?) गावात पोहोचवण्याचा दावा करणाऱ्यांनी नक्की विचार करावा . अर्थव्यवस्थेत वाटा: २००७ च्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यस्तरावर सोळाशे कोटी रुपये शुल्क घेतले गेले. अनधिकृत आकडा देवाला ठाऊक . आज त्यावेळेपेक्षा दुप्पट मुले इंजिनियरिंग करतात आणि वाढीव फीनुसार वर्षाला किमान तीन हजार कोटी गोळा होत असू शकतील. एव्हढा खर्च करून हा आउटकम समर्थनीय नाहीच. या उत्पन्नावर या संस्था कर भरतात का? तसेच या मुलांनी बँकेतून कर्ज काढलेले असेल तर ते नोकरी न मिळाल्याने फेडू शकतील् का? नसल्यास बँकेचे - पर्यायाने मोठे राष्ट्रीय नुकसान होणार आहे . किंवा काही पालक शेत विकून किंवा गहाण ठेवून पैसे घेतात. अधिकांश मुले नोकरीत जाण्यायोग्य नाहीत , हे माहित असूनही प्रशिक्षणावर मेहेनत घेतली जात नाही. काहीवेळा तर इंग्रजी न येणे किंवा आत्मविश्वास नसल्याने चांगली मुले मागे पडतात. पासिंगची टक्केवारी एकूणच ही समस्या दीर्घकालीन प्रश्न निर्माण करेल असे वाटते. गेली तीस वर्षे या सगळ्याचा तटस्थ साक्षीदार म्हणून पहाताना मला चित्र फारसे आशादायक वाटत नाही. त्या क्षेत्रातल्या आणि उद्योगातल्या लोकांनाही त्यांच्या कडून फार अपेक्षा नाहीत. संस्थाचालकांना हे ठाऊक आहे पण चालतेय तितके दिवस ते कमावून घेणारच. इंडस्ट्रीला लागेल तसे इंजिनियर्स ते घेणार- शिकवणार, वापरणार - नको तेव्हा काढून टाकणार. मग कळत कुणाला नाहीय? तर आपल्याला - म्हणजे पालकांना. पूर्वी मी शिक्षणक्षेत्रात काम केले असल्याने अनेकजण एकमेकांच्या ओळखीने सल्ला घेण्यासाठी संपर्क साधतात. परवा एका पालकाला थम्ब रूल सांगितला. मेरीट लिस्ट लागलीय- कित्येक लाख मुलं पात्र ठरली आहेत . तुमच्या पाल्याचा क्रमांक पहिल्या दहा हजारात असेल तरच अभियांत्रिकीचा विचार करा अन्यथा दुसरं काहीतरी करा . त्यांना पटलं नसेलच. पण नंतर निराश होण्यापेक्षा आधीच काहीतरी भरीव करायला घेतलेलं बरं. सरकार नियंत्रण करीत नसेल तर आपण आपल्यापुरते नक्कीच करू शकतो . सरकारने हस्तक्षेप करून कडक निकष लावून देशभरातला इनटेक सतरा लाखवरून सात लाख इतका तरी कमी केला आणि दर्जा वाढवला तर काही बरे होऊ शकते. या वळणावर कठोर निर्णय लागणार! शैक्षणिक संस्था स्वतःहून काहीही करणार नाहीत. पुढे काय? (हा अनाहूत सल्ला मिपाकरांना नसून (मिपाकर लै पोचलेले आहेत!) घरट्यातून डोके काढून डोळे किलकिले करून वास्तव जगाकडे पहाणाऱ्या नवोदित अभियंत्यांना आहे.सुदैवाने अनेक मुलांना वास्तवाची जाणीव झाली आहे.) बाबांनो आणि बबड्यानो ! आयटीत जाण्याने ऐटीत रहाण्याची वेळ आतां राहिली नाहीय. या क्षेत्रातली वाढ ३०% प्रतिवर्ष वरून १०.२% वर आली आहे म्हणे. दिवसेंदिवस त्याना मिळणारा प्रतितास दरही कमी होत गेल्याने जास्त पगार ते देऊ शकत नाहीत. जुनी खोडं स्वतः टिकून रहातात. त्याबदल्यात दहावीस माणसं सहज कमी करून कंपनीला फायदा दाखवतात आणि त्यामुळे काम करणाऱ्या मोजक्या लोकांवर ताण पडतो. सध्या निवृत्तीचं प्रमाण कमी आहे पण पाच वर्षात ते वाढेल अकाली निवृत्ती आणि सक्तीची निवृती सुरु होईल, आणि काहीशी संधी सुरु होईल - पण जे आधीच तिथे असतील त्याना. त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार सोडून द्यावा. मिळत असेल तर नक्की जावे, पण आपल्या कोअर ब्रांचचा अभ्यास चालूच ठेवावा. ज्याच्याकडे स्किल आहे त्याला सर्व क्षेत्रांत नेहमीच मागणी राहील. किंवा त्याऐवजी स्टार्टअप्स बद्दल माहिती घेऊन त्यात काम करावं. किंवा विक्रीची कला असेल तर सेल्स मध्ये करियर करावं. ती कला नसल्यास अवगत करावी . बी पी ओ किंवा तश्या प्रकारच्या कामापासून खूप दूर राहावं आणि भरपूर कष्टाची सवय लावून घ्यावी. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नोकरी सुरु केल्यास एक वेगळाच अनुभव मिळतो. मेरीट लिस्ट मध्ये अगदी तळाशी असलेल्या एक लाख मुलांनी तर स्किल इंडिया सारख्या योजनेत सहभागी व्हावे. मिसळपाव वर 'क्लोंडाईक गोल्ड रश' वाचताना मला या सगळ्या प्रकाराची राहून राहून आठवण येत होती. थेट तुलना होऊ शकत नसली तरी 'कमालीची लालसा' हे साम्य आहेच - आपल्या समाजाला ते कुठे नेणार हे समजण्यापलीकडचे आहे. ( समाप्त ) संदर्भ, आकडे आणि चित्रे: पहिल्या भागात दुवे दिलेली AICTE आणि DTE यांची अधिकृत संस्थळे.

Book traversal links for तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

  • ‹ तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
आस्वाद
समीक्षा
लेख

प्रतिक्रिया द्या
47041 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

मस्तंच लेखमाला !

पगला गजोधर
गुरुवार, 07/16/2015 - 17:13 नवीन
सर आता माझ्या मनात अनेक डाउट्स निर्माण झाले आहे, उद्या विचार करून त्यावर काकू चा धागा काढेन कदाचित…
  • Log in or register to post comments

माझ्या कंपनीत इंजिनीअरचे

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/16/2015 - 17:14 नवीन
माझ्या कंपनीत इंजिनीअरचे फ्रेशर घेणे बंद केले आहे...फक्त बीएस्सी आयटी फ्रेशर घेणार...कारण इंजिनीअरचे फ्रेशर १-३ वर्षांत सोडून जातात
  • Log in or register to post comments

टकाभौ ल्याटरल साठी आहे का ओपनिंग ?

पगला गजोधर
गुरुवार, 07/16/2015 - 17:40 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नका येउ

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/16/2015 - 19:22 नवीन
नका येउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अतिशय सुंदर अशी दखल

सतिश गावडे
गुरुवार, 07/16/2015 - 17:27 नवीन
अतिशय सुंदर अशी दखल घेण्याजोगी लेखमाला.
  • Log in or register to post comments

खेडूतराव अत्यंत माहीतीपुर्ण

सदस्यनाम
गुरुवार, 07/16/2015 - 17:44 नवीन
खेडूतराव अत्यंत माहीतीपुर्ण अन डोळे उघडणारी मालिका. शतशः धन्यवाद. सुरुवातीच्या दोन भागातली परिस्थिती बर्‍यच अंशी पाहण्यात होती पण या भागाने दिलेले धक्के भयानक आहेत. सुदैवाने ह्या क्शेत्रात शिक्षण झालेले नस्ल्याने नशीबवान समजतो स्वतः ला. (जाता जाता: ईंजिनिरींग कॉलेजेसची मुले त्यांच्या त्यांच्या फेस्टीव्हलचे टीशर्टवर "वी मेक द वर्ल्ड", वी बिल्ड द वर्ल्ड" टाईप्चे लोगो मिरवायची. त्यावेळी पण आम्ही त्यांना हसत असू. आता तर कीवच येईल. ऑल ईंजीज टेक लाईट हं ;) )
  • Log in or register to post comments

खूप आवडली लेखमाला.

मधुरा देशपांडे
गुरुवार, 07/16/2015 - 17:47 नवीन
खूप आवडली लेखमाला. एकाच गावातली ३ अशी कॉलेजेस बघितली आहेत जिथे अनेक जागा रिकाम्या आहेत. ही सगळी राजकारणी लोकांची, दोन चकाचक इमारती उभारायच्या, नावाला वृक्षारोपन वगैरे करायचे, तिथे आत काही नसले तरी चालेल. माझी एक वहिनी जेव्हा तिथे शिकवत होती, तेव्हा कित्त्येक वेळा आता या लोकांना कसे शिकवावे, काय करावे जेणेकरुन यांना समजेल, हे अभ्यास करतील आणि पास होतील याने तिलाच त्रास व्हायचा. पण मुलांना कशात रसच नसेल, तर करणार काय. लहान गावात जेव्हा अभियांत्रिकी कॉलेजेस चालु झाली, तेव्हा प्रत्येक घरातुन आता काहीही झाले, कितिही कमी मार्क्स मिळाले तरी पोरगा/पोरगी होइलच इंजिनिअर ही मानसिकता खूप जणांची पाहिली आहे. यात अजुन एक मुद्दा असाही असतो की 'डोळ्यासमोर असलेला बरा, उगाच शहरात जाऊन बिघडायचा, त्यापेक्षा इथे बरे वगैरे'. पण अट्टाहास इंजिनिअरच करायचा. आज यातले बहुतेक जण नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत किंवा कसेबसे भागवताहेत. घराबाहेरही पडावंच लागलं. पण अजुनही आपले मार्क्स, गुणवत्ता बघुन शिक्षणाचा पर्याय निवडण्याची मानसिकता कमीच आहे. मागच्या भागात दोन शिफ्ट्स मध्ये कॉलेज चालवुन विद्यार्थी क्षमता वाढवण्याबद्दल आले होते. जेव्हा आमच्याच कॉलेजमध्ये हे सुरु झाल्याचे ऐकले, तेव्हा आम्हाला हाच प्रश्न पडला होता की जिथे ६० लोकांसाठी लॅबमधली उपकरणे, संगणक पुरेसे नव्हते तर आता १२० लोकांचे काय होणार. अगदी आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःचे लॅपटॉप्स असतात, नेटची उपलब्धता असते तरीही. आणि हे एका चांगल्या समजल्या जाणार्‍या नामांकित कॉलेजात. बाकी ठिकाणी काय बोलणार?
  • Log in or register to post comments

बरोबर आहे, तरी पण कॉलेजेस बंद

आनन्दा
गुरुवार, 07/16/2015 - 22:16 नवीन
बरोबर आहे, तरी पण कॉलेजेस बंद होण्याची शक्यता कमी. कारण हा बराचसा "ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट" चा गेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

अप्रतीम लेखमाला सर. लैच भारी.

बॅटमॅन
गुरुवार, 07/16/2015 - 17:53 नवीन
अप्रतीम लेखमाला सर. लैच भारी.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण मालीका फार आवडली.

स्वाती२
गुरुवार, 07/16/2015 - 17:55 नवीन
माहितीपूर्ण मालीका फार आवडली.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर, समतोल आणि जमिनीवर

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/16/2015 - 18:16 नवीन
फारच सुंदर, समतोल आणि जमिनीवर उभी असलेली लेखमालिका ! या व्यवसाय क्षेत्राचा विचार करणार्‍या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी जरूर वाचावी अशी आहे. या क्षेत्रात अजून पुरेसे न मुरलेल्या (किंबहुना मुरलेल्यांनाही) या लेखांतील वस्तूस्थितीच्या विश्लेषणाचा उपयोग नक्की होईल. जाता जाता : लेखमालिकेत चर्चिलेल्या अर्थ-राज-कारणामुळे वैद्यकिय क्षेत्राचेही पुरेसे "कल्याण' केले गेलेले आहे.
  • Log in or register to post comments

परवाच दहावी पास झालेल्या एका

आनन्दा
गुरुवार, 07/16/2015 - 22:17 नवीन
परवाच दहावी पास झालेल्या एका मुलाला सांगितले, बाबारे तू कायपण कर, पण विंजिनेर बनू नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अस आहे तर हे....

ओहो
गुरुवार, 07/16/2015 - 18:19 नवीन
लहान गावांमधल्या महाविद्यालयांत काय होते हे सगळ्यांनीच येथे सांगितले पण पुण्या मुंबईत तरी काय वेगळे चित्र आहे होम युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी कमी आणि अदर देन युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी जास्त कारण काय तर या विद्यार्थ्यांकडे जरा जास्त पैसा आहे…. एकाच इमारतीत चालवले जाणारे अनेक अभ्यासक्रम, येउन जाउन असणारे प्राध्यापक आणि डझन भर events आणि आदल्या दिवशी फुटणारे पेपर. छानच आहे सर्व. नारायण मूर्ती नि आताच म्हंटल कि गेल्या ६० वर्षात जगाणे नोंद घ्यावी असे संशोधन झाले नाही भारतात. आय आय टी नको आय टी आय हवीत असे पंतप्रधान म्हणत आहे. म्हणजे त्यानाही हे वाटते कि भारतातील युवा वर्गाने रोजानेच काम करवे. (सुट -बूट युवा वर्गाने घालू नये) त्यांनी approns घालवित. या वर्षीच्या बजेट मध्ये शिक्षणावरचा खर्च कमी करून त्यांनी पहिली भेट दिली होतीच त्यात हि कमी लेखत राहा स्वतःला ची भर ! उच्च शिक्षणातला GRE (Gross enrollment ratio ) अजूनही १३-१५ % आहे त्याचे काय? प्राथमिक / माध्यमिक निकालात झालेला फुगवटा हा एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे खेडूत राव, आपली लेखमाला कितीही चांगली असली तरी अजून किती तरी प्रश्न अनुतारीतच आहेत .
  • Log in or register to post comments

सुंदर पण व्यथित करणारे

चैतन्य ईन्या
गुरुवार, 07/16/2015 - 18:21 नवीन
सुंदर पण व्यथित करणारे. माझ्या घरात पार आजोबांपासून शिक्षकी परंपरा होती. माझे आजोबा, काका, वडील आणि मामा शिक्षक होते. २००० साला पर्यंत काहीतरी दर्जा होता. आता बघवत नाही. सर्वच ठिकाणी सरकार स्वतः हात काढून घेतय आणि त्याचे दुष्परिणाम पुढील १०-२० वर्षात जोमाने दिसतील. आत्ता आयटीमधली सुबत्ता हि आधीच्या ४०-५० वर्षात लोकांनी घेतलेल्या कष्टाची होती हे अजून आपल्याला समजलेले नाहीये. नवीन आलेले शिक्षक फक्त आपली नोकरी कशी राहील ह्याच विवंचनेत आहेत. ना धड पगार मिळतो ना धड सन्मान मिळतो आणि मुळात स्वतःला पुस्तकी द्यानाशिवाय काहीच माहिती नाही अशी अवस्था आहे. दुर्दैवाने हे पार पहिली पासून होतंय. इतकी क्लास संस्कृति फैलावली आहे कि मला प्रश्न पडलाय शाळा आणि कोलेजस हवीतच कशाला? नुसतेच क्लासला जावे आणि बाहेर परीक्षा द्यावी. ना कुठे खेळायला मोकळे मैदान आहे ना कुठे तुमच्या लायकी प्रमाणे तुम्हाला काही मिळते. त्यातून प्रचंड लोकसंख्या आणि अतिशय कमी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी चांगली शाळा/कॉलेजेसची संख्या. हे कसे काय जमायचे. राजकीय इच्छाशक्ती कमी आहे आणि पालक लोक घाबरतात. तुम्ही जास्त आरडा ओरडा केला तर तुम्हाला त्रास होतो पण बाकीचे मदतीला येत नाहीत असे चित्र आहे. चिंताजनक अवस्था आहे. त्यातून नवीन सरकार केंद्रात काय राज्यात काय चांगल्या लोकांना बसवते आहे असे दिसत नाही.
  • Log in or register to post comments

खेडूत साहेब

सुबोध खरे
गुरुवार, 07/16/2015 - 18:37 नवीन
खेडूत साहेब अतिशय परखडपणे केलेले वास्तव निवेदन आहे परंतु किती लोकांच्या पचनी पडेल ते माहित नाही. दोन दोन वर्षे नोकरी शोधात असलेले आणी भ्रमनिरास झालेले इंजिनियर किंवा नोकरी मिळत नसल्याने पुढचे शिक्षण रस नसताना चालू ठेवणारे अनेक इंजिनियर आजूबाजूला दिसतात. तुम्ही सल्ला द्यायला गेलात तर तुमचे सर्व व्यवस्थित झाले आहे आणी आता तुम्हाला स्पर्धा नको म्हणून असे सल्ले देता असा प्रतिवाद करणारे पण अनेक दिसतात. लष्करात (किंवा निम लष्करी दलात नोकरी साठी) प्रयत्न करत असणार्या बहुसंख्य इंजीनियरना चार वाक्ये शुद्ध इंग्रजीची बोलता येत नाहीत किंवा त्यांची हे हि भयाण वास्तव डोळ्यांनी पाहिलेले आहे. असे असताना आपला कळकळीचा सल्ला किती लोक मानतील हि शंकाच वाटते. असो लेखमाला अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपण दिलेला कळकळीचा सल्ला
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम!

एस
गुरुवार, 07/16/2015 - 18:39 नवीन
बर्‍याच दिवसांनी इतके सखोल आणि तटस्थ विवेचन मिपावर वाचायला मिळाले. तूर्तास इतकेच म्हणेन की वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेखमाला.

आदूबाळ
गुरुवार, 07/16/2015 - 18:40 नवीन
अप्रतिम लेखमाला. अभियांत्रिकी शिक्षण पुरवणारे (विक्रेते/संस्थाचालक) आणि घेणारे (ग्राहक/विद्यार्थी) या दोन्ही बाजूंकडून होणार्‍या अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचा हा प्रकार दिसतोय.
  • Log in or register to post comments

खेडूतराव, अत्यंत माहीतीपूर्ण

अस्वस्थामा
गुरुवार, 07/16/2015 - 19:20 नवीन
खेडूतराव, अत्यंत माहीतीपूर्ण मालिका. शतशः धन्यवाद. अजून चर्चा करायला आवडेल.. :)
  • Log in or register to post comments

त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार

उगा काहितरीच
गुरुवार, 07/16/2015 - 19:26 नवीन
त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार सोडून द्यावा. मिळत असेल तर नक्की जावे, पण आपल्या कोअर ब्रांचचा अभ्यास चालूच ठेवावा.
आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ?
  • Log in or register to post comments

संस्कृत भाषेचा कंपायलर

सतिश गावडे
गुरुवार, 07/16/2015 - 20:14 नवीन
संस्कृत भाषेचा कंपायलर बनवायला घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

स्वतःच काहीतरी लोकोपयोगी

संदीप डांगे
गुरुवार, 07/16/2015 - 20:17 नवीन
स्वतःच काहीतरी लोकोपयोगी वेबसाईट बनवावी. पैसा छापावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

तुम्ही स्वतः डेवलपमेंट करणारे

संदीप डांगे
गुरुवार, 07/16/2015 - 20:23 नवीन
तुम्ही स्वतः डेवलपमेंट करणारे असाल आणि प्रोजेक्ट कंसेप्ट पाहिजे असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्रोजेक्ट एकट्याला नाही करता

उगा काहितरीच
गुरुवार, 07/16/2015 - 22:15 नवीन
प्रोजेक्ट एकट्याला नाही करता येणार (तितका अनुभव नाहीए) सध्या बेरोजगार बसण्यापेक्षा व्हॉइस प्रोसेस जॉइन केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आमच्या सारख्या कोअर आयटी

अप्पा जोगळेकर
Fri, 07/17/2015 - 09:06 नवीन
आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ? सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे. मिळेल तो जॉब स्वीकारावा आणि येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल.) लेख अप्रतिम आहेच. पण सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

सहमत!

खेडूत
Fri, 07/17/2015 - 09:34 नवीन
सहमत! आयटीवाल्यांची कोअर ब्रांच कंप्युटर सायन्स. ते अपडेट करत राहणे आवश्यक. सुपर स्पेशलायझेशन थोड्या लोकांना फायदेशीर . बाकीच्यांचे नुकसान करू शकते. जसे इलेक्ट्रोनिकस वाल्या मंडळीनी २००० मध्ये व्हीएलेसआय शिकून घेतले, त्याकाळी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पण २००७ नंतर गरजेपेक्षा कित्येक पट व्हीएलेसआय इंजिनियर्स झाले. पुण्यातच ते शिकवणाऱ्या चौदा संस्था झाल्या. मोबाईल ओएस वाले पण नोकियाबरोबर गंडले. अश्या बदलत्या परिस्थितीत मूळ विषयाचं ज्ञान तारून नेतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सहमत !

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/17/2015 - 11:10 नवीन
उगा काहितरीच, प्रश्न कठीण आहे. कारण उद्या काय हा प्रश्न मलापण आजही पडत असतो. आपल्या क्षेत्रात सतत अपडेट रहाव लागेल हे बी. ई. च्या पहिल्या दिवशी सांगितलेलं वाक्य आठवतो आणि सतत काही न काही शिकायचं प्रयत्न करत असतो. आपले बेसिक्स मजबूत करून ठेवा आणि सतत स्वतःला इम्प्रोव्हाइज करत रहा. आपल्या क्षेत्राततरी 'थांबला तो संपला' हे सत्य आहे. खेडूतराव, आपण अगदी बरोबर विश्लेषण केलेय! सगळे मुद्दे अनुभवतच मोठे झालो असल्याने पूर्णपणे सहमत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अजून झाली की मुलांचा नवीन काहीतरी शिकण्याचा, काही नवीन करून दाखवण्याचा उत्साह संपूनच गेलाय. वर जस आपण बर्नआउट बाबत म्हटलंय तसच काहीस आजकाल कंपनीत दाखल होणाऱ्या उमेदवारांबाबत जाणवत. एकदा सिलेक्ट झालो की बस्स! जमेल तसं काम करत रहायचं आणि पगार घेत राहायचा अशी काहीशी वृत्ती सार्वत्रिक होत चालली आहे. काम जमलं नाहीतर लीडला सांगून करवून घ्यायचं … आणि लीड त्यातल्या त्यात कसंबसं करून देणार … संपलं. अरे खुद्से क्यू पढनेका कंपनी को जरुरत होगी तो देगी ट्रेनिंग और पढायेगी असे उद्गार सर्रास ऐकू येतात. ४ ५ वर्ष काम झालेले सरळ अब किताब लेके पढना नही होता म्हणून मोकळे होतात! आम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करत राहतो … एकंदरीत कठीण होणारे असं वाटत चाललंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव

उगा काहितरीच
Fri, 07/17/2015 - 22:33 नवीन
सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे.
फेसबुक जवळजवळ बंदच आहे, मिपा बऱ्याच बाबतीत अपडेट ठेवतं त्यामुळे मिपा चालू आहे.
मिळेल तो जॉब स्वीकारावा
स्वीकारला ... आजच!
येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल
प्रयत्न करतो.
सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.
छे कधीच हार मानणार नाही. शैक्षणिक प्रवास खडतरच होता पण हार मानली नाही. एक ना एक दिवस यश मिळणारच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

सकारात्मक दृष्टिकोन

एस
Fri, 07/17/2015 - 22:37 नवीन
सकारात्मक दृष्टिकोन कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

एक ना एक दिवस यश मिळणारच !

श्रीरंग_जोशी
Fri, 07/17/2015 - 22:37 नवीन
एक ना एक दिवस यश मिळणारच !
हे खूप महत्वाचे. एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

>>> एमसीए करताना दत्ताजी

प्यारे१
Fri, 07/17/2015 - 22:56 नवीन
>>> एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. हे वाक्य दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होते. असं हवं कारण आपण लिहीलेल्या वाक्यात दत्ताजी शिंदेंचं एम सी ए सुरु होतं असं प्रतीत होत आहे. याबाबत व्याकरणाच्या लिंका 'आपल्याआपणशोधा.कॉम' वर सापडतील. -प्यारेंग_ जोशी हलकं घ्या ओ जोशीपंत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Fri, 07/17/2015 - 23:02 नवीन
=)) कृपया वरच्या प्रतिसादातील हे वाक्य
एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते.
कृपया खालीलप्रमाणे वाचावे...
दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे वाक्य आमचं एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होतं.
स्वगतः प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी वाक्यरचना एकदा तपासून घ्यायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वाचनखूण

Jack_Bauer
गुरुवार, 07/16/2015 - 20:11 नवीन
वाचनखूण साठवली आहे .
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

यशोधरा
गुरुवार, 07/16/2015 - 20:23 नवीन
सुरेख लेखमालिका. मीही वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments

आभार !

खेडूत
गुरुवार, 07/16/2015 - 20:46 नवीन
सर्व वाचक, प्रतिसादक यांचे खूप आभार… ! गजोधर , अस्वस्थामा , ओहो:- वाचून विचार करता करता शंका येतीलच. चर्चा करूच. जे मला माहीत नाही ते माहीत असणारे इथे बरेच सदस्य आहेत. पालकांनी मुलांचे करियर निवडताना जागरूक व्हावे हाच इथे लिहीण्याचा उद्देश !
  • Log in or register to post comments

अतिशय योग्य प्रकारे लिहिलंय...

संदीप डांगे
गुरुवार, 07/16/2015 - 20:54 नवीन
खूप सुंदर मालिका. मौल्यवान माहिती. 'पुढे काय?' बद्दल अजून सविस्तर वाचायला आवडेल. अभियांत्रिकीकडे जाण्याची इच्छा असणार्‍यांनी अ‍ॅप्टीट्यूड कसं ओळखायचं हाही एक प्रश्न आहे. नुसतं डीग्रीची भेंडोळी (तेही इंजी.च्या) घेऊन चपला झिजवणे म्हणजे ७० चा काळ (बी.ए. किया है, एम. ए. किया) परत आल्यासारखं वाटतंय.
  • Log in or register to post comments

आलाय साहेब आलाय!

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/17/2015 - 11:11 नवीन
फ्रेशर लोकांची गर्दी बघवत नाहीये आज काल आणि येत काहीही नाही हे दुर्दैव :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लेखमाला वाचुन काॅम्प्युटर

अजया
गुरुवार, 07/16/2015 - 21:11 नवीन
लेखमाला वाचुन काॅम्प्युटर इंजिनिअरिंगची पॅशन असणार्या माझ्या अकरावीतल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी,दया वाटायला लागलीये.
  • Log in or register to post comments

काळजी नको

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/16/2015 - 21:18 नवीन
जर कॉलेजातील शिक्षकांवर अवलंबून न राहता झोकून देऊन अभ्यास करणार असेल तर या क्षेत्रात अजुनही भरपूर वाव असणार आहेच. समस्या फक्त वरवरचे ज्ञान असणार्‍यांसाठीच आहे. लेख व संपूर्ण लेखमालिका खूप भावली. मी भारतात राहत असताना दोन कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चर्स दिली आहेत. भविष्यात मोठी सुटी असल्यास भारतवारीदरम्यान धागाकर्त्याशी संपर्क साधून गेस्ट लेक्चर देता येईल का ते बघीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आवडीने आणि सचोटीने काम करणार्

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/16/2015 - 23:54 नवीन
आवडीने आणि सचोटीने काम करणार्‍या उत्तम प्रतीच्या कर्मचार्‍यांची आणि अधिकार्‍यांची चणचण हे सार्वकालीक (आणि आजचेही) जागतीक सत्य आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. फक्त मुलाला लक्ष विचलित न करता वर सांगितलेले गुण आत्मसात करायला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अतिशय सुंदर आणी अभ्यासपूर्ण

अभिजीत अवलिया
गुरुवार, 07/16/2015 - 21:15 नवीन
अतिशय सुंदर आणी अभ्यासपूर्ण लेखमाला. धन्यवाद खेडूत साहेब.
  • Log in or register to post comments

धन्यवाद खेडूत साहेब

अविनाश पांढरकर
Fri, 07/17/2015 - 00:29 नवीन
खूप सुंदर मालिका.
  • Log in or register to post comments

या लेखमालेला अगदी समर्पक नाव द्यायचं तर..

अर्धवटराव
Fri, 07/17/2015 - 06:44 नवीन
अंजन. 'आधि वाढ मग विकास' हे आपलं राष्ट्रीय चरित्र या सर्व प्रकरणाच्या मुळाशी आहे. त्याचं मूळ आहे १८५७ नंतर भारताचं इंग्रजीकरण होण्यात (हि एक फार चांगली गोष्ट झाली असं आमचं मत). पहिले कॉपी करायची. मग हळुहळु, अर्ध कच्चं का होईना, मूळ रूप येतच हा आपला सिद्धांत आहे. लोकशही असो, मुक्त अर्थव्यवस्था असो, खासगीकरण असो कि अजुन काहि. आपण हाच पॅटर्न वापरतो. संधी हुडकायची, योग्य नियमन व्यवस्था उभारायची , श्रम घ्यायचे आणि फळ चाखायचे हि विकसीत देशांची मानसीकता. नसलेली संधी हुडकायची किंवा कुणीतरी ते सांगयचं, त्याच्या फायद्याकरता जाळं टाकायचं, काहिंना त्याचा त्याचा लाभ होईल-कुणाचं वाटोळं होईल त्याचं सांख्यीकी बघुन नवीन जाळं टाकायचं हि आपली पद्धत. जय हो !!
  • Log in or register to post comments

हजारटक्के सहमत. अगदी हेच

संदीप डांगे
Fri, 07/17/2015 - 10:00 नवीन
हजारटक्के सहमत. अगदी हेच टंकणार होतो. मूर्तींच्या कालच्या विधानामागे हेच कारण आहे. आपले लोक नवीन काही करायला घाबरतात, वाट पाहतात दुसर्‍याने करायची. त्याचे यशस्वी झाले की मग कॉपी करतात. अशाने आपण काळाच्या खूप मागे राहतो हे कळत नाही. सेफगेम खेळायची जन्मजात वृत्ती आहे पण सेफगेमला लागणारी अभ्यासू वृत्तीही नाही. आपल्याकडे शिक्षणाकडे बघण्याची गरज फक्त नोकरी मिळवण्यापुरती आहे. म्हणजे पैसा आणि मान देणारी नोकरी आणि आपण यामधे शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही. त्यामुळे अडथळा पार करायला साम-दाम-दंड-भेद वापरायला काही चुकीचं वाटत नाही लोकांना. कॉप्या करत पास होणे का होत असावं याचं हे साधं कारण आहे. शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. त्याला बायपास करण्याचे हरप्रकारे प्रयत्न केल्या जातात. आडातच मिष्टेक असल्याने पोहर्‍यात काय अपेक्षा करावी. नवीन काही करणार्‍याला आपलं वातावरण सपोर्ट करत नाही. त्यामुळे नवीन करू पाहणार्‍यांचा उत्साह टिकत नाही. एकिकडे आपल्याकडे 'हे नाही ते नाही' असं तोंडदेखलं बोलायचं आणि जेव्हा खरोखर सपोर्ट द्यायची वेळ येते तेव्हा नेहमीच्याच वृत्तीने वागायचं असंच चाल्लंय. आजवर जे मिळाले नाही ते मिळवण्यासाठी आजवर जे केले नाही ते करायला लागतं. पण आपण भारतीय लोक इतके झटके बसूनही शिकत नाहीत हे खरं दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

क्या बात है

श्रीरंग_जोशी
Fri, 07/17/2015 - 10:21 नवीन
अर्धवटराव व तुमच्या प्रतिसादांच्या आशयाशी पूर्णपणे सहमत. प्रतिसाद ज्या प्रकारे लिहिले आहे त्यामुळे तर ते अधिकच भावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मी हे स्वतः भोगलय.

अर्धवटराव
Fri, 07/17/2015 - 11:02 नवीन
शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही.
आमची हिच गत होती सुरुवातीला. लेकीन भला हो उस मानवका...आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले. त्यावेळी आमच्या टाळक्यात जे काहि थोडंफार घुसलं त्याच्याभरोशावर आमचा गाडा आजवर चाललाय. असलं कोणि त्या अगोदर का भेटलं नाहि हि खंत आहे म्हणा... पर देर आए दुरुस्त आए. या असल्या लेखमालांबद्दल म्हणुनच आपुलकी वाटते. हे सगळं केवळ लेक्चरबाजी नसुन अगदी १००% व्यवहार्य आहे हे मी स्वतः अनुभवलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आमचा एक मास्तुरे एक दोन

खेडूत
Fri, 07/17/2015 - 11:14 नवीन
आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले.
आमच्यासारखेच दिसतात तुमचे मास्तुरे! आम्ही बारा वर्षांपूर्वी चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन दिली म्हणून आज आनंदात आहोत. पण सोडण्याचं मुख्य कारण असंच झालं - की, '' मुलांना विषयासोबत अवांतर तांत्रिक माहिती का देता? तुमचा विषय शिकवा आणि गप रहा '' अशी विचारणा-कम दटावणी वारंवार होऊ लागली. आमचं म्हणणं असं होतं की इथं सर्वाधिक हुशार मुलं प्रवेश घेतात. त्याना सांगू नायतर काय बापूसाहेब मुंगळे इन्सटिटयुट मध्ये जाउन सांगणार का? नाय पटलं दिलं सोडून! सरकारी नोकरी सोडली म्हणून लोकांनी लै उपदेशाचे डोस दिलेले - आता ते आठवून गंमत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जबरी!

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/17/2015 - 11:13 नवीन
अगदी असेच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शिक्षण हे स्वत:ला पात्र

सुबोध खरे
Fri, 07/17/2015 - 10:27 नवीन
शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे.डाव्यांबद्दल तर बोलूच नये( सीताराम येचुरी सारखे लोक तर रोजगार निर्माण करणे हे सरकारचे काम आहे मग त्या आस्थापनात उत्पादन होवो कि न होवो असे बोलतात) एकदा नोकरीत चिकटला कि ब्रम्हदेवसुद्धा त्याला हाकलू शकत नाही बर्याच वेळेस अपात्र उमेदवाराला न्यायालये सुद्धा "मानवातापूर्ण" नजरेने पाहतात. अशा स्थिती मुळे काहीही करून पदवी मिळवा आणि त्या जोरावर नोकरी मिळवा. म्हणून अशी कुत्र्याच्या छत्र्यांसारखी इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आहेत. एकदा शिक्का बसला आणि सरकारी नोकरी मिळाली कि राष्ट्रपती सुद्धा तुम्हाला काढू शकत नाही. मग ज्ञान आहे कि नाही. त्यातून विविध वेतन आयोगांनी सरकारी नोकरीत बढती हि कालानुरूप असल्याचे नक्की केलेले आहे त्यामुळे तुम्ही कितीही नालायक असा एका विशिष्ट पातळी पर्यंत बढती मिळणारच. (आणि राखीव असलात तर अत्त्युच्च पातळी नक्की). (व्यापमचा महाघोटाळा याच मनोवृत्तीमुळे झाला आहे. कशीही पदवी मिळावा आणि तशाच तर्हेने सरकारी नोकरी मिळवा आयुष्याचे कल्याण होणारच). ज्ञान, पात्रता, संशोधन याचा काय संबंध?
  • Log in or register to post comments

शिक्षण हे पात्रतेसाठी नसून

संदीप डांगे
Fri, 07/17/2015 - 10:35 नवीन
शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे. अगदी नेमकं पकडलं आहे खरेसाहेब, आजच्या भारताला अमेरिकेसारख्या प्रखर भांडवलवादाची गरज आहे. आजच्या ग्लोबलायझेशच्या जगात आणि इतक्या संधी उपलब्ध असतांना गरिब आणि मागासलेले राहू तर तो आपलाच दोष आहे हे तरुणांच्या मनावर बिंबवले जाणे खरोखर आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 07/17/2015 - 11:15 नवीन
पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा