Skip to main content

पायाखालची वीट दे....!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 10/07/2015 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे

देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे

वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
लढवैयांच्या लेखणीला
'अभय' आणि 'धार' दे

                - गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेखनविषय:

वाचने 5585
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे>>> भारी

खुपच छान मुटे साहेब

देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
छान आहे!

आवडली रचना. आशय पोहचला. देवा, विठ्ठला आता पाऊस पडू दे बाबा. -दिलीप बिरुटे

मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

In reply to by जडभरत

मतलब मी नंगा झालो तरी चालेल पण दुष्टाच्या डोस्क्यात फटका घातल्याशिवाय राहणार नाही. अॅल भले!!!

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार :)