Skip to main content

गावोगावची गंमतीशीर ठिकाणे सांगा...

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 14/03/2011 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्‍यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्‍याला हसू येई. सातार्‍यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे. तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43797
प्रतिक्रिया 197

प्रतिक्रिया

बर्याचदा गावांच्या नावांमागे काहीतरी रंजक गोष्टी असतात. मी शाळेत असताना एका व्याख्यानाला गेलो होतो तिथे वक्त्यांनी याची काही उदाहरणे दिली होती. जसे कि सातार्याजवळ "वडाचे म्हसवे" नावाचे गाव आहे. त्यांनी या नावामागची माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा कळाल कि तेथे एक खूप मोट्ठे वडाचे झाड आहे. ज्याची ब्रिटीश लोकांनी नोंद करून ठेवली होती. तेव्हापासून त्याला हे नाव पडले. पण आता बाकी उदाहरणे आठवत नाहीत! :) सातार्यात "५०१ पाटी" आहे तिथे म्हणे खूप आधी ५०१ साबणाच्या जाहिरातीची फार मोठ्ठी पाटी होती. तेव्हा उंच इमारती नसल्याने ती लांबूनही दिसायची त्यामुळे हे नाव पडले. पण एका भागाला "गेंडामाळ" हे नाव कसे पडले आहे ते मात्र मला माहिती नाही! :)

महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर वर एका गावच नाव खजुरी आहे, पण खजूर कुठे दिसले नाही बुवा. ;)

कराड मध्ये खालील गमतीची ठिकाणे आहेत १. मढ्या मारुती : पूर्वी या नदीकाठच्या मारुती मंदिराजवळ प्रेतांवर अंत्यसंस्कार व्हायचे. २. पिलीग राजा (प्लेग राजा) ३. पंताचा कोट आणि कोटाखालचा गणपती ४. पायऱ्या खाली ५. वडाचा गणपती ६ अंडीवाला चौक ७. पंढरीचा मारुती ८ सात सैद (सात शहीद )

पुण्यामधे कर्वेनगरला नळस्टॉप सारखाच एक वडाचा स्टॉप आहे. लहानपणी तिकडे मामाकडे जायचो तेव्हा पी.एम्.टी. ( आताची पी.एम.पी.एल्) चा शेवटचा स्टॉप होता तो. पी.एम्.टी. त्या वडाच्या झाडाला वळसा घालुन पुन्हा पुण्याच्या दिशेने जायची. आता ते वडाचे झाड नाही पण वडाचा स्टॉप हे नाव कायम राहीले.

पनवेल मध्ये पण...लाइन आळी, मिरची गल्ली, बावन्न बंगला अशी ठिकाणे आहेत....आता बावन्न बंगला इथे एकच सोसायटी आहे....आणि लाइन आळी म्हणजे काय ते मला अजून समजले नाही.(मला वाटायच की तरुण मुले लाइन मारायला तिथे जातात..)

In reply to by नितिन पाठे

पनवेलला एक "मिडल क्लास को-ऑप हौसिंग सोसायटी" सुद्धा आहे.

लेटेष्ट एग्जेम्पल- सेनापती बापट रस्त्याजवळ "दीप बंगला" चौक आहे. अगदी परवा-परवापर्यन्त या नावाचा बँगला होता तिथे. आत्ता पाडलाय. अजुन १० वर्षाने असेच काहीहीश्री किस्से सांगतील मिपाकर.

मुलुंड ह्या गाकॅचे नाव मुळून्द असे होते त्याचा इंग्रजी उच्चार रूढ होवून नाव बदलले. दापोली ह्या शहराला 'काप ' हे दुसरे नाव आहे. ( कापात गेलो होतो ). येथे पूर्वी इंग्रजांचा "कॅम्प ' होता. त्याकॅम्प चा अपभ्रंश 'काप '. नाशिकला एक 'कॅनडा कॉर्नर'आहे.

अकोल्यात (नगरमधले अकोले नाही) 'गवळीपुरा' अशा नावाचा एक भाग आहे. आता गवळी राहतात तो पुरा असा त्याचा शब्दशः अर्थ. इथे धार काढतात पण देशी दारूची! गवळीपुर्‍यातल्या प्रत्येक घरी मोहाची दारू बनवली जाते. आधी जिथे दुधाची धार काढली जायची तिथे आता देशी दारूची धार निघते.

आमच्या कुटूंबाचे मूळ गाव - मोर्शी (जि. अमरावती). या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे दोन नद्या आहेत नल व दमयंती. गावाच्या वेशीबाहेर या दोन नद्यांचा संगम होतो :-) .

खोपोलीपासुन जवळ सातगावला एक विठोबा मंदिर आहे.त्याचं नाव बोंबल्या विठोबा पडलंय.कारण त्याच्या जत्रेत सुकटाचा बाजार भरतो!सुके बोंबिल मोठ्या प्रमाणात विकले जातात म्हणून हा बोंबल्या विठोबा!!आमच्या इथली फार प्रसिध्द जत्रा आहे ही.

In reply to by अजया

तुम्ही काय बोंबलता? नै म्हणजे नेमक्या त्याच वेळेस तिथून जात असू तर तुम्च्याच कडून बोंबील घेउ =))

"सेनापती बापट रस्त्याजवळ "दीप बंगला" चौक आहे. अगदी परवा-परवापर्यन्त या नावाचा बँगला होता तिथे. आत्ता पाडलाय." -- प्रभातच्या 'माणूस' सिनेमातील प्रमुख नायिका शांता हुबळिकर यांच्या मालकीचा हा बंगला होता. त्यांनी आपल्या मुलाच्या प्रदीप या नावावरुन "दीप बंगला" हे नाव ठेवले होते . मिरज येथे एका मोठ्या खड्ड्यामध्ये खेळाचे मैदान आहे . मिरजकर त्याला 'अमर खड्डा' म्हणतात . तसेच तेथिल एका मशिदीचे बांधकाम काळ्या दगडांमध्ये केले आहे , त्यामुळे नाव 'काळी मशिद' असे आहे .

In reply to by सिरुसेरि

प्रभातच्या 'माणूस' सिनेमातील प्रमुख नायिका शांता हुबळिकर यांच्या मालकीचा हा बंगला होता
यस्सर...मी पण हेच ल्हिणार होतो, पण लिंक सापडेना....

आमचया वेंगूर्ले गावात उभादांडा नावाचा एरिया आहे.समुद्राकिनारि असल्यामूले कदाचित् हे नाव पड़ले असावे.कारन समुद्रकिनारयाला इकड़े दांडी असे पन बोलतात.

भांडूप मध्ये गाढव नाका पण आहे. पूर्वी इथे गाढवांचा बाजार भरत असे ऐकले आहे . जाणकारांनी प्रकाश टाकावा :)

In reply to by स्वप्निल रेडकर

निपाणीत आमच्या गल्लीत सगळी गोग्गोड माणसं राहतात. पूर्वी गल्लीला "ढोरांचा बाजार" म्हणायचे. (गुरुवारी गुरांचा बाजार भरायचा इथे म्हणून.) नंतर नाव बदलून "साखरवाडी" केलंय. कित्ती गोग्गोड ना?

In reply to by शंतनु _०३१

नगरच्या बाहेर एक "भिंगार" नावाचा भाग आहे. नवीन एखाद्याला ऐकतांना ते "भंगार" सारखं वाटतं :) पाथर्डी कडे जातांना एक घाट आहे - त्याचं नाव "करंजीचा घाट" नगर कॉलेजच्या पुढे एक "कोंबडी वाल्याचा मळा" नावाचा एक भाग आहे. विखे पाटील ईंजी. कॉलेज ज्या गावात आहे त्या गावाचं नाव - "वडगांव गुप्ता". उत्तर भारतीय बांधवांचं आडनाव असलेलं मी बघितलेलं हे एकंच गाव आहे :)

In reply to by नाव आडनाव

भिंगार - हे तिथल्या उसाच्या रसासाठी प्रसिद्ध आहे. २००२ साली एमसीएची एक प्रवेश परिक्षा देऊन मी रापमंच्या बसने पुणे ते अकोला दिवसाचा प्रवास केला होता. तेव्हा चालक वाहकांना तिथला रस आवडतो म्हणून बस तिथे एका रसवंतीवर थांबवण्यात आली होती. या प्रकारचा माझा हा प्रथमच अनुभव होता. त्यामुळे मला अगदी मध्य प्रदेशात असल्यासारखे वाटले.

ठाण्यातील तीन हात नाका, तीन पेट्रोल पंप, घोडबंदर या जागांचा उल्लेख झालाच आहे. काही आणिक उदाहरणे. इतिहास माहीत नाही. पाड्यांची एक भारीच मजा आहे. पातलीपाडा डोंगरीपाडा (ठीक आहे उंचावरचं ठिकाण असेल) धर्माचा पाडा (हो अशी जागा आहे ठाण्यात) कोकणीपाडा (कोकणी लोक रहात असावेत) काजूपाडा (काजू?) पाटोणपाडा (हे म्हणजे येऊरचा लास्ट स्टॉप) झालंच तर... वाघबीळ (इथे वाघ यायचा म्हणे. अजूनही येतो) गायमुख (इथला डोंगर गाईच्या मुखासारख्या आकाराचा आहे) ढोकाळी कोलशेत कोलबाड माजीवाडा (आजीवाडा पण आहे काय?) खोपट पोखरण नं १, २

In reply to by वेल्लाभट

>>पोखरण नं १, २ ही जागांची नावं नाहीत. पोखरण (उपवन) तलावाकडे जाण्याचे दोन रस्ते आहेत. त्यातला पोखरण रोड नं १- कॅडबरी जंक्शनहून रेमंड मार्गे जाणारा आणि पोखरण रोड नं २- व्होल्टास, ग्लॅक्सो, ब्लू स्टारमार्गे जाणारा.

In reply to by dadadarekar

ठाणं हे तलावांचं शहर आहे (होतं). आता कमी तलाव असले तरीही इतर शहरांपेक्षा अधिक आहेत. तलावपाळी म्हणजे मासुंदा तलाव परिसर. हा तलाव ठाण्याच्या मध्यवर्ती जागी असून कुठल्याही वेळी जायला एक 'हॅपनिंग' जागा आहे. इथेच दिवाळीच्या आदल्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी, गुढीपाडव्याला, त्या आधीच्या संध्येला रोषणाई असते.

वांगणी - मुंबई-कसारा लाईनवरील स्टेशन. पूर्वीचे 'वैंगण'- ठाण्यामध्ये १९६५ मध्ये पाचपाखाडी भागात एका कंपनीच्या तलावात सापडलेल्या ताम्रपटात याचा उल्लेख आहे. शके ९६१ अर्थात इंग्रजी वर्ष १०६९ सालचा हा ताम्रपट आहे.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेल्या (ठाण्यात मिळाला होता) ताम्रपटाप्रमाणे (इ.स. १०६९) पहा हि नाव ओळखीची वाटतात का? अंबरवल्ली- अंबरनाथ? करहाटक - कर्जत? आसलग्राम- आसनगाव?

In reply to by सतीश कुडतरकर

करहाटक = कराड असे वाचल्याचे आठवते. शिलाहार राजाचा ताम्रपट आहे का तो?

सीमाभागात बरीचशी गमतीशीर नावे आहेत. नागोबाचे 'पांगीरे': अजून एक पांगीरे नावाचे गाव असल्यामुळे असे नाव आहे. उगम कशात आहे माहित नाही. दगडी शिप्पूर - निपाणीचा तवंदी घाट संपल्यानंतर आजरा/आंबोली रोड ला लागून आहे हे गाव. खूप सारे मोट्ठे दगड दिसतात म्हणून तसे नाव आहे का कल्पना नाही :) हसुरचंपू - बरीच 'हसूर' नावाची गावे जवळपास असल्याने ह्याचा उल्लेख 'चंपू-हसूर' असा सर्रास केला जातो. बेळगाव मध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे - 'मिलिट्री महादेव'. कदाचित मिलिटरीच्या एरियात असल्यामुळे असेल. कानडी च्या प्रभावामुळे असेल कदाचित, 'ळ' चा वापर खूप दिसतो: हेब्बाळ, जलद्याळ, मुत्नाळ, औरनाळ, खणदाळ, हाजगोळी, माद्याळ, जरळी, मुगळी, जैन्याळ(माझ्या माहितीप्रमाणे ह्या गावात जैन लोक नाहीत), करड्याळ, बोळावी, बाळेघोल (ही सर्व गावे कोल्हापूर जिल्ह्यात आहेत) निपाणीच्या स्टॅन्डवर जे विक्रेते असतात त्यांची आरोळी अशी असते - "शेंगा, भडंगा, चिप्सा, वेफर्सा…" :) यमक जुळवण्यासाठी 'आ'कार कंटिन्यू केला जातो! इथे 'पुलाव' चा उल्लेख पण 'पुलावा' असा केला जातो. माहित नाही का ते.

In reply to by लई भारी

ळ- अहो खुद्द कोल्हापूरात पण बरीच आहेत- रंकाळा, टाकाळा, नागाळा, पेटाळा, सिद्धाळा...इ.

In reply to by लई भारी

चला बेळग्गं..बेळग्गं, बेळग्गं..बेळग्गं, बेळग्गांवं.. ;) - बर्‍याच गावांची नावे 'ळ'ने संपतात, ती 'हळ्ळी' पासून तयार झालेली असतात. कन्नडमध्ये हळ्ळीचा अर्थ खेडेगाव असा होतो. उदा- मुत्नाळ. मुत्तीन हळ्ळी = मोत्यांचे गाव. (रच्याकने, चंबा मुतनाळ ऐकले असेलच की.) बेडकीहाळ (बेडकी+हळ्ळी), पडलीहाळ, नवलीहाळ, यरनाळ, गावनाळ, हनीमनाळ, सिदनाळ, -- कर्नाटकात (मोस्टली सीमाभागात) अशीही गावे आहेत. ही नावे "ऊरू" म्हणजे गाव पासून तयार झाली आहेत. . (आकड़ा- कन्नड़ उच्चार- गावाचे नाव) १ वंदू वंदूर/वन्नूर (वंदू + ऊरू = वंदूर) २ एरडू यडडूर ३ मुरु मुन्नूर ४ नालकु नांगनुर ५ ऎदु ऐनुरू/अण्णूर ६ आरु ? ७ येळू एळूर ८ एंटू ? ९ वंबत्तू ??

In reply to by यसवायजी

'हळ्ळी' ची माहिती वाचून ज्ञानात भर पडली :) पुढच्या वेळी जरा जास्त कळेल नाव ऐकल्यावर :)

In reply to by यसवायजी

मुतनाळ मागची ही व्युत्पत्ती ठाऊक नव्हती! सहीच. बाकी सीमाभागातलं माहिती नाय पण आरेकेरे म्हणून बेंगळूरूमध्ये एक भाग आहे.

In reply to by बॅटमॅन

"आरे" म्हणजे काय ते पहावे लागेल. केरे म्हणजे तलाव. एखादा तलाव नक्कीच असेल भागात.

अमरावतीत एका एरिया च नाव चक्क "नमुना" असे आहे, तिथे पत्ता सुद्धा "नमुना क्र.४" (गल्ली क्रमांक) वगैरे असतो, शहराच्या मध्यभागी असलेल्या टेकड़ी च नाव मालटेकड़ी असे आहे तर "भाजी मार्केट" नावाची एक आवासीय कॉलोनी सुद्धा आहे (नावांच्या उद्गमाबद्दल काहीही कल्पना नाही), अमरावतीत एक अतिशय प्रसिद्ध तिखट जाळ गिल्ली मिसळ (मिसळीचे वर्हड़ी वर्शन) व इतर नाश्ता विक्री करणारे एक प्रसिद्ध हॉटेल होते त्याचे नाव ते बेसमेंट ला असल्या कारणे "गड्डा" (हिंदी गड्ढा वरुन आलेले खड्डा चे समानार्थी वर्हाड़ी नाव) होते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

'भाजी मार्केट' - कदाचित तुम्हाला भाजीबाजार या एरियाबाबत सांगायचे असावे. गिली मिसळ तर खाल्ली नाही पण जयस्तंभ चौकातले गिले बडे खाल्ले आहेत १५ वर्षांपूर्वी. अजुन चव तोंडावर आहे :-) . गड्ढा हॉटेलमध्येही खाल्ले आहे. बाकी नमुना एरिया साड्या व चादरींच्या होलसेल दुकानांसाठी प्रसिद्ध आहे. जवाहर गेटजवळ रंगारी गल्ली पण प्रसिद्ध आहे. जुन्या कपड्यांना नवे रंग देऊन मिळतात तिथे.

मारुती जेव्हा द्रोणागिरी घेऊन आकाशमार्गे लंकेस जात होता, तेव्हा त्या पर्वतावरील कनकवल्लि नामक वनस्पती खाली पडली. त्यावरून कणकवली हे नाव आले, ही कथा सदर गावात लोकप्रिय आहे. आता ती वनस्पती कोठे आहे, यावर संशोधन होणे आवश्यक आहे!