Skip to main content

गावोगावची गंमतीशीर ठिकाणे सांगा...

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 14/03/2011 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्‍यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्‍याला हसू येई. सातार्‍यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे. तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43691
प्रतिक्रिया 197

प्रतिक्रिया

In reply to by प्रदीप

पुण्यात जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्ता यांना जोडणारी एक अतिशय अरुंद, चिंचोळी अशी गल्ली आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते त्याच्याशेजारी एक टोक आणि जंगली महाराज रस्त्यावर बहुधा पूर्वी जेथे डेक्कन टॉकीज किंवा कलमाडींचे पूना कॉफी हाउस होते त्याच्याशेजारी दुसरे टोक. गल्लीच्या एकाच बाजूस असंख्य टपरीवजा दुकाने आहेत, आणि रात्र असो वा दिवस, गल्लीत प्रचंड गर्दी असते. या गल्लीस 'हाँगकाँग गल्ली' असे नाव पडण्यामागील काही कारण कोणास ठाऊक आहे काय? (तसेच, याच धाग्यावर इतरत्र कोणीतरी विचारल्याप्रमाणे, 'नळ स्टॉप' या नावाचा उगम. किंवा, 'भिकारदास मारुती'तला भिकारदास नेमका कोण.)

In reply to by पंगा

तिथं चाईनीज वस्तु विकत मिळतात म्हणुन असावे, चु भु द्या घ्या. बाकी नळस्टॉप बद्दल माहित आहे. पुर्वी पुणं डेक्कनच्या पुढं नव्हतं. मात्र नळ स्टॉप जिथे आहे तिथे कार्पोरेशनचा एक पाण्याचा नळ होता, आजुबाजुच्या वस्त्यांसाठीचा (आणि कार्पोरेशनचा बहुदा त्या दिशेकडील शेवटचा) असावा. आता तिथेच का अशी शंका येउ शकते. तर बहुदा डेक्कन वरुन त्या बाजुने कर्वे नगर पर्यंत जाणारी पायवाटसुद्धा होती, त्याच रस्त्याने कर्वे येत जात असत म्हणुनच तो कर्वे रोड. म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते.

In reply to by Nile

म्हणुन तो नळ स्टॉप. असे एका त्या काळी पुण्यात राहिलेल्या कडुन ऐकल्याचे आठवते. कोणीतरी म्हणाले की पुणे महापालीकेचे पाणी त्यापुढे जायचेच नाही म्हणून नळाचे पाणी जेथे थांबते तो नळ स्टॉप .......एकेकाळी पुण्यात राहीला विजुभाऊ

In reply to by पंगा

>>फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पूर्वी जेथे लकी रेष्टॉरंट होते... ते कोपऱ्यावरचे लकी गेलं ?? अरेरे !!! तिथे अजून एकदा जायची इच्छा होती.

ऐकिव माहिती: "इष्टुर फाकडा" असे एक ठिकाण पुण्याच्या अगदी जवळच आहे. कुणीतरी स्टुअर्ट होता, त्याची तिथे समाधी(?) आहे म्हणे. शिवाय जत्रा पण असते. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा

In reply to by कवितानागेश

मी 'जाणकार' नाही पण लिहील्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहीतोय. वडगावच्या लढाईत कुत्र्याच्या आईवानी मार खाल्लेल्या लेफ्टनंट स्टुअर्टची समाधी आहे ती. या लढाईत इंग्रजांना जगात कुठेही सहन करावा लागला नाही असा पराभव महादजी शिंदेंच्या मराठा सैन्याकडून सहन करावा लागला. इंग्रज शरण आल्यावर मोठ्या मनाने त्यांना मुंबईला जाऊ देण्यात आले. या लाजिरवाण्या पराभवानंतर इष्टुर फाकडा हा एक विनोद झाला असावा मराठा सैन्यात, पण नंतर शतकभराने इंग्रजांची सत्ता आल्यावर त्या इष्टुर फाकड्याचं उदात्तीकरण करून जणू काही त्याने तुटपुंज्या सैनिकांनिशी मराठ्यांच्या बलाढ्य सेनेला मरेस्तोवर तोंड दिले असा अपप्रचार केला गेला आणि मग ही समाधी 'इंडिअन आर्मी' ने उभारली.

In reply to by नगरीनिरंजन

सहमत आहे. इष्टुड फाकड्याचा वर सांगितलेला इतिहास तंतोतंत बरोबर आहे.

सिंगापूरला ब्रिटीश येण्याआधी खूप वर्षे, म्हणजे १३६० शतकातली गोष्ट आहे. सुमात्रा बेटांवर संग निला उतामा (निलोत्तम?) नावाचा राजा होता. श्रीविजयन साम्राज्यातला हा एक राजा होता. एकदा तो शिकार करायला सिंगापूर बेटावर आला, तेव्हा इथल्या जंगलात त्याने एक नविनच प्राणी पाहिला. त्याच्या प्रधानाने त्याला हा सिंह आहे असे सांगीतले. (तो वाघ असण्याची शक्यता जास्त आहे). पहिल्यांदा ह्या भागात सिंह दिसला, म्हणून ह्या बेटाचे नाव नंतर त्याच्या कारकिर्दीत सिंगापूर पडले, अशी दंतकथा आहे. ब्रिटीशांच्या काळात अनेक मजूर भारतातून आणण्यात आले. त्यात दुधवाले भैया, धोबी वगैरे देखील होते. गवळ्यांची मोठी वस्ती आजच्या सेरेंगून भागात होती. त्यांच्या म्हशींचे गोठे जिथे होते, तो भाग कांदांग कर्बाऊ (मलेय भषेत- म्हशींचा गोठा) म्हणून ओळखल्या जाऊ लागला. आज तिथे स्त्रियांचे इस्पीतळ आहे. मजेचा भाग म्हणजे ते आज देखील कांदांग कर्बाऊ हॉस्पीटल म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळी, शहरात एक मोठा धोबीघाट होता. आपटून धोपटून कपडे धुणारे उत्तर भारतीय धोबी होते. त्या भागाचे आज देखील धोबीघाट हेच नाव आहे.

बेळगावात बोगारवेस आहे. या नावाची कुळकथा काय असावी?

In reply to by श्रावण मोडक

बोगारवेस हे नाव पु . ल . देशपान्डेच्या रावसाहेब मधे ऐकले होते .......... आम्बट शॉकिन ;-) लोकान्चे तिर्थक्शेत्र आहे असे वाटते ................

In reply to by श्रावण मोडक

१ ) बेळगाव जवळ उलागडी खानापूर नावाचे गाव आहे, उलागडी = कांदा {मराठीत} , मराठीत कांद्याच खानापूर म्हणता येईल का ? २) निप्पाणी - अक्कोळ रस्त्यावर पंगीराला जायला आंबा stop आहे पण आतातरी तिथे आंब्याचे झाड नाही . ३) चिकोडी मध्ये अंकली कुट नावाची एक वेस आहे. तिथून पुर्वी लोक अंकालीला जायचे असे म्हणतात ( आतापण तीतूनच जातात )

चेन्नई मध्ये व्हिजा गणेश म्हणुन एक गणपती प्रसिद्ध आहे. त्याच्या आशिर्वादाने म्हणे व्हिजाचे काम लवकरात लवकर होते. हा हा हा

माझ्या गावात १ एरीयाला धोंडिपुरा म्ह्नतात का ते नाही माहित. ह्याखाली ramjya ह्या आयडीने जर उपप्रतिसाद दिल्यास तो फाट्यावर मारन्यात यावा ....

In reply to by योगप्रभू

तसेच गुजरातेतल्या पोरबंदर भागातुन पुरवी परदेशांशी पोरांचा व्यापार होत असेल म्हणुन तसे नाव पडले असावे का ? - योगाप्रभु योगा से कुंगफु सिखुंगा ,,,

In reply to by टारझन

लहान माकडांचा...

कोल्हापुरात 'पापाची टीकटी , आणि ' मिरजकर टीकटी' अश्या दोन टीकट्या आहेत. आता 'टीकटी ' म्हणजे काय माहित नाही, त्यामुळे 'पापा/ पाप वा मिरजकर ही माहित नाहीत.

In reply to by स्पंदना

ते टीकटी असे नसून "तिकटी " असे आहे... "तिकटी म्हणजे तीन रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण.. हि माहीती कोल्हापूरच्या मित्राने दिलेली आहे ...

In reply to by नाखु

पापाची तिकटी हे कदाचित 'पापा परदेशी' या कोल्हापुरातल्या माणसाच्य नावावरून आले असावे.

In reply to by मिहिर

'पापा परदेशी' या कोल्हापुरातल्या माणसाच्य नावावरून
या 'पापा परदेशी'बद्दल माहिती मिळू शकेल काय?

In reply to by पंगा

पण आम्हाला शाहू महाराजांचा एक धडा होता, त्यात उल्लेख होता या नावाचा. कदाचित इंद्रराज पवारांना माहित असेल.

In reply to by नाखु

अच्छा! तिकटी होय? बघा , लहाणपणा पासुन आम्ही 'टीकटी'च ऐकत अन म्हनत आलो. आपण फारसा विचार न करता किती गोष्टी तश्याच वापरत असतो नाही?

In reply to by कहर

तिकटी - तीकाटणे यांच्यातील संबंध नाही कळला. अधिक माहिती द्याल का? तीकाटणे - शेतीच्या कामात बहुधा टोकणणी च्या आधी वापरतात असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.

तसच उस्माना बाद मध्ये 'बोंबल्या मारुती ' आहे. किंवंदता अशी आहे की एकदा या गावात चोर शिरले. वेशीत मारुतीच्या देवळाजवळुन हे चोर गावात शिरताना पाहुन हा मारुती ठो ठो बोंबलायला लागला म्हणुन याचे नाव 'बोम्बल्या मारुती' ही खरी माहिती आहे.

In reply to by स्पंदना

मिपाच्या मुखपृष्ठावर असा एक डू-आयडींना बघुन बोंबलणारा मारुती स्थापन का करत नाही नीलकांत ?

सातार्‍यात गोरा राम, काळा राम, शहा राम, कासार देवी अशी देवळं आहेत . फुटकं तळं, मंगळवार तळं आहे. रामाचा गोट्/गोठ , चिमणपुरा असे भाग आहेत.

सातार्‍यात चिमणपुरा आहे तो भाग चिमाजीअप्पा च्या मुळे ओळखला जातो व्यंकटपुरा आहे. कारंडबी नाका आहे. सातार्‍यात चाम्दणी चौक आहे. तेथून सात आठ रस्ते सुरू होतात. "म्हाद्या" नावाची एक शेंगदाण्याची भाजी सातारा भागात घरोघरी केली जाते. "सुशीला " नावाचा एक ओल्या चुरमुर्‍याच्या पोह्यांचा प्रकार ऐकीवात आहे

In reply to by विजुभाऊ

>>>"म्हाद्या" नावाची एक शेंगदाण्याची भाजी सातारा भागात घरोघरी केली जाते. आयला विजुभाउ.. कुठं फेडाल ही पापं.. आम्ही इकडे मॅगीवर आणि तुम्ही म्हाद्याचं नाव काढा... पटकी येवो तुमाला तेजायला..

कराड तालुक्यात दह्यारी, ताकारी, लोणारी, तुपारी अशी गांवे जवळजवळ वसलेली आहेत. पैकी मी फक्त ताकारीच पाह्यलंय, तेही बसमधून. बाकी, इथं जवळच नसलं तरी, दुधारी नावांचंही गांवही आहेच. सांगली जिल्ह्यातलं तासगांव परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या नावावरून भाऊंचं तासगांव म्हणून ओळखलं जातं आणि सातारा जिल्ह्यातलं 'भिकार तासगांव' म्हणून. आता या 'भिकार' नावामागचा इतिहास काही मला ठाऊक नाही ब्वॉ..

In reply to by मस्त कलंदर

याच प्रकारे नाना फडणवीसाचा मोठा वाडा असलेलं मेणवली गाव नानाची मेणवली म्हणून ओळखले जाते. याच परशुरामभाऊ पटवर्धनांचे नाव पुण्यातल्या शिप्र मंडळींच्या कॉलेजला दिले आहे. सर परशुरामभाऊ कॉलेज. अर्थात SP College.

आमच्या ऐकीव माहिती नुसार,(खात्री नाही) येरवडा : आधी ह्या भागाला हे नाव नसावे. तिथे वेड्यांचे इस्पितळ झाले अन मग ती लोक वेड्यांना शोधायला लागली. ये रे वेड्या ,ये रे वेड्या करू लागली अन त्यातूनच येरवडा असे नाव पडले असावे. :) हडपसर : हडपसर ला आधि कबरस्तान असावे.त्यातूनच हाडे पसर्-हडपसर असे नाव आले असे ऐकून आहे. बा़की काही गावांची नावे अफलातून असतात. नव्या मुंबैतच, करावे,दारावे,पावणे,दिवा असल्या नावांचे भाग आहेत. हल्ली तर म्हणे पुण्यातच "नांदेड सिटि" होउ घातली आहे. मागे उज्जैन जवळ एका गावाचे नाव आढळले "बनबना गांव" तिथल्या लोकांना त्या नावा मागचे कारण विचारले तर "ऐसेही गांव बस गया सो उसको सब लोग बनबना गांव करके पुकारते है." तोरणा किल्याकडून रायगडला जाताना कोकणात उतरावे लागते. तेंव्हा वाटेत "बोचेघोळ नाळ" लागते. ह्या नाळेतून पायी उतरता येत नाही.पार्श्वभाग टेकवतच उतरावे लागते,त्यातूनच हे नाव आले.;) अभिज्ञ.

मुंबईत पिला हाउस नावाचा (कु)प्रसिद्ध भाग आहे. (सत्या मधला संवाद आठवा, पिला हाउस मे शब्बो को ट्राय किया.. किचड मे ही कमल खिलते है...) तिकडली कामं पिवळेपणाशी संबंध सांगून असली तरी त्याच्या नावाचा पिवळेपणाशी काहीही संबंध नाही. तो प्ले हाउस चा अपभ्रंश आहे. गिरगावात दोन हत्ती नावाची जागा आहे म्हणे. बैलबाजार, साकीनाका, फिल्टर पाडा ही अशी काही नावे. बाकी मुंबईतील अनेक भाग विचित्र नावांचे आहेत. सवय झाली म्हणून विचित्र वाटत नाहीत इतकेच. दादरला कुठल्या जिन्यामुळे हे नाव पडले ते एक मुंबादेवी जाणे. विक्रोळी, भांडूप, परळ, शिवडी, माटुंगा, माहीम, मालाड, कुर्ला, चेंबूर या नावांच्या व्युत्पत्तीचा शोध मला तरी लागत नाही (हे माझे अज्ञान असेल ). चिंचपोकळी ला आधी चिंचेचे झाड होते काय? लालबाग ला कुठली बाग होती, आणि लाल का? गिरगाव मधल्या गिर चा काय अर्थ? चिराबाजार ला नक्की काय विकत मिळायचे म्हणून चिराबाजार म्हणतात? भायखळा येथे खळा असायला कधी शेत तरी होते का? पश्चिम लायनीवर वांद्रे आणि खार ही जनावरांशी जवळीक साधणारी गावे आहेत, तशीच पुढे कांदिवली आणि बोरीवली अशी खाण्याशी नाते सांगणारी गावे आहेत. दहिसर ची फोड दही आणि सर अशी केली तरीही अर्थ नाही लागत. असो, ऋषीचे कुळ, नदीचे मूळ या यादीत गावांच्या नावाची भर टाकायला हरकत नसावी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

गिरगावचं खरं नाव 'गिरणगाव' होतं, असं ऐकलंय. मिल्स/ मिल कामगारांच्या चाळींमुळे हे नाव पडलं असावं.. 'खार'हे नाव खारजमीनीवरुन आल्याचं ऐकलंय..

In reply to by चिगो

गिरगावचं खरं नाव 'गिरणगाव' होतं, असं ऐकलंय
नाही. गिरगाव वेगळे नि गिरणगाव वेगळे. गिरणगाव म्हणजे लालबाग-परळ भाग; जेथे पूर्वी कापडाच्या गिरण्या होत्या. गिरगाव म्हणजे चर्नी रोड स्थानकाच्या जवळील भाग.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बोरीवली जवळील मागठाणे - हे पूर्वीचे 'मंगलस्थान'. कान्हेरी बौद्ध लेणी क्र. ८१ शिलालेखावर याचा उल्लेख आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बोरीवली जवळील मागठाणे - हे पूर्वीचे 'मंगलस्थान'. कान्हेरी बौद्ध लेणी क्र. ८१ शिलालेखावर याचा उल्लेख आहे.

सँडहर्स्ट रोडला संडास रोड म्हणणारे मुंबैकर याचि देही याचि डोळा पाहिलेले आहेत.

कोणाला सिंगापूर ला जायचं असेल ते पण पासपोर्ट आणि विसा शिवाय तर पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात जाता येईल. विशेष माहिती: येथे येष्टी बस नि पण जात येतं. अधिक माहितीसाठी https://villageinfo.in/maharashtra/pune/purandhar/singapur.html

रेड्याची टक्कर नावाची जागा आहे कोल्हापुरात. आन्खि एक विशेष म्हन्जे तलवार चौक. हा धनाजी जाधवांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ उभारला. पुणे जिल्ह्यात चोराची आळंदी नावाचे (कु)प्रसिध्द गाव आहे(होते म्हनावे लागेल कदचित. नाव बहुधा बदलले असावे.).

कोल्हपुरातच, मी रंकाळा तलावाच्या कडेने 'देवकर पाणंद' ( हे पण एका भागाचे नांव) च्या दिशेने जाताना अगदी महानगरपालिकेने बसवलेली "संडास चौक" अशी पाटी वाचली होती. मि.पा. वरच्या कोल्हपुरकरांकडुन या चौकाचा इतिहास कळेल का ?

विदर्भातली मंडळी कुठे आहेत? या लौकर... अमरावती: हे एक चमत्कारिक आणि सुरस नावांनी भरलेले शहर आहे. >> मालटेकडी: (अगदी हाच अर्थ घेतला तरी १००% खरा आहे.) इथून अमरावती शहराचे विहंगम दृश्य दिसते. अंधार पडल्यावर इथून संपूर्ण अमरावतीत चालणारा लोडशेडींगचा खेळ पाहायला मजा यायची. >> फेजरपुरा, नमुना कॉलनी, काँग्रेस नगर, बिच्छू टेकडी, चपरासीपुरा, इत्यादी. अजुन आहेत आठवत नाहीत. अमरावतीकर, जर्शीक हेल्प कराना राजेहो.

In reply to by संदीप डांगे

आलो ना भौ, घाई काह्याले करता... गेल्या वर्षी मी ११ वर्षांनी मालटेकडीवर गेलो होते. अधिकृत नाव शिवटेकडी आहे. माथ्यावर मोकळी जागा बरीच आहे. मध्यभागी असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा एकदम भव्य आहे. दर वर्षी शिवजयंतीला शिवसैनिकांचे शिस्तबद्ध संचलन असते. एका कोपर्‍यात दूरदर्शनचे केंद्र आहे. हा फोटो सुर्योदयापूर्वी काढला आहे. MaalTekadi फ्रेजरपुरा हे नाव पोलिस स्टेशनला जोडले गेले आहे. नमुना या भागाला नमुनाच म्हणतात. कॉलनी जोडत नाही. तिथे होलसेलमध्ये साड्या, चादरी वगैरे मिळतात. काँग्रेसनगरमध्ये बर्‍याच राजकीय नेत्यांचे बंगले आहेत (यात माजी राष्ट्रपतीही समाविष्ट आहेत) म्हणून नाव काँग्रेसनगर पडले. कॅम्प एरियात आमचे घर जिथे होते (गेल्या वर्षीच विकले) तिथे रस्त्याच्या पलिकडल्या एरियाला (झोपडपट्टीच) बिच्छू टेकडी म्हणतात. थोडाफार उंचसखल भाग आहे. चपराशीपुराही जवळच आहे. कॅम्प एरियाच्या एका कोपर्‍यातील झोपडपट्टीचे नाव चिलम छावणी असे पण आहे. ते नाव प्रत्यक्षात चिमल शाह नावाच्या संतांवरून पडले असे ऐकले आहे. शहावणी चे छावणी झाले. आणखी काही नावे म्हणजे फरशी प्लॉट, पटवीपुरा, दहीसाथ, सक्करसाथ. बुधवारा, इतवारा (जुन्या शहरातील बाजारपेठांचे भाग).

In reply to by श्रीरंग_जोशी

नागपुर : नागासारखी वळणे घेत जाणार्‍या (कोणे एके काळच्या) नदीकाठी बसलेले गाव, म्हणून नागपुर.. महाल : पुर्वी भोसले राजांच्या महालासाठी प्रसिद्ध होता, आता गडकरींच्या वाड्यासाठी. 'काँग्रेसनगर' नागपुरातही आहे. तसेच श्री. जमनालाल बजाज ह्यांच्या नावावरुन 'बजाजनगर' लोकमत चौक : 'लोकमत' वृत्तपत्राचे ऑफीस इथेच. पुर्वी नागपुरमधली सगळ्यात उंच बिल्डींग, अजुनही असेल कदाचित.. पंचशील चौक : ह्याच नावाच्या टॉकीजवरुन मोमिनपुरा : बव्हांश मुस्लिम वस्ती. 'छोटा पाकीस्तान' म्हणूनपण संभावना होते कधी-कधी.. इतवारा, कळमना, गांधीबाग : मार्केट एरीया.. गंगा-जमुना : रेड लाईट एरीया.. नागपुरकरांना 'गंगा-जमुना वाहू लागल्या' वगैरे ऐकवू नका. त्याचा एकच अर्थ माहीत असतो बहुतेकांना. लोहा पुल : इंग्रजांनी बांधलेला लोखंडी रेल्वेपुल. बाकी सदर (शहरात शिरतांना आधी सगळ्यात बाहेरचा भाग, आता भरपुर आत गेलाय.) सिताबर्डी (सिताराम नावाच्या कुण्या दिवानाच्या नावावरुन नाव पडलंय, असं ऐकलंय), जरीपटका इ. भरपुर रंजक नावं आहेत. नागपुरात NADT (National Academy of Direct Taxes) ही Indian Revenue Servicesची ट्रेनींग अकादमी आहे, पण तिच्याबद्दल फारसं कुणाला ठाऊक नाही. तिथे जायचं असल्यास 'पागलखाना चौक चलो' असं सांगायचं, तिथून जवळच.. हा 'पागलखाना' पण 'ताजुद्दीन बाबा' या वलींमुळे जास्त प्रसिद्ध आहे. त्यांचा दर्गा आहे तिथे. त्यांच्याच नावावर 'छोटा ताजबाग' आणि 'बडा ताजबाग' हीपण ठीकाणं आहेत..

आजूबाजूला कुरणे असणारे गाव ते कुरणवाड .... कुरुंदवाड

In reply to by dadadarekar

हे मासे आहेत? गणपाला नाय तं जागूला बोलवून कोणीतरी ह्यांना हे खायला घाला रे एकदा!! चिंबोरी= मोठे खेकडे, कुर्ल्या= (त्यामानाने) लहान खेकडे.

ऑकलंड जवळ बाँबे हिल्स नावाचे पहाड आहेत. पुर्वी इथे बाँबे नावाचे जहाज आले होते. त्यामधून आलेले प्रवासी इथे स्थायीक झाले होते.

हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया आहे , त्यात गोलंदाज गल्ली पण आहे . बावनखोली नावाचा भाग आहे . येथे चिमना बाजार भरायचा (आता भरतो का नाही माहीत नाही) होळी नावाचा एरीया आहे.(होळीवरचे पोर डेंजर होती) पेन्शनपुरा म्हणून पण एक एरीयाआहे . रहेमत नगरात पण लोक रहातात (आता बहुतेक त्याचे सावरकर नगर केले. ) परभणीत गोल घुमट नावाचा एरीया आहे .उघडा महादेव म्हणलं तर अॉटोवाला बरोबर नेउन सोडतो. बेलजाळी म्हणून पण महादेवाचे मंदिर आहे. मुर्तीजापुर मध्ये टांगा चौक आहे (जिथे कधीच टांगे नसतात. चंद्रपुर मध्ये गोल बाजार आहे , इथे नवखा माणूस गोल गोलच फिरत बसतो , बाहेर पडायचा रस्ता काही सापडत नाही. पुण्यात हासबनीस बखळ नावाची जागा फक्त गुगल म्यापच्या सहाय्याने शोधून दाखवावी व बक्षिस घेऊन जावे .(पुणेकरांसाठी नाही हि स्किम) हैद्राबाद ला स्याप गल्ली पाहिली. बाकी जसे आठवेल तसे.

In reply to by उगा काहितरीच

स्पर्श किबोर्ड वापरून अक्षरावर अर्धा चंद्र कसा काढायचा ? काना असल्यावर देता येतो . (उदा कॉल, कॉलेज ) पण एका आक्षरावर देता येत नाही (मग स्याप, वगैरे लिहावे लागते.)

In reply to by एस

स्वॅप्स जमलं जमलं ! पण मी डायरेक्ट मराठी किबोर्ड वापरून टाईप करतो, त्या किबोर्ड वर कसं करायचं ?

In reply to by उगा काहितरीच

द्या मला बक्षिस. काय आहे ते? मी पुण्याचा नाही. खात्री साठी काही मिपा सदस्यांना विचारु शकता . खाली दिलेली लिन्कवर क्लिकावे मग तुम्ही दिलेला " हासबनीस बखळ" हा भाग गुगल मॅप वर दिसेल. https://www.google.co.in/maps/place/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8…

In reply to by प्रमोद देर्देकर

शोधुन दाखवावी म्हणजे प्रत्यक्षात तिथे जाऊन दाखवावे. (तिथे जाऊन सेल्फी वगैरे काढली तर दावा वैध ठरविण्यात येईल) सबब तुमचा दावा वैध मानता येणार नाही. तरी तुम्हाला एक उत्तेजनार्थ बक्षीस देण्याचा निर्णय विचाराधिन आहे.