✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कथा

म
मृत्युन्जय यांनी
Tue, 12/03/2013 - 16:08  ·  लेख
लेख
ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो. खुप दमतो पण तरीही स्पर्धा पुर्ण करतो तर कासव मस्त पोहत आलेले असते आणि कधीचे येउन पहुडलेले असते. ससा परत हरतो. कासवाच्या बुद्धीचा आणि सातत्याचा विजय होतो. आपली सगळी सहानुभूती अशीही दुबळ्या कासवाकडेच असते त्यामुळे कासव जिंकते तेव्हा आपल्यालाही कथा ऐकुन आनंदच होतो. पण आयुष्यात परिस्थिती फार वेगळी असते. इथे ससाच जिंकतो. खर्‍याखुर्‍या आयुष्यातला ससा असल्या शर्यतीत पळणारच नाही. तो आपल्याच दुनियेत मश्गुल असतो. "कथा" ही खर्‍या आयुष्यातल्या ससा आणि कासवाचीच कथा. ज्यावेळेस अमिताभ बच्चन अंधा कानून आणि कूली सारखे मारधाड पट यशस्वी करुन दाखवत होता त्याचवेळेस फारुख शेख, दीप्ती नवल, अमोल पालेकर हलकेफुलके चित्रपट घेउन येत होते आणि ते यशस्वी देखील होत होते. फारुख शेख, दीप्ती नवल आणि नसरुद्दीन शाह चा कथा हा असाच एक हलका फुलका चित्रपट. अमिताभ्चे चित्रपट म्हणजे झणझणीत मिसळपाव तर कथा म्हणजे वरण, भात, मीठ, लिंबु आणि त्यावर साजूक तुपाची धार. कथा ही एका सरळमार्गी मराठमोळ्या राजाराम जोशीची आणि त्याच्या बासुदेव भट्ट नावाच्या लबाड मित्राची कथा. kathaa poster राजाराम जोशी मुंबैतल्या एका चाळीतल्या २ खोल्यांच्या घरात राहत असतो. सगळ्यांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे चाळीत लोकप्रिय देखील असतो. पण एकुणच प्रतिमा थोडीशी बावळट "टेकन फॉर ग्राण्टेड" लोकांसारखी. 'तु माझा चांगला मित्र आहेस. पणा मी तुझ्याकडे त्या दृष्टीने कधी बघितले नाही' असे ज्यांना हमखास सांगितले जाइल साधारण तसा माणूस. भिडस्त आणि सज्जन आणि त्यामुळेच दुसर्‍याच्या घरात छान वाटणारा माणूस. गावाकडुन मुंबईत आलेला आणि एक दिवस हेडक्लर्क होण्याची लिमिटेड महत्वाकांक्षा बाळगणारा. हा आपल्या कथेचा कासव. एक दिवस अचानकपणे ४ वर्षे तोंडदेखील न दाखवलेला बासु भट्ट त्याच्याकडे येउन थडकतो आणि मुंबैत असेपर्यंत राजारामकडेच तळ ठोकणार असल्याचे परस्पर सांगुन टाकतो. भिडस्त राजाराम त्याला नाही म्हणु शकत नाही. पण त्याच्या मनातली चलबिचल बघुन बासु त्याला महिना ३०० रुपये भाड्याचे गाजरही दाखवतो. हे पैसे अर्थातच त्याला कधी मिळत नाहित. धड ग्रॅज्युएटही न झालेला बासु राजारामच्या कंपनीच्या मालकाला शेंडी लावुन राजारामच्याच कंपनीत सेल्स हेड म्हणुन कामाला लावतो. स्वतःला काही येतच नसते त्यामुळे सगळे काम राजारामकडुनच करवुन घेतो. गुलछबु आणि दिसताच छाप पडेल असे व्यक्तिमत्व असल्याचा फायदा घेउन बासु एकाचवेळेस बॉसची बायको, बॉसची मुलगी आणी चाळीतल्या संध्या बरोबर देखील सूत जमवतो. वास्तविक संध्यावर राजारामचे देखील प्रेम असते पण ते स्पष्टपणे सांगण्याची हिंमत नसते. राजारामच्या भिडस्त स्वभावाचा फायदा घेउन बासु त्याला पुरेपुर ठकवतो, राजारामकडे दुर्लक्ष करणारे चाळकर्‍यांमधे बासु मात्र एकदम लाडका होतो. बासुचा स्वभाव एका भ्रमरासारखा असतो. एकदम स्वच्छंदी. फार काळ एका ठिकाणी टिकणारच नाही आणि भविष्याची फारशी चिंताही नाही. लाथ मारेन तिथे पाणी काढेन ही धमक आहे आणि झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये ही जाणीव आहे. त्यामुळे बासु कोणामध्येच मानसिकरित्या गुंतत नाही. आहे त्या परिस्थितीचा आणि असेल त्या व्यक्तीचा फायदा उठवणे एवढेच काय त्याला माहिती अर्थात थोड्याच काळात "You can fool some people all the time or all the people for some time but not all the people all the time" या उक्तीचा प्रत्यय येतो आणि बासुचे बिंग फुटते पण त्याआधीच बासुने एका अरबाकडे नौकरी मिळवुन स्वतःची सोय जमवलेली असते. बॉसची बायको, त्याची मुलगी आणि संध्या सगळ्यांनाचा वार्‍यावर सोडुन बासु बेलाशक निघुन जातो. एव्हाना बासुचे लग्न संध्याशी ठरलेले असते. ऐन लग्नाच्या दिवशी हा पट्ठ्या पळुन जातो. राजाराम मनाचा मोठेपणा दाखवुन संध्याशी लग्नाची तयारी दाखवतो. संध्याचे आणि बसुचे संबंध बरेच पुढे पोचले आहेत आणि ती कदाचित प्रेग्नंट आहे हे जाणुनदेखील मागे हटत नाही. ससा पळुन जातो. कासव अखेर जिंकतो. चित्रपट संपल्यावर आपण विचार करत राहतो की कासव खरेच जिंकले का? आणि ससा खरेच हारला का? मुळात शर्यत लागली होती का ? की सश्याने कधी शर्यतीत भाग घेतलाच नाही? ससा तर रमत गमत मजा करत राहिला, कुठे गवतच खा कुठे झर्‍याचे पाणी पी, निवांत लोळत बस किंवा सॄष्टीसौंदर्य न्याहाळत बस असे करणारा तो ससा त्याचे उद्दिष्ट शर्यत जिंकण्याचे नव्हतेच तर तो हारला कसा? आणि सगळी मजा मारुन झाल्यावर ससा स्वतःच्या मर्जीने निघुन गेला तर नंतर कासवाने शर्यत जिंकली असे खरेच म्हणता येइल का? कथा संपते एक पण एक नविन तात्पर्य जन्माला घालुनच. बास कथाची कथा इतकीच. यात कुठेही हाणामारी नाही, बिभत्स दृष्ये नाहित, ऑकवर्ड करणारे शरीरप्रदर्शन नाही, द्वयर्थी विनोदी संवाद नाहित आणि तसे म्हणता विनोद निर्माण करणारी कुठलीही वाक्यरचनादेखील नाही. पण कथा लक्षात राहतो तो त्याच्या लाजवाब सादरीकरणामुळे, नसीरुद्धीन शाह (राजाराम), फारुख शेख (बासु भट) आणि दीप्ती नवल (संध्या) यांच्या लाजवाब अदाकारीमुळे. संपुर्ण चित्रपटात फारुख शेख भाव खाउन जातो. बॉसच्या बायकोला पटवताना त्याने जी काही अफलातून अदाकारी केली आहे त्याला तोड नाही. अभिनय सर्वांचाच उत्तम. चाळीतली सगळी इरसाल पात्रे सुद्धा उत्तम जमली आहे. चाळ पुर्णपणे मराठमोळी आणि दिग्दर्शिका आहे सई परांजपे त्यामुळे सतत एक मराठी चित्रपट पाहत असल्याचा भास होतो. चमचमीत खाउन कंटाळा आला असेल आणि एखाद्या दिवशी पहिल्या वाफेचा मऊ गुर्गुट्या वरण भात खावासा वाटत असेल तर कथा जरुर बघा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
कथा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा
शिफारस
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8817 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

आता

अनिरुद्ध प
Tue, 12/03/2013 - 16:19 नवीन
याची सीडी/डिवीडी शोधणे आले,माहिती साठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त रे मृत्यो!

प्यारे१
Tue, 12/03/2013 - 16:20 नवीन
मस्त रे मृत्यो! बाकी >>>नसीरुद्धीन शाह (राजाराम), फारुख शेख (बासु भट) इथे नेमका क्लिन बोल्ड झाला. पोस्टरवरुन नेमका उलटा अंदाज केलेला. फारुख शेख नि भ्रमर????(चष्मेबद्दूर नि इतर चित्रपटातला साधा भोळा आठवला!) बघायला हवा चित्रपट.
  • Log in or register to post comments

ते दोघेही एवढे पोचलेले कलाकार

तुमचा अभिषेक
Tue, 12/03/2013 - 22:25 नवीन
ते दोघेही एवढे पोचलेले कलाकार आहेत की हाच चित्रपट पुन्हा एकदा एकमेकांशी भुमिका बदलून नव्याने केला असता तरी पहिला डोक्यात आला नसता.... यात दिप्ती नवललाही जोडा.. चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास फार आधी लहानपणी पाहिलेला, त्या वयातही आवडलेला, फारूख शेख खास आवडीचा होताच, तसे दिप्ती नवल सुद्धा.. लेखही मस्तच, ससा आणि कासव या अँगल भारीच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हेच!!

तुषार काळभोर
Wed, 12/04/2013 - 11:56 नवीन
सेम!! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मस्त आहे हा सिनेमा!मस्त

यशोधरा
Tue, 12/03/2013 - 17:02 नवीन
मस्त आहे हा सिनेमा!मस्त लिहिलेस
  • Log in or register to post comments

लहानपणी हा सिनेमा दूरदर्शन ला

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/03/2013 - 17:03 नवीन
लहानपणी हा सिनेमा दूरदर्शन ला ३/४ वेळा पाहिला आहे. त्यामुळे माहित होताच.पण ससा/कासव रुपकात उलगडून दाखवल्यामुळे सर्व वाचत गेलो. आणी मजा आली. :) अतिशय छान लिहिले आहे. हल्ली हे साधे-सरळ चित्रपट हिंन्दी वाहिन्यांवर मुळीच दाखवत नाहीत. साल्यांना तमिळ्/तेलगू-लिप्यंतरीत-हिन्दी--मधले भयंकर चित्रपट दाखवता येतात. :-/ पण हे स्वच्छ-निर्मळ शिनेमे अठवणीतच फक्त! :)
  • Log in or register to post comments

बुव्याशी शमत सही लिवलंय

स्पा
Tue, 12/03/2013 - 17:10 नवीन
बुव्याशी शमत सही लिवलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मी थोडासा पाहिला होता हा

पिलीयन रायडर
Tue, 12/03/2013 - 17:04 नवीन
मी थोडासा पाहिला होता हा पिक्चर.. चांगला आहे, तुम्ही आज इथे लिहील्यने शेवट काय ते कळालं. पण मला सतत खुप वैताग येत होता की कधी ह्या बासुचे भांडे फुटणार / कधी ह्या राजारामला अक्कल येणार. ती शेवट पर्यंत येत नाही हे कळाल्याने वाईट वाटले. मला बासुला अद्दल घडेल असं वाटत होतं पण ही कथा तर रिअल लाईफ निघाली.
  • Log in or register to post comments

*****

जेपी
Tue, 12/03/2013 - 17:48 नवीन
ससा -कासवाची कथा आणी ह्या चित्रपटाची कथा ही तुलना आवडली . चित्रपट पाहीला नाही पण लवकरच पाहीन .
  • Log in or register to post comments

छान आहे लेख. सिनेमापण मस्तच.

अनुप ढेरे
Tue, 12/03/2013 - 18:55 नवीन
छान आहे लेख. सिनेमापण मस्तच.
  • Log in or register to post comments

एकदम आवडलं.

विशाल चंदाले
Tue, 12/03/2013 - 18:56 नवीन
एकदम आवडलं.
  • Log in or register to post comments

शिनेमा पाहताना बासूचा राग येत

रेवती
Tue, 12/03/2013 - 19:01 नवीन
शिनेमा पाहताना बासूचा राग येत होता पण मेला सुटलाच!
  • Log in or register to post comments

व्वा ! मस्त आठवण काढलीस ..

सुहास..
Tue, 12/03/2013 - 20:04 नवीन
व्वा ! मस्त आठवण काढलीस ...आणि परीक्षण ही छान लिहीले आहेस ... अगदी निवांत वेळ असला की सई परांजपे ने केलेली सर्व काही बघतो ..तिच्या सिरीज ही ...त्यात सगळ्यात हाईट म्हणजे चष्मेबद्दुर ...व्वा .!! हि यु ट्य्ब ची लिंक
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रपट होता.

विजुभाऊ
Tue, 12/03/2013 - 20:04 नवीन
सुंदर चित्रपट होता. यात सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे सई परांजपे ची मुलगी "विनी जोगळेकरपरांजपे" तिच्या इतके बोजड दिसणारे व्यक्तीमत्व न भूतो न भविष्यती.........
  • Log in or register to post comments

आवड आपली आपली विजुभौ !

सुहास..
Tue, 12/03/2013 - 20:09 नवीन
आवड आपली आपली विजुभौ !
  • Log in or register to post comments

छान ओळख करून दिलीस रे.

प्रचेतस
Tue, 12/03/2013 - 21:39 नवीन
छान ओळख करून दिलीस रे.
  • Log in or register to post comments

छानच ओळख करुन दिलीत!

मयुरा गुप्ते
Wed, 12/04/2013 - 01:49 नवीन
परत एकदा बघावा असा चित्रपट. असे चित्रपट नेहमीच आल्हाददायक अनुभव देतात असं माझं मत आहे. मनामध्ये जास्त काळ रेंगाळणारे म्हणुन जर कोणते चित्रपट असतील ते वरण्,भात्,साजुक तुप वालेच. -मयुरा.
  • Log in or register to post comments

तसाच्या तसा आठवणारा चित्रपट!

स्पंदना
Wed, 12/04/2013 - 05:04 नवीन
तसाच्या तसा आठवणारा चित्रपट! ते समोसे स्टोव्हवर गरम करुन देणारा नसीरुद्दीन अन बोटात किल्ली फिरवणारा फारुख शेख! शेवटी मुलांना गोष्ट सांगणारी दिना पाठक अन कासवाच्या हातात मुरझलेला पुष्पगुच्छ! आयुष्य अस दिखाव्यावर भुलुन वाया जाऊ नये अस सांगायचा प्रय्त्न वाट्तो थोडासा पण जाणवतो तो विरोधाभासच.
  • Log in or register to post comments

क्या बात, क्या बात! माझ्या

आदूबाळ
Wed, 12/04/2013 - 12:42 नवीन
क्या बात, क्या बात! माझ्या लाडक्या शिनेमांपैकी एक... या चित्रपटाचा शेवटच असा आहे - आज्जी नातवाला गोष्ट सांगत असते. तीत कासव जिंकतं. नातू खूष होतो. पण आज्जी म्हणते - वो जीत भी क्या जीत थी? या सिनेमांवरही लिहिणे: - छोटी सी बात - बातों बातों में - चष्मेबद्दूर - गोलमाल अवांतरः सई परांजपेची "हम पंछी एक डाल के" नावाची मालिका तूनळी वगैरे वर आहे का?
  • Log in or register to post comments

सुरेख ओळख!

पैसा
Wed, 12/04/2013 - 20:22 नवीन
ससा कासवाची कथा नव्या रूपात आणि नव्या ओळखीसह बघताना अगदी हेच प्रश्न पडतात! सिनेमातील नासिरुद्दिन आणि फारुख शेखबद्दलचे अभिषेकचे निरीक्षण एकदम बरोबर आहे. दोघेही काहीही करू शकणार्‍यांपैकी! दीप्ती नवल पण गोड वाटते. अगदी चाळीतली शेजारी रहाणारी मुलगी. ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी मस्त सिनेमाची मस्त ओळख.
  • Log in or register to post comments

मस्त आठवण ...

vrushali n
गुरुवार, 12/05/2013 - 11:00 नवीन
आणी त्यातल ते तुम सुंदर हो..हे गाणं फारच विनोदी होत बॉ..
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहेस

बेकार तरुण
गुरुवार, 12/05/2013 - 17:11 नवीन
चित्रपट हि छान आहे
  • Log in or register to post comments

छान रे एकदम

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 12/05/2013 - 17:17 नवीन
दूरदर्शन वर पाहिला होता खूप पूर्वी. त्यातले ते एक गाणे आठवते "कौन आया कौन आया"...
  • Log in or register to post comments

मस्तच!

इशा१२३
Fri, 12/06/2013 - 12:15 नवीन
कलाकरांच्या सहज अभिनयामुळे लक्षात राहीलेल्या चित्रपटाची आटवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आवडलेला सिनेमा. शिवाय मला

कवितानागेश
Fri, 12/06/2013 - 12:34 नवीन
आवडलेला सिनेमा. शिवाय मला समजलेला पहिलाच सिनेमा. त्या आधी सिनेमातली फक्त मारामारीच बघायचे, तेवढीच कळायची! :)
  • Log in or register to post comments

२५ जेन्युइन प्रतिसाद आले.

मृत्युन्जय
Sat, 12/07/2013 - 13:13 नवीन
२५ जेन्युइन प्रतिसाद आले. धागा पावन झाला. सर्वांना मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आवडता चित्रपट

मैत्र
Sat, 12/07/2013 - 14:04 नवीन
सई परांजपे यांचे सगळेच सिनेमे आवडतात -- चष्मेबद्दूर, कथा आणि जाने भी दो यारो.. सुहास म्हणाला तसे फार काही बोअर होत असेल तर कुठला तरी एक पाहतो.. शक्यतो चष्मेबद्दूर.. कथा मधली एक आठवण म्हणजे ती चक्क जास्वंदाची फुलं डोक्यात घालते आणि इतक्या सोज्वळ छान चेहर्‍याला ती पण शोभतात :) (पहा २२:४५ वरच्या तुनळी च्या दुव्यावर)
  • Log in or register to post comments

जाने भी दो यारो सई

अनुप ढेरे
Sat, 12/14/2013 - 15:29 नवीन
जाने भी दो यारो सई परांजप्यांचा नहिये. त्याचे दिग्दर्शक कुंदन शहा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

काल सुट्टीचा दिवस सार्थकी

प्यारे१
Sat, 12/07/2013 - 14:43 नवीन
काल सुट्टीचा दिवस सार्थकी लावला. सई परांजपेंचं दिग्दर्शन सगळ्यात भारी वाटलं. राजारामच्या आईवडलांच्या फोटोचा वेगवेगळ्या प्रसंगातला वापर भन्नाट. बुटाची जाहीरात मस्त. (हल्लीच्या दीड तासात फिनिशच्या काळात मात्र सिनुमामा संथ वाटतो.)
  • Log in or register to post comments

एकदम मस्त हलका फुलका चित्रपट.

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/07/2013 - 16:45 नवीन
एकदम मस्त हलका फुलका चित्रपट. कितीही वेळा पाहिला तरी परत बघावासा वाटणारा. सई परांजपे खरच ग्रेट बाई होती. वर उल्लेख न झालेला "स्पर्श" हा चित्रपट सुध्दा असाच सुंदर आहे. जाने भी दो यारो हा सुध्दा नसिरुद्दीन शहा आणि रवी वासवानीचा असाच एक वेगळा चित्रपट. पण तो बहुतेक कुंदन शहांचा होता सई परांजपेंचा नाही
  • Log in or register to post comments

चांगला

मिहिर
Sat, 12/07/2013 - 18:23 नवीन
मिपावरच मागे एका धाग्यात ह्या चित्रपटाचा उल्लेख वाचला होता आणि त्यानंतर डाऊनलोड करून पाहिला होता. त्याही धाग्यावर असेच भरपूर कौतुक चालले होते ह्या चित्रपटाचे. चित्रपट चांगला वाटला, पण बऱ्यापैकी कंटाळा आला. म्हणजे जितका भारी भारी म्हणून वाचले होते तितका काही खास वाटला नाही.
  • Log in or register to post comments

नविन ओळख

निमिष ध.
Sat, 12/07/2013 - 19:43 नवीन
नविन ओळख आवडली. चित्रपट पहाताना काही कळत नाही पण शेवटाला आपण ससा होउन जगायचे की कासव होउन असा प्रश्न पडल्यशिवाय राहत नाही.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा