कथा
ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकली वाचली असेल. "Slow & Steady wins the race". हे कथेच तात्पर्य. याच कथेच्या पुढचा भाग असा की सश्याला उपरती होते की तो जर कुठे लोळत पडला नसता तर जिंकला असता. ससा परत एक शर्यत ठरवतो आणि यावेळेस आळस न करता पळत राहतो. जिंकतो. कासवाला समजते हे काही त्याचे डोमेन नाही. अशीच शर्यत लावली तर तो हारत राहिल. तो परत एक शर्यत ठरवतो. फक्त वेगळ्या मार्गाने. यावेळेस त्यांच्या शर्यत मार्गामध्ये एक नदी असते. ससा पळत पळत पुढे जातो मात्र नदी ओलांडता येत नसल्याने अडखळतो. अखेर एका फार दूरच्या मार्गाने पळायला लागतो. खुप दमतो पण तरीही स्पर्धा पुर्ण करतो तर कासव मस्त पोहत आलेले असते आणि कधीचे येउन पहुडलेले असते. ससा परत हरतो. कासवाच्या बुद्धीचा आणि सातत्याचा विजय होतो. आपली सगळी सहानुभूती अशीही दुबळ्या कासवाकडेच असते त्यामुळे कासव जिंकते तेव्हा आपल्यालाही कथा ऐकुन आनंदच होतो. पण आयुष्यात परिस्थिती फार वेगळी असते. इथे ससाच जिंकतो. खर्याखुर्या आयुष्यातला ससा असल्या शर्यतीत पळणारच नाही. तो आपल्याच दुनियेत मश्गुल असतो. "कथा" ही खर्या आयुष्यातल्या ससा आणि कासवाचीच कथा.
ज्यावेळेस अमिताभ बच्चन अंधा कानून आणि कूली सारखे मारधाड पट यशस्वी करुन दाखवत होता त्याचवेळेस फारुख शेख, दीप्ती नवल, अमोल पालेकर हलकेफुलके चित्रपट घेउन येत होते आणि ते यशस्वी देखील होत होते. फारुख शेख, दीप्ती नवल आणि नसरुद्दीन शाह चा कथा हा असाच एक हलका फुलका चित्रपट. अमिताभ्चे चित्रपट म्हणजे झणझणीत मिसळपाव तर कथा म्हणजे वरण, भात, मीठ, लिंबु आणि त्यावर साजूक तुपाची धार. कथा ही एका सरळमार्गी मराठमोळ्या राजाराम जोशीची आणि त्याच्या बासुदेव भट्ट नावाच्या लबाड मित्राची कथा.
राजाराम जोशी मुंबैतल्या एका चाळीतल्या २ खोल्यांच्या घरात राहत असतो. सगळ्यांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे चाळीत लोकप्रिय देखील असतो. पण एकुणच प्रतिमा थोडीशी बावळट "टेकन फॉर ग्राण्टेड" लोकांसारखी. 'तु माझा चांगला मित्र आहेस. पणा मी तुझ्याकडे त्या दृष्टीने कधी बघितले नाही' असे ज्यांना हमखास सांगितले जाइल साधारण तसा माणूस. भिडस्त आणि सज्जन आणि त्यामुळेच दुसर्याच्या घरात छान वाटणारा माणूस. गावाकडुन मुंबईत आलेला आणि एक दिवस हेडक्लर्क होण्याची लिमिटेड महत्वाकांक्षा बाळगणारा. हा आपल्या कथेचा कासव.
एक दिवस अचानकपणे ४ वर्षे तोंडदेखील न दाखवलेला बासु भट्ट त्याच्याकडे येउन थडकतो आणि मुंबैत असेपर्यंत राजारामकडेच तळ ठोकणार असल्याचे परस्पर सांगुन टाकतो. भिडस्त राजाराम त्याला नाही म्हणु शकत नाही. पण त्याच्या मनातली चलबिचल बघुन बासु त्याला महिना ३०० रुपये भाड्याचे गाजरही दाखवतो. हे पैसे अर्थातच त्याला कधी मिळत नाहित. धड ग्रॅज्युएटही न झालेला बासु राजारामच्या कंपनीच्या मालकाला शेंडी लावुन राजारामच्याच कंपनीत सेल्स हेड म्हणुन कामाला लावतो. स्वतःला काही येतच नसते त्यामुळे सगळे काम राजारामकडुनच करवुन घेतो.
गुलछबु आणि दिसताच छाप पडेल असे व्यक्तिमत्व असल्याचा फायदा घेउन बासु एकाचवेळेस बॉसची बायको, बॉसची मुलगी आणी चाळीतल्या संध्या बरोबर देखील सूत जमवतो. वास्तविक संध्यावर राजारामचे देखील प्रेम असते पण ते स्पष्टपणे सांगण्याची हिंमत नसते. राजारामच्या भिडस्त स्वभावाचा फायदा घेउन बासु त्याला पुरेपुर ठकवतो, राजारामकडे दुर्लक्ष करणारे चाळकर्यांमधे बासु मात्र एकदम लाडका होतो. बासुचा स्वभाव एका भ्रमरासारखा असतो. एकदम स्वच्छंदी. फार काळ एका ठिकाणी टिकणारच नाही आणि भविष्याची फारशी चिंताही नाही. लाथ मारेन तिथे पाणी काढेन ही धमक आहे आणि झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये ही जाणीव आहे. त्यामुळे बासु कोणामध्येच मानसिकरित्या गुंतत नाही. आहे त्या परिस्थितीचा आणि असेल त्या व्यक्तीचा फायदा उठवणे एवढेच काय त्याला माहिती
अर्थात थोड्याच काळात "You can fool some people all the time or all the people for some time but not all the people all the time" या उक्तीचा प्रत्यय येतो आणि बासुचे बिंग फुटते पण त्याआधीच बासुने एका अरबाकडे नौकरी मिळवुन स्वतःची सोय जमवलेली असते. बॉसची बायको, त्याची मुलगी आणि संध्या सगळ्यांनाचा वार्यावर सोडुन बासु बेलाशक निघुन जातो. एव्हाना बासुचे लग्न संध्याशी ठरलेले असते. ऐन लग्नाच्या दिवशी हा पट्ठ्या पळुन जातो. राजाराम मनाचा मोठेपणा दाखवुन संध्याशी लग्नाची तयारी दाखवतो. संध्याचे आणि बसुचे संबंध बरेच पुढे पोचले आहेत आणि ती कदाचित प्रेग्नंट आहे हे जाणुनदेखील मागे हटत नाही. ससा पळुन जातो. कासव अखेर जिंकतो.
चित्रपट संपल्यावर आपण विचार करत राहतो की कासव खरेच जिंकले का? आणि ससा खरेच हारला का? मुळात शर्यत लागली होती का ? की सश्याने कधी शर्यतीत भाग घेतलाच नाही? ससा तर रमत गमत मजा करत राहिला, कुठे गवतच खा कुठे झर्याचे पाणी पी, निवांत लोळत बस किंवा सॄष्टीसौंदर्य न्याहाळत बस असे करणारा तो ससा त्याचे उद्दिष्ट शर्यत जिंकण्याचे नव्हतेच तर तो हारला कसा? आणि सगळी मजा मारुन झाल्यावर ससा स्वतःच्या मर्जीने निघुन गेला तर नंतर कासवाने शर्यत जिंकली असे खरेच म्हणता येइल का? कथा संपते एक पण एक नविन तात्पर्य जन्माला घालुनच.
बास कथाची कथा इतकीच. यात कुठेही हाणामारी नाही, बिभत्स दृष्ये नाहित, ऑकवर्ड करणारे शरीरप्रदर्शन नाही, द्वयर्थी विनोदी संवाद नाहित आणि तसे म्हणता विनोद निर्माण करणारी कुठलीही वाक्यरचनादेखील नाही. पण कथा लक्षात राहतो तो त्याच्या लाजवाब सादरीकरणामुळे, नसीरुद्धीन शाह (राजाराम), फारुख शेख (बासु भट) आणि दीप्ती नवल (संध्या) यांच्या लाजवाब अदाकारीमुळे. संपुर्ण चित्रपटात फारुख शेख भाव खाउन जातो. बॉसच्या बायकोला पटवताना त्याने जी काही अफलातून अदाकारी केली आहे त्याला तोड नाही. अभिनय सर्वांचाच उत्तम. चाळीतली सगळी इरसाल पात्रे सुद्धा उत्तम जमली आहे. चाळ पुर्णपणे मराठमोळी आणि दिग्दर्शिका आहे सई परांजपे त्यामुळे सतत एक मराठी चित्रपट पाहत असल्याचा भास होतो.
चमचमीत खाउन कंटाळा आला असेल आणि एखाद्या दिवशी पहिल्या वाफेचा मऊ गुर्गुट्या वरण भात खावासा वाटत असेल तर कथा जरुर बघा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आता
मस्त रे मृत्यो!
ते दोघेही एवढे पोचलेले कलाकार
हेच!!
मस्त आहे हा सिनेमा!मस्त
लहानपणी हा सिनेमा दूरदर्शन ला
बुव्याशी शमत सही लिवलंय
मी थोडासा पाहिला होता हा
*****
छान आहे लेख. सिनेमापण मस्तच.
एकदम आवडलं.
शिनेमा पाहताना बासूचा राग येत
व्वा ! मस्त आठवण काढलीस ..
सुंदर चित्रपट होता.
आवड आपली आपली विजुभौ !
छान ओळख करून दिलीस रे.
छानच ओळख करुन दिलीत!
तसाच्या तसा आठवणारा चित्रपट!
क्या बात, क्या बात! माझ्या
सुरेख ओळख!
मस्त आठवण ...
छान लिहिलं आहेस
छान रे एकदम
मस्तच!
आवडलेला सिनेमा. शिवाय मला
२५ जेन्युइन प्रतिसाद आले.
आवडता चित्रपट
जाने भी दो यारो सई
काल सुट्टीचा दिवस सार्थकी
एकदम मस्त हलका फुलका चित्रपट.
चांगला
नविन ओळख