Skip to main content

फ्लर्टिंग-दि संस्कृत वे.

बॅटमॅन यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
णमस्कार्स लोक्स, हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे. अजूनही बरेच श्लोक आहेत, तेही कधी प्रसंगोपात शेअर करेनच. कस्येयं तरणि: प्रपा पथिक नः किं पेयमस्यां पयः | धेनोर्वा उत माहिषं बधिर रे वारः कथं मंगल: | भौमो वाऽथ शनेश्वरोऽमृतमिदं तत्तेऽधरे दृश्यते | श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे, यद् रोचते तत्पिब || तर एक वाटसरू एका गावी आला आहे. त्याला तहान लागलीये. पण विहीर समोर दिसली तरी समोर एक तरुणी दिसल्यावर बोलायला काहीतरी निमित्त हुडकले तर पाहिजेच नैका? मग साहेबांनी विचारले, "कस्येयं तरणि: प्रपा?-तहानेपासून तारणारी ही विहीर कुणाची आहे?" "पथिक, नः- रे वाटसरू, आमची आहे." "किं पेयं अस्यां? - यात पेय काय आहे?" तरुणी मोठी सुंदर असावी. नपेक्षा आता यापुढे बोलण्यासारखे काही फारसे नसले तरी वाटसरू साहेब परत पीजे मारू लागले. ती काय दुधातुपाची विहीर थोडीच असणार होती? पण बोलायची हौस दांडगी ;) "पयः-पाणी". आता पय शब्दाची मजा अशी की त्याचा अर्थ दूध अन पाणी असा दोन्ही होतो. प्रवाश्याने दूध असा अर्थ घेऊन पुन्हा वेळ काढण्यासाठी पीजे मारणे सुरू केले. "धेनोर्वा उत माहिषं?-गायीचं आहे की म्हशीचं?" मुलगीही लगेच त्याची संभावना करते. "बधिर रे, वारः- अरे बहिर्‍या, वार आहे ते!!!" आता वार शब्दाची मजा अशी की वारि म्हंजे पाणी अन वार म्हंजे दिवस. [खरे तर व्याकरणदृष्ट्या श्लोकातले रूप चुकलेले आहे, पण कोटीच्या विनोदास्तव तिकडे जरा दुर्लक्ष करू.] मग प्रवासी तरुणाने अजून पीजे मारत संभाषण सुरू ठेवले. "कथं मंगलः, भौमो वाऽथ शनेश्वरः?-वार म्हंजे काय मंगळवार आहे, रविवार आहे की शनिवार?" आता मात्र तरुणीने सांगितले, "अमृतमिदम्- अरे, हे अमृत आहे!" आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट! "तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग :D आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे? "श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा, यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " ;) ;) फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात ;)
आतिवास

चांगला चाललाय संस्कृतचा अभ्यास :-) पण कोणतीही भाषा जोवर रोजच्या वापरात असते तोवर तिच्यात रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब दिसणं स्वाभाविक आहे असंही पुन्हा एकदा) जाणवलं.
10/07/2013 - 16:19 Permalink
बॅटमॅन

In reply to by आतिवास

पण कोणतीही भाषा जोवर रोजच्या वापरात असते तोवर तिच्यात रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब दिसणं स्वाभाविक आहे असंही पुन्हा एकदा) जाणवलं.
+११११११११११११११११११११११. यावरून अजून एक श्लोक आठवला. सासरा-जावयाचे संभाषण हा विषय आहे. जावई सासुरवाडीला आलाय आणि त्याची सरबराई पाहून खूष होऊन म्हणतो- "श्वशुरगृहनिवासः स्वर्गतुल्यो नराणाम् - पुरुषांसाठी सासुरवाडीला राहणे म्हंजे स्वर्गात राहिल्यासारखेच आहे." सासर्‍याला वाटले, जावई आता इकडेच येऊन राहतो की काय? त्यामुळे त्याने सांगितले, "यदि भवति विवेकी, पंचमे षड् दिने वा- जावयाला डोके असेल तर पाचसहा दिवसच तो इकडे राहील." जावई अजून लोचटपणा करतच होता- "दधि-मधु-घृत-लोभात् मासमेकं वसेच्चेत्- दही,मध अन तुपाच्या लोभापोटी एक महिना तरी इथे राहिलेच पाहिजे." आता मात्र सासर्‍याची सटकली. जावयाला दिली ओसरी अन जावई हातपाय पसरी?? चोलबे ना!! "तदुपरि दिनमेकं पादरक्षिप्रयोगः-त्यानंतर एखाददिवशी चपलेचा वापर केल्या जाईल" ;) :D :D
10/07/2013 - 16:29 Permalink
चौकटराजा

In reply to by बॅटमॅन

म्हणून मी डोबिवलीला एकच दिवस रहायचो . दूध, दही,तूप काय असेल ते चापून हाणायचो. सासरा चप्पल शोधू लागला की मी माझ्या चपला पायात सरकवायचो आपल्या घरला जाण्यासाठी !
11/07/2013 - 08:35 Permalink
मदनबाण

यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! हॅहॅहॅ... मी नाही यातली ! ;) फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. हॅहॅहॅ... ओठांचा रस मिळत असताना च्यामारी बोलतयं कोण ? ;) अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. वेळ-सवड मिळताच हे महत्वाचे कार्य वटवाघुळ मानवाने संप्पन करावे ही विनंती. :) लै मसाला आहे त्यात मसालेदार चिविष्ठ वर्णन आत्ताच डोळ्या समोर यायला लागले आहे. ;) (प्रेमरस प्रेमी) ;)
10/07/2013 - 16:46 Permalink
पैसा

लाईनी मारणे आणि 'चपला' यांचा प्रयोग तेव्हाही होत होता हे पाहून मजा वाटली. पुढचा लेख कधी टाकतोस?
10/07/2013 - 16:48 Permalink
प्रभाकर पेठकर

In reply to by पैसा

मुलांचे मन म्हणजे अगदी पवित्र मंदिरासारखे असते....... .....म्हणूनच त्यांना बघताच मुली 'चप्पल' काढतात.
10/07/2013 - 20:56 Permalink
प्यारे१

बॅटमनच्या संस्कृतचं, सुभाषितकाराचं, त्यातल्या कथानायकाचं नि सगळ्यात जास्त नायिकेचं कौतुक. मस्तच. :)
10/07/2013 - 16:50 Permalink
अभ्या..

हेहेहे भारीच. ही पण एक कलाच हाय राव. येउ दे अजून. बघू काय फ़ायदा होतोय का? ;-)
10/07/2013 - 16:52 Permalink
आनंदी गोपाळ

In reply to by बॅटमॅन

पण ते तुमच्या मुखचंद्रम्यावर आन सिक्ष प्याकावर डिपेंडत असावं भौतेक ;) किंवा ललनची मर्जी तत्क्षणी कशी आहे त्यावर. आजच हा (मराठी) पीजे वाचला: >> मुलगा - झोपली असशील तर स्वप्नं पाठव, जागी असशील तर आठवण पाठव, दु:खात असलीस तर अश्रू पाठव, . . . . . मुलगी - भांडी घासतीये... खरकटं पाठवू ????
10/07/2013 - 21:11 Permalink
बॅटमॅन

In reply to by आनंदी गोपाळ

अर्थातच. बाकी पीजेबद्दल म्हणाल तर मुलगी एसेमेस पाठवते अन मुलगा म्हणतो की निसर्गाच्या हाकेला ओ देतोय अशी व्हर्जन वाचलीये =))
10/07/2013 - 23:26 Permalink
मिसळलेला काव्यप्रेमी

बॅट्या, लेका काय काय खजाने आहेत रे बाबा तूझ्याकडे?? =)) =))
10/07/2013 - 17:42 Permalink
डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! सगळ्या काळात सगळ्या प्रकारची माणसे होती... फक्त प्रत्येक काळच्या सामाजीक परिस्थितीप्रमाणे त्यांचे भावनांप्रदर्शन वेगवेगळ्या पद्धतीने होत होते (केवळ रिस्क मॅनेजमेंट, अजून काय?)... उघडा खजीना आणि टंकवा अजून बरेच वेगवेगळे संस्कृत भाषेचे नजराणे... सर्वे वाचयती नक्कीम् । ;)
10/07/2013 - 18:41 Permalink
देशपांडे विनायक

तिने त्याला टेकडीवर संध्याकाळी बोलावले . तो धापा टाकत टेकडी चढून तिच्याजवळ पोहचला तेंव्हा सूर्यास्त होत होता उशीर झालेला असतानाही तिची माफी न मागता तो म्हणाला काय सुंदर आहे सूर्यास्त आणखी काय सुंदर आहे ?तिने चिडून विचारले . तुझा TOP आणि जीन आणखी ?तिने पुन्हा विचारले तुझी पर्स आणि तू खाली ठेवलेली सायकल तुला जे पाहिजे ते घेऊन जा . ती उदार होत म्हणाली घरी पाई जाताना ती रडत होती असे कानावर आले
10/07/2013 - 19:46 Permalink
सचिन कुलकर्णी

काव्यशास्त्रविनोद आवडला. :) सुंदर रसग्रहण.
10/07/2013 - 20:47 Permalink
प्रचेतस

In reply to by चित्रगुप्त

ही चित्रे पाहून अजून एक श्लोक आठवला. ऊर्ध्वास: पिबति जलं यथा यथा विरलाङगुलिश्चिरं पथिकः | प्रपापालिकापि तथा तथा धारां तनुकामपि तनुकरोति || तिच्या सौंदर्याचे आकंठपान करता यावे म्हणून तो पाणी पिण्याचा बहाणा करून तिला उघड्या डोळ्यांत साठविण्याचा प्रयत्न करीत असतो, पाणी सारे खाली वाहून जात असते. तर त्याच्या व्यक्तिमत्वावर भाळलेली प्रपाही (नवयुवती) त्या युवकाचे सान्निध्य अधिक काळ लाभावे म्हणून सुरईतील पाण्याची धार बारीक बारीक करीत जाते.
11/07/2013 - 08:34 Permalink
बॅटमॅन

In reply to by प्रचेतस

हा श्लोक तुझ्या सिग्नेचरमध्ये पाहिला होता, जबरीच आहे एकदम!!! मी सांगितलेल्या श्लोकापेक्षा जास्त "सेडक्टिव्ह" आहे ;)
11/07/2013 - 11:18 Permalink
प्रचेतस

मस्त रे बॅट्या. कथासरित्सागरातील हा श्लोक आठवला. राजन्न्वसर: कोsयं मोदकानां जलान्तरे | उदकै: सिञ्च मा त्वं मामित्युक्तं हि मया तवः || सन्धिमात्रं न जानासि माशब्दोदकशब्दयो: | न च प्रकरणं वेत्सि मूर्खस्त्वं कथमीदृशः ||
10/07/2013 - 22:06 Permalink
बॅटमॅन

In reply to by प्रचेतस

वल्लीशेठ काही संदर्भ लागले नाहीत. दुसरा श्लोक कळाला पण शब्दोदकशब्दयो: चा संदर्भ कळाला नाही. पहिल्यातले मोदक, जलांतर हेही प्रकर्ण समजले नाही, कृपया विस्कटून सांगावे. (मूर्खोऽहं कथमीदृशः म्हणणारा) बॅटमॅन.
10/07/2013 - 23:53 Permalink
बॅटमॅन

In reply to by बॅटमॅन

डोकेफोड केल्यावर शेवटी एका जालमित्राला विचारले अन खरेच "मूर्खोऽहं कथमीदृशः" चा साक्षात्कार घडला. मोदक=मा+उदक चे वैकल्पिक रूप हे कळ्ळेच नव्हते. त्यामुळे मा-शब्द-उदक-शब्दयो: चा संबंध देखील कळला अन शेवटी दिमागात बत्ती झाप्पकन पेटली :) तर वल्लीशेठ, श्लोक अतिशय जबरी आहे, फक्त इथे रिझल्ट एकदम वेगळा आहे ;) =))
11/07/2013 - 01:00 Permalink
प्रचेतस

In reply to by बॅटमॅन

येस. श्लोक जबरीच आहे. राजा राणी सरोवरात जलक्रीडा करत असताना राजा तिच्या अंगावर पाणी उडवायला लागतो. तेव्हा राणी म्हणते 'मोदकानां मा ताडयत' तेव्हा राजाला वाटते राणीला मोदक खायला हवे आहेत तेव्हा तो सेवकांकडून मोदकांनी भरलेले ताट आणवतो. तेव्हा राणी पुढील श्लोक उधृत करते. हे राजन, येथे पाण्यामध्ये मोदकांचा काय उपयोग? माझ्यावर पाणी शिंपडू नका असे मी आपणास म्हटले होते. 'मा' आणि 'उदक' ह्या शब्दांचा संधीही तुम्हास माहित नाही तसेच प्रसंगही तुम्ही लक्षात घेतला नाही. इतके तुम्ही मूर्ख कसे?
11/07/2013 - 08:22 Permalink
चौकटराजा

In reply to by प्रचेतस

मला वाटले आपल्या मिपाकर मोदकाचा काही श्लोक आहे म्हणजे गडावर पाण्याचे टाके आहे . त्यात मोदकाला ढकलण्यासाठी हे राजा, ( राजा नावाचा कोणी मिपाकर गडप्रेमी) तू का बरे अवसर लावीत आहेस ... ?
11/07/2013 - 08:42 Permalink
डॉ सुहास म्हात्रे

In reply to by बॅटमॅन

हायला ! बॅटमन्राव, अतीसुप्रसिद्ध "मोदकैही ताडय" पण आठवलं नाही? अर्थात ११ वी नंतर संस्कृत सोडलेल्या आमच्या डोस्क्यात त्याच्यापुढे काय म्हंजे कायपण गेलं नाय ही गोष्ट वेगळी ;)
11/07/2013 - 10:55 Permalink
पाषाणभेद

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन चाल लेख म्हणजे मानसिक मेजवानी अन चित्रगुप्तांची चित्रे म्हणजे नजरेची मेजवानी आहे. अवांतरः बॅटमॅनने माझा उल्लेख खाली काका म्हणून केला आहे. त्याचा त्यामुळे निषेध! (स्मायली टाकावी लागते नाहीतर लोक वेगळाच अर्थ घेताता आजकाल.) :-)
14/07/2013 - 03:16 Permalink
अत्रुप्त आत्मा

@आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट! "तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग smiley>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/flirty-smile-smiley-emoticon.gif @आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे? "श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा, यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " smileysmiley >>> http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/raining-hearts.gif फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात >>> http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/smiley-with-beating-heart.gif
10/07/2013 - 23:10 Permalink
जॅक डनियल्स

अशी संस्कृत सुभाषिते शाळेत असती तर मला १०० पडले असते आणि पुढचे शिक्षण पण मिळाले असते.;) देव, देवः आणि माला, माले करता करता कसा तरी पास झालो.
10/07/2013 - 23:43 Permalink
अग्निकोल्हा

त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले,
दंडवत.
11/07/2013 - 01:04 Permalink
स्पंदना

बॅटमॅन पंच्यांऐशी ची वाट पहात आहे. श्लोक मात्र फारच खुलवुन सांगीतला आहे, शाळेतल्या पेडणेकर बाईंची आठवण झाली. अर्थात त्या अश्या खुलवुन नाही सांगायच्या पण भाषांतर चांगल होत, किंवा समजावुन सांगताना काव्यरस व्याकरणाने बाद्ध न करता सांगायच्या मग त्या पुढे संधी, ह्यांव अन त्यांव यायच. पण तरीही आम्ही अडकलो ते पाठांतरातच. काय हो २० वर्षापुर्वी ते एक गाव होतं जेथे संस्कृत बोलीभाषा म्हणुन वापरल जायच ते अजुनही आहे का?
11/07/2013 - 04:18 Permalink
बॅटमॅन

In reply to by स्पंदना

धन्यवाद! चौरपंचाशिका टाकायला हरकत नाही, पण चावटपणा आहे सगळा त्यात, तो ट्रिम करू गेलो तर श्लोकांची मजाच निघून जाईल =))
11/07/2013 - 11:21 Permalink
धमाल मुलगा

In reply to by बॅटमॅन

बेट्या मिपा हे वयात आलेलं पैलं म्हराटी संस्थळ आहे (चालः वयात आलेलं नाटक) हे ठाऊक नाही काय तुला? टाकच तू. निदान त्या निमित्तानं का होईना आमच्यासारख्या दगडांना संस्कृतची गोडी लागेल. ;)
12/07/2013 - 02:14 Permalink
श्रीनिवास टिळक

मिपाची सतत आवक जावक चालू असल्यामुळे तिची संपूर्णपणे MSEB झाली म्हणून कंटाळून नाद सोडला होता. आज काही कारणास्तव परत आलो तर हा अपूर्व लाभ झाला. मला वाटत असल्या प्रयोगांमुळे जनतेत संस्कृत बद्दल प्रेम आणि रुची वाढेल. पुढच्या ८५ ची आतुरतेने वाट पहात आहे.
11/07/2013 - 20:47 Permalink
उपास

शेवटची पलटी आवडली.. थोडक्यात इथे फ्लर्ट (फक्त)पांथस्त करत नसून 'ती' सुद्धा त्याला भरीस पाडत आहे ;) आवडलच!
12/07/2013 - 01:58 Permalink
बॅटमॅन

समस्त प्रतिसादकांचे आभार! @धमुशेठः तुमच्यासाठी कायपण ;) टाकतोच श्लोकपण :D @श्रीनिवास टिळकः हो, तेही शीर्षक चालू शकेल. @चित्रगुप्तजी: शीर्षक "कॅची" वाटल्याने टाकलं, एवढंच. संस्कृतमध्ये त्या अर्थाचे शब्द नि:संशय असतील, पण जो अर्थबोध होणे अपेक्षित आहे त्या अर्थच्छटेचा इंग्लिश शब्द सर्वांत योग्य वाटला तस्मात टाकला.
12/07/2013 - 11:14 Permalink
अभ्या..

In reply to by बॅटमॅन

हम्म बॅट्या ढम्यासाठी तरी टाकच ही पंचाएंशी स्टोरी. त्याला सिक्स्टीफाईव्ह, ट्रीपल फाईव्ह, एटीफाईव्ह आसले आकडे लै आवडतेत ;)
15/07/2013 - 01:57 Permalink
पाषाणभेद

In reply to by अभ्या..

>>>> त्याला सिक्स्टीफाईव्ह, ट्रीपल फाईव्ह, एटीफाईव्ह आसले आकडे लै आवडतेत ऑं? एकसष्ठ, बासष्ठ तसेच आणखी काही पेशल आकडे इसरलेत का काय? काय म्हनावं आता?
15/07/2013 - 08:45 Permalink
सस्नेह

हेपण फ्लर्टिंग ऐका.. तुझ्यावर लैन मारता मारता आले म्हातारपण पडले डोक्यास टक्कल अन गेले दातपण ..तरीपण थेरडे, तुझ्यासाठी कायपण !
13/07/2013 - 14:14 Permalink
साती

बॅटमन भवोदया , तव संस्कृतभाषये गती दृष्ट्वा बहुल समाधान संतोषं च लभ्यते.
15/07/2013 - 21:21 Permalink
पिशी अबोली

In reply to by बॅटमॅन

महोदय, मम अनाहूता सूचना-'फ्लर्टिंग' विषयस्य साक्षात् अभ्यासः अपि प्रचलति स्यात् भवतः| अतः प्रशंसाया: स्वीकारः मांसवृद्धया न कृत्वा अन्येन केनचित् उपायेन करोतु, यतः सा तु फ्लर्टिंग्बाधिका... ;)
16/07/2013 - 00:02 Permalink
बॅटमॅन

In reply to by पिशी अबोली

महोदय, मम अनाहूता सूचना-
अत्र तु अहं निमिषमात्रे "अनाहिता" शब्दमेव अपठम् :P मिपास्थाने शब्दस्यास्य इतिहासं दृष्ट्वा नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम् ;)
'फ्लर्टिंग' विषयस्य साक्षात् अभ्यासः अपि प्रचलति स्यात् भवतः| अतः प्रशंसाया: स्वीकारः मांसवृद्धया न कृत्वा अन्येन केनचित् उपायेन करोतु, यतः सा तु फ्लर्टिंग्बाधिका...
बाढम् , किन्तु "व्यापार-रहस्यानि" एतादृशं सर्वान् कथयित्वा यदि सर्वेऽपि तानि अनुसरन्ति, को लाभः भवेन्मम =)) अपि च मांसवृद्ध्या: फ्लर्टिंगविषयेण सार्धं सम्बन्धः पूर्णत्वेन स्वीकृतः ;)
16/07/2013 - 00:40 Permalink
पिशी अबोली

In reply to by बॅटमॅन

नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम्
अहो आश्चर्यं, अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन साक्षात् वाल्गुदेयस्य नेत्रक्षालनं कृतम्| ;)
किन्तु "व्यापार-रहस्यानि" एतादृशं सर्वान् कथयित्वा यदि सर्वेऽपि तानि अनुसरन्ति, को लाभः भवेन्मम
भो: महोदय, मया एकमेव रहस्यं उद्धृतं तथापि एषा चिंता| भवान् तु पंचाशीतिरहस्यानि सर्वेषां पुरतः प्रदर्शयितुं प्रवृत्तः| तर्हि तेषां सर्वेषां उपयोगः भवता पूर्वमेव कृतः किम् ?? ;)
16/07/2013 - 01:16 Permalink
बॅटमॅन

In reply to by पिशी अबोली

अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन साक्षात् वाल्गुदेयस्य नेत्रक्षालनं कृतम्|
आम्, अधुना अनाहितानां युगे एतादृशमेव वक्तव्यं श्रेयस्करम् ;)
भो: महोदय, मया एकमेव रहस्यं उद्धृतं तथापि एषा चिंता| भवान् तु पंचाशीतिरहस्यानि सर्वेषां पुरतः प्रदर्शयितुं प्रवृत्तः| तर्हि तेषां सर्वेषां उपयोगः भवता पूर्वमेव कृतः किम् ??
अयि अनाहिते, त्वया कथितं रहस्यं ननु भिन्नम् | कुतः योषिदाराधनरहस्यं, कुतो स्मरकेलिवर्णनानि ;)
16/07/2013 - 01:36 Permalink

वाल्गुदेया, मांसवृद्धी फक्त शब्दात येऊन काय उपेग? किमान ४ प्याक अ‍ॅब्स आण म्हणजे लाईनी मारायला जरा वजन येईल. आणि सगळी रहस्य काय ती इथे येऊ देत!
16/07/2013 - 09:00 Permalink
बॅटमॅन

In reply to by पैसा

आयो......४ प्याक अ‍ॅब्स?? म्हंजे लाईन मारताना काहीतरी रोमँटिक बोलू की रेझ्युमे दाखवू- ४ प्याक अ‍ॅब्स, १ नोकरी, इ. लिहिलेला =)) =))
16/07/2013 - 11:56 Permalink
पिशी अबोली

In reply to by बॅटमॅन

लाईन मारल्यानंतर उत्तरपण रोमँटिक यायला हवे असेल तर बघ असे करुन, नुस्ते लाईन मारुन समाधान होणार असेल तर काही गरज नाही.. ;) =)) =))
16/07/2013 - 12:15 Permalink
बॅटमॅन

In reply to by प्रचेतस

नक्कीच! सर्व सल्लागारांचे (म्ह. सल्ला देऊन गार करणारांचे) मणापासूण आभार ;)
16/07/2013 - 12:42 Permalink
अभ्या..

In reply to by बॅटमॅन

बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग द संस्कृत वे" काय? ;) तू एक संस्कृतात बिघडलायस ती पिशी पण का? नीट गंतव्य स्थान सीसीडी, कापुचिनो पिबन्ति अन गप्पा करिष्यसि. काय समजले? आणि भो पिशे, आमचे बटूशास्त्री हास्यविनोदचर्चा चालवून घेतात तस्मात तूपण टेक लाईट. काय? ;)
16/07/2013 - 14:31 Permalink
पिशी अबोली

In reply to by अभ्या..

नीट गंतव्य स्थान सीसीडी, कापुचिनो पिबन्ति अन गप्पा करिष्यसि. काय समजले?
समजले हे, की बॅटमॅनसाठी अजून एक फ्लर्टिंग-रहस्य (जाहीर प्लॅटफॉर्मवर आल्याने) निरुपयोगी झालेले आहे... बिच्चारा! आणि अभ्यादादा, आय आल्वेजं टेकं लायटम्..
16/07/2013 - 21:31 Permalink