✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक सिगारेट पिणारी मुलगी

त
तुमचा अभिषेक यांनी
Sun, 04/28/2013 - 19:04  ·  लेख
लेख
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच. दिवसभराच्या दगदगीने आलेला शीणवटा म्हणा, खाडीवरून येणारा खार्‍या चवीचा थंडगार वारा अंगाखांद्यावरून खेळू लागताच, बायको खिडकीला डोके टेकवून लवंडली. मी मात्र जागाच होतो.. नेहमीप्रमाणेच.. बोटांची नखे खात.. हातात नावाला म्हणून पेपर, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. एका नजरेतच ओळखले. आजही तशीच तर दिसत होती.. जशी तीन-साडेतीन वर्षांपूर्वी.. रिलायन्समधील नेहमीसारखीच एक सकाळ. नाश्त्याच्या ऑर्डरची वाट बघत कॅटीन काउंटरला रेलून उभा होतो. हातात नावालाच म्हणून मेनूकार्ड धरलेले, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. माझ्याच दिशेने येताना. खरे तर काऊंटरच्या दिशेने येताना. अगदी बाजूलाच येऊन उभी राहिली. तिच्या एका कटाक्षाच्या अपेक्षेत तिला न्याहाळत असलेलो मी. पहिल्या नजरेत भरावेत ते तिचे कुरळे कुरळे आखूड केस.. कानांमागे ओढलेले.. मानेवर रुळणारे.. थोडासा टॉमबॉईश लूक देणारे. अन साजेसाच पेहराव. निळ्याशार जीन्सवर पांढरी आखूड कुर्ती. डाव्या हाताच्या मुठीत घट्ट धरलेली पर्स अन तिलाच जणू मॅचिंग असे मनगटी घड्याळ. दुसर्‍या मनगटात मात्र जाडसर काळे कडे.. हो कडेच.. बांगडी तरी कशी म्हणावे त्याला. इतक्यात अचानक तिने माझ्या दिशेने पाहिले. अन मी अनुभवले ते आतापर्यंतच्या सार्‍या वर्णनाला छेद देऊन जाणारे, समोरच्याचा मनाचा भेद घेऊन जाणारे, तिचे काळेभोर डोळे.. आखीव रेखीव भुवयांच्या कोंदणात. त्या नजरेच्या कैचीत अडकणार नाही ते मन कसले.. कितीही चंचल का असेना, काही काळ रेंगाळणारच. त्या नजरेला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाने मढवलेले.. ते तिचे डोळे. हसली तशी माझे आणखीनच भान हरपले. हाताला काहीसा झटका बसून भानावर आलो तेव्हा लक्षात आले की हातातले मेनूकार्ड खेचले जात होते. किंचित ओशाळल्यासारखे सॉरी पुटपुटलो खरे, पण तीचे लक्ष कुठे होते त्याकडे. कसलीशी ऑर्डर देऊन निघून गेली ती. अन तिला पाठमोरा न्याहाळणारा मी. केस अगदीही काही आखूड नव्हते. जीन्स-कुर्तीचा पेहराव तिला किती शोभत होता हे पाठीमागूनच समजावे. अन मग हे रोजचेच झाले. तीच वेळ तीच जागा. तिचे बदलणारे कपडे पण तेच तसेच रुपडे. अन नजर, कातिल की काय म्हणतात अगदी तश्शीच. ज्यूस अन सॅंडवीचशिवाय वेगळे काही घेताना तिला कधी पाहिले नाही. ती मला बघते की नाही हे कधी कळले नाही. पण एकदा मी सुद्धा चीज सॅंडवीच घेऊन तिच्या जवळच्याच टेबलवर बसलो. मी मागायच्या आधीच हसून तिने सॉसची बाटली माझ्यापुढे सरकवली. पुन्हा ती आपल्या खाण्यात मग्न. मी हलकेच अंदाज घेत होतो, पण पुन्हा काही तिने माझ्याकडे पाहिले नाही. तिचे उरकले अन पर्स उचलून ती निघून गेली. कॅंटीनबाहेर पडून दिसेनाशी होईपर्यंत तिला नजरेनेच सोबत देत, सावकाशपणे मग मी देखील उठलो. ती उजवीकडे "ए" "बी" "सी" ब्लॉकच्या दिशेने आणि माझी पावले वळली डावीकडच्या "डी" ब्लॉककडे. ठरवले तर कंपनीच्या पोर्टलवर तिची माहिती मिळवणे सोपे होते. तिचे नाव, तिची बसायची जागा, तिची कामाची पोस्ट, तिचे वयच नव्हे तर तिचा रक्तगट कोणता या सारखी वैयक्तिक माहिती सुद्धा सहज उपलब्ध होती. गरज होती ती फक्त पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढून पोर्टलवर फीड असलेला डेटा चाळायची. पण तशी गरज आहे हे मन कबूल करत नव्हते. कदाचित त्याला गुंतायची भिती वाटत असावी. दिवस सरत होते. फारसे काही वेगळे घडत नव्हते. तरीही या नात्यातील वीण घट्ट होतेय असे जाणवत होते. येणार्‍या सकाळची वाट आदल्या रात्री डोळे मिटण्यापासून बघू लागलो होतो. सकाळचे तिचे दर्शन पुढच्या दिवसभराला पुरत होते. मध्ये एकदा तिला सुट्टे पैसे कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडचे दोन रुपयांचे कूपन पुढे सरकवल्याचे आठवतेय. हात किंचित थरथरतच होता माझा त्यावेळी. तिने त्याकडे दुर्लक्ष करतच ते स्विकारले. त्या कूपनाची परतफेड म्हणून तिचे ते हसणे.. नंतरही कित्येकदा आम्ही एकमेकांना सामोरे गेलो. नजरेतील ते ओळखीचे भाव, ना लपवायचे प्रयत्न ना दाखवायची ओढ.. कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही, किनार्‍यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन.. एकेक घर करत आमच्यातील नाते पुढे सरकत होते एवढे मात्र खरे.. या दिवसांत एखादा दिवस असाही यायचा जेव्हा ती दिसायची नाही. मन खट्टू तर व्हायचेच पण आयुष्यातील एक दिवस फुकट ही गेल्यासारखे वाटायचे. दुसरा दिवस येणार हेच काय ते समाधान. एखादा दिवस आपणही तिच्या नजरेस न पडून तिलाही तसेच वाटते का बघावे, असा विचार मनात यायचा. पण तिला काय वाटेल हे समजण्याचा मार्ग नसल्याने त्या विचाराला बगल दिली जायची. अन अश्यातच एक दिवस मी तिचे वेगळे रूप पाहिले... दुपारच्या वेळेला जेवण आटोपून काही कामानिमित्त "ए" ब्लॉकला जाणे झाले. उन्हाची झळ लागू नये म्हणून थोडेसे लांब पडत असले तरी पायवाटेवर केलेल्या शेडखालूनच मी सहसा जातो. पण आज आभाळ भरून आल्याने शॉर्टकट घ्यायची संधी साधली. थोड्याश्या अडनाड्या रस्त्याने जिथे चिटपाखरांचा अड्डा वसावा, खुरटी झुडपे तुडवत चालता चालता हातातल्या मोबाईलशी चाळा.. नेहमीप्रमाणेच.. मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. आपल्याच धुंदीत, बरोबर तीनचार मित्र. ऑफिसचेच असावेत. हातात सिगारेट अन तोंडातून निघणारा धूर.. सर्वांच्याच.. अन हो, तिच्याही. धूराच्या वलयात धूरकट धूरकट होत जाणारा तिचा चेहरा, अन नकळत मंद झालेली माझी पावले. परत परत मान वळवून तिला पाहताना, अखेरच्या वळणावर तिची माझ्याकडे नजर गेलीच.. झटक्यात मान वळवली.. पण नजरानजर झालीच. बस्स, तीच शेवटची नजरानजर.. पुढेही काही सकाळ आल्या, पुढेही नजरेच्या भेटी झाल्या. पण नजरेतील अर्थ आता बदलले होते. जाणूनबुझून मी तिच्यापासून नजर चोरू लागलो होतो. अन ती काही फरक पडत नाही असे दाखवत असली तरी तिची नजर खरं काय ते बोलत होती. कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात.. पण तो संवाद आमच्यात कधी झालाच नाही. इतक्यात तिची नजर माझ्याकडे गेली. आणखी एक नजरानजर, जवळपास तीन साडेतीन वर्षांनी.. पण नजरेत तेच तेव्हाचे ओळखीचे भाव. यावेळी मात्र लपवायचे प्रयत्न.. दोघांकडूनही.. शेजारी माझी बायको आहे याचे भान होते मला.. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझी बायकोच असणार याची जाण होती तिला.. तरीही नजर अडकली होती.. अन सोबतीला निर्विकार चेहरा. पुढचे स्टेशन आली तशी ती उठली. नजरेची साखळी नाही म्हटले तरी तुटलीच. मुद्दामच ती उतरायला माझ्या विरुद्ध दिशेच्या दरवाज्याला गेली असावी. आजही ती पाठमोरीच छान दिसत होती. आजही सिगारेट पित असावी का.. तिला उतरताना पाहून माझ्या मनात आलेला शेवटचा विचार, मन पुन्हा एकदा चलबिचल करून गेला. खिडकीच्या बाहेर नजर टाकून ती दिसते का याचा शोध घेतला. मात्र ट्रेनने वेग पकडला तसे त्या गर्दीत हरवलेल्या तिला शोधणे अशक्यच.. कदाचित तिचे ते शेवटचे अपेक्षित दिसणे समाधान देऊन गेले असते. पण नशीबात नव्हतेच.. होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच.......... . . . चुरगाळलेली ती सिगारेट खिडकीबाहेर जाताना पाहून........... किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर.. - तुमचा अभिषेक
  • हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

Book traversal links for एक सिगारेट पिणारी मुलगी

  • हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
आस्वाद
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
33323 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

Reliance मध्ये अनेकदा मुलींना सिगारेट ओढताना पाहिलं आहे .

टपरी
Mon, 04/29/2013 - 23:03 नवीन
मी पण B -BLOCK च्या बाहेर बऱ्याच वेळा मुलीना सिगारेट ओढताना पाहिलं आहे .आजकाल मुलींनी सिगारेट ओढणे common झाल आहे . त्यात धक्का बसण्या सारखं काही नहि.
  • Log in or register to post comments

छान लेख

सुबोध खरे
Tue, 04/30/2013 - 09:49 नवीन
kiss a non smoker & taste the difference
  • Log in or register to post comments

लेखन आवडले..

अक्षया
Tue, 04/30/2013 - 10:57 नवीन
लेखन आवडले. :)
  • Log in or register to post comments

सिगरेट

तिमा
Tue, 04/30/2013 - 12:23 नवीन
मुलींनी सिगरेट ओढणे आणि मुलांनी ओढणे यांत एक फरक आहे. सिगरेट ओढणार्‍या स्त्रियांच्या बाळांनाही त्यापासून धोका असतो. पुरुषांच्या बाबतीत फक्त त्यांनाच धोका असतो.
  • Log in or register to post comments

असे काही असल्यास ते

तुमचा अभिषेक
Tue, 04/30/2013 - 17:42 नवीन
असे काही असल्यास ते गरोदरकाळातले असावे ना.. अवांतर - अशी ही बनवाबनवी चित्रपटातील बिडीचे डोहाळे लागलेला स्त्रीवेशातील लक्ष्या आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

अहो गरोदरकाळ कसला. मूल नीट

ढालगज भवानी
Wed, 05/01/2013 - 20:10 नवीन
अहो गरोदरकाळ कसला. मूल नीट "कन्सीव्ह" व्हावे म्हणून स्त्रिया व पुरुषही एकेक वर्ष धूम्रपान सोडतात असे ऐकून आहे. "कन्सीव्ह" मिस्टर आहात कुठे? पुरुषही सोडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

सिगरेट व त्यानंतर कॉफी

निनाद मुक्काम …
Tue, 04/30/2013 - 19:37 नवीन
सिगरेट व त्यानंतर कॉफी ह्यामुळे जो दुर्गंध निर्माण होतो त्यामुळे मला तर एकदा मळमळून आले. मी सिगरेट पिते ह्या निकषावर मुली नाकारल्या नाही , तर मला त्याचा वास असह्य होतो. ही माझी वैयक्तिक समस्या होती, मात्र सिगरेट पिणारे अनेक मित्र ,मैत्रिणी होते व अजूनही आहेत.ज्या दिवशी युरोपात उपहार गृह व बंदिस्त खोल्यांमध्ये सिगरेटी फुंकणे कायदेशीररीत्या दंडनीय अपराध ठरवला तेव्हा झक मारून कार्यालयांना स्मोकींग रूम निर्माण केल्या. तेव्हा आमच्या सारख्यांच्या जीवात जीव आला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हं!

आतिवास
Tue, 04/30/2013 - 14:05 नवीन
मला वाटलं (फक्त) 'एक' सिगरेट ओढून, थांबलेली मुलगी (- पुन्हा कधीच सिगरेट न ओढणारी) अशी काहीशी गोष्ट असावी! पण गोष्ट तर वेगळीच निघाली :-)
  • Log in or register to post comments

हा हा.. भलत्याच अवाजवी

तुमचा अभिषेक
Tue, 04/30/2013 - 17:40 नवीन
हा हा.. भलत्याच अवाजवी अपेक्षांनी कथा वाचायला घेतलीत आपण.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

खुप छान लिहीलय

शिलेदार
Tue, 04/30/2013 - 16:42 नवीन
सुन्दर लिहीलय मला वाटत की उगीचच नको त्या गोष्टीचा बोबाटा करण्यापेक्षा मूळ भावना समजून घेणे महत्वाचे आहे. तुम्ही खुप सुन्दर पात्र रन्गवली आहेत अगदी डोळ्यासमोर उभ राहत.रविवारची संध्याकाळ फार मस्त रन्गवली आहे. मला वाटत की नायकाचा अपेक्षा भन्ग न त्या मुलीला खुपणारी नायकाची नजर न तीला जाणवणार गिल्ट हे स्पष्ट होत. खुप छान लिहीलय खुप खुप शुभेछा!!!
  • Log in or register to post comments

खिक्क...

सोत्रि
Wed, 05/01/2013 - 12:07 नवीन
त्या मुलीला खुपणारी नायकाची नजर न तीला जाणवणार गिल्ट हे स्पष्ट होत.
खिक्क... - (कसलाही गिल्ट न जाणवणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिलेदार

छान!

पैसा
Wed, 05/01/2013 - 18:38 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments

गोष्ट चांगली ए पण लोकांच्या

शिल्पा ब
गुरुवार, 05/02/2013 - 11:45 नवीन
गोष्ट चांगली ए पण लोकांच्या प्रतिक्रियाच पहा ना !! ओठ तिचे, शिग्रेट तिची, फुकणार ती, काय प्रोब्लेमलं तर तिला अन बाकीच्यांनाच काळजी. बाकी शिग्रेटी, दारु अन सोडा म्हंजे कोक, पेप्सी वेग्रे हे प्रकार गिळल्याने, फुंकल्याने काय काय रोग होतात हे माहीत असुनसुद्धा हौस फिटत नसेल तर आपलं काय जातंय म्हणुन मी कै कोणाला सांगायला जात नै...उलट दोन कश मारावे वाटले तर ते फुकुन अन उरलेली शिग्रेट देउन "काय तो मेला वास" म्हणुन लांब निघुन जाते.
  • Log in or register to post comments

तुमची गोष्ट वेगळी आहे. तुमचा

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 05/04/2013 - 07:58 नवीन
तुमची गोष्ट वेगळी आहे. तुमचा EQ हाय आहे, म्हणून तुम्हाला जमते हे असे व्यवस्थित वागणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अर्थातच. आमचं वागणं दुसर्‍या

शिल्पा ब
Sat, 05/04/2013 - 10:34 नवीन
अर्थातच. आमचं वागणं दुसर्‍या कोणासाठी नसतं. लोकांच्या व्यक्तिगत बाबीत उपदेश करायची आमची सवय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

?????

मृणालिनी
Sat, 05/04/2013 - 15:35 नवीन
सिगारेट कुणीच पिऊ नये..... स्त्री असो वा पुरुष. आणि सिगारेट ओढणाऱ्या मुलांकडे देखील 'टपोर्याला' पहाव तसच पाहिलं जातच न? आणि ती एक वाईट सवय आहे. मग मुलाला लागली काय किव्हा मुलीला लागली काय...दोघांनाही दोन कानफाटात देऊन ती सवय मोडायला लावली पाहिजे.
  • Log in or register to post comments

अगायायायाया, कोण आहे रे तो

बॅटमॅन
Sat, 05/04/2013 - 15:46 नवीन
अगायायायाया, कोण आहे रे तो शिग्रेटी फुंकतोय्/तेय? कुणाची एवढी डेरिंग की साला मधुरातै आज्ञा देत असताना शिग्रेट पिईल? दोन कानफटात किंवा पोकळ बांबूचे फटके दिल्या जातील. (गॉथमचा मुतव्वा) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृणालिनी

छान..

रुपी
Wed, 06/17/2015 - 05:43 नवीन
लेखन आवडले..
  • Log in or register to post comments

मला ही...

स्वीत स्वाति
Wed, 06/17/2015 - 08:52 नवीन
अजुन बरेच काही लिहाय्चे आहे या लेखावर . पण सध्या बिझि आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

छान वाटले . .

शि बि आय
Wed, 06/17/2015 - 12:54 नवीन
छान वाटले . . पण काही प्रश्न मनात आले ? १) ती सिगरेट ओढते म्हणून तुम्ही नजर चोरत होतात मग ट्रेन मध्ये तुमच्याकडे सिगरेट काय करत होती बुआ ? २) जर तुम्हीहि सो कॉल्ड "फुंके" होतात मग आधी नजर का चोरत होतात?
  • Log in or register to post comments

मस्त लेख

प्रणित
Wed, 06/17/2015 - 19:36 नवीन
आता एक नविन कथा येउ दे एक मॅगी खाणारी/बनवणारी मुलगी :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा