Skip to main content

हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

Published on शनीवार, 04/05/2013
----------------------------------------------------------------------------- एक सिगारेट पिणारी मुलगी - http://misalpav.com/node/24641 ----------------------------------------------------------------------------- हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..! आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी .. ट्रेनमध्ये बसला होता.. एका मुलीबरोबर... मुलगी.?? अंह, गळ्यात लायसन झुलत होते तिच्या. सौभाग्याच्या ईतर ही सतरा खुणा, त्याची ताई किंवा वहिनी तर नसावी.. छे.. मग असे खेटून बसले नसते, ते ही ट्रेन बर्‍यापैकी खाली असताना. पण इतकीही लगट नव्हती दोघांत, त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन झोपायचे तर वेडी खिडकीच्या चौकटीत आधार शोधत होती.. भांडण झाले असावे का दोघांत, की नेहमीच पटत नसावे. छे.. नवरा बायको म्हणजे किशोरवयीन प्रेमी युगुल नाही, ते असेच बसत असावेत.. पण मी का इतका विचार करतेय तिचा..? त्यांचा...? की....... त्याचा. अजूनही त्याचे लक्ष गेले नाहीये माझ्याकडे, न गेले तरच बरे. काय करावे, कुठे नजर फिरवावी, आज ऑफिस नसल्याने पेपरही बरोबर नाही घेतलाय.. पुन्हा एकदा नकोय मला ती नजरानजर.. जीवघेणी.. न बोलताही बरेच काही सांगून जाणारी.. डोळ्यांतून झिरपत काळजाला घाव देऊन जाणारी.. स्वत:च्या अंतरंगाचा थांगपत्ता लागू न देता समोरच्याच्या मनाचा ठाव घेऊन जाणारी.. ती नजर.. आजही तशीच असेल का.. जशी तीन साडेतीन वर्षांपूर्वी.. कसा बावळटासारखा बघत होता माझ्याकडे, जसे कधी मुलगी बघितलीच नाही. पण वखवखलेली नव्हती ती नजर, आजवर बर्‍याच नजरा अनुभवल्यात तश्या. पण हिच्यात एक निरागसपणा होता.. एक प्रामाणिकपणा होता.. जे आत तेच बाहेर.. की मलाच तसे वाटले.. कँटीनच्या काऊंटरवर उभा होता, पण हातात मेनूकार्ड नुसते नावालाच धरले होते. बहुतेक महाशयांची ऑर्डर देऊन झाली असावी. एकदा आवाज दिला तरी ध्यान कुठे, मग पुन्हा मोठ्याने ओरडावेसे नाही वाटले, घेतले खेचून. ओशाळलाच तो, मी नाही दिले तिथे लक्ष.. खरे तर एक सँडवीचच काय ते ऑर्डर करणार होते मी, तरी का मागावेसे वाटले मला मेनूकार्ड... त्याच्याकडे. डोळ्याच्या कडांतून मला जाणवत होती त्याची नजर, माझ्याकडेच लागलेली.. वळावे का पटकन.. की इतक्यात नको.. थोडा वेळ द्यावा त्याला.. पण का..? कशासाठी..? दोनेक मिनिटे तशीच गेली, अन पटकन पाहिले रोखून त्याच्याकडे, क्षणभरच.. पण बावरला नाही तो, डोळ्यात एक चमक आली, पण पकडले गेल्याचे भाव नव्हते चेहर्‍यावर, खरे सांगायचे तर हेच आवडले मला त्याचे... त्याच्याबद्दल पहिल्याच नजरेत बांधलेला अंदाज खरा निघाला होता.. बावळट.. अन निरागस. मला खात्री होती की आता तो मलाच पाठमोरे न्याहाळत असणार, परत पहावे का त्याला पलटून, पकडावे परत त्याला माझ्याकडे बघताना.. पण नकोच, उगाच चुकीचा सिग्नल जायचा. त्यापुढेही कधी पलटले नाही मी, पण ब्रेकफास्ट करताना रोज बघायचे. माझ्या समोरच तर बसायचा, मसाला डोसा खात.. हातानेच.. अन हेच मला आवडायचे त्याचे. आता हे रोजचेच झाले होते. माझी बसायची जागा मी काही दिवस बदलून पाहिली, मात्र तो त्यानुसार आपले बस्तान मांडायचा. एक दिवस मग मी हा खेळ थांबवला, जेव्हा तो हे माझ्यासाठीच करतोय याची खात्री पटली. त्यानंतर माझी बसायची जागा नेहमी एकच असायची, अन थेट समोरचे टेबल त्याचे. दोघांच्या टेबलमधील अंतर तेच आणि तेवढेच, पण दोघांमधील अंतर झपाट्याने कमी होत होते. जेव्हा माझे सॅंडवीच संपायचे तेव्हा त्याच्या डोश्याचा शेवटचा घास शिल्लक असायचा. माझ्या पाठोपाठच तो उठत असणार हे नक्की. त्याची चाहूल मला जाणवायची, पण एका वळणावर येईपर्यंत. एक मर्यादा आखून घेतली होती त्याने, जिथून आमचे रस्ते वेगळे व्हायचे.. अन हेच मला आवडायचे त्याचे. पण कधीतरी तो माझ्या शोधात येईल याची खात्री होती मला, की चुकूनच भेट घडायची होती आमची. हो, चुकूनच घडली, ती ही चुकीच्या वेळी.. जे त्याने बघायला नको होते ते त्याने बघितले, जे त्याला कळायला नको होते ते त्याला कळले. पण कधीपर्यंत... तरीही, आजच तो दिवस यावा. आज सकाळपासूनच डोके भणभणत होते. हल्ली आठवड्यातून एखादीच सिगारेट इतपत नियंत्रण मिळवले होते, पण आज कसलेसे मळभ दाटून आले होते.. आकाशी.. अन मनाशीही. सकाळपासूनची तिसरी सिगारेट होती, तरीही बेचैनी कमी व्हायचे नाव घेत नव्हती. घरचे लग्नासाठी मागे लागले होते, हल्ली रोज फोनवर तो विषय काढल्याशिवाय आईला चैन नसायची. कालच्या तमाश्यानंतर आज तिचा फोन नाही हेच खुपत होते. उलट बोलायला नको होते मी.. कधीतरी अतीच होते माझे.. छे.. सिगारेटचा एक शेवटचा जोरदार झुरका, तोंडातून बाहेर पडणार्‍या धूराचे वलय, त्यातून आरपार लागलेली दूरवर नजर .. अन तो नजरेस पडला.. हातातली सिगारेट गळून पडायची तेवढे शिल्लक राहिले होते. सकाळपासूनच्या वातावरणाचे कोडे उलगडले.. आज ढग नुसते जमून आले होते, त्यांना बरसायचे नव्हते.. पण गरजून मात्र गेले.. त्याने फिरवलेली नजर कायमची असेल हे त्याक्षणी वाटले नव्हते. मन किती गुंतले आहे याचा अंदाज गुंता सोडवायच्या वेळी येतो. नात्याची एक दोर खेचायची गरज असते, तिथे आपण चुकीच्या खेचून गुंता वाढवत नेतो. त्या दिवसानंतर क्षणाक्षणाला त्याची नजर बदलताना पाहिली. दरवेळी त्याच्या नजरेचा आरसा होऊन त्यात माझ्याच नजरेतील आर्तता दिसत होती. हळूहळू त्या आरश्याचा देखील पारा उडू लागला होता. अन एक दिवस ती नजर दिसायची बंद झाली, कायमची... जी आज पुन्हा माझ्या समोर नियतीने आणली होती .. तब्बल तीन साडेतीन वर्षांनी.. पत्त्यांचा बंगला मोडण्यातील मजा अनुभवता यायला हवी.. तेच खरे प्रेम.. गेले तीन साडेतीन वर्षे मी हेच करत होते. पण आज मात्र जमेनासे झाले, जेव्हा न राहवून मी त्याच्याकडे पाहिले. आजही त्याची नजर काही बोलायला मागत नव्हती, आजही मला त्याची नजर वाचता येत होती. त्याच्या शेजारी बसलेली मुलगी त्याची ताई किंवा वहिनी नाही, हे सांगून जाणारी नजर.. आजही मनाच्या कप्प्यात माझी तीच प्रतिमा तो साठवून बसलाय हे दाखवून देणारी नजर.. इतक्यात माझी नजर त्याच्या शर्टाच्या खिश्यावर पडली. पांढर्‍या झिरमिरीत कापडाच्या पल्याड दिसणारे ते पाकीट, ओळखीचा रंग अन ओळखीचा आकार. शेवटची सिगारेट मी कधी ओढली हे मला आठवत नाही, पण ते पाकिट आजही ओळखता येत होते. तो तेव्हाही सिगारेट पित असावा का..? की हल्लीच ओढायला सुरुवात केली असावी..? आयुष्यातील पहिली सिगारेट ओढताना त्याला माझी आठवण आली असावी का...? तेव्हाही माझ्या मनात बरेच प्रश्न दाटून आले होते, आजही काही वेगळी स्थिती नव्हती. सारेच प्रश्न अनुत्तरीत राहणार, हेच एकमात्र सत्य होते. कल्पनेचे पंख लाऊन उडताना एकेक पिसे गळून पडत होती. काही मोरपिसांसारख्या आठवणी तश्याच राहाव्यात म्हणून मी विचारांची साखळी तिथेच तोडली. कुठलेसे स्टेशन आले होते, न बघताच मी उठले. त्याच्या विरुद्ध दिशेने, मुद्दामहूनच. त्याची नजर आजही माझा पाठलाग करत असणार याची खात्री होती मला, पण पलटून तिला पकडायची आज इच्छा होत नव्हती. निसटलेले क्षण कधी हातात गवसतात का. प्लॅटफॉर्मवरच्या गर्दीत मी हरवून गेले, मुद्दामहूनच..! - तुमचा अभिषेक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 14661
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

काहि बोलायाचे आहे पण बोलणार नाही काहिशा अशाच भावना असतात त्या वयात. मग काही वर्षानंतर लकडी पुलावर ती भेटते आणि कडेवरच्या पोराला म्हणते "मामाला मोरया करा" आणि त्या वेळेलाही काहिही न बोलता आपण लाचारीने "हॅ हॅ हॅ" करत वेळ मारुन नेतो. दोन्ही लेख मस्तच जमले आहेत. (बर्‍याच भाच्यांचा मामा)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माझ्या एका वर्ग मित्राचा (तो पण नौदलात होता) किस्सा आठवतो आहे. तो सुट्टीत दिल्लीला परत गेल्यावर त्याची एक जुनी मैत्रीण भेटली तिच्या कडेवर मुल होते तिने मुलाला हेच म्हटले कि वो देखो मामाजी. त्यावर आमचे मित्रवर्य म्हणाले कि हम तुम्हारे आशिक थे अब भी आशिक ही है और आगेभी आशिक रहेंगे. ये मामा जी का किस्सा छोड दो. त्यावर ती मैत्रीण हसायला लागली

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अगदी अगदी... आजवरचे पराक्रम पाहता माझेही हे दिवस फार दूर नाहीत एवढे नक्की.. ;)

दुसरी बाजू छान जमलीय.

छान जमले आहे.. आवडले...

वाचायला सुरूवात केली अन गेल्यावेळचेच चित्र डोळ्यासमोर उभे राहिले पण कॅमेर्‍याची बाजू पूर्णपणे विरुद्ध. कथेतल्या पात्राच्या मनीच्या भावना इतक्या तरलपणे मांडण्याच्या कौशल्याला सादर प्रणाम.

In reply to by श्रीरंग_जोशी

यातील पहिला लेख लिहून जेव्हा नेहमीसारखा बायकोला वाचायला दिला तेव्हा तिला म्हणालो, यावेळी बघ जरा वेगळ्या लिखाणशैलीत म्हणजे तरल असा लिहलंय... तेव्हा माझ्या काँन्वेंटमध्ये शिकलेल्या बायकोला तरल या शब्दाचा अर्थ समजवताना माझे मराठी अन ईंग्लिश दोहोंचे ज्ञान उघडे पडून जी बोंब उडाली ती माझी मलाच माहित.. तर तिला आता तुमचा हा प्रतिसाद दाखवता येईल.. अन याबद्दल तुमचे खास आभार.. :)

आवडलंय खरंच पण समथिंग इज मिस्सिंग. काय ते नेमकं कळेना. उगाच सिगारेट पिताना पकडलं गेल्याचं समर्थन? आधीच्या लेखात असलेला नि इथं नसलेला प्रांजळपणा? की आमचंच मन गुन्हेगार आहे?

In reply to by प्यारे१

धन्यवाद, आणि तुम्ही म्हणता तो प्रांजळपणा, जर हा लेख त्या लेखाच्या आधी लिहिला असता तर कदचित त्याच्या जागी इथे दिसला असता.. :)

In reply to by पक पक पक

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. आपण म्हणता ते वाचले नाही पण वपुंसारखा काही विचार मी केला याचेच समाधान.. बाकी हे स्वानुभावावर लिहिले आहे बरेचसे... वाचन कमी असल्याने माझे बरेचसे लिखाण असेच असते.. बस थोडेसे काल्पनिकतेचे पाणी.. ते नक्की काय हे सांगितले की मात्र मजा गेली.. :)

त्या तिकडे पलीकडे पण एक लेख आलाय, मला या लेखाकडून पण काहीशी तशीच अपेक्षा होती पण हा अपेक्षाभन्ग आवडला.. :) झाक्क्स जमिंग!!!

In reply to by लॉरी टांगटूंगकर

त्या तिकडे पलीकडे आणि कुठे.. आणि नेमके कशावर लेख.. शक्य असल्यास लिंक देऊ शकाल का? इथे किंवा खरडीत.. या लेखावरील प्रतिसादासाठी धन्यवाद.. :)

काय मस्त लिहिता हो! हा भाग जास्त आवडला. या जी बाजू मांडलीय त्यात पूर्वीच्या आणि नंतरच्या काळासाठी खूप शक्यता जाणवतायत, ज्या वाचकांवर सोडल्या आहेत. जमलंय..

एकाच कथासुत्राचा छाप-काटा मस्त जमला आहे. आवडला.

ताणलेले लिखाण वाटले... वाजन्ट एनि रिअल निड टु जस्टिफाय व्हाट दे हिल शी वॉज थिंकींग... आता यामुळे तुमच्या पहिल्या वर्शनला कृत्रिमता आलि.

In reply to by अग्निकोल्हा

सेम टु सेम हेच म्हणतो! - (अकृत्रिम) सोकाजी

कथा म्हणून छान जमलाय हा भाग, पण बॉसने म्हणल्याप्रमाणे दुसरी बाजूही तुम्हीच लिहिल्याने (पहिला भाग स्वानुभवाने लिहिलेले गृहित धरून) तुमच्याच मनाची वेडी आशा लिखाणात उतरलीयं (पूर्णतः कृत्रीम नाही म्हणू शकत, खरं असूही शकेल,नसेलही. पण प्यारे म्हणतो तसं ...समथिंग इज मिसिंग. बट लेट्स नॉट ट्राय टू फाइंड इट. लेट इट गो.)

आज ढग नुसते जमून आले होते, त्यांना बरसायचे नव्हते.. पण गरजून मात्र गेले.. त्याने फिरवलेली नजर कायमची असेल हे त्याक्षणी वाटले नव्हते
अप्रतिम ओळ...मस्तंच जमलंय राव ---- रागा ----

अशा अपुर्ण /अव्यक्त प्रेमाच्या कथा नेहमीच चुटपुट लावून जातात. मी पुर्वी कधीतरी ग्रामीण पार्श्वभुमी असलेली एक अव्यक्त प्रेमाची कथा वाचली होती. आता अनेक वर्षांनी त्यातले सगळे तपशील पुर्णपणे विसरुन गेलो पण ती वाचल्यानंतर मनाला लागलेली चुटपुट अजूनही लक्षात आहे. तुमची कथा शहरातली आणी अधूनिक वातावरणातील. पण अव्यक्त प्रेमातील हळवेपणा तोच आहे. थोडे ".." जास्त वाटले. बाकी सगळं उत्तम. एक छान विडीओ बनवला तर युट्युब वर लोकप्रिय होवू शकतो.

In reply to by मराठी कथालेखक

हा काय प्रकार असतो? समजले नाही... बाकी जे काही असेल ते नावावरूनच मला जमेलसे वाटत नाही :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)