✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक सिगारेट पिणारी मुलगी

त
तुमचा अभिषेक यांनी
Sun, 04/28/2013 - 19:04  ·  लेख
लेख
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच. दिवसभराच्या दगदगीने आलेला शीणवटा म्हणा, खाडीवरून येणारा खार्‍या चवीचा थंडगार वारा अंगाखांद्यावरून खेळू लागताच, बायको खिडकीला डोके टेकवून लवंडली. मी मात्र जागाच होतो.. नेहमीप्रमाणेच.. बोटांची नखे खात.. हातात नावाला म्हणून पेपर, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. एका नजरेतच ओळखले. आजही तशीच तर दिसत होती.. जशी तीन-साडेतीन वर्षांपूर्वी.. रिलायन्समधील नेहमीसारखीच एक सकाळ. नाश्त्याच्या ऑर्डरची वाट बघत कॅटीन काउंटरला रेलून उभा होतो. हातात नावालाच म्हणून मेनूकार्ड धरलेले, मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. माझ्याच दिशेने येताना. खरे तर काऊंटरच्या दिशेने येताना. अगदी बाजूलाच येऊन उभी राहिली. तिच्या एका कटाक्षाच्या अपेक्षेत तिला न्याहाळत असलेलो मी. पहिल्या नजरेत भरावेत ते तिचे कुरळे कुरळे आखूड केस.. कानांमागे ओढलेले.. मानेवर रुळणारे.. थोडासा टॉमबॉईश लूक देणारे. अन साजेसाच पेहराव. निळ्याशार जीन्सवर पांढरी आखूड कुर्ती. डाव्या हाताच्या मुठीत घट्ट धरलेली पर्स अन तिलाच जणू मॅचिंग असे मनगटी घड्याळ. दुसर्‍या मनगटात मात्र जाडसर काळे कडे.. हो कडेच.. बांगडी तरी कशी म्हणावे त्याला. इतक्यात अचानक तिने माझ्या दिशेने पाहिले. अन मी अनुभवले ते आतापर्यंतच्या सार्‍या वर्णनाला छेद देऊन जाणारे, समोरच्याचा मनाचा भेद घेऊन जाणारे, तिचे काळेभोर डोळे.. आखीव रेखीव भुवयांच्या कोंदणात. त्या नजरेच्या कैचीत अडकणार नाही ते मन कसले.. कितीही चंचल का असेना, काही काळ रेंगाळणारच. त्या नजरेला कोणाची नजर लागू नये म्हणून काजळाने मढवलेले.. ते तिचे डोळे. हसली तशी माझे आणखीनच भान हरपले. हाताला काहीसा झटका बसून भानावर आलो तेव्हा लक्षात आले की हातातले मेनूकार्ड खेचले जात होते. किंचित ओशाळल्यासारखे सॉरी पुटपुटलो खरे, पण तीचे लक्ष कुठे होते त्याकडे. कसलीशी ऑर्डर देऊन निघून गेली ती. अन तिला पाठमोरा न्याहाळणारा मी. केस अगदीही काही आखूड नव्हते. जीन्स-कुर्तीचा पेहराव तिला किती शोभत होता हे पाठीमागूनच समजावे. अन मग हे रोजचेच झाले. तीच वेळ तीच जागा. तिचे बदलणारे कपडे पण तेच तसेच रुपडे. अन नजर, कातिल की काय म्हणतात अगदी तश्शीच. ज्यूस अन सॅंडवीचशिवाय वेगळे काही घेताना तिला कधी पाहिले नाही. ती मला बघते की नाही हे कधी कळले नाही. पण एकदा मी सुद्धा चीज सॅंडवीच घेऊन तिच्या जवळच्याच टेबलवर बसलो. मी मागायच्या आधीच हसून तिने सॉसची बाटली माझ्यापुढे सरकवली. पुन्हा ती आपल्या खाण्यात मग्न. मी हलकेच अंदाज घेत होतो, पण पुन्हा काही तिने माझ्याकडे पाहिले नाही. तिचे उरकले अन पर्स उचलून ती निघून गेली. कॅंटीनबाहेर पडून दिसेनाशी होईपर्यंत तिला नजरेनेच सोबत देत, सावकाशपणे मग मी देखील उठलो. ती उजवीकडे "ए" "बी" "सी" ब्लॉकच्या दिशेने आणि माझी पावले वळली डावीकडच्या "डी" ब्लॉककडे. ठरवले तर कंपनीच्या पोर्टलवर तिची माहिती मिळवणे सोपे होते. तिचे नाव, तिची बसायची जागा, तिची कामाची पोस्ट, तिचे वयच नव्हे तर तिचा रक्तगट कोणता या सारखी वैयक्तिक माहिती सुद्धा सहज उपलब्ध होती. गरज होती ती फक्त पंधरा-वीस मिनिटांचा वेळ काढून पोर्टलवर फीड असलेला डेटा चाळायची. पण तशी गरज आहे हे मन कबूल करत नव्हते. कदाचित त्याला गुंतायची भिती वाटत असावी. दिवस सरत होते. फारसे काही वेगळे घडत नव्हते. तरीही या नात्यातील वीण घट्ट होतेय असे जाणवत होते. येणार्‍या सकाळची वाट आदल्या रात्री डोळे मिटण्यापासून बघू लागलो होतो. सकाळचे तिचे दर्शन पुढच्या दिवसभराला पुरत होते. मध्ये एकदा तिला सुट्टे पैसे कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडचे दोन रुपयांचे कूपन पुढे सरकवल्याचे आठवतेय. हात किंचित थरथरतच होता माझा त्यावेळी. तिने त्याकडे दुर्लक्ष करतच ते स्विकारले. त्या कूपनाची परतफेड म्हणून तिचे ते हसणे.. नंतरही कित्येकदा आम्ही एकमेकांना सामोरे गेलो. नजरेतील ते ओळखीचे भाव, ना लपवायचे प्रयत्न ना दाखवायची ओढ.. कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही, किनार्‍यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन.. एकेक घर करत आमच्यातील नाते पुढे सरकत होते एवढे मात्र खरे.. या दिवसांत एखादा दिवस असाही यायचा जेव्हा ती दिसायची नाही. मन खट्टू तर व्हायचेच पण आयुष्यातील एक दिवस फुकट ही गेल्यासारखे वाटायचे. दुसरा दिवस येणार हेच काय ते समाधान. एखादा दिवस आपणही तिच्या नजरेस न पडून तिलाही तसेच वाटते का बघावे, असा विचार मनात यायचा. पण तिला काय वाटेल हे समजण्याचा मार्ग नसल्याने त्या विचाराला बगल दिली जायची. अन अश्यातच एक दिवस मी तिचे वेगळे रूप पाहिले... दुपारच्या वेळेला जेवण आटोपून काही कामानिमित्त "ए" ब्लॉकला जाणे झाले. उन्हाची झळ लागू नये म्हणून थोडेसे लांब पडत असले तरी पायवाटेवर केलेल्या शेडखालूनच मी सहसा जातो. पण आज आभाळ भरून आल्याने शॉर्टकट घ्यायची संधी साधली. थोड्याश्या अडनाड्या रस्त्याने जिथे चिटपाखरांचा अड्डा वसावा, खुरटी झुडपे तुडवत चालता चालता हातातल्या मोबाईलशी चाळा.. नेहमीप्रमाणेच.. मात्र इथे तिथे भिरभिरणारी नजर.. सवयीप्रमाणेच.. अन ती दिसली. आपल्याच धुंदीत, बरोबर तीनचार मित्र. ऑफिसचेच असावेत. हातात सिगारेट अन तोंडातून निघणारा धूर.. सर्वांच्याच.. अन हो, तिच्याही. धूराच्या वलयात धूरकट धूरकट होत जाणारा तिचा चेहरा, अन नकळत मंद झालेली माझी पावले. परत परत मान वळवून तिला पाहताना, अखेरच्या वळणावर तिची माझ्याकडे नजर गेलीच.. झटक्यात मान वळवली.. पण नजरानजर झालीच. बस्स, तीच शेवटची नजरानजर.. पुढेही काही सकाळ आल्या, पुढेही नजरेच्या भेटी झाल्या. पण नजरेतील अर्थ आता बदलले होते. जाणूनबुझून मी तिच्यापासून नजर चोरू लागलो होतो. अन ती काही फरक पडत नाही असे दाखवत असली तरी तिची नजर खरं काय ते बोलत होती. कधी कधी शब्दांना पर्याय नसतो.. नजरेची भाषा नातं जुळवण्यास कितीही समर्थ असली तरी जेव्हा तुटायची वेळ येते, तिथे शब्दच हवे असतात.. पण तो संवाद आमच्यात कधी झालाच नाही. इतक्यात तिची नजर माझ्याकडे गेली. आणखी एक नजरानजर, जवळपास तीन साडेतीन वर्षांनी.. पण नजरेत तेच तेव्हाचे ओळखीचे भाव. यावेळी मात्र लपवायचे प्रयत्न.. दोघांकडूनही.. शेजारी माझी बायको आहे याचे भान होते मला.. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझी बायकोच असणार याची जाण होती तिला.. तरीही नजर अडकली होती.. अन सोबतीला निर्विकार चेहरा. पुढचे स्टेशन आली तशी ती उठली. नजरेची साखळी नाही म्हटले तरी तुटलीच. मुद्दामच ती उतरायला माझ्या विरुद्ध दिशेच्या दरवाज्याला गेली असावी. आजही ती पाठमोरीच छान दिसत होती. आजही सिगारेट पित असावी का.. तिला उतरताना पाहून माझ्या मनात आलेला शेवटचा विचार, मन पुन्हा एकदा चलबिचल करून गेला. खिडकीच्या बाहेर नजर टाकून ती दिसते का याचा शोध घेतला. मात्र ट्रेनने वेग पकडला तसे त्या गर्दीत हरवलेल्या तिला शोधणे अशक्यच.. कदाचित तिचे ते शेवटचे अपेक्षित दिसणे समाधान देऊन गेले असते. पण नशीबात नव्हतेच.. होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच.......... . . . चुरगाळलेली ती सिगारेट खिडकीबाहेर जाताना पाहून........... किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर.. - तुमचा अभिषेक
  • हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

Book traversal links for एक सिगारेट पिणारी मुलगी

  • हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
आस्वाद
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
33323 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

सुंदर

शैलेन्द्र
Sun, 04/28/2013 - 19:14 नवीन
:) सुंदर
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे..

मुक्त विहारि
Sun, 04/28/2013 - 19:16 नवीन
आवडले..
  • Log in or register to post comments

मस्त

चाणक्य
Sun, 04/28/2013 - 19:24 नवीन
आवडले लिखाण
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Sun, 04/28/2013 - 19:30 नवीन
हे पूर्वी वाचले आहे
  • Log in or register to post comments

कसे शक्य आहे, कालच लिहिले आणि

तुमचा अभिषेक
Sun, 04/28/2013 - 20:18 नवीन
कसे शक्य आहे, कालच लिहिले आणि आज इथे प्रकाशित केले. लेखातील घटना खुद्द माझ्याशीच घडली असल्याने इतर कोणी कुठे लिहिणे शक्यही नाही. पण हा, हाच अनुभव मी मागे एकदा म्हणजे दोन-तीन वर्षांपूर्वी ऑर्कुटसमूहांवर थोडक्यात लिहून सिगारेट पिणार्‍या मुलींकडे समाजाचा बघायचा दृष्टीकोण कसा असतो या आशयाचा एक धागा काढला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती

टवाळ कार्टा
Sun, 04/28/2013 - 20:26 नवीन
मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती वाइट??
  • Log in or register to post comments

मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती वाइट??

निनाद मुक्काम …
Sun, 04/28/2013 - 20:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Sun, 04/28/2013 - 20:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

+1

सोत्रि
Sun, 04/28/2013 - 20:49 नवीन
करेक्ट नेमके हेच म्हणायचे आहे! ती मुलगी सिगरेट पिते म्हणून तिला कटाप केल्यावर पुन्हा तिला बघण्याची हुरहुर का लागावी? -(सध्या सिगारेट पिणे सोडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती

तुमचा अभिषेक
Sun, 04/28/2013 - 22:17 नवीन
मुलगी सिगरेट पिते म्हणजे ती वाइट??
ती मुलगी सिगरेट पिते म्हणून तिला कटाप केल्यावर पुन्हा तिला बघण्याची हुरहुर का लागावी?
मला वाटते यावरच मी हा लेख लिहिलाय.. की खरेच मुलांनी सिगारेट ओढली तर चालते अन मुलींनी ओढली तर त्यांना वेगळ्या नजरेने बघितले जाते असे का? आणि हे सहजच घडते म्हणून माझ्याशीही झाले जे मी प्रामाणिकपणे कबूल केले. माझा पुढचा मुद्दा वैयक्तिक घेऊ नका पण उद्या आपल्यापैकी कोणाला समजले की आपला मुलगा सिगारेट ओढतोय तर जास्त धक्का बसेल की आपली मुलगी सिगारेट ओढतेय हे समजल्यावर मोठा धक्का बसेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

लेखनशैली आवडली

श्रीरंग_जोशी
Sun, 04/28/2013 - 20:38 नवीन
कथा / व्यक्तिचित्रण छान रंगले आहे. शब्दांवर चांगली पकड दिसत आहे. केवळ सिगारेट 'पिणारी' ऐवजी सिगारेट 'ओढणारी' मुलगी अधिक बरे वाटले असते.
  • Log in or register to post comments

ह्म्म कदाचित "ओढणारी" समर्पक

तुमचा अभिषेक
Sun, 04/28/2013 - 22:22 नवीन
ह्म्म कदाचित "ओढणारी" समर्पक शब्द असावा.. माझ्या तोंडात "पिणारी" हा शब्द येतो जो लेखनात उतरला.. जो अगदीच चुकीचा नसल्याने राहू देऊया.. :) बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. या प्रकारच्या शैलीत हे पहिलेच लेखन माझे .. साशंक मनानेच प्रकाशित केलेले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

प्रमाण मराठीत सिगारेट ओढतात.

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 04/30/2013 - 10:33 नवीन
प्रमाण मराठीत सिगारेट ओढतात. हिंदीत पितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

धूम्रपान बद्दल काय म्हणाल?

तुमचा अभिषेक
Wed, 05/01/2013 - 11:31 नवीन
धूम्रपान बद्दल काय म्हणाल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मग धूर पिणे म्हणा, सिगारेट

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/01/2013 - 14:28 नवीन
मग धूर पिणे म्हणा, सिगारेट नाही :-) ह्याह्याह्या !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

फुंकणे

श्रीरंग_जोशी
Wed, 05/01/2013 - 18:45 नवीन
फुंकणे हे क्रियापदही वापरले जाते बोलीभाषेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

झुरका मारणे किंवा दम मारणे..

तुमचा अभिषेक
Wed, 05/01/2013 - 20:38 नवीन
किंवा कश मारणे... चहा पिण्याला देखील मुंबईत चल एक कटींग मारूया बोलतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

त्याचा खास बोलीभाषेतील उच्चार

बॅटमॅन
Wed, 05/01/2013 - 23:31 नवीन
त्याचा खास बोलीभाषेतील उच्चार "फुकणे" असा आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तंबाखू वापरणारे

सुबोध खरे
Wed, 05/01/2013 - 23:56 नवीन
फुंके -सिगरेट ओढणारे थुंके - गुटखा/ तंबाखू खाणारे शिंके- तपकीर ओढणारे भुंके - काहीच वापर न करता तंबाखू वापरणार्यानवर भुंकणारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भुंके - विशेष आवडले

बॅटमॅन
गुरुवार, 05/02/2013 - 02:28 नवीन
भुंके - विशेष आवडले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सरस !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/02/2013 - 11:49 नवीन
सरस !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/02/2013 - 03:34 नवीन
माझ्या हातून त्याचे नकळत शुद्धीकरण झाले :-(. त्यापासून बनणारे विशेषण - फुकाडा. (वा.उ. - तो लै फुकाडा गडी हाय).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

किती बरे झाले असते ना, जर

NiluMP
Sun, 04/28/2013 - 22:18 नवीन
किती बरे झाले असते ना, जर मनातल्या आठवणीही अश्याच काढून फेकणे सोपे असते तर.. ->हो ना
  • Log in or register to post comments

लेखनशैली अतिशय प्रभावशाली. लिहते झालात हे बघुन फारच छान वाटलं.

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 22:32 नवीन
हा लेख म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसात एसीची झुळुक आहे.
शेजारी माझी बायको आहे याचे भान होते मला.. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझी बायकोच असणार याची जाण होती तिला.. तरीही नजर अडकली होती.. अन सोबतीला निर्विकार चेहरा.
निव्वळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments

किनार्‍यावर उभे राहूनही

शुचि
Mon, 04/29/2013 - 06:18 नवीन
किनार्‍यावर उभे राहूनही लाटांशी खेळायचा आनंद लुटू शकते तेच खरे मन
हे खासच!!
  • Log in or register to post comments

होती ती एक हलकीशी चुटपूट..

इन्दुसुता
Mon, 04/29/2013 - 08:26 नवीन
होती ती एक हलकीशी चुटपूट.. नकळत हात खिश्यात गेला.. सवयीप्रमाणेच.. पाकीटातून सिगारेट काढून तोंडात सरकवली.. नेहमीप्रमाणेच.. ट्रेनमध्ये आहे याचा विसर पडून ती शिलगावणार इतक्यातच..........
कथेतिल नायकाला ( कथा तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला ) ही सिगरेट्ची सवय कधी जडली म्हणे ... तिला सिगरेट ओढताना पाहिल्यानंतर की आधीपासून? :D :D कृ. ह.घे. बाकी केवळ मुलगी सिगारेट ओढते म्हणून तिला कटाप करणे ( सोत्रिंचा शब्द्प्रयोग) काही पटले नाही बुवा!!!
  • Log in or register to post comments

लेखन

मन१
Mon, 04/29/2013 - 12:17 नवीन
लेखन आवडले. <काडी मोड ऑन> हल्लीच्या पोरी नाही त्या गोष्टीत बरोबरी करु पाहतात हेच खरे. करायचीच असेल तर तर कामात करा ना म्हणाव. हापिसात येउन नाही त्या गप्पा, नट्टापट्टा अन् अशा सिग्रेटी. काय हे. <काडी मोड ऑफ>
  • Log in or register to post comments

टाकली काडी???

शुचि
Tue, 04/30/2013 - 06:35 नवीन
टाकली काडी??? :-X
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

:)

मन१
Tue, 04/30/2013 - 18:05 नवीन
पण कै लांबलाच नै ना उपधागा :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हा ही लेख मस्तच...

रितुश्री
Mon, 04/29/2013 - 12:21 नवीन
हा ही लेख मस्तच...
  • Log in or register to post comments

मी पण रिलायंस मध्येच होतो

खबो जाप
Mon, 04/29/2013 - 12:22 नवीन
मी पण रिलायंस मध्येच होतो BHQ मध्ये, रोज जेवणानंतर अगदी जीन्स पासून पंजाबी ड्रेस घातलेल्या मुलीना / स्त्रियांना सिगारेट ओढत BHQ च्या समोरच्या पायऱ्यांवर बसलेले बघितले आहे, त्यात काय गैर आहे सिगारेट ओढणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त मी स्वतः ओढत नाही आणि कुणी सुटते पैसे नसतील आणि सिगारेट साठी पैसे मागितले तर मी देवू शकत नाही म्हणून सागतो बस्स ….
  • Log in or register to post comments

सिगरेट पिताना काही मुली

अप्पा जोगळेकर
Mon, 04/29/2013 - 12:47 नवीन
सिगरेट पिताना काही मुली अत्यंत मोहक आणि स्टायलिश दिसतात असे वैयक्तिक मत. चांगला चान्स सोडलात.
  • Log in or register to post comments

सिगरेटच्या जाहीरातींचे ग्लॅमर

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 18:30 नवीन
सिगरेटच्या जाहीरातींचे ग्लॅमर त्याला कारणीभूत असावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

मलातर सिग्रेट पिणार्या मुली

टवाळ कार्टा
Mon, 04/29/2013 - 20:49 नवीन
मलातर सिग्रेट पिणार्या मुली जाम आवडतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

+१ मला सुध्दा.

अग्निकोल्हा
Mon, 04/29/2013 - 21:42 नवीन
सिगारेट ओढणार्‍या काही मुलि खरोखर सिडक्टीव वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बरोबर

इरसाल
Tue, 04/30/2013 - 09:54 नवीन
पण त्यांच्या बरोबर ओष्ठ्संपर्क करायला गेलो तर आधी कडवट गंध मग कडवट चव येते. आणी माझ्यासारख्या सिगारेट न ओढणार्‍यासाठी ते ईईईईई असे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मी असेच काहीसे लिहिणार होतो.

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 04/30/2013 - 10:47 नवीन
मी असेच काहीसे लिहिणार होतो. पण सिगारेट ओढणाऱ्या मुलीशी आजवर ओष्ठ्संपर्क न झाल्याने केवळ अंदाज करू शकलो असतो. बरे झाले तुम्ही लिहून टाकले ;-) (धुम्रगंधरसविरहितओष्ठ्संपर्कातूर) विमे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

"गुडन गरम"

नन्दादीप
Tue, 04/30/2013 - 11:26 नवीन
"गुडन गरम" नावाचा एक सिगारेटचा प्रकार असतो... ती सिगारेट ओढून ओठांवरून जीभ फिरवली की साखरेसारख गोड गोड लागत म्हणे....... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

प्रॉब्लेम "गुडन गरम" न

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/01/2013 - 00:54 नवीन
प्रॉब्लेम "गुडन गरम" न मिळण्याचा नसून ओठ* न मिळण्याचा आहे. * इथे "गरम गुडिया" अशी तद्दन भिकार कोटी करण्याची इच्छा आवरून धरली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

धुम्रगंधरसविरहितओष्ठ्संपर्कात

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 11:29 नवीन
धुम्रगंधरसविरहितओष्ठ्संपर्कातूर
आम्हीही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

फोटो जालावरुन साभार

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 05/04/2013 - 15:21 नवीन
Image removed. फोटो जालावरुन साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ओष्ठ्संपर्क

तुषार काळभोर
Tue, 04/30/2013 - 10:52 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

हॅहॅहा... :D

अग्निकोल्हा
Tue, 04/30/2013 - 11:07 नवीन
मग तुम्ही सुध्दा सिगारेट ओढायला लागा. अवांतरः- मला आइस्क्रिम खाणार्‍या काहि मुलिसुध्दा सिडक्टिव्ह वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अथवा सिगारेट ओढणार्‍या मुलिबाबत

अग्निकोल्हा
Tue, 04/30/2013 - 11:19 नवीन
टर्नऑन होण्याचे टाळा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सिगरेट पिताना काही मुली

तुमचा अभिषेक
Tue, 04/30/2013 - 17:48 नवीन
सिगरेट पिताना काही मुली अत्यंत मोहक आणि स्टायलिश दिसतात असे वैयक्तिक मत. चांगला चान्स सोडलात.
सिगारेट पिताना मुले सुद्धा स्मार्ट अन डॅशिंग दिसतात..... या अन अश्याच विचारांच्या आहारी जाऊन पाकिटावर कर्करोगाने मराल असे लिहिले असूनही पोरं पितातच.. असो, हा वेगळा विषय झाला.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अरे वा.........एक

rupali5678@yahoo.com
Mon, 04/29/2013 - 13:51 नवीन
अरे वा.........एक अविस्मर्निय असा अनुभव येतो...........
  • Log in or register to post comments

भावना पोचल्या

कालिन्दि मुधोळ्कर
Mon, 04/29/2013 - 21:06 नवीन
आमच्या ऑफिसात तळ्घरामधे एक बार होता व वरच्या मजल्यावर चहाचे दुकान. एकदा नेहमीप्रमाणे दुपारी बार मधे गेलेले असताना एक मुलगा आला. मग रोजच बार मधे आमची द्रुष्टाद्रुष्ट होत असे. एकदा अचानक कामानिमित्त वरच्या मजल्यावर जाणे झाले. तर तिथे हा मित्रांबरोबर चहा पित होता. त्याने नजर चुकवली. बस्स. तिच शेवट्ची नजरानजर हो...
  • Log in or register to post comments

एक मुलगा चहा पितो ह्या

प्यारे१
Mon, 04/29/2013 - 21:33 नवीन
एक मुलगा चहा पितो ह्या मुद्द्यावर .... अरेरे! एकदा त्याच्याबरोबर प्यायचा चहा. व्यसन कसं लागलं विचारायचं. हळूहळू सांगायचं ना चहा नको पिऊ म्हणून. थोड्या दिवसांनी आपसुकच फक्त बार मध्येच भेटला असता. 'प्या पण प्रेमानं' हा संदेश द्यायला हवा होता. मूळ लेखाबद्दल सुद्धा थोडं हेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर

छान लिहिलय. आवडलं.

श्रिया
Mon, 04/29/2013 - 22:21 नवीन
छान लिहिलय. आवडलं.
  • Log in or register to post comments

सिगरेट ओढणारी मुलगी कशी काय

बॅटमॅन
Mon, 04/29/2013 - 23:00 नवीन
सिगरेट ओढणारी मुलगी कशी काय दिसली नाही म्हंटो मी. सिगरेट पिणार्‍याच मुली दिसतात बॉ आजकाल :(
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा