भाषा आणि प्रमाण
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं?
'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई. किती तरी काळ पद्य हाच साहित्याविष्कार होता.
मराठीला गद्य स्वरूप आणि तेही ग्रंथबध्द, असं स्वरूप दिलं ते महानुभावपंथानं. अमरावतीच्या रिध्दपूर नावाच्या खेड्यातून हा मराठी साहित्याचा प्रवास सुरू झाला. आज तो एवढा फोफावला आहे की, मराठी का शिकावं तर मराठी साहित्य वाचण्यासाठी असं सुद्धा म्हणू शकतो, (भा. नेमाडे याच्याशी असहमत असतील कदाचित, अजानुकर्णा !) पण हे खरं आहे की मराठीत अतिशय उत्तम साहित्य निर्मिती झाली आहे. होते आहे.
मराठी सामान्य लोकांची भाषा आहे. तिचं खरं रूप मर्हाटी असं आहे. सातवाहन,राष्ट्रकुट, यादव, वाकाटाक, त्यानंतर मुघल आदी राजवटींत तिचा प्रवाह चालत राहिला आहे. सामान्य जनतेइतका तिचा वाली कुणीच नव्हता. अनेकानेक भाषेसोबत तिचा संकर झालेला आहे. कित्येक भाषेतील शब्द अगदी बेमालूमपणे मराठीत सामील झालेले आहेत.या 'बे' ला जाड करण्याचे कारण असे की असा समोर 'बे', 'बद' लावण्याचा प्रघात मराठी नाहीये हे लक्षात यावं.
पुढे मराठी राजवट आली, छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की स्वराज्य सामान्य माणसाचं आहे . राज्य कारभार त्याच भाषेत व्हायला हवा. सामान्य माणसाला समजायला हवं की कारभार कसा होतो. खरोखर जाणता राजा. त्यावेळी एक राजभाषा कोश तयार करण्यात आला. मराठीला बोलीतून भाषेत आणि त्यातही सरकारी कामकाजाच्या भाषेत नेण्याचा हा सर्वात प्रभावी उपाय होता. कित्येक शतकानंतर भारतात कुठल्या स्वतंत्र छत्रपतीची राजमुद्रा फारसीत नसून संस्कृतात उमटली होती. हे सर्व करण्या मागचा उद्देश काय असेल हो? लोकांना नवी भाषा शिकवणं की लोकांना कुठल्याही मंचावर आपल्याच बोलीत व्यक्त होण्याचा आत्मविश्वास देणं? यावर थोडा विचार करू व नंतर पुढे जाऊया.
मराठे, पेशवाई खरं तर पेशवाईचा पुर्वाध आणि उत्तरार्ध असं म्हणायला हवं. पेशवाईत बखरी लिहिल्या गेल्या, आपल्या स्वामींचा पराक्रम गाण्यासोबतच आता अतिरंजित लिहिणं सुरू झालं होतं असो, पण मराठी लिहिणं सुरू झालं होतं. पुढे पेशवाई बुडली. महाराष्ट्रात इंग्रजी राज्य सुरू झालं. हे नेमकं कधी झालं असावं?
बरं मला आणि एक प्रश्न पडतो की महाराष्ट्रात इंग्रजी राज्य सुरू झालं म्हणजे कधी? १८५३ ला जेव्हा वर्हाड प्रांत निजामापासून काढून इंग्रजांनी कायम आपल्या कारभारात सामील केला तेव्हा? की मुंबईला जेव्हा इंग्रजांनी आपला कारभार सुरू केला तेव्हा? वसईचा तह झाला तेव्हा ? की पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला तेव्हा?
तर याचं उत्तर असं देता येईल की सार्वभौम मराठी सत्ता १८१८ मध्ये संपली, त्यानंतर उरला तो मांडलिकांचा कारभार, संस्थानं,जी खालसा झाली ती परत मिळवण्यासाठी लढली. जी खालसा झाली नाहीत ती आहे त्यात सुख मानायला लागली.
या टप्प्यानंतर आता पर्यंत मराठीला किंवा एकूण भाषेलाच कामात येणारं असं स्वरूप होतं. भाषेतून गद्याविष्कार अजूनही तेवढा पचनी पडलेला नव्हता. पेशवाई गेल्यानंतर जे राजकारणी होते किंवा ज्यांना सत्ता केंद्रात राहायची सवय पडली होती असे, किंवा त्याही पेक्षा अचूक वाक्य असे की ज्यांना येत्या काळाची पावले ओळखता येत होती अश्यांनी ताबडतोब इंग्रजीची कास धरली. इंग्रजी वाचन सुरू झालं .
अचानक नव्या जगाची ओळख झाली. हे... हे... सारं आमच्या भाषेत यायला हवं... आमच्या लोकांना कळायला हवं. ही कळकळ वाटायला लागली. १८३२ ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं नावही सुंदर होतं 'दर्पन'.
यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. ज्याही पुढार्याला , समाजसुधारकाला आवश्यक वाटलं त्याने आपला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी वृत्तपत्र काढले. लोकांना समजावं, आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावा. त्यासाठी वृत्तपत्र काढलं. वाचक वर्ग कोण यावरून ठरायचं की भाषा कुठली असावी. 'केसरी' मराठीत होता तर 'मराठा' इंग्रजीत.
थोडं घाईत पुढे जाऊया, १९५६ ला भाषिक आधारावर राज्यनिर्मीती व्हावी असं म्हणून पोट्टी श्रीरामलु यांनी उपोषण सुरू केले. मागणी होती स्वतंत्र तेलगू भाषिक आंध्रप्रदेशाची. त्यांचा उपोषणात मृत्यू झाल्यावर आंदोलन पेटलं, अजिबात इच्छा नसताना नेहरूंनी या मागणीवर विचार करण्यासाठी 'फाजल अली आयोग' नेमला. त्यांनी काही भाषेंसाठी अनुकूल मत दिलं व त्यांची निर्मिती झाली. मराठीसाठी मात्र अशी काही योजना करण्यात आलेली नव्हती. मुंबई हे मराठी आणि गुजराती द्वैभाषिक राज्य कायम ठेवण्यात आलं होतं. म्हणजे मुंबई+कोंकण+प.महाराष्ट्र+गुजरात आदी मिळून मुंबई राज्य(इलाखा) होता. मग मराठी जनमानस पेटलं. संयुक्त महाराष्ट्र बनावा. त्यासाठी वर्हाड घ्यावा मध्य प्रदेशातून, मराठवाडा घ्यावा हैदराबादजवळून , खालून बेळगाव घ्यावे निपाणी - कारवार घ्यावे, मुंबई तर आपल्या हक्काची आहेच. आंदोलन पेटले आणि शेवटी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा निर्मिती वृत्तांत सुद्धा खूप छान आहे. 'कर्हेचं पाणी' वाचल्यास सविस्तर कळेल.
हा सगळा इतिहास कशासाठी? हे एवढं पल्हाड कशासाठी? तर मराठी ज्यांच्या साठी आधी पुण्याच्या एका पेठेत सुरू होऊन दुसर्या पेठेत संपायची आणि आज सुद्धा ज्यांचा महाराष्ट्र पुण्यात सुरू होऊन मुंबईत जाऊन संपतो त्यांना मराठी आणि महाराष्ट्राचं स्वरूप, व्याप्ती आणि थोडा इतिहास कळावा तरी.
अर्थात हा एवढासा लेख काय मराठी बद्दल सांगेल? पण काहींची उत्सुकता तर चावळल्या जाईल ना?
तर अशी ही जनसामान्यांच्या स्वाभाविक भावनाविष्कारातून बनलेली मराठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात बोलल्या जाते, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोल्हापूर, प. महाराष्ट्र आदी वेगवेगळ्या जागी बोलण्याची पद्धत , बोलण्याचा स्वर ( हेल) वेगवेगळा आहे. तुम्हाला त्या बोलीचा सराव नसेल तर बोलणे सोडा पण जे ऐकतो आहोत ते मराठीच आहे का असा प्रश्न पडावा. एवढं ते नवीन वाटू शकतो.
महाराष्ट्र व्हायच्या आधी एक ठीक होतं की आपण विखुरलेले होतो. आता मात्र आपण एकभाषक बांधव म्हणून लढा दिला होता. मराठी सारा एक आणि चांद्या पासून बांद्यांपर्यंतच्या घोषणा दिल्या होत्या , त्यामुळे सर्वांना मान्य असेल आणि लेखनाचा अर्थ सर्वांना कळावा या उद्देश्याने ह्या प्रमाण भाषेचा किंवा भाषेला प्रमाण देण्याचा प्रयत्न झाला आहे.
म्हणजे मराठीची एक बांधणी ठरवण्यात आली. सर्वांनी मिळून लिखाणात, साहित्यात, वर्तमानपत्रात तिच वापरावी असे ठरले. यामुळे लिखाणाची अर्थनिश्चिती कायम झाली. एक सारखं लिहिणं सुरू झालं.
अर्थात या प्रमाण भाषेत पुणेरी भाषेचा जास्त भरणा झाला. सुरुवातीला आणि आताही मराठी साहित्य निर्मितीचे केंद्र हे पुणे असायचे/ आहे. त्यामुळे येथे लिहिलेले प्रमाण मानले गेले आहे.
मराठीसाठी शुद्धलेखनाचे काही प्रमाणित नियम आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. त्या व्यतिरिक्त शासकीय मराठी हे प्रकरण तुम्ही आम्ही वापरतो त्या प्रमाण मराठीहून थोडेसे भिन्न आहे. मात्र हे शब्द प्रमाण आहेत आणि हे नाही असं काही प्रकरण नसावं.
मराठीला विरामचिन्हे एका इंग्रज अधिकार्याने दिले आहेत. ते ही बळजबरीने. सुरुवातीच्या काळात मराठी ग्रंथ हस्तलिखित असत. मराठी मुद्रणाला सुरुवात झाली ती ख्रिश्चन मिशनरी महाराष्ट्रात आल्या नंतर. त्यांनी बायबल मराठी आणण्याचा प्रयत्न केला. पहिला मराठी छाप हा असा तयार झाला. जागा श्रीरामपूर येथे ( हे कदाचित बंगाल मधील असावं असा अंदाज आहे.)
तर मराठीचं व्याकरण सुद्धा असं संस्कृतवर आणि इंग्रजीवर आधारित आहे. अश्या आपल्या मायबोलीचे आपण शुद्धलेखनाचे नियम ठरवलेले आहेत. कोल्हापूर कसे लिहावे व कोल्हापुरास कसे लिहावे? तत्सम आणि देशी शब्द कसे लिहावे , मि नको तर मी हवा आदी..
हे सगळं करण्यामागची भूमिका फार छान होती की आम्ही सगळे एक तर आमचा आविष्कार सुद्धा जवळपास सारखाच असेल ना? मग एकाचं लिखाण वाचताना त्याच्या मनातील भाव-भावना , विचार जसेच्या तसे वाचणार्या पर्यंत पोहोचाला हवेत. लिखित मसुद्याचे अनेक अर्थ निघायला नकोत , गोंधळ व्हायला नको हीच या प्रमाणीकरणामागे मूळ प्रेरणा. सर्वांनी हे प्रमाणीकरण मान्य करण्यामागे सुद्धा हाच तर्क.
लेखन सहज व्हावं आणि इतरांना समजावं म्हणून तयार करण्यात आलेलं हे प्रमाणीकरण मात्र आपण बोलतो त्या भाषेशी जास्त जुळतं असं काहींच्या लक्षात आलं. आणि झालं , गोंधळ सुरू झाला. मग पुढे आपल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान पाळणार्या लोकांचं आपली बोलीच कशी प्रमाण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने असाच समज पसरला की पुण्यात बोलली जाते तिच प्रमाण भाषा.
आमचे शालेय पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं आदी प्रमाणभाषेत काढण्यास सुरुवात झाली. लोकांना सांगण्यात आलं की 'ही' म्हणजे मराठी. आणि तुम्ही बोलता ती 'बोली'. हे इतपत ठीक होतं पण पुढे हे आणखीनंच वाढलं आणि 'ही' म्हणजे 'शुद्ध' मराठी आणि तुम्ही बोलता ती 'अशुद्ध मराठी' , हे अशुद्ध जरा जड जातंय असं म्हणताच मग भाषा आणि बोलींवर लिखाण झालं. प्रमाणित असते ती भाषा आणि भाषा ही शुद्ध असावी नियमांच्या चौकटीत असावी आदी अनेक पंडिती विचार विनिमय झाले.
हळूहळू आमच्यावर असं बिंबविण्यात आलं की विदर्भातील मराठी ना? अहो तिच्यावर हिंदीचा अंमळ जास्त प्रभाव आहे ! आणि मराठवाड्याचा हैदराबादशी जास्त संबंध म्हणून हैदराबादी उर्दूचा जास्त प्रभाव. खरी मराठी पुण्यातच आणि त्यातही मी राहतो त्या पेठेत बोलल्या जाते.
हे जरा जास्तच होतंय असं नाही वाटत? आधी आमच्या भाषेला बोली म्हणायचं नंतर तिला कसं नियमांचं अधिष्ठान नाही हे सांगायचं, आणि शेवटी तर ती अशुद्ध आहे एवढं बोलण्या पर्यंत यांची मजल.
बरं आम्ही बोलतो ते अशुद्ध का? तर ते प्रमाण नाहीये. प्रमाणभाषेत 'असं' सांगितलंय आणि तुम्ही लिहीतांना 'तसं' लिहिता.
ठीक आहे, मी प्रमाण म्हणून ज्याला मान्यता आहे तसं नसेन बोलत कदाचित. पण मी अशुद्ध बोलतो हे कशावरून? मी मराठी बोलत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तर नाही ...तसं नाही.... अहो तुम्ही हे 'असं' बोललं पाहिजे ( आमच्या सारखं !) , तुमच्या बोलण्यात अनुनासिकं नसतात, किंवा त्यांचे उच्चार पुरेसे स्पष्ट नसतात. तुम्ही वेगळाच हेल काढता. हा आमचा जो हेल आहे ना 'तो' प्रमाण आहे. तुमचं तसं आणि आमचं असं. शेवटी तुमचं कार्टं आणि....
ही अशी सुरुवात होते एखाद्या चांगल्या गोष्टीचे वाभाडे काढण्याची. प्रमाण चांगलेच. मात्र प्रमाण हाच केवळ आविष्कार असावा ही सक्ती का? ही सक्ती जेव्हा अनेकानेक (वेगवेगळ्या) उद्देशांनी केली जाते तेव्हा त्याला विरोध होतो. काही वेळा हा विरोध आपली बोली वाचवण्याच्या हेतूने होते काही वेळा ही आपल्या आविष्काराला दुय्यम म्हटल्याने होतो. आमच्या साहित्य विश्वाला ह्या असल्या वादांची नवलाई नाही. हे आणि असे अनेक वाद मराठीत आहेत.
येथे इंटरनेटवर सध्या कुठे मराठी बर्या स्थितीत येतेये. जरा काही मराठीतून शोधायला लागलं तर हिंदी मिश्रीत का होईना काही निकाल येतात. चार पाच मराठी चर्चासत्रे आणि काही स्थिर संकेतस्थळं अशी सध्या मराठी माणसांची 'मराठी' मिळकत. लाखोच्या संखेत मराठी लोक इंटरनेटवर आहेत. इंग्रजीत प्रवीण असल्यामुळे मराठीमुळे त्यांचं काही अडत नाही. मात्र आतलं मराठीपण त्यांना आपल्या भाषेकडे, आपल्या बोलीकडे खेचून आणतं. अश्या स्थितीत कुणाला जर का इंटरनेटवर लिहिल्या गेलेलं सगळं प्रमाण मराठीत हवं असेल तर त्याने आधी त्या विषयी लिहावं. प्रमाण का ? हे सांगावं. आणि कुणी जर का चुकीचं लिहीत असेल तर त्याला प्रमाणभाषेत लिहिणे आवश्यक का आहे ते समजावून सांगावे. त्याला पटलं तर तो ते करेन. नाही पटलं तर नाही. कृपया सांगताना प्रमाण भाषेबद्दल सांगा, शहरात किंवा पुण्यात असं बोलतात म्हणून तुम्ही असं बोला असं नका म्हणू. ते दिवस आता गेले.
प्रमाण हे सर्वांचं आहे. सर्वांसाठी आहे हे लक्षात घेऊया.
इंटरनेटवर प्रत्येकजण जे लिहितो तो त्याचा आविष्कार आहे असं समजून त्याला मान देऊया.
तुम्हाला असं वाटतं की त्यांनी प्रमाणभाषेत लिहावं यामुळे भाषेचा फायदा होईल आणि हीच माझी भाषासेवा, तर समोर या, त्यांना पटवून द्या.
उगाच याआधी कुणी खूप अट्टहासाने माझ्या मराठीला विरोध केला म्हणून आता मी मुद्दामहून अप्रमाण मराठी लिहीन असा हेका सुद्धा योग्य नाही. (मी असं न वागण्याची काळजी घेतो.)
प्रमाणभाषेबद्दल ती लादण्या इतपत अट्टहास सुद्धा नसावा व ती नकोच म्हणण्याचा दुराग्रह सुद्धा नसावा. हे माझं मत.
पण येथे महाजालावर ज्याला जे आवडते ते करण्याचं स्वातंत्र्य आहे.
मिसळपावची सुरुवातच मोकळ्या - ढाकळ्या स्वरूपाचं संकेतस्थळ असावं, जेथे अनावश्यक त्रास न होता. जे मनात आहे ते पानावर टंकता यावं असं संकेतस्थळ असावं या प्रेरणेने झाली आहे.
येथे कुणी प्रमाणभाषेचा अट्टहास करून सदस्यांना रोकटोक करू नये ही व्यवस्थापनाची भूमिका असावी असं मला वाटतं.
अन्यथा प्रमाणाला विरोध करण्याचे कारण नाही. प्रमाण लादण्याला विरोध मात्र असावाच.
------------------------------------------------------------------------------
(टीप एका बैठकीत लेख लिहिलेला असल्याने काही संदर्भ अपुरे आहेत याचे भान आहे. त्याबद्दल क्षमस्व)
नीलकांत
वाचने
18529
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
झकास!
सहमत...
In reply to सहमत... by भडकमकर मास्तर
सहमत.....
कौतुक आहे
भाषा आणि प्रमाण-
न्हाय महाराजा, होय महाराजा
In reply to न्हाय महाराजा, होय महाराजा by ॐकार
सर्वोत्तम सोदाहरण प्रतिसाद
In reply to न्हाय महाराजा, होय महाराजा by ॐकार
लाख बोललास रे ॐकारा!
In reply to न्हाय महाराजा, होय महाराजा by ॐकार
प्रमाण मर्हाटी म्हणजे ती पुन्या ३० मदे बोल्ली जाते ती त नव्हं?
नीलकांतजी,
नवीन माहिती.
नामदेव ढसाळ
प्रमाणाला
मिपा व्यवस्थापनाची भूमिका..
अंशत: सहमत
In reply to अंशत: सहमत by चित्रा
कार-भार
In reply to कार-भार by ॐकार
स्पर्धक - स्पर्धिका
यक नंबर
In reply to यक नंबर by मनस्वी
ह्येच म्हंतू
In reply to ह्येच म्हंतू by इनोबा म्हणे
... तर भाषाही गाळात जाते हो
लई भारी
संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता व्यवस्थित प्रकटली आहे
In reply to संकेतस्थळ सांभाळतांना येत जाणारी प्रगल्भता व्यवस्थित प्रकटली आहे by नरेंद्र गोळे
ते दर्पण आहे.
In reply to ते दर्पण आहे. by नीलकांत
अवांतर
मस्त लेख !!
चेंगट्पना न कर्ता हा लेख वर
फारा दिवसांनी वाचले हे.
एक प्रश्नः- हा लेख "नाना
In reply to एक प्रश्नः- हा लेख "नाना by मृगनयनी
अहो, हेतुरहित कर्म करा असं ते
In reply to अहो, हेतुरहित कर्म करा असं ते by बिपिन कार्यकर्ते
पूर्ण नाव घ्या
In reply to पूर्ण नाव घ्या by सुनील
अरे वा वा!.. चान
In reply to अरे वा वा!.. चान by मृगनयनी
महाराश्ट्रातल्या....(
In reply to महाराश्ट्रातल्या....( by बॅटमॅन
आवरा हो मृगनैनीतै...लै झालं
In reply to आवरा हो मृगनैनीतै...लै झालं by मृगनयनी
हम्म्म्म्म्म्म्म्म्म.......हे
In reply to अहो, हेतुरहित कर्म करा असं ते by बिपिन कार्यकर्ते
(No subject)
In reply to एक प्रश्नः- हा लेख "नाना by मृगनयनी
एक प्रश्नः- हा लेख "नाना