आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.
'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे.
या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
एवढे परखड आणि वस्तुनिष्ठ विचार वाचल्यावर मी खरे सांगायचे तर एकदम थक्क झालो. कुठे हे कुरुंदकरांचे २० व्या शतकातले वस्तुनिष्ठ विचार? आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर? असो.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. पैकी पहिली अत्भुत घटना ते अफझलखानाचा वध ही मानतात. तर या पहिल्या अत्भुत घटनेआधीची २९ वर्षे ही नाट्यशून्यतेची होती हेही ते परखडपणे दाखवून देतात. शिवाय "छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे" अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.
"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही" असे सांगताना कुरुंदकर पुढे ते सप्रमाणही वाचकाला समजावून देखील देतात. आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
वतनदारांविरुद्धचा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खूप कठीण लढा होता. कारण हे वतनदार म्हणजे नुसते त्यांच्याच धर्माची माणसे नव्हती तर नातेवाईक, सगे-सोयरसंबंधातील माणसे होती. प्रश्न दोन : उत्तर एक या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात "शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे"
शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात - "परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"
एक अनोखी घटना या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात - "औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजीसारखा असामान्य नेता दिवंगत झालेला होता. ......"
जदुनाथ सरकारांचा दाखलाही कुरुंदकर देतात की "औरंगजेब लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता!" "साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी आहे"
पान क्र. २२ वर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना युवावस्थेत राज्यनिर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिजामातेने रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या असतील. विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत ऐकली असेल. दादोजी कोंडदेवांचे शासनचातुर्य पाहिले असेल. ज्ञानेश्वर-नामदेव साधुसंतांपासून प्रेरणा घेतली असेल. असे अनेक तर्क आहेत."पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्यापैकी एकालाच प्रेरणा का मिळते, इतरांना का मिळत नाही, याचे समाधानकारक उत्तर कोण, कसे देणार?" असा तर्कशुद्ध प्रश्नही कुरुंदकर उपस्थित करतात.
अफझलखान वधाचा वेध घेताना अफझल खान हा वाईचा सुभेदार होता तेव्हा शिवाजीचा नायनाट हे सुभ्याचा सुभेदार या नात्याने अफझलखानानेच करणे अपेक्षित होते. त्यासाठी आदिलशाही दरबारात शिवाजीचा नाश करण्याचा त्याने विडा उचलण्याची गरज नव्हती व ही केवळ कपोलकल्पित भाकडकथा आहे हेही कुरुंदकर वस्तुनिष्ठतेने निदर्शनास आणून देतात.
त्यानंतर सिद्दी जोहरचा वेढा , शाहिस्तेखानाला अचानक लाल महालात घुसून अचंभित करणे, औरंगजेबाच्या कैदेत असताना दिल्लीहून पलायन या घटनांतून शिवाजी महाराज हे केवळ धाडसीच नव्हते तर कल्पक देखील होते याकडेही कुरुंदकर लक्ष वेधतात. शत्रूच्या नेमक्या वर्मावर घाव कसा घालावा हे शिवाजी महाराजांना अवगत होते.
छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात - " २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे"
गडांची डागडुजी व उभारणी याचबरोबर आरमाराकडे लक्ष हाही शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन कुरुंदकर दाखवतात. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांना धडकी भरवली होती. पुढील काळात मराठ्यांनी या आरमाराचा वापर केला असता तर कदाचित इंग्रज देशावर राज्यकर्ता झाला नसता. पुढे खुद्द नानासाहेब पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावल्याचेही कुरुंदकर मोठ्या व्यथित मनाने लिहिताना दिसतात.
जनतेचे प्रेम शिवाजी महाराजांनी कसे मिळवले? याच्या मुख्य कारणांचा परामर्श घेताना कुरुंदकर म्हणतात - "शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे" याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य शिवाजीने निर्माण केले, हाही उल्लेख महत्त्वाचा आहे.
सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. मी करुन देत असलेल्या पुस्तकाच्या परिचयाचा नव्हे. तेव्हा एवढे एवढे सोडले तर बाकीच्या पुस्तकात कुरुंदकरांनी जे विवेचन केले आहे ते खरेच अफलातून आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी गरीब रयतेला वतनदारांच्या जाचातून मुक्त केले यातच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य सामावले आहे असे वाचकाच्या लक्षात आणून देण्यास कुरुंदकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनी केवळ छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची अंमलबजावणी केली तर ते कृत्य खरे शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारे ठरेल.
नरहर कुरुंदकर यांचे हे छोटेसे पुस्तक वाचनीय तर आहेच पण छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्या प्रत्येक मराठी घरात असावेच असे आहे. शिवाय ऐतिहासिक संदर्भासाठीदेखील हे छोटेसे पुस्तक खूप मोठे काम करते.
नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य हे पुस्तक मी घेतले आहे. तुम्ही घेणार का? :)
एक्झॅटली मला हेच म्हणायचे आहे मित्रा . :)
अशा गोष्टी नंतर होण्याच्या शक्यता निर्माण होण्यापूर्वीच टाळता आल्या तर ते जास्त योग्य नाही का?
बाकी स्मारके कितीका उभारेनात , तो छत्रपतिंचा गौरवच असेन
चेतनराव , "देव्हार्यात बसवणे " चा शब्दशः अर्थ नका घेवू. सावरकरांच्या विचाराचे आचरण करण्या ऐवजी ( जाती भेद निर्मूलन , कर्मकांड विरहित हिंदुत्व ) त्यांच्या नावाचा जप करण्यात काही "जाती" धन्यता मानतात. तसेच महराजांच्या (रयतेचा राजा , सुभेदारी नष्ट करणे, हिंदवी स्वराज्य ) तत्व सोडून "हिणकस" राजकारण करण्यात त्यांचे तथाकथित अनुयायी धन्यता मानतात. एवढेच मला म्हणायचे होते.
लिंक दिल्या बद्दल आभार..
पण हे संग्रहालय सारखे असून ह्यात शिवाजी महाराजांची काही आरती वगैरे गायली जाणार नाही आहे...
"माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."
काही कळले नाही बुवा ..हि सक्ती फक्त हिंदू धर्म बद्दलच का बरे???
आणि समर्थान बद्दल आणि दादोजीन बद्दल काय लिवले आहे व कशाच्या आधारावर ह्या महाशयांनी ते कळले तर बरे होईल...
चेतन महोदय,
"माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."काही कळले नाही बुवा ..हि सक्ती फक्त हिंदू धर्म बद्दलच का बरे???
हे कुरुंदकरांचे विचार आहेत हे लक्षात घ्यावे. ते पटत नसतील तर त्यावर बोलायला मी असमर्थ आहे. कारण कुरुंदकर हयात नाहियेत आणि मी तेवढ्या अधिकाराने (माझी बाजू मांडू शकेल पण) कुरुंदकरांची बाजू मांडू शकणार नाही. :)
कृपया पुस्तकाच्या महत्त्वाच्या भागाकडे लक्ष द्यावे, दिशा भटकवू नये ही विनंती. मी फक्त पुस्तकाचा परिचय लिहिला आहे पुस्तक नाही. वादग्रस्त मुद्द्यांचा उल्लेख मी अगोदरच परिचयात केला आहे आणि तो संशोधनाचा भाग आहे हेही स्पष्ट केले आहे.
धन्यवाद
सागर'जी..
आपण सोनवणी यान्ची एक लिन्क दिलेली आहे, त्यामध्ये.. "ज्ञानेश्वर, चक्रधर(स्वामी), एकनाथ इ सन्तांबद्दल बहुजनांना आदरच आहे, मग ते फक्त रामदासस्वामींचाच का तिरस्कार करतात, असे दिलेले आहे..
किन्वा सोन्वणींच्या म्हणण्याप्रमाणे ""सगळ्या ब्राह्मणांचा तिरस्कारच बहुजनांना करायचा असता.. तर ज्ञानेश्वर, एकनाथ इ. ब्राह्मण सन्तांचाही केला असता.. पण बहुजन लोक या २-४ ब्राह्मणी सन्ताना मानतात.. आणि शिवाजी आणि रामदास यान्चा काहीही सम्बन्ध नसताना तो ब्राह्मणी षड्यन्त्रातून जोडला गेल्याने आणि "सत्य"काय आहे हे सगळ्या बहुजनांना माहित असल्याने ते फक्त समर्थ रामदासन्नाच नावे ठेवतात..."" इ. इ. इ.
----- या सगळ्यावर इतकेच सान्गावेसे वाटते,की मुळात ज्ञानेश्वर, एकनाथ, चक्रधरस्वामी यांचा शिवाजीमहाराजांसारख्या इतर कोणत्या थोर क्षत्रिय स्वराज्यसन्स्थापकाबरोबर कधी सम्बन्ध आलेला नव्हता. तसेच "शिवाजी महाराज" या नावावरूनच राजकारण खेळण्याची परम्परा महाराष्ट्रात अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. त्यातूनच "जातीयवाद" निर्माण झाल्याचे तर सगळेच मान्य करतात. रामदास स्वामी, तुकाराम'जी हे शिवाजींच्या काळातलेच सन्त होते.
यापैकी रामदास स्वामी- ब्राह्मण तर तुकाराम'जी हे जातीने वाणी होते. त्यामुळे रामदास स्वामी किन्वा दादोजी कोन्डदेवांसारख्या ब्राह्मण लोकांना जर शिवरायांचे गुरु म्हनून मान्य केले, तर समाजातील ब्राह्मणजातीला महत्व किन्वा मोठेपणा दिल्यासारखे होईल... ही भीती मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्र या सगळ्यांच्याच मनात होती... अर्थात अजूनही आहे.... त्यामुळे साहजिकच रामदासांच्या आणि दादोजींच्या "गुरु-त्वा" ला नाकारले गेले../ जात आहे.
ज्ञानेश्वर, एकनाथ या सन्तांकडून किन्वा या सन्तांच्या इतिहासाकडून सीग्रेडी किन्वा नरके-सोनवणी कम्पूतल्या लोकान्ना काहीही फायदा तोटा, धोका नसल्याने साहजिकच या ब्राह्मणसन्तांना सहसा कुणी वाईट म्हणत नाही. किन्वा त्यान्चे अस्तित्वही नाकारत नाही!!
तसेच सगळ्याच बहुजन समाजाला रामदासांचा तिरस्कार आहे , असेही नाही..पुण्यश्लोक स्व. 'नानासाहेब धर्माधिकारी' यान्नी दासबोधाद्वारे तसेच रामदासांच्या शिकवणुकीप्रमणे अनेक बहुजनांचा उद्धर केला. साधारण २-३ वर्षांपूर्वी नानासाहेबांचे निधन झाले..पण आजही नानासाहेब आणि समर्थ रामदासांना मानणारे व दासबोधाच्या शिकवणुकीचे पालन करणारे असंख्य बहुजन आहेत. आणि ते समर्थ रामदासांनाच शिवाजींचे गुरु मानतात!!!
मृगनयनी,
मी व्यक्तीशः कोणताही भेद मानत नाही. सोनवणींनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांचे खंडन कोणीही पुराव्यांनिशी करत नाहिये हे मला जाणवले. त्यांची सर्व मते पुराव्यांनी खोडून काढली गेली तर प्रश्न आपोआपच मिटतो. पण असे कोणीही करत नाहिये , ही खेदाची गोष्ट आहे.
ब्राह्मण लोकांचा मी व्यक्तीशः अतिशय आदर करतो. कारण ज्ञानाची कवाडे बहुजनांसाठी त्यांनीच तर खुली केली ना?
लोकमान्य टिळक किंवा कुरुंदकरांसारखे अनेक समत्त्व मानणारे विद्वान बहुजनहिताय बहुजनसुखाय याचा पुरस्कार करताना दिसतात. त्यामुळे समता मानणार्या सर्वांचाच मी आदर करतो.
पण मृगनयनी तुला आश्चर्य वाटेल, काही विध्वंसक प्रवृत्ती (ज्ञाति नव्हे) खोट्या अभिमानाला अजूनही कुरवाळतात. व आम्ही सांगतो तेच खरे असा अट्टाहास धरतात. श्री. सोनवणी हे एक इतिहास संशोधक देखील आहेत. किंबहुना मी देखील त्यांच्याशी वाद घातला आहे. पण त्यांनी जे प्रश्न निर्माण केले, जे त्यांच्या लेखातही आहेत. त्यांची उत्तरे कोणी का देत नाही? हा प्रश्न मला सतावतो आहे. असो.
पण तू जे लिहिले आहेस ते सर्व सोनवणींच्या लेखाबद्दल आहे. त्याबद्दल मी अधिकाराने बोलू नाही शकणार.
बाकी तू जे रामदास स्वामींबद्दल लिहिले आहे त्याबद्दल आदर आहेच.
दासबोध मीही वाचला आहे.
मनाचे श्लोक तर अजूनही आवडीने कधी कधी मी म्हणत असतो :)
तू सविस्तर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आपण जो अभ्यासला तोच इतिहास खरा असे कोणी मानू नये व समोर येणारे नवे संशोधन पुराव्यांनिशी तपासून आपली मते ठरवावीत एवढेच माझे म्हणणे होते. बाकी ज्ञानेश्वर, रामदास पूजनीय आहेत व राहतील :)
अवांतरः मी तुझ्यासाठी सागरजी कधी झालो ? (की मी समजण्यात चूक करतो आहे ? :(
आपण जो अभ्यासला तोच इतिहास खरा असे कोणी मानू नये व समोर येणारे नवे संशोधन पुराव्यांनिशी तपासून आपली मते ठरवावीत ...
सहमत. त्या त्या काळची वैचारिक फॅशन आणि राजकीय सोय/ मतपेटीची समीकरणे लक्षात घेत नवे नवे संशोधन घडत रहावे. ('स्पॉन्सरशिप'चा प्रश्न त्याने आपोआप सुटतो). इतिहासाचे अव्याहतपणे पुनर्लेखन घडत रहावे. त्यानुसार यथायोग्य असे मूर्तिभन्जन आणि दैवीकरण घडत रहावे. यातूनच महाराष्ट्राचे आणि पर्यायाने भारताचेही उज्वल भविष्य घडेल अशी खात्री आहे.
तर्री यांना..
मला तर तुमच्याच प्रतिसादावरून जातीय वादाचा वास येतोय :)
"जाती" वर फार जोर दिलात तुम्ही...
अशी पुस्तके स्वस्तात ल्या स्वस्तात उपलब्ध करून व त्याचा प्रसार करून ब्राम्हण व मराठा ह्यात वाद निर्माण करणे हाच हेतू आहे असल्या लोकांचा...सावरकरांचे विचार हीच माणसे पायदळी तुडवीत आहेत... कारण ह्यानंच जातीचे राजकारण करून आपली वजने वाढवायची आहेत..आणि उलट्या बोंबा...
यापैकी रामदास स्वामी- ब्राह्मण तर तुकाराम'जी हे जातीने वाणी होते. त्यामुळे रामदास स्वामी किन्वा दादोजी कोन्डदेवांसारख्या ब्राह्मण लोकांना जर शिवरायांचे गुरु म्हनून मान्य केले, तर समाजातील ब्राह्मणजातीला महत्व किन्वा मोठेपणा दिल्यासारखे होईल... ही भीती मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्र या सगळ्यांच्याच मनात होती... अर्थात अजूनही आहे.... त्यामुळे साहजिकच रामदासांच्या आणि दादोजींच्या "गुरु-त्वा" ला नाकारले गेले../ जात आहे.
कृपया कुठल्याही जातीविषयी अशी थेट विधाने करताना, थोडे तारतम्य बाळगा. याच न्यायाने मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्र जातीय ही ब्राह्मणजातीला दोषी ठरवू शकतात.
एखाद्या व्यक्तीची अथवा एखाद्या व्यक्तीसमूहाची चूक ही संपूर्ण समाजाची/जातीची चूक समजली जाणार असेल तर याच न्यायाने ज्ञानेश्वर आणि तुकारामांना विरोध करणार्या ब्राह्मणजातीय व्यक्तींमूळे संपूर्ण ब्राह्मणजातीला ही दोष दिले जातील हे लक्षात असू द्या.
शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानण्यास विरोध करणारे ही ब्राह्मण त्यावेळी होते. याचा आधार घेऊन आज कोणा मराठा-क्षत्रिय, वाणी, शूद्रांनी ब्राह्मण शिवाजी विरोधी होते असे म्हटल्यास आपण ते मान्य कराल काय?
या जातीय भांडणात मला काही ही वैयक्तीक रस नाही. मिसळपावचे वातावरण असल्या विषयांवरुन बिघडू नये एवढीच इच्छा आहे.
इनोबा,
प्रतिसाद आवडला
एखाद्या व्यक्तीची अथवा एखाद्या व्यक्तीसमूहाची चूक ही संपूर्ण समाजाची/जातीची चूक समजली जाणार असेल तर याच न्यायाने ज्ञानेश्वर आणि तुकारामांना विरोध करणार्या ब्राह्मणजातीय व्यक्तींमूळे संपूर्ण ब्राह्मणजातीला ही दोष दिले जातील हे लक्षात असू द्या.
नेमके मला हेच म्हणायचे होते. प्रवृत्तींना जातीवाचक समजले जाऊ नये.
पुस्तक परिचयाबद्दल आभार. पुस्तकाची चांगली ओळख करुन दिली आहे.
पुस्तक मिळवून वाचून संग्रही ठेवेन. काही वादाच्या विषयांवर आम्हीही घातलेले वाद.
ब्राह्मण हा विषय आल्यावर काही लोक लैच मनाला लावून घेतात असे दिसते. असो, चालायचंच...!
-दिलीप बिरुटे
खूपच छान. ६० पानी पुस्तकात 'ते' उल्लेख शेवटच्या दोन पानात आणि सागर यांच्या ५० पेक्षा जास्त ओळींच्या लेखात त्या उल्लेखांचा उल्लेख एका ओळीत (म्हणजे २%). आणि ७०% पेक्षा जास्त चर्चा त्यावरच. चालू द्या.
१९८५ मध्ये मी दहावीला असताना मराठीच्या पुस्तकात नरहर कुरूंदकरांचा एक धडा होता. त्यात महाराजांच्या चरित्रातील नाट्यमय घटनांना टाळून त्यांचे खरे कर्तुत्व अभ्यासले पाहिजे, तसेच महाराज गेल्यानंतर २५ वर्षे महाराष्ट्रातील सामान्य जनता हातात शस्त्रे घेऊन शत्रूविरूध्द उभी राहिली आणि जे राज्य सामान्य जनतेला आपले वाटले पण वतनदारांना आपले का वाटले नाही या दोन प्रश्नांचे उत्तर एकच आहे अशा स्वरूपाचे मत त्यात कुरूंदकरांनी मांडले होते असे आठवते.
छान लेखाबद्दल सागर यांना धन्यवाद आणि त्या गोष्टीपेक्षा जास्त चर्चा लेखातील इतर कन्टेन्टवर असती तर चांगले झाले असते असे वाटते. वेळ मिळेल त्याप्रमाणे मी पण या चर्चेत सहभागी होणार हे नक्की.
(महाराजांचा मोठा पंखा)
माझी सर्व वाचकांना व धागाकर्त्याला विनंती आहे की बाकी सर्व वाद राहू द्यात, आधी ह्याचा विचार करा की सध्याच्या 'वतनदारांपासून' आपली सुटका करणारा आहे का कोणी या देशांत ? नसला तर तसा होण्याचा कोणीतरी प्रयत्न करणे जरुरी आहे. कारण तरच पुढील पिढीला काही भवितव्य राहील.
हे पुस्तक मी वाचले आहे..जुने पुस्तक आहे परंतु त्याची माहिती करून देण्याचे काम आपण केले आहे.अतिशय तपशिलवार पुस्तकाची मांड्णी आहे .कुरुंदकरांनी शेवटी एका पानामध्ये महाराजांविषयी सारांश दिला आहे तो अप्रतिम आहे.
प्रतिक्रिया
येच मेरा पॉईंट हय...
सबूर .
+१ सहमत आहे
लिंक दिल्या बद्दल आभार.. पण
चेतन महोदय, "माणसाचा देव ज्या
सागर'जी.. आपण सोनवणी यान्ची
मृगनयनी,मी व्यक्तीशः कोणताही
हम्म
तर्री यांना.. मला तर तुमच्याच
यापैकी रामदास स्वामी-
प्रतिसाद आवडला
वूडहाऊस
सागर धन्स.
पुस्तक परिचय आवडला
पुस्तक परिचय आवडला.
ते राहू द्या
सहमत आहे.
मी वाचले आहे..
Pagination