अल्बर्ट स्पिअर - सैतानाचा वास्तुविशारद. भाग - ५

अल्बर्ट स्पिअर - भाग १
अल्बर्ट स्पिअर - भाग २
अल्बर्ट स्पिअर - भाग ३
अल्बर्ट स्पिअर - भाग ४
बर्याचवेळा अल्बर्ट स्पिअर जनरल फ्रॉमबरोबर दुपारी जेवायला जायचा. अर्थात त्यावेळी या युद्धाशिवाय कुठल्या विषयावर गप्पा मारणार ते ? ( याच जनरल फ्रॉमला न्युरेंबर्गच्या खटल्यात फाशी देण्यात आली).
ज. फ्रॉम.
१९४२ च्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अशाच एका दुपारी जेवताना जनरल फ्रॉम म्हणाला
“अल्बर्ट, हे युद्ध आपल्याला जिंकायचे असल्यास मला वाटते आता एकच मार्ग उरला आहे. पारंपारिक शस्त्रास्त्रांनी हे युद्ध आता जिंकणे अशक्यच आहे. असे शस्त्र तयार केले पाहिजे की त्याने फार म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर विध्वंस होईल. माझे एका शास्त्रज्ञांच्या गटाशी बोलणे झाले आहे आणि त्यांच्या मते ते असे एक संशोधन करताएत ज्यायोगे आख्खे शहरच्या शहर नष्ट होऊ शकेल. त्यातील एक जण तर म्हणाला, आख्खे ब्रिटन त्याने नष्ट होऊ शकेल. खरे का खोटे हे माहीत नाही, पण आपण त्यांना एकदा भेट द्यायला काय हरकत आहे ?”
याच सुमारास, जर्मनीमधील सगळ्यात मोठ्या लोहाच्या कारखान्याचा मालक, डॉ. व्हॉलर यानेही अल्बर्ट स्पिअरच्या कानावर, अणू संशोधनाची अक्षम्य हेळसांड चालली आहे हे घातले होते. त्याने अशीही तक्रार केली होती की मुलभूत संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यासाठी निधीही उपलब्ध केला जात नाही. त्यावेळी युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे सहज शक्य होते. ६ मे १९४२ रोजी अल्बर्ट स्पिअरने हिटलरची गाठ घेऊन हे सगळे त्याच्या कानावर घातले आणि या संशोधनाचे महत्व त्याला पटवून दिले. त्याने अशीही सूचना केली की एक राइश रिसर्च काउन्सिल स्थापन करून त्याच्या प्रमुखपदी राईश मार्शल गोअरींगला नेमावे. ही सूचना मानण्यात येऊन तसे करण्यातही आले. त्याच सुमारास तीनही दलाचे प्रतिनिधी, मिल्च, फ्रॉम, विटजेल यांनी काही शास्त्रज्ञांना घेऊन अल्बर्ट स्पिअरबरोबर बैठक घेतली. विषय होता अर्थातच अणू संशोधन. या शास्त्रज्ञांमधे होते दोन नोबेलप्राईझ विजेते – डॉ. हाईझेनबर्ग आणि डॉ. हान. अणू विभाजन आणि सायक्लोट्रॉनबद्दल डॉ. हाईझेनबर्ग यांनी माहिती दिल्यावर त्यांनी सरकारवर त्यांच्या या विषयाकडे झालेल्या दुर्लक्षासाठी अत्यंत कडवट टीका केली. यावेळी अर्थातच अमेरिका या विषयात किती पुढे आहे यावर ही चर्चा करण्यात आली.
ही बैठक संपल्यावर अल्बर्ट स्पिअरने डॉ. हाईझेनबर्ग यांना स्पष्टच अणूबॉंब तयार करता येईल का ते विचारले. त्यांनी उत्तर दिले की ते शक्य आहे पण त्याला खूप वेळ लागेल. कितीही पैसे ओतले तरीही कमीतकमी दोन तरी वर्षे लागणार होती. एवढेच नाही तर त्यात अजून एक मुख्य अडचण होती ती म्हणजे त्याकाळी युरोपमधे एकच छोटा सायक्लोट्रॉन होता आणि तो होता पॅरिसमधे. सुरक्षेच्या व गोपनीयतेच्या कारणामुळे तो वापरता येणे शक्यच नव्हते. अल्बर्ट स्पिअरने अमेरिकेकडे असणार्या सायक्लोट्रॉनपेक्षा मोठा सायक्लोट्रॉन बांधण्याची तयारी दर्शविली पण तेवढे अधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे असे एकदम करता येणार नाही असे उत्तर डॉ. हाईझेनबर्गने दिले आणि तेही बरोबरच होते. या बैठकीचा फायदा असा झाला की त्या संशोधनाला सुरवात तर झाली आणि त्यांना लागेल ती मदत कबूल करण्यात आली.
अल्बर्ट स्पिअरला हिटलरला अपारंपारिक गोष्टी करण्याचा छंद होता हे माहीत असल्यामुळे त्याने त्याची मदत होईल या आशेने त्याला भेटून या सर्व योजनेची कल्पना दिली. त्याच काळात एस् एस्ने पण एका शास्त्रज्ञाला गुपचुपपणे याच संशोधनावर कामाला लावले होते. त्याचे नाव होते मान्फ्रेड अरडेन. हा युवक स्वत:च अणूवर संशोधन करत होता. हा एका पोस्ट ऑफिसच्या मास्तरचा ओळखीचा होता आणि तो ही त्याला या कामात मदत करत होता. हिटलरने ना डॉ. हाईझेनबर्गला विचारले, ना अल्बर्ट स्पिअर ला, त्याने त्याच्या संशयी स्वभावाला अनुसरुन त्याच्या छायाचित्रकाराला या सगळ्याची बातमी काढायला पाठवले आणि त्यावर आपले मत बनवले की या संशोधनाचा काही विशेष फायदा नाही. (असेही म्हणतात की हिटलर अणूयुद्धाच्या विरूद्ध होता -त्याचे कारण त्याला पृथ्वीचा विनाश नको होता) हिटलर आणि अल्बर्ट स्पिअरने या विषयावर एकदा चर्चा केली पण अल्बर्ट स्पिअरच्या लगेचच लक्षात आले की हे सगळे समजणे हिटलरच्या बुद्धीच्या पलिकडचे आहे. केवळ त्याला समजत नव्हते म्हणून त्याने हे शास्त्र विशेष उपयोगाचे नाही असे ठरवून टाकले होते. पण होते ते भल्यासाठीच, कारण अल्बर्ट स्पिअरने लिहिले आहे “ मला खात्री आहे की हे अस्त्र जर त्याच्या हातात पडले असते तर त्याने ते पहिल्यांदा लंडनवर टाकले असते आणि जगात भयंकर विध्वंस झाला असता”
हिटलरचा पाठिंबा नसला तरीही अल्बर्ट स्पिअरने व त्याच्या इतर सहाध्यायांनी हे संशोधन चालूच ठेवले होते. साधारण १९४२ च्या शेवटी हा अणूबॉंब तयार होईल असे भाकित होते. फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर डॉ. हाईझेनबर्ग यांनी दिलेले नव्हते. तो प्रश्न असा होता की एकदा अणूचे विभाजन होऊन स्फोट झाल्यावर ती चेन रिएक्शन थांबवता येईल का ! शेवटी एक सायक्लोट्रॉन बांधूनही झाला. त्याला भेट द्यायला जेव्हा अल्बर्ट स्पिअर गेला तेव्हा त्याने त्या संशोधनावर काम करणार्या डॉ. बॉथे याला विचारले की आता त्यांना अणूबॉंब करता येईल का ? त्याचे उत्तर अर्थातच नकारार्थी आले कारण तेवढे तंत्रज्ञान त्यांच्याकडे नव्हते. ते मिळवायला अजून ३/४ वर्षे सहज लागणार होती. ते ऐकल्यावर अल्बर्ट स्पिअरचा त्या संशोधनामधला रस कमी झाला. पण त्याने त्यांना अजून एक काम दिले ते म्हणजे ते तंत्रज्ञान वापरून मोठ्या युद्धनौकांसाठी इंजिन तयार करण्याचे. त्याचे पुढे काय झाले ते माहीत नाही.
या मंत्रालयात काम करताना अल्बर्ट स्पिअरला राज्यकारभार कसा चालला होता, संपत्तीचा वापर कसा होत होता, वरच्या स्तरावर घोडचुका कशा होत होत्या आणि त्याबद्दल कोणीही कसे बोलत नव्हते आणि अशाच अनेक बेशरम गोष्टींचा अनुभव आला. त्या काळात त्याच्या हिटलरबरोबरच्या बैठकीत हिटलर म्हणाला होता “जी बाजू जास्त चुका करेल ती बाजू हे युद्ध हरणार आहे.
हिटलरचा युद्धसामुग्री उत्पादनखात्याचा मंत्री म्हणून काम करताना त्याने आजुबाजूला ज्या घोडचुका घडताना बघितल्या त्यावरून हे युद्ध कोण हरणार आहे याचा अंदाज त्याला अगोदरच आला.
सुप्रिम कमांडर हिटलर, अल्बर्ट स्पिअर व त्यांच्या बैठका:
नवथर उत्साह हा हिटलरचा अजून एक गुण (?) होता. त्याची उत्तम उदाहरणे अल्बर्ट स्पिअरने लिहिली आहेत. त्याने स्वत: कुठल्याच विषयाचा खोलवर अभ्यास केला होता, ना त्याच्याकडे कुठल्याही विषयाचे विशेष ज्ञान होते. तो ज्ञान मिळवायचा पण लोकांची तोंडे बंद करण्यासाठी. अर्थात त्याला यात त्याच्या अधिकाराचा खूपच फायदा व्हायचा. अल्बर्ट स्पिअरला बर्लिनहून युक्रेनला दर शनिवारी जर्मन सेनेच्या सरसेनापती असलेल्या हिटलरच्या बैठकीला जावे लागायचे. हे पद त्याने नुकतेच स्वत:कडे घेतले होते. त्याला बंदुका, तोफा, आणि त्यात वापरल्या जाणार्या दारूगोळ्याची सगळी माहिती होती आणि या माहितीचे मोठमोठे दगड फेकून समोरच्यांची तोंडे बंद करायची युक्तीही त्याने साधली होती. ही माहिती त्याच्याकडे एक लालरंगाचे पुस्तक होते त्यातून तो पाठ करायचा. या ज्ञानाचे प्रदर्शन करायची एकही संधी तो सोडत नसे. या सगळ्या युक्त्या वापरून तो त्याच्या हाताखालच्या अधिकार्यांना येताजाता वाकवत असे पण त्याची पंचाईत व्हायची ती एखाद्या विशेषज्ञाची समोरासमोर गाठ पडल्यावर. हे जेव्हा अल्बर्ट स्पिअरच्या लक्षात आले तेव्हा तो या बैठकींना त्याचे त्या त्या विषयातील विशेषज्ञ घेऊन जायला लागला. अल्बर्ट स्पिअरला आकड्यांचे खेळ कधीच जमले नाहीत व ते त्याच्या लक्षातही रहायचे नाहीत. त्याच्या विरूद्ध हिटलरचे होते. तो त्याच्या संभाषणात आकड्यांचा भरपूर वापर करायचा. व समोरच्याला आकडे विचारून त्याचा आवाज बंद करायचा. गंमतीने सगळे अल्बर्ट स्पिअरच्या या संघाला “अल्बर्ट स्पिअर चे आक्रमण” असे म्हणायचे.
रणगाडा हलका पाहिजे की अभेद्य हा वाद कायम चालत आला आहे. अर्थात त्याचे उत्तर आहे ज्या भागात तो वापरायचा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. किंवा ते शक्य नसल्यास या दोन्हीचा सुवर्णमध्य काढून त्याची रचना केली पाहिजे. रणगाड्याची अभेद्यता वाढवायची असेल तर त्याचे चिलखत अधिक जाड करायला लागते त्यामुळे त्याचे वजन वाढून त्याचा वेग कमी होतो. पण हिटलरचे युद्धविषयक ज्ञान हे पहिल्या महायुद्धाच्या अनुभवाभोवतीच फिरत असल्यामुळे अभेद्य रणगाडे करावेत असा त्याचा कायम आग्रह असे. उदा. पॅंथर नावाचा रणगाडा, जो त्याच्या वेगवान हालचालीसाठी प्रसिध्द होता, तो हिटलरच्या या आग्रहापोटी ४० टनी झाला.
पँथर -
त्यानंतर ना त्याने या प्रकाराची कोठेही वाच्यता केली ना रणगाड्याचा विषय काढला. जणू काही असे काही घडलेच नव्हते. याच काळात हिटलरभोवती जी माणसे जमा झाली होती त्यांनी हिटलरला खूष ठेवणे हे एकच ध्येय ठेवले होते. उदा. राईश मार्शल गोअरींग हा त्या बैठकांना स्वत: कधीच उपस्थित नसायचा पण त्याचा एक वरिष्ठ मंत्री असायचा. तो मधेच गायब व्हायचा. बरोबर १५/२० मिनिटांनी गोअरींग बैठकीला यायचा आणि हिटलरचाच मुद्दा आग्रहाने उचलून धरायचा. हिटलर म्हणायचा “ बघा राईश मार्शललाही माझ्यासारखेच वाटत आहे. हेच बरोबर आहे”. हे सगळे असे चालले होते.
रशियाच्या आघाडीवर तर हिटलरला माघार घ्यायची ही कल्पना देखील सहन व्हायची नाही. नोव्हेंबरच्या १९ तारखेला रशियन फौजांनी रुमानियन सैन्याची फळी तोडून त्या खिंडारातून आक्रमण जारी केले. ही बातमी येताच हिटलरने नेहमीप्रमाणे रुमानियन सैनिकांच्या लढवय्येपणाबद्दल शंका प्रदर्शित केली. “आपल्या सैन्याशी गाठ पडपर्यंत वाट बघा” त्याने त्याच्या जनरल्सना सांगितले. थोड्याच तासात रशियन सैन्याने जर्मन सैन्यालाही मागे ढकलायला सुरवात केली तेव्हा हिटलरने एक भाषण ठोकले.
“ ही माझ्या सेनाधिकार्यांची नेहमीचीच चूक आहे. ते नहेमीच शत्रूच्या ताकदीला अवास्तव, अतिरंजित महत्व देतात. विशेषत: रशियन सैन्याच्या. माझ्याकडे आलेल्या अहवालानुसार त्यांचे संख्याबळ नगण्य आहे. झालेल्या रक्तपाताने त्यांची लढायची इच्छाशक्ती क्षीण झाली आहे. पण तुम्हाला कोणालाच या अहवालांवर विश्वास ठेवायचा नसतो. एवढेच नाही तर रशियन अधिकार्यांचे युद्धविषयक व रणनीतीविषयी ज्ञान किती हास्यास्पद आहे हे तुम्हाला माहिती आहेच. ते काय आक्रमण करणार ? एक दोन दिवसात त्यांचे हे तथाकथित आक्रमण थंड पडेल याची खात्री बाळगा. तोपर्यंत मी एक दोन डिव्हिजन सैन्य तिकडे हलवणारच आहे. त्याने त्या आघाडीवर सगळे सुरळीत होईल”.
बिचार्याला हे माहीत नव्हते की रणनीती इत्यादि हे फार पुढचे झाले. जे सैनिक मातृभूमीच्या संरक्षणासाठी लढत असतात तेव्हा बाकी सर्व गोष्टी दुय्यम असतात. हे आपण इंडोचायनामधेही बघितलेच. जेव्हा जर्मन सेनेच्या पराभवाच्या बातम्या जलद गतीने येवू लागल्या तेव्हा हिटलरने तत्परतेने युक्रेन सोडले व प्रशियात आपले मुख्यालय हलवले. आपल्या अवतीभोवती (आपल्या कामाच्या ठिकाणी तर नक्कीच) असे लोक आपण बघतोच. या लोकांना कसलीही कटकट नको असते. (त्यानंतर लगेचच त्याने सहाव्या आर्मीची उभारणी केली. हे सैन्य धुळीस मिळालेली इभ्रत परत आणणार होती. दुर्दैवाने रशियन सैन्याने या सैन्यालाही भारी रणनीती आखून वेढले व नष्ट केले)
मृत्यूमुखी पडलेले जर्मन सैनिक-
हा सैनिक जिवंत नाही गोठलेला आहे -
वॉररूममधे भिंतींवर टांगलेल्या स्टालिनग्राडच्या नकाशावर आता काही ठिकाणीच जर्मन सैन्याच्या ठिकाणांचे निळे ठिपके दिसत होते. त्यांच्या चहुबाजूला लाल रंगाचा सागर उसळलेला दिसत होता.
याच सुमारास अल्बर्ट स्पिअर हिटलरच्या या मुख्यालयात गेला होता तेथे त्याने एक विलक्षण दृष्य पाहिले. ज. झाईटलर, ज. कायटेल समोर अक्षरश: भीक मागत होता की उरलेल्या सैन्याला माघारीचा आदेश त्वरित द्यावा म्हणजे त्या सैनिकांचे प्राण वाचतील. कायटेलने होकार दिला खरा पण बैठकीत हिटलरसमोर त्याने हिटलरचीच बाजू उचलून धरली आणि “जर रसद वेळेवेर पुरवली तर जर्मनीचे शूर सैनिक रशियन सेनेला निश्चितच थोपवतील” याला मान्यता दिली. पुरवठा कोण करणार तर गोअरींगची विमाने. सगळेच बेभरवशाचे शिलेदार !
जर्मन युद्धकैदी-
दोनच दिवसात वॉररूममधे भिंतींवर टांगलेल्या स्टॅलिनग्राडच्या नकाशावर चहुबाजूला फक्त लाल रंगाचाच सागर दिसत होता....................आणि निळी बेटे अदृष्य झाली होती.
हिटलरच्या भोवताली असणार्या राजकारण्यांची कारस्थाने............
काय होती ती? हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर आपल्याला पुढच्या भागात डोकवावे लागेल....
म्हणून क्रमश:..........................
जयंत कुलकर्णी.
अवशेष
Book traversal links for अल्बर्ट स्पिअर - सैतानाचा वास्तुविशारद. भाग - ५
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त
अतिशय रोचक माहीती. पु.भा.प्र.
हा भाग
छान नाही म्हणुन शकणार....
माझ्या इतर लेखातील काही
. (असेही म्हणतात की हिटलर
ज्यात तो नाही असे जग कदाचित
१ नम्बर !!
हेच, अगदी हेच....
अतिशय रोचक माहीती. पु.भा.प्र.
ह्म्म..
_/\_
पल्लवी तू विचारलेल्या
शाळेत असताना हिटलरबददल कुतुहल
जाई,खरे तर ही लेखमाला मी
चालेल!
कितीबी पानं हुंद्या..
सर्वांना धन्यवाद ! अगोदर
हायजेनबर्ग आणि नील्स बोर
धन्यवाद !
कोपनहागन इ-बुक
कालच विकत घेतले. विषय फार
अगदी रोचक एक लंबर लेखमाला.