बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार
अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल.
प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्या गावच्या जमिनीच्या बखेड्याच्या पहिल्या कहाणीपासूनच मराठेशाहीच्या मधल्या काळातल्या प्रवासाचा अंदाज येतो. जमिनीवर अंताजीचा हक्क असतो; पण त्याच्या अनुपस्थितीत गावातल्या एका शहाण्णव कुळी मराठ्यानं जमिनीचा ताबा मिळवलेला असतो. रामशास्त्री प्रभुणे कज्जा सोडवायला बापट नावाचा मामलेदार देतात. अंताजी खरे चित्पावन आणि मामलेदार बापटही चित्पावन. नक्की काय झालं याची शहानिशा न करताच, ‘मी तुमच्या जातीचा की नाही यापेक्षा मामला पाहून माझी बाजू तपासा’ असं म्हणणाऱ्या अंताजीकडे दुर्लक्ष करून, लाच खाऊन आपल्या जातीच्या माणसाच्या बाजूनं बापट निवाडा लावतो, वर ‘आपण एकमेकांना धरून राहिलो नाही तर ही कुणबटं आपल्या डोक्यावर मिरी वाटतील’, असा सल्लाही अंताजीला देऊन जातो. खरं तर, कुशा पाटलानं जमीन खरेदी करण्यासाठी पंचायतीला दिलेले पाच रुपये त्याला अंताजीनं जर देऊ केले असते, तर अंताजीच्या मते काम झालं असतं. पण ‘तापल्या नांगराचं दिव्य करावं लागेल’ असं ‘शास्त्रार्थाचं’ भय कुणब्याला दाखवून मामलेदार बापट अंताजीच्या बाजूनं निकाल लावतो आणि बदल्यात पाच रुपये स्वत: खातो!
उत्तर पेशवाईत ज्या जातीयतेचा सुळसुळाट झाला होता त्याचा असा प्रत्यक्षदर्शी पुरावा पाहून अंताजी हैराण होतो. त्याला आधीच्या मराठेशाहीतल्या रघूजी भोसल्यांसारख्या नेतृत्वाची आठवण होते. कोणत्याही जातीच्या माणसाला समान वागणूक देऊन, ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे, लायकी पाहून कामं देऊ करून मग अशा सर्वांच्या कर्तृत्वावर मोठ्या झालेल्या मराठेशाहीचं आजचं भ्रष्ट रूप पाहून अंताजी कष्टी होतो. ‘एकदिली, तडीस नेणे, आपापले स्वार्थ एकुणांच्या स्वार्थात बुडवणे’ हे इंग्रजांचे गुण तर त्यानं आधीच पाहिलेले असतात. मग शनिवारवाड्यावर ‘युनिअन जॅक’ फडकणार असंच त्याचा अनुभव त्याला सांगत असतो. एकविसाव्या शतकात आपल्याला तर हे माहीतच असतं. तरीही तिथपर्यंत अंताजीसोबत जायची मजा काही वेगळीच!
‘वीतभर (पोटाची) खळगी आणि टीचभर (कमरेखालचं) इंद्रिय यांच्या सुखासाठी किती धावायचं’, असा विचार करणारा मध्यमवयीन अंताजी एका परित्यक्ता प्रभू स्त्रीला अंगवस्त्र म्हणून ठेवतो. दोन्ही सुखं मिळतात आणि शिवाय गाण्या-बजावण्याचा शौकदेखील पुरा होतो! मात्र ‘प्रभू रक्षा चालेल, पण पत्नी नव्हे’ हा मराठेशाहीतल्या जातीयतेचा अजून एक गुण त्याला व्यक्तिगत आयुष्यात भोवतो. (रक्षा = रखेल) त्यामुळे चित्पावनाघरच्या काशीशी तो लग्न करतो. आता अंताजी पडला रसिक आणि देव-धर्म न करणारा, त्यामुळे धर्म-कर्मकांडात गुंतलेल्या आणि कसलंच सुख धड न देणाऱ्या या आपल्या बायकोला तो फार कंटाळून जातो. मग पुन्हा मुलुखगिरी करायला घराबाहेर पडतो. (हे म्हटलं तर व्यक्तिगत वास्तव, म्हटलं तर सामाजिक टिप्पणी ;-))
व्यक्तिगत आयुष्यापासून ते मराठेशाहीच्या ऱ्हासापर्यंत सर्वत्र पसरलेली ही जातीयता अंताजीला पदोपदी जाणवते आणि बोचते. त्याशिवाय, शिवाजीसारखे राज्यकर्ते हे जनतेचं हित पहात असत; पण आताच्या राज्यकर्त्यांना जनतेचं काय चाललंय यात रसच नाही, हेसुद्धा त्याच्या लक्षात येऊ लागतं. रयतेला जास्त उपजाऊ करण्यापेक्षा आपसांत कुरघोड्या करण्यात सत्ताधारी दंग असतात. मग सर्वसामान्य माणसाला त्यांच्यावर जीव ओवाळून द्यावासा वाटणार नाही हेदेखील अंताजीला साहजिक वाटू लागतं. मग भाडोत्री सैनिक घेऊन युद्धं खेळली जाणार यात काय नवल? आणि मग ते मोलानं आणलेले गारदी वगैरे स्वराज्याच्या निष्ठेसाठी लढणार ही अपेक्षा सोडाच; उलट आपल्या मागण्यांसाठी अडवून धरणार आणि प्रसंगी घात करणार, हेही मग ओघानं आलंच.
अशा सगळ्यात दानधर्म करणारी अहिल्याबाई होळकर शहाणी, पण तिचं नशीब म्हणूनच ती सती जाण्यापासून वाचली हे अंताजीला कळत असतं. एकंदरीत मागल्या भागातल्या सती आणि पुरबी प्रकरणांतून अंताजी शहाणा झाला आहे हे जाणवतं. त्याचाच पुढचा भाग म्हणता येईल असा, राधा आणि तिच्या महार कुटुंबाशी अंताजीचा स्नेह जमतो हा भाग तर फार परिणामकारक झाला आहे. एकीकडे गावकीत महारांना असणारा मान, त्यातून येणारा त्यांचा उपजत स्वाभिमान, त्यांची जीव लावणारी आणि प्रसंगी जीवावर उदार होणारी वृत्ती या गोष्टी त्याला भावतात, तर दुसरीकडे स्वत:च्या सद्य परिस्थितीतून उद्भवलेला राज्यकर्त्यांविषयीचा त्यांचा रोषही त्याला जाणवतो. (महार अस्पृश्य, म्हणून पेशव्यांच्या पुण्यात त्यांना थुंकीसाठी गाडगं घेऊन हिंडावं लागे). दुष्काळाची हलाखीची परिस्थिती आणि त्यात देशोधडीला लागलेले, कुटुंबियांना विकून पोटाची आग भरणारे लोक... अशा वेगवेगळ्या कारणांनी सर्व थरांतली जनता पेशवाईतल्या गचाळ कारभाराला वैतागलेली आहे हे त्याला दिसतं.
अंताजीची गंमत अशी की जात-पात न पाहता तो मित्र जोडत जातो. मग गेल्या भागात जसे बंगालातले कायस्थ महाशय आणि त्यांची बाणेदार पुरबी होते, तसे या भागात पोतनीस (प्रभू), तोफगोळ्यांचं शास्त्र शिकवणारे सुलेमान आणि (अर्धा फ्रेंच) दुबुक, धडाडीचा पण इंग्रजांना जाऊन मिळणारा जानोबा (महार) यांपासून ते अगदी नाना फडणवीस, एल्फिन्स्टन असे थोरही त्यात येतात.
याउलट पुण्यातली ऐशोआराम आणि रमणे यांत गुंतलेली ब्राह्मण मंडळी त्याला खुपतात. युद्धात नेहमी मागे राहणारे आताचे पेशवे आणि शूरवीर पहिला बाजीराव यांच्यातला फरक अनेक युद्धं पाहिलेल्या अंताजीला चांगलाच जवळून दिसतो. पेशवाईतले साडेतीन शहाणे त्याला भेटतातच, पण दारूच्या नशेत त्यांचं शहाणपण (आणि त्यातलं फोलपण) समजावून देणारा ब्राह्मणसुद्धा भेटतो. (शहाणपणाविषयीचं हे विवेचन अप्रतिम आहे!) मागच्या भागानुसार या भागातही अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा अंताजी साक्षी आहे. पण हे सर्व अंतत: त्याला आणि वाचकाला अंतर्मुख करत जातं. ‘जर असं झालं असतं तर मराठेशाही न बुडती’ असं हे निव्वळ स्वप्नरंजन नाही, तर अनेक ऐतिहासिक ग्रंथांच्या अभ्यासातून मांडलेला मराठेशाहीचा तो लेखाजोखा आहे. उदा: लढाईच्या तंत्रात मराठे तेव्हाच्या इंग्रजांना भारी पडू शकत होते याचे पुरावे त्यात खुद्द एल्फिन्स्टनच्या साक्षीनं दिलेले आहेत.
पण या सगळयाच्या पलीकडे लक्षात राहणारा कादंबरीचा गुण म्हणजे निरनिराळ्या जातींची, पंथांची, प्रांतांची रसरशीत माणसं! त्यात राधा-रखमा यांसारख्या स्वतंत्र बाण्याच्या स्त्रिया येतात, तसेच व्यंकटनाक-जानोबा यांसारखे महार येतात; त्यात इंग्रजांची लोकशाही प्रक्रिया समजावून सांगणारा एल्फिन्स्टन येतो आणि महारणीशी लग्न लावायला तयार होणारा जिगरबाज चिमणाबापू भोसलाही येतो. यल्लम्माला वाहिलेल्या आईची जिगरबाज राधा हीसुद्धा महार-मराठा-ब्राह्मण संकरातून उत्पन्न झालेली, आणि म्हणून समाजपुरुषाच्या चार कोपर्यांतल्या त्या चौघांनी लाडाकोडात वाढवलेली असते. सर्वांचं मिश्रण असणारा आणि सर्वांच्या आशा-आकांक्षांना जागा देणारा एक आधुनिक हिंदुस्थान बनू शकतो याविषयीची आशा त्यात दिसते, आणि ते आताच्या मराठेशाहीत होणे नाही याविषयीचा विषादही दिसतो. मग अखेर ‘बारा-चौदा आण्यांस नीट राखणारा’ इंग्रज ‘दो-चार आण्यांसाठी’ वाईट का म्हणावा, ही आधुनिक वास्तवाबद्दलची अंताजीची जाण भावू लागते.
नेमाड्यांना ‘हिंदू’मध्ये अठरापगड जमातींच्या उबदार भारतीय वास्तवाला काहीसं भिडता आलं खरं, पण आधुनिकतेला मात्र त्यांनी अस्पृश्य मानलं. त्यामुळे ते फार स्मरणरंजनात्मक झालं आणि त्याला उघड मर्यादाही पडल्या. त्याउलट अशा मिश्रणातच भारताचं भविष्य आहे हे इथे जाणवतं. सर्वसमावेशक असेल तेच इथे टिकेल; त्याउलट वजाबाकीचं राजकारण करणारे थोड्या काळात नष्ट होतील, ही जाणीव अंताजीला अठरा-एकोणिसाव्या शतकात रसरशीत जगून येते. तीच जाणीव शिवाजी किंवा अहिल्यादेवी होळकर (किंवा नंतरचे गांधीजी) यांना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमागे आहे. खास भारतीय म्हणता येईल अशी ही समज सर्वसामान्यांत असते म्हणूनच या व्यक्ती जनतेनं लोकोत्तर ठरवल्या; पण म्हणजे अशी जाण ज्या राज्यकर्त्यात नसेल त्याला या लोकोत्तर मिथकांच्या जवळपासदेखील पोहोचता येणार नाही हे ओघानं आलंच.
एका कळीच्या कालखंडात घडलेल्या इतिहासाला साक्षी मानून असा व्यामिश्र आणि कालातीत आशय मांडणं आणि त्याला रसाळही करणं, ही तारेवरची कसरत नंदा खरे यांना सुरेख साधली आहे. समकालीन मराठी कादंबऱ्यांत मानाचं स्थान पटकावेल अशी गुणवत्ता ‘बखर अंतकाळाची’मध्ये नक्कीच आहे.
बखर अंतकाळाची
लेखकः नंदा खरे
मनोविकास प्रकाशन (पहिली आवृत्ती: डिसेंबर २०१०)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नका
लिखाण
अगदी हेच म्हणतो. हाइंडसाइटचा
छान रसग्रहण
चांगली ओळख
जेस्म बाँड
क्लास!! हे पुस्तकही घ्यावेच
मागचा धागा वाचूनच पुस्तक
मुक्तसुनीत अणि इतरांना प्रतिसाद
काही नोंदी
मस्तच!
सुंदर समीक्षा आणि
पुन्हा मुक्तसुनीत यांना प्रतिसाद
चिंतातुर जंतु यांची पुस्तकपरीक्षणे
जंतू यांचं मिसळपाववरील अन्य
धागा वर आणल्याबद्दल संभाजी
सदर पुस्तक वाचकाला हलवुन
आभार.