मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवजयंतीची 'वरात'

महेश_कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण. तरुण मंडळीना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. शिवजयंतीनिमित्त एका तरुण गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी मिरवणूक काढण्याचे ठरवले. उंट, घोडे , भगवे ध्वज, डॉल्बी, वेशभूषा या सगळ्यांची जुळवाजुळव सुरु झाली. मिरवणुकीची जय्यत तयारी झाली. संध्याकाळी एकजण पुढे घोडयावर शिवाजी महारांजांच्या वेशात घोडयावर स्वार झाला..दुसऱ्या घोडयावर अजून एक जण सेनापतीच्या वेषात स्वार झाला. पाठीमागे ३ उंट ज्यावर अनेक बाल मावळे स्वार झाले..साधारणपणे ३ लोकांमध्ये एक या पद्धतीने २०-२५ भगवे ध्वज डोलू लागले..त्यापाठीमागे पायदळामध्ये तरुण मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते... आणि या सगळ्यांच्या पाठीमागे (कदाचित शिवाजी महाराजांची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी) ४०७ टेम्पो चे रथामध्ये रुपांतर केलेले डॉल्बी वाहन. त्यावर सुद्धा अनेक भगवे ध्वज फडकत होते... मिरवणूक निघण्यास सज्ज झाली...सगळ्यांनी आपापल्या जागा, ध्वज, वेशभूषा नीट केल्या. त्या सर्व लवाजम्याला एका मोहिमेवर निघालेल्या शिवाजीमहाराजांचे रूप देण्यात आले...आता फक्त सगळे वाट पाहत होते ते फक्त डॉल्बीच्या ललकारीची. DJ ने त्याच्या ठेवणीतली एक तबकडी काढली आणि डॉल्बीने ललकारी दिली.... . . . . . . . . . "कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला.......बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला:" इथे शिवाजी महाराजांना नव्याने माहिती मिळाली की रिक्षावाला त्यांची वाट बघतो आहे.... पुढे कोणकोणती गाणी शिवाजी महाराजांनी ऐकली ते सांगायलाच नको... आणि अशा पद्धतीने शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचे 'वराती' मध्ये रुपांतर झाले.

वाचने 7572 वाचनखूण प्रतिक्रिया 35

धमाल मुलगा 21/02/2011 - 15:13
बोंबला! काय वातावरणनिर्मिती...काय वातावरणनिर्मिती... वाचुनच एकदम खुश झालो... . . . . आणि डॉल्बीच्या ललकारीनंतर साफ आडवा! :D

स्वैर परी 21/02/2011 - 15:33
रेतीवाला नवरा पहिजे वगैरे लावले असेल! मुर्ख लेकाचे! राजांच्या कर्तुत्वाचा इतका अपमान करायचे धाडस तरी कसे होते अशा लोकांचे! शिवाजी महाराजांच्या नखाच्या एखाद्या कणाची देखील सर येईल का या 'कार्यकर्त्याना'?

In reply to by स्वैर परी

कच्ची कैरी 21/02/2011 - 17:34
परीशी पूर्णपणे सहमत .वाचुन खरच खेद झाला .

सहज 21/02/2011 - 15:48
खेदजनक. गणपतीबाप्पा व महाराज दोघेही डोक्याला हात लावून बसले असतील.

प्यारे१ 21/02/2011 - 15:50
लोकमान्य टिळक.... तेच होते ना ज्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरु केले????? दोन्ही सणांवेळी नंगानाच. काय वाटत असेल ??? आगरकर बरोबर म्हणाले असते आताच्या परिस्थितीत.

परिकथेतील राजकुमार 21/02/2011 - 15:57
काल एका व्हिडो मधे आम्ही 'शिव गर्जना' , 'लेझीम', 'तुतारी' आणि मराठी वेषात आजुबाजुला भगवे फडकवणारे तरुण ह्यांच्या तालावर कतरिना कैफला 'शिला की जवानी' ह्या गाण्यावर नाचतान बघीतले. :)

अवलिया 21/02/2011 - 16:08
मस्त ! हेच असेच शिवजयंती (तिथीने), आंबेडकर जयंती, गणपती, नवरात्र, अजुन जे काही असेल ते यांना पहायला मिळते. अगदी लग्नाच्या वरातीतही मुन्नी, शीला बँजोवर गात असतात. मजा वाटते. आपण पण नाचतो ब्वा जेव्हा जमेल तेव्हा. लाजायचे का? खरेच हे असे सण, जयंती, उत्सव, समारंभ आहेत म्हणून खुले आम रस्त्यावर नाचत नाचत मजा करता येते. नाहीतर आहेच तिच्यायला सायलेंस झोन आणि धाच्या आत अंथरुणात. अर्थात एरंडाचे तेल पिवुन बसलेल्या ढुढ्डाचार्यांना त्रास होतो.. जातात त्यातले काही परदेशी निघुन. नंतर रडतात चिठ्ठी आयी है ... असो.. पुन्हा एकदा जय भवानी ! जय शिवाजी !!! असेल हिंमत तर दाखवा माझा आवाज बंद करुन !!

In reply to by अवलिया

सुहास.. 21/02/2011 - 16:45
बराच वेळ धागा असाच पहात होतो , म्हटलं अजुन वैचारिक आले का नाहीत ते ? एक प्रश्न : जल्लोष व्यक्त करण्याचा ही आता निती-नियम आणायला हवेत का ? अर्थात एरंडाचे तेल पिवुन बसलेल्या ढुढ्डाचार्यांना त्रास होतो.. जातात त्यातले काही परदेशी निघुन. नंतर रडतात चिठ्ठी आयी है ... असो.. >>> आणि परत आले की , आधुनिक-संस्कृती प्रदान वेषभुषा करुन निघाले पब ला किंवा गावकुसाबाहेर पार्ट्या करायला ..' शिला ...शिला की जवानी...'

In reply to by सुहास..

प्रसन्न केसकर 21/02/2011 - 16:55
एक प्रश्न : जल्लोष व्यक्त करण्याचा ही आता निती-नियम आणायला हवेत का ? कश्याला? त्यापेक्षा जल्लोष करण्याचे मार्ग बदला. शिवजयंती, गणेशोत्सव कसले करता? मस्त थेऊरसारख्या जागी जाऊन `तसली' पार्टी करा ना मग कुणी अडवणार नाही. आणि कुणी आडवे आलेच तर सगळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे, मानवतावादाचे विचारवंत पुरस्कर्ते समर्थनाला येतील. कदाचित अजुन एखादे ग्रीन चड्डी कँपेन सुरु होईल तुमच्या समर्थनार्थ.

In reply to by प्रसन्न केसकर

पाषाणभेद 22/02/2011 - 11:29
बर्‍याच कार्यक्रमात शिवाजी महाराजांचे रुप कोणीतरी धारण करतो. तो (चित्रातल्या) शिवाजी महाराजांसारखा दिसतही नाही. उगाचच हसे होते. त्या विरपुरूषाची कोणीही नक्कल करू नये अशी विनंती. बाकी शिवजयंती, गणपती, आंबेडकरजयंती, ताबूत, लग्न वराती यात नाचण्यासाठी मी पण हिरहिरीनी भाग घेतो. मंडळ जी जी 'सोयपाणी' करते त्याचा लाभ घेतो. रात्रीपर्यंत धांगडधिंगा चालू असतो आमचा. एकुणच आनंद घेतो. सरकारने असल्या कार्यक्रमात 'धाच्या आत घरात' नियम केल्याबद्दल सरकारचा जाहिर निषेध.

In reply to by पाषाणभेद

नितिन थत्ते 22/02/2011 - 12:03
खरे शिवाजी महाराज चित्रातल्या महाराजांसारखे दिसायचे का याबाबत काही माहिती आहे का?

In reply to by नितिन थत्ते

पाषाणभेद 22/02/2011 - 12:07
म्हणूनच '(चित्रातल्या)' असे टाकले आहे वर. माझे हे म्हणणे आहे की त्या विरपुरूषाची सर कोणालाही येणार नाही. अन 'वरातीत' जो धांगडधिंगा चालतो तो तरी त्यांच्यासमोर करू नये. (बाकी धांगडधिंग्याला आमची ना नाही. प्रत्येकाची वेळ असते ती. मौका म्हणा हवं तर :-))

डॉ.श्रीराम दिवटे 21/02/2011 - 16:19
अवलिया, अगदी बरोबर... आम्हीही नाचतो बघा प्रत्येक वरातीपुढे.. कारण ती 'वार्‍या'वरची नसून 'जमिनी'वरची असते. पिणारे पिऊन नाचतातच त्यात काय वेगळे???

३_१४ विक्षिप्त अदिती 22/02/2011 - 12:23
माझा असल्या कार्यक्रमांना संपूर्ण पाठिंबा आहे. भारतातल्या सर्व प्रमुख शहरांमधल्या छोट्या मोठ्या सर्व हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालयं, प्रसूतीगृह यांच्यासमोर सण-जयंत्यांचं निमित्तही न शोधता दररोज अशा वराती निघाल्या पाहिजेत. सर्व निवासी इमारती, संकुलांमधेतर रात्री ११ ते ३:३० आणि पहाटे ३:३० ते ६ या वेळांत, गरज पडल्यास शिफ्ट्स लावून, जोरदार गाणी आणि नाच झालाच पाहिजे. आणि हे कार्यक्रम स्वार्थीपणे फक्त स्वतःसाठी न ठेवता संपूर्ण प्रभागाची करमणूक करतील एवढ्या प्रचंड प्रमाणात व्हावेत. आपली भारतीय संस्कृती नाच आणि गाणं यांच्याबाबतीत प्रचंड समृद्ध आहे. फक्त सांस्कृतिक ठेवाच नव्हे तर प्रचंड करमणूक करणार्‍या या सर्व कलाक्रिडाप्रकारांना उत्तेजन देणं हे आपलं परमकर्तव्य आहे. स्त्री-पुरूष समानता हा समानतेचा एक पैलू झाला, पण दिवस-रात्र, तरूण-वृद्ध, रूग्ण-निरोगी, निवासी-कार्यालयीन, शांतता-आवाज हा संपूर्ण भेदभावच समाजातून नष्ट झाला पाहिजे. असा भेदभावरहित भारतीय समाज हेच उद्याच्या समृद्ध भारताचं बलस्थान ठरेल यात मला काहीही शंका नाही. काही *** लोकं या गोष्टीला विरोध करतील, पण तो विरोध आपल्या डेसिबल्ससमोर फिका ठरेल याची मला संपूर्ण खात्री आहे. बोला शिवाजी महाराज की, जय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 22/02/2011 - 12:57
सार्वजनीक जागी देवासमोर, महाराजांसारख्या आदर्शासमोर बाजारु बकवास गाणी लावू नका. इतकेच म्हणणे मांडले तरी आमचा हक्क, आमचे जल्लोष, आमचे नियम, आमची पिळवणूक असा आक्रोश करण्यांसमोर काय बोलू? जय हिंद! चालू द्या.

In reply to by सहज

३_१४ विक्षिप्त अदिती 22/02/2011 - 13:04
सहजराव, कोणती गाणी बाजारू, बकवास हे ठरवणारे तुम्ही कोण? मुळात आमच्या भारतीय संगीताला बाजारू, बकवास म्हणताच कसे तुम्ही? आणि नाचण्यासाठी स्पेशल जागा वगैरे तुमची पाश्चात्य थेरं बंद करा. आमचा देश आहे, आम्ही कर भरतो, रस्ताही आमचाच आहे, आम्ही तिथे नाचू नायतर जोरात गाणी लावू. महान भारतीय संस्कृतीजतनाचं हे जे कार्य आम्ही हाती घेतलं आहे त्यात बिब्बा घालू नका.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 22/02/2011 - 13:27
ठीक आहे, बाजारू, बकवास व्याख्या मान्य होणार नाही पण डोक्यात तिडीक जाणारी गाण्यांची एक यादी तर बनवता येईल की नाही? का हा फक्त विरोधासाठी विरोध आहे? जाताजाता ह्या असल्या (रिक्षावाला )गाण्यांनी महाराजांच्या कार्याची, महतीची काय ओळख होते किंवा संस्कृती, स्मृती जतन होते हेही कळवल्यास मंडळ आभारी राहील.

In reply to by सहज

३_१४ विक्षिप्त अदिती 22/02/2011 - 23:56
अजूनपर्यंत कोणी इतर कोणा संस्कृतीरक्षक, प्यार्टीविरोधकांना सहजरावांचा मुद्दा खोडून काढावा असं का बरं वाटलं नाही? डोक्यात तिडीक जाणारी गाणी? मुळात संगीत डोक्यात कसं काय जातं? 'बघतोय रिक्षावाला' किंवा 'शीला की जवानी' प्यार्टीसाठी अतिशय योग्य गाणी आहेत, तेव्हा काय तुम्ही 'भला हुआ मेरी मटकी टूटी रे' ऐकणार का? थेऊरच्या पार्टीबद्दल अवाक्षर नाही आणि आता मराठी मुलांनी पार्टी केली तर रागराग का? तुमचं ते संगीत आणि आमची गाणी मात्र डोक्यात जाणारी ... हे चालणार नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी 22/02/2011 - 23:35
मुळात आमच्या भारतीय संगीताला बाजारू, बकवास म्हणताच कसे तुम्ही?
तेच तर म्हणतो मी. खरं तर हिंदी - मराठी सिनेमातली सर्व गाणी ही हिंदू संस्कृतीची बाळं आहेत. त्यांची जन्मभू, कर्मभू, पितृभू इथलीच. शीला इथलीच व तिची जवानीही इथलीच. हिंदू संस्कृतीतलं चांगलं तेवढं ठेवा आणि वाईट काढून टाका असा अट्टाहास उपयोगाचा नाही. विचारवंत व त्यामुळे अर्थातच हिंदूद्वेष्टे असलेल्यांचं ते काम.

In reply to by राजेश घासकडवी

३_१४ विक्षिप्त अदिती 22/02/2011 - 23:59
तपशीलात थोडी चूक आहे गुर्जी. शीला उर्फ कत्रिना कैफ ही पासपोर्टाने ब्रिटिश असून तिच्या जवानीतली काही वर्ष तिने मुंबैत घालवली आहेत. आणि इथे म्हटल्याप्रमाणे तीही बारा गावचं पाणी प्यायलेली आहे. बाकी सहमती आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

राजेश घासकडवी 23/02/2011 - 07:19
पासपोर्टाने ब्रिटिश असून
तुम्हाला जन्मभू, कर्मभू, पितृभू यापैकी नक्की कुठचं भू कळलं नाही? पासपोर्ट वगैरे गोष्टी विचारवंत लोक बघतात. त्यात शीला ही व्यक्तिरेखा आहे- या हिंदुस्थानातच जन्मलेली. तपशील तपासून बघता आहात म्हणे! हॅ! विचारवंत कुठल्या!

नगरीनिरंजन 22/02/2011 - 12:39
जुलूस होण्यापुर्वी या उत्सवांमध्ये ढोल, झांजा, ताशे, पवाडे वगैरे असायचे असे आठवते. येत्या काही वर्षांमध्ये अशा जुलूसांमध्ये या 'रथां'मध्ये आयटेम गर्ल नाचताना दिसतील अशी आशा. नाचायला मजा येते यात वाद नाही. पण रस्त्यावर नाचणारे डिस्कोत किंवा सिंहगडाच्या पायथ्याशी नाचणार्‍यांना नावे ठेवतात आणि डिस्कोत किंवा सिंहगडाच्या पायथ्याशी नाचणारे रस्त्यावर नाचणार्‍यांकडे तुच्छतेने पाहतात ही गंमत आहे. जुलूस जुलूस मे भी फर्क होता है भाय...

विनायक बेलापुरे 23/02/2011 - 00:44
असल्या उन्मादाला आवर घालणे मुश्कील आहे. हळव्या मनांच्या भावना दुखावतात एकदम. उत्सवप्रियता दुसरे काय ? नवी पालवी आली आणखी काही वर्षांनी की त्याच्याही पुढे ४ पावले टाकली जातील .
लेखन आणि प्रतिसाद आवडले....! मिरवणूक कोणतीही असो आपण बॉ मस्त आनंद घेतो. मिरवणूकीच्या निमित्ताने रात्रीच्या वे़ळी आकाशाच्या दिशेने उंच जाणारे मोहक फटाके. पोरांचा नाचण्याचा उत्साह. मिरवणूकीत मूख्य कार्यकर्त्यांना बांधलेले फेटे. मिरवणूकीत हत्ती-घोडे. लेझीम. अहाहा. काय सोहळा असतो. अरे हो, ज्यांना कोणाला डॉल्बी सिष्टीमचा त्रास होतो. शिवाजी महाराजांच्या मिरवणूकीत 'मै हू डॉन' वगैरे मस्त गाण्यांचा मनस्ताप होतो त्यांनी मात्र आकाशाकडे दुर्बीण लावून ब्रह्मांडाचा शोध वगैरे घेतला पाहिजे. उगाच आपण बॉ इतरांपेक्षा फार वेगळा विचार करतो असे दाखवून उत्सवी लोकांच्या आनंदावर विरजन टाकू नये असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 23/02/2011 - 09:09
मुख्य बोर्डावर माझा वरील प्रतिसाद टाकल्यावर माझ्या एका मित्रानं पडद्याच्या मागे हे ’योग्य की आयोग्य’ एवढेच सांगा असा हट्ट धरला. माझ उत्तर माझ्या मित्रासाठी असे की, ते अयोग्यच आहे पण आता सार्वजनिक उत्सवांचे स्वरुप बदलून गेले आहे. व्याख्यानमालांना होणारी गर्दी [अपवाद आहेत] आता दिसत नाही. सार्वजनिक उत्सवांमधे प्रचंड राजकारण सुरु झाले आहे. वर्गणीही खूप मिळते. मग सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधन करणे, पथनाट्य, नाटके [ऐतिहासिक महापुरुषांवर आधारित] वगैरेच्या परंपरा केव्हाच मोडीत निघाल्या आहेत. शिवजयंतीची मिरवणूक मोठी तर त्याहीपेक्षा मोठी मिरवणूक डॉ.आंबडेकराच्या जयंतीला झाली पाहिजे. त्याहीपेक्षा मोठी गर्दी अन्य कोणत्या महापुरुषांच्या जयंतीला झाली पाहिजे. अशा चढाओढीत सामाजिक सांस्कृतिक अपेक्षा आहेत त्या केव्हाच मोडीत निघाल्या आहेत. आता अशा मिरवणूका थांबवणे एका व्यक्तीच्या हातात असते तर ते केव्हाच कोणीतरी थांबवले असते. पण अशा मिरवणूकांना होणारी प्रचंड गर्दी अशी दाखवते की हेही लोकांना आवडतेच आहे. मी म्हणतो की, आपण आता हे थांबवू शकत नसू तर गर्दीतले एक होऊन जाणे केव्हाही चांगले असे मला वाटते. मित्रा प्रतिसादाने दुखावला असशील तर सॉरी.....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 23/02/2011 - 09:26
अहो सर, हे थांबवू शकत नसू पण हे अयोग्य आहे व यात मी सामील होणार नाही हे तर आपल्याला करता येण्यासारखे आहे. तसेच हे मत मांडल्यावर आपल्यासारखेच समविचारी लोक आहेत हे कळते. हे अयोग्य आहे असे आपल्याला वाटायचा आपला विचार अयोग्य नाही व तो आपण मांडला पाहीजे हे लक्षात येते. आपले विचार मांडायचे व अयोग्य प्रथा थांबवायचे बळ मिळते. जगातील सर्व समाजसुधारकांना तत्कालीन समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यातुलनेत आज किमान अयोग्य वाटणार्‍या गोष्टीला अयोग्य म्हणण्याचे धाडस आपण का दाखवु शकत नाही. प्राणाची भिती वाटणे, वाळीत टाकले जाण्याची भिती वाटणे हे नैसर्गीक आहे पण आपण आता हे थांबवू शकत नसू तर गर्दीतले एक होऊन जाणे हे अयोग्य असे मला वाटते. किमान महापुरुषांच्याबद्दल आदराच्या अश्या खोट्या प्रदर्शनात सहभागी व्हायचे टाळले पाहीजे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती 23/02/2011 - 12:05
शिवाजी महाराजांच्या मिरवणूकीत 'मै हू डॉन' वगैरे मस्त गाण्यांचा मनस्ताप होतो त्यांनी मात्र आकाशाकडे दुर्बीण लावून ब्रह्मांडाचा शोध वगैरे घेतला पाहिजे.
१. का गरीबाच्या पोटावर पाय आणताय? २. आकाशाकडे दुर्बिण लावून ब्रह्मांडाचाच शोध घेतात असं तुम्हाला वाटतं का? मग या दुर्बिणीचा उपयोग तुम्हाला माहित नसावा. ३. आकाशाकडे दुर्बिणी लावून ब्रह्मांडाचा शोध घेणारे बहिरे, बधीर असतात, असे लोकांना आरामाची गरज नाही, त्यांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होत नाही असं आपलं मत आहे का? ही सगळी माणसंच* आहेत, त्यांना आपलं म्हणा. ४. काही लोकांच्या उत्साहाचा इतर काही लोकांना त्रास होत असेल तर प्रा.डॉ., तुम्ही त्यांना काय सांगाल? उदा: काही लोकांना इतर काही लोकांना बदडण्यात आनंद मिळतो, काही लोकांना मुलींची छेड काढण्यात आनंद मिळतो? तुमचा काय सल्ला आहे, इतर लोकांनीही मारामारी करावी, मुलींची छेड काढायला सुरूवात करावी? (सकाळी साडेपाचपासून जवळपास लागणार्‍या लाऊड भावसंगीताने हैराण) अदिती *ब्रह्मांडांचा शोध घेणारेही मोठ्याने गाणी ऐकत नाचतात, पार्ट्या करतात, पण पार्टी न करणार्‍यांना त्रास न होण्याची खबरदारी घेऊनच.

महेश_कुलकर्णी 23/02/2011 - 11:37
हा लेख प्रकशित झाल्यावर २ दिवस मी त्यावर काय प्रतिक्रिया आल्या हे पहिले. काही लोक माझ्याशी सहमत होते आणि त्यांना हा प्रकार निश्चितच खेदजनक वाटला तर काहींनी मला फक्त टार्गेट केले. मुळात मी कोण आहे त्यापेक्षा माझे म्हणणे काय आहे हे फार महत्वाचे आहे. जे माझ्या म्हणण्याला विरोध करत होते त्यानीच या सर्व 'वराती'ची तुलना 'शीला' शी केली यावरून एवढे नक्कीच कळते की पब आणि डिस्को मध्ये चालणारे प्रकार सर्रासपणे महापुरुषांच्या जयंतीला रस्त्यावर चालू लागले. वाईट हे वाटते की याचेसुद्धा समर्थन होते. पब आणि डिस्को ही ठिकाणे अशा प्रकारचा नृत्य करण्यासाठीच असतात,परंतु महापुरुषांच्या जयंती किंवा उत्सव हे यासाठी असतात का? प्रसन्न केसकर साहेबांनी खूप योग्य विचार मांडला की जर तुम्हाला असा जल्लोष करायचा असेल तर बाकीचे पर्याय १२ महिने चालू असतात. त्यासाठी आपल्या उत्सवांचे वाभाडे का? काही ठिकाणी पारंपारिक खेळ, मराठी लोकगीते साजरी करून शिवजयंती साजरी करण्यात आली. शहराच्या काही भागात राहुल सोलापूरकर, नितीन बानुगडे-पाटील यांची शिवाजी महाराजांवरची व्याख्याने आयोजीत करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हे उपक्रम नक्कीच स्तुत्य आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की व्याख्याने किंवा पारंपारिक पद्धतीने जयंती साजरी करण्याचे दिवस गेले. मला कायम एक प्रश्न पडतो..हिंदू धर्मातल्या गोष्टी करतानाच कसे दिवस बदललेले असतात? अजूनही मोहरमची ताबूत विसर्जन होताना कव्वाली किंवा सुफी गाण्यांव्यतिरिक्त मी तरी ऐकले नाही. ह्यावर सर्वानी अंतर्मुख होवून विचार केला पाहिजे. खरेतर आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें। माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥ असे होण्याची ऐवजी, आपली पारंपारिक पद्धती आपण विसरत चाललो आहोत त्यांच्याकडे आपण trend या गोंडस नावाखाली कानाडोळा करत आहोत. मध्ये एकदा शिवाजी महाराजांच्या जयंती वरून वाद चालू होते तेव्हा एका शिवचरित्र अभ्यासकाचे म्हणणे फार छान होते..."अजून काही पंचांग शोधा आणि वर्षातून ३६५ दिवस शिवजयंती साजरी करा..कारण शिवराय हे व्यक्तिमत्वच असे की त्यांचे स्मरण ३६५ दिवस केले आणि त्यांचा चरित्राचा एक पैलू जरी रोज उलगडला तरी ते दिवस कमीच पडतील." जयंतीचा उपयोग हा असे होणे अपेक्षित आहे. असेच जर चालू राहिले तर मध्ये एक विनोद ऐकला होता तो प्रत्यक्षात येईल की काय अशी भीती वाटते,,, शिक्षक: महात्मा गांधी,गौतम बुद्ध आणि श्री कृष्ण यांच्या मध्ये काय साम्य आहे? विद्यार्थी: या सगळ्यांचे जन्म सुट्टीच्या दिवशी झाले. बाकी वरातीमध्ये कोणीही कसेही नाचावे त्याला आपला कधीच विरोध नाही आणि नसणार. पण मिरवणुकीची 'वरात' करू नये एवढेच म्हणणे आहे.

चिंतातुर जंतू 23/02/2011 - 12:07
अजूनही मोहरमची ताबूत विसर्जन होताना कव्वाली किंवा सुफी गाण्यांव्यतिरिक्त मी तरी ऐकले नाही. ह्यावर सर्वानी अंतर्मुख होवून विचार केला पाहिजे.
मी चिक्कार चवचाल गाणी ऐकलेली आहेत. उदाहरणार्थ स्थळ - ताडीवाला रस्ता, पुणे. इतकंच नाही, तर प्रेषिताच्या चित्रांवरून धुमाकूळ घालणारे आणि मूर्तिपूजेला विरोध करणारे आता स्वतःचे 'दबन्ग्ग'स्टाईलचे फोटो काढून फ्लेक्सही उभे करतात. शेवटी रीतभात कुणाला चुकत नाही हेच खरं ;-)