मराठा लाईट इनफंट्री भाग - ६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Sep 2010 - 4:27 pm

भाग – ६
indiansoldier
ऑगस्टच्या सुरुवातीला ३री बटॅलियन रेगिनाच्या भागात पोहोचली. याठिकाणी जर्मन सैन्याने मजबूत बचाव फळी उभारण्याच्या कामाच्या संरक्षणासाठी आपल्या उत्कृष्ट बटॅलियन्स आणून ठेवल्या होत्या. या सैन्याच्या पूर्वेला ही बचाव फळी उभारण्याचे काम जोरात चालू होते. या सैन्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे नेतृत्व ३-मराठाकडे देण्यात आले. पहिल्याच रात्री मराठ्यांनी जोरदार हल्ला चढवून पहिली काही ठाणी काबीज केली मात्र ७ ऑगस्टला त्यांची गाठ अत्यंत कडव्या अशा जर्मन सैन्याशी पडली.

शत्रूवर नजर

बर त्यांना गल्लीबोळातून युध्द करायला लागले. यात मुख्य अडचण अशी आली की जर्मन सैन्याला तोफखाना व टॅंक वापरायला पूर्ण मुभा होती तर यांना शहरातील ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी फक्त छोटी शस्त्रे वापरण्याची परवानगी होती. यात मराठ्यांची बरीच हानी झाली.

ऑगस्ट्च्या शेवटी जर्मनीच्या सेनापतीने, केसरलिंगने आपले सैन्य मागे नेऊन त्यातून एक मजबूत संरक्षण फळी निर्माण केली. त्याचे नाव गोथिक लाईन. या फळीवर निर्णायक हल्ला चढविण्यासाठी फिल्डमार्शल अलेक्सझांडर यांनी दोस्तराष्ट्रांच्या सेनेची फेररचना केल्यामुळे ८ वी डिव्हिजन ही तात्पुरती अमेरिकन ५ व्या आर्मीच्या अधिपत्याखाली आली. अमेरिकन आणि मराठ्यांचा हा युध्दातील पहिलाच एकत्र सहभाग म्हणावा लागेल.

१३ सप्टेंबर सगळ्या युध्दसामग्रीसह जोरदार हल्ला चढवीला गेला आणि यशस्वी झालाही. गोथिक लाईनला खिंडार पडले आणि जर्मनांनी परत एकदा उत्तरेला माघार घेतली. हा भाग अत्यंत डोंगराळ आणि बोलोना शहराच्या चहूबाजूला पसरलेला आहे. पो नदीचे जे खोरे आहे त्याला जाणार्‍या सर्व वाटा या डोंगररांगांनी रोखलेल्या आहेत. सुरुवातीला मराठ्यांना विशेष प्रतिकार झाला नाही पण जसजसे मराठे डोंगराळ भागात शिरू लागले तसतसा जर्मनांचा प्रतिकार अधिकाधिक प्रखर होऊ लागला. प्रत्येक डोंगराच्या प्रत्येक सोंडेवर व वाटांवर युध्द होऊ लागले. याच वेळी व्हेरूका नावाचा डोंगर काबीज करण्यात आला. बर्फ आणि वितळलेल्या बर्फामुळे झालेला प्रचंड चिखल यामुळे खरा शत्रू कोण असा प्रश्न पडू लागला.
चिखल मोठा शत्रू
याच युध्दादरम्यान लान्स नाईक बापू हुले यांना MM प्रदान करण्यात आले.
यांनी गाजविलेला पराक्रम मला औरंगजेबाच्या तंबूचे खांब कापून आणणार्‍या संताजी धनाजींच्या बहाद्दर मावळ्यांची आठवण करून देतो. हुले यांनी त्यांच्या सेक्शनमधीलच एक सैनिक घेऊन त्या दिवशी शत्रूच्या ताब्यात असलेल्या डोंगराच्या सोंडेवर पाहणी करण्यासाठी प्रस्थान ठेवले. दाट धुक्याच्या आवरणाचा फायदा उठवत त्यांनी जर्मनांच्या ठाण्यात प्रवेश केला. केलेल्या पाहणीवर समाधान न पावता त्यांनी जर्मनांची शस्त्रे उचलून आणली आणि एका चिखलाने भरलेल्या खंदकात टाकली. आठवण म्हणून अर्थात त्यांनी एक टॉमीगन मात्र आपल्या छावणीत परत आणली.

याच युध्दादरम्यान दाखविलेल्या हुशारीसाठी जमादार बोधे आणि कापले यांना MC देण्यात आला. तसेच या युध्दात मेजर कदम हे एका बॉंब हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. हे एक उत्तम धावपटू होते आणि त्यांचे व्यक्तिमत्व फार लोकप्रिय असे होते. त्यांचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला. याच लढाईत मेजर रशीद, सुभेदार डाकोजीराव शिंदे, जमादार बाळकृष्ण माने यांनाही MC देण्यात आली. या हल्ल्यानंतर जर्मानांचे कडवे प्रतिहल्ले होतच होते. त्या हल्ल्यात काबीज केलेल्या ठाण्यांचे संरक्षण हेही महत्त्वाचे काम होते. या कामात जमादार कृष्णा म्हाब्दे आणि नाईक रामचंद्र घाडगे यांना MC व MM देण्यात आले.
नदीचे काठ.
मराठा हल्ला

आता ज्या युध्दभूमीवर दुसरा व्हिक्टोरिया क्रॉस मिळवण्यात आला तेथे काय चालले होते ते बघूया.
९ एप्रिलला सेनीओ नदीच्या कडेला असलेल्या जर्मन सैन्यावर हल्ला चढविण्यात आला. पहिल्यांदा तोफांचा जोरदार भडिमार करण्यात आला. ही जागा होती १-मराठा ज्या ठिकाणी तैनात होती ती. जवळच्या खेड्याचे नाव होते लुगो. लगेचच संध्याकाळी ५ वाजता टॅंक्सनी शत्रूवर हल्ला चढवला. पुढे फ्लेमथ्रोअर्स आणि रणगाडे आग ओकत होते. अर्ध्या तासाने ही आग थांबविण्यात आली आणि मराठ्यांना आक्रमणाचा इशारा देण्यात आला.

A आणि D कंपनी हल्ल्याची आघाडी सांभाळत होत्या. किनार्‍याजवळ ते पोहोचताएत तोच त्यांच्यावर तोफांचा आणि हातबॉंबचा मारा करण्यात आला. या पहिल्याच हल्ल्यात ले. अय्यंगार आणि बरेचजण मृत्यूमुखी पडले. उरलेल्यांनी कशीबशी आपली जागा पकडली. C आणि Y कंपनी लगेचच नदी पार करण्याच्या इराद्याने पुढे आल्या. त्या नदीच्या चढ असलेल्या काठावर त्या बोटी ओढून नेताना त्यांची तारांबळ उडाली. वरून तोफांचा मारा होतच होता. या बोटी ओढून नेताना आणि एकंदरीत शत्रूच्या तोफांचा मारा बघून D कंपनीच्या कमांडर मेजर क्रॉफर्डने एका तुकडीला पायीच नदी पार करायला सांगितली आणि स्वत:ही त्याच्या तुकडीबरोबर तो पाण्यात उतरला. डाव्या बाजूला मेजर हॉवर्ड आणि त्यांच्या तुकडीने नदी पार केली आणि पलिकडच्या किनार्‍यावर पाऊल ठेवल्या ठेवल्या, एक सैनिक सोडून ते सगळे गारद झाले. A आणि C कंपनीतले जे वाचले होते त्यांनी लगेचच त्या तीरावर जागा पकडल्या तर Y कंपनीचे सैनिक मेजर व्हॅन इंगेन यांच्या नेतृत्वाखाली त्या पाण्यात उतरल्या. पोहत त्यांनी ती नदी पार केली आणि पलिकडच्या तीरावर त्यांनी ठिय्या दिला. आता मात्र त्या नदीच्या संपूर्ण पात्रावर शत्रूने जोरदार तोफांचा हल्ला चढवला. यातही बरेच सैनिक मृत्यूमुखी पडले. आपले सैनिक याच तीरावरच्या दोन जर्मन मशीनगन्सला बळी पडताना पाहून जमादार राजाराम भोसले यांनी एका सैनिकाला घेऊन परत नदी पार केली आणि त्या दोन मशीनगन्सचा नाश केला. या शौर्यासाठी त्यांना नंतर MC देण्यात आले.

इकडे उजव्या बाजूला जेथे Y कंपनी नदी पार करण्याचा प्रयत्न करत होती त्याठिकाणी शौर्याची अजून एक नौबत वाजत होती. यासाठीच VC देण्यात आला. तेथे काय घडले ते आपण त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना VC मिळताना जो उल्लेख करण्यात आला त्याच्या भाषांतरातच बघूया –

इटलीमधे १९४५ साली ९ एप्रिलच्या संध्याकाळी, ५-मराठा लाईट इन्फंट्रीने सेनिओ नदीच्या पूर्व किनार्यायवर हल्ला चढविला. ही नदी पोलिटोच्या उत्तरेला आहे. या हल्ल्यानंतर तीन मिनिटांनीच दुसरी कंपनी ही नदी पार करून पश्चिम किनार्‍यावर हल्ला चढवणार होती.

नदीच्या या भागात नदीचे पात्र साधारणत: १५ फूट रूंद व त्या महिन्यात ४ ते ५ फूट खोल असे असते. नदीचे दोन्ही काठ हे नदीच्या पाण्यापासून ३० ते ३५ फूट उंच आहेत. ( म्हणजे ही नदी पार करायला ३० ते ३५ फूट किनारा उतरायचा व परत ३० ते ३५ फूट पलिकडचा किनारा चढायचा.) दोन्ही किनार्‍यावर झाडीत दडलेली जर्मन सैन्याची ठाणी व प्रत्येक ठाण्याच्या अलिकडे भरपूर भूसुरूंग पेरलेले होते.

नामदेव जाधव हे त्या कंपनीचे रनर होते आणि जेव्हा त्यांची कंपनी ही नदी पार करून पाण्याच्या पलिकडे पोहोचली तेव्हा ते त्यांच्या कंपनी कमांडरबरोबर होते. पाण्यातून बाहेर येताच त्यांच्यावर कमीतकमी तीन ठाण्यातून मशीनगन मधून जोरदार मारा करण्यात आला. ते ठाणे होते अलिकडच्या काठावर त्या ३५ फुटी उतारावर लपलेले. नामदेव जाधव सोडून कंपनी कमांडर आणि दोन सैनिक या मार्‍यात जखमी झाले आणि उरलेले ठार झाले. या शूरवीर सैनिकाने जराही विचार न करता जखमींपैकी एका सैनिकाला उचलून त्या पाण्यातून चालत त्या भूसुरूंग पेरलेल्या काठावरून सुरक्षित जागी हलविले. मग त्यांनी दुसरी फेरी केली आणि दुसर्‍या सैनिकाला पण तसेच सुरक्षित ठिकाणी हलविले. या दोन्ही फेर्‍यात त्यांच्या आजूबाजूला गोळ्यांचा अखंड वर्षाव होत होता. मग या शूर सैनिकाने ज्या मशीनगनने त्यांच्या सहकार्‍यांना ठार व जखमी केले होते त्याचा बदला घ्यायचा ठरविला. त्यासाठी त्यांनी परत एकदा ती नदी पार केली आणि त्या मशीनगनवर हल्ला चढवला. पहिल्याच झपाट्यात पहिली मशीनगन थंड पडली. याचवेळी त्यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे त्यांचा हात ती गन धरायला निकामी झाला. तरीही न डगमगता त्यांनी ती टॉमीगन फेकून देऊन उरलेल्या दोन मशीनगनकडे मोर्चा वळवला आणि हातबॉंबचा वर्षाव करून त्या दोन्हीचाही निकाल लावला. हे करताना एक वेळ अशी आली की त्यांचा हातबॉंबचा साठा संपला. बॉंब आणायला त्यांना परत त्या जखमी सैनिकांपर्यंत उघड्यावर चालत जायला लागले.
अशारितीने तिन्ही मशीनगनचा निकाल लावल्यावर त्यांनी त्या उंच काठावर उभे राहून “शिवाजी महाराज की जय “ अशी रणगर्जना केली आणि ओरडून उरलेल्या कंपन्यांना त्या तेथून नदी पार करायला सांगितले. या शूर शिपायाने ना केवळ त्याच्या सहकर्‍यांचे प्राण वाचवले परंतू असे शौर्य गाजवून पूर्व किनारा जिंकण्यास मोठा हातभार लावला याच्यामुळेच त्या भागातील सर्व जर्मन विरोध संपुष्टात आणण्यात यश मिळाले.”
[London Gazette issue 37134 dated 19 Jun 1945, published 15 Jun]

हा बघा तो शूरवीर –

जन्म : १० नोव्हेंबर १९२१, निमाई, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू : २ ऑगस्ट १९६४, पुणे, महाराष्ट्र, भारत.

इटली मधला पुढचा थोडासा सहभाग आणि त्यांची बर्मा मधली कामगिरी पुढच्या भागात.
जयंत कुलकर्णी.
भाग ६ समाप्त.
पुढे चालू.........

संस्कृतीइतिहासकथासमाजविचारलेखमाहिती

प्रतिक्रिया

पुढील भागाची वाट पहात आहे.

जयंत कुलकर्णी's picture

21 Sep 2010 - 4:51 pm | जयंत कुलकर्णी

ही लेखमाला कारगीलच्या योध्द्यांना अर्पण !

जय जवान ! जय किसान !

पैसा's picture

21 Sep 2010 - 4:53 pm | पैसा

आवडलं!

स्वाती२'s picture

21 Sep 2010 - 4:58 pm | स्वाती२

वाचतेय.

जिप्सी's picture

21 Sep 2010 - 4:58 pm | जिप्सी

फार आवड्लं काका ! पहील्या ५ लेखांची लिंक टाकली तर बर होईल, माझे मधले काही भाग वाचायचे राहीलेत.

परत मि.पा.वर लिखाण चालू केल्याबद्दल आभार.

मस्त कलंदर's picture

22 Sep 2010 - 8:39 pm | मस्त कलंदर

माझेही मधले काही भाग वाचायचे राहिले आहेत. तेव्हा आधीच्या भागाच्या लिंक्स दिल्यात तर सर्वांनाच वाचायला बरे पडेल.

मदनबाण's picture

21 Sep 2010 - 6:53 pm | मदनबाण

वाचतोय...

अनामिक's picture

21 Sep 2010 - 7:32 pm | अनामिक

खूप सुंदर लेखन. पुढचे भाग लवकर टाका.

निनाद's picture

22 Sep 2010 - 5:30 am | निनाद

मी मागे ऑस्ट्रेलियन सैनीकांच्या गलिपोली यथील युद्धा विषयी एक कार्यक्रम ऐकत होतो. 'स्टोरीज फ्रॉम गलिपोली'.
(Stories from Gallipoli Presented by Steve Sailah, ABC Audio)
यात सैनिकांच्या मुलाखती आहेत. त्यात एक सैनीक आपली कहाणी सांगतांना म्हणतो की, "भयंकर थंडी होती, पण गरम पाणी मात्र फक्त गोर्‍या सैनीकांनाच घेण्याची मुभा होती."
तुमचे लेखन वाचल्यावर आठवले. थोडक्यात या काळात सैनिकांतही भेदभाव होता आणि 'इतर सैनिकांसाठी''परिस्थिती अजूनच खडतर होती. या पार्श्वभूमीवर आपल्या सैनिकांचे यश अजूनच मोठे आहे हे निश्चित!

ही सीडी माझ्याकडे आहे, कुणाला ऐकण्याची इच्छा असल्यास पाठवू शकेन.

राजे साहेब's picture

22 Sep 2010 - 8:27 pm | राजे साहेब

निनाद

हो खरच पाठवा सीडी लिन्क आवदेल

आभार

निनाद's picture

23 Sep 2010 - 7:12 am | निनाद

पत्ता कळवा मी सी डी पोस्टाने पाठवतो.

पाषाणभेद's picture

22 Sep 2010 - 7:15 am | पाषाणभेद

छान इतिहास आहे. लवकर लिहा.

हा भागही खूप आवडला. इतके दिवस कुठे होता ?