✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

ह
हेमंतकुमार यांनी
Sun, 08/20/2017 - 16:22  ·  लेख
लेख
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
227736 वाचन

💬 प्रतिसाद (589)

प्रतिक्रिया

आभार!

गामा पैलवान
Fri, 08/20/2021 - 14:56 नवीन
धागा जिवंत ठेवल्याबद्दल धन्यवाद! :-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

टोपलीचं झाकण उघडा.

कंजूस
Fri, 08/20/2021 - 17:46 नवीन
धागा डोलतो.
  • Log in or register to post comments

प्लॅटफॉर्म तिकीट

हेमंतकुमार
Sat, 08/21/2021 - 15:31 नवीन
Platform Tickets चे फायदे, तिकिटाशिवायही करता येतो प्रवास, काय आहेत नियम आणि कायदे? https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/news/india/platform-tickets-have-many-benefits-how-you-can-travel-in-train-without-ticket-know-rules-regulations-999751/amp?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16295338471120&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fplatform-tickets-have-many-benefits-how-you-can-travel-in-train-without-ticket-know-rules-regulations-999751 हे माहीत नव्हते. कुणाला हा अनुभव ?
  • Log in or register to post comments

मला नाही पण ....

गामा पैलवान
Sat, 08/21/2021 - 18:12 नवीन
कुमारेक, मला याचा अनुभव नाही. पण आमच्या ओळखीच्या एकांचा अनुभव आहे. त्या जोडप्याला अचानक गाडी पकडावी लागली. कोणाचीतरी प्रकृती गंभीर झाल्याने अचानक निघावं लागलं. त्यामुळे तिकीट वगैरे काढायला वेळ मिळाला नाही. गाडी फलाटावर लागली होती. त्यांनी गार्डकडे जाऊन त्याच्याकडून परवानगी घेतली. अपवादात्मक प्रसंगी गार्डकडून विनातिकीट प्रवासाची अनुमती घ्यायची सोय असते. नंतर तिकीट तपासनीसाने रीतसर तिकीट काढून दिलं. दंड वगैरे काही न आकारता यथोचित भाडं घेतलं. माझ्या मते गार्ड त्याच्या गाडीत कोणालाही घेऊ शकतो. अगदी विनातिकीट प्रवासी असला तरी. मात्र तो प्रवाशास तिकीट काढायला भाग पाडू शकतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

+१

गॉडजिला
Sat, 08/21/2021 - 20:00 नवीन
उपयुक्त माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

या बातमीबद्दल साशंक आहे.

कंजूस
Sun, 08/22/2021 - 13:14 नवीन
त्या प्रवाशाची कहाणी पटल्याने तिकिट दिले असेल. ------------ करोना नसताना साधे सेकंड क्लासचे तिकिट काढून आम्ही दुपारच्या हैदराबाद एक्सप्रेसच्या स्लिपरमध्ये ( S6 bogie )पुण्याला जाण्यासाठी बसलो होतो. ( ही बोगी मुंबई ते पुणेसाठी अनरिझव ठेवलेली असते. तिकिट तपासनीस तिकिट देतो.) बाकी platform ticket आताही देतात. ( कोणाला सोडायला / घेण्यासाठी विचारल्यावर त्यांनी खरी कहाणी ऐकवल्याने तिकिट मिळाले.) बाकी पुढे तिकिट चेकरची मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मी असंख्य वेळेस मुंबई पुणे

सुबोध खरे
Mon, 08/23/2021 - 10:33 नवीन
मी असंख्य वेळेस मुंबई पुणे प्रवास महालक्ष्मी एक्सप्रेस च्या S ६ किंवा चेन्नई एक्स्प्रेसच्या S ५ मधून केलेला आहे. जेंव्हा शक्य होते तेंव्हा मी आरक्षण करत असे. अन्यथा दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढून या डब्यात चढत असे आणि तेथे टी सी कडून वरचे पैसे भरून रीतसर तिकीट घेत असे. हे डबे पुणे कोल्हापूर / पुणे चेन्नई प्रवाशांसाठी राखीव असतात आणि ते मुंबई ते पुणे रिकामे जातात, येथे आपल्याला अगदी आदल्या दिवशी हमखास तिकीट मिळतंच. मी त्या स्लीपर वर झोपून जात असे. आणि पुण्याला चढणारे प्रवासी हा कोण आपल्या बर्थवर झोपला आहे हे टेन्शन घेऊन मला उठवत असत. मला नेहमी हसू येत असे. कारण मी काही बोलण्याच्या अगोदरच ते आपले आरक्षणाचे तिकीट दाखवून जागेवर हक्क प्रस्थापित करण्याच्या मागे असत. छान तीन तास झोप घेऊन रात्री १२ वाजता पुण्याला पोचून मी आपल्या मेस मध्ये जाऊन परत झोपत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी त्या स्लीपर वर झोपून जात

गॉडजिला
Mon, 08/23/2021 - 11:00 नवीन
मी त्या स्लीपर वर झोपून जात असे. आणि पुण्याला चढणारे प्रवासी हा कोण आपल्या बर्थवर झोपला आहे हे टेन्शन घेऊन मला उठवत असत. मला नेहमी हसू येत असे. कारण मी काही बोलण्याच्या अगोदरच ते आपले आरक्षणाचे तिकीट दाखवून जागेवर हक्क प्रस्थापित करण्याच्या मागे असत.
वा… मि अनेकदा पुण्याहुन एस५ अथवा सहाने मुंबै गाठतो. आपल्याकडे तिकिट असेल अन वरुन टिसिला विस रुपये दिले कि विषय मिटला जास्त बोलत बसायचे नाही अन्यथा पावती फाटणार हे नक्कि. तरीही काही मुली मला विचारत माझे रिजर्वेशन आहे का बिंधास्त हो म्हणायचे नाही म्हटले की आमचं आहे तुम्हि दुसरीकडे जा असं हटकुन बोलायच्या… ज्यांच रिजर्वेशन आहे ते तुमच रिजर्वेशन आहे का विचारायच्या फंदात आजिबात पडत नाहीत सरळ आमचा बर्थ आहे सांगुन मोकळे होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

platform ticket दर

कंजूस
Sun, 08/22/2021 - 13:16 नवीन
वेगवेगळा आहे. सूरतला पन्नास रुपये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

गा.पै. ,

हेमंतकुमार
Sat, 08/21/2021 - 18:24 नवीन
अपवादात्मक प्रसंगी गार्डकडून विनातिकीट प्रवासाची अनुमती घ्यायची सोय असते.
उपयुक्त माहिती, आभार !
  • Log in or register to post comments

किरकोळ सवलत

हेमंतकुमार
Sun, 08/22/2021 - 08:27 नवीन
नवीन 3AC इकॉनॉमी वर्गाचे भाडे निराशाजनक. ३०० किमी पर्यंत 3AC पेक्षा काहीच फरक नाही. https://www-railpost-in.cdn.ampproject.org/v/s/www.railpost.in/indian-railways-declares-new-3ac-economy-fare-offers-tiny-reduction-over-3ac-for-cramped-coaches/amp/?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16295835738218&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.railpost.in%2Findian-railways-declares-new-3ac-economy-fare-offers-tiny-reduction-over-3ac-for-cramped-coaches%2F 3AC चे भाडे = स्लीपर X २.६ 3AC इकॉनॉमी = स्लीपर X २.४. किरकोळ सवलत . स्लीपरचा प्रवासी इकडे आकर्षित होणे अवघड दिसते.
  • Log in or register to post comments

प्रगती

हेमंतकुमार
Wed, 08/25/2021 - 15:18 नवीन
भारतीय रेल्वे मध्ये नवप्रज्ञेचा (AI) वाढता वापर होणार आहे. त्यादृष्टीने काही अधिकाऱ्यांना आय आय टी, आय आय एम , आयएसबी इत्यादी संस्थांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. https://www.analyticsinsight.net/how-does-indian-railways-leverage-artificial-intelligence-to-boost-customer-experience/
  • Log in or register to post comments

भाऊपूर-नवीन खुर्जा मार्गाचे उद्घाटन

निनाद
गुरुवार, 08/26/2021 - 06:34 नवीन
पंतप्रधान मोदींनी पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या नवीन भाऊपूर-नवीन खुर्जा या ३५१ किलोमीटरच्या मार्गाचे उद्घाटन केले. हा मार्ग पंजाबच्या लुधियानाला पश्चिम बंगालमधील डानकुनीशी जोडतो याला ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असे नाव आहे. हा १८७५ किलोमीटरचा भव्य मार्ग विस्तार आहे. समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर विकसित करण्याची योजनेचे कार्य २०१४ नंतर सुरू झाले त्यानंतर मोदी सरकारने ११०० किलोमीटर मार्ग बांधला गेला आहे. हे कार्य अजूनही वेगाने चालले आहे. सध्या मालगाड्यांना प्रवासी गाड्यांपेक्षा प्राधान्य मिळत नाही. त्यामुळे जास्त गाड्या चालवण्यावर बंधने आहेत. माल वाहतुकीवर याचा परिणाम होतो. समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर एकदा पूर्ण झाल्यावर, मालवाहतुकीच्या किमान ७० टक्के गाड्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नेटवर्कवर हस्तांतरित केल्या जातील. या सर्व मार्गांचे विद्युतीकरण चालले आहे. विद्युतीकृत रेल्वे मार्ग मालवाहू गाड्यांना जास्त भार ओढताना वेग तीन पटीने वाढू शकतो.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 08/26/2021 - 08:23 नवीन
हा १८७५ किलोमीटरचा भव्य मार्ग विस्तार आहे.
छानच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

जबरी

फारएन्ड
गुरुवार, 08/26/2021 - 21:55 नवीन
जबरी महाकाय प्रोजेक्ट आहे हा! याची एक क्लिप काही महिन्यांपूर्वी पाहिल्यापासून प्रचंड इण्टरेस्ट आहे याबद्दलच्या माहिती मधे. यात अजून महत्त्वाचे म्हणजे, मालवाहतुकीबद्दल नेमकेपणा येइल लागणारा वेळ, माल कधी पोहोचू शकेल याबद्दल. मी वाचले त्याप्रमाणे जेव्हा खात्रीशीर व वक्तशीर डिलीव्हरी हवी असते तेव्हा रेल्वेचा वापर सध्या तितकासा होत नाही. या कॉरिडॉर मुळे रेल्वेची मालवाहतूक तर वाढेलच पण भारतीय उद्योगधंद्यांनाही त्याचा प्रचंड फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

वेग

निनाद
Fri, 08/27/2021 - 06:26 नवीन
मालगाड्यांचा वेग स्वतंत्र भारतात जास्तीत जास्त ताशी २५(!) राहिला आहे. गेल्या साठ वर्षात मालवाहतुकीत प्रवासी वाहतुकीच्या मानाने सुमारे ८५% घसरण झाली आहे. ही भरून काढण्यासाठी हे प्रयत्न चालले आहेत. कॉरिडॉर मुळे वेग ७५ तरी करण्याचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

मुबई वाडी बंदर ते शालिमार

सुबोध खरे
Fri, 08/27/2021 - 11:26 नवीन
मुबई वाडी बंदर ते शालिमार कलकत्ता किंवा मद्रास सॉल्ट कोटुर येथे सुपर एक्सप्रेस गुड्स ट्रेन्स चालत असत. त्या ४ दिवसात खात्रीशीर गंतव्य स्थानी माल पोचवत असत. मुंबई कलकत्ता १९६८ किमी मुंबई मद्रास १२५० किमी. म्हणजे २० किमी किंवा साडे बारा किमी सरासरी वेग. बाकी मालगाड्या कितीही दिवस घेत. मुंबई चेन्नई मार्ग अजूनही पूर्ण दुहेरी झालेला नाही आणि त्याचे विद्युतीकरणही अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे मधल्या विभागात गाडीला इलेक्ट्रिक इंजिनाच्या पुढे डिझेलचे इंजिन लावावे लागते. ७० वर्षात दक्षिण भारताकडे रेल्वेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. रेल्वे हे रेल्वे मंत्रालयाचे खाजगी संस्थान असल्यासारखे चालवले जात होते त्याचा हा परिपाक होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

+१

हेमंतकुमार
Fri, 08/27/2021 - 11:57 नवीन
<दक्षिण भारताकडे रेल्वेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे.> विशेषता केरळमध्ये तर अधिकच दुर्लक्ष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

केरळचा प्रश्न अगदी वेगळा आहे.

सुबोध खरे
Fri, 08/27/2021 - 12:11 नवीन
केरळचा प्रश्न अगदी वेगळा आहे. तेथे लोकसंख्येची घनता फार जास्त असून कम्युनिस्ट विचार सरणीमुळे जमीन संपादन करणे भयंकर कटकटीचे आहे त्याशिवाय घरं खेडी आणि पाणथळ भाग टाळून रेल्वे मार्ग काढावा लागत असल्याने तो फार जास्त वळणावळणांचा झाल्यामुळे तेथे रेल्वेचा वेग फारसा वाढवता येत नाही. अगदी तिरुवनंतपूरम राजधानी एक्स्प्रेस सुद्धा केरळ मध्ये सरासरी ५०-५५ वेगाने धावते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

+१

वामन देशमुख
Sun, 08/29/2021 - 23:51 नवीन
७० वर्षात दक्षिण भारताकडे रेल्वेचे अक्षम्य दुर्लक्ष
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कॅमेरा सुरक्षा

हेमंतकुमार
गुरुवार, 08/26/2021 - 15:15 नवीन
भारतीय रेल्वेने रशियन बनावटीच्या Ntechlab या प्रकारच्या कॅमेरा सुरक्षा यंत्रणा गुजरात व महाराष्ट्रात काही ठिकाणी बसवल्या आहेत. यामध्ये प्रवाशांचे चेहरे ओळखण्याची सोय आहे. या यंत्रणांचा उपयोग खालील कामांसाठी होणार आहे : प्रवाशांची मोजणी वाहतूक नियंत्रण हरवलेल्या व्यक्ती आणि गुन्हेगारांचा शोध https://eurasiantimes-com.cdn.ampproject.org/v/s/eurasiantimes.com/indian-railways-start-using-russian-face-recognition-technology-by-ntechlab-reports/?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16299705961053&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Feurasiantimes.com%2Findian-railways-start-using-russian-face-recognition-technology-by-ntechlab-reports%2F
  • Log in or register to post comments

Heritage Train| Patalpani to Kalakund Track

मदनबाण
Sun, 08/29/2021 - 22:10 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Aap Kiske Vanshaj Hain | Manoj Muntashir Live Latest | Hindi Poetry
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

हेमंतकुमार
Sun, 08/29/2021 - 23:07 नवीन
हंपी ऑन व्हील्स लवकरच चालू होतेय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गोल्डन चॅरियेट ट्रेन टूर

निनाद
Mon, 08/30/2021 - 05:17 नवीन
सुवर्ण रथ रेल्वे कर्नाटकचे ६ नाईट प्राइड, दख्खनच्या ५ नाइट ज्वेल आणि ३ रात्री कर्नाटकची झलक अशा सहली नेते. पुढील सहल ऑक्टोबर मध्ये दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

विडिओ आवडला.

कंजूस
Mon, 08/30/2021 - 08:56 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सफर

हेमंतकुमार
Tue, 08/31/2021 - 11:08 नवीन
बंगाल मध्ये नवी जंगल सफर ट्रेन ! https://www-moneycontrol-com.cdn.ampproject.org/v/s/www.moneycontrol.com/news/india/indian-railways-launches-a-new-toy-train-safari-on-darjeeling-himalayan-railway-route-7409731.html/amp?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16303876657325&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.moneycontrol.com%2Fnews%2Findia%2Findian-railways-launches-a-new-toy-train-safari-on-darjeeling-himalayan-railway-route-7409731.html
  • Log in or register to post comments

वंदे भारत

हेमंतकुमार
Tue, 09/07/2021 - 12:26 नवीन
वंदे भारत ट्रेन्सचे उत्पादन वाढत आहे. काही रोचक माहिती इथे https://m.timesofindia.com/business/india-business/vande-bharat-express-new-trains-indian-railways-icf-mcf-rcf-production-target/amp_articleshow/85976852.cms या ट्रेन्स ना ट्रेन 18( 2018साली तयार झाल्या म्हणून) असेही म्हणतात. त्यांचे आधीचे नाव शताब्दी किलर्स असे ठरले होते !
  • Log in or register to post comments

दोन विडिओ

कंजूस
Wed, 09/08/2021 - 09:41 नवीन
फ्रान्स ( पारीतील ) मेट्रो प्रवास. (कात्रा )वैष्णोदेवी वंदे भारत ट्रेन.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 04:12 नवीन
दोन्ही चित्रफिती छान आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नुकसान भरपाई !

हेमंतकुमार
गुरुवार, 09/09/2021 - 04:11 नवीन
रेल्वे नियोजित वेळेपेक्षा चार तास उशीरा पोहोचल्यामुळे त्यातील एका प्रवाशाचे पुढील विमान चुकले. त्यावर त्याने दावा दाखल केला होता. अखेर तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाच्या निर्णयानुसार या व्यक्तीला रेल्वेने तीस हजार रुपये नऊ टक्के व्याजासह भरपाई द्यायची आहे. असा हा महत्त्वपूर्ण निर्णय ! https://www.moneycontrol.com/news/india/train-delay-railways-to-pay-rs-30000-to-man-who-missed-flight-7442971.html
  • Log in or register to post comments

आधार क्र..

हेमंतकुमार
Sun, 09/12/2021 - 10:06 नवीन
रेल्वे तिकीट ऑनलाईन काढताना आधार किंवा पॅन क्रमांक विचारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
  • Log in or register to post comments

गरज काय?

गामा पैलवान
Mon, 09/13/2021 - 17:25 नवीन
प्रवासासाठी आधार वा प्यानची नेमकी गरज काय? हा घटनेने दिलेल्या संचारस्वातंत्र्याचा संकोच आहे. प्रवासी पैसे भरून प्रवास करतोय. फुकटांत नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बहुतेक

हेमंतकुमार
Mon, 09/13/2021 - 18:08 नवीन
दलाल मंडळींच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी असं काहीसे त्या बातमीत म्हटलं आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बरोबर

गॉडजिला
Mon, 09/13/2021 - 18:47 नवीन
तपासनीस आयडी प्रूफ मागतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पुरावा वेगळा आणि आधारप्यानची सक्ती वेगळी

गामा पैलवान
Mon, 09/13/2021 - 22:27 नवीन
गॉडझिला, तुम्ही गॉडझिला आहात याचा पुरावा म्हणून आधार वा प्यान देणं वेगळं. आणि पुरावा म्हणून आधार वा प्यानची सक्ती करणं वेगळं. ओळखीचा पुरावा इतर काही असू शकतो. उदा. पूर्वी मुंबईत लोकलचा पास काढण्यासाठी ओळखपत्र काढावं लागे. तो ओळखीचा पुरावा आहे. किंवा मतदान आयोगाने जारी केलेलं ओळखपत्र हा ही पुरावा आहे. आधार वा प्यान ची सक्ती होता कामा नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

सक्ती कुठाय ?

गॉडजिला
Mon, 09/27/2021 - 13:00 नवीन
फिरा की खाजगी वाहन अन् ड्रायवर भाड्याने घेऊन हवे तिथे हवे तसे... तुम्हाला स्वस्त सरकारी (?) रेल्वे हवी पण तिकीट काढले एकाने प्रवास दुसरा करतोय हा गैरप्रकार टाळायला तुम्हाला आधार लिंक केल्याने काय नुकसान आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बातमीनुसार सक्ती आहे

गामा पैलवान
Mon, 09/27/2021 - 14:17 नवीन
गॉडझिला, मूळ बातमीच्या मथळ्यात .... now these documents will have to be given असं लिहिलंय. म्हणजे सक्ती आहे. मात्र खालील मजकुरात .... IRCTC may also ask you for PAN, Aadhaar or passport information अशी संदिग्ध शब्दरचना आहे. माझा मुद्दा अध्यार, आयकर क्रमांक, पारपत्र या तिघांच्या सक्तीच्या विरोधात आहे. इतर कुठलंही सरकारी ओळखपत्र चालून जायला पाहिजे. विशेषत: रेलवेने जारी केलेलं ओळखपत्र तर चालायलाच पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

आपल्या मुद्याशी मी थोडा थोडा सहमत आहे कारण हेतु योग्य आहे.

गॉडजिला
Mon, 09/27/2021 - 14:44 नवीन
संधिग्द रचना आजकाल नॉर्मल गोश्ट आहे न्युजपत्रांच्या बाबतीत. त्याना पेजहिट्स हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

खरं म्हणजे

कंजूस
Mon, 09/13/2021 - 21:37 नवीन
तिकिट काढणारा प्रवासात असला तर दलाल जातील असं वाटायचं. पण तो नियम अशक्य कारण बरेचदा ज्येष्ठ नागरिकांची तिकिटं नातेवाईकांनी काढून दिलेली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ते होतंच अगोदरपासून ना?

कंजूस
Mon, 09/13/2021 - 21:32 नवीन
म्हणजे की खिडकीवर प्रिंटेड तिकिट काढताना लागत नाही फण प्रवासात कोणतेतरी ओळखपत्र {विचारल्यास} दाखवावे लागते. ओनलाईन साठी बुकिंग करतांना जे लिहिलं तेच दाखवावं लागायचं. पाच महिन्यांपूर्वी irctc site ला आधार verification होतं. तीन महिन्यांपूर्वी email verification वाढवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

...

हेमंतकुमार
Mon, 09/13/2021 - 21:45 नवीन
आता ऑनलाईन तिकीट काढायच्या वेळेसच ते आधार क्रमांक ,ओटीपी असं काहीतरी मागून खातरजमा करणार असे दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ऑनलाईन तिकीट काढायच्या अगोदरच

कंजूस
Mon, 09/13/2021 - 23:08 नवीन
बुकिंग - सर्च ट्रेनवर गेलं की लगेच verify - 1,2,3,4 ..... येतं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

भारतीय रेल्वे कात टाकणार!

हेमंतकुमार
Wed, 09/22/2021 - 11:58 नवीन
५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रममुळे ‘फोर-जी’ नेटवर्क प्रत्यक्षात येणार आहे... रेल्वेच्या सिग्नल व संदेश यंत्रणांमधील आधुनिकीकरण समजावून सांगणारा एक चांगला लेख.
  • Log in or register to post comments

पुस्तक

कंजूस
गुरुवार, 09/23/2021 - 21:20 नवीन
पुस्तक भारतात ८० रेल्वेंतून प्रवास - अनुभव. Around India In 80 Trains ISBN Search
  • Log in or register to post comments

पुस्तक

कंजूस
Fri, 09/24/2021 - 04:30 नवीन
पुस्तक भारतात ८० रेल्वेतून प्रवास - अनुभव. Around India In 80 Trains ISBN Search
  • Log in or register to post comments

वा

हेमंतकुमार
Fri, 09/24/2021 - 11:45 नवीन
छान दिसतय पुस्तक. कुणी वाचले तर त्यावर लिहा. .............................. रेल्वेच्या संगणकीय तिकीट आरक्षण यंत्रणेतील एक मोठा दोष बारावीत शिकणाऱ्या मुलाने उघडकीस आणला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अभिनंदन !
  • Log in or register to post comments

मी घेतलंय.

कंजूस
Fri, 09/24/2021 - 12:33 नवीन
William. Darlympleचा चांगला अभिप्राय आहे. अमेझोनवर used books स्वस्त मिळतात वाटतं. Around the world in 80 daysवरून स्फूर्ती घेऊन लिहिलंय लेखिकेने. कामाचं/ विनोदी असल्यास थोडक्यात लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

Around India in 80 days

कंजूस
Fri, 10/01/2021 - 07:14 नवीन
एक चांगलं पुस्तक झालं असतं. लेखिकेचे निरीक्षण, सांगण्याची कला आणि विनोदबुद्धी यामुळे वाचायला मजा येते. वेगवेगळ्या ट्रेन्समधून प्रवास करून थोडेफार स्थळदर्शन यावर लिहून काम भागले असते असते. दहा बारा प्रकारच्या घेऊन हे साध्य झाले असते. पण दोन कारणांमुळे सगळा कार्यक्रम भोंगळ झाला. एक म्हणजे Around the world in 80 days या जुन्या गाजलेल्या पुस्तकाचे उदाहरण समोर ठेवून ८० गाड्यांतून उगाचच प्रवास केला. तो करायचा म्हणून केला आणि तोही टु टिअर स्लीपरमधून. ज्यातून भारतातील सामान्य जनता प्रवास करत नाही. शिवाय नाट्यमय घटना अशा काहीच नाहीत. दुसरी चूक - पासपॉत हे पात्र सहकारी आणि सहप्रवासी म्हणून निवडण्यातली चूक. भांडणं झाली. एकूण ही योजना कशी तरी पूर्ण केली पण अर्ध्या प्रवासानंतर ते दोघे वेगळे झाले. लेखिकेने एकट्यानेच शेवटच्या चाळीस गाड्यांतून प्रवास केला. शेवटी सर्व त्रासाचे निराकरण हैदराबादच्या विपश्यना केंद्रात दहा दिवस काढून केले. ते प्रकरण कंटाळवाणं झालं. एक चांगलं होणारं पुस्तक पॉसपॉतमुळे गळपाटलं. पुस्तकाची किंमत वीस डॉलर ही फार वाटते कारण खूप खर्च आला चार महिने प्रवास आणि राहाणे,खाण्यावर. महाराजा ट्रेनस- डेक्कन ओडिसीचं ( मुंबई ते दिल्ली) आठ दिवसांचं तिकिट आताच साडेसात लाख रुपये आहे. म्हणजे २०१२मध्ये पाचसहा लाख असावे. त्यातले जे इतर प्रवासी होते त्यातल्या बऱ्याच जणांना कोणत्यातरी टिव्ही कार्यक्रमांत या गाडीचा प्रवास बक्षिस मिळाला होता. सर्व परदेशी होते आणि एकच दिल्लिचा टुअर एजंट होता. कमी वेळात टार्गेट ट्रिपस बुक केल्याने त्यास ही ट्रिप फुकट मिळालेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

गतिमान व लोभस...

हेमंतकुमार
Wed, 09/29/2021 - 19:43 नवीन
युरोपमधील उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन असलेली ही टीजीव्ही ट्रेन : Image removed. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ही ट्रेन तिथे वापरात आली आणि त्यातून गतिमान शब्दाला एक नवाच अर्थ प्राप्त झाला. युरोप भेटीमध्ये अनेक जण या ट्रेनला भेट देत असतात
  • Log in or register to post comments

कुमारेक,

गामा पैलवान
गुरुवार, 09/30/2021 - 15:25 नवीन
कुमारेक, माहितीबद्दल धन्यवाद! :-) गाडी वेगाने हाकण्यासाठी हिला साधारणपणे विजेची इंजिने असंत. मात्र तरीही गॅस टर्बाईन वर चालणारं एक टर्बोगॅस इंजिन प्रारूप फ्रान्समध्ये अनेक गाड्यांवर १९९० पर्यंत वापरात होतं. Image removed. संदर्भ : https://retours.eu/en/36-tres-grande-vitesse-turbotrain-TGV/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा