✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

ह
हेमंतकुमार यांनी
गुरुवार, 06/28/2018 - 10:02  ·  लेख
लेख
सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला. तो आधुनिक वैद्यकातील एक मूलभूत आणि महत्वाचा शोध असल्याने त्याच्या संशोधकाला त्याबद्दल नोबेल परितोषिक बहाल केले गेले. या लेखात आपण ‘क’ चा शोध, त्याचे आहारातील स्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाचे परिणाम यांची माहिती घेऊ. शेवटी नवीन संशोधन, समज-गैरसमज आणि काही वादग्रस्त मुद्द्यांचा आढावा घेईन. आहारातील स्त्रोत: Citrus गटातील फळे म्हणजेच आवळा, लिंबू, संत्रे इ. याचे मुख्य स्त्रोत. त्यापैकी आवळा हा सर्वोत्तम म्हणता येईल. पण लिंबू हे स्वस्त आणि नेहमी उपलब्ध असल्याने ते सहज आणि सर्वांना मिळू शकते. या फळांतून ‘क’ व्यवस्थित मिळण्यासाठी ती ताज्या व कच्च्या स्वरूपात खाल्ली पाहिजेत. 'क' हे उष्णतेने लगेच नाश पावते. म्हणून शिजवलेल्या अन्नातून ते मिळणार नाही. आपला भात,वरण, तूप, मीठ व लिंबू हा पारंपरिक आहार परिपूर्ण आहे. फक्त त्यात लिंबू पिळताना पानातील भात व वरण हे कोमट झालेले असावेत. लिंबाचे लोणचे हा प्रकार मात्र त्यातील ‘क’ छान टिकवून ठेवतो. ‘क’ च्या शोधाचा इतिहास: आपल्याला ‘क’ मिळण्यासाठी ताज्या फळांचे सेवन किती महत्वाचे आहे हे आपण जाणतो. १-२ शतकांपूर्वी सैनिकांना जहाजातून दीर्घ युद्धमोहिमांवर पाठवले जाई. तेव्हा आहारातील फळांच्या अभावाने ते सर्व खूप आजारी पडत. तेव्हा या समूह-आजाराला “Sailor’s scurvy” असे म्हटले गेले. पुढे संशोधनातून ‘क’च्या गोळ्या तयार झाल्या आणि त्या नौसैनिकांना मोहीमेवर नियमित द्याव्यात असा विचार पुढे आला. नेपोलियन व नेल्सनचे प्रसिद्ध युद्ध झाले त्यात नेल्सनच्या सैनिकांना ‘क’ नियमित दिलेले होते तर नेपोलियनच्या नाही. त्यामुळे नेल्सनने जो ऐतिहासिक विजय मिळवला त्यात त्याच्या डावपेचांच्या बरोबरीने ‘क’ चा वाटाही महत्वाचा होता ! त्यानंतर ‘क’ च्या गोळ्या अशा मोहिमांवरील सैनिकांना नियमित दिल्या जाण्याची पद्धत पडली. शरीरातील कार्य: १. ‘क’ चे सर्वात महत्वाचे कार्य हे शरीर-सांगाड्याच्या बळकटी संबंधी आहे. ही बळकटी Collagen या प्रथिनामुळे येते. हे प्रथिन शरीरात सर्वत्र आहे पण मुख्यतः ते हाडे व रक्तवाहिन्यांमध्ये असते. ‘क’ त्याला बळकट करते. २. आहारातील लोहाचे व्यवस्थित शोषण होण्यातही ‘क’ची भूमिका महत्वाची आहे. विशेषतः शाकाहारातील लोहाच्या शोषणात ती अधिक महत्वाची आहे. ३. त्याचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते antioxidant आहे. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘क’ आणि त्याच्या जोडीने ‘इ’ व ’अ’ या जीवनसत्वांचे योगदान मोलाचे आहे. ४. आपली सर्वसाधारण प्रतिकारशक्ती मजबूत करण्यातही त्याचा मोठा वाटा आहे. अभावाने होणारा आजार(Scurvy) : आहारात ताजी फळे व भाज्यांचे सेवन नियमित असल्यास सहसा ‘क’ चा अभाव होत नाही. हा भाग एकट्या रहाणाऱ्या व्यक्ती, वसतीगृहातील मुले इ. च्या बाबतीत दुर्लक्षिला जातो. अशा कमतरतेतून होणाऱ्या अभावाला ‘bachelor’s scurvy’ असे म्हणतात. या व्यतिरिक्त कुपोषण वा आतड्यांचा दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्ती ,गरोदर स्त्रिया आणि फक्त गाईच्या दुधावर पोसलेली तान्ही बालके यांत हा अभाव होण्याची शक्यता जास्त असते. अभावाचे परिणाम असे असतात: १. हिरड्यांचा दाह होणे, सुजणे वा त्यातून रक्तस्त्राव होणे २. त्वचेखाली व अन्यत्रही रक्तस्त्राव होणे ३. जखमा लवकर न भरणे ४. सांधेदुखी ५. अशक्तपणा व थकवा. pict (चित्रः जालावरुन साभार ) औषधरूपातील ‘क’ आणि आजार प्रतिबंध : ‘क’ हे पाण्यात विरघळणारे असल्याने ते औषधरुपात जरी गरजेपेक्षा जास्त घेतले तरी बिघडत नाही. शरीराला गरज नसलेला जास्तीचा भाग लघवीतून बाहेर पडतो. त्याच्या या गुणधर्माचा गैरफायदा वैद्यकात बऱ्याचदा घेतला गेला आहे. आयुष्यात अनेक दीर्घकालीन कटकटीचे आजार आपल्याला सतावतात. त्यांच्यावर उपचार म्हणून विविध उपचारपद्धतींची औषधे आपण घेतो. तरीसुद्धा बऱ्याचदा रुग्णाचे पुरेसे समाधान होत नाही. तो कमीअधिक प्रमाणात पिडलेलाच असतो. मग अशा आजारांमध्ये पूरक उपचार म्हणून ‘क’ चा वापर केला जातो. त्याला फारसा शास्रीय पाया नसतो. पण, ‘क’चा एखादा गुणधर्म त्या आजारात “उपयोगी पडू शकेल” अशा आशेने ते मोठ्या डोसमध्ये दिले जाते. कधी आजार-प्रतिबंध म्हणून तर कधी ‘रामभरोसे’ उपचार म्हणून. त्यातूनच पुढे समाजात त्याबद्दलचे गैरसमज पसरतात. मग त्याचा उठसूठ गैरवापर होऊ लागतो. आता अशा आजारांची यादी बघूया: १. सर्दी-पडसे २. कर्करोग ३. हृदयविकार ४. मोतीबिंदू व दृष्टीपटलाचे काही आजार ५. उच्च रक्तदाब . यातील सर्दी वगळता बाकीच्या यादीकडे पाहिल्यास वाचकांच्या भुवया लगेचच उंचावतील ! तेव्हा त्यातील दोन आजारांचे वास्तव समजून घेऊ. १. सर्दी : वरवर ‘साधा’ दिसणारा पण रुग्णास अगदी सतावणारा हा आजार. ऋतुबदलातील सर्दी तर बहुतेक सर्वांना होणारी. त्यावर नक्की उपाय काय हा अगदी पेचात टाकणारा प्रश्न. ‘क’ आपली साधारण प्रतिकारशक्ती वाढवते या तत्वास अनुसरून सर्दीच्या रुग्णांवर त्याचे प्रयोग झाले. त्यांचे निष्कर्ष उलटसुलट. आजमितीस एवढे म्हणता येईल की सर्दीचा प्रतिबंध काही ‘क’ देण्याने होत नाही. पण ती झाली असता तिची तीव्रता व कालावधी त्याच्या डोसने कमी होऊ शकतो. २. कर्करोग : हा तर गंभीर आजार. त्याचे विविध उपचारही अंगावर काटा आणणारे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर संशोधनाचे लक्ष्य केंद्रित होणे स्वाभाविक आहे. गेल्या शतकापासून अनेकांनी त्यासाठी ‘क’ चा वापर करून पाहिला आहे. अलीकडे या रोगाच्या केमोथेरपी बरोबर ‘क’ चे पूरक उपचार करण्याचेही प्रयोग झाले आहेत. त्यांचे निष्कर्ष अद्याप तरी दखलपात्र नाहीत. वरच्या यादीतील अन्य आजारांबाबतही यासंदर्भात कोणतेही ठाम विधान करता येत नाही. अनेक उलटसुलट दावे आणि अपुरे संशोधन यामुळे ‘क’ आणि गंभीर आजारांचा प्रतिबंध हा विषय सध्या वादग्रस्त आहे. ...... तर असे हे Ascorbic acid उर्फ ‘क’. स्वतः ‘तब्बेतीने’ नाजूक आहे खरे, पण आपल्याला कसे बळकट करून जाते ! ********************************************* पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ, पुणे.

Book traversal links for ‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

  • ‹ ड’ जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता ( उत्तरार्ध)
  • Up
  • कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
58199 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

रोहिणीतील रक्ताचा पी एच

हेमंतकुमार
गुरुवार, 07/05/2018 - 20:27 नवीन
तपासून तो ७.३५ पेक्शा कमी असल्यासच (दीर्घकाळ ) Metabolic acidosis चे निदान होते. हा मूलभूत मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments

कुमार१ आणि खरे दोघांचे आभार.

charming atheist
गुरुवार, 07/05/2018 - 23:21 नवीन
कुमार१ आणि खरे दोघांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख!

Nitin Palkar
गुरुवार, 07/05/2018 - 21:15 नवीन
नेहमी प्रमाणेच उत्तम लेख!
  • Log in or register to post comments

मस्तं चालली आहे व्हिटॅमिन क

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/05/2018 - 21:23 नवीन
मस्तं चालली आहे व्हिटॅमिन क वरची चर्चा ! हा अत्यंत उपयिक्त धागा बनला आहे !
  • Log in or register to post comments

व्हिटॅमिन C बद्दल अतिशय उपयुक्त माहिती ....

डॉ श्रीहास
Wed, 07/11/2018 - 12:28 नवीन
सर्वात महत्वाचा मुद्दा : सर्दीसाठीबद्दल चा गैरसमज दूर केलात, कारण किमान १० जणांना तरी रोज सांगतो की लिंबं, आवळे आणि पेरू खात जा !!
  • Log in or register to post comments

डॉ श्रीहास,

हेमंतकुमार
Wed, 07/11/2018 - 12:35 नवीन
धन्यवाद ! सहमत.
  • Log in or register to post comments

अजून एक ...

हेमंतकुमार
Wed, 07/11/2018 - 12:47 नवीन
डॉ श्रीहास, क' ने सर्दीची तीव्रता कमी होण्याबाबत तुमचा अनुभव असल्यास जरूर लिहा
  • Log in or register to post comments

व्हिटॅमिन C मुळे ॲलर्जीसदृष्य लक्षणं नक्कीच कमी होतात...

डॉ श्रीहास
Wed, 07/11/2018 - 13:18 नवीन
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3643615/
  • Log in or register to post comments

उपयुक्त संदर्भ

हेमंतकुमार
Wed, 07/11/2018 - 14:36 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

आंबट खाल्याने आमवात होतो असे

जागु
Wed, 07/11/2018 - 15:27 नवीन
आंबट खाल्याने आमवात होतो असे ऐकले आहे. संधीवात आणि आमवात एकच का? संधीवात असेल तर लिंबू आवळा चालतो का?
  • Log in or register to post comments

जागु,

हेमंतकुमार
Wed, 07/11/2018 - 15:56 नवीन
क्षमस्व. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदिक तज्ञ देउ शकतील.
  • Log in or register to post comments

ओके. मला ही शंका आली कारण

जागु
Wed, 07/11/2018 - 16:33 नवीन
ओके. मला ही शंका आली कारण हाडांसाठी आंबट चांगल आहे हे वाचल पण संधीवातात आंबट खायला बंदी असते. कदाचीत वात हा आजार वेगळा असेल व वाताला आंबट चालत नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

दाह आणि 'वात'

हेमंतकुमार
Wed, 07/11/2018 - 16:55 नवीन
या शब्दांमुळे घोळ होतो खरे ! Arthritis = सांध्यांचा दाह , असे साधारण भाषांतर. या आजाराची कारणे असंख्य. 'वात' हा आयुर्वेदिक शब्द. दोन भिन्न शास्त्रांची सांगड घालणे तसेच इंग्लिश चे मराठी करताना घोळ होतो. पथ्याच्या कल्पनाही भिन्न असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट

माहितगार
Wed, 07/11/2018 - 16:23 नवीन
आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की काही अपवाद आहेत. कारण वर मर्यादीत फळांची चर्चा झाल्याचे दिसते. आहारातील टमाटे, चिंच, आमसूल , आंबट चुका, आंबट झालेले दही/ताक आणि क जिवनसत्व याबद्दल या निमित्ताने माहिती मिळावी हि विनंती. आहार विषयक चांगल्या चर्चा मालिकेसाठी धागा लेखकाचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments

माहितगार, आभार व शंकानिरसन

हेमंतकुमार
Wed, 07/11/2018 - 16:49 नवीन
आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की >>>> नाही होऊ शकत. आंबटपणा अनेक प्रकारच्या आम्लांमुळे असू शकतो. पण ज्यांत Ascorbic acid आहे तेच फक्त ‘क’ होय. दही- ताकाचा आंबटपणा Lactic acid मुळे आहे.
  • Log in or register to post comments

चुकीची समजून दूर केल्या बद्दल खूप खूप आभार.

माहितगार
Wed, 07/11/2018 - 17:55 नवीन
ओह ओह, मला वाटायचे कोणतेही आंबट खाल्ले की येत असणार क जिवनसत्व मी तर आंबट चिक्कार खातो, आणि मला काय क जिवनसत्वाची फिकिर, सुरवातीस धागा उघडण्याचेही कष्ट घेतले नव्हते :) बरे झाले प्रश्न विचारला. माझी अनेक वर्षांची चुकीची समजून दूर केल्या बद्दल खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

पदार्थास आंबट चव असली कि

सुबोध खरे
Wed, 07/11/2018 - 18:54 नवीन
पदार्थास आंबट चव असली कि त्यात क जीवनसत्त्व असते यास कोणताही आधार नाही. आंबट गोड बोरे किंवा चिंच यात फारसे क जीवनसत्त्व नाही.( यात इतर अनेक खनिजे असतात हा भाग वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

किती नकळत चुकीचे समज

माहितगार
Wed, 07/11/2018 - 21:29 नवीन
किती नकळत चुकीचे समज डोक्यात फिट होतात, इथून पुढे काळजी घेता येईल. माहितीसाठी अनेक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ही घ्या ‘क’ ची फळयादी :

हेमंतकुमार
Wed, 07/11/2018 - 17:36 नवीन
ही घ्या ‘क’ ची फळयादी : आवळा, लिंबू, संत्रे पेरू, काळ्या मनुका किवि, स्ट्राबेरी पपई , लाल ढोबळी मिरची .
  • Log in or register to post comments

अनेक आभार

माहितगार
Wed, 07/11/2018 - 17:56 नवीन
अनेक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

आता सोप झाल.

जागु
गुरुवार, 07/12/2018 - 11:38 नवीन
आता सोप झाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सध्या पेरुचा हंगाम

हेमंतकुमार
Fri, 07/13/2018 - 08:03 नवीन
सध्या पेरुचा हंगाम आहे. तेव्हा मस्तपैकी पेरुंचा आस्वाद घ्या आणि ‘क’-समृद्ध व्हा ! या सदिच्छा सह इथला समारोप करतो. सर्वांचे आभार . या मालेतले पुढचे जीवनसत्व (ब१२) इथे आहे : https://www.misalpav.com/node/42982
  • Log in or register to post comments

मोतीबिंदू...

हेमंतकुमार
Tue, 09/27/2022 - 12:32 नवीन
तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखात खालील उल्लेख आहे औषधरूपातील ‘क’ आणि मोतीबिंदू प्रतिबंध >>> या संदर्भातील काही नवीन संशोधनाची भर घालतो. मोतीबिंदू होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख म्हणजे वाढत्या वयानुसार होणारा. यात डोळ्याच्या भिंगातील दीर्घकालीन ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे मोतीबिंदू होण्याची प्रक्रिया सुरू होते असे मानतात. क जीवनसत्वाला ऑक्सिडेशन विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया मंद करता येईल का आणि त्यामुळे मोतीबिंदू १० वर्षांनी पुढे ढकलला जाईल का हा उत्सुकतेचा विषय आहे.परंतु अलीकडील संशोधनानुसार असा निष्कर्ष निघालेला नाही. मोतीबिंदू होण्याच्या अन्य एका कारणाबाबत आशादायक परिस्थिती आहे. दृष्टीदोषाच्या काही रुग्णांवर डोळ्यांची एक विशिष्ट शस्त्रक्रिया केली जाते (vitrectomy). त्याचा दुष्परिणाम म्हणून पुढे मोतीबिंदू होतो. अशा रुग्णांना जर शस्त्रक्रियेनंतर क जीवनसत्व औषध रूपात दिले तर दुष्परिणामामुळे होणारा मोतीबिंदू टाळता येईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा