निसर्ग, शेती आणि शेतकरी

स्वधर्म's picture
स्वधर्म in जनातलं, मनातलं
8 Jan 2015 - 3:40 pm

अलिकडेच मिपावर उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं हा लेख वाचला. त्यावर भरपूर प्रतिक्रीयाही आल्या. त्यानिमित्ताने मनात आलेले काही विचार...
शेतकरी हा एक अत्यंत अन्यायग्रस्त घटक अाहे अशी हाकाटी नेहमी एेकू येते़़. त्यात बर्याच प्रमाणात तथ्य आहेही. पण शेतकर्‍यांकडे परिक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बर्याच गोष्टी आश्चर्यकारकरित्या आपल्या समोर येतात. शेतकरी हे पूर्वी आपले व आपल्या कुटुंबाचे पोट प्रथम भरून मगच उरलेल्या उत्पन्नाची विक्री करायचे. त्यामुळे शेती असलेले कुटुंब मुबलक उपलब्धता असलेले व म्हणून सुखवस्तू मानले जायचे. अगदी २०-३० वर्षांपूर्वीही 'उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी' ही म्हण सर्रास वापरली जायची. मग आत्ताच नेमके शेतकरी अडचणीत का आले? नक्की काय झाले? कुठे चुकत गेले? प्रश्न मोठा जटील आहे, त्याला थोडक्यात उत्तर नाही, पण हे काही मुद्दे अन प्रत्यक्ष निरीक्षणे.

१९- २० व्या शतकात़ विज्ञान प्रगत झाले. औद्योगिक क्रांती झाली. नंतर सतत विज्ञानाची घौडदौड सुरूच राहिली व औद्योगिक विकास वाढत गेला. मानवाला त्याचे अनेक फायदेही झाले. एक खास विज्ञाननिष्ठ व औद्योगिक व आर्थिक विकास ज्यामुळे शक्य होतो अशी विचारधारा प्रभावी बनली. तिने अनेक क्षेत्रांना प्रभावित केले. शेती आणि शेतकर्यांवरही याच औद्योगिक विचारधारेचा प्रभाव पडला. कीड कशी मारायची, आपल्या जमीनीतून आधिकाधिक उत्पन्न कसे काढायचे, तिच्यातून जास्तीत जास्त पाणी कसे उपसायचे हाच प्रचार आणि प्रसार सर्वत्र होऊ लागला. जमीन, पाणी, हवा, निसर्ग, एवढेच नव्हे, तर प्राणी ही सगळी आता 'इनपूटस' झाली आणि आर्थिक फायदा हेच एकमात्र 'आउटपुट' मोजले जाऊ लागले. म्हणून या विचारधारेमुळे तोंड सतत बाजाराकडे ठेवावं लागतं. शेतकरी या सगळ्या प्रभावाखाली तेच करतो आहे.

सध्याची जवळजवळ सर्व कृषी विद्यापीठे व तज्ञ शेतीकडे एखाद्या औद्योगिक यंत्रणेप्रमाणे पाहतात. तिकडे जसे गुंतवणूक करून कच्चा माल टाकला, मजूर लावले, की प्रक्रीया करून तयार उत्पादन निघते, तसेच शेतातून निघावे यासाठी संशोधन, विश्लेषण, प्रयत्न करतात. पण शेती ही एक जिवंत गोष्ट आहे. जमीन ही एक जिवंत व्यवस्था आहे, कारण तिच्यात प्रचंड प्रमाणात सूक्ष्मजीव असतात, त्यांचे आरोग्य केवळ आकड्यात सापडत नाही. त्यांची जीवनचक्रे व आपण करत असलेल्या गोष्टींचा त्यांच्यावर होणारा परिणाम याची आपल्याला फार म्हणजे फारच कमी माहिती आहे, याची नम्र जाणीव केवळ अपवादानेच शेतकरी व शेती तज्ञांना आहे. तुंम्ही एक दोन जरी रेडीओ व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम ऐकले, तर तज्ञ काय सांगतात ते लगेच समजेल. कोणत्या पिकाला कोणते खत घालायचे, कोणत्या कीडीसाठी कोणते औषध फवारायचे, एवढेच सतत ऐकू येते. कंपन्याही आपल्या प्रॉडक्ट्सचे अत्यंत आक्रमक मार्केटींग करत असतात.

यातून नकळत एक शोषण व्यवस्थाच जणू निर्माण झाली. यात पहिले शोषण झाले जमीनीचे. दुसरे पाण्याचे, तिसरे प्राण्यांचे आणि आता तर एकूण परिसंस्थेवरच आजची शेती आक्रमण करू लागली आहे. आज ऊस पिकवून सधन झालेल्या अनेक शेतकर्यांच्या जमीनी सांगली-कोल्हापूरच्या सधन पट्ट्यात क्षारपड झालेल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वर्षानुवर्षे ऊसाची लागवड व त्यासाठी दिलेले बेसुमार पाणी! ऋषी प्रभाकर यांच्या भाषणात एक वाक्य ऐकले होते: ‘Agriculture is the worst interference with the nature that man has created.’ किती खरं आहे ते! या सगळ्यात शेतकरी केवळ अज्ञानी व निष्पाप राहिला का? का तोही एक शोषक बनूनच या घटकांचे शोषण करत राहिला, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

आपल्या शेतातून आपल्या गरजा जास्तीत जास्त भागवाव्यात हा शेतीविचार जुना झाला, मागे पडला. आज शेतकर्यांच्या शेतात घरचं धान्य नाही, भाजीपाला नाही, फळं नाहीत अन तेलही नाही. नगदी पिकं आणि एकवर्णी लागवड करून बाजाराकडे तोंड करून बसले आहेत सगळे. आजचे शेतकरी संघटना बांधत आहेत, आंदोलनं करत आहेत पण स्वतं:चं अन्न स्वतःच्या शेतात पिकवतच नाहीत. बाजारपेठेवर भरवसा ठेवायचा, अन आपल्या गरजा भागवण्यासाठी सगळं विकत आणायचं असा मामला. जर शेतकरी बाजारी व्यवस्थेतला अनुभवी, नियंत्रक नाही, तर त्याने सतत बाजारपेठेतून आपल्याला फायदाच होईल ही अपेक्षा बाळगली तर हाती काय लागणार?

एकदा मी एका सेंद्रीय शेती गटाच्या अभ्यास बैठकीला गेलो होतो. तिथे एका सभासदाने अतिशय वेगळा मुद्दा मांडला, तो इथे लिहीण्याचा मोह आवरत नाही. आपण सध्या सगळीकडून स्त्री-भृण हत्त्येविषयी ऐकतो. स्त्री गर्भाची हत्त्या करणारे डॉक्टर हे नराधम आहेत व ती कुटुंबेही अज्ञानातून भयानक अन्याय करत आहेत असे सर्वांनाच वाटते. पण जरा आजूबाजूला आपल्या शेतकरी बांधवांकडे पहा. म्हशीला रेडा झाला अन तो जगला - वाढला असे किती आढळते? त्या सभासदाच्या मते जिवंत म्हशी व रेड्यांचे प्रमाण ९०:१० पेक्षा कमी असावे. तिकडे पुरूष हत्त्या कोण करत आहे? रेडी असेल तर तिला खायला देतात, रेडा असेल तर एक तर तो उपाशी मरतो किंवा त्याला कत्तलखान्याची वाट दाखवली जाते. माणसांनी स्त्री गर्भाबाबत जी संवेदनशीलता दाखवली त्यातली थोडीतरी जनावरांच्या वाट्याला शेतकर्यांकडून येतेय का?

मला हव्या त्या जमीनीच्या तुकड्यावर, मला हवे ते, मला हव्या तितक्या प्रमाणात आणि हव्या त्या गुणवत्तेचे, मला हवे तेंव्हा उगवले पाहिजे, या उद्देशाने केलेले उपदव्याप म्हणजे शेती! म्हणून तो एक निसर्गावर विजय मिळवूनच करता येणारा धंदा आहे, नव्हे जवळजवळ निसर्गविरोधीच म्हटले तरी चालेल. शेवटी यात माणूस म्हणजे शेतकरी खरंच जिंकेल असं वाटतं? याला काही उत्तर आहे काय? हे सगळं इतकं चुकतं गेलंय, तर आता नक्की बरोबर काय? पण अजूनही आशेला जागा आहे. काही अप्रसिद्ध एकांडे शिलेदार अंधाराकडून प्रकाशाकडे चालले आहेत. पुढे कधीतरी त्यांच्याबद्दल.

- स्वधर्म

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

8 Jan 2015 - 4:32 pm | नगरीनिरंजन

लेख आवडला पण संक्षिप्त वाटला. अर्थात या विषयाचा आवाका इतका मोठा आहे की एका लेखात सगळं सविस्तर लिहीणे शक्य नाही.
शेती करायला सुरुवात करणे ही माणसाची सगळ्यात मोठी चूक आहे असे जॅरेड डायमंड या नृवंशशास्त्रज्ञाने म्हटले आहे. १०-१२ हजार वर्षांपूर्वी कधीतरी दुष्काळामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे म्हणा शेती करायला सुरुवात झाली आणि त्यातून काय उगवून आलं असेल तर अँथ्रोपोसेंट्रिझम. माणूस सगळ्या सजीवांमध्ये श्रेष्ठ आहे आणि सगळी पृथ्वी माणसाच्या वापरासाठीच आहे व सगळे सजीव माणसासाठी निव्वळ स्रोत आहेत या विचाराचा पगडा इतका वाढत गेला आणि अधिकाधिक नफा मिळवणार्‍यांना व उपभोग घेणार्‍यांना इतकी प्रतिष्ठा येत गेली की शेवटी माणूससुद्धा एक रिसोर्स झाला आहे. अधिकाधिक फायद्यासाठी एकमेकांचे शोषण करणारी उतरंडीची समाजरचना झालीय आणि गरीब शेतकरी त्यात बरेच खाली आहेत.

स्वधर्म's picture

8 Jan 2015 - 5:35 pm | स्वधर्म

>> या विषयाचा आवाका इतका मोठा आहे की एका लेखात सगळं सविस्तर लिहीणे शक्य नाही.
अगदी. अगदी. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करायचा तर केवढी खोली आहे अन त्याला न्याय देऊ शकत नाही, असे वाटत होते.
एकतर पहिल्यांदाच मिपावर लेख म्हणून काही लिहीले आहे. धन्यवाद.

- स्वधर्म

नगरीनिरंजन's picture

8 Jan 2015 - 7:43 pm | नगरीनिरंजन

एक एक मुद्दा घेऊन सविस्तर लेखमाला लिहील्यास उत्तम!

काळा पहाड's picture

8 Jan 2015 - 6:53 pm | काळा पहाड

‘Agriculture is the worst interference with the nature that man has created.’ हे वाक्य एकदम प्रभावी वाटलं. शेतकर्‍यांबद्दल बोलताना आपण त्यांचा निसर्गाशी संबंधित घटक आणि आपल्याला अन्न देणारा (अन्नदाता) अशा प्रकारे उल्लेख करतो. पण खरं म्हणजे शेती हेच निसर्गावरचं (तेही खाजगी) अतिक्रमण आहे हे अभावानेच लक्षात येतं. असं अतिक्रमण करणं हा मानवाला आवश्यक घटक असला तरी ते निदान मानवाच्या फायद्याचं असावं असं वाटतं. उदाहरणार्थ इथॅनॉल तयार करण्यासाठी उसाची शेती हा एक करंटेपणा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आपण शेतकरी हा एक उद्योजक आहे हे विसरतो. तो एक स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट आहे. या उद्योगातले सर्व धोके, फायदा आणि नुकसान हे समाजाचं नुकसान नाही. तर त्याचं स्वतःचं आहे. बरेच लोक शेतकरी म्हणजे समाजावर उपकार करत असल्याच्या थाटात बोलतात. जेव्हा शेती करताना तो समाजाचा विचार घेत नाही, ती जमीन विकल्यावर सगळा फायदा त्याचा तर त्यात होणार्‍या नुकसानीबद्दल समाज (सरकार च्या रुपाने) जबाबदार कसा?

विवेकपटाईत's picture

8 Jan 2015 - 8:15 pm | विवेकपटाईत

बाबा रामदेवांच्या प्रेरणेने गौ आधारित विषमुक्त शेतीची योजना मोठ्याप्रमाणात राबविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. विषमुक्त खाद, कीट नाशक नुकतेच बाजारात आणले आहे (PBRI). गायींची नस्ल सुधारण्यासाठी 'नंदिशाला' उपक्रम ही सुरु केला आहे. काही वर्षांत चित्र पालटेल.
बाकी शेतीच अन्य व्यवसायांशी तुलना होऊ शकत नाही. आपल्याला येत्या काही वर्षांत १०० कोटी वयस्क लोकांचे पोट भरायचे आहे. ३०-३५ कोटी टन अन्नाची आवश्यकता आहे. निसर्गाशी समतोल राखून ही गरज कशी पूर्ण करू शकू हे आत्ताच पाहावे लागेल. लक्षात ठेवले पाहिजे, पैश्याचे पहाड घेऊन सुद्धा आपण जगभर फिरलो तरी कित्येक कोटी धान्य मिळण्याशी शक्यता कमीच. समाज आणि सरकार शेतकरीच्या नुकसान बाबत जवाबदार नाही तर सरकार, समाजाच्या (ग्राहकाच्या) दबावाने शेतीवर निर्बंध का आणते. सरकारने ही शेतीत अन्य धंद्या प्रमाणे शेतीत ढळवांढवळ बंद केली पाहिजे.

स्वधर्म's picture

9 Jan 2015 - 12:57 pm | स्वधर्म

काऴा पहाड व विवेक पटाईत, धन्यवाद.
>> १०० कोटी वयस्क लोकांचे पोट भरायचे आहे. ३०-३५ कोटी टन अन्नाची आवश्यकता आहे. निसर्गाशी समतोल राखून ही गरज कशी पूर्ण करू शकू हे आत्ताच पाहावे लागेल.
मला असे वाटते की हा एक ट्रॅप अाहे. त्यात अडकता कामा नये. त्यासाठी उत्पादन वाढीचा वाट्टेल तो मार्ग अवलंबता कामा नये. भलत्या तडजोडी केल्या तर नंतर पस्तावण्याची वेऴ अाल्याशिवाय राहणार नाही.

- स्वधर्म

अर्धवटराव's picture

9 Jan 2015 - 1:09 pm | अर्धवटराव

शेतकरी औद्योगीक विचारांचा बनला कारण बार्टर सिस्टीम जाउन करन्सी सिस्टीम आलि. शेतकरी स्वतः पर्टिक्युलरली निसर्गाप्रती निश्काळजी झाला नाहि... एकुण मनुष्यप्राणिच तसा झाला.

स्वधर्म's picture

9 Jan 2015 - 4:58 pm | स्वधर्म

शेतकरी औद्योगिक विचारांचा का झाला, हा मुख्य मुद्दा नाहीये. औद्योगिक विचारंाचा प्रभाव इतर अनेक क्षेत्रांवर पडला, तसाच त्याच्यावरही पडला. पण इतर व शेतकरी यांच्यात फरक असा, की इतर शहरी, नोकरदार हे निसर्गाप्रती निष्काऴजी राहिले, तर त्यांना परवडते, शेतकऱ्याला नाही, कारण तो थेटपणे निसर्गावर अवलंबून असतो. तुंम्हाला नक्की काय पटले नाही?

- स्वधर्म

अर्धवटराव's picture

9 Jan 2015 - 8:19 pm | अर्धवटराव

जेंव्हा आपण शेतकरी निसर्गावर जास्त अवलंबुन असतो असं म्हणतो तेंव्हा तिथे शेती नामक व्यवसाय अभिप्रेत असतो. त्यामुळे शेतकर्‍याने निसर्गाची काळजी घ्यावी म्हणजे आपल्या व्यवसायाचीच... इट्स नो डिफ्रंट दॅन एनी अदर बिझ. आता अशी आयसोलेटेड काळजी घेणे फार मर्यादीत अर्थाने शक्य आहे. शेती निसर्गस्वास्थ्य पूरक, प्रथम शेतकर्‍याचं पोट भरणारी (जंगल जसं पक्षांचं पोट भरतं) आणि मग एक व्यवसाय असं गणित जमवायचं असेल तर ते एकट्या शेरकर्‍याकडुन शक्य नाहि व त्याकरता त्याला दोष देता येत नाहि.

राही's picture

9 Jan 2015 - 2:42 pm | राही

लेख आवडला.
जे जे मानवास उपयुक्त ते ते सगळे चांगले हा 'चांगल्या'चा निकष शेकडो वर्षे मान्यता प्राप्त आहे. मानवकेंद्रित तत्त्वज्ञानात असेच असू शकते. क्रिस्टियन धर्मातल्या 'इंटेलिजंट डीज़ाइन' चे सार हेच आहे. ही सृष्टी मोठ्या कल्पकतेने (कुणाकडून तरी) बनवली गेली, मानवाने त्याचा उपभोग घ्यावा. 'गाय हा एक उपयुक्त पशू आहे कारण ती आपल्याला दूध देते' हे वाक्यही त्यातलेच. गाय आपल्याला दूध देत नाही, तिच्या वासरांसाठी निर्माण झालेले ते दूध आपण तिच्याकडून (हिरावून) घेतो.
हा उपयुक्ततावाद एके काळी पर्यावरण चळवळीचा पाया होता. शुद्ध हवा, पाणी कुणासाठी? तर आपल्या (मानवाच्या) जगण्यासाठी. सुखद हिरवीगार कुरणे कशासाठी तर आपल्या दृष्टिसुखासाठी. किंवा गायीगुरांना चरण्यासाठी आणि नंतर त्यांनी मुबलक दूध देण्यासाठी. ग्लोबल वॉर्मिंग, ओझोनचे प्रमाण हे मानवजीवनाशी निगडित आहे, म्हणून त्यावर नियंत्रण हवे.
मानवाच्या चष्म्याचा फोकल पॉइण्ट मानवच आहे. स्वतःचे जास्तीत जास्त सुख आणि समाधान पाहाणे आणि पंचमहाभूतांना कामाला लावून (वेठीस धरून) ते हासिल करणे (अचीव या ईग्रजी शब्दास चांगला मराठी शब्द सुचवा कुणी तरी. मिळवणे, प्राप्त करणे, संपादन करणे हे तितकेसे चपखल वाटत नाहीत.) हेच मानवाचे कार्य बनून राहिले आहे.

स्वधर्म's picture

9 Jan 2015 - 5:31 pm | स्वधर्म

धन्यवाद राही.

>> स्वतःचे जास्तीत जास्त सुख आणि समाधान पाहाणे आणि पंचमहाभूतांना वेठीस धरून ते हासिल करणे हेच मानवाचे कार्य बनून राहिले आहे.
अाता जागे होण्याची वेऴ आली आहे. निसर्गाने मानवाला फटके द्यायला सुरूवात केली आहे. त्याचा पहिला फटका शेतकऱ्याला बसू लागला आहे. म्हणून त्यांनी आता आत्मपरिक्षण केले पाहिजे. अडचणी, कठीण परिस्थितीचे बील आता इतरांवर फाडून उपयोग नाही.
दुसरा मुद्दा असा की, मानवाने निसर्गाचे दोहन करून जगणे हे हजारो वर्षे चालूच आहे. किंबहुना इतर जीवमात्रांस हानी न पोहोचवता मानवाला श्वासही घेणे शक्य नाही. पण मानवाचे जगणे हे दोहनाची पातऴी पार करून शोषण बनू लागले, की मर्यादा ओलांडली असे म्हणावे लागेल.

- स्वधर्म

कलंत्री's picture

10 Jan 2015 - 12:13 pm | कलंत्री

जीवचक्रातून या कडे पाहिले तर आजही निसर्ग / पृथ्वी आपल्याला क्षमा करु शकेल. निसर्गाच्या र्‍हासामूळे आज नाही तर काळांतराने ही पृथ्वी मणूष्यविहीन झाल्याशिवाय राहणार नाही.