मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वाचे आर्त - भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
1
. भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , भाग ९ - अनैसर्गिक निवड , भाग १० - नैसर्गिक निवड , सिंहावलोकन , भाग ११ - सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट , भाग १२ - सामाजिक डार्विनवाद , भाग १३ - 'आहे' आणि 'असावं' , भाग १४ - उत्क्रांती आणि हरितक्रांती , भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी जनुकीय बदल केलेले जीव - जीएमओ (जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गॅनिझम्स) यांच्याबद्दल सध्या बराच वादंग आहे. जीएमओ खाद्यांवर बंदी आणा ते जीएमओ खाद्यांमुळे प्रचंड फायदा आहे अशा गोष्टी कर्कश शब्दांत मांडल्या जातात. हा वाद, त्याचे परिणाम आणि त्यांचं भविष्य समजून घेण्यासाठी त्यामागचं विज्ञान आधी समजून घ्यायला हवं. नाहीतर आपल्याला त्याविषयी मिळणाऱ्या साउंडबाइट्स, टीव्हीवर होणाऱ्या गरमागरम चर्चा आणि वादविवाद यांतून गैरसमजच वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक भाषा न वापरता, त्यामागचा उद्देश आणि तंत्रं समजावून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. गेल्या काही लेखांत आपण उत्क्रांतीविषयी विचार केला. नैसर्गिक निवडीतून होणारी उत्क्रांती ही गेली तीन अब्ज वर्ष सतत चालू असलेली प्रक्रिया आहे. उत्क्रांतीचा मूळ गाभा असा की काळानुसार प्रजाती बदलतात - जे गुणधर्म त्या विशिष्ट प्रजातीतल्या प्राण्यांना तग धरायला मदत करतात ते गुणधर्म स्थिरावतात, वाढतात आणि जे गुणधर्म उपयुक्त नसतात ते नाहीसे होतात. काही प्रजातींपासून या गुणधर्मांत बदल झालेल्या नवीन प्रजाती निर्माण होतात. हे चक्र अव्याहतपणे चालू राहिल्यानेच आज निसर्गात इतक्या विविध प्रजाती दिसतात. पण प्रश्न असा आहे की या प्रजाती बदलतात कशा? त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की प्रत्येक प्राण्यात त्याचा स्वतंत्र असा डीएनए असतो. हा काही गुणसूत्रांमध्ये (क्रोमोझोम्समध्ये) विभागला गेलेला असतो. म्हणजे माणसाच्या डीएनएत गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या असतात - प्रत्येक जोडीत एक आईकडून आलेला आणि एक वडिलांकडून आलेला असतो. हे एका अर्थाने 'माणूस कसा बनवावा?' याच्या कृतीचं पुस्तक असतं - तेवीस भागांत विभागलेलं. त्यातल्या प्रत्येक गुणसूत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रथिनं कशी तयार करायची याची कृती असते. ही विशिष्ट काळी वाचली जाऊन, त्यानुसार वेगवेगळे पदार्थ तयार होऊन त्यातून माणूस बनतो. ही प्रक्रिया प्रचंड क्लिष्ट आणि थक्क करणारी आहे. त्याविषयी कधीतरी स्वतंत्र लेख लिहिणं योग्य ठरेल. मात्र आत्ता जीएमओ म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी इतकंच पुरेसं आहे. या गुणसूत्रांचे, विशिष्ट प्रथिनं निर्माण करण्याची कृती देणारे भाग म्हणजे जीन्स किंवा जनुकं. आपण गेल्या लेखात पाहिलं की त्यातली काही जनुकं प्रभावी तर काही अप्रभावी असतात. प्रभावी जनुक आईकडून किंवा वडिलांकडून आलं तरी मुलामध्ये ते दिसतं. मात्र अप्रभावी जनुकाचा परिणाम दिसण्यासाठी ते दोन्ही पालकांकडून आलेलं असलं पाहिजे. भाताची लागवड करताना उंच रोपाचं जनुक हे प्रभावी ठरतं. त्यामुळे उंच झाडं जास्त तयार होतात. मात्र जेव्हा भरपूर तांदूळ निर्माण करणारी इतर जनुकं असतात तेव्हा मात्र या उंचीचा गैरफायदा होतो. त्या वजनाने पिकं मान टाकतात. मग काय करायचं? एक मार्ग असा आहे की काहीही करायचं नाही, आणि जे पीक येईल ते 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या न्यायाने स्वीकारायचं. जर त्यातून पीक कमी येण्याने कोट्यवधी माणसं मरणार असतील, तर मरू देत. आपण कोण आलो निसर्गाच्या नियमांत ढवळाढवळ करणारे? दुसरा मार्ग असा आहे की ठीक आहे, जर मला जास्त पीक हवं असेल तर जेव्हा मला कमी उंचीची जनुकं दोन्ही पालकांपासून आलेलं झाड सापडेल तेव्हा मी त्याच झाडापासून लागवड करेन. इतर अधिक उंचीची झाडं मारून टाकेन किंवा पुढे वाढवणार नाही. ही अनैसर्गिक किंवा मानवीय निवड झाली. या संकरित बियाणांच्या प्रयोगात आपण नैसर्गिकरीत्याच दोन जनुकांची जोडणी करतो. म्हणजे अधिक पीक देणारी उंच जात आणि कमी उंचीची जात एकत्र करतो. आणि नंतर उंची देणारी जनुकं असलेली झाडं नष्ट करतो. या संकरातून प्रत्यक्ष जनुकीय बदल आपण करत नाही - ते नैसर्गिकरीत्याच होतं. मात्र आपण निवड करून विशिष्ट जात जगवतो, आणि इतर जगू देत नाही. यात आपण नैतिकदृष्ट्या काही चुकीचं करतो आहोत अशी आपल्याला शंकाच येत नाही. कारण आपण फक्त विशिष्ट बिया पेरल्या, त्यातून उगवलं त्यातलं काही निवडलं आणि त्या बिया पुन्हा पेरल्या. त्यातून उत्तम पीक येतं म्हणून जगभर पसरवल्या. हरितक्रांती घडवताना हेच केलं गेलं. अशी निवड करून आपल्याला हवे ते गुणधर्म असलेलं बियाणं तयार करणं ही वेळखाऊ पद्धत आहे. अनेक प्रयोग करावे लागतात. त्यातले नव्व्याण्णव टक्क्यांहून अधिक बाद करावे लागतात. काळजीपूर्वक निवड करावी लागते, तेव्हा कुठे हाताला हव्या त्या गुणधर्मांचं मिश्रण असलेलं बी सापडतं. पण याऐवजी जर आपल्याला जास्त किफायतशीर पर्याय उपलब्ध असेल तर? तो समजावून घेण्यासाठी आपल्याला गुणसूत्रांचा विचार करायला लागेल. तांदळाचं रोप बनवण्यासाठी असणारी गुणसुत्रांच्या कृतीची पुस्तकं आहेत. प्रत्येक तांदळाच्या जातीत ती किंचित वेगवेगळी आहेत. जेव्हा आपण संकरित बियाणं तयार करतो, तेव्हा या कृतींचं मिश्रण असलेलं बियाणं बनवतो. म्हणजे नव्या जातीत या पुस्तकांच्या पानांपैकी काही एका जातीतली तर काही दुसऱ्या जातीतली आली असतील. हे मिश्रण योग्य तसं होईलच अशी खात्री नसते, म्हणून अनेक वेळा प्रयोग करून योग्य मिश्रण व्हायची वाट बघावी लागते. त्याऐवजी जर आपल्या एका पुस्तकांतली योग्य पानं दुसऱ्या पुस्तकांत घालता आली तर? म्हणजे एका जातीच्या बियाणाचा डिएनए घेऊन त्यात योग्य ठिकाणी योग्य ती जनुकं घातली आणि तीच पेरली तर? याचा फायदा उघड आहे. हजारो प्रयोग करून काहीतरी हाती लागण्याऐवजी नेमके प्रयोग करून तोच परिणाम साधता येतो. याच प्रक्रियेला जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणतात आणि त्यातून तयार होणाऱ्या नवीन प्रजातीला जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गॅनिझम किंवा जीएमओ म्हणतात. एका अर्थाने हे तंत्रज्ञान न वापरताही बियाणांमध्ये जनुकीय बदल घडवणं हे पूर्वापारपासून चालू आहे. नियंत्रित संकरातून, आणि निवडीतून कुत्र्यांमध्ये इतकं प्रचंड वैविध्य निर्माण केलं गेलं ते जनुकीय बदलांतूनच. फक्त फरक इतकाच की कुठचा गुणधर्म कसा वेगळा काढायचा याबाबतीत डोळसपणा नव्हता. अंधारात चाचपडत जायचं, जर पुढे पोचलो तर तिथून सुरूवात करायची आणि धडपडत हळूहळू पुढे जायचं अशी पद्धत होती. मार्ग तोच. शेवट तोच. मात्र पद्धत नैसर्गिक म्हणावी अशीच होती. जीएमओ तयार करताना डोळसपणा अधिक आहे. पुन्हा मार्ग तोच, शेवट तोच. पण पद्धत मात्र अनैसर्गिक वाटते कारण आपण प्रत्यक्ष जनुकांची पुस्तकं उघडून, ती वाचून त्यातली पानं निवडण्याचा अधिकार आपल्या हातात घेतो. हे अनेकांना निसर्गाच्या किंवा पर्यायाने देवाच्या अखत्यारीत ढवळाढवळ करण्यासारखं वाटतं. एकंदरीत देवाच्या अखत्यारीतल्या गोष्टींमध्ये मानवाने ढवळाढवळ करणं याला कायमच विरोध होत आलेला आहे. पोप फ्रान्सिसने नुकतंच इन व्हिट्रो फर्टिलायझेशनबाबत विधान केलं "वैज्ञानिक प्रगतीतून मूल निर्माण करून त्याकडे देवाची देणगी म्हणून पाहाण्याऐवजी आपण एक अधिकार म्हणून पाहातो आहोत.... हे सर्वनिर्मात्या देवाविरुद्ध पाप आहे". गंमत अशी आहे की १९७८ साली जेव्हा पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली तेव्हाच्या कार्डिनल आल्बिनो लुचियानीने - नंतर लवकरच जो पोप जॉन पॉल १ झाला त्याने - 'त्या बिचाऱ्या आईवडिलांना फक्त एक मूल हवं होतं' अशा समजूतदार शब्दात त्या घटनेची बोळवण केली होती. पण टेस्ट ट्यूब बेबी म्हणा, क्लोनिंग म्हणा किंवा जीएमओ पिकं म्हणा - हे काहीतरी अनैसर्गिक प्रकरण आहे अशी अनेकांची संभावना होते. अशा अनैसर्गिक, मानवी ढवळाढवळीच्या कृतींना विकृती म्हणणं, आणि त्यातून काहीतरी राक्षसी तयार होईल अशी भीती बाळगणंही दिसून येतं. प्रत्यक्षात नैसर्गिक प्रक्रियांना समजावून घेऊन त्यातल्या काही प्रयोगशाळेत घडवून आणणं हेच या सर्वांत अंतर्भूत आहे. म्हणून जीएमओ सरसकट चांगलंच का? अर्थातच नाही. जीएमओ तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की जनुकांचं आरोपण करताना ते दोन जीव सारख्याच जातीचे असले पाहिजेत अशी अडचण नाही. म्हणजे भातावर पडणाऱ्या एखाद्या कीडीचा प्रतिबंध करणारे रेणू तयार करणारं जनुक जर डासांमध्ये सापडलं तर ते तिथून उचलून भाताच्या गुणसूत्रांमध्ये बसवता येतं. यातून तयार होणारे जीव हे संपूर्णपणे नवीन, आत्तापर्यंत न दिसलेले असतात. याचा अर्थ असा नाही की माणसाला खाणारा भात तयार होईल. तो भात हा भातच असतो, फक्त त्या किडीच्या बाबतीत त्याची प्रतिकारशक्ती अधिक असते. या प्रचंड क्षमतेपोटी जनमानसात एकंदरीतच जीएमओ या प्रकाराबद्दल धास्ती आहे. विशिष्ट प्रमाणात ती योग्यही आहे. तयार होणाऱ्या धान्यात काही अनपेक्षित मारक घटक तर नाहीत ना, याची मोठ्या प्रमाणावर खात्री करून घ्यावी लागते. आणि यासाठी काही चांगल्या चाचण्या असतात, त्या केल्याही जातात. पण कुठच्याच चाचणीबाबत शंभर टक्के खात्री नसते. कदाचित पंचवीस वर्षांनी काहीतरी वाईट परिणाम दिसला तर? या भीतीला उत्तर देणं कठीण असतं. मात्र सध्या 'जीएमओ वाइट' विरुद्ध 'जीएमओ उत्तम' असे दोन तट पडलेले दिसतात. त्यात पहिल्या गटातले अनेक लोक असे असतात ज्यांचा जीएमओला नैतिक दृष्टिकोनातून विरोध असतो, किंवा जो विरोध असतो त्यात 'आपण निसर्गाच्या मामल्यात ढवळाढवळ करतो आहोत, अशी ढवळाढवळ करणं धोकादायक आहे.' हा एक घटक असतो. हा संपूर्णपणे पायाहीन आहे. कारण केवळ ढवळाढवळ केल्यामुळे निसर्गाचा कोप वगैरे होत नाही. तसं असतं तर 'वस्तू गुरुत्वाकर्षणाने खाली येतात' या नियमाविरुद्ध वर जाणाऱ्या लिफ्ट वापरणंही धोकादायक ठरलं असतं. निसर्ग अमुक करा अमुक करू नका असं सांगत नाही. निसर्ग केवळ असतो. त्यातून नैसर्गिक प्रक्रियांनी काही पदार्थ, जीव तयार होतात. त्यातल्याच काही प्रक्रिया नियंत्रित करून अधिक सुयोग्य जीव आपण निर्माण करू शकतो. कुठच्याही तंत्रज्ञानाप्रमाणे आपण ते कुठच्या हेतूने आणि किती काळजीपूर्वक वापरतो त्यावरून त्यातून तयार होणाऱ्या गोष्टी साधक किंवा बाधक ठरतात. त्यामुळे सरसकट 'जीएमओ वाईट' असं म्हणणं आततायी ठरतं. मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित

वाचने 6727 वाचनखूण प्रतिक्रिया 15

आनन्दा Mon, 01/25/2016 - 08:53
हम्म.. जीएमओ वाईट असे व्यक्तिशः मला देखील वाटत नाही. पण मला त्यावर विश्वास नाही हे देखील तितकेच खरे. माझ्यापुरते कारण असे आहे की, जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये नैसर्गिकरीत्या बदल होतो, आणि त्यानंतर तो स्थिरावतो तेव्हा निसर्ग त्याच्या असंख्य चाचण्या घेतो. अनेक परम्युटेशन्स बनतात त्यातले एक जगते, म्हणजेच त्याची निसर्गाला असलेली उपयोगिता सिद्ध झालेली असते. मानवनिर्मित बदलांमध्ये असे होत नाही. कोणता जीन मानवी शरीरात जाऊन नेमके काय करेल हे सांगणारे तंत्रज्ञान अजून तसे बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे आपल्याला परिणामांची नेमकी जाणीव नसते. किंबहुना जीएमओ जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो तेव्हा ते केवळ स्वतःलाच नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या क्षेत्राला देखील प्रभावित करते. साधे भाताचे उदाहरण घेऊ.. मी माझ्या शेतावर जीएमओ वापरले, तर त्याचे परागीभवन शेजारच्या शेतातील पिकावरदेखील होणार. म्हणजे मी माझे बियाणे मॉडिफाय केल्याचे परिणाम माझ्या शेजार्‍याला देखील भोगावे लागणार. हा अगदी साधा प्रकार झाला. याच्यापेक्षा भयंकर गोष्टी देखील होऊ शकतात. मग जीएमओ वापरूच नये का? याला मात्र माझे उत्तर वेगळे आहे. नियंत्रित प्रकारे वापरावयास काहीच हरकत नाही. वापरले नाही तर पुढे संशोधन कसे होणार? त्यामुळे जीएमओ सरसकट टाकाऊ तर नाहीच. पण तसेच सरसकट ते अँजल पण नाही.

In reply to by आनन्दा

मराठी कथालेखक Mon, 01/25/2016 - 14:23
मग जीएमओ वापरूच नये का? याला मात्र माझे उत्तर वेगळे आहे. नियंत्रित प्रकारे वापरावयास काहीच हरकत नाही. वापरले नाही तर पुढे संशोधन कसे होणार?
+१ एखाद्या छोट्या बेटावर असे संशोधन होत रहावे. उगाच घाई गडबडीने ते सरसकट अमलात आणू नये कारण परतीचा रस्ता बंद झाला तर मोठीच समस्या उभी राहू शकते.

In reply to by आनन्दा

राजेश घासकडवी Tue, 01/26/2016 - 01:22
जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये नैसर्गिकरीत्या बदल होतो, आणि त्यानंतर तो स्थिरावतो तेव्हा निसर्ग त्याच्या असंख्य चाचण्या घेतो. अनेक परम्युटेशन्स बनतात त्यातले एक जगते, म्हणजेच त्याची निसर्गाला असलेली उपयोगिता सिद्ध झालेली असते.
मला वाटतं तुम्हाला म्हणायचं आहे की नैसर्गिक बदल हे त्यामानाने हळुवार असतात आणि मानवनिर्मित बदल हे वेगवान असतात. यात कदाचित तथ्य असेल. पण अमुक तमुक नैसर्गिक बदलाची 'निसर्गाला असलेली उपयोगिता' हे म्हणणं योग्य नाही. निसर्गाला उपयोगी असं काही नसतं. निसर्ग केवळ असतो. जनुकांमध्ये बदल होतात, त्यानुसार प्राणी बदलतात. त्या बदलांचा आसपासच्या प्राण्यांवर आणि पर्यायाने निसर्गावर परिणाम होतो. जे बदल टिकाऊ असतात ते टिकतात. म्हणजे जे बदल त्या प्राण्याला टिकून राहायला उपयोगी पडतात ते टिकतात. त्यात इतर प्राण्यांना टिकण्याच्या दृष्टीने तोटा होत असला तरी काही फरक पडत नाही.

तुषार काळभोर Mon, 01/25/2016 - 11:36
मानव निसर्गात॑ ढवळाढवळ करतो, किंवा निसर्गाला हानी पोहचवतो, असं मी मानत नाही. कारण मी मानवाला निसर्गापासून वेगळं समजत नाही. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. त्यामुळे जर मानवाच्या एखाद्या कृतीने निसर्गाला हानीकारक असे काही होत असेल, तर ते पर्यायाने मानवालाच हानीकारक असेल. कोणताही जीव त्याच्या बौद्धिक व शारिरीक क्षमतेनुसार काही कृती(अ‍ॅक्टिव्हीटी) करत असतो, ज्याचा निसर्गावर काहीतरी परिणाम होतच असतो. मग निसर्गाचाच भाग असलेल्या मानवाच्या क्रियांनी/कृतींनी निसर्गात 'ढवळाढवळ' कशी होईल?

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा Mon, 01/25/2016 - 14:05
मानवाची बर्‍याच वेळेस "ढवळाढवळ" होते कारण १. मानव त्याच्या नैसर्गिक प्रेरणेनुसार वागत नाही. तो बुद्धी नुसार वागतो. २. माणसाच्या गरजा अन्न आणि निवारा या नैसर्गिक गरजांच्या खूप पुढे गेल्या आहेत, त्यामुळे तो एक प्रकारे नैसर्गिक जीवनपद्धतीच्या खूप पुढे गेला आहे. ३. मानवाच्या कृतींची परिणाम बर्‍याच वेळेस विस्तृत प्रमाणावर आणि दीर्घकाळासाठी होऊ शकतात. उदा. अणुबॉंब. अणु स्फोट करणे ही माझ्या दॄष्टीने ढवळाढवळ आहे. कारण मानवाला त्याचे दूरगामी परिणाम माहीत असतीलच असे नाही. तरी देखील तो ती कृती करतो. बाकी याच्याशी मात्र अंशतः सहमत - कोणताही जीव त्याच्या बौद्धिक व शारिरीक क्षमतेनुसार काही कृती(अ‍ॅक्टिव्हीटी) करत असतो, ज्याचा निसर्गावर काहीतरी परिणाम होतच असतो.

In reply to by आनन्दा

तुषार काळभोर Mon, 01/25/2016 - 20:43
मानव हा निसर्गाचाच भाग नाहीये का? १. मानव त्याच्या नैसर्गिक प्रेरणेनुसार वागत नाही. तो बुद्धी नुसार वागतो. >> ती बुद्धीच निसर्गाने मानवाला दिलेली आहे. ती बुद्धी नैसर्गिकच आहे. म्हणून त्या बुद्धीतून निपजणारे सर्व 'नैसर्गिक प्रेरणाच आहे. २. माणसाच्या गरजा अन्न आणि निवारा या नैसर्गिक गरजांच्या खूप पुढे गेल्या आहेत, त्यामुळे तो एक प्रकारे नैसर्गिक जीवनपद्धतीच्या खूप पुढे गेला आहे. निवारा ही तरी नैसर्गिक गरज कशी? अगणित सजीव ऊन-वारा-पाऊस सहन करत उघड्यावर जीवन जगतात. किंवा फारतर काही जीव आडोसा शोधतात/वापरतात. काही मोजके जीव निवारा बांधतात (उदा. पक्षी, मुंग्या इ.) मग हे मोजके जीवसुद्धा नैसर्गिक गरजांच्या पुढे गेले आहेत का? बरं, नैसर्गिक निवारा म्हणजे काय? मानवाने कसा आडोसा/निवारा वापरावा? नारळाच्या झावळ्या वापरून केलेला? कोणतेही साहित्य वापरले तरी निवारा 'मानवनिर्मित'च असेल ना? मग 'नैसर्गिक' व मानवनिर्मित' यात फरक कुठे करावा? नैसर्गिक पदार्थ/वस्तू वापरून केलेले ते नैसर्गिक, असे असेल तर, मानवनिर्मित यच्चयावत वस्तू ही नैसर्गिक घटकांपासूनच तयार झालेली असते ना? नैसर्गिक जीवनपद्धतीची व्याख्या कशी करावी? ३. मानवाच्या कृतींची परिणाम बर्‍याच वेळेस विस्तृत प्रमाणावर आणि दीर्घकाळासाठी होऊ शकतात. उदा. अणुबॉंब. अणु स्फोट करणे ही माझ्या दॄष्टीने ढवळाढवळ आहे. कारण मानवाला त्याचे दूरगामी परिणाम माहीत असतीलच असे नाही. तरी देखील तो ती कृती करतो. >> सर्व हरित वनस्पती, त्यांना निसर्गाने दिलेल्या हरितद्रव्याचा व नैसर्गिक सूर्याने दिलेल्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर करून कोट्यावधी वर्षांपासून ऑक्सिजन तयार करत आहेत. ज्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प होते, तिथे ते वनस्पतींमुळे इतके वाढले की ऑक्सिजनवर जगू शकणारे जीव तयार झाले. ही वनस्पतींची निसर्गातील ढवळाढवळ नव्हे काय? त्यामुळे झालेले परिणाम विस्तृत प्रमाणात व दीर्घकाळासाठीचे नाहीत काय? मानवाने स्वतःला निसर्गाहून वेगळे असे समजण्यापेक्षा 'आपण निसर्गाचा भाग आहोत' असे मानायला हवे.

In reply to by तुषार काळभोर

राजेश घासकडवी Tue, 01/26/2016 - 01:34
प्रतिसाद आवडला. मानव आणि निसर्ग हे द्वैत काही वर्णनात्मक सोयीपुरतंच ठीक आहे. मात्र ते टोकाला नेलं की गोंधळ होऊ शकतात. भाग ३ मध्ये मी याविषयी लिहिलेलं होतं. आपण निसर्गाला आपल्या शरीराच्या मर्यादेच्या पलिकडचे काहीतरी - असे मानतो. आपण आपल्या शरीराच्या मर्यादेनंतर संपतो - त्याच्या बाहेर जे काही आहे त्याचे आपण नैसर्गिक आणि कृत्रिम असे नीटस दोन भाग करतो. मी - माझ्या आसपास दिसणारे मानवनिर्मित जग - या दोन गोष्टी सोडल्या की बाकीचा सगळा निसर्ग. ही विभागणी अनेक वेळा सोयीची पडते खरी पण अनेक वेळा त्यामुळे अडचणही निर्माण होते. कारण आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत हे आपल्याला विसरायला होते. अनेक वेळा 'मी आणि निसर्ग' या द्वैताचे रूपांतर 'मी विरुद्ध निसर्ग' या मांडणीत होते. मानवनिर्मित ते सगळे वाईट, आणि नैसर्गिक म्हणजे सर्व काही सुंदर अशा रोमॅंटिक कल्पनाही बळावतात. किंवा निसर्ग गेला खड्ड्यात, माझे सुख तेवढे महत्त्वाचे अशी तद्दन भोगवादी प्रवृत्तीही दिसते.

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा Tue, 01/26/2016 - 07:34
मी जेव्हा अन्न आणि निवारा असे म्हणतो, तेव्हा त्यामध्ये निवारा याचा अर्थ "आडोसा" असा अभिप्रेत होता. परंतु पक्षांचे उदाहरण मान्य. फक्त फरक इतकाच आहे की हे सगळे निसर्गातील जैव साखळीच्या रूपाने निर्माण होणारे असते. किंबहुना माझी "नैसर्गिक" ची व्याख्या सोपी आहे - आत्ताच सुचली - निसर्गात जैवसा़खळीच्या योगे जे जे निर्माण होते ते नैसर्गिक. मग यामध्ये मुंग्यांचे वारूळ आले, पक्षांची घरटी देखील आली. याउलट मानवनिर्मीत म्हणजे रासायनिक अभिक्रिया करून निर्माण केलेले पदार्थ, विशेषतः जे निसर्गात अगोदर उपलब्ध नव्हते - उदा. प्लास्टिक, सिमेंट. परंतु याचबरोबर साचे वापरून बनवलेले पदार्थ - उदा. लोखंडाचे पाईप वगैरे यांचे काय याबद्दल मी देखील सध्या संभ्रमात आहे, पण त्यांना मी तरीही नैसर्गिक म्हणेन, कारण १. त्यांचा कच्चा माल निसर्गतः उपलब्ध असतो २. त्यांमध्ये शुद्धीकरण किंवा मिश्रण याशिवय अन्य क्रियांचा अंतर्भाव होत नाही. ३. निसर्गामध्ये या पदार्थांचे विघटन करण्याची क्षमता आहे., ४. त्यांचे अस्तित्व नैसर्गिक जैवसा़खळीत अडथळा आणत नाही. आता बाकीच्या गोष्टींकडे वळू - बुद्धी जरी मानवाला निसर्गाने दिलेली असली, तरी ती नैसर्गिक प्रेरणा म्हणता येणार नाही. याचे कारण प्रेरणा म्हणजे जे ज्ञान उत्क्रांतीमध्ये "आपोआप" पुढे गेलेले आहे. पक्ष्याला घरटे बांधणे शिकवायला लागत नाही. माकडाला झाडावर चढायला शिकवावे लागत नाही. कुत्र्याला पाय वर करायला शिकवावे लागत नाही याव्यतिरिक्त जे शिकवले जाते त्याला प्रेरणा म्हणणे मला मान्य नाही - उदा. कुत्र्याला आपण भाषा शिकवतो - ही प्रेरणा नव्हे. ही बुद्धी. थोडक्यात प्रेरणा म्हणजे बुद्धीचा असा भाग जो उत्क्रांतीमध्ये (कदाचित) डीएनए मध्ये गेला आहे.
सर्व हरित वनस्पती, त्यांना निसर्गाने दिलेल्या हरितद्रव्याचा व नैसर्गिक सूर्याने दिलेल्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर करून कोट्यावधी वर्षांपासून ऑक्सिजन तयार करत आहेत. ज्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प होते, तिथे ते वनस्पतींमुळे इतके वाढले की ऑक्सिजनवर जगू शकणारे जीव तयार झाले. ही वनस्पतींची निसर्गातील ढवळाढवळ नव्हे काय? त्यामुळे झालेले परिणाम विस्तृत प्रमाणात व दीर्घकाळासाठीचे नाहीत काय?
हे अगदी बरोबर आहे, पण काही काळापूर्वी वनस्पती देखील नव्हत्या, नुसती रसायने होती, त्यांपासून एकपेशीय जीव तयार झाले. त्याला काय म्हणाल? वादासाठी मी असे देखील म्हणेन, की आज मानव जे वागतोय ते सगळे नैसर्गिक आहे, अणुबाँब देखील नैसर्गिकच आहे, आणि असे ५० अणुबाँब वापरणे देखील नैसर्गिकच. त्या अणुबाँब मुळे होणारी म्युटेशन्स पण नैसर्गिकच. वादासाठी मी हे मान्य करू शकतो, पण वास्तवात नैसर्गिक आणि मानवनिर्मित ही आपण आपल्या सोयीसाठी केलेली विभागणी आहे, आणि सर्वसामान्यपणे नैसर्गिक पदार्थांमध्ये जगामध्ये १-२ वर्षांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची क्षमता नाही. नैसर्गिकरीत्या जर उद्या प्लास्टिक तयार झाले, तर कदाचित त्याच वेळेस त्याला रेझिस्टंट सजीव पण तयार होतील कदाचित. पण मानवनिर्मित प्लास्टिकच्या बाबतीत आपण असे म्हणू शकत नाही.. प्लास्टिकचे विघटन करू शकणारे सजीव तयार व्हायला अजून कदाचित लाखो वर्षे जातील, पण प्लास्टिक मात्र आज आहे. म्हणून ते ढवळाढवळ. बाकी याच्याशी मात्र बाडिस सहमत -
मानवाने स्वतःला निसर्गाहून वेगळे असे समजण्यापेक्षा 'आपण निसर्गाचा भाग आहोत' असे मानायला हवे.
फक्त त्याबरोबर अजून एक वाक्य - --------------मानवाने स्वतःला निसर्गाहून वेगळे असे समजण्यापेक्षा 'आपण निसर्गाचा भाग आहोत' असे मानायला हवे, आणि त्याबरोबर निसर्गाला पचेल असेच वागायला शिकायला हवे------------------ (अजून मला देखील तसे वागता येत नाही हा भाग वेगळा)

एस Mon, 01/25/2016 - 15:42
जनुकिय बदल घडवून आणलेल्या बियाणांना विरोध हा केवळ त्याच्या अनैसर्गिक स्वरूपामुळे किंवा अद्याप अज्ञात असलेल्या विध्वंसक वा हानिकारक वैशिष्ट्यांमुळे नाहीये. त्याला आर्थिक बाजूही आहे. सर्वात मोठी भीती ही जीएम कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होण्याची ही आहे. जीएम बियाणे हे दरवर्षी त्याच कंपन्यांकडून घ्यायचे आहे. त्याची पैदास स्वतः करता येत नाही. दुसरे म्हणजे जीएम बियाणांच्या फैलावामुळे निसर्गात अद्यापही थोड्याफार प्रमाणात टिकून असलेल्या जैववैविध्यावर फार सर्वंकष आणि फार वेगाने परिणाम होण्याची शक्यता आहे.

In reply to by एस

आनन्दा Tue, 01/26/2016 - 07:08
अ‍ॅक्च्युअली येस. हे अजून एक कारण आहे. मी याला "वापर करणार्‍याची नैतिकता" असे म्हणेन. कशावरून वापर करणारा हे तंत्रज्ञान स्वत:च्या अमर्याद फायद्यासाठी वापरणार नाही? मग इतरांचा तोटा झाला तरी चालेल.

अतिशय उत्तम लेख, बऱ्याच गोष्टी क्लियर झाल्या, तरीही माझे काही प्रश्न. १. जीएम फूड्स किंवा इतर सीड्स हे तंत्र उपयुक्त असले तरी ह्याचा पुर्ण उपयोग लोकोपयोगी कार्यात होईल अशी शाश्वती नाही न? आता बघा मी शेतकरी होतो आम्ही कापुस पेरत असू, सीसीआय उर्फ़ कॉटन कॉर्पोरेशन ऑफ़ इंडिया कायम स्टेपल कापसाला जास्त भाव देते (हे तार्किक आहे) मग लॉन्ग स्टेपल कापुस कुठला तर त्याला बीटी कॉटन हे उत्तर आले, बीटी कॉटन पहिल्यांदा बाजारात आणणाऱ्या कंपनी बद्दल मी इथे बोलणे टाळतो घासकड़वी सर, पण ह्या बिया बऱ्याच अंशी "टर्मिनेटर सीड्स" असल्याचा प्रचार झाला होता, तसेच सेमी एरिड ट्रॉपिकल झोन (SAT) मधे ह्या बियांचे जे क्लेम्स होते (कमीत कमी पाणी वापरणार, धागा लांब येणार,कापुसबोंडे/झाड़ उर्फ़ लाग प्रमाण जास्त असणार, बोंडअळीला प्रतिकार करू शकण्याची अंगभूत ताकद जास्त असणार) ते पूर्णपणे जरी नाही तरी बहुतांशी सपशेल फसलेले दिसले उदा. बोंडअळी निर्मूलन झाले तरी तिकडे वळते केलेले डिफेंस मैकेनिज्म बोंड कुरतडणाऱ्या माव्यांविरुद्ध हतबल होणे, धागा लांबी क्लेम पेक्षा कमी (अक्षरशः नॉन स्टेपल जीएम वाणापेक्षाही कमी निघणे) सरकी चे प्रमाण जास्त असणे, ती सरकी टर्मिनेटर प्रकारातली असल्यामुळे पुनः लागवडीला परत महागड़े बी घ्यायचा वरकड़ खर्च, एकंदरित ऑन फार्म बीज प्रक्रिया व्यवस्थेचे उच्चाटन वगैरे भयानक इफेक्ट्स दिसुन आले (माझा जवळपास ८ एकर कापुस होता ज्यात ३ एकर प्रायोगिक तत्वावर जीएम बीटी कॉटन लागवड केली होती). मग ह्याचा अर्थ काय? अ. सरकारच्या कृषिमंत्रालय अन त्यांच्या जनुकीय समिती (कमेटी फॉर क्लेअरेंस ऑफ़ जीएम ब्रीड्स) ने घाई केली का बियाणे सर्टीफाय करायची? ब. ह्या घाईचे कारण शेतकऱ्यांना मदत होते की कॉर्पोरेट लॉबिंग होते?? क. मुळात रिसर्च अपुरा राहिला होता का? २.ऐसेच काहीतरी बीटी वांग्याबद्दल ही ऐकून होतो, अर्थात वांगी लागवड केलेली नाही बीटी ची म्हणून ही माहीती ऐकिव आहे ह्यावर आपण काही सांगू शकाल का?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

राजेश घासकडवी Fri, 01/29/2016 - 18:55
ह्यावर आपण काही सांगू शकाल का?
ह्यावर खरोखरच मी तुम्हाला काही सांगण्याइतका माझा अभ्यास नाही. या लेखमालेची विज्ञानाबद्दलची भूमिका ही मायक्रोपेक्षा मॅक्रो पातळीवर अधिक आहे. मोठा आवाका आणि मर्यादित शब्द घेतले की थोडं बर्ड्स आय व्ह्यू घेणं गरजेच पडतं. तुम्हीच प्रत्यक्ष जमिनीवर शेती करून ती बियाणं वापरून बघितलेली आहेत, त्यांचे जाहिरात केलेले फायदे-तोटे आणि प्रत्यक्ष परफॉर्मन्स याचा अनुभव घेतलेला आहे, इतर शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला माहीत आहेत - तेव्हा तुम्हीच यावर एखादा लेख लिहिला तर मला काहीतरी शिकायला मिळेल.

अर्धवटराव Sat, 01/30/2016 - 06:30
निसर्गाच्या व्यवहारात ढवळाढवळ म्हणजे पाप वगैरे भानगडीत काहिच अर्थ नाहि हे खरं आहे. नैतीकतेची बंधनं देखील काहि कामाची नाहि. जीएमो च्या बाबतीत सर्वात मोठी भिती मानवी हव्यासाचीच आहे. उत्सुकता, उपयोगीता, गरज वगैरे पासुन सुरु होणारं तंत्रज्ञान व्यवसायाच्या पातळीवर येतं आणि मग त्याचा भस्मासूर होण्याची भिती वाटते. दोन महायुद्धांत विज्ञानाने कमावलेल्या शस्त्रांमुळे काय हाहा:कार उडाला हे जगाने बघितलं आहे. कुठलिही समाजोपयोगी गोष्ट विकेंद्रीत होण्याऐवजी (सत्ता/धन)केंद्रीत झाली कि त्यामुळे उद्भवणारा धोका कल्पनातीत असतो (कल्पनातीत म्हणजे इन्फायनैट या अर्थाने नव्हे, तर ज्याला भोगावं लागतं त्याला काहिच कल्पना नसणे या अर्थाने...) पण हा वाद 'विज्ञान शाप कि वरदान' या टाईपचा आहे. आणि त्याला उत्तर म्हणजे 'डजण्ट मॅटर... इट्स कमींग...'