मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वाचे आर्त - भाग ११ - सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
1
. भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत, भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत , भाग ९ - अनैसर्गिक निवड , भाग १० - नैसर्गिक निवड , सिंहावलोकन *************** 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' हा वाक्प्रयोग स्वतः डार्विनने प्रथम वापरला नव्हता. हर्बर्ट स्पेन्सरने उत्क्रांती घडवून आणणाऱ्या नैसर्गिक निवडीचे वर्णन करताना तो वापरला. तो इतका नेमका ठरला की डार्विननेही आपल्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये वापरायला सुरूवात केली. एखादी कल्पना नेटकेपणाने मांडण्यासाठी अशा मोजक्या, प्रभावी शब्दांच्या वाक्प्रचारांचा उपयोग होतो खरा; पण काही वेळा त्या सोपेपणाची किंमत गैरसमजांतून मोजावी लागते. किंबहुना असे आकर्षक वाक्य मनात ठासून बसले की त्याचे आपल्याला हवे ते अर्थ काढून तोच उत्क्रांतीवादाचा सारांश समजणे साहजिक होते. मराठीत त्याचे शब्दशः भाषांतर 'सर्वात लायक तगून राहातात' असे होईल. पण सर्वात लायक म्हणजे नक्की कशासाठी? तगून राहाणे म्हणजे काय? बळी तो कान पिळी असा अर्थ अपेक्षित आहे का? या जगात शक्तिवान लोकांना दुर्बळांचा नायनाट करण्याची मुभा या वाक्याने दिली आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. या वाक्याचा अर्थ नक्की काय, आणि नक्की काय नाही हे आपण समजून घेऊ. 'फिट' या शब्दाचा अर्थ आपण सुडौल, शक्तिवान, चपळ शरीराशी जोडतो. या अर्थाचा एक थर तसा आहेच. मात्र फिट याचा दुसरा अर्थ 'फिट बसणे' याच्याशीही निगडित आहे. आपल्या सर्वसाधारण वापरात तो विशिष्ट खोबणीत बरोब्बर बसणे या अर्थाने वापरतो. किंवा एखाद्या समूहात इतरांशी मिळतंजुळते घेत आपली जागा बरोबर धरून राहाण्यालाही फिट बसणे म्हणतात. नैसर्गिक निवडीच्या संदर्भात फिटेस्ट म्हणजे सर्वात शक्तिवान किंवा सर्वाधिक सौष्ठव असलेला हा अर्थ कमी असून तत्कालीन परिस्थितीत जगण्यासाठी आवश्यक असे गुण बाळगणारा हा अर्थ होतो. म्हणून मराठीत त्यासाठी लायक हा शब्द वापरला आहे. सर्व्हायव्हल म्हणजे अर्थातच टिकून राहाणे. अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत मिळतंजुळते घेऊन तगून राहाणे. 'ज्या सजीवांमध्ये आपल्या भवतालाशी मिळतंजुळते घेण्याची सर्वाधिक क्षमता असते ते टिकून राहातात, कमी क्षमता असलेले टिकून राहू शकत नाहीत.' हा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचा अर्थ आहे. म्हणून सर्वाधिक लायक तगून राहातात हे सोपे भाषांतर. तरीही या वाक्यातून अनेक चुकीच्या अर्थच्छटा स्वीकारल्या जाण्याचा धोका आहे. त्यासाठी आपल्याला ते नीट तपासून घ्यायला हवे. टिकून राहाणाऱ्या अनेक गोष्टी आपण बघतो. खरे तर टिकून राहाणे हे आपण सजीवांपेक्षा निर्जीवांबाबत अधिक सत्य मानतो. 'आयुष्य क्षणभंगूर आहे. माणसाचे जीवन मर्यादित आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव मृत्यू पावतो' या गोष्टी आपण गृहित धरतो. याउलट 'हिमालय पर्वत अचल, अढळ, अमर आहे' म्हणतो. किंवा 'जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत...' असे म्हणत आपण सूर्य-चंद्राचे कायमचे अस्तित्व अधोरेखित करतो. हिमालय, सूर्य, चंद्र टिकून राहातात. हिमालयावरचे हिम दरवर्षी वेगळे असेल, काही दगड तुटतील, कडे कोसळतील, पण एक पर्वतरांग म्हणून त्याचे स्वरूप बदलत नाही. आपल्या महाकाय आकारामुळे बदलच न घडणे किंवा घडलेले हे एक प्रकारचे स्थैर्य आहे. सजीवसृष्टीमधले स्थैर्य वेगळ्या स्वरूपाचे असते. त्यांचे टिकून राहाणे पर्वत-नद्यांपेक्षा भिन्न असते. एक विशिष्ट हरीण घेतले तर ते त्याचे आयुष्य संपेपर्यंतच टिकून राहाते. पण हरीण ही जमात, ती प्रजाती पिढ्यानपिढ्या टिकून राहाते. हरणांची एक पिढी आपल्यासारख्याच पिढीला जन्म देते आणि मरून जाते. आणि हे चक्र चालू राहाते. त्या विशिष्ट हरणाचे पाडस पाहिले तर ते हुबेहुब आपल्या आईवडिलांप्रमाणे नसते. तसे कुठचेच हरीण दुसऱ्या कुठल्याही हरणासारखे हुबेहुब नसते. मग एका पिढीतून पुढच्या पिढीत नक्की काय जातं? याचे उत्तर आहे - गुणधर्म. आपण हरीण कसे ओळखतो? त्याचा आकार, त्याच्या अंगाचा रंग, त्यावरच्या ठिपक्यांचा पॅटर्न, त्याच्या चेहेऱ्याची ठेवण, गवत खाण्याची सवय, धावण्याचा साधारण वेग, चित्त्याचे अन्न असणे - या सर्व गुणधर्मांचा समुच्चय असलेला प्राणी म्हणजे हरीण. त्यामुळे टिकून राहातात ते विशिष्ट प्राणी नव्हेत, किंवा हुबेहुब तसेच प्राणी नव्हेत; तर त्या प्राण्याच्या व्यवच्छेदक गुणधर्मांचा एकत्रित समुच्चय. या गुणधर्मांचे पिढ्यानपिढ्या टिकून राहाणे हे हिमालय किंवा सूर्य-चंद्र टिकून राहाण्यापेक्षा वेगळे आहे. पर्वत हे एका जागी असतात, किंवा भौतिकदृष्ट्या बदलत नाहीत. याउलट प्राणी जन्मतात-मरतात पण त्यांच्या प्रजातीचे स्वरूप तेच राहाते. पहिल्यांदा उत्क्रांती शिकताना 'समूह टिकून राहातो' या पद्धतीची मांडणी केलेली मी ऐकली होती. ती पूर्णपणे चुकीची नाही, पण तितकीशी बरोबरही नाही. 'समूहाच्या भल्यासाठी' प्राणी काहीतरी करत असतात किंवा निदान त्यांनी ते करावे तरी अशा काहीशा रोमॅंटिक विचारांचा तीवर पगडा होता. ती मांडणी पुरेशी बरोबर नाही. व्यक्तीही टिकून राहात नाहीतच. म्हणून या टिकून राहाणाऱ्या गुणधर्मांचा विचार करण्यासाठी 'जीन पूल' किंवा 'जनुक समुच्चय' ही संकल्पना आहे. म्हणजे समजा एखाद्या प्रजातीत पंखांचे रंग काळे किंवा पांढरे असू शकतात. काही कारणामुळे १० टक्के काळा रंग असलेले आणि ९० टक्के पांढऱ्या रंगाचे जीव आहेत. याचा अर्थ जनुक समुच्चायात पंखांचा रंग ठरवणाऱ्या जनुकांपैकी काळा रंग निर्माण करणारी १० टक्के जनुके आहेत आणि पांढरा रंग निर्माण करणारी ९० टक्के जनुके आहेत. आता या दोन जनुकांमध्ये फिटेस्ट किंवा तगायला लायक नक्की कुठचं? थोडक्यात पंखांचा रंग काळा असलेला चांगला की वाईट? याला सरळसोट उत्तर नाही. कारण हे परिस्थितीनुसार ठरते. परिस्थिती बदलली की त्याला प्रतिसाद म्हणून या दोनपैकी कुठचा रंग 'चांगला' हे ठरते. याचे एक उदाहरण आपल्या डोळ्यांदेखतच, म्हणजे गेल्या दोनशे वर्षांत घडलेले आहे. औद्योगिक क्रांतीच्या आधी काळ्या रंगाचे पतंग (मॉथ) हे अतिशय कमी प्रमाणात आढळत असत. सुमारे नव्व्याण्णव टक्के पतंग हे पांढऱ्या रंगाचे व त्यावर काळे ठिपके असलेले असत. पांढुरक्या रंगाच्या झाडांच्या बुंध्यांच्या पार्श्वभूमीवर ते दिसायला अवघड होते, याउलट काळे पतंग चटकन उठून दिसत. आणि भक्षक पक्षी त्यांना खाऊ शकत. मात्र औद्योगिक क्रांतीमुळे ही परिस्थिती बदलली. अनेक ठिकाणी नवीन झालेल्या गिरण्यांच्या धुरामुळे झाडांच्या बुंध्यांवर काळे थर जमले. आता या काळ्या रंगांवर पांढरे पतंग उठून दिसायला लागले. याउलट काळ्या पतंगांना पार्श्वभूमीत मिसळून जाता आल्यामुळे संरक्षण मिळाले. त्यामुळे औद्योगिक क्रांती चालू असतानाच्या काळात - एकोणिसाव्या शतकात - काळ्या रंगांच्या पतंगांचे प्रमाण प्रचंड वाढले. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात प्रदूषण हळूहळू कमी झाले. त्यामुळे पुन्हा परिस्थिती बदलली. आता झाडांवर काळ्या रंगाचा थर नाहीसा झाला. औद्योगिक क्रांतीपूर्वीचीच परिस्थिती परत आली. आणि त्याचबरोबर जनुकसमुच्चय बदलून त्यामुळे काळ्या रंगाच्या पतंगांची संख्या कमी झाली, पांढऱ्या रंगांच्यांची संख्या वाढली. या उदाहरणावरून एक मुख्य गोष्ट दिसून येते ती म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट मधला फिटेस्ट किंवा तगण्यासाठी लायक हा काही आधीच ठरलेल्या गुणांचा संच नसतो तर ते गुणधर्म कुठचे हे परिस्थितीनुसार ठरते. म्हणजे काहीसे असे - अधिक वेग, अधिक शक्ती, अधिक चपळता हे गुणधर्म आपल्याला 'फिट' असण्याशी जोडलेले वाटतात. पण उत्क्रांतीच्या बाबतीत हे नेहेमीच बरोबर असेल असे नाही. वेगवान ससा हा जसा उत्क्रांत आहे, तसंच हळूवार चालणारे कासव हेही उत्क्रांत आहे. त्या दोघांकडेही आपापल्या परिस्थितीत, आपापल्या पद्धतीने जगण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक अशा जनुकांचा समुच्चय आहे. यापैकी कुठचा चांगला अथवा कुठचा वाईट असे आपल्याला म्हणता येणार नाही. मनुष्याला बुद्धी आहे, त्याला भाषा बोलता येतात, त्याने तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आहे, म्हणून आपल्याला असे वाटू शकते की मनुष्य हा सर्वोत्तम, किंवा उत्क्रांतीच्या सर्वोच्च पायरीवर असलेला प्राणी आहे. पण ते खरे नाही. इतर प्राणीही आपल्याप्रमाणेच त्यांच्या त्यांच्या जीवनपद्धतीत टिकून राहिलेले आहेत. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अमुक गुणधर्म चांगला, किंवा तमुक गुणधर्म कमी दर्जाचा असे काही नाही. कारण नैसर्गिक निवड ही आंधळी असते. कोणी ती विशिष्ट दिशेने प्रवास व्हावा म्हणून करत नाही. पतंगांच्या उदाहरणावरून दिसते की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या वाक्प्रयोगात काळे वाईट - पांढरे चांगले असा काळापांढरा, ठरीव विचार नाही. ज्या परिस्थितीत जे गुणधर्म विशिष्ट प्राण्याला जगून राहायला, टिकून राहायला, आणि पुनरुत्पादन करून आपले गुणधर्म पुढच्या पिढीत पाठवायला मदत करतात त्या गुणधर्मांचा समुच्चय टिकून राहातो. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

वाचने 7270 वाचनखूण प्रतिक्रिया 12

राही 06/01/2016 - 19:32
या मालिकेतल्या इतर लेखांप्रमाणे हा लेखही आवडलाच, पण त्यातल्या कठिण संकल्पना सोप्या करून सांगणारी प्रवाही ओघवती भाषा अधिक आवडली, आवडते.

मराठी कथालेखक 06/01/2016 - 19:54
हा लेखसुद्धा छान आहे. पण जुन्या वशंजांचा दाखला द्यायला विसरलात की हो .. (म्हणजे आधीच्या लेखांचे दुवे) अशानं समुच्चय टिकायचा कसा ? Big Smileys

In reply to by मराठी कथालेखक

राजेश घासकडवी 06/01/2016 - 20:32

मराठी_माणूस 06/01/2016 - 20:11
ज्या परिस्थितीत जे गुणधर्म विशिष्ट प्राण्याला जगून राहायला, टिकून राहायला, आणि पुनरुत्पादन करून आपले गुणधर्म पुढच्या पिढीत पाठवायला मदत करतात त्या गुणधर्मांचा समुच्चय टिकून राहातो
ह्या मधे प्राणी कायम स्वरुपी टीकुन रहायला (अमरत्व कींवा जास्तीत जास्त आयुर्मान), गुणधर्मा मधे तशा प्रकारचा बदल घडुन येण्याच्या द्रुष्टीने काही होत नाही का ?

In reply to by मराठी_माणूस

राजेश घासकडवी 07/01/2016 - 10:06
उत्तम प्रश्न. शरीराचं अमरत्व ही तशीही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. कारण कधी ना कधी, कुठे ना कुठे अपघात होतातच. त्यामुळे लांब आयुष्य विरुद्ध कमी आयुष्य असा विचार करू. लांब आयुष्य असणारं शरीर निर्माण करायचं हे रचनेच्या दृष्टीने खर्चिक प्रकरण असतं. कारण त्यात सतत शरीर दुरुस्त करत राहाण्याच्या यंत्रणा निर्माण कराव्या लागतात. त्या यंत्रणा मोडू नयेत म्हणून त्या वेळोवेळी दुरुस्त करण्याची सोय करावी लागते. पण समजा अशी एक पॉप्युलेशन आहे जी हजार वर्षं जगते. त्या लोकसंख्येत समजा जर असं म्यूटेशन झालं की ज्यायोगे ती व्यक्ती हजारऐवजी सहाशेच वर्षं जगेल, पण पहिल्या पन्नास वर्षांत अधिक शक्तीवान असेल, आणि त्या काळात अधिक मुलं पैदा करू शकेल. अर्थातच जसजशा पिढ्या जातील तसतसा हा जीन लोकसंख्येत पसरत जाईल. पुनरुत्पादनक्षमता जितकी लवकर सुरू होईल तितकी लवकर पिढी जन्माला येईल. त्यामुळे आयुष्य कमी करून पुनरुत्पादनक्षमता आधी आणणारे जीन्स लोकसंख्येत जास्त पसरतील. थोडक्यात जर १०० वर्षं मध्यमवयीनासारखं जगणारं शरीर असण्यापेक्षा पंधरा ते तीस वयात तरुण, जोरकस शरीर आणि पन्नासनंतर म्हातारं होणारं शरीर हे जनुकीय दृष्ट्या जास्त फायद्याचं आहे.

सुधीर कांदळकर 09/01/2016 - 07:01
हाही लेख चांगला जमला आहे. आवडला. धन्यवाद.

अर्धवटराव 09/01/2016 - 07:36
चक्रावुन जायला होतं हे सगळं बघुन. मग परत तोच विचार येतो... एखाद्या पेशीला, पेशी/रेणु समुहाला, सभोवताच्या परिस्थितीशी जुळवुन घ्यायची प्रेरणा कुठुन येत असावी. ज्या प्रमाणे जुळवुन घ्यायची प्रेरणा आदिम आहे तसच कुण्या पेशीने मुद्दाम जुळवुन न घेण्याची आत्मघातकी प्रेरणा सुद्धा जोपासली असेल काय? मग या दोन्हि परस्पर विरुद्ध प्रेरणांचा उगम काय असावा. विश्वाचं प्रसरण होणं म्हणजेच 'वाढ' होणं म्हणावं काय? आणि हि वाढच अ‍ॅडाप्टीव्ह प्रेरणेचं मूळ कारण असेल काय??

In reply to by अर्धवटराव

राजेश घासकडवी 09/01/2016 - 18:16
एखाद्या पेशीला, पेशी/रेणु समुहाला, सभोवताच्या परिस्थितीशी जुळवुन घ्यायची प्रेरणा कुठुन येत असावी.
परिस्थितीशी जुळवून घेण्याची 'प्रेरणा' पेशीसमूहांमध्ये नसते. पुन्हा जिराफाच्या मानेचं उदाहरण घेऊ. लाखो वर्षांपूर्वी जे चार फूट लांब मान असलेले जिराफ होते, त्यांच्यापैकी 'जिराफ जमातीची मान लांब झाली तर बरं होईल' अशी प्रेरणा नव्हती. किंवा उंचावर असलेली पानं खाण्यासाठी त्यांनी माना ताणल्या म्हणून त्यांच्या वंशजांच्या माना लांब झाल्या असंही नाही. त्यांना जी पिल्लं झाली त्यातल्या काहींच्या मानेच्या लांबीत काही आपोआप होणारे जनुकीय बदल (आजब किंवा जेनेटिक म्यूटेशन्स) झाली. त्यातल्या फक्त मानेच्या लांबीवर परिणाम करणारे जनुकीय बदल पाहू. काही माना लांब करणारे होते, तर काही माना आखूड करणारेही होते. त्यातल्या लांब मानांच्या जिराफांना जास्त अन्न मिळालं म्हणून त्यांना मुलं जास्त झाली, आणि आखूड मानांच्या जिराफांना फार पिल्लं झाली नाही. त्यामुळे पुढच्या पिढीत लांब मानेच्या जिराफांची संख्या थोडीशी वाढली. फार नसेल, समजा एखादा टक्का वाढ झाली. पण ही संख्यावाढ दर पिढीला चालू राहाते. दर पिढीला थोडी थोडी करत जिराफांच्या लोकसंख्येतलं लांब मानांचं प्रमाण वाढत जातं, आणि आखूड मानांचं प्रमाण कमी होत जातं. कुठच्याही प्रेरणेशिवाय सगळी लोकसंख्याच बऱ्याच पिढ्यांनंतर लांब मानेची बनते. अजून काही आजब घडतात. आणि ही प्रक्रिया चालूच राहाते. एका विशिष्ट प्रमाणात मान वाढली की ती वाढलेली मान सांभाळत जगण्याचे तोटे आणि लांब मानेचे फायदे जेव्हा साधारण समान होतात तेव्हा मान वाढायची थांबते. याचा अर्थ जनुकीय बदल होणं थांबत नाही. फक्त मान अतिरेकी लांब असलेल्यांचा तोटा होतो, आणि आखूड मानेचे जिराफ जसे अनेक पिढ्यांनंतर नाहीसे होतात तसेच अतिरेकी लांब मानेचे जिराफही नाहीसे होतात.
ज्या प्रमाणे जुळवुन घ्यायची प्रेरणा आदिम आहे तसच कुण्या पेशीने मुद्दाम जुळवुन न घेण्याची आत्मघातकी प्रेरणा सुद्धा जोपासली असेल काय?
पुन्हा, प्रेरणा हा शब्द योग्य नाही. मात्र आपोआप होणारे जनुकीय बदल हे जसे काही चांगलेे असतात तसेच काही वाईटही असतात. त्यातले त्या पर्यावरणात जगायला मदत करणारे बदल पुढच्या पिढ्यांमध्ये टिकून राहातात, वाईट बदल नाहीसे होताना दिसतात.

In reply to by राजेश घासकडवी

जिराफाची मान हे एकच उदाहरण बरेचजण घेतात. परागीभवनासाठी जो किडा फुलावर बसणं आवश्यक त्याच्या मादीसारखा हुबेहूब आकार आणि गंधही फुलांमधे असणं हेही असंच म्हणायचं? (काही फुलं चुकून किड्याच्या मादीच्या आकाराची झाली आणि ती अधिक पैदास करत गेली. त्यातल्या काहींना चुकून त्याच नेमक्या किड्यांच्या मादीसारखा गंध प्राप्त झाला, मग त्यांची जास्त पैदास झाली इ.इ...) परिसराचा हुबेहूब रंग , डिझाईनसकट अंगावर धारण करणारी फुलपाखरं, सरडे हेही सतत रंग बदलू शकणारे म्युटेशननेच होत गेले असं म्हणायचं? डॅनाईड एगफ्लाय या पक्ष्यांसाठी चांगल्या चवीच्या फुलपाखराची मादी टायगर या वाईट चवीच्या फुलपाखराची तंतोतंत नक्कल असते. नर आणि मादी एगफ्लायमधला फरक पहा. A फक्त मादी अचानक म्युटेशनने इतकी प्रचंड (शून्य साम्य) बदलली आणि बदलत गेली? तीही नेमकी आसपासच्या अन्य वाईट चवीच्या फुलपाखरासारखीच (आणि म्हणून पक्ष्यांकडून टाळली जाऊन अभय मिळणारी). अशी असंख्य उदाहरणं आहेत. तस्मात योगायोग अन म्युटेशन वगैरे थियरी म्हणून ठीक, पण फार फार फेच्ड वाटायला लावणारी. अगदी जंबोजेट जुळून येण्याइतकी.

In reply to by गवि

राजेश घासकडवी 10/01/2016 - 04:20
मिमिक्री हा प्राणीजगतात आढळून येणारा अत्यंत कॉमन प्रकार आहे. एका प्रजातीने आपलं रूप 'बदलून' दुसऱ्या प्रजातीसारखं 'करणं' हे त्या प्रजातीसाठी किंवा दोन्ही प्रजातींसाठी उपयुक्त ठरणारी गोष्ट आहे. त्यामुळे फुलाचा आकार मादीसारखा होणं, वासही तसाच होणं, अंगाचे रंग विषारी प्रजातींसारखे होणं ही उदाहरणं सर्रास दिसतात. किंबहुना विविध प्राणी उत्क्रांत झाले याचा सबळ पुरावाच मिमिक्रीतून दिसून येतो. पण तुमचा मुद्दा थोडा वेगळा आहे.
अशी असंख्य उदाहरणं आहेत. तस्मात योगायोग अन म्युटेशन वगैरे थियरी म्हणून ठीक, पण फार फार फेच्ड वाटायला लावणारी. अगदी जंबोजेट जुळून येण्याइतकी.
थोडक्यात तुमचा मुद्दा 'इर्रिड्युसिबल कॉंप्लेक्सिटी'चा आहे. युक्तिवाद पेलीसारखाच आहे. आणि हे मी तो मुद्दा झटकून टाकण्यासाठी म्हणत नाहीये. किंबहुना या युक्तिवादाला पुरेसं परिणामकारक उत्तर दिल्याशिवाय उत्क्रांतीच्या थियरीबद्दल लोकांना पुरेशी खात्री वाटत नाही. तुम्ही 'योगायोग' हा शब्द वापरलेला आहे. पण नैसर्गिक निवडीत योगायोग नाही. म्यूटेशन्स योगायोगाने होतात. पण त्यातले फेवरेबल नेहेमीच निवडले जातात. आणि प्रवास एका विशिष्ट दिशेने होतो. जिराफाच्या मानेच्या लांबीचं उदाहरण नेहेमी दिलं जातं याचं कारण ते वन डायमेन्शनल आहे, कंटिन्यूअस आहे, त्यामुळे समजून घ्यायला सोपं आहे. पण इतर कुठच्याही गुणधर्माविषयी आपल्याला असा एकदिशीय विचार करता येईल. उदाहरणार्थ तुम्ही घेतलेलं 'फुलं हुबेहुब मादीच्या आकाराची, आणि त्याच वासाची असतात' हे घेऊ. काही लाख, कोटी वर्षं मागे जाऊ आणि त्यावेळच्या फुलांना एक स्कोअर देऊ. त्या विशिष्ट किड्याच्या मादीशी किती साम्य आहे? वास, आकार या सर्वात हुबेहुब साम्य असेल तर १० आणि बिलकुल साम्य नसेल तर ०. आता त्याकाळी त्यांच्यात फार साम्य नव्हतं - त्यामुळे त्यांचं वितरण १ ते ३ मध्ये असेल कदाचित. आता जर त्या किड्यांना ३ हे पुरेसं साम्य वाटलं, तर ते त्या फुलांकडे जास्त आकर्षित होतील, आणि त्या फुलांचे पराग जास्त प्रमाणात पसरवले जातात. असं पिढ्यानपिढ्या झालं की १ ते ३ मध्ये असलेलं डिस्ट्रिब्यूशन २ ते ३ मध्ये येतं. मग काहीतरी म्यूटेशन घडतं आणि ३.५ स्कोअर असलेली फुलं निर्माण व्हायला लागतात. अर्थातच ही फुलं त्या किड्यांना जास्त आवडतात, आणि त्यांचे पराग जास्त पसरतात.... आणि ही प्रक्रिया चालू राहात एक वेळ अशी येते की शेवटी डिस्ट्रिब्यूशन हे ६ ते ८ मध्ये आहे. कणसांची लांबी, जिराफांच्या मानेची लांबी जशी वाढत गेली, तसंच हे डिस्ट्रिब्यूशन अव्याहतपणे सरकत जातं. प्रश्न असा आहे की आपल्याला प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत जंबोजेट सिद्धांताप्रमाणे उडी न मारता चढत्या पायऱ्यांचा हळुवार स्लोप सापडतो का? अनेक बाबतीत सापडलेला आहे. अनेक बाबतीत मल्टिपल म्यूटेशन्सही होताना दिसलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत एक म्यूटेशन, दुसरं म्यूटेशन असं करत करत प्रत्येक वेळी आधीच्यापेक्षा चांगली परिस्थिती निर्माण करता आली तर आत्ताच्या उंचीपर्यंत कसे पोचले हे समजून घेता येतं. डोळा कसा उत्क्रांत झाला याबद्दल खूप संशोधन झालेलं आहे.