येडस...
तर ऐंशीच्या दशकात एका आफ्रिकन बयेला माकडचाळे करण्याची कुबुद्धी सुचली. अर्थात चाळेच ते. कसेही, कुठेही अन् कधीही करता येऊ शकतील इतकी त्यात ती रममाण होऊन गेली होती. म्हणजे तिने पाळलेल्या मर्कटाशी तिचे सूत जुळले होते. सूत जुळले म्हटल्यावर ऊत यायला वेळ लागत नसतो. त्याप्रमाणे उतू गेलेला तिचा त्यावेळचा ऊत आता सर्वांना चांगलाच भोवला आहे. गेल्या चाळीस वर्षात अधिक मृत्यू होणाऱ्या मलेरियाचा धसका कोणी घेतला नसेल इतका एड्सचा घेतला जातो. झाले भले, होवो भले पण यांमुळे लोकांच्या (अन् बायकांच्याही) ‘बिन’धास्त वागण्याला एकप्रकारे लगामच बसला म्हणायचा. ‘साधन’ बाळगल्याशिवाय बागडता येऊ शकणार नाही, असा नियमच बनून गेला. तसं हुंदडायचं-बागडायचं वय थेट सत्तर ऐंशी पर्यंत पोचल्याचं आपण पेपरांत वाचतोच की. इतके म्हातारचळ उघडकीस येत असतील तर या व्हायरसचा धोका किती वाढू शकतो याचा अंदाजच केलेला बरा... असो.
बाहेर जावे तर ‘टोपी’ आवश्यक असते, रपेट मारावी तर ‘हेल्मेट’ जरुरी होता है! असा एकंदर गोची करणारा मामला बनला आहे. ‘ते’ साधण्यासाठी ‘हे’ खिशात असलंच पाहिजे, ही अट मोठी जाचक ठरू लागलीय. पूर्वी कसं डोंगरकपारीत, झाडा-झुडपामागे, मुख्यत्वे उभ्या डोलणाऱ्या पिकांत ‘एक मौका दे, मौका दे, मौका दे’ म्हणत विनासायास घुमता यायचं, रमता यायचं. आता भितीच एवढी वाटते की जिला/ज्याला आपण स्पर्शतो आहोत ती/तो पॉझिटिव्ह तर नसेल ना? या नुसत्या शंकेनेच सेक्शुअल ड्राईव्ह पुरेसा ऍक्ट होत नाही! मुक्तपणा, स्वैर वागणे आता शक्य नाहीच. अशा ‘गैर’ ठिकाणी मग मनाची समजूत घालून भीत भीत मुख्य कार्यभाग पूर्ण केल्याचं समाधान मानून घ्यावं लागतं. असो.
सध्या भारतात जवळजवळ २.५ मिलियन लोक एचआयव्हीसह जगत आहेत. ही जी पॉझिटिव्ह व्यक्तींची आकडेवारी प्रसिध्द करून चिंता व्यक्त केली जाते, त्याहीपेक्षा भयाण वास्तववादी आकडे जाहीर झाल्यावर ग्लानीच येईल. आपणही तसे नाही ना? अशी शंका नकळत येत जाईल. इतका हा भस्मासूर फोफावला आहे. स्वतःहून एचआयव्हीची तपासणी कुणीच करून घेत नाही. बोटांवर मोजण्याइतकेच असतील. त्यामुळे खरी माहिती पुढे येत नाही. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही हा व्हायरस आपले काम चोखपणे बजावत चालला आहे. कितीही सावधगिरी बाळगली तरी त्या अधीरक्षणी संयम सुटतोच. त्याला व्यसनेसुद्धा पूरक ठरत असतात. ‘आपण हे काय करून बसलो?’ असा प्रश्न सकाळी उतरल्यावर पडतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. व्हायरसने आणखी एकाला लक्ष्य केलेले असते. आम्ही मेडिकल कॉलेजला असतांना नेहमी सांगितले जायचे, ‘सध्याचा एचआयव्हीचा प्रसारवेग पाहता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा पाचपैकी एक पेशंट एचआयव्ही ग्रस्त असणार आहे. तेव्हा प्रत्येक पेशंट हाताळतांना काळजी घेणे जरुरीचे आहे.’ परंतु तसे झाले नाही. जनता वेळीच जागरूक झाल्याने, तशा जाहिरातींचा भडीमार केला गेल्याने एचआयव्हीच्या संसर्गाला थोडाफार का होईना आळा बसला आहे. एक मात्र खरे जनमानसांत या व्हायरसची इतकी धास्ती घेतली गेली की कंडोमच्या बाजारपेठेत प्रचंड उलाढाल वाढली. यशस्वी मार्केटींग तंत्र वापरून काही कंपन्या त्यामुळे गब्बर झाल्या. (यावरूनही ‘बाहेर’ जाणे किती अगत्याचे असते, याची प्रचिती अभ्यासूंना घेता येऊ शकेल!) असो.
त्यानंतर एचआयव्हीला आटोक्यात ठेवण्याची औषधे उपलब्ध झाल्यावर बहुतेकांकडून सुस्कारा टाकला गेला. तोवर अनेक तथाकथित वैद्य व खानदानी तंबूवाल्यांनी चौका-चौकांत अशा एड्सग्रस्तांना गाठून पार लुटून नेले होते. कधीही बरा न होणारा आजार समूळ नष्ट केल्याचा दावा हे भोंदू लोक करीत असायचे. एका दाक्षिणात्य वैद्यबुवांनी तर अशी औषधी शोधून काढली होती की ज्यामुळे एचआयव्हीचा रिपोर्ट निगेटिव्ह येत असे! खरे तर ती शुध्द धूळफेकच होती. शरीरातील सी-डी फोर काउंट वाढवून दाखवीत तो वैद्य एड्स बरा केल्याचा आव आणायचा. त्याने या एका आजारापोटी भयंकर माया गोळा केली. आमचे काही पेशंटही त्याचा महागडा प्रसाद घेऊन आले होते. त्या वनस्पतीने थोडी तरतरी यायची मात्र एड्स वाढतच रहायचा. अशाप्रकारे त्याने अनेकांना गंडवले. भीतीच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला असे अनेक भोंदू टपलेले होतेच. असो.
दोन वर्षांपूर्वी ७२ तासांच्या आत घ्यावयाच्या गोळीची अमाप विक्री झाली तेव्हाही अनेक चर्चासत्रे झडली. ही गोळी ७२ तासांच्या अगोदर सेवन केली असता गर्भधारणा होत नाही अशी जाहिरात केली गेली. संततीनियमनासाठी ती वापरणे योग्यच होते. मात्र या गोळ्या कॉलेजपरिसरांतील मेडिकल्समध्ये इतक्या खपू लागल्या की समाजधुरीणांनी या विरुध्द आवाज उठवला नसता तर नवल. ‘विदाऊट कंडोम’ एकत्र येण्यासाठीची गुरुकिल्ली म्हणजे ही गोळी. असा समज भुकेल्या तरुण-तरुणींमध्ये पसरला. त्यामुळेच या गोळ्या प्रमाणापेक्षा अधिक खपल्या होत्या. परंतु या वापरणाऱ्यांच्या हे लक्षात येत नव्हते की ही गोळी फक्त गर्भ राहू देत नाही, इतर जंतू इकडे-तिकडे येणार-जाणार आहेतच. या गोळीच्या वापराने ‘एसटीडी’ बेलाशक पसरणार हे ठरलेलेच होते. ही भीती ओरडून सांगावी लागली तेव्हा कुठे या गोळ्या निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी जाहिरात मागे घेऊन हात आखडता घेतला. असो.
तर असे हे ‘येडं’स पुराण. गावे तितके कमीच ठरेल. खरोखर या आजाराला इतके घाबरून चालेल का? तर नाही. म्हणजे स्वैर वागावे असा म्हणायचा हेतू नाही. मुळात व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन मेथड सर्वांनी अंगिकारावी हेच खरे. एचआयव्ही पॉझिटीव्ह म्हणजे एड्स नव्हे, हे कायम लक्षात ठेवावे. एचआयव्ही हा विषाणू शरीरांत असणे म्हणजे मृत्यू नव्हे. तो योग्य औषधोपचारांनी कित्येक वर्षे लांबविता येतो, याची अनेक उदाहरणे आढळतील. यांमुळेच जे पॉझिटिव्ह झालेच आहेत, त्यांना मायेने जवळ करणाऱ्या अनेक संस्था पुढे येत आहेत. हे एक क्रिटीकल समाज कार्य असले तरी त्यातील उदात्त मेख जाणून घेऊन अनेक तरुण-तरुणी हात पुढे करून एचआयव्हीबाधितांच्या सेवेला हजर राहताहेत. त्यांच्या मनात किंतु नसतो का? त्यांना अनेक शंका येत नसतील का? ते का म्हणून अशांच्या दिमतीस हजर राहत असतील? असे कित्येक प्रश्न सामान्यांना पडत असतील. पण त्याची फिकीर न बाळगता त्यांचे सत्कार्य चालू आहे. रुग्ण कशाने एचआयव्हीबाधित झाला हे ते शोधीत बसत नाहीत. त्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यापेक्षा आपल्याला एड्स झालाय या भीतीतून बाहेर काढणे हे स्वतःचे आद्य कर्तव्य ते समजतात. समुपदेशन, औषधोपचार इ.इ. कार्ये त्यात अंतर्भूत आहेत. असो.
१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनी अशा अनेक मुद्यांचा ऊहापोह केला जाईल. त्यावरील नवनवीन औषधांची चर्चा होईल. सामान्यांना ज्याचे नाव उच्चारताच अंगावर काटा येतो तो आजार कसा रोखता येईल या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी व्हावयास पाहिजे ही अपेक्षा...
वाचने
4990
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक!
चांगलं लिहलयं
छान प्रासंगिक. सकाळी
लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे
In reply to छान प्रासंगिक. सकाळी by धन्या
लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे
In reply to छान प्रासंगिक. सकाळी by धन्या
कितवीला आहात? पास.
In reply to लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे by मानस्
उत्तम लेख आणि परफेक्ट
ह्म्म्...एड्सचा व्ह्यायरस कसा
+१
In reply to ह्म्म्...एड्सचा व्ह्यायरस कसा by मदनबाण
दालचिनी (Cinnamon) ला मराठी शब्द - 'कलमी'!!
In reply to ह्म्म्...एड्सचा व्ह्यायरस कसा by मदनबाण
एड्स....
येडस... तर ऐंशीच्या दशकात एका
>>येडस... तर ऐंशीच्या दशकात
+१००
In reply to >>येडस... तर ऐंशीच्या दशकात by स्वाती२
स्वातीतै आणि बहुगुणी काकांशी
In reply to +१०० by बहुगुणी
चुकीची माहीती
सर्वप्रथम लेख अजिबात आवडला