येद्या मुग्या
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.
टिळकांच्या प्रेरणेनंतर या तरुणांनी महुज-नाळवंडी-हिवरा-शिवणी-वांगी व अजूबाजूच्या वाड्या-तांड्यातून ४०-६० गबरु तरुण एकत्र केले. त्यांनी शोषितांचे दु:ख समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना वाटले की सर्वांत मोठा प्रश्न आहे तो म्हणजे अर्थिक विवंचना. त्यावर उपाय म्हणून धाक दाखवून स्थानिक सावकारांकडून खंडण्या वसूल करुन त्या पैशात गरजुंना मदत करायचे ठरले. खंडणी सत्र सुरु झाले पण गरीबी, रोगराई येवढी भयानक होती की त्यातून काहीच भागेना. दरम्यान यांच्या नावाचा दबदबा सुद्धा तयार झाला होता. त्यातच काही सावकारांनी त्यापुढे खंडणी द्यायला असमर्थता दर्शवली. आपला दबदबा कायम ठेवाचा तर या सावकारांना अद्दल घडवली पाहिजे म्हणून यांनी सरळ डाके टाकायला सुरुवात केली. आता डाक्यांसाठी बंदुका, दारुगोळा, घोडे असा सगळा लवाजम्याचा खर्च वाढू लागला. आणि पंचक्रोशितले सावकार तर अगोदरच नागवले गेलेले. मग पैसा उभारायचा कुठून?
ठरले - आता मोठ्या मोहिमा उघडायच्या. गोदेकिनारच्या मोठ्या सावकारांवर डाके टाकायचे. महुज परिसर बीड जिल्ह्याच्या मध्यावर असल्याने गोदातीर साधारणत: ४०-५०किमी अंतरावर पडे. अशा मोहिमांसाठी तयारी सुरु करुन बेत ठरवले जाऊ लागले. ते साधारणतः असे असत.
१. हिवर्या पासून जवळच असलेला घोडेखूर डोंगर अथवा वांगीच्या कान्होबा डोंगरावर शक्यतो वैरणीच्या (अथवा गवताच्या) गंजी रचून ठेवाव्यात.
२. डाक्यासाठीचे/लुटीचे गाव व त्यातील घरे अगोदरच हेरुन ठेवावेत व अमावस्येच्या रात्री त्यावर चाल करावी - गंजी पेटवून उत्तरेला गोदातीरी कूच करावे.
३. लूट झाल्यावर मुद्देमालासह परत येताना गांजीच्या उजेडाच्या दिशेने परत यावे जेणे करुन रस्ता चुकणार नाही.
अशा लुटालुटी सुरु झाल्यावर येद्या-मुग्या ज्या पिडीतांसाठी हे कार्य सुरु केले त्यांना लक्षात ठेवायला काय शिवाजी थोडेच होते. झाले, सगळ्या जिल्ह्यात यांचा हैदोस सुरु झाला. काही गावांना या टोळीने पैसा वाटून खूष ठेवले होते. तिथे या डाकूंची भाकर-कालवणाची सोय लागली. त्यात त्यांचे मुख्य ठाणे म्हणजे महूज जे पुढे डाके-महुज म्हणून ओळखले जाऊ लागले. दुसरा अड्डा असे तो हिवरा गाव-परिसरात. तिथल्या एका नर्तकीने यांना वेड लावले होते.
ही सगळी टोळी उन-वारा-पाऊस यांना न जुमानता डोंगर दर्यातून वार्याच्या वेगाने पसार होई. वाड्यांच्या तटबंद्या अन बुरुजांच्या भिंती हा हा म्हणता घोरपडी सारख्या चढण्यात यांचा हात कुणी धरत नसे. पेशवाईच्या काळात मराठ्यांच्या सेनेत लढलेल्या मर्द मावळ्यांच्या वंशजांची ही पिढी अशी काही काळातच नामांकित डाकू टोळीमध्ये रुपांतरीत झाली. त्यांना पकडून देण्यासाठी निजामाने इनाम जाहिर केला पण येद्या मुग्या काही केल्या हाती येईनात. बीडच्या जहागिरदार देशमुखांनी सुद्धा आपली शर्थ केली पण त्यांना सरळ मुकाबल्यात यश आले नाही. बरेचदा पोलिसांसोबत चकमकी झाल्या पण येद्या-मुग्या पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांना एकटे/बेसावध घेरुन पकडायचे प्रयत्न केले. पोलिस त्यांच्या पाठिमागे लागल्यावर ते दोघे एकाच घोड्यावरुन पळ काढत. घोड्यावरचा एक डाकू पुढे तोंड करुन तर दुसरा पाठिमागे तोंड करुन बसत आणि दोन्ही दिशेने गोळीबार करत पळून जाण्यात यसस्वी होत.
एकदा देशमुखांच्या खबर्यांनी खबर आणली की येद्या-मुग्याचे हिवर्याच्या नर्तकीकडे येणे-जाणे असते म्हणून. देशमुखांनी आणि निजामाच्या पोलिसांनी नर्तकीला फितूर केले अन तिच्या घरात-परिसरात पोलिसांनी जाळे टाकले. असे म्हणतात की जेवताना सुद्धा बंदूक खाली न ठेवणार्या येद्या-मुग्याला तिने चहापाण हातात देऊन बंदूक खाली ठेवायला लावली आणि दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना जन्मठेप झाली. येद्या तुरुंगातच मेला पण मुग्या परत आला. तोपर्यंत त्यांच्या टोळीत फूट पडली होती. कही जण पुन्हा शेतीवाडी कडे वळले होते तर काही चोर्या-चपट्या करुन म्हतारपणात आले होते.
तुरुंगातून परत आल्यावर मुग्या वांगी-शिवणी भागात राहिला. त्याच्या हडावर मांस राहिले नव्हते. माझे अजोबा सांगत की गाईच्या गळ्याच्या पोळीसारखी (खाली लोंबणारी त्वचा) त्याच्या दंडाखाली त्याची कातडी लोंबत होती त्यावरुन तारुण्यात तो काय गबरू असेल याची कल्पना यावी.
---------------------------------------- समाप्त -----------------------------------------------
********************* काही टिपा *****************************
- कथा ऐकीव माहितीवर लिहिली आहे. कुणाला अधिक माहिती असल्यास भर टाकावी, दुरुस्त्या सुचवाव्यात ही नम्र विनंती.
- डाके-महूजच्या गावकर्यांनी सत्तर्-ऐंशीच्या दशकात गावचे नामांतर करवुन घेतले - मौज. हेच आमचे गाव :)
- पाचवी सहावीच्या उन्हाळ्याच्या सुट्यात मी गावच्या आडावर (आड कसला, बांधलेली विहीरच आहे ती) गेलो होते. पाच्-सात परस खोल खडकांच्या तळाला टिचभर पाणी दिसत होते. एक आजीबाई आणि तिचा नातू सुद्धा त्यांच्या घागरीत खवंगा-खवंगा करुन पाणि भरत होते. मी घागर खाली टेकवली आणि दगडावरुन गडगडत ती सरळ आडात जाऊन पडली. बाजूला लिंबाच्या झाडाखाली एक अजोबा दोर वळत बसलेले. त्यांनी येऊन आडात पाहिले आणि काही न बोलता सरसर आडात उतरले. मऊ खडकांच्या सांधींचा आधार घेऊन त्यांनी केलेले हे दिव्य बघून मी तर जाम इम्प्रेस झालेलो. ते बघून शेजारच्या आजीबाई कुजबुजल्या, "रक्तातच आहे यांच्या". मी विचारले, "म्हणजे?". "येद्याचा नातू ह्ये त्यो". आमचा झालेला "आ" आजून वासला.
- असे म्हणतात की आमच्या गावाला त्या दोघांनी केलेल्या पापाचा शाप आहे म्हणून इथे आता वैभव नांदत नाही. नेहमीचे दुष्काळ, आठरापगड दारिद्र्य, निरक्षरता, सरकारी खिरापतींवर अन नेते मंडळींच्या (त्यांचे भाडोत्री गुंड म्हणून) तुकड्यांवर जगायची लागलेली सवय, अशा अनेक प्रश्नांनी हा भाग आणि पूर्ण मराठवाडाच गांजलेला आहे. गावात गेल्यावर जिकडे बघावे तिकडे पडके वाडे, भकास-गांजलेले चेहरे अन शुन्यातल्या नजरा सगळीकडे दिसतात. त्यातील काही येथे आहेत.
- मी स्वतः कान्होबाच्या डोंगरावर कित्येकदा गेलेलो आहे. तिथून दिसणारे पंचक्रोशीचे विहंगम दृष्य - नद्या, तळे, दूर झाडीतून येणारे मोरांचे आवाज, मधूनच दुडूदुडू पळत जाणारे हरणाचे मखमली गोंडस पाडस - आजही सगळे आत्ता बघितल्यासारखे ताजे समोर दिसते.
- बालाघाटच्या डोंगरांत पेशव्यांनी निजामाला शह देण्यासाठी किल्यांची योजना केली होती असे म्हणतात (तज्ञांनी खुलासा करावा). सततच्या लढाया आणि नंतर हा भाग निजामाकडे गेल्यावर ते काम तसेच अर्धवट राहिले. त्यातील एक कान्होबा डोंगरावर असावा असे वाटते - तेथे खूप खोल खोदलेले खंदक वा किल्ल्याचा पाया आहे. तिथे डोंगरावर उभा राहून त्याला न्याहाळत मी कित्येक तास कल्पना करत उभा असायचो की पेशवे वा त्यांच्या सेनापतींनी ही जागा निवडताना, बांधकाम सुरु करताना काय विचार केला असेल? त्यांच्या समोर त्या वेळी त्या भावी गड-किल्ल्याचे काय चित्र असेल? जर गड बांधून झाला असता तर आज इथे कसे दिसले असते? अशा अनेकानेक विचारांनी रोमांच उभे होत आणि नकळत अंगात मावळा संचारत असे; मुखातून अरोळ्या निघत - हर हर महादेव! शिवाजी महाराज की जय! जय भवानी जय शिवाजी!
वर्गीकरण
गोष्ट एकदम भन्नाट आहे. पण या
In reply to गोष्ट एकदम भन्नाट आहे. पण या by शिल्पा ब
जबाबदारी
ही कथा अजुन मस्त फुलवता आली असती..
In reply to ही कथा अजुन मस्त फुलवता आली असती.. by योगप्रभू
जंत्री
भन्नाट कथा आहे
In reply to भन्नाट कथा आहे by धनंजय
सहमत
गबरु
और भी आने दो.
In reply to और भी आने दो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कनकालेश्वर का?
In reply to कनकालेश्वर का? by भास्कर केन्डे
अर्रर्र.....
In reply to अर्रर्र..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पावसाळा
झकास.....
मस्त!
दत्त्या करवत्याची आठवण झाली
In reply to दत्त्या करवत्याची आठवण झाली by विसुनाना
दत्त्या करवत्याची कथा
In reply to दत्त्या करवत्याची आठवण झाली by विसुनाना
:)
In reply to दत्त्या करवत्याची आठवण झाली by विसुनाना
थोडा फरक
तुमचा लेख आवडला. नवीन माहिती
In reply to तुमचा लेख आवडला. नवीन माहिती by मनस्विनि२५१
काय म्हणता?
लेख आवडला. अवांतर : नर्तकी
मी पण बीड जिल्ह्यातलाच! हिवरा
In reply to मी पण बीड जिल्ह्यातलाच! हिवरा by यकु
हिवरा
मस्त....
आजोबांनी भितीदायक गोष्ट
In reply to आजोबांनी भितीदायक गोष्ट by रेवती
+१
रोचक माहिती!
जबरा!
विंटरेस्तींग
वारणेचा वाघ
In reply to वारणेचा वाघ by विकास
वारणा खोरं..