मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय मिळवायचंय तुम्हाला ? .....३

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
भाग १ भाग २ भाग -३... “कुठले मशिन आहे ते ?” “PNQ – 10” माझ्या पोटात मोठा खड्डा पडला. आमच्या प्लॅंटमधले त्या प्रकारचे एकुलते एक मशिन होते त! पवारला ते किती खराब झालंय हे विचारुन मी झपाझप पावले उचलली. मला बघायलाच पाहिजे ते आता ! हा जॉब जाऊ देत, पण त्या मशिनवर पुढचे कितीतरी उत्पादन अवलंबून होते. “पवार दुरुस्त होईल का नाही ते ?” “माहीत नाही. आत्तातरी त्यांनी ते पुर्ण खोलून ठेवले आहे. आम्ही त्या कंपनीशी फोनवर बोलतोच आहोत. ” पवार´त्या मशिनिस्टने हे मुद्दाम केले असेल का हो ?” “काही सांगता येत नाही. पण जोशीसाहेब ओरडल्यावर तो इतका भडकला होता की त्याची मन:स्थिती ठीक नव्हती. त्या मन:स्थितीत काहीही होऊ शकते.” माझी कानशीलं गरम झाली. ह्या जोशामुळे केवढा गोंधळ झालाय हा. तोंडात शिव्याच आल्या माझ्या. असं वाटलं फोन करुन त्या त्यांना द्याव्यात आणि सांगावे त्यांना “दाखवणार होतात ना ? मला कसे काम करायचे ते ! चांगलंच दाखवलंत !” प्रकरण - २ एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही अंतर्बाह्य ढवळून निघत असता आणि तुमच्या जवळचे म्हणावेत असे तसेच ढीम्मं असतात हे मी समजूच शकत नाही. असे का ? देवाला, आणि त्यांनाच माहीत ! ६.३० वाजता मी प्लॅंटमधून, काहीतरी संध्याकाळचे जेवावे म्हणून घरी आलो. हॉलमधून जाताना माझ्या बायकोने 'स्मिता'ने टीव्हीमधून डोके वर काढले, माझ्याकडे बघून लाघवी हसून ती म्हणाली “कशी वाटते माझी नवीन हेअर स्टाईल ?” तिच्या नेहमीच्या वेण्यांची जागा आता एकदम विस्कटलेल्या केसांनी घेतली होती. आणि त्यात काही ठिकाणी छटाही आल्या होत्या. पण एकंदरीत अवतार छान दिसत होता. “मस्तच दिसतंय.” तिच्या लांबसडक पापण्या फडकवत ती म्हणाली “ती ब्युटीपार्लरमधली बाई म्हणाली, ह्या हेअरस्टाईलमुळे माझे डोळे जास्तच उठून दिसतील.” तिच्या सुंदर, काळ्याभोर, मासोळी डोळ्यांना उठून दिसायची काही आवश्यकता आहे असे मला खरंतर वाटत नव्हतं. पण कोण सांगणार ? “खरंच सुंदर” “खरंच म्हणतोस, की आपलं असंच ?” “काय सांगू तुला, आजचा दिवस फारच वाईट गेला.” “हं SSSSSSSSSS ! पण आपण आता संध्याकाळी जेवायला बाहेर जाणारच आहोत. येईल तुझा मूड परत.” मी नकारार्थी मान हालवत म्हणालो “ नाही गं जमणार आज ! मला काहीतरी पटकन खाऊन लगेच कारखान्यात जायचे आहे. “ काय ?” स्मिता ताडकन उभी राहिली. स्वाभाविकपणे तिचे हात कंबरेवर गेले. तेवढ्यात माझ्या लक्षात आले की तिला ती नवीन साडी फारच सुंदर दिसत होती. “अरे काय म्हणतोस काय ? मी आत्ताच मुलांना आपण जाणार म्हणून आईकडे सोडून आले. चेष्टा करतोयस ना माझी ?” “नाही गं ! खरंच सांगतोय. आज कारखान्यात सकाळीच एक मशिन नादुरुस्त होऊन पडले आहे आणि त्या मशिनची एक ऑर्डर पुरी करायला फार आवश्यकता आहे. सगळे त्याच कामावर लागले आहेत आणि मी घरी कसा बसू ? आणि माझे जेवणात लक्षतरी लागेल का ?” “ठीक आहे ! पण आता घरी खायला काहीच नाही. तू कालच मला आज आपण बाहेर जाणार असं सांगितलेस ना ? म्हणून मी काहीच केले नाही घरी.” आत्ता माझ्या डॊक्यात प्रकाश पडला. मागच्या भांडणाच्यावेळी मी तिला हे वचन दिले होते. संतापेल नाहीतर काय करेल ती ? “आपण एक तासभर बाहेर जाऊन यायचं का स्मिता ?” “कशाला ते तरी ! जाऊदेत. आमचं नशिबच वाईट.” तिच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला मला. का खरंच होतं ते ?.... जयंत कुलकर्णी. जर याचा कंटाळा आला तर पुढेमागे ही लेखमाला बंद करायचा हक्क लेखक राखून ठेवत आहे. मित्रांनो/मैत्रिणींनो, कधी पाने जास्त तर कधी कमी. मला वाटते हे तुम्ही चालवून घ्याल.

वाचन 7186 प्रतिक्रिया 0