 | काही चित्रपट आनंदासाठी, विरंगुळ्यासाठी नसतातच. तुम्हाला ज्ञात-अज्ञात वास्तवाचा प्रत्यय आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजात आपल्या आजू बाजूला घडणाऱ्या अनेक घटनांनी, अस्वस्थ करणाऱ्या वास्तवांनी मनात जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधणं जरी एका व्यक्तीला शक्य नसलं तरी अशी व्यक्ती मग चार चौघांत आपलं मत मांडते, शक्य असेल तर मग जोगवा सारखी एखादी कलाकृती निर्माण होते. ह्यात काम करणारे अभिनेते, त्यातून मिळणाऱ्या बिदागीच्या आशेने तर येत नाहीतच मात्र, आपली ह्या लोकोपयोगी कार्याला काही मदत होईल का ह्या विचाराने पुढे सरसावतात. |
देवाला वाहून घेतलेल्या, थोडक्यात देवासाठी सोडून दिलेल्या जोगीणींची आणि जोगत्यांची हि कथा. नाही म्हणजे विषय तसा साधा सरळ आहे. त्यातील बऱ्याच सत्यतेचा अंदाजही आपल्याला असतोच. पण ह्या गोष्टी अश्या होणारच असे मानणारे आपण आणि त्यात काही खटकण्याजोगं आहे हे समजणारे ते श्रीपाल मोरखिया नाहीतर राजीव पाटील ह्या सारखे लोक. कर्नाटकामधलं एक साधं सरळ गाव, नाव काय माहित नाही. किंव्हा तितकंसं लक्षात राहत नाही. एकूण काय एकंदर सर्वच गावांची ही तऱ्हा. इकडून तिकडून सारखीच. न- कळत्या वयात केसांमध्ये जट निघाली म्हणून देवीला वाहिलेली सुली, आणि तय्याप्पाची ही कहाणी. दोघांची मनस्थिती निराळी, दोघांवर समाजाचे आघात निराळे. एकंदर पंथाचा दृष्टीकोनही हताश आणि निराशावादी. तरीही हा चित्रपट कंटाळवाणा आणि अगदीच नकारात्मक होत नाही. संपूर्ण समाजाचा दृष्टीकोन दाखवताना, त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांचा पण तितकाच व्यापक विचार लेखक आणि दिग्दर्शकाने केलेला आहे.
मी तसं पाहता विषयासाठी चित्रपट पहिला असा म्हणणं तसं चूक ठरेल. मी पाहिला उपेंद्र लिमये साठी. मला तर त्याचा अभिनय नेहमीच आवडलेला आहे. त्याला तर ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसंच मुक्ता बर्वेही अभिनयाला कुठेही उणी पडली नाही. दोघांच्या संवेदनशील आणि जिवंत अभिनयामुळे कलाकृती आणि निर्मात्यांचा आशय सरळ मनाचा ठाव घेतो. विनय आपटे, किशोर कदम अश्या सहकलाकारांनी पण ह्या जोडीला चपखल साथ दिलेली आहे.
श्रद्धा. सर्व धर्माचं मूळ. ह्या धर्माचं मग कर्मकांडात कधी रुपांतर होतं हे कळतही नाही. आणि सवयीने मग ते खटकतही नाही. श्रद्धेच्या गरजेतून मग अश्या काही निष्पापांचा बळी दिला जातो आणि समाजाचा गाडा अविरत चालू राहतो. आपल्या सारख्या शहरी संस्कृतीत वाढलेल्या मनांना जेंव्हा ह्या वास्तवाची जाणीव होते तेंव्हा ते आपल्याला जरूर अस्वस्थ करून जातं, आणि वर्षानुवर्षे ह्या चालीरीतींना मानत आलेल्या सश्रद्ध समाजाच्या मनाच्या कोडगेपणाचं आश्चर्य वाटत रहात. असं जरी असलं तरी तेथील सामान्य माणसासाठी ही गोष्ट नेहमीचीच असते, आणि ह्या वस्तुस्थितीची जाणीव चित्रपट आपल्याला हळुवारपणे करून देतो.
आत्तापर्यंत मी हा चित्रपट पाहिला नव्हता ही माझी चूकच. पण तशी आपण करू नये ही विनंती. अनेकांनी आत्तापर्यंत हा पाहिला असेलच. नसल्यास जरूर पहा, शहरीकरणाच्या थोड्याच दूर असणार्या वास्तवासाठी पहा, त्याला चव्हाट्यावर आणणाऱ्या धाडसी निर्मात्यांसाठी पहा. आपल्या अभिनयाने त्यात जान ओतणाऱ्या कलाकारांसाठी पहा. समाजाच्या जाणिवेचे पदर अनुभवण्यासाठी पहा, निष्कारण वाया गेलेल्या आयुष्यांसाठी पहा. आईचा हा मेळा जरूर पहा.
प्रतिक्रिया
बघायचा आहे पण बघवेल का हा
छान !!
उपेंद्र
>>जोगवा पूर्ण सलग पाहू शकले
In reply to उपेंद्र by स्वाती दिनेश
+ १
In reply to >>जोगवा पूर्ण सलग पाहू शकले by दिपाली पाटिल
जोगवा उत्कृष्ठ आहे, विषयाशी
नेत्राभिनय
In reply to जोगवा उत्कृष्ठ आहे, विषयाशी by विंजिनेर
चित्रपट वास्तवदर्शन