
ती सुंदर होती. अप्रतिम लावण्यवतीच. आंतरराष्ट्रीय 'वोग' मासिकात जगातील सर्वांत सुंदर स्त्रियांत तिची गणना झाली होती. ती उच्चशिक्षित होती. ती त्या काळात सफाईने कार चालवायची. ती पडदा पाळत नव्हती. तिने बाराव्या वर्षी वाघाची शिकार केली होती. तिला पोलो पाहायला आवडायचे. ती मुक्त, स्वच्छंद आयुष्य जगली, तरीही राजपरिवारातील आदब तिने सोडली नाही. खरे तर विलासी सुखासीन आयुष्य जगली असती, तशी ती जगलीही, पण समाजासाठी, स्त्रीशिक्षणासाठी तिने स्वतःला गुंतवून घेतले. आपले प्रयत्न यशस्वी करून दाखवले.