
"आई, मनीकडे जाते गं खेळायला."
"ये जाऊन. जेवायच्या वेळेपर्यंत ये, म्हणजे झालं."
"हो, येते गं"
म्हणत आमची स्वारी निघाली रस्त्याकडे. वाटेत रहाटाच्या पाळीवरून विहिरीत डोकावलं नाही, तर पाप लागलं असतं. जरा टाचा उंचावतेय, तोच शेजारचे काका पंप सुरू करायला आले.
"काय बघतेस गं?"
मी फक्त मान उंचावून डोळे विस्फारून हसले. बेड्यातून बाहेर. रस्त्यावर. गोंद्या बैलगाडी घेऊन तरीकडे निघालेला. त्याला वाट दिली. हो, बैलांनी मला शिंग मारलं तर काय घ्या! काही मुलं सायकलचे टायर काठीने पळवत होती.