मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक कागद

गबाळ्या · · जे न देखे रवी...
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग तल्लीन होई कासावीस ते बालक धावे, कैसे कळणे त्याला ।। ६ ।। 
 सोसाट्याचा सुटला वारा कधीच मुकला परी आधारा भरकटलेला गोंधळलेला, लटके बाभळीला ।। ७ ।। 
 धावत धावत बालक येई अलगद त्यासी कवेत घेई घाव पुसुनि तया मनीचे, सज्ज करी उडण्याला ।। ८ ।।   उंची कितीही गाठो कोणी बाहुबली वा अगाध ज्ञानी मातीशी या नाळ तोडुनी, सफल न कोणी झाला ।। ९ ।।

वाचने 3263 वाचनखूण प्रतिक्रिया 4

In reply to by एस

गबाळ्या 28/11/2017 - 00:41
लगोलग वचनाबद्दल आणि प्रोत्साहित करणाऱ्या अभिप्रायाबद्दल खूप आभार ! भा. रा. तांबे हे एक अत्युच्च शिखर आहे. त्यांची झलक तुम्हाला दिसली हा तुम्ही माझ्या क्षमतेपेक्षाही जास्त केलेला माझा गौरव आहे.