उंबरठा नसलेले घर -- १
लेखनविषय:
काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू
जणू स्वतंत्र झाल्या आहेत
----
बैठकीच्या खोलीत
कोपर्यातल्या मेजावर
एक फुलदाणी होती
..
काल रात्रीपर्यंत होती
सकाळी अंगणात सापडली
पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं
पदरात पडेल
या आशेने अंगणात आली असावी बहुदा
----
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत
----
तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे
उजाडल्यापासून बघतोय
थडाथड दारं आपटतायत
बहुदा तिची डायरीही असावी त्यात
----
काय झालं कुणास ठाऊक पण
गेला एकदाचा
रात्रभर बरसून
पाऊस फुलं देऊन.. गेला
आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
----
पण आता अंगणातली माती
चक्रीवादळात अडकल्यासारखी
आत-बाहेर होतेय
-----
अंगणातली फुलं सांभाळायची कि
उंबरठा नसलेले घर
तेच उमजत नाहीये तिला
-----
काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२४/०६/२०१४)
वाचन
10900
प्रतिक्रिया
0