अक्का,
आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात."आठवणी येतात",असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात.
तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझं बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्षाने आठवली.