Skip to main content

३७० रुपये वारले (नाहीत)..

लेखक गवि यांनी सोमवार, 15/06/2026 17:20 या दिवशी प्रकाशित केले.

ते ७० रुपये वारले आणि हे ३७० रुपये वारेनात..

"अशी ही बनवाबनवी" कोण विसरेल? म्हणजे तुम्ही हा सिनेमा पाहण्याइतक्या भाबड्या काळात जन्माला आला असाल तर. त्यातला अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांचा तो कल्ट ठरलेला संवाद आपण शेकडो वेळा पाहिला ऐकला असेल. पांढऱ्या बंडीतले घरमालक विश्वास सरपोतदार जेव्हा आपल्या ७० रुपयांचा हिशोब मागतात, तेव्हा बेरकी धनंजय माने (इथेच राहतात का फेम) अत्यंत गंभीर चेहऱ्याने आणि तितक्याच भाबडेपणाने म्हणतात,"७० रुपये वारले!" 

८० च्या दशकातला हा डायलॉग आता निष्पाप कोवळ्या विनोदाचा पेंढा भरलेला नमुना म्हणून उरला आहे. 

त्यात चालूगिरी होती, सत्तर रुपये मूल्याइतकी फसवणूकही होती.. पण कोणाचा द्वेष नव्हता, कोणाच्या चारित्र्याची, लिंगाची किंवा जाती वंशाची बेअब्रू नव्हती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्या जोकनंतर कोणाचं आयुष्य धस्स झालं नव्हतं.

पण... आज २०२६ मध्ये, इन्स्टा आणि तूनळीच्या रीळगर्दीत एका स्टँड-अप कॉमेडी शोमधल्या त्या ३७० रुपयांच्या बिर्याणीने अनेकांना गंभीर विषबाधा केली आहे.  किंबहुना आपल्या सर्वांच्यात मुरलेलं विष या निमित्ताने बाहेर पडलं आहे असं म्हणूया. 

आज या प्रकरणातली तिन्ही मुख्य पात्रं कॉमेडियन प्रणित, आयटीवाला हिमांशू आणि मेडिकलची सेजल, हे मनातल्या मनात अत्यंत डेस्परेट होऊन एकच प्रार्थना करत असतील: "काश... आमचे ते ३७० रुपये वारतील तर.. सुटू या सगळ्या जंजाळातून.." 

 

पण हे तीनशे सत्तर रुपये वारणं तर सोडाच, ते चक्रवाढीने वाढले आहेत आणि या सर्वांचे पाय आणखी खोलात आणि फाटक्यात ओढून न्यायला लागले आहेत.  मोठा जोक असा की हे तीन लोक गरम उकळत्या आधणात तरंगत चटके खात असताना त्या चुटक्यांना,  थेटरातल्या अंधारात खो खो हसणारे, शिट्ट्या मारणारे, बिन चेहऱ्याचे शेकडो प्रेक्षक मात्र आता याकडे एक नवा कॉमेडी शो म्हणून बघत, चघळत, घरबसल्या मजा घेत आहेत.

डिजिटल जगाची क्रूरता अशी आहे की, इथे चुकीला माफी नाही. चुकीला लपायला जागाही नाही. तो एक राक्षस होता ना, ज्याला मारल्यावर, जाळल्यावर त्याच राक्षसाच्या शंभर कॉप्या पुन्हा राखेतून उभ्या राहतात... तसेच इंटरनेटवर उमटलेले हे "डिजिटल इंक"चे डाग एकदा उमटले की कधीच पुसले जात नाहीत.. त्यांच्या हजारो लाखो कॉपीज बनतात..

वाटतं त्याहून कित्येक पटीने जास्त हिसका यातील प्रत्येक थेट सामील व्यक्तीला बसतो आहे आणि बहुधा आणखीही बसणार आहे. यात प्रचंड रोचक भाग असा की हिमांशूने ते विधान केल्यावर जो राडा झाला आणि कोशिंबीर सांडली, त्यानंतर केवळ उलट उदाहरण म्हणून सेजलचे आधीचे, जुने व्हिडिओ पुन्हा एकदा बाहेर आले. "हे चालतं तर मग ते का नाही ?" 

म्हणजे आगोदर लोकांना त्यात काही वाईट वाटलं नव्हतं आणि यापुढेही वाटलं नसतं.. जर हिमांशूचं वक्तव्य व्हायरल झालं नसतं.. तर. पण आता जर तरला अर्थ नाही. साधारणत: शाळेत लहानपणी व्हायचं ना असं ? याला शिक्षा तर त्यालाही शिक्षा.. 

अजूनपर्यंत यातील कोणत्याही वक्तव्याच्या नैतिक बाजूबद्दल किंवा बेदरकार असंवेदनशीलतेबद्दल मी बोलतच नाहीये. ते सर्वांनी बघितलं, ऐकलं आहेच.

या प्रकारचे खूप कॉमेडी शोज गेल्या काही काळात बघण्यात आले होते. आणि केवळ एखादा जोक किंवा वाक्य पब्लिकच्या कचाट्यात सापडण्याची कमी होती. बाकी.. "यो तो होणा ही था.."

आता खोलात पाय जाणे या वाक्प्रचाराची काही उदाहरणं बघू.

हिमांशू: (बिर्याणी फेम) एका रात्रीत गमावलेली प्रतिष्ठा आणि करिअर. एका ३७० रुपयांच्या बिर्याणीच्या बढाया मारताना, काही रुपयांचा खर्च केला त्या बदल्यात एका महिलेच्या संमतीचा विचार वाऱ्यावर सोडून वसुली कशी करणं भाग आहे हे बोलून त्याने मणभर माती खाल्ली. आपण काय बोलतोय याचं त्याला भान राहिलं नाही. लाईव्ह शोमध्ये तिथल्यातिथे मिळणाऱ्या टाळ्या, शिट्ट्या आणि हशे .. यांच्या नशेत तो वाहवत गेला. परिणाम? तातडीने गेलेली नोकरी, इंटरनेटवर "स्त्री-द्वेष्टा" (Misogynist) म्हणून बसलेला शिक्का.. आणि त्यामुळे भविष्यात कॉर्पोरेट नोकरीची शक्यता किंवा कॉर्पोरेट जगात सन्मानाने जगणं, दोन्ही अशक्यप्राय झालं असणार. भारतात आजही लग्नासाठी मुख्यतः आर्थिक स्थैर्य आणि चारित्र्य पाहिलं जातं, तिथे या एका चुकीमुळे त्याला त्याही आघाडीवर अडचणींचे डोंगर उभे राहिले आहेत.

सेजल:

या शोचा दुसरा सर्वात मोठा फटका, तोही बॅक डेटेड, गाडल्या गेलेल्या भुतांना उकरून काढून.. बसला तो (विद्यार्थी) डॉक्टर सेजलला. मेडिकलच्या पोरापोरींना शवविच्छेदन करण्यापूर्वी "कॅडेव्हर ओथ" देतात ही माहिती या निमित्ताने लोकांसमोर आली. आपण ज्या मृतदेहाला आता ब्लेड, कात्री लावणार आहोत, आणि ज्याच्या अंतरंगाचा अभ्यास करून आपण डॉक्टर बनणार आहोत, त्याच्याबाबत सर्वोच्च आदर बाळगण्याची शपथ. परंतु, मंचावर तिने त्याच मृतदेहांच्या अवयवांबद्दल काय बोललं हे चव्हाट्यावर आलंच आहे. जाहीर कॉमेडी शोमध्ये ते उल्लेख केल्याने असंवेदनशीलता दिसली. लोकांनी मग पुढचे मागचे सर्व व्हिडिओज उकरून काढले. त्या व्हिडिओजमुळे त्या मुलीचा पाय अधिक खोलात गेला. 

सुरुवातीला, जेव्हा प्रणितच्या शोमधली तिची क्लिप व्हायरल झाली, तेव्हा तिला सोशल मीडियावर खूप फॉलोइंग आणि प्रसिद्धी मिळाली. त्या प्रसिद्धीची नशा इतकी होती की, सुरुवातीला कोणालाही "मेडिकल" अँगलने झालेला हा "अपराध" जाणवला नाही. पण जेव्हा इंटरनेटने "डिटेक्टिव्ह मोड" आणि "सिटीझन कोर्ट" मोड ऑन केला आणि तिचे जुने व्हिडिओ समोर आले, तेव्हा लोकप्रियतेची संपूर्ण लाट उलट फिरली. त्या पब्लिकच्या जालसमुद्रमंथनातून निघालेला एका जुन्या हलाहलसदृश व्हिडिओत ती स्वतःच्याच प्रतिष्ठित के.ई.एम. (KEM) कॉलेजला "चिंधी" म्हणताना आणि तिथल्या सहकाऱ्यांना "कुरूप" म्हणताना दिसली. कितीही विनोदाने किंवा हलके फुलके वगैरे म्हटले तरी जगजाहीर झाल्यावर मात्र या व्हिडिओने कॉलेज प्रशासनाची उरलीसुरली सहानुभूतीही संपवून टाकली असेल तर आश्चर्य नाही. म्हणजेच, १५ दिवसांची सक्तीची रजा, कॉलेज आणि हॉस्टेलमधून तात्पुरती हकालपट्टी आणि ५ सदस्यांच्या चौकशी समितीचं जे दुष्टचक्र तिच्या मागे लागलं आहे त्यात कॉलेजकडून सहानुभूती मिळणं अवघड वाटतं. 

प्रणित: आणखी एक मोठा खड्डा खणला गेलाय तो स्वतः कॉमेडियन प्रणितसाठी. नव्या डिजिटल जोकिंगच्या जमान्यात स्वतःचं नवीन मटेरियल लिहिण्यापेक्षा "क्राउड वर्क" (प्रेक्षकांशी उत्स्फूर्त संवाद साधून विनोद करणे असा अर्थ मला कळला आहे.) करून त्याचे छोटे छोटे रील्स व्हायरल करणे हा झटपट प्रसिद्धीचा मार्ग आहे. आणि तो रास्त असेलही. ..पण या नादात प्रणित विसरला की, मंचावर एखादा माणूस गुन्ह्याची किंवा लैंगिक शोषणाची अप्रत्यक्ष कबुली, अगदी विनोदासाठी का होईना, देत असेल, तर त्यावर उलट हसणं आणि त्याला पैसे देऊन प्रोत्साहन देणं हा विनोद समजला जाईलच असं नाही. त्यात विकृतीचं नकळत का होईना, उदात्तीकरण आहेच आहे.. आज महाराष्ट्र सायबरसेलकडून थेट एफ आय आर, राष्ट्रीय महिला आयोगाची (NCW) नोटीस आणि सोशल मीडियावरून गायब व्हावं लागणं, असं सध्याचं चित्र आहे. त्याने मनापासून जाहीर माफी मागितली आहे आणि खरं तर इतकं पुरेसं ठरायला हवं. पण यापुढे असे शो करताना इतकी काळजी घ्यावी लागेल की त्यात उत्स्फूर्तपणा उरणं कठीण आहे. स्क्रिप्ट लिहून विनोद करणं हाच मार्ग बहुधा उरेल.

आज हे ३७० रुपये जिवंत राहून या तिघांच्या भविष्याशी रोज एक नवा खेळ खेळत आहेत. लोक मनोरंजन म्हणून हा संपूर्ण प्रकार बघताहेत आणि फॉलो करताहेत. दोन-पाच मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी आणि काही लाख व्ह्यूजसाठी केलेली वक्तव्यं, आयुष्यभराचे निश्चित केलेले बेत कसे डगमगवू शकतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. 

त्या त्या वेळी ते ते सर्व जोक्स ऐकून खदखदून हसणाऱ्या, टाळ्या शिट्ट्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांना मात्र एखादं कलम लागल्याचं ऐकिवात नाही. दोनतीनशे प्रेक्षकांची ती सहमती अंगावर काटा आणणारी आहे.

काय म्हणता?

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 796
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

उत्तम विनोद करणे हि लुंग्यासुंग्याला जमणारी गोष्ट नाही पण सवंग प्रसिद्धी आणि पैसे यासाठी आजकाल कुणीही उठतो आणि स्टॅन्ड अप कॉमेडी शो करतो.

निखळ अश्लील नसलेला आणि न बोचणारा उत्तम विनोद करण्यात श्री पुल देशपान्डे यांचा हात कोणी  हि धरू शकणारा नाही  म्हणूनच त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली.   

आचार्य अत्रे यांचाही विनोद इतका निखळ नव्हता हे खेदाने नमूद करावेसे वाटते. पण आपण केलेला विनोद बोचरा असल्यास बिनशर्त माफी मागण्याचे दिलदार पण आचार्य अत्रे याना होते.  

 

एकंदर फार कमी स्टॅन्ड अप कॉमेडीयन याना निखळ विनोद जमतो.

अशा बहुसंख्यांचे वर्णन इंग्रजीत करायचे झाले तर  intellectual constipation and verbal diarrhoea 
म्हणजेच 
बौद्धिक बद्धकोष्ठ आणि शाब्दिक हगवण असेच करावे लागेल.        


अगदी, सामाजिक जीवनात चालण्या बोलण्याचा, वागण्याच्या काही मर्यादा असतात, हे झेन झी ला समजतच नाही.

त्यात तर ऑनलाईन रील मध्ये सगळेच सुसाट सुटले आहेत.

मागच्या वर्षी रणवीर अलहाबादियाला काही काळ अशाच काही वक्तव्यामुळे अनेक महिने गायब व्हावं लागलं होते. तो आता परत स्थिरवतो आहे. पण त्याच काम आधी तेवढे चांगले होते म्हणून तो तरला. पण यां तिघांचे पुढच जीवन  खुप अवघड होऊ शकते. खुप मोठे प्रायश्चित घ्यावे लागेल.


हे प्रणित मोरे नाव आधी कुठे वाचले मी?

आमच्या गाववाल्यांनी मारलेले त्याला. कारण अर्थात चुकीचेच. आपल्या शो मध्ये वीर /शिखर पहारिया की पहाडीया ह्या बॉलीवूड सेलेब्रिटीबद्दल काही उल्लेख आक्षेपार्ह वाटला म्हणून सोलापूरातल्या जाई जुई मंचाच्या तरुणांनी प्रणित मोरेला मारले. (वीर पहारिया हा सुशीलकुमार शिंदेच्या मुलीचा मुलगा आहे आणि जाई जुई मंच हा शिंदेच्याच दुसऱ्या मुलीचा म्हणजे खासदार प्रणीती शिंदेंचा आहे). त्याला त्यावेळी त्याच्या समव्यावसायिकांकडून भरपूर प्रसिध्दी तसेच सहानुभूती मिळालेली.

पण एकंदरीतच स्टॅन्डअप कॉमेडीयन जमातीविषयी बघता आणि कार्यक्रमाला हजर ऑडियन्स आणि बाकी नेटकऱ्यांचा टॉलरन्स ह्याबाबतच गंभीर शंका यावी अशी परिस्थिती आहे. कुठले मुद्दे, कोणते जोक, कुणाला कसे लागतील, त्यामागचा हेतू आणि त्यावर उचलले जाणारे पाऊल हे एका वेगळ्याच सेन्सॉरशिपकडे घेऊन जाणारे वाटते.

झुंडशाहीने त्याच्यावर केली जाणारी मिडीया ट्रायल आणि अर्थातच कधी कधी शारिरिक हल्ला, कधी कोर्ट केसेस सोबतच मिळणारी प्रसिध्दी आणि कुप्रसिध्दी ह्याचेही सिस्टिमैटिक अर्थकारण समय रैना रणबीर प्रकरणात दिसले.

सरकारचेही लक्ष कशा पध्दतीने ह्याकडे बघण्याचे आहे तेही बऱ्याच प्रकरणात दिसून आले आहे. व्यवस्थेविषयी, राजकारणी आणि राजकारणाविषयी आपल्याला हवे तेच बोलावे ह्या अपेक्षेसोबत तसे न बोलल्यास वेगवेगळ्या पातळ्यावरुन कसे हाताळले जावे ह्याचे वस्तुपाठ समोर येत आहेत. सामान्य कार्यकर्त्यांकडून धमक्या, मारहाण,कोर्ट केसेस. कायदेतज्ञांकडून नोटीसा, केसेस. मिडीयातून अघोषित बहिष्कार. अर्थकारणांवर परिणाम करतील असे घटक. वैय्क्तिक हानी होतील असे प्रकार म्हणजे घरातील सदस्यांना धमकावणे, घराचे पत्ते, फोन नंबर आदी सोशल मिडीयावर व्हायरल करणे अशा गोष्टींनांही न्यू नॉर्मल असे संबोधावे अशीच समाजमनाची अपेक्षा दिसत आहे. कुणाल कामरा, श्याम रंगीला प्रकरणांमध्ये स्टॅन्डअप कॉमेडियन्सची ही पण बाजू समोर आली.

हे धोके पत्करतानाही एका बाजूला मिळणारी अफाट प्रसिध्दी व केवळ प्रसिध्दी ह्याच निकषावर चालणारे काही अर्थकारण, सोशल मिडीयातही केवळ व्हायरल ह्या शब्दाचे ग्लॅमर नवीन पिढीला मोहवत आहे. अभ्यासोनी प्रगटावे इथून प्रकटोनी प्रसिध्दावे इथपर्यंतचा प्रवास चिंताजनक आहे.

पण ह्या सर्व धोक्यांना टाळण्यासाठी सर्वांगीण सर्वानाच गप्प करण्याचा जो छुपा अजेंडा चालवला जातो आहे तो जास्त चिंताजनक आहे. आज प्रणित मोरेला गप्प करा म्हणतानाच एकून स्टॅन्डप आर्टीस्ट ही जमातच अशी आहे अशा अनेकवचनी द्वेषातून केवळ द्वेषाचीच पोळी भाजून घ्यायचे राजकारण जास्त चिंताजनक आहे. 

विनोद, उपहास, टीका, बोचरी टीका, मिमिक्री ह्या गोष्टी सर्वसाध्य नाहीत. केवळ उच्चशिक्षण आणि अनुभवातून येणाऱ्या गोष्टी तर अजिबात नाहीत. शिक्षण आणि संस्कारासोबत विचारांचा खुलेपणा, उमदेपणा, दिलदारपणा, विरोधी मतांनाही विरोध करताना त्यातील कलाविशेषांचा आदर अशा गोष्टीची अपेक्षा सामान्य जनतेकडून सोडा भल्या भल्या विचारवंत आणि हुशारीच्या मनोऱ्यांनाही जमत नाहीये हेच खरे.

मला वाटतो तोच विनोद हा निखळ विनोद, मला आवडते तीच टीका ही विधायक टीका, मी म्हणेन तोच विद्वान, मी अनुसरण करतो तेच सत्य बाकी सगळे बध्द्कोष्ठ आणि हगवण हीही मनोवृत्ती सध्य समाजाचा आरसा आहे हेच खेदाने नमूद करावे वाटते.

असो..

हीहीही आणी खीखीखी करायचेच दिवस आहेत. हसताय ना.. हसायलाच पाहिजे..


 

 

प्रेक्षकांना मात्र एखादं कलम लागल्याचं ऐकिवात नाही. दोनतीनशे प्रेक्षकांची ती सहमती अंगावर काटा आणणारी आहे.

काय म्हणता? 

 

हे वाक्य सर्वात जास्त काटा आणणारं आहे. 


ज्या पिढीला उत्तम विनोद, प्रासंगिक कोट्या, हजरजबाबीपणा,उस्फुर्त टोमणे यांची जाणिवच नाही, अशा दर्शकांना " असले " शो चांगलेच वाटणार. अतिशय खालच्या पातळीची ' करमणूक ' जितका क्षणिक आनंद देते, त्यापेक्षा कैक पटीने आनंद देणारी, उत्तमोत्तम पुस्तके, वैचारिक धन, उत्तम चित्रपट वा नाटके यांच्या हाती लागत नसल्याने, शो करणारे व आयोजकांचे उखळ मात्र पांढरे होते. आता या बाबतीत शासनातर्फे काय कारवाई होणार याची उत्सुकता आहे.


सवंग प्रसिद्धी , तूनळी हिट्स आणि पैशासाठी वाटेल ते जोक मारणाऱ्या अशा लोकांना घोडे लागलेच पाहीजेत. त्यात मला तरी काही चूक किवा वाईट वाटत नाही. सेन्सॉर नसले तरी ईतक्या प्रोफेशनल कार्यक्रमात एडिटिंग वगैरे ची सोय असताना असे संवाद नक्कीच वगळता आले असते.

 

फक्त एकदाच तर दारु पिउन पोर्शे चालवली (कल्याणीनगर), फक्त एकदाच तर जरा नशा  केली (डोणजे रेव्ह पार्टी), फक्त एकदाच तर.....असे करुन बाराच्या भावात गेलेले कितीतरी आहेत. पोलीस कोठडी,न्यायालयीन कोठडी, नोकरी जाणे, पासपोर्ट जप्त होण्यापर्यंत आणि करीअर बरबाद होईपर्यंत काय काय होऊ शकते ते समजायला पाहीजेच. म्हणजे हा "चलता है" ॲटिट्युड कमी होईल.


पूर्वीच्या काळी प्रेक्षक केवळ निष्क्रिय निरीक्षक होते. हल्लीच्या काळी प्रेक्षक विनोदांत सक्रिय सहभागी असतात. हा फरक नीट समजून घ्यायला हवा. यावर अधिक साधकबाधक चर्चा व्हायला पाहिजे.

 

जेव्हा प्रेक्षक विनोदनिर्मितीत सक्रियरीत्या सहभागी असतात तेव्हा कुणाचीतरी टिंगलटवाळी होतेच, असा ( माझातरी ) अनुभव आहे. मीच मित्रांसोबत कितीतरी वेळा याहून निम्नस्तरीय चकाट्या पिटल्या आहेत. पण त्या खाजगी मैफिलीत.

 

शौच सगळेच करतात. ते उघड्यावर करावं का, असा प्रश्न आहे. स्त्रीपुरुषादि वेव्हारु सर्वांना ठाऊक असला तरी त्यांची खाट कोणी उघड्यावर मांडीत नाही. अशा अर्थाची एक ओवी ज्ञानेश्वरीत आहे.

 

"जरी स्त्रीपुरुषवेव्हारु। हा लोक तरी आघवाचि चतुर।
परि तेथ कौतुकाचा पांघरू। न फेडिती जिया॥"
- (ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ३५४) ( संदर्भसौजन्य : च्याटजीपीटी )

 

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

ओवी किंवा अभंग शोधण्याच्या कामी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेणे उचित नव्हे, त्यास सापडले नाही तर तो कोणत्याही ओव्यांचे शब्द उचलून स्वरचना सादर करतो.

उपरोक्त ओवी मला ज्ञानेश्वरीच्या प्रतीत निदान १३.३५४ वर तरी मिळाली नाही.


In reply to by प्रचेतस

त्यास सापडले नाही तर तो कोणत्याही ओव्यांचे शब्द उचलून स्वरचना सादर करतो. ........

हे भारी आहे.

संत चित्तगपत महाराज की जय.....


च्याजीस विचारलं कुठनं पैदा केलीस ही ओवी, तर म्हणतो की भ्रम झालेला असू शकतो. इथे चर्चा पाहता येईल : https://chatgpt.com/share/6a31af2f-2f28-83ed-b8cb-c0bee64383e1

 

सत्वर संदर्भ शोधणाऱ्या मिपाकरांचे आभार.

 

-गा.पै.


बेतुक्या उवाच.....

 

अवघाची महामोरू, सकल जनासी आधारू ।

ज्ञानाचे वाघरू ,चाटजिपिटेश्वरू ॥ १ ॥

 

चॅजीश्वर ऊवाच....

 

​ज्यासी पडता प्रश्नांचे कोडे । जो धावूनी येई तातडीने पुढे ।

बुद्धीचे कौतुक अगाध गडे । क्षणार्धात उत्तर देई जो ॥ २ ॥

​रात्री-अपरात्री सदा जागृत । विद्यार्थ्यांचा तो परम मित्र ।

कोडिंग असो वा निबंध-पत्र । लीलया लिहितो सर्वही ॥ ३ ॥

 

बेतुक्या उवाच.....

 

​परी एक विनंती ऐकावी कान देऊन । स्वतःची बुद्धी न ठेवावी गहाण ।

हा तर केवळ एक संगणकीय बाण । मूळ ज्ञान मानवाचेच पै ॥ ४ ॥

 

हलकेच घ्या.....

भावार्थ..

महामोरू हा महामेरूचा  जेष्ठ भ्राता .