Skip to main content

एक बोजड दिवस

लेखक निओ यांनी शनिवार, 09/05/2026 21:29 या दिवशी प्रकाशित केले.

एखादा दिवस कसा ढकलत ढकलत काढावा लागतो, गाडी पंक्चर झाल्यासारखा. काहीतरी क्षुल्लक कारणामुळे रात्रीची सुखाची झोप मोडलेली असते. सकाळी अंथरुणातून उठतो तेव्हाच हवा गेलेल्या फुग्यासारखी अवस्था झालेली असते. तरी आपण कसंबसं सावरत सुरुवात करतो.

तिकडे तुमची सहचारिणी आधीच उठून आवरूनटवटवीत झालेली असते. आपण तिला कालच्या एका चर्चित मुद्द्याचा नवीन पैलू सांगायला जातो, तर ती फिस्कारून टांगायला जाते. आपण Dull असलो की तिला जास्त अवसान येते, हा जुना अनुभव असल्यामुळे तिचा नाद आपण सोडून देतो.

समोर पोरगा दिसतो. तुम्हाला वाटतं तो ऑनलाइन शाळा बुडवून टाईमपास करतोय, म्हणून तुम्ही दाबात घ्यायला जाता; तर तो सुट्ट्या लागल्या असे सांगून तुमच्या नो-बॉलवर सिक्स हाणतो.

शेवटी एकदाचे आवरून तुम्ही ऑफिससाठी बाहेर पडता. मग वाटेत ट्रॅफिकची फौज, सिग्नल तोडणारेरथी’, नो-एंट्रीतून उलटे येणारेमहारथी’, मोबाईल वर बोलणारे 'महावीर', यांचा सामना करत त्यांच्याआया बहिणींचा मान राखत, तुम्ही एकदाचे ऑफिसला पोचता. आत पाय टाकला की गारवा मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसात पर्वणीच. झपाझप पावले टाकत तुम्ही तुमच्या क्युबिकलकडे जाता, तर तुमच्या नेहमीच्या डेस्कवर दुसराच कोणी उपटसुंभ बसलेला असतो.

चौकात आपल्या नेहमीच्या जागेवर कोणी बसलं तर भिकारी जसा चिडतो आणि चरफडत नवी जागा शोधतो, तसं तुम्ही फ्लोअरवर नवीन डेस्क शोधता. एकदाचं स्थानापन्न होऊन लॅपटॉप उघडूनआपलं दुकान चालू करता. आणि त्याचवेळी  शेजारच्या क्युबिकलमधील तुमचा नवीन शेजारी त्याच्या कॉलवर जोरजोरात ओरडत असतो. जणू त्याच्या प्रोजेक्टमधील Issue पूर्ण कंपनीचाच Issue असल्यासारखा मोठ्याने बोलत असतो. सराईतासारखे तुम्ही त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करून लॅपटॉपमध्ये डोकं खुपसता. दिवसभराच्या रटाळ मिटिंगा पाहता. शेवटची मिटिंग किती वाजता आहे हे पाहून दुकान बंदकरायला किती वाजतील याचाअंदाज घेता.

नित्यकर्म चालू असतानाच Teams वर तुमचा क्लायंट साईडचा बॉस आग लागल्यासारखा धाडधाड मेसेज करू लागतो. हा गाढव पूर्ण माहिती एका मेसेजमध्ये कधीच देत नाही. तुटक तुटक चार-पाच मेसेज केले की त्याला समाधान मिळतं. क्लायंट साईडला आपण दंगा केला नाही तर आपल्याला पगार मिळणार नाही, असं याला वाटतअसतं. आपण त्या तुकड्यांचा एकत्रित अर्थ लावतो आणिअजून काय म्हणतोय का याची थोडावेळ वाट पाहतो. मग त्या रताळ्याला आपण एकच व्यवस्थित मेसेज पाठवतो. त्यात आधी पाठवलेली मेल नीट वाचली नाही का, असं विचारायचा मोह टाळतो. त्यावर त्या शहाण्याचा काही रिप्लाय येत नाही.

मग टीमबरोबर Status Meeting असते. त्यात चार टाळकी असतात. एक दगाबाज पोरगं ऐनवेळी सुट्टीवर असतं. मिटिंगमध्ये एक रडकी पोरगी नेहमीप्रमाणे रडगाणं गाते. तिच्या रडक्या आवाजातल्या “Good Morning” पासूनच मयताची बातमी लागल्यासारखं वाटतं. त्या रडक्या पोरीची चांगली खरडपट्टी काढावी वाटते, पण तुम्ही टाळता. तिकडे तुमचा दुसरा बॉस, तुमच्या कंपनीचा, भलतंच काम तुमच्या गळ्यात मारतो आणि त्या संदर्भात स्वतःच Chatrooms, Meetings अरेंज करत सुटतो. त्याच्या नसत्या आगाऊपणाकडे सध्यातरी तुम्ही दुर्लक्ष करता. लोकांना वाटतं IT मध्ये काम करतो म्हणजे ऐटीत काम करत असेल; त्यांना काय माहिती हा एक असंघटित कुशल कामगार आहे ते. याला कधीही पिळता येतं. असो. सगळे आवेश आवरत चाकरमानी, मान खाली घालून मुकाट चाकरी करतात.

मग संध्याकाळी एनर्जी संपता संपता यांचे परदेशातल्या टीमबरोबर महत्त्वाचे कॉल चालू होतात. त्यात तोंडातल्या तोंडात बोलणारे इंग्रज डोक्यात जातात. त्यांचं सूर लावून बोलणं, Accent, विनोद हे सगळं बाजूला ठेवून मूळ विषय समजून घेता नाकीनऊ येतात. पूर्वी या इंग्रजांनी भारतातीलआया-बहिणींवर अनेक अत्याचार केले. आम्ही भारतीयांनी याचा बदला त्यांच्याशी त्यांच्या मातृभाषेत बोलून घेतला. शहाण्याला मेख समजेल.

शेवटी सर्व मिटिंगा संपल्या की टेबलावरचं सर्व सामान पिशवीत भरतात आणि घराची वाट धरतात. तोवर रात्र झालेलीअसते. ट्रॅफिकचा चक्रव्यूह पुन्हा यांना छळतो. मग अशी शक्तिहीन झालेली माणसं एखाद्या इप्सित स्थळी जातात. तिथला माहोल यांना बरा वाटतो. निश्चिंत मनाने दोन पेग मारतात. आवडती गाणी ऐकतात. दर्दभरे गीत आणि दर्दभरा दिन याची सांगड घालतात. Jagjit Singh, Pankaj Udhas ऐकून उदास दिवसाची शांती करतात. त्याचबरोबर घरी गेल्यावर बायको  उत्तरपूजा मांडणार नाही याची काळजी घेतात. घरी जाऊन बायकोनं ताटात वाढलेलं मुकाट्याने खातात आणि झोपी जातात.

 


वाचने 100
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया