पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
20 Jun 2016 - 4:40 pm

.
वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय.
संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली.
पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे. बडोद्यातली म्युझियमे बघून तर अगदी खुळावलो, आणि पुढे आपण नोकरी केलीच तर ती एकाद्या म्युझीयममधेच करायची असे वाटू लागले. या सर्व संग्रहालयात असलेली पाश्चात्य निसर्गचित्रे आणि संगमरवरी मूर्ती तेंव्हा मला फार आवडत. १९१६९ पासून इंदुरच्या आर्ट्स्कुलात शिकू लागल्यावर अनेक पाश्चात्त्य कलावंत ठाऊक झाले, आणि त्यांची मूळ चित्रे बघण्याची आस लागली.

मध्ये अनेक वर्षे उलटली. दिल्लीतल्या (अलिकडेच जळून भस्मसात झालेल्या) नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये दहा वर्षे चित्रकार म्हणून नोकरी केली, नंतर अमेरिकन एम्बसीत प्रदर्शन अधिकारी म्हणून बराच काळ काम केले, त्यामुळे 'म्युझियम' या विषयाची बरीच माहिती झाली. या काळात जिथेही जाईन तिथली म्युझीयमे बघण्याचा छंद जोपासला. १९८४ साली तीन महिने अमेरिकेतली संग्रहालये बघणे आणि त्यात काम करणे हे घडून आले. नंतरच्या अमेरिका प्रवासांमधेही बरीच संग्रहालये बघितली.

अलिकडे गेली आठ- नऊ वर्षे पॅरिस मधील अनेक संग्रहालये, रोम मधील व्हॅटिकन आणि अन्य म्युझीयमे बघण्याचा योग आला. अनेक फोटो काढून जमा झाले, परंतु त्यावर काही लिहीण्याचे मात्र जमले नाही. अलिकडेच प्रचेतस यांनी सुचवल्यावर हा उपद्व्याप करण्याचे ठरवले.

पॅरिस मधील अनेक संग्रहालये ज्या इमारतींमधे आहेत, त्या इमारती म्हणजे एकेकाळचे वैभवशाली राजप्रासाद आहेत आणि ते सुंदर उद्यानांनी वेढलेले आहेत. विविध काळी विविध राजांनी आपापली भर घातल्याने काही शतकांनंतर त्यांना आजचे स्वरूप लाभलेले आहे. हा सर्व इतिहास जाणून घेत त्या इमारतींचे अवलोकन करणे हा सुद्धा एक आनंददायक अनुभव आहे. असो. नमनाला घडाभर तेल झाल्यावर आता प्रत्यक्ष विषयाला हात घालतो.

१. फॉन्तेनब्लो (Fontainbleau ) : पॅरिसपासून अंतर ५५ किमी
फ्रान्सच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेला हा राजप्रासाद हा आठ शतके फ्रान्सच्या विविध राजे लोकांचे निवासस्थान राहिलेला आहे. १२ व्या शतकात या ठिकाणी एक किल्ला होता. या भागात घनदाट जंगल आणि भरपूर पाण्याचे झरे असल्याने फ्रेंच राजघराण्यातील लोक शिकारीसाठी इथे येऊन रहात.(यातील 'ब्लो' नामक झऱ्यावरूनच 'फॉन्तेनब्लो' हे नाव पडले ) फ्रांसचा राजा फ्रँक्वा-१ अथवा फ्रांसिस -१ (1494-1547) हा कलेचा आश्रयदाता असून याने प्राख्यात चित्रकार लिओनार्दो द विंची याला इटलीतून पाचारण केले. (त्यावेळीच लिओनार्दोने 'मोनालिसा' हे चित्र आपल्याबरोबर फ्रान्सला आणले) याच राजाने नवीनच शोध लागलेल्या अमेरिका खंडात फ्रेंच वसाहती स्थापन केल्या.
राजा फ्रँक्वाचे तात्कालीन चित्रः
.
या राजाने तात्कालीन इटालियन रेनासां शैलीत एक नवीन प्रासाद बांधण्याचे काम ल ब्रेतों (Gilles Le Breton) या वास्तुविदावर सोपवले. इ.स. १५२८ च्या सुमारास या प्रासादातील राजाच्या निवासकक्षापासून प्रार्थनागृहापर्यंत पहुचणारी एक गॅलरी बांधण्यात आली. त्यासाठी इटालीतून खास वास्तुविद आणि चित्र-मूर्तीकार बोलावण्यात आले. १५३३ ते १५३९ या काळात उठावाच्या मूर्ती आणि सपाट चित्रे यांच्या संगमातून सजावटीचे काम पूर्ण झाले. या शैलीला 'फाँतेन्ब्लो स्कूल' असे नाव पडले. इटालियन रेनासां शैलीची फ्रान्समधील ही प्रारंभिक चित्रे आहेत.
फ़्रेंक्वा-१ ची गॅलरी, त्यातील उठावाच्या मूर्ती आणि चित्रे:
.
.
.

प्रार्थनागृह (चॅपेल)
.
१५४० मध्ये प्रासादाभिवती विस्तीर्ण उद्यान बनवले गेले :
.

फ्रान्सिसच्या मृत्युनंतर हेन्री -२ आणि राणी कॅथेरीन द मेदिची यांनी घोड्याच्या नालेच्या आकाराचा जिना बनवला:
.
.
(वरील दोन चित्रे जालावरून साभार)

१५५२ चे सुमारास खालील दालनांवरील गच्चीवर भिंती, उंच खिडक्या, कलाकुसरयुक्त छत आणि कलात्मक सजावट केलेले नृत्यदालन (बॉलरूम ) बनवण्यात आले. या दालनाच्या एका टोकाला भव्य अग्निस्थान ( fireplace ) तर दुसर्‍या टोकाला नृत्याचे वेळी गायक-वादकांना बसण्याची गॅलरी आहे.
नृत्यकक्षात प्रशांत आणि मी:
.
अग्निस्थान:
.
गायक-वादकांना बसण्याची गॅलरी:
.

या प्रासादात एकूण सुमारे १५०० दालने आहेत, अर्थात आपल्याला त्यापैकी फारच थोडी बघायला मिळतात. या दालनांखेरीज इथे नेपोलियन म्युझियम, चिनी वस्तुंचे संग्रहालय, नाट्यगृह अशा अनेक प्रेक्षणीय जागा आहेत. प्रासादाभोवती विस्तीर्ण उद्यान आहे. सर्वत्र जुनी चित्रे आणि संगमरवरी मूर्ती यांची रेलचेल आहे.
राण्यांचे शयनकक्ष :
.
शाही जिन्यातील सजावटः
.

प्रासादातील काही शिल्पे:
.....

...
लहानपणी वाचनात आलेल्या 'त्रिस्तनी राजकन्या' नामक एक गोष्टीची आठवण वरील बघून शिल्प आली. मदुराईच्या मीनाक्षी मंदिरातही असे शिल्प आहे, ते या निमित्तने आठवले.

नेपोलियनचे सिंहासन आणि पलंग:
...

नेपोलियन संग्रहालयातील काही वस्तू:
नेपोलियनच्या बाळाचा पाळणा:
.

नेपोलियनच्या पिस्तुली:
.
नेपोलियनचा तंबू:
.

प्रासादाभोवतालीच्या उद्यानातील शिल्पे:
.
...
...

प्रासादाजवळचे तळे:
.
चौदाव्या लुईच्या काळात तळ्यात बनवलेला मंडपः
.

ही लेखमाला लिहिण्यास उद्युक्त करण्याबद्दल प्रचेतस यांना अनेक आभार.
पुढील भागात पॅरिसच्या आणखी एकाद्या राजप्रासादाची सफर करूया.

-----------------------------------------------------------------------------
फाँतेनब्लो विषयी काही उपयुक्त दुवे:
http://www.musee-chateau-fontainebleau.fr/The-Park?lang=en
https://en.wikipedia.org/wiki/Palace_of_Fontainebleau
http://chateaudefontainebleau.fr/spip.php?page=sommaire&lang=en

(क्रमशः)

वावरसंस्कृतीकलाधर्मइतिहाससमाजजीवनमानराहणीप्रवासदेशांतरशिक्षणमौजमजाप्रकटनआस्वादलेखअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

तिमा's picture

20 Jun 2016 - 5:26 pm | तिमा

एका संग्राह्य, उत्तम लेखमालिकेला सुरवात. सर्व छायाचित्रे आवडली.

जबरदस्त लेखमाला चित्रगुप्तजी.
एका मुरब्बी चित्रकाराच्या नजरेतून पाहिलेले हे संग्रहालय खरोखरी डोळे दिपवणारेच आहे.
शाही जिन्यातल्या सजावटीखालील तुमचा फोटो अप्रतिम आलाय हो अगदी. सर्वच फोटो आवडले.
आपणासोबत आमचे प्रशांतमालक पाहून नवल वाटले (म्हणजे प्यारिसात ते असतात बर्‍याचदा पण म्युझियममध्ये म्हणजे.....)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2016 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली आवड़ आणि त्या निमित्ताने केलेली भटकंती आवडली. चित्र छान. त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्रात कुठे आहेत का ? वल्ली सांगेलच. बाकी, शिल्प, प्रसाद, राजवाड़े, यांची छायाचित्र सुंदरच. प्रचेतस यांनी आपल्याला लिहायला उद्युक्त केल्याबदल त्यांचेही आभार.

पुलेशु.

अवांतर : आपला आणि प्रशांतचा फोटोही आवडला. प्रशांतला पॅरिस मधलं काय काय दाखवलं, सांगायला विसरु नका.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

20 Jun 2016 - 6:42 pm | प्रचेतस

त्रिस्तनी शिल्प महाराष्ट्राततरी मी कुठे पाहिले नाही.
मीनाक्षी देवी साउथ इंडियन. तिचेच असे शिल्प असते. जन्मजात ती त्रिस्तनी. तिला योग्य असा नवरा मिळाल्यावर जादाचा एक स्तन गळून जाइल असे काहीसे वरदान तिला असते अशी कथा वाचली होती पूर्वी.

प्रचेतस's picture

20 Jun 2016 - 6:39 pm | प्रचेतस

ह्या विषयावर लिहिते झाल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.

सालारजंगमधलं व्हेल्ड रिबेकाचं संगमरवरी शिल्प अतिशय आवडीचं. केवळ तेव्हढं बघण्यासाठीच तिथं जावं.

फोंतेनब्लो प्रासाद, तिथली चित्रं, तिथली शिल्पं खूपच सुंदर. सौष्ठव खूपच खुलवतात हे इटालियन शिल्पकार.

नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही.

नेपोलियनचे सिंहासन अगदीच साधे आणि लहानसे वाटले. पलंग मात्र अगदी राजेशाही.

अगदी हेच मनात आले माझ्या. ते सिंहासन बघून असे वाटले की एव्हढा मोठ्ठा राजा, भव्य प्रासाद आणि सिंहासन फारच साधे.
तसच हे पण मनात आल की शिवाजी महाराजांच सिंहासन (वाचलेल्या वर्णनावरून) केव्हढं भव्य आणि शाही असेल. आपल्या राज्यकर्त्यांचा सर्व ठेवा आपल्याला जतन करून ठेवता आला असता तर किती नवीन गोष्टी कळल्या असत्या आपल्याला.

बाकी लेख सुंदरच लिहिलाय. आणि बाकिच्यांनी म्हणल्याप्रमाणे चित्रकाराच्या नजरेतून कलाकृतींविषयी अजून थोडं सविस्तर वाचायला आवडेल. ते पुढील लेखांमधे येऊद्या.

(शिल्पप्रेमी) सई

बोका-ए-आझम's picture

20 Jun 2016 - 6:54 pm | बोका-ए-आझम

यात काही कळत नसलं तरी जाणकार माणसाचं बोट धरून भ्रमंती करायला नेहमीच मजा येते. चित्रगुप्तकाकांबरोबर तशीच मजा येणार आहे याची खात्री आहे. पुभाप्र!

चौकटराजा's picture

20 Jun 2016 - 7:12 pm | चौकटराजा

शिल्प चित्र व वाडे या बरोबरच युरोपमधे अनेक जागी कारंजी बागा व पुषकर्णी यांची रेलचेल आहे..त्यातील एक फोन्तेनब्लो आपण स्वतः पाहिले व आपले प्रशांत यानाही दाखविले. आता मिपाच्या भाषेत ते काय इनो का काय त्याची बाधा झाली. फ्रान्स मधील अन्य अशाच जागा पाहिल्या असल्यास आम्हाला लेखातून का होईना तिथे जाता येईल.

पहिल्या भागापासूनच ही लेखमाला जबरदस्त होणार याची खात्री झालीय. सुरेख!
पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2016 - 12:39 am | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम चित्रांनी भरलेला माहितीपूर्ण लेख ! अर्थात चित्रगुप्त संग्रहालयांवर लिहिताहेत म्हटल्यावर हे सर्व अपेक्षित होतेच.

एका भन्नाट मालिकेची सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

अगदी आवडत्या विषयावरची लेखमालिका. वाखु साठवत आहे.चित्र आणि शिल्पांबद्दल अजून वाचायला आवडेल.
पुभाप्र

पहिलाच भाग मस्त....

पुभाप्र.

अत्रन्गि पाउस's picture

21 Jun 2016 - 12:01 pm | अत्रन्गि पाउस

गेल्या वर्षी चित्रगुप्त काकांबरोबर Cathedrale Notre Dame आणि लूव्र एका चित्रकाराच्या नजरेतून बघितले ...आणि तो एक अविस्मरणीय अनुभव आहे ....
मोनालिसा सोडून काहीही माहित नसलेले आम्ही (मी व माझे २ मित्र) त्या (गुप्त) कट्ट्या नंतर २ दिवस फक्त चित्रगुप्त काका आणि लूव्र ची त्यांची जानकारी ह्यावर बोलत होतो ...

नीलमोहर's picture

21 Jun 2016 - 12:23 pm | नीलमोहर

उत्तम माहिती आणि मस्त फोटो,
या लेखमालेत लुव्र येईलच, मात्र पुढे रोम, व्हॅटिकन बद्दलही स्वतंत्रपणे लिहावे ही विनंती.
पुढील लेखांच्या प्रतीक्षेत.

निनाद's picture

21 Jun 2016 - 12:26 pm | निनाद

खूप छान विषय आहे, तुमची माहिती पण छान. तरीही चित्रकाराच्या नजरेतून अजून आस्वाद असायला हवा होता. आणि शैली अधिक विस्ताराने हवी, अशी विनंती करतो.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jun 2016 - 12:45 pm | प्रकाश घाटपांडे

सगळ काही अगम्य व अदभूत वाटत.

नाखु's picture

21 Jun 2016 - 2:17 pm | नाखु

पुण्यसंचय असल्याने राजा,नालजिना आणि शिल्पी दिसली.

बाकी मालीका पुढे पुढे रोचक होत जाणार हे नक्की. दर्दी माणसाकडून बारकावेच सम्जत नाहीत तर बघण्याची दृष्टी मिळते हे नुलकर काका आणि लेणी महंताकडून अनुभवले आहे.

वाचक नाखु

नंदन's picture

21 Jun 2016 - 3:59 pm | नंदन

लेख आवडला. छायाचित्रं आणि सोबतची माहितीही खास. पु.भा.प्र.

नव्या मालिकेचे स्वागत. पहिल भाग सुरेख झालाय.
फोटू पाहून मन भरले! छतांवरचं काम नुसतं पहात रहावं.

दोनदा प्यारीसला जाऊनही असले कांही पाहिले नाही, पुढे ठाऊक नाही.
त्यामुळे अश्याच छान ठिकाणांचा परिचय करून द्यावा ही विनंती.

विवेकपटाईत's picture

21 Jun 2016 - 7:14 pm | विवेकपटाईत

लेख आणि चित्रे दोन्ही आवडले.

बबन ताम्बे's picture

22 Jun 2016 - 12:06 pm | बबन ताम्बे

सर्व फोटो अप्रतिम.
त्याकाळात किती असंख्य कलाकार या सुंदर कलाकृतीं घडवण्यासाठी राबले असतील.युरोपात हे सगळे खूप चांगल्या रितीने जतन केले आहे. मागे उरळी कांचनजवळील भुलेश्वर मंदीर पहावयास गेलो होतो. एव्ह्ढया अप्रतिम मुर्ती, पण तुटलेल्या अवस्थेत पाहून वाईट वाटले.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि रोचक माहिती.
पुभाप्र.

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि रोचक माहिती.
पुभाप्र.

वाखु साठवली.अप्रतिम फोटो आणि रोचक माहिती.
पुभाप्र.

एस's picture

22 Jun 2016 - 9:56 pm | एस

सुंदर.

पैसा's picture

22 Jun 2016 - 10:15 pm | पैसा

सुंदर! हे फोटो म्हणजे डोळ्यांना मेजवानी आहे अगदी! त्यात तुम्ही इतके सुरेख वर्णन केलंय की क्या कहने!

मंदार कात्रे's picture

23 Jun 2016 - 11:07 pm | मंदार कात्रे

फार छान

वाचतो आहे
पुभाप्र

मंदार कात्रे's picture

23 Jun 2016 - 11:07 pm | मंदार कात्रे

फार छान

वाचतो आहे
पुभाप्र

उल्का's picture

23 Jun 2016 - 11:26 pm | उल्का

अप्रतिम फोटो आहेत सर्व.
पुभाप्र.

साधा मुलगा's picture

25 Jun 2016 - 7:42 pm | साधा मुलगा

सुंदर आणि अप्रतिम! पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबबत माहिती घ्यायला आवडेल. मागे पेठकरकाकांचा आणि आणखी एका ताईंचा/ काकूंचा या शहराच्या सफरी विषयी लेख वाचला होता. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

@ साधा मुलगा: पॅरिस शहर आणि आजूबाजूचा परिसर याबाबत लिहीण्याचे राहून गेले होते, ते आता हाती घेण्याचा विचार आहे. पुढील एक-दीड महिना मी रोज या परिसरात भटकंती करणार असल्याने आता ते जमण्यासारखे आहे.

यशोधरा's picture

25 Jun 2016 - 7:49 pm | यशोधरा

सुंदर! वाखु साठवलीय.

निशाचर's picture

25 Jun 2016 - 8:24 pm | निशाचर

पुभाप्र.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2016 - 11:05 am | प्रभाकर पेठकर

शिल्प आणि तैलचित्र मनाला फार लुभावतात. चित्रकलेचे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे चित्रकाराच्या नजरेतून शिल्पाचे विश्लेषण करणे, रसग्रहण करणे जमत नाही. पण शिल्पाचे, तैलचित्राचे तपशिल पाहताना कलाकाराच्या कलेने थक्क व्हायला होतं.
हि लेखमाला आमच्या रसिक मनाला शिल्पाची माहिती, इतिहास इत्यादी साज चढवून आनंदाची उधळण करणार ह्यात शंका नाही.
शुभेच्छा..!

नारायणी's picture

5 May 2017 - 9:43 pm | नारायणी

मला बरेच्से फोटो दिसत नाहीत. मी क्रोम वापरत आहे.

चित्रगुप्त's picture

3 Nov 2017 - 10:59 pm | चित्रगुप्त

मला बरेच्से फोटो दिसत नाहीत. मी क्रोम वापरत आहे.

आता दिसत आहेत का फोटो ?