कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
9 Feb 2016 - 11:29 am

वैधानिक इशारे

१.---> कुत्री पाळणे, हे अतिशय घातक व्यसन असल्याने, जबाबदारीने, आर्थिक कुवतीने आणि सामाजिक भान ठेवूनच, ह्या व्यसनाच्या नादी लागावे.

२.---> कुत्री एखाद्या लहान मुलासारखीच असतात.त्यांच्या देहबोलीवरून, खाण्या-पिण्यावरून आणि भुंकण्यावरून त्यांच्या आजारपणाचा, त्यांच्या मागणीचा, अंदाज घ्यावा लागतो.त्यांची भाषा फक्त त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या व्यक्तीलाच समजू शकते.

३.---> कुत्र्यांना शिकवणे हे अत्यंत वेळखाऊ आणि शांतपणे करायचे तप आहे.विशेषतः त्यांच्या "शी-शू"च्या सवयी बाबतीत.त्यांच्यावर जास्त न रागावता ह्या सवयी लावणे, सुरुवातीला थोडे त्रासदायक ठरेल, पण ह्या सवयी लागतात.

४.---> आली लहर आणि घेतला कुत्रा, असे अजिबात करू नका.कुत्रा पाळणे हे तिन्ही-त्रिकाळ करायची गोष्ट आहे.घरात २४ तास कुणी ना कुणी असेल तर (विशेषतः जेष्ठ लोक) कुत्रा जरूर पाळा.मला तरी ह्या बाबतीत कुत्र्यांचा खूपच उत्तम अनुभव आला आहे.आमच्या सासूबाई आता घर सोडून जावू शकत नाहीत.घरात कुत्री आणल्यापासून, त्यांना ह्या कुत्र्यांची छान सोबत होते.

==================================================================

काही सूचना

सूचना १ ----> ह्या भागात कृपया "कुत्र्यांची तोंडओळख आणि लॅब्रेडोर" ह्या विषयीच माहितीची देवाण-घेवाण करु या.

सूचना २ ----> पुढील भागात आपण "बीगल" ह्या जातीविषयी माहिती घेवू या.

सूचना ३ ----> आम्ही जरी श्र्वान-व्यसनी असलो तरी, ह्या व्यसना बाबतीत जाणकारही नाही आणि विशेषज्ञ तर अजिबात नाही.त्यामुळे, मी इथे लिहीत असलेली माहिती. बरीचशी मिळवलेली आणि थोडी-फार स्वानुभवाची आहे.कृपया माझी माहिती चुकीची असल्यास, दुरुस्त करण्यात यावी, ही कळकळीची विनंती.

सूचना ४ ----> कूठलाही कुत्रा किंवा कुत्री घेण्यापुर्वी, आपल्या घराजवळ किंवा आपल्याला सहज नेता-आणता येईल इतक्या अंतरावर पशूवैद्यक असावा.

सूचना ५ ----> आपल्या घराजवळ एखादे पाळीव श्र्वान असेल तर फार उत्तम.साधारणपणे ज्या कुटुंबात श्र्वान असते ते पाळीव श्र्वानांना आणि त्यांच्या मालकांना नेहमीच मदत करतात आणि दोन्ही घरातली कुत्री एकमेकांबरोबर छान खेळतात.

==============================================================

कुत्र्यांची निवड ======>

कुत्र्यांची निवड करतांना मी खालील गोष्टींना प्राधान्य देतो.

१. कारण

अ) सोबत ----> आमच्या सासू बाईंना अजिबात ऐकायला येत नाही.त्यामुळे आमच्या अपरोक्ष, त्यांची काळजी घ्यायला कुणी तरी त्यांच्या बरोबर असावे.

ब) संरक्षण ----> बाहेरची कुणी व्यक्ती घरांत आली तर, ती सतत आपल्या जवळ असली पाहिजे.आपल्या इशार्‍या नुसार त्यांनी भुंकायला पाहिजे.

२. घराचे आकारमान ---->

माझा अनुभव, सुरुवातीला आम्ही हा निकष धान्यात घेतला न्हवता.सुदैवाने आमच्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्रीने, आमच्या घराचे आकारमान कमी असले तरी, त्रास दिला नाही.पण प्रत्येक लॅब्रेडॉर तसे नसते.किंबहूना, लॅब्रेडीर, ग्रेट-डेन, डॉबरमन, गोल्डन रीट्रीव्हर, अल्सेशियन जातीच्या कुत्र्यांना किमान गॅलरी असलेले घर उत्तम.

पग, बीगल, पामेरियन, ह्या अशा दीड-फुटी कुत्र्यांना कमी जागा असली तरी चालते.

३. आज्ञाधारक पणा ---->

प्रशिक्षित कुत्री, मालकाने आज्ञा दिल्याशिवाय, शक्यतो घरात भुंकत नाहीत.तरी पण रॉटवायलर सारखी नाठाळ(?) कुत्री फ्लॅट धारकांनी पाळू नयेत, असे मला वाटते.

बंगला असेल तर रॉटवायलर सगळ्यात उत्तम, असे माझे मत.

------------------------------------------------------

श्र्वानांची काळजी =====>

१. खाणे-पिणे =====>

प्रत्येक श्र्वान हे आपापल्या कुवतीनुसारच खाते.लॅब्रेडॉर, ग्रेट-डेन, रॉटवायलर एका वैठकीत २-४ भाकर्‍या सहज रिचवतात आणि आपण काही खाल्लेच नाही अशा अविर्भावात बसतात.

आहार नियमित, वेळच्यावेळी आणि संतुलीत असावा.शक्यतो, कुत्र्यांना भरवायला जावू नये.त्यांची खाण्या-पिण्याची भांडी पण वेळोवेळी बदलावी.कुत्री बर्‍याचदा एककल्ली असल्याने, ठरावीक व्यक्ती आणि ठरावीक भांडे, ह्याची सवय, त्यांना लगेच लागू शकते.

पुढे-मागे काही कारणांंमुळे, त्या व्यक्तीला कुत्र्याला अन्न द्यायला न जमल्यास किंवा ते भांडे नसल्यास, कुत्रे इतरांनी दिलेल्या किंवा दुसर्‍या भांड्यातील अन्नाला तोंड लावत नाहीत.(ह्या दोन्ही गोष्टी बघीतलेल्या आहेत.)

पे-डीग्रीचे खाद्य सुरुवातीला, ३-४ महिन्यांपर्यंत जरूर द्या.पण पुढे मात्र हळूहळू घरच्या जेवणाची सवय त्यांना लावा.

भात-पोळी-भाकरी-अंडी-मासे-मटन आणि कोंबडी आठवडाभर आलटून-पालटून द्या.शक्यतो मैद्याचे पदार्थ जास्त देवू नका.

त्यांच्या पाण्याच्या भांड्यात सतत पाणी असेल ह्याची काळजी घ्या.

२. जंतू संसर्ग ====>

श्र्वानांना जंतू संसर्ग फार लवकर होतो.विशेषतः छोट्या श्र्वानांना.त्यामुळे, वेळच्या वेळी कोमट पाण्याने आणि साबण लावून श्र्वानांना आंघोळ घालणे.

आपण आजारी असलो तर, श्र्वानांच्या जवळ फार वेळ जावू नका.

३. कातडीचे रोग ====>

तापमान आणि इतर आजारी कुत्र्यांच्या सहवासामुळे (मग भले तो थोडा वेळासाठी तरी का असेना) आपल्या श्र्वानाला पण हे रोग होवू शकतात.

कुत्र्यांच्या कातडीरोगावर मलमे उपलब्ध असली तरी, ती मलमे कुत्र्यांच्या अंगावर जास्त वेळ टिकत नाहीत.कुत्रे लगेच ती मलमे चाटायला लागतात.

त्यामुळे शक्यतो, आम्ही ही मलमे, कुत्रे झोपल्यावर लावतो.कधी यश मिळते तर कधी मिळत नाही.

४. श्र्वानांना फिरायला नेणे ====>

सुरुवातीचे २-३ महिने किंवा श्र्वानांचे लसीकरण पुर्ण होईपर्यंत, श्र्वानांना फिरायला नेवू नये.

कारण, एकतर त्यांना अद्याप आपल्या सुचना समजत नसतात, त्यांना रहदारीचा अंदाज येत नसतो आणि रस्त्यावरच्या घाणीला ते कधी तोंड लावतील, ह्याची खात्री नसते.

२-३ महिने झाले की, मग प्रत्येक श्र्वानाला. मग तो छोटा असो वा मोठा, त्यांना रोजच्या रोज फिरायला न्यावेच लागते.इथे कुठल्याही प्रकारे अळं-टाळं करून चालत नाही.लॅब्रेडॉर सारख्या मोठ्या श्र्वानांना किमान २-३ किमी आणि ते पण दिवसातून २ वेळा अत्यंत आवश्यक आहे.

छोटा श्र्वान असेल तर त्याला पण त्याला झेपेल इतपत फिरवायला हवेच.

किंबहूना श्र्वानांना जितका व्यायाम द्याल तितके त्यांचे आरोग्य उत्तम राहील.

५. श्र्वानांना शिकवणे ====>

खरेतर श्र्वानांना शिकवणे फार सोपे.संयम आणि अंदाज ह्या गोष्टी असतील तर फारच सोपे.

ते लहान असतानांच त्यांना शिकवायला घ्या.

सुरुवात, त्यांना शांत बसवण्या पासून करा.

इथे थोडी-फार चापटी मारलीत तरी चालते.कारण तसेही जास्तीत-जास्त २ चापट्यांनीच काम होते.

एकदा त्यांना बसायची सवय झाली, की मग आपण "खा" म्हटल्याशिवाय, त्यांनी खायला नको, ही सवय लावणे, सोपे जाते.

कुत्र्यांना घेवून फिरायला जातांना, ह्या दोन्ही सुचनांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे.

तिसरी सवय म्हणजे, बेल वाजवल्या वर भुंकणे किंवा दरवाजा जवळ येणे.

चौथी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे, श्र्वानांना त्यांच्या शी-शूची जागा ठरवून देणे.

सुरुवातीला, त्यांना द्रव पदार्थच जास्त प्रमाणात द्यायला लागतात.साहजीकच त्यांचे "शू"चे प्रमाण आणि वारंवारता जास्त असते.३-४ महिन्यांनी घन आहार चालू झाला की, शूची वारंवारता फार कमी होते.

साधारणपणे खायला दिल्यानंतर, एक १०-१५ मिनिटातच त्यांना "शू" होते.अशावेळी त्यांचे खाणे आम्ही बाथरूम मध्येच देतो.एकदा त्यांनी सलग ३-४ खाणी आणि लगेचची "शू" बाथरूम मध्ये केली की, मग ती देवाघरी जाई पर्यंत पुढील प्रत्येक "शू" ती बाथरूम मध्येच करतात.

"शू" प्रमाणेच त्यांच्या "शी"च्या वेळा आणि जागा पण ठराविक असतात."शी" करण्यापुर्वी प्रत्येक कुत्री स्वतः भोवती रिंगण घालतात.त्यांनी असा पिंगा घालायला सुरुवात केली, की सरळ त्यांना बाथरूम मध्ये नेतो.४-५ दिवसांत सवय लागते.

शेकहँड द्यायला किंवा सलाम करायला शिकवण्यापेक्षा, ह्या ४ मुलभूत सवयी, श्र्वानांनी आत्मसात केल्या की श्र्वानाचे आणि श्र्वान मालकाचे सुखी-समाधानी-आनंदी जीवन सुरु होते.

आता आपण श्र्वानांच्या जातींच्या आणि त्या-त्या जातीतल्या श्र्वानांच्या गुणावगुणांच्या माहितीची देवाण-घेवाण करू या.

६. बाळंतपण ---->

त्र्यांचे बाळंतपण हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि त्याच प्रमाणे जबाबदारीचा.

आपल्या कुत्रीला दिवस गेले की, एखाद्या बाळंतिणी सारखी तिची काळजी घ्यायला लागते.तिला सकस आणि चौरस आहार, किती वेळा आणि कुठला द्यावा हे पशुवैद्यका कडून जाणून घ्या.

दुर्दैवाने, आमच्या पहिल्या कुत्रीची पिल्ले काही कारणांमुळे गर्भाशयातच वारली.

आम्हा उभयतांचे अज्ञान, चुकीची औषध-योजना, घरापासून दूर असलेले पशुवैद्यक आणि लॅब्रेडॉरचे आकारमान, ही त्यामागची कारण-मीमांसा.

पिल्ले आतल्या आत गेल्यामुळे, तिचे गर्भाशय काढायला लागले.त्याची परिणिती कुत्रीचे वजन वाढण्यात झाली.

त्यामुळे तुमची कुत्री जर गर्भवती झाली तर, अनुभवी पशुवैद्यकाला पर्याय नाही.

कुत्र्यांच्या बाळंतपणाबाबत जास्त अनुभव नसल्याने, मी इथेच थांबतो.

==================================================

श्र्वान क्रमांक १ ======> लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर

होतील बहू, असतील बहू, पण माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कौटुंबिक श्र्वान म्हणजे लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर.

मी बघीतलेले ९९% लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर, अतिशय प्रेमळ, बर्‍यापैकी समजूतदार आणि सहनशील होते आणि आहेत.

ह्यांचे दुर्गूण म्हणजे, प्रचंड खादाडपणा, अवाढव्य शरीर, वजन आणि केसगळती.

शरीराने बर्‍यापैकी अवाढव्य असल्याने डॉक्टर जवळ नसेल आणि स्वतःची गाडी नसेल तर फार कमी रिक्षावले, ह्यांना न्यायला तयार होतात.

आधी ह्यांना जेवायला घालून मग जेवायला बसतात तर थोडी शांत असतात, पण जर तुम्ही आधी खायला बसलात तर तुमच्या ताटात तोंड घालायचा नक्कीच प्रयत्न करतील.

तशी ही जात बर्‍यापैकी आळशी.लहानपणी जी काय मस्ती करतील तीच.पण साधारणपणे १-२ वर्षांची झाली की, आपण बरे आणि आपले घर बरे, ह्याच भुमिकेत शिरतात.ह्यांना शिकवायला जास्त त्रास पडत नाही.बाहेर फिरायला काढले की आमच्या लॅबूला तर नंतर-नंतर पट्टा पण लावत न्हवतो.

आता इथेच थांबतो.पुढे भेटू या प्रतिसादात.

पुढच्या भागात आपण बीगल विषयी माहिती घेवू या.

समाजजीवनमानशिक्षणमौजमजाप्रकटनविचारअनुभवमाहितीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 Feb 2016 - 11:41 am | यशोधरा

वा वा! मस्त धागा!

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 11:46 am | संदीप डांगे

मुवि, तुम्ही मनकवडे आहात काहो? इतक्या आतुरतेने मी हीच माहिती शोधत होतो. जालावर सगळी विपर्यस्त आणि बेजबाबदारपणे काहीही लिहिलेले असते. चिमणरावला मी पुस्तकांबद्दल्ही विचारलं होतं.

तुम्ही हा धागा काढल्याबद्दल तुमचे आमच्या सर्व कुटूंबातर्फे खूप खूप आभार.

आमची मार्गी - गोल्डन रिट्रीवर - आता ४० दिवसांची झाली. सगळं खाते. शी घराबाहेर जाऊन करते. दरवाजा उघडायला लावते. शु चं गणित फक्त तुम्ही म्हणताय तसं शिकवायला लागेल. आमचा हॉल स्विमिंग पूल झालेला असतो. ;-)

१. संरक्षक सोबती =====> लेखक्/लेखिका ----विजय भट, सौ मालती दाते....प्रकाशक --- पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन, १७८६, सदाशिव पेठ , पुणे-३०.किंमत १८०/- रुपये.

हे पुस्तक घरात हवेच.

२. कुत्याचे ट्रेनिंग आणि काळजी, लेखक डॉ.सुधीर राजुरकर (मोबाइल क्रमांक ==> ९४२२१७५७९३), साकेत प्रकाशन, औरंगाबाद, फोन नंबर ===> २३३२६९२,२३३२६९५... (हँडबूक म्हणून उत्तम)

३. गुणी सोबती... कुत्रा पाळतांना...लेखक डॉ.विनय गोर्‍हे आणि सुषमा कर्वे.

४. काही उपयुक्त वेब साईट्स ----->

http://www.petexpertise.com/dog-training-ebook.pdf

http://www.dog-first-aid-101.com/dog-ebooks.html

http://www.dog-obedience-training-review.com/dog-tricks.html

सगळी कुत्री शिकतात, पण शिकण्याचा वेळ मात्र कमी-जास्त असतो.

बाद्वे,

गोरि (गोल्डन रीट्रिव्हर) घेतल्याबद्दल अभिनंदन.

माझे पण एक स्वप्न आहे.

एक १०-१२ खोल्यांचे घर असावे.त्या खोल्यात गोरि,लॅबू,बीगलू,फॉटि(फॉक्स टेरियर),रॉटवायलर अशी मस्त कुत्री असावीत आणि आपण व्हरांड्यात झोपून त्यांची निगराणी करावी.आयुष्यभर त्यांनी आम्हाला साथ केली, निदान आम्ही देवाघरी जाण्यापुर्वी तरी त्यांची सेवा करून मगच जावे.

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 2:54 pm | संदीप डांगे

पुस्तके आणि इतर दुव्यांसाठी खूप खूप धन्यवाद! फारच मोलाची मदत केलीत तुम्ही.

'मार्गी' चा काही ऋणानुबंध असावा. काहीच ठरवुन प्लान करुन आणलेली नाही. विशेष म्हणजे देणार्‍यानी मोफत दिलीय. पण जबाबदारी ओळखून आहोत. बस, तिसरं मूल आहे घरातलं! आम्हाला खरंच देवाचा वर मिळाल्यासारखं झालंय. घर अंगण मोठं आहे. त्यामुळे तिला आवडतंय इकडून तिकडे दुडूदुडू धावायला. :-)

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 4:04 pm | मुक्त विहारि

हॅरी पॉटर मधले एक वाक्य आहे... छडीच आपला जादूगार निवडते.

बर्‍याचदा कुत्रांच्या बाबतीत पण हा अनुभव येतो.

"पुस्तके आणि इतर दुव्यांसाठी खूप खूप धन्यवाद! फारच मोलाची मदत केलीत तुम्ही."

मला माझ्या पहिल्या कुत्रीला पाळतांना बराच त्रास झाला.सुदैवाने ती लॅब असल्याने, जास्त अडचणी आल्या नाहीत.त्यामुळे लॅब देवाघरी गेल्यानंतर कुठल्या जातीचा कुत्रा घ्यावा, ह्याचा शोध घेतांना ही पुस्तके मिळाली.

बाद्वे,

प्राणी पाळणे हे एक शास्त्र आणि कला आहे.केवळ पुस्तके वाचून आणी माहिती मिळवून हे ज्ञान कृतीत आणता येत नाही.

आता नाशकात आलो की, मार्गीला भेटायला नक्की येवू.

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 4:28 pm | उगा काहितरीच

हॅरी पॉटर मधले एक वाक्य आहे... छडीच आपला जादूगार निवडते.

बर्‍याचदा कुत्रांच्या बाबतीत पण हा अनुभव येतो.

यावर आधारीत "हाचिको - ए डॉग स्टोरी" नावाचा एक नितांत सुंदर चित्रपट आहे. बघितला नसेल तर जरूर बघावा. रच्याकने कधी कुत्रा पाळला तर नाव काय ठेवायचे हे फिक्स आहे . १) हाची किंवा फ्लपी (होय तोच ३ डोक्याचा कुत्रा )

मम्बाजी सर्वज्ञ's picture

9 Feb 2016 - 7:01 pm | मम्बाजी सर्वज्ञ

'हाचिको' जपानी पिक्चर-स्टोरी आहे. जरूर पहा. सत्यघटनेवर आधारित आहे. जरूर पहा.
टिशू पेपर्स चा डबा घेऊन बसा!

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 4:32 pm | संदीप डांगे

छडीच आपला जादूगार निवडते >> अगदी. +१००

केवळ पुस्तके वाचून आणी माहिती मिळवून हे ज्ञान कृतीत आणता येत नाही.
>> ते तर आहे. पण आजुबाजुला कोणी जाणकार नाहीत, कित्येकदा आपल्या अज्ञानीपणामुळे (खायला घालण्यातल्या चुका, अस्वच्छता, इ.) त्यांचा जीव धोक्यात घालतो त्याची भीती वाटते. कुठे तरी मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळालीतर वेळ वाचतो, पाळीव-पालक दोघांना सोयिस्कर ठरतं. अशावेळी पुस्तकं बरी पडतात.

बाकी, प्रत्येक जीव हा एक इन्डीविज्युअल पर्सनॅलिटी असल्याने त्याच्यासोबत राहुनच तो कसा आहे हे कळतं, जसं कळत जातं तसं नातं फुलत जातं.

मीता's picture

9 Feb 2016 - 3:00 pm | मीता

:)

अप्पा जोगळेकर's picture

9 Feb 2016 - 3:40 pm | अप्पा जोगळेकर

शी घराबाहेर जाऊन करते.
अहो मग उलट घरात करायला शिकवा. म्हणजे संडासात.
मी पाहिलेले ९० % श्वान मालक शी घराबाहेर करतात म्हणून् कौतुक करत असतात. पण एकजणसुद्धा ती शी उचलेल तर शपथ.

संदीप डांगे's picture

9 Feb 2016 - 3:48 pm | संदीप डांगे

अहो अप्पा, घराबाहेर म्हणजे आमच्याच आवारात. आवार मोठं आहे. थोडी मोठी झाल्यावर तिची सोय आवारातच असणार आहे. त्यामुळे शीशू ची एक जागा ठरवून द्यायला लागेल. सध्या तरी ती विष्ठा झाडांच्या जमीनीखाली जाते खत व्हायला. पुढे व्यवस्थित प्लानिंग करुन एकच सवय लावायला लागेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 11:47 am | कैलासवासी सोन्याबापु

उगाच वाचले!! जखमेवरची खपली निघाली राव!! आमच्याघरी जर्मन शेफर्ड होते, सिंगल कोट! तूफ़ान हुशार कुत्री असतात, सद्धया अमरावतीच्या घरी काका कड़े एक लैब्राडोर, एक दालमेशियन आहे विलक्षण मायाळु असतात अन भो**ची मन कुरतडून खातात इहलोक सोडुन गेल्यावर, मागच्या वर्षी बहिणीचे लग्न झाले तेव्हा तिला एक आठवडा सासर (नागपुर) ते अमरावती वाऱ्या करायला लागल्या होत्या भाकरी खाऊ घालायला त्यांना :'( घरी गेलो सुट्टीमधे कधी तर पहिले भुकुन घर डोक्यावर घेणार अन नंतर चाटुन काढणार ! :)

जमल्यास लॅब्रॅडॉरचे पण अनुभव लिहा की...

"उगाच वाचले!! जखमेवरची खपली निघाली राव!!"

ह्या बद्दल मनापासून दिलगीर आहे.मी तुमची अवस्था समजू शकतो, कारण त्याच स्थितीतून मी पण गेलेलो आहे. आमची आधीची लॅबू ("स्वीटी" नावाची लॅब्रेडॉर)देवाने परत नेली.भेंडी घरात करमेना, बायकोने माझी ही दयनिय अवस्था बघून लगेच एक बीगलू घरी आणले.

असो,

कुत्रा देवाने नेला, की भयानक मानसिक हाल होतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 12:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

आमचे ध्यान, वय ६ महीने असतानाचा फोटु, अर्थात चर्चा लॅबची सुरु आहे पण आम्हाला मोह आवरला नाही तस्मात् क्षमस्व ___/\___

लैब्राडोर बद्दल खुप काही आहे लिहिण्यासारखे थोड्यावेळात देतो आमच्या मेगाबायटी आठवणी

अन्नू's picture

9 Feb 2016 - 12:30 pm | अन्नू

आमचे ध्यान
Smiley
इतका रागराग करनं बरं नै. ;)
आमच्याकडेसुद्धा अशाच चेहरेपट्टीची हसमुख 'लुई' होती.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 6:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमचं कुत्रं लैच जास्त बिलंदर होतं! आम्ही विहिरिवर पोरे पोरे अंघोळीला बसलो की तोंडात पाइप धरून पाणी उडवी ग़ुलाम अंगावर!! एकदा आळीतल्या एकाच्या घरात शिरलं मस्ती करता करता अन काय तरी तोंडात घेऊन पळालं! जरा धावत गेलं अन तो ऐवज काय होता तो तिठ्यावर टाकून घरात जाऊन दडी मारली! आम्ही कुतुहलाने बघता ते त्या मनुष्याने आणलेले पिवळे साहित्य होते :D :D

आम्ही १६ पोरे अन हा सतरावा खेळगड़ी असे आमचा

इतपत चालतंय हो....

बीगल नंतर अल्सेशियनच घ्यायचा विचार होता. आता तुम्ही आहात म्हटल्यावर आमच्या धाग्यात तुमच्या अनुभवांची पण भर पडेल.

सगळ्यात ग्रेसफूल कुत्र म्हणजे "अल्सेशियन."------च्यामारी, आम्ही पण अल्सेशियन बद्दल बोलायला लागलो.आता थांबतो.

अन्नू's picture

9 Feb 2016 - 11:52 am | अन्नू

लहान मुलासारखी त्याची देखभाल करावी लागते हे खरं आहे.
शिवाय बाळंतपणातच नाही तर इतर बारिक-सारीक आजारातही पशुवैद्य हा गरजेचा असतो. आमच्याकडे असलेली कुत्री अशाच चुकीच्या वैद्यकीय ट्रीटमेंटने मरण पावली! :(

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 12:40 pm | मुक्त विहारि

अशाच चुकीच्या वैद्यकीय ट्रीटमेंटने मरण पावली!"

आमची बाळंतपणात मरता-मरता वाचली.बिचारीची पिल्ले पण गेली आणि गर्भाशय पण काढायला लागले.

सुनील's picture

9 Feb 2016 - 12:10 pm | सुनील

वाचतोय.

थोडी कायदेशीर बाजू - तुमच्या श्वानाची सरकार-दरबारी नोंदणी करून घ्या. सदर नोंदणीचे दर वर्षी नूतनीकरण करणे जरूरीचे असते. त्यासाठी श्वानाचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

आणि आता थोडे केनेल (श्वानाच्या लॉजिंगविषयी) - सदा सर्वकाळ घरात कुणी असणे नेहेमीच शक्य होत नसते. तुम्हाला जर दोन-चार दिवसांकरीता स्वतःच्या वाहनाने जायचे असेल तर, श्वानास घेऊन जाणे श्रेयस्कर. श्वानप्रेमी हॉटेल्स/रेसॉर्ट्स कमी आहेत, पण आहेत.

परंतु त्यापेक्षा जास्त दिवस वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जायचे असेल तर, श्वानास चांगल्या केनेलमध्ये सोडून जाणे उत्तम. त्यासाठी जवळपासची सगळी केनेल प्रत्यक्ष पाहून घेणेच योग्य. सोसायतीतील अन्य श्वानपालक याबाबतीत अधिक मार्गदर्शन करू शकतील.

पुलेप्र

(एका गोल्डन रिट्रिवरचा पालक)

अन्नू's picture

9 Feb 2016 - 12:22 pm | अन्नू

एक महत्त्वाचं- श्वानांचा वैद्य आणि जनावरांचा वैद्य यात जमिन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे गफलत करुन घेऊ नका.

गॅरी ट्रुमन's picture

9 Feb 2016 - 12:23 pm | गॅरी ट्रुमन

मस्त लेख. पुढील लेखासाठी शुभेच्छा.

सध्या कुत्र्यांची काळजी घ्यायला लागणारा वेळ नसल्यामुळे कुत्रा पाळता येत नाही. पण जेव्हा ते शक्य होईल तेव्हा घरी माणसांपेक्षा कुत्रे जास्त असावेत असे नेहमी वाटते. बघू कधी शक्य होते ते. जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा मुविकाकांचा हा (आणि पुढचे) लेख उपयोगी होतील म्हणून वाचनखूण साठवत आहे.

(कुत्र्यांची महाप्रचंड आवड असलेला) ट्रुमन

कुत्रा पाळता येत नाही...."

असे असेल तर अजिबात घेवू नका.सुरुवातीचे २-३ दिवस गेले की, घरच्यांची आणि कुत्र्यांची, दोघांचीही फरफट होते.

आमच्या ओळखीतल्या एकाने, आमचे बघून कुत्री घरात आणली.एक-दोन आठवड्यांनी तो मला ती फुकट द्यायला तयार होता.पण त्यावेळी मला २-२ कुत्री एकावेळी पाळणे शक्य न्हवते.पुढे त्याने ती कुत्री एका फार्मवाल्याला दिली.

अगदी कामाच्या वेळी आलेला महत्त्वाचा धागा. दहा बारा खोल्यांच्या भल्यामोठ्या घरात मी राहते. इतके दिवस गरज वाटली नाही पण हल्ली संरक्षक कुत्रा असणे गरजेचे वाटायला लागले आहे.कारण अंगणात कोण शिरले ते घरात पत्ता लागत नाही.
सध्या घरात हीच माहिती मिळवणे कार्यक्रम सुरु आहे.मोठी अडचण म्हणजे कायम घरात कोणीतरी असणे.मी परदेशात गेलेले असले तर राहत्या ठिकाणी श्वान डाॅ नाही(व्हिजिटिंग येतात) आणि केनेल पण.या मुद्द्यावर अडून बसलो आहोत :(

कपिलमुनी's picture

9 Feb 2016 - 12:46 pm | कपिलमुनी

कुत्रा पाळताना आपण स्वीकारत असलेला व्रत १२-१५ वर्षे चालणार आहे याची पूर्वकल्पना असावी.

मला कुत्रा खुप आवडतो पण फ्लॅटमध्ये तो न पाळण्यामागची काही कारणे आहेत.
१. कुत्र्याचे स्पेधली लॅबचे गळणारे प्रचंड केस आणि त्यामुळे होणारे आजार.
लॅबचे केस सोफा, बसेल तिथे किंवा , भिंतीला अंग घासेल तिथे गळतात, वार्‍याने घरभर होतात. त्यामुळे घरात लहान मूल असेल तर याचा त्रास होउ शकतो . ह्या केसाचे तंतूमुळे इतर काही आजार होउ शकतात का याची माहिती डॉक देतीलच.
२.लाळ आणी इतर स्त्राव : माणसाप्रमाणे कुत्राचेही नैसर्गिक स्राव असतात त्यामुळे त्यांची स्वछता महत्वाची तसेच यामुळे आपल्याला काही आजर होउ नये याची काळजी घ्यावी.
३.रात्रीची झोप ; कुत्रा वेळ मिळेल तसा थोडा थोडा झोपु शकतो (दुपारी) पण रात्री पूर्ण ६-७ तास झोपेल याची खात्री नाही. कधी कधी तो घरात फिरतो आणि बांधलेला असेल तर भुंकून अस्तित्वाची जाणीव करू शकतो.
४. बाहेरगावी जाणे : कुत्र्यांचे होस्टेल जवळ असेल तर उत्तमच किंवा एखाद्या शेजार्‍याची / जवळ रहाणार्‍याची सवय लहानपणापासून लावावी असे न झाल्यास तुम्हाला परगावी जाताना प्रचंड त्रास होइल.
५.सहकारी सोसायटीची धोरणामधे कुत्रा पाळायची परवानगी आहे क ते पहा.

६. कुत्रा खूप प्रेमळ असतात , कुत्रा जीव लावतो , खेळतो बागडतो मोठा होतो आणि मरतो !त्याचा खूप त्रास होतो. शक्य झाल्यास मी माझ्या शेवटच्या दिवसांमधे कुत्रा पाळेन म्हणजे त्याला वाईट वाटेल मला नाही.

कपिलमुनी's picture

9 Feb 2016 - 1:35 pm | कपिलमुनी

६ वा पॉंईट उधारीचा आहे , कुणाचा ते आठवत नै सध्या

ब़जरबट्टू's picture

9 Feb 2016 - 2:56 pm | ब़जरबट्टू

गाविंचा आहे. कालेज सिरीज होती ती बघा... :)

राजो's picture

11 Feb 2016 - 7:03 pm | राजो

हा धागा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2016 - 3:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुत्रा खूप प्रेमळ असतात , कुत्रा जीव लावतो , खेळतो बागडतो मोठा होतो आणि मरतो !त्याचा खूप त्रास होतो. शक्य झाल्यास मी माझ्या शेवटच्या दिवसांमधे कुत्रा पाळेन म्हणजे त्याला वाईट वाटेल मला नाही.

रस्त्यावरचं सापडलेल्या गबरूपासून पपामेरियन, लेब्राडोर, जर्मनसेफर्ड गेली पंधरा वर्षापासून पाळली आहेत, घरातल्या लोकांनी शी शु चं लहान मुलासारखं केलं आहे, आजारी पडतात, जखमा होतात ते प्रचंड त्रासदायक काम असतं आताच जर्मन शेफर्ड कुत्री मरण पावली. कुत्री मरण पावल्या नंतरचा त्रास प्रचंड होतो. सध्या माझी कुत्री पाळण्याची हौस संपली आहे, माहिती नाही कुत्री पाळायची नाहीत असा पण किती दिवस टिकून राहतो.

-दिलीप बिरुटे

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 12:57 pm | उगा काहितरीच

चांगला विषय. अशी एकत्रितपणे माहिती हवीच होती. आत्तापर्यंत तरी अनुभव नाही श्वानांचा (कुत्रा लिहावासं वाटलं नाही) पण इच्छा आहे . पण मला मोठ्या श्वानापेक्षा पग वगैरे आवडतात.

मुवी.. उत्तम लेख.. थोडे फोटो टाका. फोटो असले की लेखातली माहिती वाचताना आणखी मजा येते.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 1:26 pm | मुक्त विहारि

का कुणास ठावूक, पण आमचा संगणक आम्हाला फोटो डकवायला मदत करत नाही आहे.

कंजूस's picture

9 Feb 2016 - 1:05 pm | कंजूस

उत्तम लेख.
ब्लॅाकमध्ये कायम कुत्रा ठेवणे अशक्य आहे पण कुत्रा आवडतो.तेव्हा उसनी हौस -

आई ग्गं! लॅबू कसला गोडुला आहे!

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Feb 2016 - 1:34 pm | बिपिन कार्यकर्ते

भूभूचा धागा आणि प्रकाश घाटपांडे धाग्यावर आले नाहीत तर धागा वाया जाईल. त्याला लिंक देतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2016 - 3:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटपांडे यांनी मला पुस्तक पाठवलं होतं ती आठवण येतेच आमचा एक जुना धागा http://mr.upakram.org/node/1077

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Feb 2016 - 6:16 pm | बिपिन कार्यकर्ते

प्राडॉ... जुन्या धाग्यांच्या आठवणी आल्या.

http://www.manogat.com/node/10948 ही मनोगतावरील लेखमालिका लीजंड आहे. सर्वांनी आवर्जून वाचावी अशी.

स्वाती दिनेश's picture

27 Feb 2016 - 12:14 am | स्वाती दिनेश

मलाही तेच आठवले,
मु वि.. वाचते आहे. अनेक आठवणी ताज्या होत आहेत.
स्वाती

पैसा's picture

9 Feb 2016 - 1:39 pm | पैसा

छान अत्यंत माहितीपूर्ण धागा, मालिका. आधी मुलांचे संगोपन यावर मुविंची सुरेख मालिका आली होती.

अशा बर्‍याच जखमा उरात लपवल्या आहेत. त्यामुळे या धाग्यावर इतकेच.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 2:01 pm | मुक्त विहारि

ह्या कुत्र्यांचे पण संगोपन करावे लागते.जमल्यास तुमचे पण ह्या कुत्र्यांच्या संगोपनातले अनुभव लिहिलेत तर अजून एक सुंदर लेखमाला तयार होईल.

२-३ वर्षांनी मुले बोलायला लागतात, तर कुत्री घरात आणून २-३ दिवस होत नाहीत तोच त्यांच्या शारीरिक हालचालींनी संवाद साधायला बघतात.

संवाद साधायची अक्कल कुठून शिकतात कुणास ठावूक.

आमचे सासरे वारले, त्या सुमारास कुत्री आमच्या बरोबर सासर्‍यांकडेच होती.त्या दिवशी तिची जेवायची वेळ झाली तरी, तिने घरात हलकल्लोळ केला नाही.एरवी तिच्या त्या ठराविक वेळेला अन्न नाही मिळाले तर, थोडी भुंकायची.

स्वगत : माणसांना जर ही संवाद साधायची कला आली, तर किती उत्तम होईल.

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Feb 2016 - 1:56 pm | माम्लेदारचा पन्खा

माणसांपेक्षा तेच जास्त आवडतात... निष्कपट.. निर्व्याज आणी कुठलीही अपेक्षा न करणारे आणी तरीही भरभरून प्रेम करणारे...आपलीच लायकी नाही असं प्रेम करून घ्यायची असं नेहमी वाटतं !

प्रमोद देर्देकर's picture

9 Feb 2016 - 2:02 pm | प्रमोद देर्देकर

मीही तेच म्हणतोय मु.वी. साहेब प्रत्येक कुत्र्याविषयी माहिती देताना कृपया त्या त्या जातीच्या कुत्र्याचे छायाचित्र द्यावे. आम्हाला तर कोणत्या जातीची आहेत ते ओळखु येत नाही हीच गोची आहे.

पण ह्या काही लिंक्स अर्थात फक्त लॅब्रेडॉरच्या.....

लॅबूचे फोटो

http://www.pbase.com/woodmist/labradors

http://www.dogbreedinfo.com/labradorphotos.htm

लॅबूच्या क्लिप्स

https://www.youtube.com/watch?v=Q1qwD3ArWxc

सच्चा सोबती नावाचं एक पुस्तक आहे. ते वाचलंयत का? सुरेख आहे. हाच विषय.

शान्तिप्रिय's picture

9 Feb 2016 - 2:12 pm | शान्तिप्रिय

छान लेख.
या विषयावर मिपावर पहिल्यांदाच हा लेख वाचतोय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Feb 2016 - 2:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

वाचतोय!! लहानपणी मी पहिलीत असताना आजीने एक गावठी कुत्र्याचे पिलु घरी आणले होते. वर्षभर ते राहिले, त्याचे आजारपण लसीकरण वगैरे करताना मी पण बरेच काही शिकलो.घरचेही बर्‍यापैकी सहकार्य करत होते. पण एक दिवस आमची कामवाली बाई म्हणाली कि मी याला घेउन जाते.तिचे मोठे घर शेत वगैरे होते. मग घरचे फार मागे लागले आणि ती ते घेउन गेली.साला फार वाईट वाटले. पण करतो काय? मग दर ६-८ महिन्यानी त्याला भेटायला जाणे हा एक कार्यक्रमच होउन बसला.त्यानेही मस्त ओळख ठेवली होती. यथावकाश शाळा अभ्यास वगैरे वाढले आणि ते प्रकरण मागे पडले. नंतरही २-४ वेळा प्रयत्न केला पण एकही कुत्रे टिकले नाही घरी.
आता मुलगा कधी कधी म्हणतो कुत्रा आणुया, पण फ्लॅटमधे जागेची कमतरता आणि कुत्र्याचे केस गळण्याने होणारे संभाव्य रोग लक्षात घेता हिंमत होत नाही.

फ्लॅट साठी बीगल नामक कुत्रा उत्तम...सध्या माझ्याकडे तीच जात आहे.

मुलाला कुत्र्यांच्या केसाची अ‍ॅलर्जी असेल तर, कुठलाच कुत्रा घेवू नका.

साप जसा कात टाकतो, तसेच कुत्र्यांचे केस गळतातच.

प्रत्येक प्राण्यामध्ये काही तरी दोष असतातच, पण आपल्याला जर कुत्रा पाळणे उपयुक्त वाटत असेल तर, कुत्रा जरूर पाळा.

वैधानिक इशारा :

मुले काही ठराविक वर्षांपर्यंत कुत्रा पाळायचा हट्ट करतात, पण पुढे त्या कुत्र्यांचे संगोपन पालकांनाच करावे लागते ही १००% वस्तुस्थिती आहे.

मोदक's picture

9 Feb 2016 - 2:50 pm | मोदक

हा बीगलच आहे का?

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 2:54 pm | मुक्त विहारि

हा बीगलच.

बीगल बाबत सध्या तरी इतकेच.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 4:35 pm | मुक्त विहारि

आमचे बीगलू फार नशीबाने (आमच्या) घरी आले.

पद्मावति's picture

9 Feb 2016 - 3:06 pm | पद्मावति

कुत्रा खूप प्रेमळ असतात , कुत्रा जीव लावतो , खेळतो बागडतो मोठा होतो आणि मरतो !त्याचा खूप त्रास होतो. शक्य झाल्यास मी माझ्या शेवटच्या दिवसांमधे कुत्रा पाळेन म्हणजे त्याला वाईट वाटेल मला नाही.

....+१००००००० अगदी हेच आणि असंच म्हणायचे आहे..

मीता's picture

9 Feb 2016 - 3:16 pm | मीता

t

उगा काहितरीच's picture

9 Feb 2016 - 3:52 pm | उगा काहितरीच

मस्त आहे लोला. एक सल्ला द्यावासा वाटतोय - कुत्र्याला सहसा फरशीवर ठेवू नका. पाय वाकडे होतात त्यांचे . आमच्या घरच्या कुत्र्याचे पाय वाकडे झाले होते. आम्ही फरशीवर पोतं वगैरे टाकत होतो. तरीही त्याचे पाय वाकडे झालेच. जाणकार अधिक माहिती देतीलच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2016 - 4:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तय लोला. लो.

-दिलीप बिरुटे

लोला नाही देणार ..तशीच दुसरी देईन गिफ्ट .. :P

यशोधरा's picture

9 Feb 2016 - 6:36 pm | यशोधरा

झिप्री लोला छान दिसतेय!

मुक्त विहारि's picture

10 Feb 2016 - 4:35 pm | मुक्त विहारि

एकदम गोड दिसत आहे.

पद्मावति's picture

9 Feb 2016 - 3:22 pm | पद्मावति

awww.....क्यूट!!

अप्पा जोगळेकर's picture

9 Feb 2016 - 3:43 pm | अप्पा जोगळेकर

अत्यंत हिडीस जनावर आहे हे वैयक्तिक मत. बाकी चालू द्या.
- कुत्र्यांचा कर्दनकाळ

आप्पा : प्रतिसाद द्यायची इच्छा नव्हती .पण तरीही.. तुम्हाला कोणीही या धाग्यावर प्रतिसाद द्या म्हणून आमंत्रण दिलेले नाही तस्मात तुमच्या बहुमोल प्रतिक्रिया स्वतःकडे ठेवाव्यात .

अप्पा जोगळेकर's picture

9 Feb 2016 - 5:02 pm | अप्पा जोगळेकर

ओके. Sorry शक्तिमान.

धागा काढायला जितके लेखन स्वातंत्र्य आहे, तितकेच वाद-प्रतिवाद करायला हवे.

हे वाद-प्रतिवाद सुसंवादाकडे जात असतील तर उत्तमच.

प्रत्येक नाण्याला किमान २ बाजू असतातच.एखाद्याने दुसरी बाजू मांडली तरी हरकत नाही.

मी घरात पहिली कुत्री देवाघरी गेल्या बरोब्बर, दुसरी कुत्री आणल्यापासून, माझे माता-पिता अद्याप माझ्या घरी आलेले नाहीत.असतो एकेकाचा स्वभाव.

आपण माफी मागायची आणि मोकळे व्हायचे.

मुक्त विहारि's picture

9 Feb 2016 - 4:23 pm | मुक्त विहारि

मला स्वतःला ३ वेळा कुत्री चावली आहेत. ३ही वेळा स्वतःच्या पैशाने इंजेक्शने घ्यायला लागली आहेत. त्यापैकी २वेळा पोटात.

३ही वेळा चूकी माझी होती.

स्वतःची चूक ओळखून दुरुस्त केली की बर्‍याच वेळा प्रॉब्लेम सुटतो.

माझ्या मते तरी ह्या जगातला अत्यंत हिडिस प्राणी म्हणजे माणूस. अ‍ॅटमबाँब काय बनवतील, सगळ्या पृथ्वीवर कचरा काय करतील आणि तरी पण ह्या मानवाची कचरा करायची हौस काही भागत नाही म्हणून मग अंतराळात कचरा करतील, आपलाच देव श्रेष्ठ म्हणून एकमेकांचे गळे काय कापतील आणि पोट भरले तरी बाहेर जावून चटकमटक खात बसेल.

असो,

कुत्राच कशाला कुठलाही प्राणी पाळला तरी मानवाच्या दुर्गुणापुढे, प्राण्यांचे दुर्गुण पण सौम्यच वाटतात.

गॅरी ट्रुमन's picture

9 Feb 2016 - 9:49 pm | गॅरी ट्रुमन

कुत्राच कशाला कुठलाही प्राणी पाळला तरी मानवाच्या दुर्गुणापुढे, प्राण्यांचे दुर्गुण पण सौम्यच वाटतात.

अगदी अनंतवेळा सहमत. प्राणी बिचारे निसर्गाने त्यांना बनविले आहे तसेच आणि त्याप्रमाणेच राहतात. आपण जे नाही ते आहोत हे दाखवायचा ढोंगी प्रयत्न करत नाहीत ते. त्याची मोनोपॉली माणसाकडेच.

कुत्राच कशाला कुठलाही प्राणी पाळला तरी मानवाच्या दुर्गुणापुढे, प्राण्यांचे दुर्गुण पण सौम्यच वाटतात.
१००% सहमत

अप्पासाहेब जरा पोलिसांची डायरी काढ़ा व् वाचा.कुत्रा असलेल्या घरात चोरीचे प्रमाण नगण्य असते पण तेच वाचमैन असलेल्या घरात, सोसायटीत चांगल्यापैकी असते कारण पुष्कळदा हे राखणदारच टीप देतात. मी आतापर्यन्त लैब,अल्शेशियन,रोट्विलर,पामेरियन(पोमीरिणीयन) गावठी अशी अनेक कुत्रि पाळली आहेत. तुमच्या धोतराचा टुकड़ा एखाद्या श्वानाने फाड़ला असेल तर तुम्ही बाकीच्याना का दोष देत आहात? पुढे सांभाळून नाहीतर एखादे श्वान हां प्रतिसाद लक्षात ठेवेल आणि गटारी साजरी करेल तुमच्याबरोबर, म्हणजे लचका तोडेल हो

अन्नू's picture

9 Feb 2016 - 5:09 pm | अन्नू

बघा माणसं तरी इतकं ऐकतात का ते-

पद्मावति's picture

9 Feb 2016 - 6:34 pm | पद्मावति

आई गं.... कसली गोड बाळे आहेत!!!!
जेवायला तोंड लावण्याआधी पटकन वदनी कवळ म्हणतील की काय असे वाटत होतं :)

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Feb 2016 - 6:37 pm | बिपिन कार्यकर्ते
पद्मावति's picture

9 Feb 2016 - 6:52 pm | पद्मावति

ही ही ही ....हे अल्टिमेट आहे :)

प्रमोद देर्देकर's picture

10 Feb 2016 - 11:04 am | प्रमोद देर्देकर

कसलं अल्टीमेट साला इथे मात्र राग येतो. ती ऐकतात म्हणुन काहीही. हेच जर का उलटं केलं तर म्हणजे त्यांनी या माणासाच्या गळ्यात पट्टा बांधुन त्याच्या समोर जिल्बीचे ताट ठेवायचे आणि लाळ टपकली तरी तोंड लाव असे सांगायचेच नाही. वदनी कवळं तर हाईटच आहे काय तरी करायला लावतात.

अन्नू's picture

10 Feb 2016 - 11:30 am | अन्नू

हे घ्या- खास तुमच्यासाठी बिगर लाळ गाळणारं कुत्रं ;)

मुक्त विहारि's picture

10 Feb 2016 - 4:24 pm | मुक्त विहारि

पाळीव प्राण्याला ह्या अशा मुलभूत गोष्टी शिकवणे भाग आहे.

तुमच्याकडे पाहूणे आले असतांना कुत्र्यांनीच कशाला, आपल्या दीडवर्षाच्या मुलाने त्या पाहुण्याच्या ताटात तोंड घातले किंवा पटकन त्यांना एखादी चपराक दिली, तरी आपल्याला खजील व्हायला होते.

आपण आपल्या मुलांना जशा शी-शू-जेवतांना न सांडणे-पाहूणे आल्यावर नमस्कार करणे अशी गोष्टी शिकवतो, तसेच हे आहे.

काही काही पालक जसे आपल्या २ वर्षाच्या मुलाला लुंगी डान्स करायला लावतात, तसेच काही काही श्र्वान मालक (श्र्वान पालक नाही, श्र्वान पालक ह्या अशा वेड्या-वाकड्या गोष्टी करत नाही.) आपापल्या कुत्र्यां कडून अशा गोष्टी करून घेतो.

छान आहे गं लोला! भोंडल्याचं गाणं आठवलं झिप्र्या कुत्र्याला बांधा गं बाई!

निखिल बेके's picture

9 Feb 2016 - 4:45 pm | निखिल बेके

ब्रायन ग्राफीन हा लैब्रेडॉर आहे,आणि स्नूपी बीगल.
गोल्डन रिट्रीवर ह्या देखण्या जमातीविषयी अजून वाचायला आवडेल.

अद्द्या's picture

9 Feb 2016 - 4:48 pm | अद्द्या

अत्यंत वाईट अनुभव दिलेत या प्राण्याने . जिवंत असताना नाही .. मरताना .
गेल्या जन्मीचं कर्ज असल्या सारखं वर्ष भर सगळे लाड करवून घेतले. मग कोणा हराम्याने विष दिलं .
साधा गावठी कुत्रा.. पण शेवटी तो कुत्राच .. लळा लावतोच. कुठल्या जातीचा आहे याने काही फरक पडत नाही .

असो . पुन्हा कधी तरी एखादा दणकट जर्मन शेफर्ड किंवा लॅब्रेडॉर सांभाळायची इच्छा आहे (पाळायची म्हणणार नाही . कारण मग एक गुलामीचा वास येतो त्याला ) .

बाकी लेख मला आवर्जून वाचेनच .

मस्त लेख

अद्द्या कधी फ्रेंच मास्टीफ सांभाळावे वाटले तर सांग. चिपवाली फिमेल २०१५ शो विनर आहे. तिचे एक कुलदिपक नाममात्र किमतीत देईन.

(ते फक्त अस्सल ऑल्डमाँक वाल्यालाच द्यायचेय.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 6:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

फ्रेंच मास्टिफ अन नेपोलियन मास्टिफ वेगवेगळे असतात का? नेपोलियन मास्टिफ म्हणजे बहुतेक ते हैरी पॉटर मधील हैग्रिड चे अंगावर वळ्या वळ्या असणारे भू भू असते "fang"

अभ्या..'s picture

9 Feb 2016 - 6:33 pm | अभ्या..

हा. गुगल्या सर्च हा.
FM हे फ्रेन्च मास्टीफ
NM हे नेपोलियन मास्टीफ.
एकच तमन्ना आता. कारवानी. उस्मानाबादला हाय एका मित्राकडे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 6:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

गोंदवल्याला एका मित्राचा चुलता राहतो त्याच्याकडे अस्सल कारवानी कुत्री होती डॉली लैच भारी जात ! लांब तोंड अन शेलाटे अंग! रानात पाखरू बसु देणार नाही! जमल्यास एकदा रामपुर हाउंड सर्च कर भावा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Feb 2016 - 5:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

साली कुत्री आणि मांजरं हरामखोर असतात.ल़ळा लावतात आणि एक दिवस फटकन मरतात ॓_॓!!!!

अप्पा जोगळेकर's picture

9 Feb 2016 - 5:55 pm | अप्पा जोगळेकर

सीएम्सी मध्ये असताना रात्री सेकंद शिफ़्ट मध्ये होतो तेव्हापासून दुष्मनी आहे या जनावराशी.
पाळीव असेल तर उगाच अंगालगत येत राहते आणि त्याचे घाणेरडे केस आपल्या अंगाला चिकटतात. शिवाय श्वान प्रेमी अहो काही करत नाही हो तो म्हणून त्याला आवरण्याऐवजी कौतुक करत राहतात. सकाळी धावायला जावे तर यांचे मलमूत्र विसर्जन मालकाच्या देखत रस्त्यावर चालू असते.
एक कहर मालक तर 'चल मोंटी, कर बघू श्श्श्श्श्श्श्ह्श्श्स्श' करायचा.
शिवाय त्यांचे ते विष्ठ खाणे, कचरा पसरून ठेवणे, दुचाकिस्वारांच्या अपघातास कारण होणे, चावल्यावर इंजेक्शन घ्यावे लागणे आणि जाहीर संभोग किळस आणतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 6:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

च्यायला जाहिर संभोग करणाऱ्या प्राण्यात काय कुत्रीच आहेत होय फ़क्त ! काहीही राव! वाड़ीवस्तीला लहानपण गेले आमचे, तिथे तर कोंबड्या कुत्री म्हशी गाई मांजरी सगळ्यांचे लाग पाहुन आहोत! आम्ही तर मग जुमानजी मधल्या त्या मिशाळ इंग्रज शिकार्या सारखे डबल बोर घेऊन बाहेर पडायला पाहिजे शिकारीला!!

कसंय न मालक "Nature is naked man makes it NUDE" हे वाक्य पोचले अन पचले तर विचार करा थोडा त्यावर! बाकी कारणे ग्राह्य धरली जाऊ शकतात कुत्री द्वेषाला तुमच्या बाकी हे संभोग वाले तर काहीतरीच आहे बळंच

हेच म्हणनार होतो. ते उघड्यावर संभोग करणार नाहीतर कुठे करणार..

टिनटिन's picture

9 Feb 2016 - 6:28 pm | टिनटिन

काही फेमस उदाहरणे पण द्या जमल्यास. उदा. जन्जीर कोणत्या ब्रीडचा होता ? द मास्क मधील मायलो .....

भंकस बाबा's picture

9 Feb 2016 - 7:03 pm | भंकस बाबा

जंजीर लैब्राडोर जातीचा कुत्रा होता, ही जात स्निफर (हुंगुन वास काढणार) म्हणुन ओळखली जाते. जमिनिखाली ८ फुटापर्यन्त ही जात अमली पदार्थ, आरडीएक्स, स्फोटक् शोधु शकते(नाकाने).
पोलिस खात्यात पहल्यान्दा डोबेरमन ही जात स्निफर डॉग म्हणुन वापरली जायची पण ही जात वन मैन डॉग् म्हणुन ओळखली जाते त्यामुळे व्हायचे काय की त्याचा ट्रेनर बदलला की हे डोबेरमन थोड़े सैरभिर व्हायचे. लैबचे तसे नाही, ते लवकर कुणाबरोबरहि जुळवून घेतात. डोबेरमन, जर्मन शेफर्ड(अल्शेशियन),रोटवीलर , ग्रेट डेन , हे गार्ड डॉग म्हणून ओळखले जातात. गोल्डन रिट्रीवर ही जात शिकारिसाठी वापरली जायची. जेव्हा शिकारी बंदुकिने प्राणी जख्मी करायचा तेव्हा हे कुत्रे त्याचा माग काढत ती शिकार तोंडात अलगद पकडून मालकाला आणून द्यायचा. (जोगळेकर वाचताय ना?)

अप्पा जोगळेकर's picture

9 Feb 2016 - 7:35 pm | अप्पा जोगळेकर

कुत्र्याची किळस वाटू नये अशी जबरदस्ती आहे का ? शिवाय अलम दुनिया शिकारी करत फिरत असते हा समज काढून टाका.
- कुत्र्यांचा शिकारी

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Feb 2016 - 7:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

अजिबात नाही ! किळस वाटू शकते त्यात कोणाची कोणाला कश्यासाठी जबरदस्ती असणार फ़क्त कारणे पटण्यालायक असायला हवी! ती पण तुम्ही स्वतःच दिली आहेत! अन ती अतर्क्य आहेत असे नाही तर त्यातले एक कैच्याकै आहे इतकेच नोंदवले!बाकी तुम्हीच आधीच्या पोस्ट पासुन कुत्र्यांचा कर्दनकाळ अन काय काय स्वाक्षरी केल्यात म्हणुन शिकारीचा रेफेरेंस! तुम्हाला करायचे ते करा पाखरं हुला वा कुत्री मारा आमचे काय जाते!