✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

र
राजेश घासकडवी यांनी
Fri, 12/04/2015 - 22:28  ·  लेख
लेख
भाग १ - काळाचा आवाका ऋग्वेद १०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् । नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् । किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥ न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः । आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥ सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही. धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं. काही झाकलेलं नव्हतं, की लपलेलं नव्हतं. त्या क्षणी ना मृत्यू होता, ना मृत्यूपासून सुटका. एका निर्वात, निरावकाशाने स्वतःला जेव्हा आणलं, आणखी काही काही तिथे नव्हतं. ---- कुठल्यातरी तप्त वायूंची एक तबकडी स्वतःभोवती भिरभिरली. त्यातला मुख्य भाग गुरुत्वाकर्षणाने केंद्राकडे खेचला गेला. हा आपला सूर्य. त्या तबकडीच्या काही भागांत इतर वायू गोळा झाले. त्यांचे जागोजागी गोळे झाले. ते अव्याहतपणे गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती फिरत राहिले. पोटात कमीजास्ती आग राखून ठेवून थिजले. आपापल्या परीने घट्ट-विरळ, ओले-कोरडे, थंड-गरम झाले. हे आपले सूर्यमालेतले ग्रह. त्यातलीच एक आपली पृथ्वी. पृथ्वीच्या उकळत्या लाव्ह्यावर थंड सायी आल्या, त्यांची जमीन झाली. पोटातून निसटणारी वाफ पाणी होऊन जमिनीवर स्थिरावली आणि वातावरणाचं पांघरुण टिकून राहिलं. त्यातच आपल्याला दिसणारी सर्व जीवसृष्टी फुलली. ही गेल्या साडेचार अब्ज वर्षांची कथा आहे. पण मुळात ही तप्त वायूची तबकडी आली कुठून? त्यासाठी आपल्याला अजून मागे जावं लागतं. गेल्या लेखात आपण पृथ्वीच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी एक वाव पसरून उभा राहिलेल्या माणसाची प्रतिमा डोळ्यांसमोर आणली. पण संपूर्ण विश्वाचा उगम बघायचा झाला तर त्या माणसाच्या अलिकडे अजून दोघांना वाव पसरून उभं राहावं लागेल. कारण विश्वाचं वय पृथ्वीच्या वयाच्या जवळपास तिप्पट आहे - १३.८ अब्ज वर्षं. हे वय आपल्याला अगदी अचूकपणे माहीत आहे - त्यातली संभाव्य त्रुटी हजारात पाच इतकीच आहे. आता हे वय कसं मोजलं? हे समजावून घेण्यासाठी आपल्याला महास्फोटाचा सिद्धांत (ज्याला सामान्यपणे बिग बॅंग असं नाव आहे) थोडासा समजावून घ्यावा लागेल. दूरदूरच्या दीर्घिकांचा (आपल्या आकाशगंगेप्रमाणेच इतर तारकासमूहांचा) अभ्यास करताना शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं की प्रत्येक तारकासमूह आपल्या आकाशगंगेपासून दूर दूर चाललेला आहे. हे काहीसं चक्रावून टाकणारं होतं. कारण पृथ्वी हे विश्वाचं केंद्रस्थान नाही, तो एका साध्यासुध्या दीर्घिकेतल्या साध्यासुध्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे हे उघड होऊनही शतकं लोटली होती. मग आता बरोब्बर आपणच केंद्रस्थानी असल्याप्रमाणे विश्व का वागत होतं? थोडी गणितं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तारकासमूह नुसतेच दूर जात आहेत असं नाही, तर जितके लांबचे तितके अधिक वेगाने दूर जात आहेत. याची सांगड कशी लावायची? लवकरच त्यांना उत्तर सापडलं. हे तारकापुंज फक्त आपल्यापासून दूर जात नसून, सगळेच सगळ्यांपासूनच दूर जात आहेत. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर हे विश्वच प्रसरण पावतं आहे. अवकाशाची व्याप्तीच वाढते आहे. गुलाबजाम तळायला टाकला की तो मोठा होतो हे आपण अनुभवलेलं आहे. आता कल्पना करूया की त्या गुलाबजामच्या आतमध्ये सगळीकडे पसरलेले बरेचसे वेलचीचे दाणे आहेत. आपण कुठच्यातरी वेलचीच्या दाण्यावर बसून इतर दाण्यांकडे बघत आहोत अशीही कल्पना करू. जसजसा गुलाबजाम मोठा होत जाईल, तसतसे तुमच्या मागचे पुढचे, वरचे खालचे सर्वच दाणे आपल्यापासून दूर जाताना दिसतील. कारण आख्खा गुलाबजाम फुलतो आहे. आता हा गुलाबजाम म्हणजे संपूर्ण विश्व, त्यातला खवा म्हणजे अवकाश, आणि वेलचीचे दाणे म्हणजे तारकासमूह हे समजून घेतलं की सर्वच तारकासमूह आपल्यापासून दूर का जात आहेत याचं कोडं सुटतं. किंवा हीच कल्पना एका फुग्याचं उदाहरण घेऊनही सांगता येते. समजा, एका फुग्यावर अनेक ठिपके काढलेले आहेत. यापैकी कुठल्याही दोन ठिपक्यांमधलं अंतर फुग्याच्या पृष्ठभागावर रेषा काढून मोजता येतं. आपण जसजसा फुगा फुगवू तसं प्रत्येकच ठिपक्यांच्या जोडीतलं अंतर वाढताना दिसेल. तर विश्व विस्तारतं आहे. याचा अर्थ आपण जसजसं इतिहासात जाऊ तसतसं ते लहान होत जाणार. आणि एक क्षण असा येईल की ते एका बिंदूमध्ये सामावलं असेल. तिथपासून ते आत्तापर्यंतच्या विस्ताराची कथा भौतिकीच्या (फिजिक्सच्या) नियमांच्या आधारे सांगणारा सिद्धांत म्हणजे महास्फोट सिद्धांत - बिग बॅंग थियरी. या सिद्धांताच्या आधारे या स्फोटानंतरच्या अगदी काही मिलीसेकंदांपासून पुढे काय झालं याचं अगदी स्पष्ट टप्प्याटप्प्याचं चित्र मांडण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरलेले आहेत. या मांडणीमुळे अर्थातच 'इतक्या अब्ज वर्षांनी अमुक अमुक गोष्टी दिसतील इतक्या इतक्या प्रमाणात दिसतील' अशा प्रकारची काही भाकितं करता येतात. त्यातली एक म्हणजे विस्ताराचा वेग. एका विशिष्ट प्रकारच्या सुपरनोव्हांचा - अत्यंत प्रखर ताऱ्यांचा - अभ्यास करून हा वेग मोजला. तो बरोब्बर १३.८ अब्ज वर्षांनी जितका असायला हवा तितका आला. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड रेडिएशन वापरून तापमानात होणारे चढउतार मोजले. तेही त्याच सिद्धांताच्या गणितानुसार १३.८ अब्ज वर्षांनी जितके असायला हवे तितकेच आहेत हे दिसून आलं. तसंच तारकासमूहांचं एकमेकांपासूनचं सरासरी अंतर किती असेल याचंही महास्फोट सिद्धांतानुसारचं गणित आणि सध्याचं निरीक्षण यामधूनही १३.८ अब्ज वर्षांचाच आकडा मिळतो. थोडक्यात या सिद्धांताच्या तीन अंगांचा अभ्यास केला तर तिन्हींमधून उत्तर एकच येतं - आणि सत्याशी मिळतंजुळतं ठरतं. यापलिकडे अवकाशात प्रत्यक्षात दिसणाऱ्या अनेक गोष्टींची संगती लागते. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार हायड्रोजन आणि हेलियम विश्वात प्रचंड प्रमाणात असतील आणि तसेच ते दिसतात. 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह रेडिएशन दिसायला हवं' हेही महास्फोट सिद्धांताचं - आता खरं ठरलेलं भाकित आहे. म्हणजे आरोपीच्या हाताचे ठसे शस्त्रावर मिळणं, मृत व्यक्तीच्या कपड्याचे तंतू आरोपीच्या अंगावर सापडणं, शस्त्र विकत घेतल्याची पावती त्याच्याकडे सापडणं असे तीन स्वतंत्र पुरावे सापडले तर आरोपीच खुनी आहे हे ओळखू येतं. त्याहीपलिकडे त्याच्याकडे खून करण्यासाठी सबळ कारण असणं, आधी त्याने धमकी दिलेली असणं, त्या वेळेसाठी त्याच्याकडे दुसरीकडे असण्याचा पुरावा नसणं हेही दिसून आलं तर त्यावर शिक्कामोर्तबच होतं. इतकेच किंवा त्याहूनही अधिक भक्कम पुरावे महास्फोट सिद्धांतासाठी आहेत. याचा अर्थ सगळेच बारीकसारीक प्रश्न सुटलेले आहेत असं नाही. पण म्हणून आत्तापर्यंत सापडलेलं उत्तर टाकून देण्याची पाळी येणार नाही इतकं चांगलं सर्वसाधारण उत्तर सापडलेलं आहे हे निश्चित. पण मग १३.८ अब्ज वर्षांपूर्वी काय होतं? हा महास्फोट का झाला? तो कोणी घडवून आणला का? हे प्रश्न थोडे फसवे आहेत. कारण काळ आणि अवकाशच सुरू होण्याचा तो 'क्षण' आहे. अवकाश म्हणजे काही खरोखरचा गुलाबजाम नाही, जो आधी कोणीतरी तयार करावा लागतो. आख्खं विश्वच त्या एका बिंदूत सामावलेलं होतं. तिथपासून वेळेची मोजणी सुरू झाली. असं असताना 'त्याआधी काय होतं?' हा प्रश्नच निरर्थक ठरतो - शून्याने भाग देण्यासारखा. वर उद्धृत केलेल्या नासदीय सूक्तात म्हटलेलं आहे - 'सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही.' ही न-असण्याची स्थिती आपल्याला डोळ्यासमोर आणता येत नाही. 'धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं.' या वस्तुमान अवकाश नसण्याच्या स्थितीची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. नासदीय सूक्ताच्या कर्त्याला अर्थातच महास्फोट सिद्धांताचं ज्ञान नव्हतं. कारण या कळसापर्यंत पोचण्यासाठी आधी न्यूटन, नंतर आइन्स्टाइन आणि त्यानंतर आलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी बांधलेल्या पाया, पायऱ्या आणि खांबांचा आधार लागतो. जर कोणीतरी काढलेल्या चित्रात आजच्या देवळाच्या कळसासारखा आकार दिसत असेल तर त्यावरून त्याकाळी आख्खं देऊळ होतं असं म्हणणं योग्य ठरत नाही. नासदीय सूक्तातलं वर्णन हे काव्यात्म वर्णन आहे. सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारं आहे इतकंच. शब्दांच्या, भाषेच्या मर्यादा या सूक्तातही जाणवतात - कारण काळच सुरू झालेला नसतानाही तिथे-तेव्हा असे स्थितीकालदर्शक शब्द वापरल्यावाचून त्या परिस्थितीचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात. तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

Book traversal links for विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

  • ‹ विश्वाचे आर्त - भाग १९ - कार्बन डेटिंग
  • Up
  • विश्वाचे आर्त - भाग २० - उत्क्रांतीचे पुरावे - भूस्तरीय अवशेष ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
29414 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

???

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/07/2015 - 23:25 नवीन
लेखाच्या लेखकाने प्रतिसादकांच्या काही गोष्टी मानून व वादविवाद संपल्याचे लिहून झाल्यावरही कोणाला काही प्रतिस्पर्धा आयोजित करायची असेल तर त्याला ही जागा आणि/अथवा वेळ योग्य नाही... किंबहुना अश्या प्रतिस्पर्धेने खाली सांगितलेल्या कारणांमुळे मूळ मुद्द्यांना काहीच फरक पडत नाही ! इथे कोण कोणापेक्षा जास्त ज्ञानी ही चढाओढ नाही आणि कोणाला कोणापेक्षा जास्त डिग्र्या आहेत हा मुद्दा तर अजिबात नाही. (हा मुद्दा इथे कसा काय आला असावा बरे ?!) इथे आणि कोणत्याही वादविवादात "कोणता मुद्दा मांडलेला आहे आणि तो मुद्दा बरोबर आहे की चूक आहे" हा मुख्य मुद्दा असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोणी लिहिले यापेक्षा काय लिहिले हे जास्त महत्वाचे असते... "शास्त्रिय" आणि "सारासार विवेकाने" केलेल्या वादविवादात हे अत्यंत आवश्यक असते असे म्हणतात. आता आमचे शिक्षणच म्हणायचे तर, "आईन्स्टाईननेसुध्दा एखादी चूक केलेली असली तरी तो आईन्स्टाईन आहे म्हणून मान खाली घालून ते बरोबरच आहे असे म्हणायचे नाही", हे आम्ही शिकलोय, शिकवलेय व व्यवहारात पाळत आलोय... हेच सत्य शास्त्रिय जगतात पाळले जात आहे म्हणूनच तर आईन्स्टाईनच्या आणि इतर अनेक अग्रगण्य शास्त्रज्ञांच्या सिद्धांतांत अनेक बदल होऊन ते अधिकाधिक विकसित केले गेले आहेत / केले जात आहेत / केले जातिल. डिग्री, पूर्वओळख इत्यादी पार्श्वभूमीवर व्यक्तीचे / लेखनाचे / कामाचे मुल्यमापन करणे ही केवळ अशास्त्रियच नव्हे तर अनितीकारक पध्दत होईल. माझा असा अंदाज आहे की लेखकाला अश्या प्रकारच्या वादावादीमुळे मिळणार्‍या टीआरपीमध्ये अजिबात रस नसणार... आणि मला इथे गणित-गणित खेळून काही सिद्ध करण्याइतका वेळ अथवा रस नाही. तेव्हा, रामराम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अय्या, अदि तिने लेख वाचलेले

pacificready
Sun, 12/06/2015 - 15:54 नवीन
अय्या, अदि तिने लेख वाचलेले नाहीत काय आधीचे? जुने लेख आहेत बाळा हे. अज्ञानी बालकांच्या उद्धारा साठी लिहिलेले लेख पुन्हा इथे पेस्टवलेत गुरुजींनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खिक्क!

जव्हेरगंज
Sun, 12/06/2015 - 19:57 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

मानवाचा, पृथ्वीचा आणि विश्वाचा निर्माता कोण

नितीनचंद्र
Sun, 12/06/2015 - 06:48 नवीन
मागे डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी दैनिक सकाळ मधे लेखमाला लिहुन "पृथ्वीवरचा माणुस उपरा " याला गती दिली होती. नासदीय सूक्त याच्या ही मागे जाते आणि ब्रह्मांडाच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकु पहाते आहे. मिसळपाव कर यावर गांभिर्याने चर्चा करत आहेत. राजेशसाहेब आपले अभिनंदन. इतर शेरे फारसे विचारात घेऊ नका
  • Log in or register to post comments

"स्फोट होण्यापुर्वी" असे

नगरीनिरंजन
Sun, 12/06/2015 - 13:43 नवीन
"स्फोट होण्यापुर्वी" असे म्हणणे गणिती भाषेत मांडणे अशक्य आहे म्हणून त्या स्थितीला शास्त्रज्ञ "सिंग्युलॅरिटी" असे म्हणतात. सिंग्युलॅरिटी म्हणजे ज्याची कल्पना करणे मानवी बुद्धीला अशक्य आहे ती स्थिती. विश्वाचे सगळे वस्तुमान व ऊर्जा एका बिंदूत सामावले असणे याची कल्पना आपण करु शकत नाही कारण विश्वाच्या व्याख्येनुसार आपण विश्वाबाहेरुन विश्वाकडे पाहू शकत नाही. तरीही मल्टीव्हर्स असणे किंवा आपण एका कॉम्प्युटर सिम्युलेशनमध्ये जगत असण्याची शक्यता किंवा आपले विश्व दुसर्‍या अतिप्रचंड विश्वातला सूक्ष्म भाग असणे वगैरे कल्पनांचे पतंग उडत असतात; पण या कल्पना सिद्ध करणे खूप अवघड आहे. यातल्या कोणत्याही कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य कोणालाही आहेच तसेच देवाच्या कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचेही आहे. त्यासाठी गणिती पुराव्यांना खोटे ठरवणे किंवा सिंग्युलॅरिटीबद्दल बालिश अंदाज करण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments

ननि मार्मिक प्रतिसाद !

मारवा
Sun, 12/06/2015 - 15:07 नवीन
अत्यंत मार्मिक प्रतिसाद ! स्वातंत्र्याशी सहमत आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

"स्फोट होण्यापुर्वी" असे

दत्ता जोशी
Sun, 12/06/2015 - 15:16 नवीन
"स्फोट होण्यापुर्वी" असे म्हणणे गणिती भाषेत मांडणे अशक्य आहे म्हणून त्या स्थितीला शास्त्रज्ञ "सिंग्युलॅरिटी" असे म्हणतात. सिंग्युलॅरिटी म्हणजे ज्याची कल्पना करणे मानवी बुद्धीला अशक्य आहे ती स्थिती.
जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येत नाही, जिला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव नाही ती विज्ञानाला अमान्य असते. "सिंग्युलॅरिटी" - याचा अभिप्रेत अर्थ "एकतत्व" किंवा "अद्वैत" असा आहे. अगम्य असा नाही. "सिंग्युलॅरिटी" ( अद्वैत) आणि ड्युअलिटि ( द्वैत)म्हणजे जे अद्वैत नाही ते किंवा एका पासून वेगळे/ विभिन्न/ विरुद्ध आहे ते. या कल्पना परत तत्व्ज्ञानाकडेच नेतात.
यातल्या कोणत्याही कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य कोणालाही आहेच तसेच देवाच्या कल्पनेवर विश्वास किंवा श्रद्धा ठेवण्याचेही आहे.
धन्यवाद. अनुमोदन. तसेच आपण देव या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही म्हणजे जे विश्वास ठेवतात त्यांना मूर्ख, अडाणी, मागास सम्ज्ण्यचेहि करण नाही. कारण दोन्ही गोष्टी या विश्वासाशी निगडीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सिंग्युलॅरिटी हा शब्द तुम्ही

नगरीनिरंजन
Sun, 12/06/2015 - 16:30 नवीन
सिंग्युलॅरिटी हा शब्द तुम्ही म्हणता त्या अर्थाने वापरला जात नाही आणि सिंग्युलरॅलिटीचा विरुद्ध शब्द ड्युअ‍ॅलिटी नाही एवढेच नमूद करतो. यात द्वैत-अद्वैत वगैरे काहीही अभिप्रेत नाही. the state, fact, quality, or condition of being singular. "he believed in the singularity of all cultures" synonyms: uniqueness, distinctiveness, difference, individuality, particularity a peculiarity or odd trait. plural noun: singularities synonyms: idiosyncrasy, quirk, trait, foible, peculiarity, oddity, eccentricity, abnormality 2. PHYSICSMATHEMATICS a point at which a function takes an infinite value, especially in space–time when matter is infinitely dense, such as at the centre of a black hole. 3. a hypothetical moment in time when artificial intelligence and other technologies have become so advanced that humanity undergoes a dramatic and irreversible change.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

सहमत.

संदीप डांगे
Sun, 12/06/2015 - 16:44 नवीन
सहमत. थोडक्यात 'सिंग्युलॅरिटी म्हणजे अशी स्वयंभू अवस्था आहे, जिच्यात बदल होणे आतल्या-बाहेरच्या कुठल्याही कारणाने, बलाने, पदार्थाने, उर्जेने शक्य नाही. शास्त्रज्ञांच्या समोरचं गुढ हेच की असं काय झाले की बिगबँगची अवस्था निर्माण झाली'. मी जे समजतोय ते बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

डांगे साहेब चहा प्यायचा का?

pacificready
Sun, 12/06/2015 - 17:22 नवीन
डांगे साहेब चहा प्यायचा का? single single घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कॉफी घेऊ. थंड किंवा गरम न

संदीप डांगे
Sun, 12/06/2015 - 18:00 नवीन
कॉफी घेऊ. थंड किंवा गरम न होणारी. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

वरचा माझा प्रतिसाद चुकलाय.

संदीप डांगे
Sun, 12/06/2015 - 18:09 नवीन
वरचा माझा प्रतिसाद चुकलाय. जरा गोंधळ झाल्याने शब्दाचा अर्थ चुकीचा लावलाय. हे कॉस्मॉलॉजी सरकारी भाषेप्रमाणे आहे. एक एक शब्दावर एक एक लेख व्हईल... :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काळजी नसावी. कारण जो क्रमांक

दत्ता जोशी
Sun, 12/06/2015 - 23:17 नवीन
काळजी नसावी. कारण जो क्रमांक २चा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे ते एक गृहीतक ( hypothesis ) आहे. त्यमुळे तुम्ही लावलेला अर्थ पण hypothetically correct च आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

या लेखात विवेचन आहे थोडंसं.

नगरीनिरंजन
Sun, 12/06/2015 - 18:09 नवीन
या लेखात विवेचन आहे थोडंसं. The conclusion of this lecture is that the universe has not existed forever. Rather, the universe, and time itself, had a beginning in the Big Bang, about 15 billion years ago. The beginning of real time, would have been a singularity, at which the laws of physics would have broken down. Nevertheless, the way the universe began would have been determined by the laws of physics, if the universe satisfied the no boundary condition. This says that in the imaginary time direction, space-time is finite in extent, but doesn't have any boundary or edge. The predictions of the no boundary proposal seem to agree with observation. The no boundary hypothesis also predicts that the universe will eventually collapse again. However, the contracting phase, will not have the opposite arrow of time, to the expanding phase. So we will keep on getting older, and we won't return to our youth. Because time is not going to go backwards.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लिंकसाठी धन्यवाद!

संदीप डांगे
Sun, 12/06/2015 - 18:17 नवीन
लिंकसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद. लेखात स्टीफन होकिन्स

दत्ता जोशी
Sun, 12/06/2015 - 23:14 नवीन
धन्यवाद. लेखात स्टीफन होकिन्स संपूर्ण लेखात परत परत " would have been" May have been , May , Prediction , Hypothesis असले शब्द वापरतात बुवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

त्यालाच विज्ञान म्हणतात हो!

नगरीनिरंजन
Mon, 12/07/2015 - 05:01 नवीन
त्यालाच विज्ञान म्हणतात हो! मातीत उंटाच्या पायाचे ठसे दिसल्यास रॅशनल माणसे "इथून उंट चालत गेला असावा" असे म्हणतात; "उंट चालत गेलाच" असे म्हणत नाहीत कारण उंटाच्या पायाच्या आकाराचे बूट घालून कोणी गाढव गेला असण्याची कितीही सूक्ष्म का असेना शक्यता उरतेच. ते काही अध्यात्म नाही अमुकच असते आणि तमुकच असते, मी स्वतः अंतःचक्षूंनी पाहिलंय आणि तुम्ही "पुरेशी" साधना केली तर तुम्हालाही "साक्षात्कार" होईल अशी ढिशक्याँव मारायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

हायपोथिसिस आहे ते मान्य आहेच.

नगरीनिरंजन
Mon, 12/07/2015 - 05:04 नवीन
हायपोथिसिस आहे ते मान्य आहेच. तुम्हाला खोडायचा असल्यास खोडून दाखवा. "हायपोथिसिस आहे म्हणजे ते खोटेच" हे लॉजिक अध्यात्मात चालत असेल पण इथे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

"हायपोथिसिस आहे म्हणजे ते

दत्ता जोशी
Mon, 12/07/2015 - 07:42 नवीन
"हायपोथिसिस आहे म्हणजे ते खोटेच" हे लॉजिक अध्यात्मात चालत असेल पण इथे नाही.
मी अध्यात्माविषयी काही बोलोच नाही तरीपण अध्यात्माविषयी आकस प्रकट केल्याबद्दल अभिनंदन. पण नेमके उलटे आहे. आणि तेच दाखवून द्यायचे आहे. अध्यात्मातील गृहीतके सांगितली कि पुरावे द्या म्हणायचं. आणि विज्ञानातील संकल्पना गृहीतक आहेत हे फक्त अधोरेखित केलं कि चिडचिड करायची याला काही अर्थ नाही. हायपोथेसिस आहे तर घासकवडी साहेबांनी लेखाखाली तसा डिस्क्लेमर द्यावा किंवा वाक्य रचनेत बदल करावा असं सहज सुचवलं होतं. आपण दिलेला लिंक त्याला दुजोरा देतो इतकाच सुचवायचं होतं. बाकी वैयक्तिक काही घेण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वैयक्तिक घेतलेले नाही आणि

नगरीनिरंजन
Mon, 12/07/2015 - 08:18 नवीन
वैयक्तिक घेतलेले नाही आणि लेखात कुठेही हे असंच आहे अशी भाषा मला तरी वाटली नाही. अध्यात्माबद्दल मला प्रचंड आकस आहे व तो दाखवून द्यायला मला यत्किंचितही लाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

आपली गृहितके चुकीची आहेत असं

pacificready
Mon, 12/07/2015 - 09:53 नवीन
आपली गृहितके चुकीची आहेत असं मला वाटत आहे. आकस असण्याबद्दल हरकत नाही. कीप आकसिंग.;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद! हरकत नाही.

नगरीनिरंजन
Tue, 12/08/2015 - 03:28 नवीन
धन्यवाद! हरकत नाही. तुम्हालाही वाटेल ते वाटून घ्यायचा अधिकार आहे. या गृहीतकांच्या समर्थनार्थ मिळणार्‍या पुराव्यांवर विश्वास ठेवणार्‍यांशी वाद घालण्यात वेळ घालवणे व्यर्थ आहे; तरीही लेखमालेत पुढे "सजीव आपोआप निर्माण झाले अशी शास्त्रज्ञमान्य थियरी आहे" वगैरे गोष्टी येणार आहेत त्या वाचून परत हेच आक्षेप तिथेही नोंदवण्याचे स्वातंत्र्यही आहे सर्वांना. स्वातंत्र्याचा आणि लॉजिकचा काहीही संबंध नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

विज्ञानाच्या कुठच्याही

दत्ता जोशी
Sun, 12/06/2015 - 14:51 नवीन
विज्ञानाच्या कुठच्याही थियरीबद्दल 'अधिक सबळ पुरावा असलेली थियरी सापडली की ही टाकून देऊ आणि नवीन स्वीकारू' ही भूमिका असते.
धन्यवाद. कहारेतर आधीच लिहिणार होतो पण तुम्ही स्वतःच लिहिली आहे तर. लेखात एक चोतोशी सुधारणा सुचवू इच्छितो. तो असा कि एकतर लेखाखाली हा disclaimer लिहावा किंवा जी AFFERMATIVE ( होकारार्थी) वाक्ये आहेत तिथे "असावे", "असू शकेल", "असेल असे वाटते", "असे माझे किंवा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे" असा बदल करावा. मागे कोणत्यातरी धाग्यात तुम्हाला काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे मिळाली नाहीत. पण परत एकदा वेद आणि वैज्ञानिक गृहीतके यांची सरमिसळ का करत आहात किंवा त्या गृहितकांना मजबुती देण्यासाठी वेदांचा आधार घेण्याची वेळ का येते आहे असे विचारणे जास्ती सयुक्तिक ठरेल.
पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही.
कोणता पुरावा? दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे. प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही. म्हणजे आता जे प्रसरण/ expansion होत आहे त्याचा दर/ rate काय? त्याचे सातत्य काय? हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल' याची कोणतीही माहिती नाही. किंवा ते plot करणे अशक्य आहे. अर्थात मी जे लिहितो आहे ते समजून घेणे सोपे नाही पण हे सत्य आहे म्हणूनच हि सर्व गृहीतके आहेत हे मान्य करावेच लागेल. या अनुषंगाने एक प्रश्न : प्रकाशाचा वातावरणातील वेग काय याचे उत्तर सुधा निःसंदिग्धपणे मिळत नाही. तुम्हाला या विषयी काही माहिती आहे काय ? असल्यास कृपया थोडी माहिती द्यावी. तो अलिखित डिस्क्लेमर असतो. पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि जेव्हा एवढा प्रचंड पुरावा असतो तेव्हा मूळ थियरी नष्ट न होता ती किंचित काही सुधारली जाते.
  • Log in or register to post comments

हे expansion 'लिनेअर' आहे कि

दत्ता जोशी
Sun, 12/06/2015 - 15:23 नवीन
हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल'
लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल हे कृपया "linear आहे कि exponential " असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

विज्ञानाबद्दल अज्ञान

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/07/2015 - 21:40 नवीन
दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे.
१. विज्ञानातली कोणतीही पद्धत १००% खात्रीशीर नसते; जर १००% खात्रीशीर मोजमापं करता आली असा दावा कोणी करत असेल तर त्यांनी त्यांची मापनपद्धती बदलण्याची गरज आहे असं खुशाल समजावं. अगदी आपण आपलं वस्तुमान मोजलं, ज्याला सर्वसामान्यपणे वजन म्हणतो, त्यातही दोष असतो. आपलं वजन मोजण्याच्या काट्याचा लीस्ट काऊंट - वजनात किती फरक झाल्यावर काट्यावर दिसेल तो जर १०० किलो असेल तर निराळा काटा वापरण्याची गरज आहे. आपल्या मोजमापात किती त्रुटी (एरर) आहे याचा योग्य अंदाज करता येणं विज्ञानात फार महत्त्वाचं असतं. २. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रकाशातून काय आणि किती गोष्टी कळतात याची कल्पना तुम्हाला कितपत आहे हे माहीत नाही. पण या प्रकाशातून ताऱ्यांचंच नाही तर दीर्घिकांचं वय, त्यांचं वस्तुमान, त्यांचा आकार, त्यांच्यात काय-काय घटकद्रव्यं आहेत या अनेक गोष्टी सांगता येतात. ताऱ्यांकडून, दीर्घिकांकडून येणाऱ्या प्रकाशाची फक्त तीव्रता मोजत नाहीत; त्यांचा वर्णपट शोधला जातो, त्यात निरनिराळे बदल कसे होतात यांचा अभ्यास होतो. कधी हा प्रकाश, भिंगातून आल्यासारखा वाकडा येतो, त्याचा अभ्यास होतो. ३. तुम्ही ज्याला एकच पद्धत म्हणत आहात, ती पद्धत एकच नाही. तीव्रतामापन, वर्णपट, गुरुत्वीय भिंग, अशा अनेक पद्धती आहेत. ज्यांचं मापन करून वेगवेगळ्या पद्धतींनी उत्तरं आणि त्यांच्यामधल्या त्रुटी किती हे समजतं. त्यातून वयाचा अंदाज केला जातो. त्यातल्या त्रुटी किती यांचंही गणित केलं जातं.
प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही.
२-३ दशकं निरीक्षण केलेलं असलं तरीही आपल्याला 'दिसतात' ते काही क्वेझार्स काही अब्ज वर्षं जुने आहेत. थोडक्यात २-३ दशकं निरीक्षणं करून आपण काही अब्ज वर्षांमागे काय घडलं हे आज बघू शकत आहोत.
जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येत नाही, जिला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव नाही ती विज्ञानाला अमान्य असते.
जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येते, त्या प्रत्येक वस्तुला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव असेलच असं नाही. उदाहणार्थ प्रकाशकण, अर्थातच फोटॉन. डार्क एनर्जी हा प्रकार काय आहे हे अजूनही खगोलशास्त्रज्ञ आणि/किंवा कणभौतिकशास्त्रज्ञांना समजलेलं नाही. हिग्ज बोसॉन दिसला तोही अगदी अलीकडेच.
"सिंग्युलॅरिटी" - याचा अभिप्रेत अर्थ "एकतत्व" किंवा "अद्वैत" असा आहे. अगम्य असा नाही.
"सिंग्युलॅरिटी" याचा अर्थ एका कणात - ज्याला लांबी, रुंदी, उंची काहीही नाही, त्यात सगळं सामावलेलं होतं असा आहे. ते अजूनही अगम्य आहे. ते गमतं का गमत नाही याचा त्या शब्दाशी काहीही संबंध नाही. ते नक्की काय होतं हे कदाचित समजेल, कदाचित समजणारच नाही असं गृहितक कदाचित उद्या मांडलं जाईल. --- अवांतर - लेखनावर प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचेच आभार. विज्ञान, विज्ञानाची पद्धत, खगोलशास्त्र, विश्वरचनशास्त्र या विषयांबद्दल चांगल्या, सवंग भोंदूपणा नसलेल्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत लेखनाची किती गरज आहे हे या धाग्यांमध्ये दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

सुंदर माहीतीपुर्ण प्रतिसादांची मालिका खंडीत होऊ नये

मारवा
Mon, 12/07/2015 - 21:53 नवीन
सुंदर माहीतीपुर्ण प्रतिसादांची मालिका खंडीत होऊ नये कारणीभुत कोणीही होवो. काहीही होवो. कुठलाही प्रश्न होवो. इतकीच एकच इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून एक. वायूची तबकडी हा

दत्ता जोशी
Sun, 12/06/2015 - 14:54 नवीन
अजून एक. वायूची तबकडी हा निष्कर्ष कोठून आला?
  • Log in or register to post comments

आकाशाज्जाय्ते वायुः ..तर

दत्ता जोशी
Sun, 12/06/2015 - 14:56 नवीन
आकाशाज्जाय्ते वायुः ..तर नव्हे??
  • Log in or register to post comments

काय ठरलय मग?

विलासराव
Sun, 12/06/2015 - 22:39 नवीन
काय ठरलय मग? विज्ञानाला मानायच. अध्यात्माला मानायच. दोघांना मानायच. की दोघांनाही नाही मानायच. काही सुचेनास झालय ही चर्चा वाचून.
  • Log in or register to post comments

इट्स सो सिम्पल!

संदीप डांगे
Sun, 12/06/2015 - 23:03 नवीन
स्वतः बनवलेलं रॉकेट घेऊन बालाजीच्या चरणी आशिर्वादासाठी जायचं. नवा कंप्युटर, कार घरी आणल्यावर त्याला पाच कुंकवाचे टिके लावायचे. सॅटेलाईटचा वापर करून शेकडो किलोमीटरच्या केबलमधून येणार्‍या इंटरनेटवरून साइबाबाची ऑनलाईन आरती करायची. डीटीएच टीवीच्या डिशमधून फुल्ल एच्डी ७० इन्च टीवीतून दिसणार्‍या आसाराम बाप्पुला नमन करायचे. अजून बरीच मोठी लिस्ट आहे काय करायचं त्याची... मानणे न मानण्याने काय होणार? ज्यांना हे कळतं त्यांना अजून काय कळायची आवश्यकता आहे...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

सत्यवचन!

नगरीनिरंजन
Mon, 12/07/2015 - 05:20 नवीन
सत्यवचन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

विसंगती कधी न घडो

तुषार काळभोर
Mon, 12/07/2015 - 09:58 नवीन
विसंगती कधी न घडो (सु/सृ)जनवाक्य कानी पडो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्ये तुमचं ह्याला मानायचं,

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/07/2015 - 23:35 नवीन
त्ये तुमचं ह्याला मानायचं, त्याला मानायचं सोडून द्या की ओ... मनमानी करा, बास !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

छान चाललीय चर्चा,राजेशजी अभिनंदन

बाजीगर
Tue, 12/08/2015 - 11:54 नवीन
गहन विषय आहे.पण छान चाललीय चर्चा. सृष्टीसे पहले कुछ नहीं था... सत भी नही, असत भी नही अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था... छिपा था क्या ,कहां,किसने ढका था.... उस पल तो आगम,अटल जल भी कहां था... सृष्टीका कौन है कर्ता ?... कर्ता है वा अकर्ता ? आवडलं.
  • Log in or register to post comments

नक्की कुणाकुणाला कायकाय सिद्ध

कवितानागेश
Tue, 12/08/2015 - 12:38 नवीन
नक्की कुणाकुणाला कायकाय सिद्ध करायचय?! :)
  • Log in or register to post comments

असं विचारुन आपण काय सिद्ध करु

pacificready
Tue, 12/08/2015 - 12:42 नवीन
असं विचारुन आपण काय सिद्ध करु इच्छित आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

फारतर "त्याच्याआधी काय होते

बॅटमॅन
Tue, 12/08/2015 - 17:15 नवीन
फारतर "त्याच्याआधी काय होते हे सध्याच्या थेरीला समजले नाही" असे म्हणा. प्रश्न बाय इटसेल्फ निरर्थक नाहीये. पेनरोज या शास्त्रज्ञाने आजवर असे अनेक बिगबँग झाले असावेत असाही एक कयास मांडलेला आहे.
  • Log in or register to post comments

पेनरोज या शास्त्रज्ञाने आजवर

विलासराव
Tue, 12/08/2015 - 20:40 नवीन
पेनरोज या शास्त्रज्ञाने आजवर असे अनेक बिगबँग झाले असावेत असाही एक कयास मांडलेला आहे. सहमत. या विश्वातली प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते.नष्ट होते.परत उतपन्न होते. परत नष्ट होते. असे वर्तुळ न आदि न अंत चालूच आहे. अगदी दीर्घिकाही याला अपवाद नाहीत. लाइफसायकल मोठी असेल पण अंत होतो. मला फार योग्य शब्दात मांडता नाही येत.असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा