एक 'वजनदार' धागा...
....... तसे या लेखाचे पूर्ण शीर्षक - "गॅलिलिओचा बाप, चित्रकला, संमोहनशास्त्र, संगीत, गवंडीकाम, होमियोपाथी, ज्योतिषविद्या, न्यूटन, ताजमहाल आणि (ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छुंसाठी उपयुक्त -) एक वजनदार धागा" असे आहे. ... गोंधळलात ?
अहो,या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे, तोही एक वजनदार धागा. म्हणजे बघा:
गॅलिलिओचा बाप एक संगीतज्ञ होता, तो संगीत रचताना काल- मापनासाठी हा 'वजनदार धागा' वापरायचा.
काही होमियोपाथ नेमके औषध हुडकण्यासाठी, तसेच चित्रकार, मूर्तीकार, गवंडी, सुद्धा हा वापरतात.
अमेरिका व अन्य देशात अनेकजण खरेदी करताना या धाग्याचा कौल घेतात म्हणे.
संमोहनशास्त्रात याचा उपयोग केला जातो.
ताजमहाल, पिरामिड वगैरे भव्य बांधकामे या धाग्याशिवाय करणे अशक्य.
न्यूटन व फोकाल्ट यांचे यावर आधारित शोध प्रसिद्धच आहेत.
अर्थात हा 'वजनदार धागा' म्हणजे "लंबक" अथवा पेंडूलम. बघा:
http://www.vaastuinternational.com/dowsing/vid_pendulum.gif
http://www.calacademy.org/products/pendulum/page1.htm
परंतु लंबकाच्या आणखी एका उपयोगाविषयी मी या धाग्यात सांगणार आहे.
दहा- बारा वर्षांपूर्वी लंबकाचे जे काही प्रयोग मी केले होते, त्याची हकीगत:
एक दिवस मला 'लंबकविद्या' नामक एक पुस्तक मिळाले, त्यात लंबकाच्या सहाय्याने भविष्यातील घटना जाणून घेता येतात, असे सांगितले होते.
पूर्वी आर्टस्कूल मध्ये शिकत असताना व्हीनस इ. चे पुतळे वा प्रत्यक्ष मॉडेल वरून रेखाटन करताना आम्ही लंबक वापरायचो, पण हे नवीनच काही होते.
पुस्तकात दिलेले सुरुवातीचे सोपे प्रयोग सहज जमले. ते म्हणजे लंबकाची दोरी हातात धरून हात अगदी स्थिर ठेवता येणे. त्यानंतर मुद्दाम हाताने गति न देता नुसत्या विचाराने लंबक उभा, आडवा, घड्याळाच्या दिशेने व उलट दिशेने फिरवता येणे, वगैरे.
आता प्रत्यक्ष भविष्य जाणून घेण्याच्या दिशेने प्रयोग करायचे होते; प्रचंड उत्सुकता दाटली होती.
ज्याची लवकर प्रचीती घेता येईल, अशी भविष्यातील घटना कोणती?
पत्नी त्यावेळी भगिनी मंडळात भिशीसाठी जायला निघालीच होती. चिठ्ठ्या टाकून जिचे नाव निघेल, तिला पैसे मिळत, तेंव्हा तिला जाण्यापूर्वी त्या सर्वांची नावे विचारून लिहून घेतली.
मग कागदावर एक अर्धवर्तुळाकृती आकार बनवून त्याचे - जितक्या बायका होत्या तितके - भाग पाडून प्रत्येकात एकीचे नाव लिहिले.
"शून्य" बिंदूवर हात अगदी स्थिर करत लंबक धरून ठेवला.
मग डोळे मिटून अगदी उत्कटपणे असा विचार केला, की जिला भिशीचे पैसे मिळणार असतील त्या भगिनीचे नाव कळावे. काही वेळाने लंबाकाने गति घेतल्याची हाताला जाणीव झाल्यावर डोळे उघडले. "उज्वला" या नावावर लंबक सावकाश पणे फिरत होता....
काही वेळाने पत्नी परतल्यावर तिने सांगितले की पैसे उज्वलाला मिळाले..... आम्ही थक्कच झालो.
मग काय, हा एक नवीनच नाद लागला. रोज काही ना काही प्रयोग करू लागलो.
लवकरच बर्याच लोकांना ही बातमी कळली, रोज कुणी ना कुणी भविष्य जाणून घ्यायला येऊ लागले.
... शेजारी राहणार्यांच्या गर्भार मुलीला मुलगा होणार, हे भाकीत खरे ठरले.
... एका परिचिताच्या दोन मुलींनी दहावी व बारावीच्या परिक्षा दिल्या होत्या, निकालाची प्रतिक्षा होती, त्यांना किती टक्के मार्क मिळणार, याचे भाकीतही बरोबर निघाले.
... एकाच्या मुलीचे लग्न अमुक वेळी होईल, व ती परदेशी जाईल, हेही बरोबर निघाले.
... एका मित्राने कुठल्याश्या सोसायटीत घरासाठी रक्कम जमा केली होती, पण तो जरा साशंक होता, त्याला पैसे काढून घेण्याचा सल्ला दिला, तो अगदी समयोचित ठरला.
लंबकाच्या सहाय्याने केलेली अशी अनेक भाकिते खरी ठरली. सुमारे वर्ष - दोन वर्ष मी यात बराच गुंतलो होतो, नंतर मात्र मी हा उद्योग पूर्णपणे बंद केला, त्याला खालील कारणे घडली:
१. कुणाचेही भविष्य जाणून घेण्यासाठी लंबकाचा प्रयोग करताना स्वत: अगदी तटस्थ, निर्विकार असणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे मला माझे स्वत:चे आणि मुला-बाळांचे भविष्य जाणून घेणे कधीच शक्य झाले नाही. म्हणजे स्वत:साठी ही विद्या निरुपयोगी ठरली.
२. मी हा उद्योग हौस म्हणून, विनामूल्य करत होतो, हळू हळू इतके लोक येऊ लागले, की माझे वैयक्तिक/कौटुंबिक जीवन, चित्रकला, हे सर्व विस्कळीत होऊ लागले. यातून पैसा कमावण्याची इच्छाही नव्हती, आणि तसले व्यवहारचातुर्यही माझ्याकडे नाही.
३. पुढे काही पंजाबी व्यापारी, बिल्डर वगैरे येऊ लागले, त्यांना खूप मोठ्या रकमांची गुंतवणूक करायची असल्याने माझा सल्ला हवा असायचा. आता मात्र यातले गांभीर्य आणि धोका माझ्या लक्षात आला.
४. माझी सुरुवातीची उत्कंठा, कुतूहल हे आता शमलेले होतेच, त्यातून शेवटी एक दिवस एका बाईने तिची अंथरुणाला खिळलेली आई केंव्हा मरण पावणार असे विचारले, त्याच क्षणी मी हा लंबकाचा उद्योग पूर्णपणे बंद केला, तो आजतागायत.
माझ्यापुरता हा विषय इथेच संपल्याने मला भाकिते कशी करता आली, त्यामागे कोणते निसर्गनियम काम करत होते, वगैरेचा शोध घेतला गेला नाही.
हा झाला माझा अनुभव. अर्थात कुणी वेगळ्या प्रकारे हे करेल, वेगळे अनुभव येतील, काही नवीन मार्ग खुले होतील... त्यामुळे गंमत म्हणून करून बघायला हरकत नाही. आणि अगदी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छु लोक्स पोरी-बाळींवर छाप टाकण्यासाठी याचा उपयोग करू शकतात, पण जरा जपून.
(अवांतर: काही लोक यातून प्रचंड पैका मिळवतात, असे ऐकून आहे, मात्र यात त्यांच्या व्यवहारचातुर्याचा, धूर्तपणाचा, संभाषणकौशल्याचा, 'पीआर' गिरीचा मोठा हात असणार. उदा. 'बॉलीवुड' मधील एका लंबकवाल्याची तीन महिने आधीपासून appointment घ्यावी लागते म्हणे).
या लेखात मला लंबकाच्या भविष्यकथन क्षमतेबद्दल कोणतीही मंडनानात्मक वा खंडनात्मक भूमिका घ्यायची नाही, हे नमूद करू इच्छितो. मात्र तुम्ही काही प्रयोग केलेत, तर जरूर कळवा. खालील दुव्यांवर उपयोगी माहिती मिळेल:
http://www.lettertorobin.org/companion/html/StudentGuide.html
http://www.pendulums.com/how_it_works.htm
http://www.newspiritservices.com/pendulum.html
http://www.crystaltiger.com/sa02003.htm
http://educationalelectronicsusa.com/p/shm-II.htm
http://en.wikipedia.org/wiki/Pendulum
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पातळी
गॅलिलिओ
चित्रगुप्त आपला लेख वाचला.
मन एकाग्र करणे महत्वाचे. लंबकाचीही जरुरी नाही...
पुन्हा एकदा
ब्रम्हचर्यव्रताचरणमुक्तेच्छु
.
तज्ञानी जिज्ञासुंच्या अज्ञानात भर घालावीविजुभाऊ, ज्ञानात भर घालावी हे ऐकले होते. हे काय नवीन !बाजारात लंबक विद्येवर बरीच
हाच तो धागा
माझ्यापुरता हा विषय इथेच
मलासे वाटते इंद्रियातीत ज्ञान असावे.
रंजक माहिती
मेख!
इंद्रियातीत जाणीव
तो प्रसिद्ध / सिद्ध लंबक आता कुठे आहे?
@कंजूस : लंबक कुठेतरी असेल. सापडला तर देईन तुम्हाला.