महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही? फक्त भारतीयच नव्हे तर सगळ्या जगाला ललाम भूत झालेला हा थोर कवी, नाटककार. पण त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल फारसे काही कळत नाही. एवढेच काय, त्याचा नक्की कालखंड कुठला हे देखील खात्रीलायकपणे सांगता येणे मुश्कील आहे. एक तर विनयामुळे असेल किंवा अन्य काही कारणे असतील; पण त्याने स्वत:बद्दल फारसे काही लिहून ठेवले नाही किंवा लिहिले असेल तरी ते अजून कुठे सापडले नाही.
प्रा. वि. वा. मिराशी , रावबहादूर चिंतामणराव वैद्य, प्रा. र. ना. आपटे इ. पंडितांच्या मते तो शकांचा पराभव करणारा सम्राट विक्रमादित्य ह्याच्या पदरी होता.