"च्यामारी ह्या म्हातार्याच्या, हातात घावुदे एकदा... नरडंच आवळतू साल्याचं", हणम्या स्टेशनमास्तरच्या केबीन मधुन बाहेर येता येता करवादला. त्याची धुसफूस ऐकुन तिथेच बसलेल्या दोघा-तिघांनी दात विचकले. नान्याच्या पाठीत धपाटा घालुन तो तिथेच एका दगडावर बसला, बाजुला तोंडातील तंबाकुची पींक टाकुन, तो परत चालु झाला. नान्याच्या पाठीच धीरडं झालेले बघुन बघ्यांची चांगलीच करमणुक झाली. हणम्या जाम तापला होता, तापणार नाय तर काय हो? एकतर जवान गडी, चार महिन्यांपलिकडेतर हळद लागली, आठ्वड्याला दोन रोज ह्याची मुंबई ड्युटी, म्हनजे हा आपला चार रोज तिकडंच की!