मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.