आयुष्याच्या महत्वाच्या गरजा भागलेली आजची तरुणाई. कुठच्यातरी भयंकर अडचणींमधून मार्ग काढून काहीतरी नेत्रदीपक करण्याची निकड संपलेली. जगण्याचं कारण काय, असा प्रश्न पडतोय, हे कळण्याइतका विचार करण्याची सवय नाही, आणि तरी त्या प्रश्नाच्या गर्तेत कधी ना कधी अडकून भरकटणारी, त्या डोळ्यांत भरणाऱ्या भरकटलेपणावर आपापल्या कुवतीने उत्तरं शोधणाऱ्या, सुचवणाऱ्या जगावर कावलेली तरुणाई.
ऑक्टोबरमधला डॅन म्हणून सहजपणे आपला वाटू शकतो. व्यवहारात मंद, आणि तरी काहीतरी करण्याची इच्छा असणारा, ते करण्यासाठी मार्ग माहीत नसलेला, आणि मग ती काही करण्यासाठीची ऊर्जा उगाच जगाला हडतुड करत वाया घालवणारा डॅन.