मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवनेरिची वारी

झकासराव · · कलादालन
मध्यंतरी शिवनेरीला जाउन आलो. आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथे झाला त्या ठिकाणी जायचं ह्या कल्पनेनच सॉल्लिड्ड मस्त वाटत होतं. काय करणार. ज्यावेळी पुण्यात येवुन पहिल्यांदाच लाल महाल पाहिला होता त्यावेळी तिथली माती कपाळाला लावणारी आम्ही येडी. त्यामुळे असं गडावर जायच म्हणल की स्फुरण चढतचं. :) मग काय माहिती गोळा करुन चार टाळकी जमवुन निघालो. फोटो टाकतोच पण आधी थोडासा इतिहास टाकतो गडाचा. हा गड छत्रपतींच्या काळात स्वराज्यात नव्हता. वाचुन विश्वास नाही ना बसला. शाहु महाराजांच्या (सातारा गादी स्थापन केलले) काळात हा गड जिंकला मराठ्यानी. तर आपण बघुया इतिहास गडाचा. ** हा किल्ला पुणे जिल्हातील जुन्नर गावाच्या जवळ आहे. हे गाव शकराजा नहपानाची राजधानी होती. पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करुन जुन्नर व आजुबाजुच्या परिसरावर वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. ह्या मार्गावरुन चालणार्‍या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी ह्या मार्गावरिल गडांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांच्या काळातच इथे बरीच लेणी खोदण्यात आली. सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट ह्या राजवटीखाली होता. सुमारे ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवानी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि ह्याच काळात शिवनेरीचे रुप गडाचे झाले. नंतर हा किल्ला बहमनी राजवटीखाली आला. नंतर निजामशाहिची स्थापना झाली आणि त्यानी राजधानी अहमदनगरला हलवली. १५९५ मध्ये हा किल्ला आणि जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे जन्म झाला हे माहितीच आहे. १६३२ साली राजानी हा गड सोडला. (अर्थात राजे त्यावेळी बालक होते) १६३७ साली हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला होता. पुढे १६७३ साली शिवरायानी गडाचा तत्कालीन किल्लेदाराला फीतवुन किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. पुढे १७१६ मध्ये हा किल्ला शाहुमहाराजानी मराठेशाहीत आणला. नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत झाला. आता बघु फोटो. पुण्यावरुन जाणार्‍याना नाशिक हायवे वरच नारायणगावातुन डावीकडे फाटा आहे जो जुन्नरला घेवुन जातो. मुंबईवरुन येणार्‍याना माळशेज घाटाने याव लागेल. आता गडावर जाण बरच सोप आहे. बर्‍याच वर पर्यंत गाडी रस्ता आहे. तिथुन वर पायर्‍या आहेत. अजिबातच दमछाक होत नाही. बरीच कुटुंब आली होती तिथे. हा फोटो गाडी पार्किंच्याजवळुन घेतलाय. कातळ दिसतोय. Image removed. हा मुख्य दरवाजा. बरिचशी डागडुजी केली आहे पुरातत्व खात्याने. Image removed. हा गणेश दरवाजा. त्यावर दोन बाजुला दोन कसलीशी चिन्ह दिसत आहेत. Image removed. ही अशी चिन्हं विजयाच, सामर्थ्याच प्रतिक म्हणून वापरली जात असावीत का? कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे. Image removed. हा गडावरुन दिसणारा सुंदर देखावा. Image removed. हा आहे हत्ती दरवाजा. Image removed. हत्ती दरवाज्यावर असे खिळे आहेत. Image removed. हा फोटो उगाचच एक प्रयत्न. मला लयी भारी फोटो काढता येतात ह्या गैरसमजातुन. हॅ हॅ हॅ.... Image removed. वाटेत अशी लहान लहान पाण्याची टाकं दिसतात. पाणी किती स्वच्छ आहे ना. पण त्याच पाण्यात कुणी प्लॅस्टिकची पिशवी टाकुन ठेवली होती. :( हे टाकं हत्ती दरवाज्याच्या जवळच आहे. Image removed. हा अंबारखाना. ह्यात जुन्या काळी धान्य साठवल जायच. Image removed. गडाच्या सुशोभीकरणाच्या अंतर्गत गडावर वेगवेगळी झाडं लावली आहेत. ठिकठिकाणी लॉन्स बनवले आहेत. हे रक्तपर्णी नावाच्या झाड. अंबारखान्याच्या जवळच आहे. Image removed. परत एकदा उगाचच हॅ हॅ हॅ.. क्लोज अपचा प्रयत्न... Image removed. उंचीची स्पर्धा करणारी निवडूंग. Image removed. हा उंच निवडुगांचा फोटो. Image removed. हे छत्रपतींचे जन्मस्थान आहे अशी पाटी आहे तिथे. ह्या इमारतीतच एक पाळणा आहे. तो शिवरायांचा आहे अस तिथे लिहिलय. पण त्याचा फोटो नाहि काढता आला. Image removed. इथे एक कौलारु इमारत आहे. त्यात हा पुतळा आहे. Image removed. एक जुनी इदगाहची भिंत आहे. त्याच्या बाजुला हा एक छोटा चौथरा आहे. Image removed. त्या चौथर्‍यावर अशी भाषा / लिपी दिसते. ही फारसी की अरेबिक? Image removed. त्याच चौथर्‍याच्या आत जाउन पाहिल तर असले किडे दिसले. प्रथमच पाहिले असले किडे. Image removed. हा फोटो गडाच्या सर्वात उंच ठिकाणावरुन काढलाय. Image removed. खाली उतरताना तिसर्‍या की पाचव्या दरवाज्यापासुन जवळ असलेल आणि आम्ही पहायच राहिलेल शिवाई देवीच मंदीर पाहिल. त्याच्या मागे काहि लेणी आहेत कोरलेली. त्यात एकात स्तुप होत. तिथुन उतरुन थोडीशी पोटपुजा करुन आम्ही लेण्याद्री आणि ओझरचे गणपती करुन घरी परतलो. हे लेण्याद्री. (जुन्नर पासुन १० किमीवर असेल. तिथुन पुढे ओझर साधारण १४-१५ किमी.) Image removed. बाकीचे फोटो खालील लिन्कवर आहेत. http://picasaweb.google.com/zakasrao/Shivneri# ** गडाचा इतिहास लिहिण्यासाठी मला मेलवर आलेल्या माहितीचा संदर्भ घेतला आहे. त्या एका पीडीएफ मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांचा इतिहास, गडावर बघण्यासारखी ठिकाणं, जाव कसं, गडावर काय काय सोय होउ शकेल इत्यादी माहिती आहे. ही माहिती एकत्र करणार्‍या सगळ्या अज्ञात मंडळीना माझा साष्टांग दंडवत. ह्या माहितीचा खुप उपयोग होतो. * इथे मराठा हे व्यापक अर्थाने आहे. त्यावर काथ्याकुट नको.

वाचन 11875 प्रतिक्रिया 0