Skip to main content

भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय ?

लेखक गामा पैलवान यांनी शनिवार, 15/08/2026 02:56 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळालं. तर हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी माझ्या मनांत थोडाबहुत संभ्रम आहे. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हा लेख लिहितो आहे. स्वातंत्र्यासोबत फाळणीही झाली. त्यामुळे तिचा विचारही आपोआप होणार. तर मुद्द्याला हात घालूया.

तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अ‍ॅटलींनी २० फेब्रुवारी १९४७ साली ब्रिटीश संसदेत जाहीर केलं की ०३ जून १९४८ पर्यंत ब्रिटीश इंडियास पूर्णपणे स्वयंशासित करणार. अर्थात, या तारखेपश्चात ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही. या घोषणेस सत्तांतराची घोषणा म्हणतात. १६ जुलै १९४७ रोजी या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झालं. त्याच वेळेस भारताची फाळणी करायचं ठरलं. तर प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या खंडप्राय देशाची फाळणी फक्त ११ महिन्यांत ( जुलै १९४७ ते जून १९४८ ) कशी करायची? आणि भरीस भर म्हणून सत्तांतराचा दिवस जून १९४८ च्या तब्बल १० महिने आधी म्हणजे १४ व १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत मागे खेचला. म्हणजे फाळणीसाठी अवघा दीड महिनाच उरला होता. ही घिसाडघाई का?

सत्तांतराच्या पश्चात दोन अंमलशाह्या ( = dominions ) उत्पन्न झाल्या. १४ ऑगस्ट १९४७  रोजी पाकिस्तान व दुसऱ्या दिवशी भारत. ह्या दोन्ही अंमलशाह्या स्वायत्त होत्या. म्हणजे भारत व पाकिस्तानी सरकारे स्वयंशासित असणार आणि त्यांचा प्रमुख ब्रिटनचा राजा केवळ नामधारी असणार. आज घडीस इ.स. २०२६ साली कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व जमेका ( यादी अपूर्ण )  या प्रकारच्या अंमलशाह्या आहेत. आता, हाच दर्जा मिळावा म्हणून पहिल्या महायुद्धाच्या नंतर प्रयत्न सुरू केले होते. १९१६ साली लखनौ करार झाल्यावर हिंदू व मुस्लिमांची तेव्हढ्यापुरती एकजूट झाली. हिंदी लोकांना स्वायत्तता मिळावी म्हणून मुस्लीम लीगने काँग्रेसशी सहकार्य करायचं मान्य केलं. याच कारणासाठी टिळकांनी होमरूल चळवळ ( १९१६ ते १९१८ ) याचसाठी राबवली. टिळक १९२० साली स्वर्गवासी झाले. तोवर गांधी भारतीय राजकारणांत स्थिरावले होते. त्यांनी १९२१ मध्ये असहकार चळवळ पेटवली. ती जर नीट तडीस नेली असती तर अंमलशाही स्वायत्तता तेव्हाच मिळाली असती. मात्र चौरीचौरा येथील पोलिसांच्या हत्यांच्या सबबीखाली गांधींनी चळवळ मागे घेतली. तर मग तांत्रिक दृष्ट्या पाहू जाता १९२१ ते १९४७ या वर्षांत हिंदू जनतेने काय कमावलं, असा प्रश्न पडतो. जर  अंमलशाही स्वायत्तताच मिळवायची होती तर पहिल्या महायुद्धानंतर सर्वात चांगली संधी होती. ती वाया दवडल्यामुले दुसरं महायुद्ध संपेपावेतो वाट बघावी लागली. मग गांधी आणि नेहरू पितापुत्रांच्या राजकारणाचं फलित काय? भारताची फाळणी सोडल्यास दुसरं काही दिसून येत नाही. मात्र यावर चर्चा झालेली आवडेल.

मध्यंतरीच्या काळांत १९२८ साली ( मोतीलाल ) नेहरू रिपोर्ट आला. त्यांतही स्वायत्ततेची मागणी होती. तेव्हा लॉर्ड आयर्विनने अनौपचारिक जाहीरनाम्याद्वारे मधाचं बोट चाटवलं होतं ( इ.स. १९२९ ).  मात्र पुढे फारशी प्रगती झाली नाही. म्हणून गांधींनी सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू केलं ( १९३२).

तर मग स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतराद्वारे मिळालेली स्वायत्तता असं म्हणावयास पाहिजे. आता यांस स्वातंत्र्य का म्हणायचं? बहुधा १९४८ नंतर ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही अशी नि:संदिग्ध घोषणा झालेली असल्याने या सत्तांतरास स्वातंत्र्य म्हणता यावं. असं माझं आकलन आहे.

सत्तांतर म्हंटलं की आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जवाहर नेहरूंना शासनप्रमुख म्हणून कोणी नेमलं? त्यांनी १९४६ साली सरकारात शिरतांना साधा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. कृपया हे हिंदी चलचित्र ( साडेपाच मिनिटे ) पाहणे : https://www.youtube.com/watch?v=1FobmFy1qM4

१९५२ साली निवडून आल्यावरच नेहरू पंतप्रधान झाले. मग १९४७ ते १९५२ पर्यंत ते कशाच्या आधारावर पंतप्रधान म्हणवले जातात? याच मुद्द्यामुळे फाळणीच्या अधिकृत दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. मी ती अधिकृत का मानावी? तसंच नेहरूंनी कोणत्या आधारे भारतीय सैन्याच्या विजयी आगेकूचीत हस्तक्षेप केला? भारताने काश्मीरच्या प्रश्नी राष्ट्रसंघाचे निरीक्षक मागवले होते, त्याची मागणी नेहरूंनी केली. ती अधिकृत ठरेल का? त्यावरही प्रश्न उपस्थित होतात.

१९४७ च्या सत्तांतरात काही महत्त्वाचे धागे सुटेच लटकंत आहेत.

यांतला एक धागा पटेलांविषयी आहे. त्यांना जर पोलादी पुरुष मानलं जातं, तर त्यांच्या नजरेतनं नेहरूंचा दर्जा कसाकाय निसटला? त्यांनी संस्थानांच्या एकीकरणाचं काम खमकेपणाने केलं. पण हा खमकेपणा गांधींना संरक्षण देण्यात का कमी पडला? इंग्रजांनी भारत एक केला असं म्हंटलं तर १९४७ साली सत्तांतराच्या वेळेस ५५०+ संस्थाने वेगळी का राहिली? इंग्रजांनी भारत एक केला आणि सरदार पटेल लोहपुरूष आहेत ही दोन विधाने परस्परविरोधी आहेत.

असो.

सध्या इतकच लिहून थांबतो. जसजशा गोष्टी आठवतील तसतशा लिहीत जाईन म्हणतो. चर्चा सुरू होऊद्या.

आपला नम्र,
-गामा पैलवान 


वाचने 108
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया