Skip to main content

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 14/11/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

वाचने 134078
प्रतिक्रिया 637

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

हेच तर चुकतं श्री. श्रीरंग जोशी यांच, असं काही माहित पडल्या पडल्या त्यांनी आधी ट्विटरवर बोंब ठोकायला हवी होती, असतील नसतील तितक्या व्हाट्सप गृप्स वर ठणाणा करायला हवा होता, फेसबुकवर पोस्टी टाकुन शंख करायला हवा होता, मिपावर एक जळजळीत धागा पेटवायला हवा होता गेला बाजार शक्य असल्यास पॉम्प्लेट छापुन विमानतळावरच्या क्स्टमस्च्या ऑफिस समोर ते भिरकावुन रामलीला मैदानीय ठिय्या द्यायला हवा होता. ह्यांनी काय केलं तर म्हणे तिथे मेल टाकुन दुरुस्ती सुचवुन बाकीच्या लोकांची मदत करायचा चंग बांधला. ह्यअ‍ॅ....अस कोणी करतं का ???????????? जर पुन्हा तुम्ही असं करताना सापडलात किंवा दिसलात किंवा कळले तर मग बघाच.........

In reply to by इरसाल

नायतर काय ! अश्याने राजकारणात येण्याचे चान्सेस शून्य करून घेत आहेत, ते वेगळेच =))

In reply to by राघवेंद्र

उगीच नाही त्या फंदात पडू नका असे मी तरी सांगेन... स्वतःचे पैसे फक्त बरोबर बाळगा, नसती समाजसेवा अंगाशी येऊ शकते. भा.री. बँकेच्या म्हणण्याप्रमाणे अनिवासी भारतीय आपापल्या एन आर ओ खात्यात पैसे भरू शकतात. भा.री. बँक पत्रक : https://rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=119 बँकांची यादी : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/pdfs/71206.pdf दुसऱ्या एका धाग्यात म्हंटल्याप्रमाणे कळत-नकळत 'हम सब चोर है' चे अजून एक उदाहरण म्हणजे अनेक अनिवासी भारतीयांकडे (६ महिन्यांहून अधिक वास्तव्य) एन आर ओ/इ खातेच नाहीये, झूम वगैरे सेवा वापरून आपले भारतातील बचत खात्यात असेच पैसे पाठविले जात आहेत... Import and Export of Indian Currency are “Restricted”. However, (i) any person resident in India is allowed to take outside India currency notes of Government of India and Reserve Bank of India notes upto Rs. 7,500/- per person; (ii) any person resident in India who had gone out of India on a temporary visit, is allowed to bring into India at the time of his return from any place outside India, currency notes of Government of India and Reserve Bank of India notes upto Rs. 7,500/- per person; and (iii) a passenger coming from Nepal or Bhutan to India and/or a passenger travelling to Nepal or Bhutan from India, is allowed to carry currency notes of Government of India and Reserve Bank of India notes without any value restriction except notes of denominations of above Rs. 100/- in either case, so long as the same constitutes part of his bonafide baggage.

In reply to by समर्पक

वरील लींक पाहिल्या पण जर एन आर ई खाते असेल तर नक्की काय करता येईल हे स्पष्ट होत नाहीये. कृपया याबाबतीत अधिक मार्गदर्शन करावे. धन्यवाद!

In reply to by बंड्याभाय

परदेशातून "भारतीय नोटांच्या स्वरूपात" आणलेले पैसे एनआरआय खात्यात जमा करता येत नाहीत, पण एनआरओ खात्यात जमा करता येतील.

नोटा रद्द केल्यामुळे अतिरेक्यांच्या काळ्या किंवा खोट्या पैशावर टाच आल्याने काश्मीरच्या समस्येत फरक दिसू लागले आहेत. दगडफेक बंद झाली आहे... No stone pelting on forces in Kashmir after demonetisation move, says Manohar Parrikar

१४ लाख कोटींपैकी २ लाख कोटी जमा झाले बँकेत असे कळले. २ लाख कोटी जमा झाल्याची प्रेस नोटः http://finmin.nic.in/press_room/2016/PressReleaseR12112016.pdf हजार पाचशेंपैकी एकुण रक्कम इथे सापडेलः http://www.firstpost.com/india/chart-rs-500-rs-1000-notes-form-86-of-to…

एकूण परीस्थीती पहाता सामान्य माणसे किर्कोळ नोटांच्या उपलब्धतेमुळे जास्त त्रस्त आहेत. यावर ऊपाय म्हणून जर पोस्टल स्टैंप थोडे दिवस मोठ्या प्रमणात उपलब्ध करुन दिले , १०-२०-१०० च्या डिनोमिनेषन मधे तर किर्कोळ व्यवहारासाथि लोक वापर करु शकतात.

कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस ----------- एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्‍यक नसते. युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे) याचे फायदे:
  • सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
  • अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
  • पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.

In reply to by निनाद

चांगली माहिती,याचे नीट माहितीपत्रक बनवून स्वखर्चाने छापून प्रचाराला सुरुवात करतो, कुणाला आपल्या भागात वितरण करायचे असल्यास इथे प्रिंटेबल पीडीएफ टाकतो.

In reply to by निनाद

याबद्दल सविस्तर व योग्य माहिती कुठे मिळेल? विशेष धागा काढाल काय कोणी जाणकार? हि माहिती तातडीने पसरवूया...

In reply to by निनाद

एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) हे बॅकबोन आहे. यावर आधारीत अ‍ॅपस बनवली आहेत बँकांनी. युपिआय वापरणारे कोणतेही अ‍ॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा. स्टेट बँकेचे आहे तसेच फ्लिप्कार्ट चे पे मिळते आहे... खालील ब्यांकांनी हे उपलब्ध करून दिले आहे: Banks live as PSP and Issuer: 1 Andhra Bank 2 Axis Bank 3 Bank of Maharashtra 4 Canara Bank 5 Catholic Syrian Bank 6 DCB Bank 7 Karnataka Bank 8 Union Bank of India 9 United Bank of India 10 Vijaya Bank 11 Punjab National Bank 12 Oriental Bank of Commerce 13 TJSB 14 Federal Bank 15 ICICI Bank 16 UCO Bank 17 South Indian Bank 18 HDFC

सुंदर आणि सकारात्मक विश्लेषण! ज्या पद्धतीने मोदी सरकारने हे execute केलय ते खरचं प्रशंसनीय आहे. श्री बोकील यांची मुलाखत पाहीली आणि आधीचे पंतप्रधान खरचं अर्थतज्ञ होते का असा सोपा प्रश्न पडला. असो!

In reply to by बंड्याभाय

आधीचे पंतप्रधान म्हणजे आजचे सर्व नाही पण बरेचसे एम बी ए ... आपले असे साधे गणित आहे !!! एम बी ए झाला तरी निर्णयासाठी पुन्हा ए जी एम कडे !! जी एम कडे ! अहो इथे कंपनीत ए जी एम हे सत्ताबाह्य केंद्र नरी नसते.....तिथे दिल्लीत काय ...... ?

In reply to by बंड्याभाय

आधीचे पंतप्रधान उत्तम अर्थतज्ञ होते यात वाद नाही. त्यांचे शिक्षणक्षेत्रातले (प्रोफेसर), भारतिय व जागतिक स्तरावरचे ब्युरोक्रॅट म्हणून आणि पंतप्रधान नरसिंह राव अर्थमंत्री म्हणून त्यांचे काम अत्यंत प्रशंसनिय होते याबद्दल दुमत नाही. मात्र, पंतप्रधान उर्फ भारताचे सर्वोच्च अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांचे काम त्यांच्या अगोदरच्या कारकिर्दीला शोभेसे झालेले नाही. याचे मुख्य कारण ब्युरोक्रॅटने कितीही मोठ्या दर्जाच्या योजना समोर आणल्या तरी त्याची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या (भारताच्या बाबतीत पंतप्रधानांच्या) परवानगी व राजकीय पाठींब्याशिवाय होऊ शकत नाहीत. नव्वदीच्या दशकात ममोसिंगांच्या ब्युरोक्रॅट कारकिर्दीत त्यांना तशी परवानगी व राजकीय पाठींबा देणारा पंतप्रधान नरसिंह रावांच्या स्वरूपात होता. त्यामुळे त्या जोडगोळीने भारताला आर्थिक दुर्दशेतून बाहेर खेचायची सुरुवात केली. त्यांची ती कारकीर्द देशाला व त्यांना स्वतःला अभिमानस्पद होती. मात्र, त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांना पंतप्रधानाचे फारसे अधिकार नव्हते व ते घटनाबाह्य शक्तीकेंद्राच्या अधिकाराखाली काम करत होते ही उघड गुप्त गोष्ट (ओपन सिक्रेट) होती. अर्थातच, त्या काळी ते घहटनाबाह्य शक्तीकेंद्राच्या आदेशाप्रमाणे काम करणारे केवळ नावाचे पंतप्रधान पण प्रत्यक्षात ब्युरोक्रॅटच होते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक योजना व्यवहारात आणण्याऐवजी त्यांना घटनाबाह्य शक्तीकेंद्राचे आदेश पाळणे इतकेच काम करावे लागले व दुर्दैवाने ते आदेश देशाच्या फायद्याचे ठरले नाहीत. सर्वात वाईट म्हणजे, एखाद्या अभिमानी शिक्षकासारखे किंवा ब्युरोक्रॅटप्रमाणे, मनाला न पटणार्‍या आदेशांचे पालन न करता किंवा आपल्या अधिकाराखाली घडणार्‍या कुकृत्यांकडे डोळेझाक न करता, सत्तेचा लोभ सोडून पंतप्रधानपदाचा त्याग करणेही त्यांना जमले नसते. त्यांनी तेवढेही केले असते तरी आजही त्यांचे नाव अभिमानाने घेतले गेले असते.

एक नोंद करतो. मानूस हा मुळात जनावर आहे त्याला संस्कृति व कायदा यानी जखडले आहे. सबब तो स्खलन्शील आहे , अगदी मी सुद्धा ! तेंव्हा भ्रष्टाचार हा मलाही हवा असतो. कारण मला खिडकीतली सीट मिळवायची असते. इतराना ती नको अशी माझीच भूमिका॑ असते.पण माझ्या मनाची अशीही धारणा असते की इतरानी नाखुशीने का होईना कायदा पाळला तर मी पाळेन. अशी माझ्यासारखी अनेक माणसे समाजात असतात. वहातुक पोलिस सिग्नल तोडला तर शिक्षा करताना दिसत नाहीत म्हणून आज पुण्यात आधी पाच सेकंद समूहाने गाडी दामटण्याची संवय सर्वाना झाली आहे. अशी संवय मोदी मोडू पहात आहेत. त्याना आर बी आय, सी बी आय.. ई डी , पोलिस , न्याययंत्रणा तुरूम्ग प्रशासन , सायबर सेल यातून अगदी १० टक्के जरी नुसते बाबू लोक न मिळता॑ पेटलेले देशभक्त उच्च पदावर मिळाले तरी सरकारी यंत्रणांचा जरब निर्माण होऊ शकते. " बच्चे सोजा नही तो मोदी आयेगा" अशी धारणा निर्माण झाली तर॑ काम होउ शकते. वरील सर्व यंत्रणामधील भ्रश्ट लोकांच्या भीतीने मोदीनी ही गैरसोयीची पण गुप्त मोहिम आखली. आपल्या देशात काहीच भले होणार नाही अशी भावना सर्वत्र झाली होती .आता गैर लोकाना नवे मार्ग शोधावे लागतील. त्याने देशाचे सॉफ्टवेअर अधिकच विकसित होत जाईल. पुन्हा सांगतो माणूस मुळातच स्खलन्शील आहेच .

In reply to by चौकटराजा

सहमत, करप्शन इज अ ह्युमन प्रोसेस नॉट अ टेक्निकल प्रोसेस हेन्स इट कॅन बी जस्ट 'कंट्रोल्ड' इट कॅनॉट बी 'स्टॉप्ड'.

In reply to by चौकटराजा

आता गैर लोकाना नवे मार्ग शोधावे लागतील. हे प्रश्न मानवी स्वभावामुळे निर्माण होत असल्याने, हा चोर-पोलिस खेळ मानवाच्या सुरुवातीपासून चालू असून मानवाच्याच्या अंतापर्यंत चालू राहील, यात संशय नाही.

जनधन सारख्या योजनेत आतापर्यंत ५०० च्या खाली शिल्लक आहे पण ९ नोव्हेंबर नम्तर ती ४५००० पर्यंत वाढली तर अशा खातेदारांचे महाराष्ट्र राज्यात तरी जातीनिहाय सर्वेक्षण करावे म्हण्जे नक्की कोणती जात किती मागास आहे हे पुराव्यासकट कळून येईल. अभ्यासगटाची गरजच भासणार नाही. बघा पटतं का ..... ?

कपिलमुनी, झी न्यूज ही सर्वात खोटारडी ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे. मग सर्वात चांगली NDTV आहे का ?

बँकांसमोरच्या रांगा अजूनही लांबलचक आहेत. याचे एक कारण म्हणजे काळा पैसा असलेले लोक स्वतः आणि इतरांना हाताशी धरून वारंवार अनेक बँकांना भेट देऊन रु४००० (आजपासून रु४५००) नवीन नोटांत बदलत आहेत असे दिसते. यामागे, या राष्ट्रीय कामात मदत तर नाही, पण "कारवाई मागे न घेतल्यास अनागोंदी माजेल" अश्या धमक्या राष्ट्रीय वाहिन्यांवर देणार्‍या पक्षांचा किती हात आहे हे पाहणेही योग्य ठरेल. याला उपाय म्हणून आता सरकारने न पुसणारी शाई (निवडणूकीत वापरली जाणारी) वापरण्याचे ठरवले आहे. बहुसंख्य लोक अजूनही सकारात्मक आहेत आणि "आजके दुखके बाद सुखही आने वाला है ।" अशा अर्थाची विधाने करताना वाहिन्यांवर दिसत आहेत. त्यावरून लोक या कारवाईचे स्वागतच करत आहेत व त्रास सोसायला तयार आहेत. याविरुद्ध, विरोधी पक्ष जनतेच्या फायद्याच्या कारवाईत सरकारची मदत करण्याऐवजी लोकसभेच्या येत्या सभेत सरकारला कसे घेरता यासाठी एकी दाखवत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेली खालीच चित्रफीत बघा. चित्रफितीत पहिल्या २० सेकंदांच्या जाहिरातीनंतर लोकांच्या रांगा दाखविल्या असून ८-१० जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. चित्रफितीत पार्श्वभूमीला एखादी दु:खद घटना दाखवित असल्यासारखे करूण संगीत असून चित्रफीतीच्या खाली अशी वाक्ये लिहिली आहेत. Impatience, disappointment and anger prevailed as people across the country continued to face hardship in exchanging demonetised currency notes and withdrawing money and struggled to procure essentials to meet daily needs. जर पूर्ण चित्रफीत पाहीली तर हे लक्षात येते की प्रतिक्रिया दिलेल्या सर्व ८-१० जणांपैकी एकानेही या निर्णयाबद्दल नाराजी, विरोध, संताप, निराशा व्यक्त केलेला नाही. थोड्या दिवसात समस्या दूर होईल, आम्हाला काहीच समस्या नाही असे सर्वजण सांगत आहेत. असे असताना वरील दिशाभूल करणारी वाक्ये लिहून चित्रफितीत शोकसंगीत टाकण्याची काय गरज होती? सरकारच्या या निर्णयामुळे काही ठराविक लोकांच्याच बुडाशी जाळ झाल्याचे दिसत आहे व तीच मंडळी विरोध करीत आहेत. बहुसंख्य जनता या निर्णयाला अजिबात विरोध करताना दिसत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शाईचं कळालं नाही. रोज ४५०० बदलायला परवानगी आहे. मग काय रोज शाई लावणार ?

याला उपाय म्हणून आता सरकारने न पुसणारी शाई (निवडणूकीत वापरली जाणारी) वापरण्याचे ठरवले आहे. सुपरसे भी उपरssssssssssss आईडीया !!!

म्हात्रे सर, या कारवाईचे सर्वात मुख्य हेतू, उद्देश व ध्येय काय होते? १. नकली नोटा कि 2. नोटांच्या स्वरूपातील काळा पैसा कि 3. भ्रष्टाचार कि तिन्ही एकत्र? गोंधळमुक्त नियोजन कसे झाले असते यावर लेख लिहिण्याचा विचार करतोय म्हणून मुख्य उद्देश जाणून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या कवायतीतून नेमके आउटपुट काय अपेक्षित होते?

In reply to by संदीप डांगे

नोटा बदलणे हा सामान्य बदल नाही. माझ्या तरी अयुष्यात मानव चंद्रावर गेला या पेक्षाही ही अवघड गोष्ट आहे. तिथे कोपर्‍यावर साड्या वाटताहेत अशी अफवा पसरल्यावर चांगल्या सुशिक्षित बायकाही ती साडी घ्यायला पळालेल्या मी पाहिल्यात. ( नगर सेविकेची कमाल ) हा तर पैशाचा मामला. पैसा कोणत्याही माणसाला कसलीही दुर्बुद्धी सुचविणारा जादूगार. मोदींची ही लढाई १२० कोटी पापी माणसांविरूद्ध आहे. आपण अत्यन्त हिडीस माणसाना पैशातून सत्ता , सत्तेतून पैसा या चक्रात पोहोचवले आहे. या॑ ऑपरेशन मधे संयम, उधारी व काटकसर या तीन तत्वानाच स्थान आहे. बाकी व्यवस्थापनाची नेहमीची तत्वे इथे फोल. काळा पैसा त्यातून बॅकेत येतो आहे हे खरे आहे. पण आता तो अपरिहार्यपणे चौकशीच्या आवाक्यात येतो आहे हे काय कमी आहे. वाईट माणूस स्वता: ला जेवढा हुशार समजतो तेवढा तो नेहमीच नसतो. यात काही मध्यम दर्जाची " काळा" वाले नक्की सापडतील. आज एक शक्क्ल एकाने बोलून दाखविली--- जनधन मधे ० ब्ल्यलन्स असताना ४५००० ची रक्क्म सापडली व त्या व्यक्तीस काही कर्ज असेल तर त्याला पैसे परत न देता कर्ज वसूल करून घ्यायचे. आता बोला !

In reply to by चौकटराजा

दुसऱ्या ठिकाणी लिहिलेला प्रतिसाद इथे परत लिहीत आहे. जिनियस माणसांना वाटत असतं कीआपल्या पेक्षा हुशार माणूस कुणीच नाही. जो उठतो तो असे समजतो कि काळा पैसे ठेवणारे लोक अत्यंत हुशार आहेत आणि काहीही करून त्यांना पकडता येणार नाही. तसेच अंबानी अडानि यांच्यावर जो तो ताशेरे ओढतो आहे. सरकारी/ आयकर अधिकारी भ्रष्ट असतील पण मूर्ख किंवा ढ नक्कीच नाहीत. जिनियस माणसे वापरात असलेल्या क्लृप्त्या त्यांना माहित नाहीत असे समजणे हा भाबडेपणा ठरेल. आतापर्यंत कायद्यात अनेक त्रुटी होत्या.त्या मोदी सरकार कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. अजूनही त्या संपल्या असे मानणे हे भाबडेपणाचे ठरेल. (या अनेक त्रुटी मागील सरकारने जाणून बुजून तशाच ठेवल्या असे मानण्यास जागा आहे.परंतु तो वादाचा मुद्दा ठरेल म्हणून तो बाजूला ठेवा) परंतु गळक्या भांड्याला आपण डाग लावतो तेंव्हा मोठे भोक बंद झाल्यावर लहान भोकातून गळताना दिसते तसेच इथे आहे. जित्कीजास्त भोके तुम्ही बंद कराल तितके तुमचे भांडे जास्त भरेल आणि जास्त काळ त्यात पाणी टिकेल. छिद्रान्वेषी लोक बंद झालेली भोके ना पाहता जी छोटी भोके आहेत त्याकडेच बोटे दाखवून" हेच का तुमच्या मोदी सरकारचे ( सरकार आमचे किंवा तुमचे नसून आपल्या सर्वांचे आहे हे सोयीस्कररीत्या विसरून) भ्र्रष्टाचाराविरुद्ध युद्ध" म्हणून काड्या घालण्यात धन्यता मानत आहेत. आजता गायत कोणत्याही नेत्याला या नोटा "रद्द" करणे हा निर्णय चुकीचा होता हे सिद्ध करता आलेले नाही. म्हणून "त्यामुळे सामान्य जनतेला प्रचंड त्रास होतो आहे" याबद्दल च तुणतुणे वाजवणे चालू आहे. जसे काही सामान्य जनतेचे हेच तारणहार आहेत आणि इतकी वर्षे सामान्य जनतेला भ्रष्टाचारापासून यांनीच मुक्त ठेवले होते. सामान्य जनतेच्या त्रासापेक्षा हि योजना सफल झाली तर आपली दुकाने बंद होतील, पैसा तर गेला आहेच आणि आता पुढच्या निवडणुकीत हि बाराच्या भावात जायला लागेल या भीतिने कावकाव करणे चालू आहे.

In reply to by संदीप डांगे

हे सगळे आणि पाकिस्तानी आयएसआयने छापलेल्या खोट्या नोटा चलनवलनातून काढून टाकणे. कारवाईत काही गोंधळ होणे अपेक्षित होतेच याची मुख्य कारणे (अ) भारतासारख्या देशातील १२५ कोटी लोकांशी संबंध असलेला कारवाईचा आवाका आणि (आ) तुम्ही लिहिलेल्या आणि अतिरक्यांपासून ही कारवाई पंतप्रथान टीव्हीवर उघड करेपर्यंत गुप्त ठेवण्याची निकड (नाहीतर तिची उपयुक्तता बरीच कमी किंवा जवळ जवळ शुन्य झाली असती). या लेखात व माझ्या इथल्या व इतर लेखांवरच्या प्रतिसादांत याबाबतीत बरेच तपशील आले आहेतच. आता लगेच काही कामानिमित्त काही तास बाहेर जात असल्याने सद्या एवढेच.

डॉक्टर सुहास म्हात्रे आणि वाचकहो, मोदींचे पुढील लक्ष्य कोणते? माझ्या मते बेनामी लघुउद्योग. त्यांच्यात मजबूत काळा पैसा आहे. २०१७ नंतर एकही डास उडू शकणार नाही असे मोदींचे वक्तव्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

याबाबतीत माझे काही अंदाज (ते अंदाजच आहेत कारण कोणत्याही सरकारी सुत्रांशी माझे संबंध नाहीत) आहेत... आणि त्यांची वाच्यता करून भारताविरुद्धच्या हितसंबंधाना कळत-नकळत होणारी मदत करू नये असे मला वाटते. इतरांनीही तेच करावे अशी माझी विनंती आहे. अंदाजाच्या गदारोळात एखादा मुद्दा भारताविरुद्धच्या हितसंबंधाना सजग करू शकतो. "पुढे काय होईल" या चिंतेत ठेवून शत्रूला सतत असुरक्षित मनःस्थितीत ठेवणे अर्धी लढाई जिंकण्यासारखे असते.

विरोधी पक्षांचे नेते केवळ सरकारच्या मोहिमेचा विरोध करून थांबलेले नाहीत तर काहीजण "काळ्या धनाने जागतिक अर्थसंकटात भारतिय अर्थव्यवस्थेला तारून नेले आहे" असे राष्ट्रीय वाहिन्यांवर म्हणू लागले आहेत" !!!!!!!!!!!!!!!! Black money helped Indian economy during global recession: Akhilesh Yadav हे स्वप्न आहे काय ? कोणीतरी मला चिमटा काढा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

देवा विरोधी पक्षातील अश्या नेत्यांना माफ कर. त्यांना समाजत नाहीये कि ते काय बोलत आहेत.

आत्ताच वाचनात Eco times ची बातमी आली. Modi's Surgical strike backfires. तशाच आशयाचा रिपोर्ट NDTV ने परदेशी मिडीयाचा हवाला देवून प्रसिद्ध केला आहे. (कंटाळ्यामुळे लिंकवत नाही) . हा निर्णय Backfire होउ शकतो का ? मला तरी सामान्य जनतेच्या भल्याचाच निर्णय आहे असे वाटत होते. अशा प्रकारचा रिपोर्ट वाचुन जरा शंकेची पाल चुक - चुकली. मिपा तज्ञांच्या मते backfire चे chances आहेत का किंवा कसे. ?

In reply to by मोहन

बॅकफायर म्हणजे रद्दबातल नाही हो. बॅकफायर म्हणजे घेतलेल्या निर्णयांचे फायद्यापेक्षा तोटे जास्त होणे ज्यायोगे फायद्यांचे परिणाम शून्य होऊन तोट्याचे परिणाम जास्त होणे. मोदींनी कितीही दबाव आला तरी हा निर्णय अजिबात मागे घेऊ नये, फक्त चलन टंचाईवर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात.

डांगेजी - मी ही Backfire म्हणजे फायद्यापेक्षा तोटे जास्त या न्यायानेच वापरला. ( त्याला पर्यायी मराठी शब्द सुचला नाही म्हणून ) . या लेखांनुसार मोदींनी कुणाही तज्ञाची मदत न घेता हा निर्णय आपल्या मर्जीतल्याच काहीच्या भरवशावर घेतला असावा. हे आता मोदींच्याही लक्षात आले असल्याने त्यानी गोव्यात मेलोड्राम्याटीक भाषण केले असाही युक्तीवाद केला आहे.

In reply to by मोहन

अशा लेखांना फाट्यावर मारायचं, लक्ष देऊ नका. आपण आपल्या आजूबाजूच्या जनजीवनावर काय परिणाम होतो त्यावर बारीक लक्ष ठेवायचे. ही कायमची सवय ठेवली तर बदल लक्षात येत राहतात व माध्यमांमधे आलेले कितपत योग्य त्याची पडताळणी होते. त्यांच्या लेवलला त्यांना काय माहिती, सल्ले उपलब्ध होते त्यावर त्यांनी अमूक एक निर्णय का घेतला हे त्यांनी स्वत: सांगितल्याशिवाय समजणार नाही. आपण फक्त अंदाज लावणार. मी इथे बसून टाइप करतोय, माझी साधने अत्यंत मर्यादित आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तिकडे असलेली साधने, मनुष्यबळ हे हजारोपटीने माझ्यापेक्षा जास्त सक्षम व सर्वंकष आहे. त्यांचा निर्णय हा योग्य व पूर्ण अभ्यासाअंतीच आलेला आहे. तो त्यांनी स्वतः घेतल्याची शक्यता शंभर टक्के आहे. पंतप्रधान एक धाडसी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या स्वभावाला साजेसेच वर्तन घडले आहे त्यात आश्चर्यकारक काहीच नाही. काही निर्णय अंमलबजावणीला आल्यावरच त्यातले गुणदोष कळायला लागतात. पुर्वी असं झालंय म्हणून आताही होईल असे काही नसतं. दोन आणि दोन बरोबर चार हे गणितात होतात, प्रत्यक्ष होतीलच असे नाही. कागदावर दिसणारी योजना प्रत्यक्षात आली की वेगळी होऊ शकते. किंवा काही मोठे फायदे-बदल घडवून आणण्याच्या मोठ्या उद्दिष्टांना जास्त प्राथमिकता देऊन कोलॅटरल डॅमेजही गृहित धरलेला असतो. नुकसानाचा परिघ व प्रभाव किती हेही बघितलेले असते. मला वाटतं ते असं की पंतप्रधानांच्या निर्णयाच्या परिणामांचा आवाका व त्यासाठी करायला लागणारी व्यवस्था याचे कुठेतरी काहीतरी बिनसले. तिसर्‍या-चौथ्या लेवलपासून खालच्या अधिकार्‍यांना गुप्ततेमुळे निर्णयाची तातडी व गंभीरता लक्षात आली नसल्याने थोडी दिरंगाई, चालढकल झाली असल्याचा माझा 'अंदाज' आहे. आपल्याला सर्व प्लानिंग ने घरातून ७ चाजता निघून चौकातली बस पकडून रेल्वेस्टेशनला जाऊन लोकल पकडून दोन तासाचा प्रवास करुन एखाद्या ठिकाणी पोचायचे आहे. पण घरातून निघायला १० मिनिट उशीर झाला तरी पुढचे नियोजन कुठेतरी बिघडून आपण प्रत्यक्ष गंतव्यस्थळी एक तास उशीराने पोचण्याची शक्यता निर्माण होते. कारण मधल्या साखळीतल्या विविध शक्यतांचा एकमेकांशी असलेला ताळेबंद हुकतो. दुसरं असं की काळापैसा हा वरकरणी दाखवला जाणारा उद्देश शत्रूंना अजूनही गाफिल ठेवण्यात व कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. पण माझ्यामते कालांतराने तरी हा उद्देश जनतेसमोर आला पाहिजे, अन्यथा अशा प्रकारच्या प्रचंड प्रयोगात पुढच्या वेळेस जनतेची साथ लाभेलच असे नाही. बाकी जर तर च्या वादविवादात आता पडून उपयोग नाही. ३१ डिसेंबर डेडलाईन आहे. तोवर बॅन्काण्च्या बाहेरच्या लाईनी डेड झाल्या तरी पुरे! सध्या लाईनीतली माणसेच डेड व्हायची साथ सुरु आहे.

In reply to by मोहन

या निर्णयाने ज्यांचे मोठे नुकसान होईल अश्या भारतात आणि भारताबाहेर अनेक लॉबीज आहेत. तेव्हा या कारवाईच्या विरोधी मते माध्यमांत आली नाही तरच आश्चर्य वाटायला हवे. कारवाईच्या विरुद्ध असलेली मतेही (काही अतिउत्साही राजकारणी सोदले तर) अगदी लॉजिकल वाटावी अशीच मांडली जाणार. कारण भ्रष्टाचारी तत्वांसाठी भ्रष्टाचार कायम ठेवणे किंवा अतिरेकी तत्वांसाठी त्यांचे रुळलेले अर्थिक मार्ग कायम ठेवणे हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. या आणि कोणत्याही मोठ्या कारवाईत, "उपाय मूळ रोगापेक्षा जास्त जालीम होऊ नये इतके तिला व्यवहारी बनवण्यासाठी", काही कमी ठेवाव्या लागतातच (उदाहरणार्थ, या कारवाईत काही लोकोपयोगी सेवांत जुन्या नोटा स्विकारण्याची सूट दिलेली आहे. त्याच्या आधारे बराच काळा पैसा वापरला जात असणारच.). अश्या 'मोहरीचा पर्वत बनवणे' आणि 'नसलेल्या मोहरीतूनही पर्वत तयार करणे' यासाठी सर्वच गट अनेक विचारवंत पोसत असतात, याची भारतात (व सर्व जगात) कमी उदाहरणे नाहीत. सर्वसामान्य भारतीय म्हणून आपला सरकारवर आणि त्याच्या कारवाईवर विश्वास असला तर, उगाच गोंधळात न पडता (कारण त्याने आपला गोंधळ वाढण्यापलिकडे जास्त काही परिणाम होत नाही; आणि लोकांचा गोंधळ वाढवणे हा तर विरोधी तत्वांचा मुख्य उद्येश असतो.), सरकारला त्याची मुदत (या कारवाईत ३० डिसेंबरपर्यंत) देऊन काय परिणाम होत आहेत तिकडे लक्ष देत रहावे, हे मला योग्य वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कारवाईच्या विरुद्ध असलेली मतेही (काही अतिउत्साही राजकारणी सोडले तर) अगदी लॉजिकल वाटावी अशीच मांडली जाणार. वरचे अखिलेश यादव यांचे "काळा पैसा अर्थव्यवस्थेला उपयोगी असते" हा दावा एक मूर्खपणा नसून नेत्याच्या शब्दांवर डोळे मिटून विश्वास ठेवणार्‍या भारतातल्या असंख्य अंधभक्तांना आपल्या बाजूला वळविण्याचा किंवा त्यातला खोटेपणा ओळखूनही स्वार्थी हितसंबंधासाठी त्या दाव्याची भलावण करून आपली रोटी भाजणार्‍या लोकांना दिलेला दिलासा आहे. जेव्हा केजरीवाल किंवा राहूल गांधी "कोठे आहेत करोडपती बँकेच्या रांगात?" असे विचारतात तेव्हा फारसा विचार न करणार्‍या सर्वसाधारण माणसाचा "अरे खरंच, ते लोक का नाही उभे माझ्याबरोबर उभे?" असा विचार करण्याइतका बुद्धीभेद होतो. जरा विचार केल्यावर हे ध्यानात येते की, (अ) ज्यांना खर्‍या व्यवहारांसाठीसुद्धा बँकेत जावे लागत नाही असे कोट्याधिश आता तेथे जावून १, ५, १०, १०० कोटी बॅगेत (किंवा टेंपोमध्ये) घेऊन बँकेत जातील व सरकारच्या जाळ्यात अडकण्याचा मूर्खपणा करतील का?"; (आ) "असे केले तरी त्यांचे त्याच्या कोट्यावधी काळ्या पैशातले कितीसे पैसे सुरक्षितपणे पांढरे होतील?"; (इ) "काळे पैसे लपवायला इतर सुरक्षित मार्ग शोधणे किंवा 'बिझनेस लॉस' समजून काळे पैसे नष्ट करणे/कचर्‍यात टाकून देणे व स्वतः सुरक्षित रहाणे (पक्षी : सीर सलामत तो पगडी पचास न्याय) त्यांच्या करिता जास्त चांगले असणार नाही का?" या प्रश्नांची खरी उत्तरे वरची विधाने करणार्‍या राजकारण्यांना माहित नसतील इतके ते निर्बुद्ध निश्चितच नाहीत. त्याउलट, लोकांचा बुद्धीभेद करून आणि त्यांना उल्लू बनवून त्यांच्यावर राज्य करणे हा तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ आणि जीवनभरचा व्यवसाय असतो, नाही का ? :)

डांगेजी व म्हात्रे साहेब आपल्या दोघांशीही सहमत आहे. मी मोदींचे गोव्यातले भाषण टी.व्ही वर पाहिले आणि तेंव्हाच मला तरी ते "मोदींसारखे" वाट्ले नाही. " वो लोग जान के पीछे पडे है, किंवा ५० दिन दो ... उसके बाद चौराहेपर जो सजा देश देगा .... वगैरे बाबी तर फारच खटकल्या " कुठे तरी तणाव आणी Fear of Unknown जाणवत होता. इतरांच्या बाबतीत जरी हे अपेक्षीतच असते तरी मोदी जरा वेगळ्याच मुशीतुन घडलेले सामान्यतः दिसतात. म्हणुन जरा शंका यायला लागली होती.

भ्रष्टाचार वाढून सामान्यांना झळ पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक उदाहरण देतो. एक शिक्षण संस्था आहे तिथे शिक्षकांना तीस हजार पगार आहे. तो त्यांच्या बॅक खात्यात थेट जमा होतो. पण भ्रष्ट संस्थाचालकांनी एक अलिखित नियम बनवला आहे की पगार जमा झाल्यावर दहा हजार रुपये रोख कार्यालयात आणून जमा करावे. जे असं करणार नाहीत त्यांच्या नोकरीचे अर्थातच काही खरे नाही. अशा प्रकारे संस्थाचालकांनी भरपूर माया/काळा पैसा जमवला आहे. आता नोटा रद्द झाल्याने त्यांचे काही लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे चरफडणार्‍या संस्थाचालकांनी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी फर्मान काढले की पूढील महिन्यापासून शिक्षकांनी दहा ऐवजी बारा हजार जमा करावे. असे झाल्यास सामान्य माणसाला झळ पोहोचली असेच म्हणावे लागेल ना ? मी मोदी विरोधक नाही. नोटा रद्द करण्याच्या निर्णयालाही माझा विरोध नाही. [अर्थात अंमलबजावणी अजून चांगल्या प्रकारे व्हायला हवी होती. निदान आता लवकरात लवकर नवीन नोटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन द्याव्यात] पण पाठिंबा देतानाही सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा करणे योग्य असे मला वाटते. साठलेल्या काळ्यापैशाविरोधी कारवाई करतानाच भ्रष्टाचार विरोधी अनेक पावले उचलणे गरजेचे आणि तातडीचे आहे. मुख्य म्हणजे देशात वेगवेगळ्या ठिकाणी चालणारा भ्रष्टाचार निपटून काढणे एकट्या केंद्राला कधीच शक्य होणार नाही. खरं तर खूपशा बाबी राज्याच्या अखत्यारित आहेत, शिवाय न्यायव्यवस्था पूर्णपणे प्रामाणीक आणि सक्षम हवी. जसे वरील उदाहरणात शि़क्षक संस्थाचालकांविरुध्द तक्रार का करत नाहित ? तर त्यांना न्याय मिळण्याची खात्री नाही.. न्याय मिळणे तर दूर हातात असलेली नोकरी पण जाईल ही भिती आहे. प्रकरण जास्त ताणले गेल्यास अजूनही इतर प्रकारे त्रास होण्याची शक्यता आहे. कुणी म्हणेल त्याने धैर्याने , न डगमगता ही लढाई लढावी. पण सामान्य माणूस असे करु शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

अनंत अडचणी आहेत, व्यक्ती तितक्या अडचणी असणारच. एवढं जनार्दन रेड्डीने खर्च करून लग्न लावलं, पण त्याला विचारलंत तर तो पण अडचणी सांगेल. तुम्ही बहुतेक सर्व सांगत आहात त्या मानसिकतेशी निगडीत आहेत. ज्याला भ्रष्टाचार करायचाच आहे तो विविध मार्ग शोधत राहणार. पण म्हणून उपाय करू नये का? भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि परत काळा पैसा तयार होऊ नये अशी एक किंवा अनेक योजना असतील तर कृपया सांगा. आपण सर्व मिळून साधक बाधक विचार करू आणि मग PMO ला कळवू. हे उपहासाने म्हणत नाहीये आणि वैयक्तिक तुमच्यावर आरोप करतोय किंवा आव्हान देतोय असे कृपया समजू नये. निर्णय आवणाऱ्याने/ न आवडणार्याने किंवा कोणी पण एक किंवा अनेक लोकांनी मिळून उपायांवर चर्चा करावी अशी अपेक्षा आहे.

In reply to by ट्रेड मार्क

भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि परत काळा पैसा तयार होऊ नये अशी एक किंवा अनेक योजना असतील तर कृपया सांगा. आपण सर्व मिळून साधक बाधक विचार करू आणि मग PMO ला कळवू.
वरती थोडक्यात लिहिलंय. पुन्हा लिहितो भ्रष्टाचार आणि 'कायदा व सुव्यवस्था' या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत खूपशा गोष्टी राज्यांच्या अखत्यारित येतात. सर्वात महत्वाच्या म्हणजे पोलीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक खाते (ACB) त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे मग दुसरा उपाय हा की राज्यांचा या खात्यांवरील प्रभाव कमी करणे पोलीस किंवा ACB विरोधात केंद्राकडे सहज तक्रार करता आली पाहिजे. 'आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा. तक्रारींची दखल वेळेत घेतली गेली पाहिजे. दुसर्‍या बाजूने न्याययंत्रणा भ्रष्टाचार मुक्त आणि सक्षम हवी. 'तारीख पे तारीख' पद्धत बदलून वेळेत न्याय मिळायला हवा. त्याकरिता मात्र एकटे सरकार फार काही करु शकत नाही. सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत. भ्रष्टाचार्‍यांना आधी रोखणे गरजेचे आहे. नोटा रद्द करण्याच्या top down approach इतकंच bottom up approach महत्वाचं आहे. यासाठी एक-दोन उपाय सांगता येणार नाही. तर प्रत्येक यंत्रणेचा स्वतंत्र अभ्यास करुन त्यातील loopholes हळू हळू दूर केले पाहिजेत. Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाही. काळा पैसा बाहेर काढण्याचं काम नंतर केल्यास बरं असं माझं मत आहे.

In reply to by मराठी कथालेखक

त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे:
जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी तेवढा चांगला शासनकर्ता पूर्ण बहुमताने सगळ्या राज्यांमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहिजे. आपल्याकडची राजकीय पक्षांची संख्या बघता तर हे नजीकच्या भविष्यात होईल असं वाटत नाही.
आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा
यासाठी ऑनलाईन पोर्टल केले आहेत/ काम चालू आहे
सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत.
माझ्या आठवणीप्रमाणे मोदी सरकारने सुरुवातीच्या काळात बरेच जुने कायदे रद्दबातल केले होते. या कायद्यांचा उपयोगापेक्षा त्रासच जास्त होता. त्यामुळे काम चालू आहे पण गेल्या ६०-७० वर्षांची घाण साफ करायला वेळ तर लागणारच.
भ्रष्टाचार्‍यांना आधी रोखणे गरजेचे आहे
हा परत मानसिकतेचा मुद्दा आला. जिथे लहानपणापासून नियमांच्या विरुद्ध करणारा म्हणजे हिरो, हे बिंबवलं जातं तिथे हे कसं साध्य करणार? मुळात भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. याचा फक्त पैश्यांशी संबंध नसून प्रत्येकाच्या वागण्याशी पण आहे. जिथे लोकांना साधं सिग्नलला १ मिनिट थांबता येत नाही, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबता येत नाही तिथे तुम्ही भ्रष्टाचार कसा रोखणार? पाणपोईवरच्या पाण्याच्या भांड्यांपासून रस्त्यांवरच्या गटाराच्या झाकणापर्यंत चोरून नेलं जातं. रुपये ५०००० च्या खरेदीवर १०००-१५०० रुपये वाचावे म्हणून बिल नाकारलं जातं तिथे भ्रष्टाचार कसा रोखणार? असो.
Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाही
continuous improvement तर असणारच आहे. पण ज्यावेळेला एखादी गुंतागुंतीची प्रणाली (functionality), ज्यात भरपूर परस्परावलंबित्व आहे, ती एकदमच पूर्ण करायला लागते. मग एकदा बेसिक नीट झालं की मग continuous improvement करत राहायला लागतं. आत्ता सुद्धा हा तुम्हाला एकदम स्ट्राईक वाटतोय पण - जनतेला बँकिंग प्रणाली मध्ये आणण्यासाठी जन धन योजना, मॉरिशस व इतर पैसे फिरवण्याचे मार्ग बंद केले किंवा प्रयत्न तरी केले गेले, बेहिशोबी पैसा जाहीर करण्यासाठी २ वेळा मुदत दिली, २००० च्या नोटा छापण्याची तयारी ६ महिने चालू होती, बँकांना १०० व त्याच्या आतील नोटा जास्त प्रमाणात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. आता यापेक्षा जास्त म्हणजे फक्त या तारखेपासून ५००-१००० च्या नोटा बंद करणार असं सांगणं बाकी होतं. जे आधी सांगणं उपयोगी नव्हतं कारण मग काळाबाजारवाल्यांनी सगळ्या १०० व त्याखालील नोटा आधीच पळवल्या असत्या. म्हणजे परत सामान्य माणसाचे हालच झाले असते. मी एक मस्त प्लॅन मिळेल, ज्यात स्टेप बाय स्टेप काय आणि कसं करावं हे असेल, अशी अपेक्षा केली होती. तुम्ही म्हणताय ती सर्वसाधारण रूपरेखा झाली. यात जो पडून राहिलेला पैसा आहे किंवा जो मालक बदलतोय पण बँक/ आयकर विभाग टाळतोय त्या बाहेर कश्या काढणार आणि खोट्या नोटा आहेत त्या रद्द कश्या करणार?

पोलीस वाहनांमधून नेल्या जाणाऱ्या जुन्या नोटा पकडत आहेत. जर त्या सिर्फ कागज का तुकडा रह गयी है तर हे कागज के तुकडे पकडण कसं काय योग्य, काही लोक अजूनही बंद नोटा स्वीकारत आहेत, तेही कसे कायदेशीर? पोलीस कंप्लेंट करावी काय?

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, मागे लिहिल्याप्रमाणे जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द झालेली असली तरी लोकं त्या आपसांत व्यवहारार्थ वापरू शकतात. त्यांना अडवणारं कोणी नाही. मात्र यामुळे काळा पैसा खेळता राहायला मदत होईल. म्हणून पोलीस असा पैसा पकडत आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही तो 30 डिसेंम्बर पर्यन्त खेळत राहील? त्यानंतर त्याची किंमत शून्य होईल, म्हणजेच 9 तारखेला जे झालं ते काय मग? काय तरी मिसिंग आहे. ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी रुपये आहेत ते मजूर, नोकर, लेबर कॉन्ट्रॅक्टर तर्फे 300 रुपये रोजंदारीवर पैसा पांढरा करून घेत आहेत. 50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात. कारण 200 कोटीवाला मध्यमवर्गीय पापभिरू नाही, त्याच्याकडे त्याच्या लेव्हलचे रिसोर्सेस असतात,

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, १.
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही तो 30 डिसेंम्बर पर्यन्त खेळत राहील?
३० डिसेंबरच कशाला, जगाच्या अंतापर्यंत खेळता राहू शकतो. ९ ला जे झालं तो शासकीय निर्णय होता. त्यानुसार जुन्या नोटा हे शासनमान्य वैध चलन ( = लीगल टेंडर) राहणार नाही. मात्र इतर लोकं ते चलन म्हणून वापरू शकतात. त्यावर शासन बंधन घालू शकंत नाही. २.
50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात.
आपापसांत अवैध चलन चालवणे म्हणजे पैसा पांढरा करून घेणे नव्हे. आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

असा "मजूर" एका बँकेतल्या एका व्यवहारात वापरणे थांबवणे व्यवहारात शक्य नाही. पण आता प्रत्येक ट्रांझॅक्शनसाठी पुसता न येणार्‍या शाईचा एक ठिपका बोटावर लावला तर असा मजूर एकूण किती वेळा "वापरला" गेला आहे ते समजेल आणि त्याने अनेक वेळा बँकांना भेट दिली असल्यास त्याच्या पैश्याचा स्त्रोत विचारता येईल. किंबहुना, आपल्या हातावर शाई लावतात इतकेच कारण बहुतेक अश्या मजूरांना वापरणे किंवा स्वतःला वापरून देणे थांबवायला पुरेसे होईल. त्यातही, कोणी ते चालू ठेवलेच तर "मजूराच्या" मदतीने वापरलेल्या काळ्या पैशाच्या स्त्रोतापर्यंत पोचणे शक्य आहे. सर्व पैसे बदलाचे व्यवहार लिखित स्वरूपात व ओळखपत्रासह आहेत. तेव्हा सद्याचा गदारोळ संपल्यावरही संशयास्पद प्रकरणांची चौकशी करता येईल.