Skip to main content

तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 13/09/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे. धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती. धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे. - दररोज पूजा करणं - मंदिरात नियमितपणे जाणं - देवाला नवस बोलणं - तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं - विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं - पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं - शिवाशीव, विटाळ पाळणं - मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं. - घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं. - घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा. १. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.) २. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.) ३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.) उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.

वाचने 51339
प्रतिक्रिया 205

प्रतिक्रिया

या सगळ्या गोष्टीन्चा आणि श्रद्धेचा काही संबंध नाही हो. गॉड फिअरिंग सोलवाल्यांचे हे सगळे प्रकार आहेत.

वरील दोन्ही प्रतिसादांशी तंतोतंत बाड़ीस , तुम्ही जे जे दिले आहे लिस्ट मधे ते आस्तिक/सश्रद्ध वगैरे पेक्षा देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या पब्लिक चे विधी जास्त वाटतात

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या पब्लिक चे विधी यासाठी खास टाळ्या !

धर्म, श्रद्धा आणि रुढीप्रियता ह्यां सर्वात फरक आहे, असे वाटते.
या सगळ्या गोष्टीन्चा आणि श्रद्धेचा काही संबंध नाही हो.
हे आक्षेप योग्य आहेत. सश्रद्ध, धार्मिक मन आणि पाळल्या जाणाऱ्या रुढी यांच्यात थोडंफार कोरिलेशन असेल, पण रुढीप्रियता म्हणजेच धार्मिकता नाही हे उघड आहे. मला अनेक उदाहरणं माहीत आहेत, जिथे 'माझी आई पूजा आपली प्रथा म्हणून करायची, पण देवावर तिचा फारसा विश्वास नव्हता. ते तिच्यासाठी एक करण्याचं काम होतं' असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मी दिलेल्या निकषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तरी काही हरकत नाही. ते वापरा म्हणण्यापेक्षा 'या या गोष्टींचा तुम्हाला विचार करता येईल' या स्वरूपाची मदत म्हणून होते. मुलांनी आपल्या आईवडिलांबरोबर इतका वेळ घालवलेला असतो की त्यांना आपल्या आईवडिलांचा स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत हे व्यवस्थित माहीत असतं. स्वतःविषयीही तेच. त्यामुळे आईवडिलांशी स्वतःची तुलना ही बऱ्यापैकी बरोबर असेल अशी आशा आहे. तेव्हा तुम्ही नक्की कुठचे निकष वापरता हे महत्त्वाचं नाही. कदाचित वेगवेगळे निकष लावून तुम्ही आत्तापर्यंत निष्कर्ष काढलेलाही असेल. तो सरळ वापरला तरीही चालेल.

In reply to by राजेश घासकडवी

मुळातच स्वतः सोडून दुसर्‍या एखाद्याची - अगदी आई, वडिल असले तरी - श्रद्धा, विश्वास ह्याचे योग्य आणि अचूक मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न पडला आहे. हे सारे फारच सापेक्ष होईल असेही वाटते आहे, म्हणजे मूलभूत असे निष्कर्ष निघणार नसतील तर कितपत अचूकता असेल असेही वाटते आहे. तरीही कोणी लिहिणार असेल तर वाचायची उत्सुकता आहेच.

In reply to by यशोधरा

ओक सरांची आठवण आली. त्यांची नाडीची कट्टर चिकाटी, यांची कट्टर नास्तिकतेची. नास्तिक करून सोडेन सकलजन हा यांचा दावा दिसतो. असो. शुभेच्छा मास्तुरे!

In reply to by प्यारे१

अहो मी मिपावर जवळपास शंभर लेख लिहिलेले आहेत. त्यातले नास्तिकतेची भलामण करणारे किती ते तपासून बघा जरा.

In reply to by राजेश घासकडवी

बस्स काय मालक? या विषयावर किति तरी वेळा चर्चा झाल्या आहेत की. http://misalpav.com/node/24879 ही तुम्हीच सुरु केलेली चर्चा पुन्हा एकदा वाचाल काय? उगा उतरणीला लागलेली भारतीय टीम जिंकायला कुणा लिंबू टीम बरोबर खेळून जिंकते तसं वाटायला लागलं आहे. टीआरपी कमी झाला की असले विषय काढून स्कोअर करायचा.

In reply to by प्यारे१

म्हणजे तुम्हाला शंभरात एक लेख सापडला... आणि तुम्ही माझी तुलना शशिकांत ओकांशी करता! काहीही हं, प्यारे१!

In reply to by राजेश घासकडवी

एक उदाहरण दिलं साहेब... बाकीची तुम्हाला माहिती आहेत की. लेख आणि प्रतिसाद सुद्धा वाचण्यासारखे असतात हो आपले. :)

मी तरी देवाचा उपयोग करून घेतो. चांगले यश मिळाले तर देवाने दिले आणि अपयश आले तर, ते मात्र माझ्या चुकीने, अशीच मानसिक धारणा आहे. त्यामुळे माझ्या मते तरी, देव हा उत्तमच, कारण तो नेहमीच माझ्या यशाचा धनी. राहता राहिला तुमचा प्रश्र्न. "तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?" थोडा जास्तच. आमचे माता-पिता, तीर्थक्षेत्री जातात ते पदभ्रमण करायला.गर्दी नसेल तर देवाला दर्शन पण देतात.चुकुन कधी वडीलांनी अभिषेक केला असेल तरच. त्यामानाने आम्ही थोडे बरे. गुहागरला व्याडेश्र्वरला अभिषेक घालतो आणि त्याच दिवशी साग्रसंगीत भोजन पण करतो. एकाच दगडात २ पक्षी, अभिषेक केला म्हणून बायको खूष आणि चिपळूणच्या "दीपक"ची तीर्थयात्रा पार पडली म्हणून आम्ही पण खूष. तुमच्या अज्जून काही प्रश्र्नांची माझी उत्तरे......कंसातील उत्तरे मिपाच्या बाबतीत, कारण मिपा हाच आमचा देव आणि मिपाकर हेच आमचे सगे-सोबती. - दररोज पूजा करणं ====> अजिबात नाही.वाचनातूनच वेळ मिळत नाही.(आणि मिपा-मिपा खेळतांना तर नाहीच नाही.) - मंदिरात नियमितपणे जाणं ====> अजिबात नाही.आमच्या दर्शनाने उगाच त्याचा दिवस खराब जायचा.(मिपाच्या मंदिरात मात्र जमेल तशी हजेरी लावतोच) - देवाला नवस बोलणं ===> हमखास.पण अजिबात फेडत नाही.आपल्या संकटाचा भार त्याच्यावर टाकायचा आणि संकटाचा सामना आपला आपणच करायचा. (आमच्या मिपाला उत्तम-उत्तम लेखांचा अभिषेक क्षणो-क्षणी मिळू दे, असा नवस मात्र रोजच बोलतो.) - तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं ===> त्याचा उल्लेख केला आहे. (मिपाकरांबरोबर कट्टा करणे ही पण एक प्रकारची तीर्थयात्राच) - विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं ====> विवाह-मुंज-वास्तूशांत, ह्याबद्दल परत कधीतरी...पण आमचे सत्यनारायण पण वेगळेच असतात.मिपाकरंना ह्याबाबतीत वेगळे सांगायला नको. - पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं ====> प्रचंड जागरूक असतो. अद्याप तरी कुणालाही एका नव्या पैशाने फसवले नाही, की कुणाला मानसिक-शारिरीक आणि आर्थिक त्रास दिलेला नाही.जमेल त्याला जमेल तशी मदतच केली. हेच आमचे पुण्य. आणि पापाच्या बाबतीत म्हणाल तर, रोज मिपावर बैठक टाकून बसणे. - शिवाशीव, विटाळ पाळणं ===> अजिबात नाही. (आम्ही डू-आडींच्या लेखाला पण कधी-कधी प्रतिसाद देतो.) - मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं. ====> अजिबात नाही. (काही डु-आय-डींना इथले संमं, योग्य त्यावेळी, त्याच्या कर्माचे फळ देतातच. नाना प्रकारे, गहन-विचार करून फुकाचा हितोपदेश करणारे बरेच जण जागो-रे-जागो-रे करत गेले.) - घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं. ====> अजिबात नाही. (मिपावर मात्र जमेल तसा प्रतिसाद देतोच.) - घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं ====> आमचे देवा=विषयी एकूण मत, देवाला पण ठावूक असल्याने, तो पण बिचारा एका भिंतीवर जागा पकडून असतो. (मिपा साठी २ स्थाने आहेत.एक हॉल मध्ये आणि दुसरा शयन-खोलीत.) थोडक्यात तर आम्ही, "कुठे शोधिशी रामेश्र्वर अन कुठे शोधिशी काशी...." आणि "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले....." अशा मिपाकरांच्या पंक्तीतले.

आईवडिल - १ मी - ३ दोन्हीही पक्ष एकदम कट्टर! ;-) त्यामुळे आमच्या घरात रोजचीच महायुद्धे व्हायची. हेहेहेहे!

३:४;) विषय गंडलाय पण ट्यार्पीसाठी बराय!

In reply to by जेपी

प्रचलित असलेले मात्र घासूगुरुजींच्या यादीत नसलेले दोन प्रकार आहेत: नास्तिक आणि अज्ञेयवादी. तू कोणत्या प्रकारात येतो?

In reply to by सतिश गावडे

एक्क़ा काकानी ती फेयर अन लव्हली स्टाइल ची स्ट्रीप काढली होती ना काही दिवसापूर्वी? नास्तिक ते आस्तिक ची?

In reply to by सतिश गावडे

परिवार गरजेपुरते धार्मिक आहे(उदा.वेळ वाचवण्यासाठी चटश्राद्ध चालेल.) मी आस्तिक कडुन पुर्ण नास्तिक होत गेलो.(उदा.कर्मकांडावर पैसे आणी वेळ वाया घालवण्यापेक्षा इतरत्र सत्कारणी लावेन)

वरील यादित ४- नास्तिक ५- अज्ञेयवादी या दोन अजुन जोडल्या पाहिजेत कारण नाहीतर वरील यादित उत्तर कसे देणार ? हे म्हणजे तृतीयपंथीया ला मेल किंवा फिमेल एकपैकीच निवड कर असे विचारण्यासारखे आहे ? तर वरील यादि त ४ कींवा ५ जोडले तर माझे उत्तर आई वडिल -१ मी- ५ असे देइल घासकडवींनी त्यांच्या सोयीसाठी मला ३ मध्ये बसवुन घ्यावे. वर्गीकरणाची व्याप्ती वाढणे आवश्यक आहे मात्र. हे शेपुट फार वाढेल असे वाटत असेल तर ६- इतर असे म्हणुन ब्लँकेट मध्ये इतर सर्व कॅटेगरीज टाकाव्यात पण बेसीक तीन धार्मिक नास्तिक व अज्ञेयवादी त कॉम्प्रोमाइज करण्यात अर्थ नाही

आइ २; वडिल ३; मी इट्स कॉम्प्लीकेटॅड...

त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा. १. तुमच्या यादीत वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे नास्तिक आणि अज्ञेयवादी यांचा समावेश हवा. २. अजून एक, यादीत "काय म्हाय्त नाय बुवा" यांनाही स्थान दिले पाहिजे. वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो... कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो...
हे काहींना लागू होते त्यामुळे सहमत.
कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;)
हे काहींना लई येळा लागू होते म्हणून लई येळा सहमत.

(कदाचित विषयांतर होईल पण तरीहि हे चिटकवतोय हे वाचून वडील अन म्या ३ नंबरला आहे याचे समाधान वाटते.) श्री. गिरीष लाड यांची पोष्ट ( डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांचे सहकारी ) लहानपणापासून मी देव मानणारा, कुंभ रास असल्याने नियमितपणे शनिवारी शनिमंदिरात जावून तेल वाहणारा आणि इतर सगळे धार्मिक कर्मकांड करणारा होतो. जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती आली तेव्हा तेव्हा देवाशी भावचाल पण केली. हे झाल तर ते देईन, अस झाल तर तस करीन वगैरे वगैरे प्रत्येक वेळी हि शंका होतीच कि असे खरच होत असते का? देव खरच आहे का? पण गांभीर्याने विचार कधीच केला नव्हता. वाटायचं कि इतकी वर्ष सगळे देव देव करताहेत, सगळी मोठी, थोर मानस देव मानताहेत, म्हणजे असेल. आपण कशाला नसत्या उद्योगात पडायचे. नुकसान काय आहे? झाला तर फायदाच आहे. आणि शिवाय गरज पडल्यावर शेवटी देव सोडून कुठे जाणार आपण? परत मेल्यानंतर खरच देव असला, स्वर्ग नर्क असला तर? कशाला चान्स घ्या. म्हणून सगळे सुरळीत चालले होते. माझी आणि माझ्या आजीची (ती आत्ता ८५ वर्षांची आहे) नेहमी जुगलबंदी चालायची. मी एन सी सी मध्ये होतो आणि नेहमी शनिवारीच दाढी केली नसल्याची आठवण यायची, परत रविवारी सकाळी एन सी सी ला उशीर झाला तरी शिक्षा आणि दाढी नाही केली तरी शिक्षा, त्यामुळे शनिवारी माझी आणि आज्जीची चकमक ठरलेली. ती नेहमी ओरडायची कि शनिवारी दाढी करू नये, मग मी तिला कारण विचारायचो आणि ती म्हणायची कि शास्त्रात लिहिलंय. मग माझा पुढच प्रश्न, कुठाय शास्त्राच पुस्तक, आणि तू कधी वाचाल? अशी आमची अनेक भांडणं व्हायची, प्रत्येक वेळी हे असे का, ते तसे का? आणि एकच उत्तर मिळायचे कि शास्त्रात लिहिले आहे. प्रश्न विचारू नको, सांगते ते गपचूप कर. प्रत्येक वर्षी दिवाळीला लवकर उठून अंघोळ कर नाहीतर नरकात जाशील, याच्यावरून तर गमती जमती ठरलेल्या. मी तिला चिडवायचो, कि अमेरिकेतील सगळे लोक नरकातच भेटतील. २०१० साली दाभोलकरांना पहिल्यांदा भेटलो. साधना साहित्य संमेलन कोल्हापुरात भरल होत आणि तिथे मी पाणी प्रश्नावर एक ऑडियो पुस्तक बनवले होते त्याचे प्रकाशन अमोल पालेकरांच्या हस्ते होते. तेव्हा डॉक्टरांची आणि माझी पहिली भेट झाली. तो पर्यंत खरतर अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे काही माहित नव्हते. मग डॉक्टरांशी अजून परिचय झाला आणि पुढे बरच वाचण्यात पण आल. माझ्या गर्भलिंग निदान रोखण्याच्या कामाला पाठबळ देणारे डॉक्टर एकमेव सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती होते. बाकीचे विरोधच करत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी कौतुक आणि कुतूहल जास्तच वाढले. पुढे त्यांच्या व्याख्यानांच्या ऑडियो सीडी बनविण्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही त्यांच्या १० व्याख्यानांची ऑडियो सीडी काढायचे ठरवले. १० दिवसांकरता एक स्टुडियो बुक केला आणि आम्ही रोज सकाळी स्टुडियोत भेटू लागलो. ते एकसंध व्याख्यान करायचे आणि मी एकमेव श्रोता. त्या १० व्याख्यानाचा माझ्यावर खूपच परिणाम झाला आणि मी स्वतः विचार करू लागलो. डॉक्टर नेहमी म्हणायचे कि माझ पटत नसेल तर हरकत नाही, पण मी काय म्हणतोय ते एकाल तरी? विचार तर कराल? हळू हळू एक एक गोष्ट उलगडत गेली आणि मी विचार करण्याबरोबरच इतरांशी चर्चाहि करू लागलो. एक प्रश्न शेवटी नेहमी सगळे विचारायचे कि देव आहे कि नाही? मी पण सगळे तर्क लावून विचार केला, डॉक्टरांचेहि मत एकले. त्यापुढे मला उत्तर सापडले ते असे कि ....... देव हि संकल्पना आहे. कुणी गणपतीला देव म्हणतात, कुणी तिरुपती, कुणी अल्ला, कुणी जिजस इत्यादी इत्यादी. म्हणजे देव म्हणून तुम्हाला कुणीतरी सांकेतिक स्वरुपात म्हणजे मूर्ती स्वरुपात हवा असतो. मग नुसती मूर्ती असून उपयोग नाही, त्याला नाव पाहिजे आणि त्याने माणसाला अशक्य असणाऱ्या सर्व गोष्टी केलेल्या असल्या पाहिजेत आणि त्याची कथा असली पाहिजे. (त्याचे पुरावे नसले तरी चालतील) म्हणजे अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्ञानदेवाने उडवलेली भिंत! गेल्या १०० २०० वर्षात विद्यानाने खूप प्रगती केली. गेल्या ३० वर्षात तर विद्यानाचा प्रसार आणि प्रभाव खूपच वाढला. साधारण २० वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट आता काहीच वाटत नाही. म्हणजे घरी बसून परदेशातील क्रिकेटचा सामना लाइव्ह बघणे, (संदर्भ महाभारतातील संजय), विमानात बसून हवेत उडणे (अनेक संदर्भ), अशी अनेक उदाहरणे देत येतील. आज जर एका लहान मुलीला हे सांगितले कि विमान आपोआप किंवा चमत्काराने उडते, देव उडवतोय, तर ती देखील हसेल. कारण त्यामागचे कारण कळले आहे. म्हणजे जी गोष्ट आधी चमत्कार होती, ती करणारा देव होता. त्या गोष्टीचा खुलासा आज विद्यानाने केला आणि कारण कळले कि तिथून देवाची सुट्टी होते. आधी संतान किंवा मुलबाळ हे देवाच्या कृपेने व्हायचे, पण आज कारण कळले आहे, त्यामुळे आज जर कोणी असे म्हटले कि आपला काय नाय बाबा, सगळी देवाची कृपा, तर लोक हसतील किंवा वेगळाच अर्थ काढतील. याही पलीकडे अजून अनेक अशा गोष्टी आहेत कि ज्या का आणि कशा घडतात ह्याची कारणे कळलेली नाहीत. त्यामुळे ते देवच करतोय असे जरी मानले तरी हरकत नाही. पण देवाच्या नावावर ज्या काही भाकड कथा आणि देवाचा जो काही धंदा मांडलाय तो तरी थांबवायला पाहिजे कि नाही? पण तसे होतांना दिसत नाही कारण देव म्हणजे भीती. हे केल तर पाप लागेल, ते केल तर पाप लागेल, नरकात जाल इत्यादी इत्यादी. मग त्यासाठी उपायाचा धंदा. म्हणजे कालसर्प योग आहे, हि पूजा करावी लागेल, सत्यनारायणाची पूजा करा, (आजकाल सत्यानारायनाचे branded पूजेचे साहित्य मिळते), बर सत्यनारायणाची कथा ऐकल्यावर तर जास्तच भीती वाटते. सत्यानारायनाचा प्रसाद घेतला नाही तर नौका पाण्यात बुडते, द्रव्याचा कचरा होतो, आणि पूजा करून "ब्राम्हनास खान पाण आणि दान केले" कि सत्यनारायण प्रसन्न होतो आणि कचरा परत द्रव्यात रुपांतरीत होतो. मला एक साधा प्रश्न पडतो, जर तो देव असेल, तर तो असा खुनशी कसा काय असू शकतो? एकतरी शांत देव आहे का? कि ज्याची पूजा नाही केली तरी त्याला राग येत नाही? बर प्रत्येक पूजेचा लाभार्थी हा ब्राम्हणच कसा काय? देवाने अस कधी का नाही सांगितल कि चांदीची गाय एका शोशितला, गरिबाला दान करा? सगळे सुके मेवे ब्राम्हणालाच का द्यायचे? फक्त ब्राम्हणानेच का पूजा करायची? जसे आजकाल बरेच दवाखाने भीतीचा धंदा करतात, तसाच देवाचा धंदा करणारे वाढतच चालले आहेत. कोण लाल किताब तर कोण हनुमानाचे लोकेट विकतोय. म्हणजे लोकांच्या वाईट परिस्थितीचा गैरवापर करून देवाच्या उपायाचे लालूच दाखवणारे धंदे आज बोकाळत चालले आहेत. कारण देव नीतीने वागायला शिकवत नसून अनीतीने केलेल्या कामांतून सुटका कशी होईल ह्याचा पर्याय झाला आहे. ११ वर्षे पाप करा आणि एकदा कुंभ मेळ्यात स्नान केले कि अकौंट नील, म्हणजे परत पाप करायला मोकळे, दोन नंबरचा पैसा कमावला कि एकदा शिर्डीला त्यातला हिस्सा समर्पित केला कि काळा पैसा पांढरा! बर आजच्या लोकशाहीच्या काळात देवानेही परत जन्म घेवून दाखवावा आणि निवडणूक लढवून जिंकून दाखवावी. परत देवाचीच गोष्ट सांगायची तर अनेक प्रश्न पडतात. देव आहे तर कुणाला दिसत कसा नाही, गणपती फक्त भारतातीलच लोकांना कसा माहित, किंवा भारतातील देव परदेशात का नाहीत, मग ज्यांना इतर देशातील लोक ओळखताच नाहीत, त्यांनी हि सृष्टी कशी काय निर्माण केली? आणि केली तर त्यांना साधे ओळखत पण का नाही? फक्त एकच देव का नाही? का अल्ला, जीजस, इतकी वेगवेगळी देव निर्माण झालीत? बर सगळ्यात मोठी अंधश्रद्धा हि आहे कि "सगळे धर्म एकच सांगतात!" साफ खोट आहे, जर सगळे धर्म एकच सांगत असतील, तर वेगवेगळ्या प्रथा, पद्धती का? हिंदूला जाळतात आणि मुसलमानाला पुरतात का? श्रावण आणि गटारी गटारी अमावस्या किती विरोधाभास आहे बघा , म्हणजे रात्री १२ च्या आत पी पी दारू प्यायची आणि लगेच सकाळी पूजेला बसायचे? श्रावण संपला कि परत सगळा सुरु? बर गम्मत बघा उपवासाला काहीच खायचं नाही, अगदी निरंकार, पण सिगरेट पिला तर चालते, तंबाखू खाल्ली तर चालते, कस काय? आज गुरुवार आहे, आज पार्टी नको? इतर दिवस चालते. म्हणजे दारू पिणे हे दिवसानुसार चांगले आणि वाईट कस काय असू शकते? म्हणजे देव फ़्लेक्जिबल आहे अस म्हणायचं का? कि आज शनिवार आहे ह, आज माझा दिवस आहे, आज दारू पिलास तर बघ, अस कुठे असते का? सरते शेवटी, इतकी वर्षे हा प्रकार चालत आलेला आहे, त्यामुळे काळत पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. हे सगळ मी शिकलेल्या लोकांबद्दल बोलतोय. कि ज्यांना हे सगळ पटत, पण कृतीत आणणे कठीण जाते. कारण फक्त अनाहूत भीती. म्हणूनच म्हणतो कि देव म्हणजे भीती. आणि म्हणूनच मी पठडीतल्या देवाला मानत नाही. देव आहे कि नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो. जी लोक देव मानतात कि देवाची पूजा अर्चना करतात ती लोक वेडी आहेत किंवा वाईट आहेत अस मी मुळीच म्हणत नाही. देव मानणे आणि देवाचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बर इतक्या वर्षांची सवय आहे कि कुणी तरी पाहिजे ना आधाराला? मग जर देवच मानायचा ना तर सोप सांगतो, आपल्या आई वडिलांना देव माना, जे काही तुम्ही देवासाठी करता, ज्या निष्ठेने करता, त्याच्या ५०% जरी तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी केल तरी बघा चमत्कार तुमच्या घरातूनच होतील. मंदिरात दक्षिणा देण्यापेक्षा आई वडिलांना द्या, कठीण प्रसंग आला तर देवाकडे धाव घेण्यापेक्षा आई वडिलांकडे जा, बघा नुस्त उत्तरच मिळणार नाही तर धीर पण मिळेल, शक्ती पण मिळेल आणि समाधान पण. हे सगळा देवानेच निर्माण केलाय न, मग तुम्हाला निर्माण करणारे तुमचे आई वडिलाच आहेत न, मग तुमचा देव म्हणजे तुमचे आई वडील. ते सोडून कुठे इकडे तिकडे पळता? देव जरूर माना पण मूर्तीला नाही, तर जिवंत आई वडिलांना. मग सत्यानारणाची भीती नाही, कि शनीची साडेसाती नाही.

In reply to by सत्याचे प्रयोग

मला या "देव नसतो" वाल्या लोकांचा माजोरडेपणा आवडत नाही. जणू काय देव आहे किंवा नाही हे सिद्ध करायचा मक्ता फक्त आस्तिक लोकांनीच घेतलाय. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर चा हा प्रकार आहे. "कारण कळले कि तिथून देवाची सुट्टी होते" हे फक्त अर्ध-शिक्षित लोकांसाठी खरंय. जोपर्यंत प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणार्‍या गोष्टी आहेत, तोपर्यंत माझा देवावर विश्वास आहे.

In reply to by काळा पहाड

माझे आजोबा म्हणायचे माणूस चंद्रावर गेला की माझा देवावरचा विश्वास उडेल .

In reply to by सत्याचे प्रयोग

मग गेला का माणूस चंद्रावर? निळु भुजबळ अमेरिकेतल्या वाळवंटात फिरुन आला होता ना? -नानाडोंगरकर

वर अनेक लोकांनी 'नास्तिक व अज्ञेयवादी अशा कॅटेगरी हव्या होत्या' असं म्हटलेलं आहे. पण कौलाच्या सोयीसाठी, सोपेपणासाठी फक्त ३ उतरत्या भांजणीचे गट केलेले आहेत. उतरत्या भांजणीचे ५ गट केले असते तर त्यांची २५ कॉंबिनेशन्स होऊ शकली असती. ३ च गट केल्याने फक्त ९ कॉंबिनेशन्स होतात - संकलन करून नंतर त्याचा गोषवारा मांडायला सोपं जाईल. मी तयार केलेले गट हे थोडे तोकडेच आहेत हे मला माझं स्वतःचं मत नोंदवताना जाणवलं. कारण माझे आईवडील कमी धार्मिक गटात असले तरीही मी शून्य धार्मिक आहे. आमच्या घरी वडील कमी आणि आई किंचित धार्मिक स्वभावाची. अधूनमधून सत्यनारायण, घरातल्या देवांची नोकरी सांभाळत आठवड्यातून एकदोनदा पूजा यापलिकडे आईने फारसं काही केलं नाही. तरीही काही कठीण प्रसंगी तिला नवस बोलावासा वाटतो. याउलट मी पूर्णपणे सास्कृतिक हिंदू आहे. देवळात जायला नकार देत नाही, प्रथा म्हणून कोरडेपणे हातही जोडतो. गणपतीच्या आरत्या म्हणतो, आणि तो प्रसंग म्हणून एंजॉय करतो. पण देवाविषयी श्रद्धा, पावित्र्य वगैरे काही वाटत नाही. मुलाला अनेक वर्षं देव म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. आता तो जवळपास आठ वर्षांचा होईल. परवाच त्याने एक प्रसंग सांगितला. तो कोणाकडे गेला असताना त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान मुलगी त्याला काहीतरी गॉड वगैरेविषयी सांगत होती. हे सांगून तो आम्हाला म्हणाला 'आय वॉज लाफिंग इनसाइड माय हेड. देअर इज नो गॉड. अॅंड शी डझंट नो दॅट!' म्हणजे हे प्रकरण तर आमच्याही पुढे आहे. मी शाळेत होतो तेव्हा देव-भूत वगैरे कल्पनांचा बऱ्यापैकी पगडा होता. तो मला स्वतःलाच प्रश्न विचारून उडवावा लागला होता. इथे तर काहीच ओझं नाही. आमच्याकडे तरी आमचे आईवडील ३, मी ४ आणि मुलगा ५ अशी स्थिती दिसते आहे.

In reply to by राजेश घासकडवी

देवळात जायला नकार देत नाही, प्रथा म्हणून कोरडेपणे हातही जोडतो.
मी तर देवळात जाऊनही नमस्कार करत नाही. मस्त रांगेत उभा राहतो. मुर्ती न्याहाळतो. भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पाहतो. आणि तसाच बाहेर पडतो. मी देवाला नमस्कार न करताच रांगेत सरकत आहे हे जर कुणाच्या लक्षात आले तर ती व्यक्ती मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहते. एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)

In reply to by सतिश गावडे

एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :) निवांत ???!!! डोळे भरून ???!!! गर्दी नसतानाही भाविकांना पुढे सरकवण्यासाठी धक्काबुक्की करणार्‍या (माझ्या मते केवळ सवयीने गुंडगिरी करणार्‍या... हे मी त्यांना तोंडावर सांगितले आहे) मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा ! ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा !
हे मी पूर्वी आळंदीच्या मंदिरात करत असे. गेले ते दिवस. राहिल्या त्या आठवणी. ;)

In reply to by सतिश गावडे

+१ मला दूर, एकदम शांततेत असलेली देवळे/प्रर्थनास्थळे आवडतात. तीथली शांतता मनाला भावते. कधी कधी एखादी गुहा जीथे पीनड्रॉप सायलेन्स असतो तीही देवळासारखीच भासते. बाकी लाईन लाउन देवदर्शन करणे खूप कंटाळवाणे वाटते.

In reply to by खटपट्या

मला दूर, एकदम शांततेत असलेली देवळे/प्रर्थनास्थळे आवडतात. तीथली शांतता मनाला भावते. कधी कधी एखादी गुहा जीथे पीनड्रॉप सायलेन्स असतो तीही देवळासारखीच भासते.
श्री. वल्ली उर्फ मा. प्रचेतस सर यांच्याशी संपर्क साधावा.

In reply to by सतिश गावडे

मी तर देवळात जाऊनही नमस्कार करत नाही. मस्त रांगेत उभा राहतो. मुर्ती न्याहाळतो. भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पाहतो. आणि तसाच बाहेर पडतो.
खिक्क... आपलं सामान बघायला आमीबी हे करायचो लय मज्या यायची. सतत लक्ष सामानाकडंच असल्याने भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पहायला मात्र वेळ मिळायचा नाही. तुम्ही लै नशीबवान.
मी देवाला नमस्कार न करताच रांगेत सरकत आहे हे जर कुणाच्या लक्षात आले तर ती व्यक्ती मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहते.
ह्म्म.. हे मात्र अनुभवलं आहे. आम्ही आमच्या सामानासाठी मंदीरात आलो होतो त्या एकनीश्ठेची बाकीच्या लोकांना साली किंमतच नसते :(
एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)
पाहुन झाल्यावर जर भक्तीभावाने त्याच्यापुढे नतमस्तक झाला नाहीत... भलेही तुम्हाला कौतुकाने पहाणारा कोणीही तिथे नसेल तर बात कुच जमी नही असेच खेदाने म्हणावे लागेल. पुन्हा प्रयत्न करायचा. विठठल जरा लाजाळु दैवत आहे.. त्याला आर्जव करावे लागते पण एकदा ते झाले की तो त्याच्या अरतीत म्हटल्या परमाने जिवलग झालाच म्हणून समजा.

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या मुलाला एका विशीष्ट बाजुनेच तुम्ही वाढवत आहात असे प्रथमदर्शनी तरी वाटते. मी कदाचित चुक असेन. पण त्याला तुम्ही देव या बाजुने काहीच ( एक संकल्पना किंवा बघ बाबा काही काही लोकांच अस मत आहे की अस अस असत या अर्थाने पण तुम्ही त्याला जाणीवपुर्वक दुर ठेवत आहात) म्हणजे जस धार्मिक लोक आपली धार्मिकता आचरणातुन पुढे आपल्या मुलाबाळांना कंडीशनींग साठी वापरतात अगदि त्याच रीतीने तुम्ही तुमची नास्तिकता तुमच्या मुलापर्यंत ( त्याचे इतर ऑप्शन्स ऑदर साइड हाइड करुन करत आहात.) त्याचा परीणाम ही स्वाभाविकतेने तुम्ही एन्जॉय करत आहात. पण मग तो पुढे जाऊन कट्टर नास्तिक झाला तर तो जेन्युईन स्वतःच्या वैचारीक प्रवासाने एका विशिष्ट ट्प्प्यापर्यंत ( खाचखळगे अनुभव चिंतन चुक सुधारत हळुहळु वैचारिक प्रगती साधत उत्क्रांत होत ) जसा तुम्ही प्रवास केलेला दिसतोय तसा न होता जसे कट्टर धार्मिक घरात वाढलेले मुल रेडीमेड भुमिकेची चादर पांघरुन सुरक्षिततेची उब मिळवतात तशा मुलांचा तो फक्त दुसरी बाजु असेल. कारण आठ वर्षांचा मुलगा वरील प्रकारच विधान त्याला एका विशिष्ट दिशेने कंडिशनींग केल्याशिवाय बोलत असेल यावर विश्वास बसण अवघड आहे. हे सर्व माझ कल्पनारंजन ही असेल अस प्रत्यक्षात नसेलही प्रामाणिकपणे सांगतो अशी काही कट्टर नास्तिक पालक बघण्यात आहेत म्हणुन वाटल म्हणुन बोलतोय. राग मानु नका.

In reply to by मारवा

१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. कारण देव नसतोच हे काही वैश्विक सत्य नव्हे (जसं देव असतो हे ही नव्हे. त्या दोन्हीपैकी सत्य अजून पुढे यायचं आहे). २) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं. ३) त्याचबरोबर त्याला कुठल्याही मानसिक आधार नसेल. देव हा आपली गरज आहे. ते आपलं अल्टीमेट सेफ्टी नेट आहे. सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.

In reply to by काळा पहाड

त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन आस्तिक बनला असेल तर ती आस्तिकता कणा नसलेली आस्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते. तशीच आणि तितकीच जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन नास्तिक बनला असेल तर ती नास्तिकता देखील कणा नसलेली नास्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते हेच म्हणायच होत एका विवेकी पालकाने मुलांना दोन्ही बाजु तिसरी बाजु अधिकाधिक बाजु केवळ परीचीत करुन दिल्या पाहीजेत. डेटा देऊन मागे व्हायला हवं अस माझ व्यक्तीगत मत आहे इतकचं बाकी तुम्ही जे नास्तिंकावर आक्षेप घेतले आहेत ते प्राचीन च आहेत आशा आहे तुम्हाला त्याचा प्रतिवाद माहीत असेल

In reply to by काळा पहाड

आदर्शवादी मुद्दा आहे की नाही माहिती नाही पण या जगात सगळ्यात जास्त जीव देव आणि धर्माच्याच् नावाने गेलेयत, हे नम्रपणे नमूद करते...

In reply to by स्वप्नांची राणी

यात काही गोष्टींचा गोंधळ झालाय. १. जीव घेणारे लोक देवावर आणि (तथाकथित) धर्मावर श्रद्धा असणारे आहेत असं तुम्ही गृहीत धरताय. २. धर्म सांगतो ते देवाचं सांगणंच असतं असं बर्‍याच लोकांना वाटतं. धर्मावरची आणि देवावरची श्रद्धा एकच आहे असंही तुम्ही गृहीत धरताय. ३. ज्या देवावर श्रद्धा असायला हवी तो देव खराच देव आहे असं तुम्ही गृहीत धरताय. माझ्या मते ही गृहीतकं पूर्णपणे चुकीची आहेत. तुम्ही कुणाची तरी पापं कुणाला तरी चिकटवताय. आता ही गृहीतकं सोडून "खर्‍या देवावरच्या खर्‍या श्रद्धेनं" (धर्मावरच्या नव्हे) किती माणसं मारली ते सांगा.

In reply to by काळा पहाड

१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत.
हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?
खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं
याला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.
सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.
लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?
नाही. कारण देव ही एक खरी की खोटी माहिती नाही पण चांगली संकल्पना आहे. आपल्यातल्या चांगुलपणाचं देव हे एक प्रतिक आहे. पण ही संकल्पना अमूर्त असल्यामुळे, किंवा एकूणच जीवनातल्या अनुभवामुळे बरेच आस्तिक लोक नंतर नास्तिक होतातही. तुमचा स्वतःशी संवाद "देव आहेच" या संकल्पने नंतर "तो खराच आहे का" अशा प्रकारे सुरू होतो. कारण त्याला कुणीच पाहिलेलं नाही. पण "देव नाहीच" या संकल्पने मध्ये मनावर पडदा टाकला जातो आणि स्वतःशी संवाद होतच नाही. जिथे कठोर मतं असतात तिथे संवाद होत नाही. मध्यपूर्वेमध्ये उगम पावलेल्या एका धर्माबद्दल ("बाकीचे काफीरच") आपण ते पाहतोच, नाही का?
याला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.
गुन्ह्याचं स्वरूप भयंकर प्रमाणात बदललेलं आहे असं मला वाटतं. दुर्योधन तेव्हाही होता. पण निर्भयाची केस पाहिली तर दुर्योधन म्हणजे अगदी मवाळ वाटायला लागतो. बाकी धार्मिक दंगली या फक्त आस्तिकच करतात असा काय पुरावा आहे? नास्तिक हे देवावर श्रद्धा न ठेवणारे पण धर्माचा अभिमान असणारे असू शकतात.
लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.
ठीक आहे. ज्याचा त्याचा विचार. पण समाजातले बहुतांशी 'जन' मनाने दुर्बळ असतात. त्यांच्याकडे हा वैचारिक प्रगल्भ पणा असेलच असं नाही. समाजातला प्रत्येक घटक तेवढा प्रगल्भ होईपर्यंत देवाचा प्लासिबो वाईट नाही असं मला वाटतं.

In reply to by काळा पहाड

१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. कारण देव नसतोच हे काही वैश्विक सत्य नव्हे (जसं देव असतो हे ही नव्हे. त्या दोन्हीपैकी सत्य अजून पुढे यायचं आहे).
देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं.
इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.
३) त्याचबरोबर त्याला कुठल्याही मानसिक आधार नसेल. देव हा आपली गरज आहे. ते आपलं अल्टीमेट सेफ्टी नेट आहे. सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.
नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.

In reply to by सतिश गावडे

देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.
वैयक्तिक मत हे अनुभवातून येतं. इतक्या लहान वयात वैयक्तिक मत असेल असं मला वाटत नाही. या वयात आपली मतं आपण आई वडिलांवरूनच ठरवतो. आईवडिलांचा कल बघून आपलं मत ठरवायला मुलं शिकतात. म्हणून टीनएजर्स होईपर्यंत पालकांचे आणि त्यांचे खटके उडत नाहीत. एकदा बाहेरचं वारं लागलं की मगच महायुद्ध सुरू होतं. तेव्हा एक मुद्दा म्हणून मी माझं वेगळं मत मांडलं. बाकी मोठ्या माणसांच्या बाबतीत हे ठीकच आहे. पण लहान मुलांना थोडं देव, भुतं, पर्‍या वगैरे जगात राहू द्यावं असं माझं मत आहे. उगीच त्यांना जगातल्या भीषण गोष्टींची जाणीव करून द्यायची काय घाई आहे?
इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.
दारू पिवू नये असं माझ्या पालकांचं मत आहे. त्यांचं मॉरल दडपण माझ्यावर असल्यामुळे मी दारू पीत नाही. नाहीतर मी प्यालोच असतो. हे फक्त उदाहरण म्हणून. दारू चांगली की वाईट हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे, की देव हा फॅक्टर माणसाच्या स्वच्छंदीपणावर नियंत्रण ठेवणारा फॅक्टर आहे. कशाची तरी भिती आहे म्हणून माणूस स्वतःवर बर्‍याचदा नियंत्रण ठेवतो. मानवी स्वभाव वगैरे आहेच. पण जिथे to be or not to be असा बॉर्डरलाईन वरचा प्रश्न असतो तिथे देव हा घटक चांगलं वागण्याच्या बाबतीत निर्णायक ठरत असावा असं मानायला बरीच जागा आहे.
नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.
हे बोलायला ठीक आहे. मानवी मन हे मशीन नव्हे. "मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल" हा इथे मुद्दा आहे. तो आवाका संपला की माणूस कोसळतो. अशा वेळी मनावरचं अतिप्रचंड दडपण आस्तिक कदाचित त्या सेफ्टी व्हॉल्व्ह मुळे सहन करील. नास्तिक लोकांना ती संधी नाही. जे काही करायचे आहे ते करून झाल्यावर काय?

In reply to by काळा पहाड

२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं. याचा सर्वात प्राथमिक प्रतिवाद एक माणुस धार्मिक आहे म्हणुनच फक्त तो रेप हत्या करत नाही अस म्हणणं म्हणजे त्याला मुलभुत संवेदनशीलता च नाहीये असा होतो. उद्या धर्माने आज्ञा दिल्यावर तो हे सर्व बिनदिक्कत करेल. यात मानवी संवेदनशीलतेच मुलभुत अस्तित्व नाकारण झाल. संवेदनशीलता जीने एक माणुस दुसरया माणसाच्या सफरींग वा वेदनेशी रीलेट करतो ती. एखाद्या बेटावर एखाद्या मुलाला पुर्ण गॉडलेस वातावरणात वाढवलं तर तो ईश्वराविषयी प्रश्न विचारणार नाही पण तो अस्तित्व विषयक प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. मी कोण आहे ? माझ्या सभोवतालाचा माझ्या अस्तित्वाशी काय संबंध आहे ? माझ्या जगण्याच प्रयोजन काय आहे ? इ. तो मुलगा कुठल्याही देवाने धर्माने आज्ञा जरी दिली नाही तरी त्याच्या मित्राला सहकारयाला पुर्ण मानवी कारणांनी प्रेरणांनी नैतिक प्रतिसाद देइल. एक प्रयोग सर्व्हे घेऊन पीटर सींगर आणि मार्क हॉसर यांनी केलाय तो वाचण्यासारखा आहे. तीन वेगवेगळ्या मोराल सिच्युएशन्स त्यांनी धार्मिक व नास्तिक लोकांना दिल्या व त्याची उत्तरे देण्यास सांगितले त्यात आस्तिक व नास्तिक असल्यामुळे उत्तरात फरक पडलेला नाही असे आढळुन आले. डिटेल इथे वाचता येईल. १-http://www.utilitarianism.net/singer/by/200601--.htm फ्रान्स डे वाल यांचे नैतिकतेच्या उत्क्रांती वरील संशोधन Primates and Philosophers: How Morality Evolved हे एक अप्रतिम पुस्तक धार्मिकतेच्या हि अगोदर अस्तित्वात असलेली मानवी अंगभुत नैतिकता कशी उत्क्रांत होत गेली.

स्त्रियांच्या बाबतीत सासरचे घर हा ही एक फॅक्टर असावा. कारण कित्येकदा तुम्ही ज्या घरातून आलात आणि ज्या घरात पोचलात यामधे धार्मिक-अधार्मिक वातावरणात जमिन-अस्मानाचा फरक असु शकतो. माझ्याच बाबतीत पहा ना; आई १ : रोजची पुजा-अर्चा, रामरक्षा ईत्यादी स्तोत्रे नियमीत. वैभवलक्ष्मीचे व्रत बरीच वर्शे करत होती...(कधी फळलं नाही ते सोडा..!!), आम्हां तिन्ही मुलींनांही गणपतीस्तोत्र, शुभंकरोती, मारुतीस्तोत्र, मोरया मोरया मी बाळ तान्हे ई.ई. स्तोत्रे रोज संध्याकाळी नियमीत म्हणायची सक्ती करायची. आमची लग्ने जुळावीत म्हणून कसली कसली व्रते उदा. रुक्मिणी व्रत (?) असे काही काही आम्ही करावीत अशी तिची मनापासून ईच्छा असे. वस्तू हरवली की कार्तविर्यर्जुनाचा मंत्र अजुनही म्हणत राहते. ती पण भरपुर वाचन करते पण जरा योगिनी जोगळेकर टाईप. तरिही विटाळ - शिवाशीव ईत्यादी पाळत नव्हती. दादा २ : संशयीत धार्मिक. देवावर फारसा विश्वास नाही. पण कधी स्पष्ट बोलले नाहीत. पुजा करणे मात्र टाळायचे. मुलीचे लग्न जुळावे म्हणून आईने त्यांना शनीच्या देवळात तेलाचा दिवा लावायला पाठवले. असे ११ शनिवार करायचे होते. त्या देवळात जाईपर्यंत त्यांच्या जिवातजीव नव्हता की कोणीतरी मला हे असलं विचित्र करतांना पाहील. ते अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरले. अर्धा शनिवारही हे व्रत न सांभाळल्याने आमची लग्ने उशिरा झाली... (डोळा मारत) . वाचन भरपुर. शक्यतो ईंग्लिश. मी ३ : खरं म्हणजे ४ आणि ५ : पण हे पर्याय नसल्याने तिसरा निवडला. माझ्या अश्या असण्याचे श्रेय पुर्णपणे घरातूनच आलेल्या वाचनाच्या आवडीला आहे. आधी अर्थातच धार्मिक होते. स्तोत्रे म्हणायचे. एकदा पाचवी सहावीत असतांना तर कुठेतरी बाहेर जायचे होते तेंव्हा अचानक भरपुर पाऊस पडू लागला. तो थांबावा म्हणून मी देवासमोर मांडी घालून बसले आणि 'शरण तुला..." मंत्राचा अखंड जप सुरू केला. पाऊस आण्खीन वाढला आणि पुढचे ४ दिवस थांबलाच नाही.... विचार हळु-हळू वळत गेलेत. पुजा करण्याचा कंटाळा होताच. तरिही परी़क्षेला जातांना देवाला नमस्कार व्हायचाच. हे ही प्रयत्नपुर्वक थांबवले. आणि त्यामुळे निकालावर काही फरक पडत नाही हे पण यथावकाश लक्षात आले. एकदा परिक्षेच्या आधी एका अंगात आलेल्या बाईच्या पाया पडायला आईने पाठवले होते. मी नमस्कार केल्यावर त्या म्हणाल्या "पहीला नंबर येणार आहे हां...पण अभ्यास भरपुर करावा लागेल" . अर्थात हे काही रॉकेट सायंन्स नाहिये. हा प्रसंग बहुतेक माझ्या मनात नास्तिकतेची पहिली ठिणगी पाडून गेला. तसेच त्या बाईंच्या अशिर्वादाने निपुत्रीकांना मुले व्हायची अशी त्यांची ख्याती होती. पण त्यांना स्वता:ला मुल-बाळ नाहीये, यातला विरोधाभासही पहील्या नास्तिक दर्शनाचे कारण ठरला असावा. आता फारच शेफारलेय मी!! सासु-सासरे -१ (उणे एक) : हि पण एक श्रेणी हवी होती ईथे. सासु-सासरे अतिप्रचंड धार्मिक. मुळ नागपुरचे आणि त्यातून देषस्थ असे डेडली काँबो असल्याने घरात पुर्ण वर्षाचे सगळे सण-वार! कुळाचार, करंज्या, पात्या बारा भानगडी !! नागपंचमीचा सण माहित होता. पण त्यादिवशी झाडून सगळ्यांच्या नावाचे, अगदी चुलत घराच्या नावाचेही दिवे बनवायचे, हा अतिप्रसंगच होता. एक एक वेळेला त्या दिवशी घरात २२ गोड पदार्थ बनायचे ! प्रत्येक कुळाचाराला पुरणपोळीचा अत्याचार असायचाच. वर्षातून १२-१५ वेळा तरी पुरणपोळ्या बनत असाव्यात. आधी गणपती १० दिवस असायचे. ते दिड दिवसावर आणले. पण त्या दिड दिवसात १० दिवसांची झाडून सगळी कर्मकांडं ! श्रावण आणि चातुर्मास म्हणजे तर उत नुसता. सणावारांना शिवा-शीव, विटाळ आवर्जून पाळला जायचा. ईथे माझी मतं जाहीर करणं म्हणजे पराकोटीचा संघर्ष होता. तसच वयातल अंतर पाहता ते लोक बदलणही अशक्य होतं. पण तरिही धीमेपणाने का होईना माझ्यापुरता बदल मी घडवलाय. विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच. ईतक्यातच मला सवाष्ण म्हणून जेवणाचे आमांत्रण आले होते. त्या जेवणाच्या आधी अर्धा दिवस उपास ठेवायचा होता. मी सवाष्ण म्हणून जाणे साफ नाकारले. (सवा ष्ण ही संकल्पना मला व्यक्तिश: पटत नाही) छोटा प्रसंग वाटला तरी सवाष्ण जाण्याचे नाकारणे म्हणजे काय असते हे स्त्रीच्या जागी असल्याशिवाय नाही कळू शकणार. चक्क त्यांच्या मुलाच्या आयुष्याशीच खेळ की !! सर्व्हे साठी: पालक - मी = २ - ३

In reply to by स्वप्नांची राणी

मुलीचे लग्न जुळावे म्हणून आईने त्यांना शनीच्या देवळात तेलाचा दिवा लावायला पाठवले. असे ११ शनिवार करायचे होते. त्या देवळात जाईपर्यंत त्यांच्या जिवातजीव नव्हता की कोणीतरी मला हे असलं विचित्र करतांना पाहील. ते अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरले. अर्धा शनिवारही हे व्रत न सांभाळल्याने आमची लग्ने उशिरा झाली... लग्न जुळावे म्हणून शनीमहाराजांची प्रार्थना? अहो तो वैराग्याची देवता आहे. मंद, शनीचर म्हणून प्रसिद्ध आहे. लग्न उशिरा झाले यात काही आश्चर्य नाही मग! किमान देवीची तरी उपासना करायची. असो.

In reply to by मांत्रिक

अहो मांत्रिकबुवा, जसं तुम्ही अजुनही शनी ला महाराज, वैरागी, मंद, शनीचर ई.ई. समजताय ना, तशी त्याच्या कृपेने लग्न जूळतात ही माझ्या आईची त्यावेळी कल्पना होती. पण मला माहितेय की शनी हा एक ग्रह, गॅसचा गोळा आहे. त्याच्या आत अर्थातच लोह, निकेल ई.ई. बरच काही आहे....आणि मंदचर बिंदचर म्हणू नका हां त्याला, पृथ्विपेक्षा बराच फास्ट आहे तो.... (प्लीज...कुठे नेऊन ठेवल्यात स्मायली माझ्या!!! लोकं शब्द-न-शब्द खरा मानत सुटलेत....)

In reply to by स्वप्नांची राणी

चुकीच्या हेतूने चुकीच्या उपासना केल्या तर त्याचा फायदा न होता त्रासच होतो असा तंत्रशास्त्रातील संकेत आहे. हां, तुम्ही काहीच मानत नसाल तर गोष्ट वेगळी! माझा पूर्ण विश्वास (ईश्वरी अस्तित्वावर) असल्याने माझे मत मी मांडले.

In reply to by स्वप्नांची राणी

प्रतिसाद आवडला!!!
विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच.
तुमच्या पुढच्या लढ्यांसाठी शुभेच्छा.

आस्तिकता किंवा नास्तिकता ह्याचा आणि नौतिकतेचा फारसा संबंध नाही. पण नास्तिक असणे ह्यापेक्षा त्याचा जाज्वल्य अभिमान मिरविणे हे जास्त होत आहे. येथील काही प्रतिसाद देखील हेच दाखवित आहेत.

In reply to by स्वप्नांची राणी

हम्म्म. लॉजिकल थिंकिंग. कधीतरी केलं गेल्यानं 'जाज्ज्वल्य' अभिमान वाटणं स्वाभाविक असावं. ;) हलकं घ्या ओ काकी.

In reply to by सह्यमित्र

' आस्तिकता किंवा नास्तिकता ह्याचा आणि नौतिकतेचा फारसा संबंध नाही. पण नास्तिक असणे ह्यापेक्षा त्याचा जाज्वल्य अभिमान मिरविणे हे जास्त होत आहे' - १००% सहमत

नैतिकता हि सर्वस्वी वेगळी बाब आहे तिचा आणि आस्तिक व नास्तिक असण्याचा काहीही दुरान्वयानेही संबंध नाही

In reply to by मारवा

नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध नसला तरी 'खरा' आस्तिक आपोआप नैतिक असतो एवढं नक्की.