Skip to main content

सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 18/05/2018 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
बघूच धावतो कसा? खट्याळ चांदवा... सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा! अजून पाहिली न मी भरात पौर्णिमा उगाच दावतो मला घड्याळ चांदवा! नभावरुन एकदाच हात फेरला उद्या कळेल बातमी..'गहाळ चांदवा!' शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये, तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा! निळ्या नभावरी पिठूर साय पांघरु... उधाणला उरातुनी दुधाळ चांदवा! तनू-तनू तहानली सहाण वाटते हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा! पहाटही नभावरी गुलाल रंगते मिठीत लाजला तिच्या मधाळ चांदवा! —सत्यजित
लेखनविषय:

वाचने 17603
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

दिल चांदवा चांदवा हो गया !

In reply to by सस्नेह

छोटासाच पण खूप सुंदर बोलका प्रतिसाद! वाह् म्हणून दाद द्यावासा! खूप धन्यवाद!

आहा!

तनू-तनू तहानली सहाण वाटते हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा!
जियो! अप्रतिम कल्पना...! एकेक शब्द मनात घोळवत घोळवत हे कडवं म्हणतोय केव्हापासून. सये तुझ्या तनूवरी हा चंद्र मी उगाळतो चांदण्यांच्या वणव्यात साऱ्या जीव कसा पोळतो

In reply to by एस

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद एस! आपण लिहिलेल्या ओळीही सुंदर आहेत! त्यांतील पहिल्या ओळीवरुन अजून दोन ओळी सुचल्या,ज्या सदर गझलेसाठीच,दुसरा मतला—'हुस्नेमतला',असू शकतील... "सये तुझ्या तनूवरी उगाळ चांदवा, दिसेन मग जरा तरी नव्हाळ चांदवा!" धन्यवाद!

छानच अगदी.

+१११

शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये, तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा! हे भारी आवडलं. असं कधी वाचनात नव्हतं आलं. मस्तच

आवडली रचना. -दिलीप बिरुटे

शाली,प्राची,प्रचेतस,पद्मश्री,शिव कन्या,संजय पाटिल,सविता,अभ्या,बिरुटे सर,यशोधरा... आपण सर्वांनी अनेकवेळा अवर्जून प्रतिसाद नोंदवून दाद दिलीत,लिखाणास प्रोत्साहन दिलेत,त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

सत्यजित साहेब , आपल्या कविता मला फार भावतात . आपण फारच सुंदर विचार करता . सुंदर कविता .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

सुरेख आणि रेखिव रचना.