भरवू नकात आता...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
1 Aug 2017 - 4:42 pm

भरवू नकात आता बाजार आरश्यांचा
येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा!

अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या
केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!

मीही जरा-जरासा संदिग्ध होत गेलो
संदिग्ध होत गेला व्यवहार आरश्यांचा!

तू ही परी प्रमाणे स्वप्नात बागडावे
देऊ कसा तुला मी उपहार अारश्यांचा!

ते वागले असावे लपवून चेहऱ्यांना
तेंव्हाच शक्य झाला अपहार आरश्यांचा!

सांभाळुनीच लावा आता जरा मुखवटे
होणार आज आहे,यल्गार आरश्यांचा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

रचना ठीक. पण एक सांगावेसे वाटले, म्हणून..

तुमच्या रचना छान असतात, गेय असतात.
त्यांचा थोडा संदर्भ, रूपरेषा जर आधी किंचित मांडली तर कवितेशी समरस होऊन आस्वाद घेणे अधिक आवडेल.
पटले तर प्रयोग करुन बघावा. चु.भु.द्या.घ्या.

राघव

सत्यजित...'s picture

16 Aug 2017 - 12:29 am | सत्यजित...

राघवजी,प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
माझ्याकडून सहसा,गझल लिहिण्याचाच प्रयत्न केला जातो! गझलेची रचना मुळातच छंदबद्ध असल्याने,तिच्यात गेयता सहजच उतरुन जाते!
गझलेचा प्रत्येक शेर,ही एक स्वतंत्र कविता असल्याने,तसेच प्रत्येक शेरात वेगळा विषय मांडण्याचे स्वातंत्र्य (गैरमुसलसल)गझल देत असल्याने,संपूर्ण गझलेची रुपरेषा मांडणे (निदान गैरमुसलसल गझलेबाबतीत) अवघड आहे!
शिवाय गझलेत विधाने केली जात नाहीत.एक विचार एकाच शेरांत पूर्णपणे व्यक्त होणे गरजेचे असतानाच,प्रत्येक शेर आपआपल्या प्रतिमांत व्यक्त होणे गरजेचे असते! शिवाय रसिकांना आप-आपले अनुभव,ईच्छा ई. अनुसार प्रतिमांचे अर्थ,संदर्भ शोधण्याचे स्वातंत्र्य गझल देत असते,हि तिची एक खासियत आहे!
धन्यवाद!

शब्दबम्बाळ's picture

16 Aug 2017 - 8:38 am | शब्दबम्बाळ

खरं तर माफ करा म्हटलं पाहिजे! जे काही लोक चांगलं लिहितात ते बऱ्याचदा दुर्लक्षित राहत...
इतक्या दिवसांनी पहिली हि गझल, तुम्ही लिहिता छानच.. लिहीत रहा! :)

खासकरून हे दोन आवडले -
"तू ही परी प्रमाणे स्वप्नात बागडावे
देऊ कसा तुला मी उपहार अारश्यांचा!"

"अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या
केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!"

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार शब्दबंबाळ!
>>>खरं तर माफ करा म्हटलं पाहिजे! जे काही लोक चांगलं लिहितात ते बऱ्याचदा दुर्लक्षित राहत...>>>आवड आणि सवड यांची सांगड घालताना रसिकांकडून असं होत असावं कधी-कधी! पण अनेक वाचनांनंतरही कसलाच,एकही अभिप्राय मिळाला नाही तेंव्हा आपण रसिकापर्यंत पोहोचू शकलो नाही की काय अशी खंत डोकावून जाते एखादवेळी! अशांत आपल्या प्रतिसादासारखा येणारा अनुभव मात्र ऐन दुष्काळात एखादी सर कोसळून जावी असा अल्हाददायक असतो! धन्यवाद!